"मैं पीछे नहीं हटुंगा... मैं लडुंगा... आखरी आदमी, आखरी गोली तक..." ब्रिगेड मुख्यालयाला दिलेल्या संदेशामधले हे शेवटचे शब्द होते हुतात्मा मेजर सोमनाथ शर्मा यांचे...
१९४७-४८ला भारत-पाकिस्तान यांच्यात भीषण युद्ध झालं. त्यावेळी श्रीनगर शहर आणि विमानतळ यांच्या जवळ असलेलं बडगाम खूप संवेदनशील ठिकाण होतं. ते ठिकाण जर पाकिस्तानच्या हाती गेलं असतं, तर खूप मोठा धोका श्रीनगर शहराला पोहोचणार होता. म्हणून त्यावेळचे ब्रिगेडियर एल.पी.सेन यांनी गस्तीसाठी दोन तुकड्या बडगामला पाठवण्याचं ठरवलं. त्या तुकड्यांचं मुख्य काम होतं बडगाम क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्करला हुडकणं आणि त्याची वर्दी ब्रिगेडला देऊन बेसला परत येणं. त्याच तुकड्यांमध्ये सामील असलेल्या कुमाऊ रेजिमेंटच्या चौथ्या बटालियनच्या डी कंपनीचं नेतृत्व करत होते, मेजर सोमनाथ शर्मा...
३ नोव्हेंबर १९४७ रोजी डी कंपनी ठरल्याप्रमाणे पुढे जात होती. मुख्यालयाला वेळच्या वेळी सांदेशाही पाठवत होती. काही वेळात कंपनीच्या परतण्याची वेळ आली. डी कंपनीला दुपारी तीन वाजता मागे फिरण्याचे आदेश मिळाले होते. पण दुपारी अडीचच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या काही हालचाली दिसून आल्या. मेजर शर्माने लगेच आपल्या कंपनीला सतर्कतेचा इशारा दिला. थोड्याच वेळात पाकिस्तानी लष्कराने मेजर शर्मा आणि त्यांच्या डी कंपनीला तीन बाजूनी घेराव घातला. बॉम्ब हल्ल्यामध्ये आपले काही जवान जख्मी झाले तर काहींना वीरमरण आलं. श्रीनगर शहर आणि विमानतळाच्या दृष्टीने मेजर शर्मा यांना बडगामचं महत्व चांगलंच ठाऊक होतं...
स्वतःचा जीव धोक्यात घालून मेजर शर्मा त्यांच्या विविध छवण्यात जाऊन, त्यांनी तैनात केलेल्या आपल्या जवानांना लढण्यासाठी एकवटू लागले. मेजर शर्मा आणि आपल्या जवानांनी अनेक पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घातलं. मेजर शर्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिपाई दिवाण सिंह यांनी शत्रूवर प्राणघातक हल्ला चढवला. काही अंतरावर ठेवलेल्या शस्त्रसाठ्यावर आदळलेल्या एका बॉम्बमुळे मेजर शर्मा जबर जख्मी झाले. पण शत्रूवर रोखलेली त्यांची रायफल तशीच आग ओकत राहिली. मेजर सोमनाथ शर्मा, शिपाई दिवाण सिंह आणि आपल्या काही जवानांना वीरमरण आलं. तसंच पाकिस्तानी लष्कराचे २००हून अधिक घुसखोरही मारले गेले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीमुळे पाकिस्तानी लष्कराची आगेकूच तिथेच थांबली. अधिक नुकसान होऊ नये म्हणून अखेर त्यांना मागे हटावं लागलं...
खचलेल्या आणि दमलेल्या पाकिस्तानी लष्कराकडून आपल्या एक पंजाब रेजिमेंटने बडगाम पुन्हा ताब्यात घेतले. पण, मेजर सोमनाथ शर्मा आणि त्यांच्या जवानांच्या तीव्र प्रतिकाराचा आणि चिवट लढाऊपणाचा तो खरा विजय ठरला. बडगामच्या लढाईत दाखवलेल्या अदम्य साहसाबद्दल शिपाई दिवाण सिंह यांना मारणोत्तर महावीर चक्र आणि मेजर सोमनाथ शर्मा यांना मारणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मानित केलं गेलं. शिपाई दिवाण सिंह, महावीर चक्र मिळवणारे दूसरे तर मेजर सोमनाथ शर्मा, परमवीर चक्र मिळवणारे पहिले सैनिक ठरले...
आज ३१ जानेवारी. आज मेजर शर्मा यांचा जन्म दिवस. भारतमातेच्या रक्षणार्थ वयाच्या पंचविसाव्या वर्षीच जिवावर उदार झालेले, कुमाऊ रेजिमेंटचे, परमवीर चक्र विजेते मेजर सोमनाथ शर्मा यांना माझा सलाम...
कालिका माता की जय...
बजरंगबली की जय...
दादा किशन की जय...
भारतमाता की जय...
मेजर सोमनाथ शर्मा अमर रहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.
