संध्याकाळची वेळ होती. ऑफिसमधून निघालेला सोहम घराच्या वाटेने न जाता उलट्या दिशेने चालू लागला. हताशपणे रस्त्याने चालत जाताना सोहमला एक बाग दिसली. सोहम काही काळ गेटवरच रेंगाळला आणि त्याने बागेच्या दिशेने पावलं वळवली. बागेत बऱ्यापैकी रेलचेल होती. कुठे जेष्ठांच्या गप्पा तर कुठे लहानांचे खेळ. कुठे व्यायामाचे वर्ग तर कुठे प्रेमी युगुलं एकमेकात रममाण झाली होती. सोहमने सर्वत्र नजर फिरवली. एका कोपऱ्यात एक बाक रिकामं होतं. सोहम जड पावलांनी चालत बाकापर्यंत पोहोचला. बाकावर बसल्यावर सोहम वाकला आणि त्याने दोन्ही हातात डोकं खुपसलं. "एक्सक्यूज मी..."
सोहम बसल्याच्या काही वेळानंतर त्याला हा आवाज आला. सोहमने वर पाहिलं तर त्याच्याच वयाचा एक माणूस समोर उभा होता. त्याचा प्रसन्न चेहेरा पाहून सोहमलाही बरं वाटलं. आपली बॅग जवळ खेचत सोहमने त्या माणसाला बसायला जागा दिली. तो माणूस सोहमला धन्यवाद देऊन त्याच्या बाजूला बसला. थोडा वेळ शांततेत गेल्यावर त्या माणसाने सोहमला विचारलं, "काही... प्रॉब्लेम आहे का..." सोहमने त्याच्याकडे रागाने पाहिलं तर थोडं मागे सरकत तो माणूस पुन्हा म्हणाला, "नाही, तुम्ही बराच वेळ शून्यात पाहत इथे बसला आहात. उदास दिसताय. तो चहावाला पोऱ्या दोन वेळा हाक मारून गेला पण तुमचं लक्ष नव्हतं. म्हणून विचारलं. सांगायचं नसेल तर राहू देत. पण सांगितलंत तर तुमचंच मन हलकं होईल..." सोहमने एकवार त्या माणसाकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली...
"काय सांगू बाबा तुला... घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना खूप वाईट अवस्था झाली आहे माझी. सकाळी ऑफिसला निघायच्या वेळीच आई आणि बायकोमध्ये वाद सुरू होतात. ते इतके विकोपाला जातात की सोडवता सोडवता निघायला उशीर होतो. मग ऑफिसला यायलाही उशीर होतो. सकाळी घरी झालेली कटकट ऑफिसमध्ये बाहेर पडते. कामात लक्ष लागत नाही. बॉसची बोलणी आणि टोमणे खावे लागतात. संध्याकाळी बॉसही विनोद वगैरे करतो आणि बैकीचेही आनंदात असतात. तिथून घरी गेलो की या दोघीही एकदम हसतमुख असतात. जर संध्याकाळी सगळे नॉर्मल असतात तर दिवसभर काय धाड भरते सगळ्यांना... या सगळ्यामुळे खूपच मनस्ताप होतो रे मला. दोन प्रमोशन्स हुकली माझी... काय करू तेच समजत नाही...असं वाटतं संपवून टाकावं स्वत:ला..."
सोहमच्या खांद्यावर हात ठेवत तो माणूस बोलू लागला, "मित्रा, एकदम असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. एक काम कर. सध्या ऑफिसचा विचार नको करूस. सकाळी घरात असं काय घडतं ज्यामुळे भांडणं होतात, ते शोध. घरातल्या बायकांची बहुतांश भांडणं किचनशी जोडली गेली असतात आणि तिथे जाण्याचा आपल्यावर क्वचितच प्रसंग येतो. वाद एका मुद्द्यावरून सुरू होतो आणि विकोपाला जाईपर्यंत तो मूळ मुद्दाच मागे पडतो. उद्या सगळं नेहमीसारखं सुरू होऊ देत. वादाला तोंड फुटेल तेव्हा नेमकं काय घडलं याकडे लक्ष दे. कदाचित उत्तर सापडेल..." त्या माणसाच्या बोलण्याने सोहमला बरं वाटलं. त्याच्या चेहेऱ्यावर स्मित उमटलं. तेवढ्यात तो चहावाला पोऱ्या परत तिथे आला...
