रात्रीचे बारा वाजून गेले होते. निर्मनुष्य स्टेशनवर गाडी येऊन थांबली. प्रशांत बॅग घेऊन उतरलाच होता की गाडी निघाली, आणि काही क्षणातच तिने स्टेशन मागे टाकलं. आता स्टेशनवर सगळं सामसूम होतं. प्लॅटफॉर्मच्या कडेला दोघंजण झोपले होते, पण त्यांच्याशी बोलायला प्रशांत धजावत नव्हता. काही क्षण इकडे-तिकडे पाहून प्रशांत स्टेशनबाहेर आला. समोर दोन रस्ते दिसत होते. एक सरळ जात होता तर दुसरा डावीकडे वळला होता. बऱ्याच वर्षांनी गावाकडे परतल्यामुळे समोरचे रस्ते पाहून प्रशांत थोडा गोंधळला. काही क्षण विचार करून प्रशांतने समोरचा मोठा रस्ता निवडला आणि चालू लागला...
हळूहळू स्टेशन मागे गेलं. स्टेशनवरचे मोठे दिवे लहान होत होत विरून गेले. आता सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं. दुतर्फा झाडी असलेल्या त्या रस्त्यावरून प्रशांत एकटाच चालत होता. आजूबाजूने येणारा रातकिड्यांचा आवाज वातावरणाला अजून भयावह बनवत होता. प्रशांतने बॅगेतून हेडफोन्स काढून कानाला लावले आणि मोबाईलमधली गाणी सुरू केली. गाण्यांमुळे वातावरण थोडं हलकं झाल्यासारखं त्याला वाटलं. झपझप पावलं टाकत प्रशांत रस्ता कापू लागला. समोरच्या वळणावर प्रकाश दिसू लागला आणि काही क्षणातच मोठा आवाज करत एक वाहन भरधाव वेगाने प्रशांतच्या दिशेने आलं...
हेडलाईट इतक्या भसकन आल्याने प्रशांतने गच्च डोळे मिटून घेतले. वाहनाचा आवाज वाढत गेला आणि प्रशांतला कोणीतरी खेचल्यासारखं वाटलं. त्याने डोळे उघडले तर समोर एक माणूस उभा होता. प्रसन्न डोळे आणि तेजस्वी चेहेरा असलेला तो माणूस त्या वातावरणात काही वेगळाच वाटत होता. प्रशांतचा हात सोडत तो म्हणाला, "शेवटी उशीर झालाच..." त्याच्याकडे वळत प्रशांत म्हणाला, "नाही नाही दादा. तुम्ही अगदी वेळेवर आलात. नाहीतर आज..." बोलता बोलता प्रशांतची नजर रस्त्याकडे गेली. तिथे एक मोठा ट्रक उभा होता. ट्रकचे चारही लाईट जळत होते आणि ट्रक भोवती धुक्याचं वलय दिसत होतं. ट्रकच्या आत मात्र कोणीच नव्हतं...
ट्रकला पाहून प्रशांत चक्रावला आणि म्हणाला, "हा ट्रक इथे... म्हणजे माझ्या अंगावर येणारं वाहन हा ट्रक होता की काय... पण यात तर कोणीच नाही. तुमच्यामुळे वाचलो मी दादा..." तो माणूस फक्त हसला आणि म्हणाला, "चल, मी तुला सोबत करतो तुझ्या घरापर्यंत..." हे ऐकून प्रशांतला हायसं वाटलं. दोघंही एकत्र चालू लागले. थोडा वेळ दोघांमध्ये शांतता राहिल्यावर प्रशांतने बोलायला सुरुवात केली, "अरे, आपण इतका वेळ एकत्र आहोत तरी एकमेकांची नावंच माहित नाहीत अजून... मी प्रशांत. लहानपणीच शहरात गेलो शिकायला. आज तीस वर्षांनी परतलोय. अण्णांच्या, म्हणजे माझ्या वडिलांच्या जमिनीच्या कामासंदर्भात. तुम्ही..." प्रशांतने विचारलेल्या या प्रश्नावर तो माणूस म्हणाला, "मी सुशील. मी इथेच असतो. वाट पाहत असतो..." प्रशांतच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे पाहून सुशील म्हणाला, "संधीची..."
सुशीलचं उत्तर प्रशांतला थोडं विचित्र वाटलं, पण त्याकडे लक्ष न देता प्रशांतने विषय बदलला. गप्पा मारत दोघं चालले असताना सुशील म्हणाला, "अरे प्रशांत तुझं घर इकडे नाही, डाव्या अंगाला आहे..." प्रशांतने डावीकडे पाहिलं तर लुकलुकणारे दिवे त्याला दिसले. काही क्षणातच दोघं गेटजवळ पोहोचले. प्रशांतने घराकडे पाहिलं, तर दिवे चालू होते. दार उघडं होतं आणि वाड्याभोवती धुक्याचं वलय दिसत होतं. घराकडे पाहून प्रशांत गोंधळला आणि म्हणाला, "वाडा असा काय दिसतोय... मघाशी रस्त्यावर उभा तो ट्रक पण असाच दिसत होता. आणि आता वाडा..." प्रशांत बोलत होता इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो सुशीलला म्हणाला, "एक मिनिट. सुशील, आपण आज पहिल्यांदाच भेटतोय... मग मला कुठे जायचंय आणि माझं घर कुठे आहे, हे तुला कसं माहित..."
