Saturday, February 21, 2026

अशी ही बनवाबनवी - पत्र ओळख...


चार दोस्तांची कथा ही न्यारी...
बनवाबनवी असे नाव हिचं...
गोंधळात गोंधळ घालती चौघे...
उराशी बाळगुनी स्वप्न घराचं...

सर्वात मोठा धनंजय माने...
या टोळीचा हा लीडर...
करतो काम एका स्टोरमध्ये...
शंतनूचा हा बिग ब्रदर...

शंतनू म्हणजे भाऊ धनंजयचा...
असे हा होतकरू डॉक्टर...
अभ्यासासोबतच बरं का...
सुषमाचा हा आहे प्रियकर...

सुषमा म्हणजे मैत्रीण मनीषाची...
एवढीच काय ती ओळख तिची...
मनीषासोबत तिनेही धरली...
सुट्टीत वाट मावशीच्या घरची...

मनीषा असे मावशीची लाडकी...
पुढे होणार ती सुधीरचीही आवडती...
तिच्या मनी असे एक राजकुमार...
सगळेच ज्याच्या प्रेमात पडती...

मनीषाच्या मनातला तो राजकुमार...
सुधीर तिच्या समोर आणतो...
असे हा मित्र धनंजय-शंतनूचा...
घरात मात्र सुधा म्हणून वावरतो...

सुधासोबत असते पार्वती...
ती पार्वती नाही तो परशा आहे...
संगीत दिग्दर्शन असे स्वप्न सुधीरचं...
परशाला लोकनाट्याची नशा आहे...

पाषाण रोडच्या लीलाबाईंच्या बंगल्यात...
स्त्रिया म्हणून सुधीर-परशा फिरतात...
लीलाबाईंच्या डोळ्यात आहे मोतीबिंदू...
पण त्या बळीलाच जास्त घाबरतात...

बळी म्हणजे लीलाबाईंचा पुतण्या...
ओळखला जातो हा गुंडं म्हणून...
लीलाबाईंच्या बंगल्यावर ठेवतो डोळा...
तानूला बरोबर घेऊन...

बंगल्यातली ढालगज मोलकरीण तानू...
नजरेत तिच्या सतत संशयी भाव...
तिची ती नजर चुकवत कमळी करते...
दुसऱ्यांदा बंगल्यात शिरकाव...

कमळी म्हणजे छबूरावांची लेक...
परशाच्या मनातही ती राही...
तमाशा व लोकनाट्य करणारे छबूराव मात्र...
परशाला नेहमीच पाण्यात पाही...

स्टोरची मालकीण माधुरी...
नसे तिचा बंगल्याशी थेट संबंध...
वरवर असे ती कठोर तरी...
धनंजयशी जुळले तिचे भावबंध...

धनंजयचे पूर्वीचे घरमालक...
नाव त्यांचे विश्वासराव सरपोतदार...
बोलायला आहेत हे अस्सल पुणेरी...
डायबिटीजने हे असती बेजार...

अशी ही चिवित्र पात्र एकेक...
मस्त उडवती धमाल...
हीच तर आहे बरं का मंडळी...
बनवाबनवीची कमाल...

@ अनिकेत परशुराम आपटे.