Saturday, September 9, 2017

प्रतिबिंब

“अजय, किती सुंदर आहे रे ही जागा... आणि ही बाल्कनी तर अप्रतीम आहे. छान गार्डन करता येईल इथे...” रश्मी अजयला सांगत होती. अजय आणि रश्मीचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं आणि लगेचंच अजयला प्रमोशन मिळाल्याने आज त्यांच्या घराचं स्वप्नही पूर्ण होणार होतं. अजय आणि त्याचा ब्रोकर बाजूलाच उभे होते. अजय म्हणाला, “तुला आवडलं ना... झालं तर मग. मिस्टर मेहता आपण पुढची बोलणी करू.” मिस्टर मेहतांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. तो म्हणाला, “साहेब, ही जागा मिस्टर गुप्तेंची आहे. ते दुबईला असतात आणि जागा विकण्याचे हक्क त्यांनी माझ्याकडे दिले आहेत. ही पहा फाईल. यात जागेचे पेपर्स पण आहेत. अजय फाईल बघत असताना रश्मीमात्र घर बघण्यात मग्न होती. फिरता फिरता ती बेडरूममध्ये आली. सर्व खोल्यांसारखी ही खोलीदेखील रिकामीच असणार अशी तिची समजूत होती पण तसं झालं नाही...

“ए अजय, इकडे ये... हे बघ काय...” खोलीत असलेल्या एकमेव लाकडाच्या कपाटाने रश्मीचं लक्ष वेधलं होतं. अजय धावत आत आला तर रश्मी कपाटासमोर उभी होती. “मिस्टर मेहता, हे कपाट मिस्टर गुप्ते इथे विसरून गेले का...” अजयने मिस्टर मेहताला विचारलं. मिस्टर मेहता लगेच उत्तरले, “नाही. मिस्टर गुप्ते म्हणाले त्यांना याची गरज नाही म्हणून ते त्यांनी इथेच ठेवले. तुम्हाला जर नको असेल तर मी लगेच हे इथून हटवतो.” रश्मीला ते कपाट खूप आवडलं होतं. ती म्हणाली, “नको नको, अजय हे कपाट ठेऊ आपण. अरे आपलं सामान अजून लागायचं आहे. स्टोरेजसाठी उपयोग होईल याचा. शिवाय अशी कपाटं मिळत नाहीत रे आजकाल...” अजय हसला. मिस्टर मेहतांनाही समजलं होतं. व्यवहार पूर्ण झाला. घर अजय आणि रश्मीच्या ताब्यात आलं होतं. पूजा करून गृहप्रवेश करावा असा रश्मीचा मानस होता. अजयला ते फारसं रुचत नव्हतं. पण रश्मीसाठी तो तयार झाला...

पूजा सुरू झाली. गुरुजी निरांजन पेटवत होते आणि वाऱ्याची झुळूक ते निरांजन विजवत होती. दारं, खिडक्या बंद असताना वारा कसा काय येतोय हे कोडं कोणालाच उलगडत नव्हतं. गुरुजी एकदा बाहेर जाऊन निरांजन पेटवून आले. बाहेर ते छान पेटलं पण घरात शिरताच ते परत विजलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर निरांजन कसंबसं पेटलं. पूजा पार पडली. रविवार असल्याने संध्याकाळीमात्र अजयने त्याच्या सर्व मित्रांना जोरदार पार्टी दिली. जितक्या उत्साहात अजय आणि रश्मीने पूजेत सहभाग घेतला तितक्याच उत्साहाने दोघांनी पार्टीचाही आस्वाद घेतला. तात्पूर्ता का होईना, पण सकाळच्या निरांजनाचा विषय दोघंही विसरले होते. रात्र झाली. आवरूनसवरून दोघं बेडरूममध्ये आली. मागे पडलेला निरांजनाचा विषय काढत रश्मी म्हणाली, “काय रे अजू, सकाळी ते निरांजन का पेटत नव्हतं... रश्मीला उडवून लावत अजय म्हणाला, “अगं काही नाही गं... कोणीतरी खिडकी उघडली असेल आणि ज्योत विजली असेल. तू जास्त लक्ष देऊ नकोस. उद्या मला ऑफीसला जायचंय. झोप आता.” “खिडकी उघडली... ए.सी. चालू असताना खिडकी कोण उघडेल... बरं, उघडलीच, तर एकदाच... सारखी सारखी ज्योत कशी विजेल... गुरुजींनी निरांजन घराबाहेर जाऊन पेटवलं तर ते लगेच पेटलं, पण तेच जेव्हा गुरुजी घरात घेऊन आले तेव्हा पुन्हा विजलं... हे प्रकरण साधं नाही...” अजय झोपला पण रश्मीमात्र शंकांच्या विळख्यात अडकली...

