रात्रीचे साडे-बारा वाजत आले होते. सिनेमा संपत
आला होता तरी थियेटरमध्ये हास्य लहरी थांबत नव्हत्या. सिनेमा संपला. हळू हळू दिवे
सुरू होऊ लागले तसे प्रेक्षक जागेवरून उठू लागले. "काय कॉमेडी पिक्चर
यार...", "आजवर इतकी हसलेच नव्हते
मी...", "पेट दुखने लगा यार हँसते हँसते..."
असे संवाद ऐकू येऊ लागले. सर्व दाराकडे जाऊ लागले इतक्यात, "मोहित, मोहित अरे काय झालं... अरे ऊठ..." हे
बोल ऐकून सर्व तिथे पाहू लागले. दिव्यांच्या प्रकाशात एका रांगेत मधल्या खुर्चीवर
एक मुलगा बसला होता आणि दुसरा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होता. बसलेल्या मुलाचा
चेहेरा पांढरा पडला होता, डोळे मोठे झाले होते आणि तोंड सताड
उघडं होतं. तो मुलगा मेला होता...
पोलीसांना ताबडतोब कळवलं गेलं. तपास सुरू झाला.
इंस्पेक्टर ने मोहितसोबत असलेल्या मुलाला काय झालं ते विचारलं. तो म्हणाला,
"सर, मी विक्रम. हा माझा भाऊ मोहित. उद्या
रविवार म्हणून आज हा नाईट शो पहायला आम्ही आलो. अगदी शेवटपर्यंत मोहित छान मजा घेत
होता. लाईट लागले तर मला मोहित असा दिसला..." इंस्पेक्टरने लगेच विचारलं,
"तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं..." यावर विक्रम म्हणाला,
"पिक्चर संपायच्या मिनिटभर आधी मोहित म्हणाला होता,
"विकी, अरे हे काय दाखवत आहेत..."
मी काही रियॅक्ट करणार इतक्यात पिक्चरच संपला. लाईट लागले आणि..." विक्रमचं
बोलणं संपलंच होतं तोवर हवालदार जवळ येत म्हणाला, "सर,
बॉडीवर कसल्याही खुणा नाहीत. सगळ्या वस्तूही तशाच आहेत..."
हवालदाराकडून बॉडीकडे पाहत इंस्पेक्टर म्हणाले,
"थियेटरच्या मॅनेजरला बोलावून आणा..." नंतर विक्रमकडे
पाहत म्हणाले, "मृत्यू कशाने झाला ते सांगणं कठीण आहे
पण मोहितचा चेहेरा पाहता असं वाटतंय की त्याने काहीतरी भयानक पाहिलं
असावं..." इंस्पेक्टरला मध्येच तोडत विक्रम म्हणाला, "भयानक... सर, पिक्चर तर कॉमेडी होता..." हा
संवाद सुरूच होता की एक माणूस समोर आला. त्याला पाहून इंस्पेक्टरने विचारलं,
"तुम्ही..." तो माणूस म्हणाला, "सर, मी थियेटरचा मॅनेजर आहे. बाजूच्याच
बिल्डिंगमध्ये राहतो..." हे ऐकताच इंस्पेक्टर म्हणाला, "हे बघा, इथे एक मृत्यू झाला आहे. जोवर तपास पूर्ण
होत नाही, तोवर हे थियेटर आम्ही सील करत आहोत..."
इंस्पेक्टरच्या मुखातून हे शब्द ऐकताच मॅनेजरने हलकेच उद्गार काढले, "परत..."
मॅनेजरचे हे शब्द ऐकताच इंस्पेक्टर त्याच्याकडे
वळत म्हणाले, "परत म्हणजे... काय म्हणायचं
आहे तुम्हाला..." मॅनेजरने डोक्यावरचा घाम पुसला आणि बोलते झाले,
"आठ वर्षांपूर्वी या थियेटरमध्ये अशीच घटना घडली होती.