त्याला पाहून त्या माणसाने विचारलं, "आता तरी चहा घेणार ना... हा मुलगा तिसऱ्यांदा आलाय इथे..." सोहम हसला आणि त्याने त्या चहावाल्या पोऱ्याला दोन कटिंग द्यायला सांगितलं. तो माणूस लगेच म्हणाला, "मी आता चहा पीत नाही... बरं चल. तुझं चालू देत. मी निघतो..." तो माणूस उठला तसा सोहमही उभा राहिला. त्या माणसाकडे पाहत सोहम म्हणाला, "बाय द वे, मी सोहम... आणि तू..." तो माणूस हसला आणि म्हणाला, "मी मनोज..." सोहमने त्याच्याकडे फोन नंबर मागितला तर मनोज म्हणाला, "माझ्याकडे फोन नाही रे..." सोहमला थोडं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, "मग आपली भेट..." मनोजने स्मित केलं आणि, "बघू..." असं म्हणून तो चालू लागला. तो चहावाला पोऱ्याही त्याच्या वाटेने गेला. पण तो सारखा मागे वळून वळून सोहमकडे पाहत होता. चहाचा घोट घेत पाठमोऱ्या मनोजकडे पाहत सोहम तसाच उभा होता...
चार-सहा महिने निघून गेले. सोहमच्या आयुष्याची गाडी बऱ्यापैकी रुळावर आली होती. एक दिवस सोहम आणि त्याच्या ऑफिसचा स्टाफ लंच टाईममध्ये हॉटेलमध्ये जेवायला गेले. हॉटेलच्या समोरच ती बाग होती. गप्पा मारता मारता सोहमचं लक्ष बागेकडे गेलं आणि त्याला मनोज आठवला. सोहम विचारात पडला, "अरे, ज्या माणसाने मला इतकी मोलाची मदत केली, त्यालाच मी विसरलो..." हॉटेलमधून बाहेर पडताना सोहमने सर्वांना ऑफिसला जायला सांगितलं आणि, "थोड्या वेळात येतो..." असं सांगून तो स्वत: बागेकडे वळला. दुपार असल्याने बागेत वर्दळ कमी होती. मनोजला शोधत सोहम बागेत नजर फिरवत असताना एका बाकावर तो चहावाला पोऱ्या झोपलेला दिसला. सोहम तिथे गेला आणि त्याने त्या पोराला उठवलं. तो उठून उभा राहिला आणि सोहम काही बोलणार इतक्यात तो पोरगाच म्हणाला, "अरे साहेब तुम्ही... आता कसे आहात तुम्ही..."
या प्रश्नाने सोहम थोडा चक्रावला. तो पोरगा म्हणाला, "साहेब तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला कसं ओळखलं... साहेब, तुम्ही मागच्या वेळी इथे आला होता तेव्हा फारच विचित्र वागत होता. असं वाटत होतं तुम्हाला वेड लागलं. पण आज तुम्ही बरे दिसताय..." त्या पोऱ्याच्या या बोलण्याने सोहम अजूनच गोंधळला. तो काही बोलणार इतक्यात त्याची नजर त्याच्या डाव्या बाजूला गेली. तिथे एक स्तंभ होता आणि त्यावर हार घातलेला एक फोटो टांगलेला होता. फोटो पाहून सोहमचे डोळे विस्फारले. फोटोकडे बोट दाखवत सोहमने त्या पोऱ्याला विचारलं, "हा फोटो कोणाचा..." फोटोकडे पाहत तो पोरगा म्हणाला, "हे आमचे मनोज साहेब. त्यांच्या आजोबांनी ही बाग बांधली. मनोज साहेब रोज सकाळी इथे जॉगिंगला यायचे. मलाही इथे चहाचा धंदा चालवण्याची परवानगी त्यांनीच दिली. ते इथे असायचे तेव्हा इथे येणाऱ्यांना माझ्याकडून चहा घ्यायला सांगायचे. माझा धंदा छान चालायचा. पण वर्षभरापूर्वी सगळं संपलं...