सकाळी सगळी कामंधामं उरकून अजय ऑफीसला निघून गेला. रश्मीने शेजाऱ्यांची ओळख करून घेण्याचं ठरवलं. तशी सोसायटी छान मोठी होती. प्रत्येक मजल्यावर तीन घरं होती. रश्मी राहत होती त्या मजल्यावरही तीनच घरं होती. एक रश्मीचं, दुसरं तिच्या घरासमोरचं आणि एक घर लिफ्टच्या शेजारचं. रश्मीने समोरच्या घराची बेल वाजवली. एका महिलेने दार उघडलं. रश्मी लगेच बोलती झाली, “नमस्कार काकू. मी रश्मी दांडेकर. मी आणि माझा नवरा समोरच्याच घरात रहायला आलो आहोत, म्हटलं सर्वांशी ओळख व्हावी, म्हणून आले.” त्या महिलेने एकवार रश्मीच्या घराकडे पाहिलं आणि पुन्हा आपली निर्विकार नजर रश्मीकडे वळवली. तिचं ते बघणं रश्मीला फारसं रुचलं नाही. तिच्याकडे एकदा पाहून रश्मीने तिथून काढता पाय घेतला. लिफ्टमधून बाहेर येत असलेले एक गृहस्थ तिला दिसले. रश्मी हसली, तशी ते गृहस्थही हसले. “तुम्हीच नवे बि-हाडकरू वाटतं. मी वसंत दामले. हे माझं घर. ये, आत ये...” रश्मी आत गेली तर एका स्त्रीने तिचं स्वागत केलं. “ही आमची मंडळी बरं का... सुमन नाव आहे हिचं.” ओळख झाली. चहा–नाश्ता झाला. रश्मी जायला निघणार इतक्यात तिला समोरच्या घरातली ती महिला आठवली. रश्मी वळली आणि विचारू लागली, “काका, आमच्या समोरच्या घरात त्या गुजराती काकू राहतात त्या जरा वेगळ्याच वाटल्या मला...” हे ऐकताच दामले म्हणाले, “गुजराती!! छे छे... अगं महाराष्ट्रीयन आहे ती. म्हणजे मला काही फारसं माहित नाही कारण मीही मागच्याच वर्षी आलो इथे रहायला. पण ती बाई गुजराती नाही हे मला सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितलं.” हे ऐकून रश्मी गोंधळली. घरात येऊन विचार करू लागली, “जरा विक्षिप्तच होती ती बाई. आणि चेहऱ्यावर काही भावच नव्हते तिच्या... दामले काका म्हणतात ती बाई गुजराती नाही. पण मग तिची साडी...” रश्मी विचारात मग्न असताना... “ठक ठक...”

“ठक ठक...” असा आवाज आला आणि रश्मीची विचार मालिका खंडित झाली. बेल असताना दार का वाजवायचं असा विचार करत रश्मीने दार उघडले. बाहेर कोणीच नव्हतं. जरा इथे तिथे पाहून रश्मीने दार लावून घेतलं. काही क्षणात, “ठक ठक...” पुन्हा आवाज आला. रश्मीने पुन्हा दार उघडलं. बाहेर कोणीही दिसलं नाही. रश्मी वैतागली. म्हणाली, “कोण आहे... समोर या पाहू असे... दार का वाजवताय सारखं...” पण उत्तर नाही आलं. रश्मीने जरा पुढे होऊन पूर्ण मजल्यावर पाहिलं पण तिला कोणीच दिसलं नाही. रश्मी मागे फिरली. दार लावून घेणार इतक्यात तिच्या समोरच्या घराचा दरवाजा उघडला आणि निर्विकार चेहरा असलेल्या त्याच काकू रश्मीला दिसल्या. रश्मी त्यांना काही विचारणार इतक्यात त्यांनी दार बंद केलं. गोंधळलेली रश्मी घरात आली आणि तिने दार लावून घेतलं. “काय कटकट आहे. ही नक्कीच सोसायटीमधली पोरं असणार... उगाच त्रास देत असणार. ते काही नाही, आता दार कितीही वाजलं तरी उघडायचं नाही. कोणाला इतकीच गरज असेल तर बेल वाजवतील.” असा विचार करून रश्मी तिच्या कामाला लागली. दिवसभर “ठक ठक...” या आवाजाने रश्मीला अगदी वीट आला होता. शेवटी तिने ठरवलं, “संध्याकाळी अजय आल्यावर या प्रकाराचा निकाल लावायचाच...”