त्यावेळी नवीन नवीन थियेटर्स झाल्याने व आमचं थियेटर जुनाट असल्याने इथे फारसं
कोणी फिरकत नसे. मालक थियेटर विकून कायमचे शहर सोडून जाण्याच्या विचारात होते. एका
रात्री खूप उशीरा मालकाचा मुलगा आणि त्याचे मित्र थियेटरवर आले. मालकाचाच मुलगा
असल्याने चौकीदाराने त्याला अडवला नाही. माझी ड्यूटी सहाला संपल्याने मी निघून
गेलो होतो. सवा बाराच्या सुमारास चौकीदार मला बोलवायला आला. मी जाऊन पाहिलं तर
सीटवर एक मुलगा होता. भितीने त्याचा मृत्यू झाला होता. त्याच सीटवर जिच्यावर आज
हा..."
इंस्पेक्टर, हवालदार
व प्रेक्षक एकमेकांकडे पाहू लागले. मॅनेजर म्हणाला, "पोलीसांनी
तपास केला, पण काहीच हाती लागलं नाही. इथे नक्की काय झालं ते
कोणालाच माहीत नाही. केस संपल्यानंतर सहा वर्ष हे थियेटर असंच बंद पडून होतं. कोणीच
थियेटर विकत घ्यायला तयार नव्हतं. मालक व मालकाचा मुलगा शहर सोडून निघून गेले.
मीही पोटापाण्यासाठी पडेल ते काम करून दिवस ढकलू लागलो. अखेर मागच्या वर्षी एका
माणसाने हे थियेटर विकत घेतलं. मी त्याला विनंती केल्यावर त्याने मला नोकरीवर
ठेवलं. रिनोव्हेशन केल्यावर मागच्याच आठवड्यात हे थियेटर पुन्हा सुरू झालं आणि
आज..." ऐकणाऱ्या कोणालाच काही कळत नव्हतं. इंस्पेक्टरने बॉडी ताब्यात घेतली व
थियेटर सील करून निघून गेला. विक्रम मात्र गोंधळला होता. हा काहीतरी वेगळा प्रकार
आहे असंच त्याला वाटत होतं...
विक्रम दिवसभर विचार करत राहिला घडलेल्या घटनेचा.
अखेर त्याने ठरवलं की पोलीस त्यांच्या परीने तपास करतीलच, पण आपणही या प्रकरणाचा छडा लावायचा प्रयत्न करायचा. विचार मनाशी पक्का
करून विक्रम थियेटरजवळ पोहोचला. त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. विक्रमने
विचार केला, “मालकाच्या मुलाच्या मित्राचा मृत्यू रात्री
बाराच्या सुमारास झाला होता आणि काल मोहितसुद्धा त्याच सुमारास गेला. दोन्ही
मृत्यूंची वेळ सारखी कशी काय... इथेच काहीतरी पाणी मुरतंय. मला बारा वाजायची वाट
पहायला लागेल...” चौकीदारांची नजर चुकवून विक्रम थियेटरच्या मागच्या बाजूला आला.
जिन्याच्या बाजूला लावलेल्या काचांमध्ये एक काच थोडी उघडी होती. हळू हळू ती काच वर
ढकलत विक्रमने आत प्रवेश केला. ऑडिटोरियममध्ये जाऊन बारा वाजण्याची वाट पाहू
लागला...
काही क्षणातच बारा वाजले. विक्रम इकडे-तिकडे पाहू
लागला. पण काहीच घडत नसल्याने विक्रम जागेवरून उठला. काही विचार करून तो त्याच
जागेवर बसला जिथे मोहित बसला होता. एक-दोन मिनिटेच गेली असतील. अचानक पडदा लखलखू
लागला. अचानक आलेल्या आवाजाने विक्रम दचकला आणि प्रॉजेक्टरकडे पाहू लागला. त्या
बाजूला पूर्ण अंधार होता. विक्रम विचारात पडला,
“प्रॉजेक्टर रूम जर बंद आहे तर पडद्यावर प्रकाश कसा पडला...” तेवढ्यात पडद्यावर
काही चित्र दिसू लागली. डोळ्यातून रक्त सांडत येणारी एक आकृती, थडग्यातून धाडकन वर येणारा एक हात, याचसोबत
चित्रविचित्र आवाज येऊही लागले. खुर्चीवर बसलेला विक्रम थोडा घाबरला खरा पण एका
क्षणापूर्वी तिथे काहीच नव्हतं हे लक्षात येऊन चिडून तो म्हणाला, “काय चाललंय हे... इथे असं काय आहे जे घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे...
