Sunday, September 28, 2025

अलौकिक संगम...

"नाद" म्हणजे ध्वनी अर्थात स्वर. आणि "नर्तन" म्हणजे नृत्य. शशांक प्रभू यांचा तबला, अथर्व कार्लेकर यांचे टाळ व पखवाज, प्रसन्न माईणकर यांची सितार आणि सिद्धार्थ मेष्टा यांची संवादिनी यांतून उत्पन्न होणारे विविध स्वर, शिवाय ओंकार मुळ्ये यांच्या गायनाचे सप्तसूर आणि कथक नृत्यांगना प्राची जोशी, त्रिशा शेट्टी, प्रांजली बडे, शार्वी त्रिवेदी, रिद्धी घोसाळकर आणि इंद्रायणी बुधकर यांचे नृत्याविष्कार, यांचा त्रिवेणी मिलाप म्हणजेच, "नादनर्तन..."


कार्यक्रमाची सुरुवात झाली, "पंचतुंड नर रुंद मालधर..." या पारंपरिक नांदीने. वाद्यवृंद आणि कथक नृत्याचा समन्वय साधत ही नांदी सादर झाली. नांदी संपते नं संपते तोच वेगवेगळ्या वाद्यातून येणारे वेगवेगळे स्वर आणि एका वाद्यातून दुसऱ्या वाद्यातला छान प्रवास अनुभवायला मिळाला. तबला सुरू असताना त्याला मिळालेली पखवाजची जोड... पखवाज समेवर असताना टाळांचा येणारा नाद आणि या तिघांना पदोपदी मिळणारी संवादिनी आणि सितारची साथ, या सगळ्यांचा एकत्रित येणारा अनुभव फार सुंदर होता. जणू दोन नद्या वेगवेगळ्या प्रवाहाने जात असताना, एकत्रित येऊन एकमेकात मिसळतात, तसाच काहीसा अनुभव होता...



यानंतर समोर आला, कथाकथनाचा एक निराळा आविष्कार. प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांचं स्वयंवर, कालिया नाग आणि श्रीकृष्ण यांच्यातलं द्वंद्व आणि सरते शेवटी रसिक-श्रोत्यांकडे मागितलेला जोहार... या सर्व कथांमध्ये एक वैशिष्ट्य होतं. वाद्यवृंद आणि नृत्यांगना यांनी मिळून कथेतल्या व्यक्तिरेखा हुबेहूब उभ्या केल्या आणि सोबत येणाऱ्या नृत्याविष्कारांतून त्या त्या कथा उलगडत गेल्या. श्रीराम व देवी सीता यांचा विवाह, आणि कालिया नागाच्या फण्यावर श्रीकृष्णाने केलेलं नृत्य, हे दोन्ही नृत्याविष्कार अतिशय अप्रतिम आणि डोळ्यांचं पार्ण फेडणारे होते. मुख्य म्हणजे एकही शब्द नं वापरता, फक्त वाद्यवृंद, पढंत आणि नृत्य, या त्रिकुटाने त्या कथा डोळ्यांसमोर उभारल्या...



Karaoke आणि reelsच्या जगात, live संचासोबत, तबला, टाळ आणि पखवाजचं कथक नृत्याशी असलेलं नातं, शिवाय वाद्यवृंदांचे वेगवेगळे छंद आणि जाती, आणि त्याच सोबत या सगळ्यांचा अलौकिक संगम दर्शवणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे, श्री सिद्धेश कामत आणि डॉ. राजश्री ओक यांच्या संकल्पनेतून उदयास आलेला, "नादनर्तन..."

@ अनिकेत परशुराम आपटे.