संध्याकाळी अजय आला तोच घोड्यावर स्वार होऊन, “काय गं रशू, तयार नाही झालीस अजून... अगं जरा लवकर... नाटकाची सुरुवात नाही घालवायची मला...” त्याच्या या बोलण्याला रश्मी लगेच उत्तरली, “अरे हो हो... आल्या आल्या कसली रे घाई... नाटकाला अजून दोन तास आहेत म्हटलं... बरं अजू, आपल्या सोसायटीमधली पोरं खूप मस्तीखोर आहेत रे... दारावर नॉक करून पळून जातात...” आवराआवर करत अजय म्हणाला, “पोरं, अगं या सोसायटीमध्ये लहान मुलं नाहीत. जी आहेत ती कॉलेजला जाणारी आहेत...” रश्मी गोंधळली, “लहान मुलं नाहीत मग दार कोण वाजवत असेल...” हा विचार करत असताना, “अगं रशू, नवीन घर आहे आपलं. शिवाय अजून पूर्ण सामानही लावलेलं नाही आपण. म्हणून कदाचित या मोकळ्या घरात घुमणारे आवाज ऐकून तुला भास होत असतील. तू लक्ष नको देऊ. चल तयार हो पटकन.” अजयच्या बोलण्याने रश्मी भानावर आली आणि ड्रेस काढण्यासाठी तिने कपाट उघडलं. रश्मी ड्रेस निवडत असताना, “ठक ठक...” या आवाजाने अवाक झाली. आवाज अगदी जवळून आला होता. काही क्षण गेले. पुन्हा, “ठक ठक...” असा आवाज आल्यावर रश्मीने लगेच अजयला हाक मारली. “अजू, मी म्हणत होते ना, “ठक ठक” असा आवाज येतो. या कपाटातून तो येत आहे. पण कपाटात तर कपड्यांशिवाय काहीच नाही...” अजय कपाटाच्या बाहेरून हात फिरवत कपाटाच्या मागच्या बाजूला गेला. भिंत आणि कपाट यांच्या फटीत त्याला काहीतरी दिसलं. तो म्हणाला, “ए रशू, कपाटाच्या मागे काहीतरी आहे... चल कपाट सरकावू आपण. तू त्या बाजूने कपाट ढकल मी या बाजूने ओढतो.” दोघं मिळून कपाट सरकावू लागली. काही क्षणात अजयला जाणवलं की तो कपाट ओढतो आहे पण ते हलत नाही. त्याने दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कपाट ढकल्याचं सोडून रश्मी भिंतीकडे एकटक पाहत उभी होती. त्याने जाऊन पाहिलं तर पांढऱ्या नक्षीदार चौकटीत गोलाकार आकाराचा एक प्रचंड मोठा आरसा त्याला दिसला. तो आरसा इतका मोठा होता की संपूर्ण माणूस त्यात दिसू शकत होता. शिवाय तो आरसा भिंतीला फिक्स केला होता...

“अय्या, किती छान आहे हा आरसा... ए अजू, मी पूर्ण दिसते आहे बघ यात...” “मिस्टर मेहता मला या आरशाबद्दल काहीच बोलले नाहीत... आणि हा आरसा तर भिंतीला फिक्स केलेला दिसतोय...” अजय वेगळ्याच विचारात असताना रश्मीने त्याला भानावर आणलं, “ए अजू, आपण ठेऊया ना हा आरसा...” “रशू, अगं घर घेताना मिस्टर मेहता आपल्याला या आरशाबद्दल काहीच बोलले नाहीत. त्यांना याबद्दल कल्पना द्यायला हवी.” असं म्हणून अजयने मिस्टर मेहतांना फोने लावला, “नमस्कार, मेहता साहेब. मी अजय बोलतोय. अहो इथे ते मिस्टर गुप्तेंचं कपाट आहे ना, त्याच्या मागे आम्हाला एक आरसा सापडलाय. याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का... काय... बरं... ठीक आहे... तुम्ही मला मिस्टर गुप्तेंचा नंबर आणि इमेल आयडी पाठवून द्या, मी स्वत: त्यांच्याशी बोलतो.” अजयने फोन ठेवला आणि रश्मीकडे वळला तर रश्मी तंद्री लागल्यासारखी आरशात पाहत होती, “किती सुंदर आरसा आहे ना हा... असं वाटतंय जणू एक दुसरी व्यक्तीच समोर उभी आहे.” रश्मीच्या आवाजात एक वेगळीच झाक अजयला जाणवली. “रशू, अगं चल. निघायचं आहे ना आपल्याला... रश्मी...” अजयने आवाज चढवला तशी रश्मी शुद्धीत आल्यासारखी त्याच्याकडे वळत म्हणाली, “अरे, बोलत काय बसलोय आपण... जायचं नाही का आपल्याला... अरेच्या मीच तयारच नाहीये अजून... पाच मिनिटं थांब. मी आलेच...” रश्मी ड्रेस घेऊन आत गेली. अजयला रश्मीचं आत्ताचं वागणं थोडं खटकलं होतं घर नवीन आहे म्हणून कदाचित रशू अशी वागली असेल असा विचार करून अजयने तो विषय टाळला. बाहेर पडताना रश्मीने पुन्हा एकवार त्या आरशाकडे पाहिलं आणि दोघं बाहेर पडली...

