Wednesday, June 1, 2022

लिफ्ट...

अंधार वाढत चालला होता. एकलकोंड्या रस्त्यावरून रोहन वेगाने गाडी चालवत होता. बंद काचा, ए.सी. आणि गाणी यांमुळे रोहनचा बाहेरच्या वातावरणाशी संबंध तुटल्यासारखा झाला होता. गाण्यांच्या ठेक्यावर मान डोलवत रस्ता जाईल तसा रोहन गाडीला नेत होता. गाडीने एक वळण घेतलं. थोड्याशा अंतरावर रोहनला काहीतरी दिसलं. रोहनने गाडीचा वेग कमी केला. ती वस्तू हळूहळू मोठी होत गेली. ती एक मुलगी होती आणि बाजूलाच एक दुसरी गाडी उभी होती. रोहनने तिच्याजवळ येऊन गाडी थांबवली. काच खाली होताच ती मुलगी वाकली आणि म्हणाली, "माझी गाडी बंद पडली आहे. प्लीज, मला जरा पुढेपर्यंत सोडता का..."


रोहनने दार उघडलं आणि ती मुलगी आत बसत गोड आवाजात थँक यू म्हणाली. रोहनने गाडी पुन्हा सुरू केली. गाण्यांचा तो कर्कश आवाज कानावर पडला तशा त्या मुलीच्या कपाळावर आठ्या आल्या. रोहनकडे पाहत ती म्हणाली, "ही गाणी जरा बंद करता का... नाहीतर जुनी गाणी लावा. अशा वेळी जुनी गाणी छान वाटतात ऐकायला. रोहनने रेडियोचा ट्रॅक बदलून जुनी गाणी लावली तशा त्या मुलीच्या कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या आणि ती खिडकीबाहेर पाहू लागली. एकवार तिच्याकडे पाहत रोहन म्हणाला, "मी रोहन, आणि तुम्ही..." रोहनकडे पाहत ती मुलगी म्हणाली, "मी शरयू. शहरात शिकायला असते. घरी निघाले होते. वाटेत गाडी बिघडली. कोणाची मदत मिळते का हे पाहत होते तर तुमची गाडी दिसली..."

रोहनने लगेच विचारलंच, "घरी चालला होता... मग तुमचं सामान..." रोहनकडे पाहत शरयू हसत म्हणाली, "नाही... सामान नाहीये..." अशा अवेळी शरयूचं रस्त्यावर असं उभं राहणं रोहनला जरा खटकत होतं. तो राहून राहून तिच्याकडे पाहत होता. खिडकीबाहेर बघणारी शरयू रोहनकडे वळत, स्मित करत म्हणाली, "माझ्याकडे नको, रस्त्यावर लक्ष ठेवा. नाहीतर ऍक्सीडेंट होईल..." या वाक्याने रोहन गडबडला आणि पुन्हा रस्त्याकडे पाहू लागला. काही वेळाने गाडीने अजून एक वळण घेतलं. थोडं अंतर गेल्यावर शरयू म्हणाली, "हं इथेच थांबा. इथेच उतरते मी..." रोहनने चक्रावून शरयूकडे पाहिलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. बाजूलाच एक पाऊलवाट होती. ती वाट झाडीतून आत जात होती. काही अंतरावर एक लुकलुकणारा दिवा दिसत होता...

दिव्याकडे पाहत रोहन म्हणाला, "तुम्ही तिथे राहता..." पुन्हा स्मित करत शरयूने मान डोलावली आणि थँक्स म्हणून पाऊलवाटेने चालू लागली. तिच्याकडे थोडावेळ पाहून रोहनने गाडी पुन्हा सुरू केली. शरयू निघून गेली म्हणून रोहनने रेडियोचा ट्रॅक बदलला. गाडीने एक वळण घेतलं. पुन्हा रोहनला काही अंतरावर काहीतरी दिसलं. रोहनने गाडी जवळ नेली तर ती शरयू होती. रोहनने आजूबाजूला पाहिलं तर ती जागा त्याला ओळखीची वाटू लागली. रोहनला वाटलं आपल्याला भास झाला. स्वत:शीच हसत रोहनने शरयूला गाडीत घेतलं. गाडी जशी पुढे जात होती तसे दोघांमधले तेच संवाद, बाहेरची तीच दृष्य, हे सगळं पुन्हा अनुभवताना रोहन पार गोंधळून गेला होता. त्याच अवस्थेत रोहनने विचारलं, "मघाशी तुम्हीच होता ना... मी तुम्हाला लिफ्ट दिली आणि तुम्ही एका ठिकाणी उतरून गेलात..." स्मित करत शरयू म्हणाली, "तुम्हाला भास झाला... होतं असं कधीकधी... काळ खूप मोठा आहे, अथांग आहे... काळाच्या पडद्याआड काय दडलंय कोणीच नाही सांगू शकत... तुम्ही रस्त्याकडे लक्ष द्या. नाहीतर ऍक्सीडेंट होईल..."

