Sunday, November 24, 2024

KYCबद्दल बोलू काही...

बऱ्याच वेळा UPI, Internet Banking, Online Shopping, ATM Cash Withdrawal करत असताना आपल्या लक्षात येतं, अरे transaction होत नाही. कुछ तो गडबड है, हे लक्षात आल्यावर आपण बँकेकडे धाव घेतो. तिथे आपल्याला समजतं KYCअभावी आपलं खातं debit freeze झालं आहे. मग आपला चरफडाट होतो. असं कसं freeze झालं... खातं सुरू करताना सगळे कागदपत्र तर दिले होते... आता हे काय नवीन... नवीन नाही, तसं जुनंच आहे सारं. याच KYCबद्दल थोडंसं...

K.Y.C. म्हणजेच Know Your Customer. ग्राहकाची आवश्यक ती माहिती. म्हणजे संपूर्ण नाव, सध्याचा राहता पत्ता, शिक्षण, आर्थिक उत्पन्न (Annual Income), वैवाहिक स्थिती (Marital Status), चालू फोन नंबर, चालू ई-मेल आय.डी. या सर्व माहितीसाठी लागतात कागदपत्र. व्यक्तीचं PAN, हे आधी ओळखपत्र म्हणून गणलं जायचं आणि राहत्या पत्त्यासाठी चालू Passport, चालू Driving License, Voters Card किंवा आधार कार्ड यापैकी एक चालायचं. नियमात बदल होत गेले. आणि PANचा उपयोग फक्त कर-देयकाचा क्रमांक (Tax Payers Number) म्हणूनच राहिला...

KYC कधी व कुठे करायचं?, किती काळानंतर करायचं?, हे प्रश्न येतात. मी एक बँकर असल्याने बँकेत होणाऱ्या KYCबद्दल मी बोलेन. RBIने KYCचा कालावधी निश्चित करण्यासाठी एक पायंडा किंवा स्तर ठेवला आहे. त्या पायंड्यानुसार कुठल्याही KYCचा कालावधी, ते KYC ज्या खात्याशी जोडलं आहे, त्या खात्यातल्या transactionsवर आणि त्यामुळे खात्याच्या Risk catagoryवर अवलंबून असतो. रिस्क तीन प्रकारचे असतात. Low Risk, Medium Risk आणि High Risk...

Low Risk...

सगळे वैयक्तिक ग्राहक, अर्थात Individual Customers low risk catagoryमध्ये येतात. यात जेष्ठ नागरिक, गृहिणी, सामान्य नागरिक आणि बालवर्गाचा समावेश आहे. यांच्या खात्याकडे पाहिलं, तर पैशांची जास्त देवाण-घेवाण नसते. खात्यातल्या घडामोडीही ठराविक असतात. वैयक्तिक बचत खाती यात समाविष्ट असतात. या catagoryमध्ये येणाऱ्या ग्राहकांना साधारण १० वर्षांनी पुन्हा KYC करावं लागतं...

Medium Risk...

ज्या खात्यात आर्थिक व्यवहार होतात, व्यावसायिक दृष्ट्या जी खाती सुरू असतात, अशी सर्व खाती medium risk catagoryमधली असतात. मुख्यत्वे चालू खाती अर्थात current accounts किंवा संस्थेची खाती अर्थात institutional accounts म्हणजे सोसायटी, ट्रस्ट, Association of Persons (unregistered trusts), अशा खात्यांचा medium risk categoryमध्ये समावेश होतो. या catagoryमध्ये येणाऱ्या ग्राहकांना साधारण ५-६ वर्षांनी पुन्हा KYC करावं लागतं...

High Risk...

High risk catagoryवर रिझर्व्ह बँकेचं विशेष लक्ष असतं. मोठ्या प्रमाणातले रोकड व्यवहार, भागिदारी असलेले व्यवहार, राजकीय व्यक्तींची खाती, सुरक्षा यंत्रणांचे म्हणजेच पोलिस, जवान, नौदल यांचे पैशांचे व्यवहार, रासायनिक द्रव्यांबद्दलचे व्यवहार, हे सर्व या catagoryमध्ये येतं. इथे मात्र ग्राहकांना दर दीड ते दोन वर्षांनी पुन्हा KYC करावं लागतं...

यांमध्ये परकीय खाती म्हणजेच NRE-NRO accountsचा समावेश नाही, कारण ही खाती परतीय चलनावर चालतात...

CKYC & Re-KYC...

प्रत्येक बँकेला नियमित कालानंतर CERSAIच्या पोर्टलवर आपापल्या ग्राहकांचे KYC upload करावे लागतात. जर ते व्यवस्थित झाले, तर CERSAIतर्फे प्रत्येक ग्राहकाचा एक CKYC क्रमांक तयार होतो, जो ग्राहकाला मेल आणि मेसेजद्वारे कळवला जातो. तो CKYC क्रमांक वापरून पोर्टलवरून बँकांना ग्राहकाचे कागदपत्र download करता येतात. कधी कधी CKYC क्रमांक नाकारला जातो. फोटो बरोबर नसणं, दिलेले पुरावे अर्धवट असणं किंवा पुराव्यांची तारीख उलटलेली (Passport & Driving License) असणं, ही कारणं असतात CKYC क्रमांक न मिळण्याची. अशा वेळी ती ती खाती KYCच्या कारणास्तव freeze होतात...

आता CKYC आणि Re-KYC यातला फरक आपण पाहू...

जेव्हा Passport किंवा Driving Licenseची तारीख उलटून जाते, ग्राहकाचं नाव किंवा धर्म बदलतो (बहुत करून लग्न झालेल्या महिला ग्राहक...), जेव्हा ग्राहकाचं वय १८ पूर्ण होतं, पहिल्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास death claim settlementच्या वेळी इतर खातेदार किंवा nominee राहतात, वर्षाहून अधिक काळ खातं न वापरल्याने lock किंवा dormant होतं, त्यावेळी सगळे कागदपत्र देऊन पुन्हा CKYC करणं भाग असतं. जरी आधी दिली असली तरी...

Re-KYCचा सरळ अर्थ आहे Revised KYC. इथे बँकेकडे असलेला एक फोर्म भरून Re-KYCची पूर्तता करता येते. त्या फॉर्ममध्ये आधी दिलेल्या कागदपत्रांचाच वापर करून KYC पूर्ण होते. Passport किंवा Driving License जरी दिलं असेल आणि KYCची तारीख जवळ आली असेल आणि या कागदपत्रांची तारीख उलटली नसेल तरी Re-KYC देता येतं. आत्ताशा प्रत्येक बँकेच्या websiteवर KYC किंवा Re-KYC करण्याची सोय असते. ज्यांना ते जमत नाही, त्यांना मात्र त्यांच्या बँकेत जावं लागतं...

मला ज्ञात असलेल्या गोष्टींच्या आधारे वरील माहिती दिली आहे. जाणकारांना त्यात काही भर घालायची असल्यास अथवा सुधारणा सुचवायची असल्यास स्वागतच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.