नाटक संपलं. बाहेरच जेवून दोघं घरी आली. बऱ्याच दिवसांनी अजय आणि रश्मीला इतका छान वेळ घालवायला मिळाला होता. नाटकाच्या गप्पा आणि एकमेकांच्या प्रेमळ सहवासात दोघांना कधी झोप लागली याचा पत्ताच नव्हता. अजयने झोपेत बाजूला हात लावला पण हाताला रश्मी लागली नाही. डोळे किलकिले करत अजयने पाहिलं तर रश्मी बाजूला नव्हती. शेजारीच ठेवलेला मोबाईल त्याने उचलला आणि त्यातला torch पेटवला. Torchच्या अंधूक प्रकाशात त्याला आरशासमोर उभी असलेली रश्मी दिसली. आरशातल्या स्वत:च्या प्रतिबिंबाकडे रश्मी एकटक पाहत होती. अजय तिच्याजवळ गेला. एक दोनदा हाक मारूनही रश्मीने उत्तर दिलं नाही तेव्हा अजयने तिला हलवलं. रश्मी भानावर आल्यासारखी म्हणाली, “अरे तू इथे काय करतो आहेस... झोपला नाहीस का... उद्या ऑफीस आहे ना... चल, झोपूया आपण...” असं म्हणून रश्मी अजयला घेऊन पुन्हा बेडवर आली. काही क्षणातच रश्मीला झोप लागली. अजयमात्र जागा होता. रश्मीच्या वागण्यात अचानक होणारे बदल त्याला फारसे रुचत नव्हते. “इतकं काय आहे त्या आरशात की एवढ्या रात्री रशू त्यात पाहत होती... आणि तिच्या वागण्यातला बदल... उद्याच ऑफीसातून मिस्टर गुप्तेंना फोन करतो आणि या आरशाचा सोक्षमोक्ष लावून टाकतो.” अजयने मनाशी विचार पक्का केला आणि तो झोपी गेला...

