Tuesday, April 23, 2024

The 51...

"Six it is... That's a century for Sachin Tendulkar... And the 51st of his career..." रवि शास्त्रीचे हे शब्द आणि मैदानात उभा सचिन तेंडुलकर. हे दृष्य आठवलं, की एकच गोष्ट मनात येते. न्यूलँड्स, केपटाऊन येथे २०११ सालच्या सुरुवातीला खेळला गेलेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका यांच्यातला तिसरा कसोटी सामना...


हा सामना त्या मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना तर होताच, पण सचिन तेंडुलकरचाही दक्षिण आफ्रीकेमधला हा शेवटचा कसोटी सामना होता. नाणेफेक जिंकून भारताने दक्षिण आफ्रीकेला प्रथम फलंदाजी दिली. टिच्चून मारा करणाऱ्या ज़हीर, ईशात आणि श्रीशांथच्या समोर उभ्या जॅक कॅलीसच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रीकेने ३६२ धावा उभारल्या. प्रतिउत्तरादाखल मैदानात आलेल्या भारतीय फलंदाजीची खराब सुरूवात झाली...


सेहवाग आणि द्रविड लवकर बाद झाले आणि चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी आला. डेल स्टेन आणि मॉर्नी मॉर्कल तुफान फॉर्ममध्ये होते. डेल स्टेन तर भन्नाट गोलंदाजी करत होता. चेंडू चांगलाच स्विंग होत होता. उसळी घेत होता. डेल स्टेनची गोलंदाजी खेळणं अशक्य होतं. स्विंगसोबत स्टेनने टाकलेल्या चेंडूंना वेगही होता. चेंडू अंगावर येत होते, बॅटची कड मिस होत होती, शरीराला इजाही होत होत्या. अशा परिस्थितीत गौतम गंभीरसोबत उभा राहिला तो सचिन तेंडुलकर...


भारताची धावसंख्या दोनशे पार पोहोचलीच होती, की गंभीर बाद झाला. गंभीर पाठोपाठ, स्टेनच्या भेदक माऱ्यामुळे लक्ष्मण, पुजारा आणि धोनी हे भरवशाचे फलंदाज लवकर परतले, आणि दबाव भारतीय संघावर आला. तेव्हा सचिनने फलंदाजीची सूत्र स्वत:च्या हाती घेतली. तळाच्या फलंदाजांसोबत छोट्या छोट्या भागिदाऱ्या रचत त्याने धावफलक पुढे नेला. स्टेन, मॉर्कल आणि हॅेरिस यांचा नेटाने सामना करत, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचे बहारदार फटके खेळून सचिन तेंडुलकरने ३१४ चेंडूत १४६ धावांची खेळी केली...


न्यूलँड्स, केपटाऊनच्या मैदानात सचिन तेंडुलकरने झळकवलेलं हे शतक फार महत्वाचं होतं. एक म्हणजे दक्षिण आफ्रीकेमधलं हे सचिनचं शेवटचं शतक होतं. दुसरं म्हणजे सचिनच्या दैदिप्यमान कारकिर्दीतलं हे शेवटचं आणि एक्कावन्नावं शतक ठरलं. आणि तिसरी व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत, तगड्या बॉलिंगसमोर आणि परदेशी मैदानावर हे शतक साकार झालं होतं...

आज २४ एप्रिल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरचा आज एक्कावन्नावा वाढदिवस. क्रिकेट जगतातला देव आणि भारताच्या या मास्टर ब्लास्टरला वाढदिवसाच्या शतकी शुभेच्छा...

सचिन... सचिन...
सचिन... सचिन...
सचिन... सचिन...

@ अनिकेत परशुराम आपटे.