रात्रीचे बारा वाजून गेले होते. स्टेशनला ट्रेन थांबली आणि विलास खाली उतरला. "हे स्टेशन आहे..!! माणूस तर जाऊ देत, साधं कुत्रंही दिसत नाही ते..." स्वत:शीच पुटपुटत विलास आजूबाजूला पाहू लागला. इतक्यात ट्रेन सुटली. जाणाऱ्या ट्रेनचा काय तो आवाज येत होता. नजरेचा टप्पा पार करून ट्रेन दिसेनाशी झाली आणि स्मशान शांतता पसरली. रातकिड्यांचा आवाजच होता जो या शांततेचा भंग करू पाहत होता. विलासने पुन्हा स्टेशनवर नजर फिरवली...
आडगावातलं छोटंसं स्टेशन ते. एखादी गाडी क्वचितच यायची इथे. विलासने सभोवार पाहिलं. स्टेशनवर कोणीच नव्हतं. बॅग उचलून विलास गेटजवळ आला. तिथे एका बाकावर एक हमाल पेंगत बसला होता. त्याला हलवत विलासने विचारलं, "दादा... जांभेकरांच्या वाड्यावर जायचं आहे. कसा जाऊ... ओ दादा..." डोळे चोळत चोळत तो हमाल उठला आणि एका दिशेला बोट दाखवत म्हणाला, "ह्यो रस्ता तुम्मासनी जांबेकरांच्या वाड्याकडं घेऊन जाईल. ४-५ मैल लांब हाय त्यो वाडा. थितं पोचाया तासभर तरी लागल. या वक्ताला टांगा बी नाय मिळायचा. त्यापेक्षा तुम्मी हितंच रात काडा आन् उजाडल्यावर जा की... न्हाय रस्ता सामसूम हाय, बाजूला जंगल हाय आन् आवस बी हाय ओ..."
विलास उभा राहत म्हणाला, "अहो दिवसभर प्रवास करून इथवर पोहोचलो आहे. आता वाडा टप्प्यात आला असताना मला इथे थांबवणार नाही. एकदा पोहोचलो तिथे की बरं वाटेल मला. धन्यवाद बरं का..." बॅग गळ्यात अडकवून विलास स्टेशनबाहेर पडला. जसजसा विलास पुढे जात होता तसा तसा स्टेशनमधून येणारा उजेड कमी होत होता. विलास एका वळणावर उभा होता. त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि सर्वत्र अंधाराचं साम्राज्य दिसू लागलं. तो एक पाऊल मागे आला तर स्टेशनच्या दिव्यांचा मिणमिणता प्रकाश त्याला दिसू लागला. विलासने धीर करून अंधारात बुडालेल्या रस्त्यावर पाऊल टाकलं...
दोन्ही बाजूला गर्द झाडी, रातकिड्यांचा आवाज, पानांची सळसळ आणि अमावस्येमुळे चंद्राच्या प्रकाशाचा आभाव, यांमुळे विलास थोडा घाबरला होता. त्याला घाम फुटू लागला होता. त्याने चालण्याचा वेग वाढवला. तो पुढे जात होता आणि वातावरण अधिकच अंधारं होत गेलं. इतक्यात काहीतरी हवेत तरंगत त्याच्या समोरून गेलं. विलास थबकला. एक क्षण त्याला कळेचना काय झालं. घामाचा एक ओघळ त्याच्या कानामागून खाली आला. स्टेशन पार करून पंधरा मिनिटंच झाली असतील. विलासला वाटलं आता धावत सुटावं आणि स्टेशन गाठावं. तो काही हालचाल करणार इतक्यात, "घाबरू नकोस मुला, वटवागूळ होतं ते..."