सुशील फक्त हसला. हसताना सुशीलच्या डोळ्यात एक तेज होतं. प्रशांतजवळ येत सुशील म्हणाला, "माझं जाऊ दे. प्रशांत, तुला अजून बऱ्याच गोष्टी समजलेल्या दिसत नाही. आता मी सांगतो तुला. चल माझ्याबरोबर..." सुशीलने प्रशांतच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचवेळी प्रखर असा प्रकाश प्रशांतच्या डोळ्यांवर आला. तो प्रकाश इतका तीव्र होता, की प्रशांतचे डोळे दिपले. थोड्याच वेळात प्रकाशाची तीव्रता कमी झालेली जाणवल्याने प्रशांतने डोळे उघडले. तो त्याच रस्त्यावर उभा होता जिथे त्याला सुशील भेटला होता. त्याच्या समोर तोच ट्रक तेच धुक्याचं वलय पांघरून उभा होता. आश्चर्य वाटून प्रशांत सुशीलला म्हणाला, "हे काय... आपण परत इथे कसे आलो... थोड्या वेळापूर्वी तर आपण माझ्या घरासमोर होतो. मग आता हे..."
सुशीलच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटलं. तो प्रशांतला म्हणाला, "तुला अजूनही नाही समजलं... मग डोळे बंद करून चित्त एकाग्र कर. तुला सगळं समजेल..." सुशीलच्या बोलण्याचा अर्थ प्रशांतला कळत नव्हता. पण त्याने डोळे बंद केले आणि शांत उभा राहिला. थोड्याच वेळात त्याला कुजबुजण्याचा आवाज आला. प्रशांतने डोळे उघडले तर समोर उभ्या असलेल्या ट्रकभोवती थोडी गर्दी दिसत होती. लोक आपापसात बोलत होते, "पुन्हा तेच झालं...", "व्हय तर, याच वक्ताला ह्यो टरक हितं कसा काय येतो कोन जाने...", "बिचारा... अजून चाळिशीपण आली नसेल..." या सर्वांपेक्षा ऊंच आवाजात एक माणूस ओरडत होता, "हाय रे कर्मा... हे काय झालं..." प्रशांतने तो आवाज ओळखला. सुशीलकडे पाहत तो म्हणाला, "हा तर अण्णांचा आवाज... हा काय प्रकार आहे..."
प्रशांत बोलतच होता, की सायरन वाजवत एक एँब्यूलंस तिथे आली. दोन माणसं स्ट्रेचर घेऊन उतरली आणि गर्दीत शिरली. काही क्षणातच पूर्ण उघडलेलं स्ट्रेचर घेऊन ती माणसं एँब्यूलंसकडे जाऊ लागली. हालचालीमुळे स्ट्रेचरवरचा कपडा बाजूला झाला. स्ट्रेचरवरच्या व्यक्तीचा चेहेरा पाहून प्रशांतच्या अंगावर काटा आला. स्ट्रेचरवरची व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून, स्वत: प्रशांतच होता. थरथरत्या हातांनी प्रशांत, निपचित पडलेल्या स्वत:च्या शरीराला स्पर्श करायला गेला पण त्याचा हात शरीराच्या पार झाला. गोंधळून जाऊन प्रशांतने सुशीलकडे पाहिलं. सुशील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडापुढे उभा होता. सुशीलला पाहताच प्रशांतने डोळे विस्फारले. सुशीलच्या पूर्ण अंगाभोवती एक वलय होतं आणि ते झाड त्याच्या आर-पार दिसत होतं...
प्रशांतने आपला थरथरता हात सुशीलकडे नेला आणि तो काही बोलणार इतक्यात सुशील म्हणाला, "प्रशांत, तू आता जिवंत नाहीस. मघाशी मी तुला ओढलं तेव्हा तुझं शरीर नाही, तर या तुझ्या आत्म्याला मी ओढत होतो. या शरीराच्या बंधनातून तू मोकळा झाला आहेस पण अजून तुला मुक्ती नाही मिळाली. हा रस्ता आणि हा ट्रक म्हणजे एक मायाजाल आहे. यांच्या पाशात कधी काळी मी अडकलो होतो. याच ठिकाणी, याच वेळी, याच ट्रकने मला या रस्त्याच्या पाशात अडकवलं. तेव्हापासून मी इथेच आहे. मला मुक्त करणाऱ्या दुसऱ्या सुशीलला मी शोधत होतो आणि तू आलास. आता तुला शोधायचाय दुसरा प्रशांत. जो स्वत:ला या रस्त्याच्या आणि ट्रकच्या पाशात अडकवून तुझी सुटका करेल..." इतकं बोलून सुशील गायब झाला. प्रशांत मात्र विस्फारलेल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होता...
आजही प्रशांत त्या रस्त्यावर वाट पाहतोय, त्याला मुक्त करणाऱ्या दुसऱ्या प्रशांतची............
@ अनिकेत परशुराम आपटे.