हे वाक्य ऐकताच रोहनने कर्कचून ब्रेक मारला. गाडी झटका देत थांबली. शरयूकडे पाहत रोहन म्हणाला, "त...तुम्हा...ला हवी असलेली जागा आली. उतरा तुम्ही..." गाडी जिथे थांबली होती तिथे जवळच एक पाऊलवाट होती. गाडीतून खाली उतरून वाकून पाहत शरयू म्हणाली, "थँक्स हं. पण तुम्हाला कसं कळलं मला इथेच उतरायचं आहे ते..." शरयूचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच रोहनने गाडी सुरू केली आणि एका झटक्यात तिथून निघाला. ए.सी. सुरू असूनही रोहनला दरदरून घाम फुटला होता. आजूबाजूचं वातावरण पाहताना आपण याच रस्त्याने तिसऱ्यांदा जात आहोत असं त्याला वाटलं. तेवढ्यात गाडीने वळण घेतलं. काही अंतरावर रोहनला पुन्हा काहीतरी दिसलं. जवळ जात असताना रोहनला शरयू दिसली. गाडी न थांबवता रोहनने वेग वाढवला आणि शरयूला मागे टाकत गाडी पुढे निघून गेली...

गाडीच्या बाहेरच्या बाजूला लागलेल्या रेयर व्ह्यू मिररमधून रस्त्याच्या कडेला उभ्या शरयूकडे पाहत पाहत रोहनने गाडीचा वेग अजून वाढवला. शरयू लांब जात नाहीशी झालेली पाहून रोहनने सुटकेचा श्वास सोडला आणि रुमालाने घाम पुसू लागला. तो पुन्हा गाणं लावायला रेडियो सुरू करणार इतक्यात, "रोहन, मला लिफ्ट नाही ना दिलीस..." हा घोगरा आवाज आवाज रोहनच्या कानी पडला. हळूहळू त्याने मान वळवून मागे पाहिलं. मागच्या सीटवर शरयू बसली होती. बुबूळं नसलेले पांढरे डोळे, उडणारे मोकळे केस आणि रक्ताळलेला चेहेरा पाहून रोहन जागीच गारठला. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. शरयू पुन्हा घोगऱ्या आवाजात म्हणाली, "तू मला लिफ्ट दिली नसतीस तर सुटला असतास. पण आता, या अथांग चकव्यातून तुझी सुटका नाही... माझ्याकडे नको, रस्त्यावर लक्ष दे... नाहीतर... हा...हा...हा..." वेडंवाकडं हसत शरयूने समोर बोट दाखवलं. रोहनने बोटाच्या दिशेने पाहिलं आणि......

अंधार वाढत चालला होता. एकलकोंड्या रस्त्यावरून यतीन वेगाने गाडी चालवत होता. "उगाच त्या हॉटेलवर थांबलो. किती उशीर झाला. आता हा ओसाड रस्ता पार होईपर्यंत गाडी नीट चालू देत म्हणजे मिळवली..." असं यतीन स्वत:शीच बोलत असताना गाडीने एक वळण घेतलं. थोड्याशा अंतरावर यतीनला काहीतरी दिसलं. यतीनने गाडीचा वेग कमी केला. ती वस्तू हळूहळू मोठी होत गेली. ती एक गाडी होती आणि बाजूला कोणीतरी उभं होतं. यतीनने गाडी थांबवली. काच खाली होताच ती व्यक्ती वाकली आणि म्हणाली, "हाय, मी रोहन. माझी गाडी बंद पडली आहे. प्लीज, मला जरा पुढेपर्यंत सोडता का..."

@ अनिकेत परशुराम आपटे.