कोण आहे इथे...”
विक्रम अजून काही बोलणार इतक्यात प्रॉजेक्टर
रूममध्ये प्रकाश दिसला आणि झारोख्यातून एक प्रकाश किरण पडद्यावर पडला. इतका वेळ
ज्या पडद्यावर विचित्र भयाण गोष्टी दिसत होत्या तिथे आता एक मोठी इमारत दिसू
लागली. तिथे अनेक जणांची ये-जा होत होती,
गोंगाट होत होता. विक्रमला लक्षात आलं की हे नक्कीच एखादं कॉलेज असावं. विक्रम
विचारच करत होता इतक्यात, “धीरज, तुझं
थियेटर विकलं जातंय म्हणे...” या आवाजाने तो धाचकला आणि पडद्याकडे पाहू लागला... पडद्यावर
घड्याळ दिसू लागलं. घड्याळाचे काटे वेगाने उलट्या दिशेला फिरू लागले. काही क्षणातच
काट्यांचा वेग मंदावला आणि क्षणातच घड्याळ गायब होऊन पुन्हा तेच कॉलेज दिसू
लागलं...
कॉलेजच्या आवारात एका बाईकच्या आसपास दोन मुलं
होती. बाईकवर बसलेला मुलगा म्हणाला, “हो
ना यार, हे मॉल झाल्यापासून आमच्या थियेटरकडे जास्त कोणी फिरकतच नाही... पप्पा
थियेटर विकण्याच्या विचारात आहेत यार...” तेवढ्यात समोरून एक मुलगा येताना दिसला.
धीरजने त्याला, “ए समीर...” अशी हाक मारली. समीर जवळ येताच धीरज म्हणाला, “काय रे सम्या, कुठ निघालास... पूजाकडे का...” समीर
थोडा लाजल्यासारखा झाला आणि म्हणाला, “काय करू यार... मला
खूप आवडते पूजा, पण ती मला दादच देत नाही रे...” समोरच उभा असलेला तेजस म्हणाला, “अरे मुली काय अशातशा पटतात का... त्यांना हिरोगिरी आवडते. तू काहीतरी
धाडस कर म्हणजे पूजा तुझ्याकडे येईल बघ...” तेजसचे शब्द ऐकताच धीरज म्हणाला, “येस, एकदम परफेक्ट... समीर आम्ही तुझी मदत करतो.
आज रात्रीच तू कर धाडस...”
समीरचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून धीरज म्हणाला, “अरे असं काय करतोस... पूजाला मिळवायचं आहे ना तुला... मग एक धाडस करच...
हे बघा माझं थियेटर तसं रिकामंच आहे. आणि आज रात्रीचा शो पण कॅन्सल झालाय. आपण एक
काम करू, तू थियेटरमध्ये एकटा बसून दाखव. फक्त पाच मिनिटं
बस. ते शूट करून आम्ही पूजाला दाखवतो. मग बघ... तुझ्यासारख्या धाडसी मुलाच्या
प्रेमात बुडून जाईल ती...” हे ऐकल्यावर समीरची कळी खुलली. धीरजशी हस्तांदोलन करून
समीर त्याच्या वाटेने निघून गेला. तो लांब गेल्यावर धीरज म्हणाला, “साला, थियेटरचा मालक मी,
मोठा माणूस मी, बाईक माझ्याकडे, आणि हा
समीर घेऊन जाणार पूजला... या पूजावर किती दिवसांपासून माझा डोळा आहे, आणि हा... पण आजच याला धडा नाही दिला तर नावाचा धीरज नाही. या समीरला
अंधारात एकटं बसायची जाम भीती वाटते. याचाच मी फायदा घेणार हा...हा...हा...”