हे शब्द कानी पडताच त्याने चपापून मागे पाहिलं. एक वृद्ध माणूस मागे उभा होता. चेहेऱ्यावर प्रसन्न हसू आणि डोळ्यांत चमक असणारा तो माणूस विलासच्या जवळ येत म्हणाला, "घाबरू नकोस मुला. जंगल आहे ना हे, वटवागुळं फिरतच असतात इथे. पण तू कोण..? आणि या आडवेळेस इथे काय करतो आहेस..? त्या आजोबाला पाहून विलासला जरा धीर आला. तो म्हणाला, "आजोबा, मी माझ्या आजोळी चाललो आहे. दत्तात्रय जांभेकर माझे आजोबा. तिथेच निघालो आहे..." हे ऐकताच ते आजोबा प्रसन्नतेने म्हणाले, "अरे... म्हणजे तू दत्ताचा नातू विलास ना... किती मोठा झालास रे... अगदी लहान असताना पाहिलं होतं तुला, जेव्हा गाव सोडून तुझे बाबा शहराकडे गेले. त्यानंतर आज पाहतो आहे मी तुला..."
विलास ऐकत होता पण त्याला या माणसाची ओळख पटत नव्हती. शेवटी तो माणूसच म्हणाला, "तू मला ओळखलं नसशीलच... अरे मी गजाभाऊ. तुझा आजा दोस्त हो माझा. एकदम जिगरी दोस्त. काय म्हणतात तुमच्या शहरी भाषेत, हां... फास्ट फ्रेंड... वाड्याच्या जवळच घर आहे माझं. फेरफटका मारायला निघालो होतो तर तुला गोंधळलेला पाहिलं. म्हणून आलो. बरं चल, मी येतो तुझ्या सोबतीला. काय ना अंधार आहे, जंगल आहे, वाटबीट चुकलास तर नसतं संकट यायचं. लांडग्यांचा सुळसुळाट आहे ना इथे..." गजाभाऊंची साथ मिळाल्यामुळे विलासला जरा हायसं वाटलं. गजाभाऊंशी गप्पा-गोष्टी करत विलास रस्ता कापू लागला. काही क्षणात वाडा नजरेच्या टप्प्यात आला...
गेटजवळ पोहोचताच गजाभाऊ म्हणाले, "चला, तू तुझ्या ठिकाणी सुखरूप पोहोचलास. माझं काम झालं. आता चलतो मी..." विलासने त्यांना आत येण्याचा खूप आग्रह केला पण काहीही न ऐकता ते चालू पडले. त्यांना पाठमोरं जाताना विलास पाहत राहिला. मग गेट उघडून आत गेला. ओसरीवर बसलेले विलासचे आजी-आजोबा त्याची वाटच पाहत होते. तो दिसताच आजी-आजोबा एकदम म्हणाले, "विलास, अरे किती उशीर... केव्हाची वाट पाहतो आहोत आम्ही... आणि काय रे, गेटवर का उभा होतास..." गेटकडे पाहत विलास म्हणाला, "अहो गजाभाऊंचा निरोप घेत होतो..."
हे ऐकताच आजोबांनी आश्चर्याने विचारलं, "कोणाचा निरोप घेत होतास तू..." विलास लगेच म्हणाला, "आहे आबा, गजाभाऊंचा. तुमचे इतके चांगले मित्र आणि कोण म्हणून विचारताय... अहो तेच तर सोबतीला होते माझ्या. तुम्ही पाहिलं नाही का त्यांना गेटवर माझ्यासोबत..." आजोबा जवळ येत म्हणाले, "कसं शक्य आहे... अरे महिन्याभरापूर्वी अमावस्येच्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला आहे. रात्री फेरफटका मारत असताना म्हणे लांडग्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यातच ते गेले. हे ऐकून विलासला धक्का बसला. गेटकडे पाहत तो म्हणाला, "म्हणजे... मला भेटलेले गजाभाऊ खरे नसून तो... विलासच्या डोळ्यात पाणी तरारलं. गेटकडे पाहतच त्याने गजाभाऊंना नमस्कार केला...
तेव्हापासून आजपर्यंत दर अमावस्येच्या रात्री हा चमत्कारिक प्रकार घडू लागला. रात्री अपरात्री जंगलाकडे वाट चुकलेल्या वाटसरूंना गजाभाऊंची सोबत मिळून ते वाटसरू त्यांच्या इष्टस्थळी पोहोचू लागले...
@ अनिकेत परशुराम आपटे.