ऑफीसला गेल्यावर अजयने मिस्टर गुप्तेंना फोन लावला. बराच वेळ बेल वाजत राहिली पण कोणी उत्तर देत नव्हतं. अजयने दोन-तीन वेळा प्रयत्न करूनही मिस्टर गुप्ते उत्तर देत नाहीत म्हटल्यावर त्याने इमेलचा वापर करायचं ठरवलं. त्याने लगेच मिस्टर गुप्तेंना मेल पाठवला, “नमस्कार मिस्टर गुप्ते. मी अजय दांडेकर. तुमचे एजंट मिस्टर मेहता यांच्याकडून तुमचं घर मी विकत घेतलं आहे. त्याच संदर्भात मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मी तुम्हाला फोन केला होता पण तुमच्याकडून उत्तर आले नाही. मी तुमच्या मेलची किंवा फोनची प्रतीक्षा करत आहे. लवकरात लवकर आपला संपर्क व्हावा. अजय दांडेकर...” मेल पाठवून अजय विचारच करत होता, “फोन नाही उचलला, निदान मेल तर बघतील. मिस्टर गुप्तेंचं उत्तर आल्यावर त्यांना आरशाबद्दल विचारतो.” त्याच्या विचारांची मालिका खंडित झाली त्याला येणाऱ्या फोनमुळे. दामले काकूंचा फोन होता, “अजय, अरे रश्मी कुठे सापडत नाहीये. तू जरा लवकर येतोस का... मला काही सुचत नाहीये...” इतकं ऐकलं मात्र आणि अजय वेळ न दवडता घराकडे निघाला. तो लिफ्टमधून वर आला. दामलेंच्या घराचं दार उघडंच होतं आणि दामले काकू डोक्याला हात लावून समोर बसल्या होत्या. “काकू...” अजयच्या आवाजाने त्यांनी वर पाहिले. अजय आत आला. दामले काकू रडवेल्या झाल्या होत्या. “काकू, शांत व्हा बघू आधी. काय झालं ते सांगाल का...” अजय दामले काकूंना धीर देत म्हणाला. दामले काकू बोलू लागल्या, “काय सांगू तुला, सकाळी रश्मी घरी आली. आमच्याशी छान बोलली. तिच्या बोलण्याचे विषय दोनच, एक म्हणजे तुमच्या समोरची बाई आणि दुसरा म्हणजे आरसा. रश्मी घरी परतली. दुपारी मी पाटवड्या केल्या होत्या. त्या रश्मीला द्यायला गेले, पाहिलं तर दार उघडं होतं. मी आत शोधलं पण रश्मी कुठेच नव्हती. तिच्या चपलामात्र घरातच होत्या. हे गेलेत तिच्या शोधात. ते आले की समजेल.” दामले काकूंचं बोलणं संपतं तोच काका दारात उभे दिसले. दामले काकू आणि अजयच्या चेहऱ्यावरील प्रश्नांना त्यांनी नकारार्थी मान हलवली. “आता थांबण्यात अर्थ नाही. पोलिसात तक्रार करायला हवी. काका तुम्ही येता का सोबत... मी बॅग घरी ठेऊन येतो...” असं म्हणून अजय घराकडे निघाला...

त्यांच्या समोरच्या घराचं दार उघडं होतं. अजयने पाहिलं तर रश्मीने सांगितलेली ती बाई दारात उभी होती. तिच्याच बाजूला साधारण दहा-बारा वर्षांचा एक मुलगा उभा होता. अजयने घरात शिरताना त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला तर त्यांच्या निर्विकार चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलेलं त्याला दिसलं. त्या परीस्थितीतही त्याचं ते हसणं अजयला विचित्र वाटलं. अजय घरात आला. बूट काढून बॅग ठेवायला अजय बेडरूममध्ये गेला तर कपाटाच्या बाजूला आरशाच्या खाली रश्मी बेशुद्ध पडली होती. “रश्मी...” अजयने जोरात हाक मारली. त्याचा आवाज इतका मोठा होता की दामले काका-काकूसुद्धा धावत आले. अजयने रश्मीला उचलून बेडवर ठेवलं. काकांनी लगेच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आले. रश्मी अजून बेशुद्धच होती. त्यांनी तिला तपासलं. डॉक्टर जरा गोंधळल्यासारखे वाटत होते. म्हणाले, “त्यांना कसलंतरी टेंशन असावं. या शुद्धीवर आल्या की त्यांना खायला देऊन या गोळ्या द्या. रात्रभराची झोप झाली की बरं वाटेल त्यांना.” जाताना एकवार डॉक्टरांनी रश्मीकडे पाहिलं आणि ते निघून गेले. रश्मी सापडली म्हणून दामले काकूंना जरा हायसं वाटत होतं पण त्यांच्या मनात एकच शंका येत होती, “मी मगाशी आले तेव्हा तर रश्मी इथे नव्हती आणि दारसुद्धा उघडं होतं... मग रश्मी परत कधी आली...” त्या काही बोलणार इतक्यात रश्मी शुद्धीवर आली. रश्मीला दिलासा देत अजय म्हणाला, “रश्मी, उठलीस का... अगं आम्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवलास तू... काय घडलं सांगू शकशील का...” रश्मी काही क्षण अजयकडे पाहत राहिली. हळू हळू बसती होऊन बोलू लागली, “तू गेल्यावर मी आवरत होते. का कोण जाणे, मला आरशाकडे जायचं मनात आलं. मी आरशासमोर उभी राहून स्वत:ला न्याहारत होते. काही क्षणात मला जाणवलं की हे प्रतिबिंब माझ्यासारखं नाही. मी करत असलेल्या हालचाली आणि आरशातल्या माझ्या हालचाली यात वेळेचा थोडा फरक होता. मी ज्या हालचाली करत होते त्या हालचाली आरशातमात्र काही क्षणानंतर व्हायच्या. मला वाटलं माझ्याच मनाचे खेळ असावेत असं म्हणून तो विचार बाजूला सारावा म्हणून दामले काकूंकडे गेले. परत आल्यावर जेवणाची तयारी करू लागले. पण तो आरसा मला बोलवत आहे असा सारखा भास होत होता. मी आरशासमोर गेले. काही क्षण तशीच उभी राहिले. हालचाल करणार इतक्यात आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटलेलं मला जाणवलं आणि मला भोवळ आली. जाग आली तेव्हा तू समोर दिसलास... अजय, तो आरसा मला साधासुधा वाटत नाही... आपण ते कपाट पुन्हा आरशासमोर ठेऊ आणि आरशाला त्यामागे लपवून ठेऊ...”