रोज सकाळी येणारे हसतमुख मनोज साहेब संध्याकाळी येऊ लागले. ते ही कधी-कधी. त्या कोपऱ्यातल्या बाकावर ते तासंतास बसून रहायचे. उदासीन चेहेरा करून ते शून्यात पाहत रहायचे. आणि एक दिवस त्याच बाकावर ते मेलेले आढळले. त्यांच्या हातात विषाची छोटी बाटली होती. पोलिस तपासात समजलं की मनोज साहेबांना धंद्यात खोट बसली. सर्वांनी त्यांची साथ सोडली. ते एकटे पडले. मग निराशेत जाऊन त्यांनी स्वत:ला संपवलं. बागेत येणाऱ्या काही लोकांनी वर्गणी काढून इथे हा स्तंभ उभारला आणि मनोज साहेबांचा फोटो त्याला टांगला. मी रोज सकाळी एक हार घेऊन येतो आणि या तसबिरीला घालतो. मनोज साहेब गेल्यानंतर त्या बाकावर बसणारे तुम्हीच पहिले होता..." इतकं बोलून आपली किटली उचलून तो पोरगा त्याच्या वाटेने निघून गेला. सोहम मात्र मनोजच्या तसबिरीकडे पाहत तसाच उभा राहिला. इतक्यात, "माझी वाट पाहत होतास ना..."
या वाक्याने सोहम दचकला. बाजूला मनोज उभा होता. या वेळी मनोज वेगळाच दिसत होता. त्याच्या संपूर्ण शरीराभोवती एक वलय होता आणि सोहम त्याच्या आर-पार पाहू शकत होता. मनोजने त्याच्याच हार घातलेल्या फोटोकडे पाहिलं. स्मित करत सोहमकडे पाहत मनोज म्हणाला, "म्हणजे तुला समजलं तर... अरे दीड वर्षापूर्वी काय नव्हतं माझ्याकडे... पैसा, चांगली बायको, राहता बंगला... पण एक चुकीचा निर्णय आणि पार रसातळाला गेलो मी. माझा बिझिनेस बुडाला. पैशाआभावी माझ्या बायकोनेही मला घटस्फोट दिला. मित्र-मंडळींनीही पाठ फिरवली. पूर्ण एकटा पडलो मी. त्या बाकावर बसून याच नकारात्मक गोष्टींचा विचार करत रहायचो. एक दिवस सहन होईनासं झालं आणि मी स्वत:ला संपवलं. मला वाटलं संपलं सगळं. पण नाही. माझं शरीर संपलं. पण शरीरातला मी मात्र इथेच अडकलो. असाच अर्धवट अवस्थेत...
कदाचित माझ्याचप्रमाणे निराशेत गेलेल्या दुसऱ्या मनोजची सुटका व्हायची होती माझ्या हातून. त्या दिवशी तुला त्याच बाकावर बसलेलं पाहिलं आणि जाणवलं, की तू ही माझ्याच मार्गाने निघाला आहेस. मी तुझी सोबत केली आणि तुला त्या मार्गाने जाण्यापासून थांबवलं. माझं समाधान झालं. आता निघतो..." इतकं बोलून प्रसन्न मुद्रेने चालत जाऊन मनोज त्याच्याच तसबिरीत विलीन झाला. पाणावलेल्या डोळ्यांनी मनोजच्या तसबिरीकडे पाहणाऱ्या सोहमच्या मुखातून दोनच शब्द बाहेर पडले, "धन्यवाद मित्रा..."
@ अनिकेत परशुराम आपटे.