Friday, June 27, 2025

शॉपिंग...

शॉपिंग...



स्त्रियांसोबत शॉपिंग म्हणजे...
वेळ काढू तो उद्योग असतो...
पाकिटाची जाडी कमी आणि...
खांद्यांना मात्र व्यायाम असतो...

ड्रेस घ्यायचा म्हणाल तर...
वेगवेगळे असतात प्रकार...
त्यातही प्रत्येक प्रकारात म्हणे...
व्हरायटी असते फार...

यातलं हलक्या रंगाचं, त्यातलं छोट्या डिझाईनचं...
अशी कॉमेंट्री नेहमीच चालते...
रकान्यांमधून ते ते ड्रेस काढताना...
दुकानदाराची कसोटी लागते...

बरं, आपल्याला विचारलेल्या मताचा...
तिथे काहीच उपयोग नसतो...
आपण निवडलेलं कापड किंवा ड्रेस...
हमखास बाजूला सारला जातो...

एका दुकानातल्या काही ड्रेसेसवर...
यांची नजर बसते...
प्रचंड मोठ्या ढिगाऱ्यातून...
मग एका ड्रेसची निवड होते...

एकच ड्रेस घ्यायचा आहे...
या वाक्याला काहीही अर्थ नसतो...
हे आपल्याला तेव्हाच समजतं...
जेव्हा हातात पिशव्याचा बोजा वाढतो...

दुकानांमागून दुकानं...
मागे पडत जातात...
यांचा उत्साह दांडगा तर असतो...
आपले हात-पाय मात्र थकतात...

पोटभर खरेदी करूनही...
काही खास नव्हतं हेच ऐकू येतं...
स्त्रियांसोबत शॉपिंगचं...
प्रकरणच वेगळं असतं...

@ अनिकेत परशुराम आपटे.