रश्मी गप्प झाली. अजयने तिला शांत केलं. दामले काकूंनी आणलेल्या जेवणातून कसेबसे चार घास दोघांनी पोटात ढकलले. रश्मीला गोळ्या देऊन अजयने तिला झोपवलं खरं पण तो स्वत:मात्र विचारांच्या जगात हरवून जागा होतो, “काय गौडबंगाल आहे या आरशाचं... सोसायटीचे सेक्रेटरी म्हणाले या सोसायटीमध्ये लहान मुलं नाहीत, पण मग समोर दिसलेला तो लहान मुलगा... बरं रश्मीच्या म्हणण्याप्रमाणे जर तो आरसा इतकाच भीतीदायक आहे तर तिने तो लपवायला का सांगितलं... तोडून टाकू असं का नाही म्हणाली...” अजयची विचारमालिका खंडित झाली फोनच्या बेल मुळे. त्याने पाहिलं तर डॉक्टर फोन करत होते. आवाजाने रश्मीची थोडी चुळबूळ झाली. अजयने फोन उचलला, “बोला डॉक्टरसाहेब... काय... आहो पण झालं काय ते तरी सांगा... फोनवर न सांगता येण्याइतकं महत्वाचं आहे का काही... ठीक आहे. सकाळी मी ऑफीसच्या आधी तुम्हाला भेटून जातो...” कदाचित रश्मीबद्दल काहीतरी सांगायचं असेल डॉक्टरसाहेबांना... हा विचार करत अजयला झोप लागली. सकाळी अजय जागा झाला. चाचपडून पाहिलं तर बाजूला रश्मी नव्हती. “कामात गुंतली असावी...” हा विचार करून आवरू लागला. आवरता आवरता अजयला, “ठक ठक...” असा आवाज आला. आधी अजयने दुर्लक्ष केलं पण तो आवाज थांबतच नव्हता. काही क्षणातच, “अजय... अजय... मला बाहेर काढ...” असे अस्पष्ट आवाज अजयला येऊ लागले. आवाजावरून रश्मीच बोलावते आहे असं अजयला वाटत होतं. तो इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला कोणीच दिसत नव्हतं. इतक्यात रश्मी खोलीत आली. तिला पाहून अजय म्हणालाच, “काय गं रशू... का बोलवत होतीस... मला वाटलं लांबून कुठूनतरी बोलवत आहेस... कारण तुझा आवाज खूप खोल होता...” हे ऐकून रश्मीचा चेहरा कावराबावरा झाला. ती म्हणाली, “मी... नाही... मी नाही बोलावलं... अरे तुला ऑफीसला उशीर होऊ नये म्हणून असेल... चल, पटकन तयार होऊन जा ऑफीसला...” रश्मीचं बोलणं ऐकून, आवरून अजय लगेच बाहेर पडला...