रात्री साडे अकरा वाजता समीर थियेटरवर पोहोचला.
थियेटर सामसूम होतं. अंधाराशिवाय तिथे दुसरं काहीच दिसत नव्हतं. गेटवर धीरज आणि
तेजस त्याची वाटच पाहत होते. समीर आल्यावर धीरजने कुलूप उघडलं आणि तिघं आत गेले.
त्याही वेळेला धीरजने सामोसे आणि कॉल्ड ड्रिंकची व्यवस्था केली होती.
खाण्या-पिण्यात १५-२० मिनिटं गेली. धीरज म्हणाला, “समीर, पावणे बारा झालेत. आता तू आत जा. आम्ही दोघे
प्रॉजेक्टर रूममधून तुझं शूटिंग करतो...” समीरचा चेहेरा पाहत तेजस म्हणाला, “समीर, तुला भीती वाटते आहे का... नाही बरोबर
आहे... धीरज, अरे दहा मिनिटं काही लावता येईल का
स्क्रीनवर...” धीरज म्हणाला, “बाय ऑल मीन्स. प्रॉजेक्टर
रूममध्ये काहीतरी असेलच. समीर, आता आम्ही प्रॉजेक्टर
रूममध्ये जातो. शूट झालं की लगेच ऑडिटोरियममधले लाईट लावतो. फक्त पाच मिनिटं, आणि
उद्या पूजा तुझी...”
पूजाचं नाव ऐकताच समीरची भीती थोडी कमी झाली. समीर
दार उघडून आत गेला. तेजस आणि धीरज प्रॉजेक्टर रूममध्ये पोहोचले. अंधारात चाचपडत
मोबाईलच्या प्रकाशात समीर हळू हळू पुढे जात होता. तो खुर्चीवर बसला. अंधाराचं आणि
शांततेचं साम्राज्य आजून-बाजूला पसरलं होतं. खुर्चीत बसलेल्या समीरच्या मनात
भीतीने जोर धरायला सुरुवात केली. तेवढ्यात पडद्यावर एक कार्टून लागलं. समीरने घड्याळ
पाहिलं. बाराला एक मिनिट होतं. “तेजस आणि धीरज आपल्याला शूट करतच असतील. ते झालं
की लाईट लागतीलच. तोवर समीर, घाबरू नकोस. काही होत नाही. ते दोघं आहेतच इथे...”
समीर स्वत:च बडबडत होता. तिथे प्रॉजेक्टर रूममध्ये तेजस म्हणाला, “धीरज मघाशी तू मला खूण केली तसं मी समीरला विचारलं. पण तुझ्या मनात आहे
तरी काय...”
धीरज हसत म्हणाला, “माझ्या आणि पूजाच्या मध्ये येतो काय... आता या समीरला अशी अद्दल घडवतो
ना की कॉलेजच नाही तर शहर सोडून जाईल...” इतकं म्हणत धीरजने बाजूला पडलेली एक रीळ
उचलली आणि प्रॉजेक्टरमध्ये घातली. तिथे ऑडिटोरियममध्ये स्क्रीनवरच्या कार्टूनची
जागा अचानक एका भयाण स्मशानाने घेतली. चित्र-विचित्र आकृत्या आणि घोंघावणारे आवाज
यांनी स्क्रीन आणि ऑडिटोरियमभर थैमान घालायला सुरुवात केली. पूजाच्या विचारात
असलेल्या समीरला अचानक कार्टूनऐवजी हे सगळं भयाण व किळसवाणं दिसू लागल्याने तो
जागीच खिळला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. अचानक थडग्यातून एक रक्ताळलेला
हात बाहेर आला...
