Monday, December 14, 2020

घबराट...

वादळी पावसाचा दिवस होता. एकीकडे विजांचा लखलखाट तर दुसरीकडे ढगांचा गडगडाट होत होता. अशातच बंगल्यातले लाईटही गेले होते. सूर्य ढगांच्या आड लपला असला तरी बंगल्यात बऱ्यापैकी उजेड होता. ती बंगल्यात एकटीच होती. तिला काही केल्या झोपच येत नव्हती. शेवटी ती उठली आणि सगळ्या खोल्या न्याहाळू लागली. तिची भिरभिरती नजर जणू काही शोधू पाहत होती...

ती आरशासमोर आली. तिने आरशात डोकावलं आणि तिला जरा हायसं वाटलं. चेहेऱ्यावरचा घाम टिपून तिने पुन्हा आरशाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांना जे दिसलं ते पाहून तिचा वरचा श्वास वर आणि खालचा खाली अडकल्यासारखा झाला. वाऱ्याच्या वेगासारखी ती मागे झाली आणि सैरभैर होऊन त्याला शोधत घरभर पळू लागली. तिचा आवाज ऐकून एका खोलीतून तो बाहेर आला...

त्याला पाहताच ती त्याला बिलगली. त्याने तिची हनवटी वर उचलली. तिच्या डोळ्यात अजूनही भितीचं सावट होतं. तिला शांत करत तो म्हणाला, "अगं काय झालं... झोपली नाहीस ती... आणि इतकी का घाबरलीस..." थरथरता हात दाराकडे करत ती म्हणाली, "ति...थे क.....क कोणीतरी आहे. म.....मी पाहिलं त्याला. आ....रशासमोर उभा होता तो..." तिच्या डोक्यावर हात ठेऊन पुन्हा तिला शांत करत तो म्हणाला, "तुला भास झाला असेल. झोपण्यापूर्वी तू त्या दंतकथा वाचतेस ना, त्याचा परिणाम आहे हा... चल दाखव तुला काय दिसलं ते..." दोघं बाहेर आली. त्याने आरशाकडे नजर वळवली...

आरशासमोर आता एक नाही, तर दोघं उभी होती. दारात उभ्या तिने आणि त्याने एकमेकांकडे पाहिलं. तो म्हणाला, "तुझं खरं होतं. या अंधश्रद्धा नाहीत. जिवंत माणसं खरंच अस्तित्वात असतात..." विजांच्या कडकडाटासोबतच बंगल्यातून दोन पांढरेशुभ्र ढग बाहेर पडले आणि वातावरणात हरवून गेले...

@ अनिकेत परशुराम आपटे.