अजय बाहेर पडला खरा. पण त्याचं लक्षमात्र घराकडेच लागलं होतं. “रश्मीने गुजरातीपद्धतीने साडी का नेसली... तिचं चेहरा असा रागीट का दिसत होता... मी ऐकलेला आवाज रश्मीचाच होता आणि तोही घाबरलेला वाटत होता... पण आत्ता रश्मी आली तेव्हा व्यवस्थित वाटत होती... मग तो आवाज...” विचार करत असताना अजय दवाखान्याजवळ पोहोचला तर तिथे गर्दी जमलेली दिसली. हळू हळू पुढे सरकत अजय दाराजवळ आला तर तिथे पोलीस उभे होते. अजयने विचारणा केली तर समजलं, की डॉक्टर मोठ्या विचित्र पद्धतीने मरण पावलेत. हे ऐकून अजयला धक्काच बसला. तो आत आला. इंस्पेक्टर जबानी घेत होते. जमिनीवर चादरीखाली झाकलेला डॉक्टरसाहेबांचा मृतदेह होता. वाऱ्यामुळे चादर बाजूला झाली आणि... समोरचं दृश्य पाहून अजयच्या पायाखालची जमीन सरकली... डोक्टरांची मान पूर्ण पिळली गेली होती आणि जीभ बाहेर आली होती. अजय हबकला आणि मागे सरकत सोफ्यावर कोसळला. इंस्पेक्टर अजयच्या जवळ आला आणि प्रश्न विचारू लागला. अजय म्हणाला, “मी अजय दांडेकर. माझी पत्नी रश्मी डॉक्टरांची पेशंट आहे. काल रात्री डॉक्टरांनी मला फोन केला होता. त्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. पण आज...” अजय बोलायचा थांबला. इंस्पेक्टरसाहेबांनी अजयचं स्टेटमेंट घेऊन त्याला जाऊन दिलं. डॉक्टरांच्या त्या अवस्थेमुळे अजय पुरता हबकला होता. तो कसाबसा ऑफीसमध्ये पोहोचला. त्याने मोबाईल काढला तर त्यावर दोन गोष्टी त्याला दिसल्या. एक होता डॉक्टरांचा voice message आणि दुसरा होता मिस्टर गुप्तेंनी पाठवलेला मेल. अजयने डॉक्टरांचा मेसेज ऐकला, “मिस्टर अजय, कदाचित हा मेसेज तुम्हाला मिळेल तोवर मी जिवंत नसेन. मला तुमच्या पत्नीबद्दल.... तू.... आ.....................”

अजयला हे सर्व ऐकत असताना घाम फुटला. “डॉक्टरांना रश्मीबद्दल काहीतरी सांगायचं होतं आणि ते सांगत असतानाच त्यांचा खून झाला. असं काय असेल ज्यामुळे त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले...” हा विचार करत अजयने मिस्टर गुप्तेंचा मेल उघडला, “नमस्कार मिस्टर अजय. माफ करा तुमचा फोन मी घेऊ शकलो नाही. पण बरं झालं तुम्ही मला मेल पाठवलात. मिस्टर अजय, मी माझ्या एजंटला हे घर देण्यापूर्वी या घराची पूर्ण कल्पना द्या असं सांगितलं होतं. कदाचित पैशाच्या लालसेपोटी तो गप्प बसला. मिस्टर अजय, तुम्ही आणि तुमची पत्नी फार मोठ्या संकटात सापडला आहात. ते संकट मी अतिशय जवळून भोगलंय. त्या घरात एक आरसा आहे. त्यात काहीतरी अमानवी शक्ती आहे. कदाचित याच आरशामुळे माझा दहा वर्षांचा मुलगा गायब झाला. आमच्या घरात काम करणारी आमची मोलकरीण मोठ्या विचित्र अवस्थेत मेलेली सापडली आणि माझी पत्नी हे सर्व पाहून भान हरवून बसली. त्यानंतर मी तिथे जराही न थांबता इथे दुबईला निघून आलो. मिस्टर अजय, मला असं वाटतं की तो आरसा त्याच्या समोर येणाऱ्या व्यक्तीला संमोहित करतो. तो आरसा ताबडतोब तोडून टाका मिस्टर अजय. मिस्टर गुप्ते.” मेसेज वाचत असताना अजय थरथरत होता. सोबत असलेल्या फाईलमध्ये मिस्टर गुप्तेंचा फोटो होता ज्यात त्यांची पत्नी आणि मुलगाही होते. त्या मुलाला अजयने ओळखलं... “अरे... हा तर तोच समोरच्या घरात असलेला मुलगा... त्याने घातलेला टी-शर्ट उलटा होता... आणि रश्मीने सांगितलेली ती गुजराती बाई... My God… म्हणजे तो मुलगा आणि ती बाई...” अजयसमोर हळू हळू सर्व गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या. “मला ताबडतोब घरी जायला हवं... रश्मी फार मोठ्या संकटात आहे... तिला वाचवायला हवं. पण मी एकट्याने कसं... दामले काका-काकू माझी मदत करू शकतील कदाचित...” हा विचार करत अजय घराकडे वळला...