तिकडे प्रॉजेक्टर रूममध्ये उभे असलेले तेजस आणि
धीरज याची मजा घेत होते. तेजस म्हणाला,
“धीरज, आता बस कर. समीरला धडा मिळाला असेल...” इतकं बोलून
तेजसने प्रॉजेक्टर बंद केला आणि लाईट लावले. धीरज म्हणाला,
“असा कसा बसल्या बसल्या धडा मिळेल त्याला... आता त्याला चांगला धमकावतो...” तेजस
आणि धीरज ऑडिटोरियममध्ये पोहोचले. समीरजवळ पोहोचताच दोघांनाही धक्का बसला. समीरचा
चेहेरा पांढरा फटक पडला होता. डोळे बाहेर आले होते आणि तोंड सताड उघडं होतं.
तेजसने समीरला हलवलं पण काही उपयोग नव्हता. समीर जागच्या जागीच मेला होता. तेजस
आणि धीरज खूप घाबरले. धीरजने जरा विचार केला आणि तो तेजसला म्हणाला, “हे बघ तेजस, हे लपवून आपण वाचू शकणार नाही. उलट
आपण सर्वांना सांगू की आम्ही आज पिक्चर पहायला आलो होतो आणि अचानक समीर गेला. ही
आयडिया समीरचीच होती असंही आपण सांगू...”
अचानक सर्व गोठलं. स्क्रीनवर घड्याळ पुन्हा दिसू
लागला. आता घड्याळाचे काटे वेगाने योग्य दिशा पकडून फिरू लागले. काट्यांचा वेग
मंदावून ते थांबले आणि काळ आजच्या घडीला परत आला. सर्वत्र अंधार पसरला. विक्रम
विचार करू लागला, “असा झाला होता तर
समीरचा मृत्यू... आणि आपला मृत्यूदाता अजून जिवंत आहे हा सल बोचत असणार त्याला.
समीरला मुक्ती देण्यासाठी मला काहीतरी करायला हवं. पण हे पोलीस दाद नाही लागू
देणार मला. त्यांची मदत घायची तर पुरावे कुठून आणायचे... मलाच पावलं उचलायला
हवीत...” सकाळी विक्रम थियेटर मॅनेजरला भेटला. त्याच्याकडून धीरजच्या घरचा नंबर
मिळवून विक्रमने धीरजला फोन लावला. “मी एक शुभचिंतक बोलतोय. आठ वर्षांपूर्वी
थियेटरमध्ये काय घडलं होतं हे मला माहित आहे. तुझं नाव गुप्त ठेवायचं असेल तर ताबडतोब
थियेटरवर ये...” असं सांगून विक्रमने धीरजला बोलावून घेतलं. काही तासात धीरज तिथे
आला. आता खऱ्या नाट्याला सुरुवात होणार होती...
धीरज ऑडिटोरियममध्ये आला. खुर्चीवर समीरला बसलेला
पाहून तो जरा चरकला. “स....समीर... त...तू... कसा काय... त...तू तर आ...ठ वर्षांपूर्वी...
नाही तू समीर असूच शकत नाहीस... खुर्चीवर निपचित पडलेल्या त्या देहाजवळ जाऊन
धीरजने त्याला हलवलं. विक्रमने धीरजकडे पाहताच धीरज चरकला आणि मागे होत म्हणाला, “क...कोण आहेस तू... इ...थे काय करतो आहेस...” धीरजच्या प्रश्नाला उत्तर
देत विक्रम म्हणाला, “तुझ्या नीच कृत्यामुळे याच खुर्चीवर
दोन दिवसांपूर्वी मी माझ्या भावाला गमावलं. आता पोलीस स्टेशनला येऊन, आठ
वर्षांपूर्वी तुझ्यामुळे समीर मेला, हे बऱ्याबोलाने कबूल कर...” लगेच धीरजचा नूर
बदलला. तो म्हणाला, “अच्छा, कालच्या पेपरमध्ये ज्याची बातमी
वाचली तो तुझा भाऊ होता तर. असो... फार वाईट झालं. आता तुलाही तुझ्या भावाकडे
पाठवून देतो. तुझ्यासकट पूर्ण थियेटर पेटवून देतो. म्हणजे बातमी होईल की
थियेटरमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि पोलीस बंदोबस्त असतानाही आगाऊपणे आत घुसलेल्या
विक्रमचा लागलेल्या आगीत जळून मृत्यू झाला... समीर जसा सस्पेन्समध्ये मेला तसाच
तूही मरशील... हा..हा...हा...”
