Saturday, October 11, 2025

आदर...

ती: बाबू, आमच्या हिस्ट्री बुकमध्ये एक गडबड आहे...

मी: मने अगं अर्ध वर्ष संपत आलं आणि आता गडबड दिसते का तुला...

ती: मला गडबड आधीच दिसली होती, पण आज माझी फ्रेंड पण म्हणाली गडबड आहे...

मी: बरं काय गडबड आहे सांग...

ती: मला शिवाजी महाराजांचा चॅप्टर आहे. त्यात शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला घेतलेली शपथ, अफजल खान वध, पवनखिंड, सिंहगढ आणि राज्याभिषेक असे पार्ट्स आहेत...

मी: चांगलं आहे की. त्यात गडबड काय...

ती: गडबड चॅप्टर्समध्ये नाही, तर नावांमध्ये आहे. सगळीकडे बादशाह औरंगजेब, मिर्जा राजे जयसिंह, सरदार अफजल खान, सुलतान आदिलशाह म्हटलं आहे. पण आपल्या लोकांना मात्र तसं काहीच नाही. काही ठिकाणी शिवाजी, संभाजी, तान्हाजी, जिजाबाई, असं म्हटलं आहे. हे बघ...

मी: बघू बघू... हो गं खरंच की...

ती: बाबू, जर त्यांना आपण असं बोलवू शकतो तर मग छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सुभेदार तान्हाजी, राजमाता जिजाबाई असं का नाही म्हणत... मला तर राग आला. मी टीचरला सांगितलंसुद्धा. पण काही उत्तर नाही मिळालं...

मी: मग तू काय करणार आता...

ती: मी तर ठरवलं आहे. शाळेत त्यांची नावं लिहिताना मी बादशाह, सुलतान, सरदार हे शब्द वापरणार. करण ते बुकमध्ये लिहिलं आहे. पण आपल्या सगळ्या लोकांची नावंसुद्धा मी छत्रपती, महाराज, सुभेदार हे शब्द लावूनच लिहिणार कारण ती माझ्यासाठी इम्पॉर्टन्ट माणसं आहेत...

मी: शाब्बास... असंच कर...

ती: पण बाबू, आपल्या देशाचं नुकसान करणाऱ्या मोठ्या लोकांची नावं आपण छान घ्यायची, आणि आपल्या देशातल्या मोठ्या लोकांना असं एकेरी बोलवायचं... असं का...



माझ्या मुलीने विचारलेला प्रश्न काही चुकीचा नाही. जर आदरार्थी बहुवचन किंवा विशेषण द्यायचंच असेल तर सर्वांना द्यावं. देशाच्या शत्रूचा उल्लेख करताना बादशाह, सुलतान आणि सरदार अशा विशेषणांचा वापर करायचा, आणि आपल्या त्या महान व्यक्तींचा मात्र एकेरी उल्लेख... हे कुठेतरी थांबायलाच हवं. माझ्या मुलीने घेतलेल्या निर्णयात मी तिच्या पाठीशी आहे. आपल्या देशातल्या या सर्व महान व्यक्तींना आपणच आदर द्यायला हवा म्हणजे येणारी पिढी त्यांना आदराने पाहील. तुमचं काय मत...

@ अनिकेत परशुराम आपटे.