“माझ्याबद्दल नाही बोललास धीरज...” धीरज हसतच होता
की या आवाजाने तो आणि विक्रम दोघंही दचकले. आवाज स्क्रीनमधून येत होता. दोघांनीही
स्क्रीनकडे पाहिलं तर तिथे घड्याळ दिसत होतं. काटे उलट्या दिशेने फिरत जाऊन काही
क्षणात थांबले. आता आठ वर्षांपूर्वीचं ऑडिटोरियम दिसत होतं. समीरचा मृतदेह खुर्चीत
होता. धीरज आणि तेजस बाजूला उभे होते. “ही आयडिया समीरचीच होती असंही आपण
सांगू...” असं धीरजने म्हणताच तेजस आणि धीरजने बोंबाबोंब केली. पोलीस तपास झाला
आणि थियेटर सील केलं गेलं. तेजस खूप अस्वस्थ होता. त्याने धीरजला सांगितलं, “धीरज, आपल्याला समीरला फक्त घाबरवायचं होतं रे आणि
तो बिचारा तर... मला हे सहन होत नाहीये... माझं मन खातंय मला... मी पोलिसांना सगळं
सांगणार आहे...” त्याला गप्प करत धीरज म्हणाला, “तेजस, इथे बोलू नकोस... जरा शांत रहा. तू रात्री थियेटरवर ये. आपण तिथे
बोलू...”
रात्री तेजस थियेटरवर पोहोचला. धीरज गेटजवळ उभा
होता. तेजस येताच दोघं मागच्या दाराने आत गेले. प्रॉजेक्टर रूम जवळ येताच तेजसचा
गळा पकडत धीरज म्हणाला, “पोलिसाना सगळं
सांगणार तू... मला अडकवणार तू... आता तू ही गायब होशील आणि कोणाला पत्ताही लागणार
नाही...” असं म्हणत धीरजने तेजसचा गळा आवळायला सुरुवात केली. काही क्षणात तेजस
जमिनीवर कोसळला. धीरज त्याला उचलून थियेटरच्या मागच्या बाजूला घेऊन आला.
पार्किंगमध्ये तेजसच्या शरीराचे तुकडे करून ते एका मोठ्या सूटकेसमध्ये भरून ती
सूटकेस जंगलात घेऊन गेला. तिथे सूटकेसला आग लावल्यावर धीरज निघून गेला...
आग धगधगू लागली आणि धीरज परत फिरला. अचानक स्क्रीन
गोठली. पडद्यावर तेजसचा भाजलेला आणि रक्ताळलेला चेहेरा दिसत होता. तो म्हणाला, “धीरज, तू माझ्या शरीराचे तुकडे केलेस आणि क्रूरपणे
मला मारलंस. जेव्हा तू तुकडे करत होतास, तेव्हा मी जिवंत
होतो. अंगात त्राण नसल्याने मला ओरडताही आलं नाही. पण आता मी बदला घेणार... माझाही
आणि समीरचाही... हा...हा...हा...” पडद्यावर तेजस हस्त राहिला. थियेटरचं दार उघडलं
गेलं. तेजसने विक्रमला बोट दाखवून इशारा केला. विक्रमने मान हलवली आणि तो
दाराबाहेर पडला. धीराजही जायला निघाला पण तो जागीच खिळला आणि आपोआप येऊन त्याच
खुर्चीत बसला. दार बंद झालं आणि एक आर्त किंकाळी ऑडिटोरियमभर घुमली...
सकाळी पोलीस थियेटरमध्ये आले. आठ वर्षांपूर्वी एक
मुलगा आणि चार दिवसांपूर्वी मोहित ज्या जागी मेले होते, त्याच खुर्चीवर तशाच
पद्धतीने धीरजला मेलेलं पाहून पोलीस संभ्रमात पडले. पेपरातली ही बातमी वाचून
आपल्या घरी विक्रम मनोमन सुखावला...
समाप्त.