अजय लिफ्टने वर आला. घरी जाण्याआधी दमलेंकडे वळला. काका आणि काकू समोरच बसले होते आणि विचारात गढून गेले होते. अजयच्या येण्याने दोघांची विचार मालिका भंगली. अजय म्हणाला, “काका, एक धक्कादायक वाईट बातमी समजली आहे मला. काल रश्मीला पहायला ते डॉक्टर आले होते ना... त्यांचा आज सकाळी मृत्यू झालाय... त्यांच्याच दवाखान्यात मान पिळलेल्या अवस्थेत ते मृत आढळले. पोलीसांचं म्हणणं आहे की हा मृत्यू साधा नाही. कोणातरी ताकदीच्या माणसाने डॉक्टरसाहेबांची मान तशी पिळली. पण काकू, मला हा प्रकार मानवी नाही तर अमानवी वाटतो आहे. कारण डॉक्टरांनी मला जो मेसेज पाठवला आहे, त्यात ते बोलत असताना त्यांच्यावर हल्ला झाला...” अजयचं बोलणं मधेच तोडत दामले काकू बोलत्या झाल्या, “अजय, मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे... अरे रश्मीचं वागणं जरा विचित्र वाटतंय रे... कालपर्यंत जी रश्मी तुमच्या समोरच्या घरी जायला कचरायची तीच रश्मी आज जवळ जवळ तासभर तिथे होती. बरं, तिचं चेहराही मला रागीट वाटला. ती सतत मला आरशाबद्दल भरभरून सांगत होती, मला सारखी आरसा बघायला या असं सांगत होती... मी निघालेही होते पण हे आले म्हणून नाही गेले. काही वेळाने मी केलेला शिरा घेऊन आले तर दार उघडं होतं आणि रश्मी आत नव्हती. मी मागे वळले तर मागून येणाऱ्या रश्मीचा धक्का लागून प्लेट खाली पडून फुटली. काचेच्या तुकड्यांमुळे माझ्या पायालाही जखम झाली आणि रश्मीच्या पायालाही. पण रश्मीच्या पायातून रक्तच नाही आलं शिवाय क्षणाचाही विलंब न होता जखम बरी झाली. हे पाहून मला काय बोलावं सुचेना... मी सरळ तिथून निघाले आणि घरात आले. ह्यांच्याशी बोलतच होते की तू आलास...” अजयने सगळं ऐकून घेतलं. म्हणाला, “काकू, तिच्या पायातून रक्त आलं नाही याचं कारण... ती रश्मी नाही...”

अजयचं बोलणं ऐकून दोघंही अवाक झाले. अजय पुढे बोलत होता, “काका मला मिळालेल्या माहितीनुसार मी जो निष्कर्ष काढलाय तो खरा ठरतोय तर... रश्मीचा निर्विकार चेहरा, काच लागूनही पायातून रक्त आलं नाही आणि जखमही लगेच बरी झाली... काका, रश्मी आधी गायब झाली. घरात शोधूनही मिळाली नाही. नंतर घरातच सापडली आणि तीही आरशाजवळ. आपलं प्रतिबिंब नेहमी उलटं असतं. आमच्या समोरच्या घरात राहणारी ती बाई गुजराती आहे असं रश्मी म्हणाली होती कारण तिच्या साडीचा पदर उजव्या खांद्यावर होता. काका, काकू... आपल्यात जी वावरते आहे ती रश्मी नसून तिचं प्रतिबिंब आहे आणि माझी रश्मी बहुतेक त्या आरशात कैद आहे. समोरच्या घरात असलेली ती बाई आणि तो लहान मुलगा हेही खरे नाहीत. ती जशी तुमच्या मागे लागली तसंच आधी कोणीतरी त्या बाईच्या आणि त्या मुलाच्या मागे लागलं असेल. पण त्यांना वाचवायला कोणीही आलं नसेल... यावेळी मात्र तसं नाही होणार... काकू, मी आज सकाळीच रश्मीचा आवाज ऐकला. लांबून कुठूनतरी आवाज येतोय असं वाटत होतं. पण मला खात्री आहे रश्मी त्याच आरशात आहे आणि मी तिला सोडवणारच... आणि यात मला तुमची मदत हवी आहे...” दामले काका आणि काकू तयार झाले. अजयने बोलायला सुरुवात केली, “जर रश्मीला बाहेर काढायचं असेल तर मला आत जावं लागेल. रश्मीला कदाचित बाहेर येण्याचा मार्ग सापडत नसावा. मी हाताला दोर बांधून आरशात जाईन दोराचं दुसरं टोक बाहेर कपाटाला बांधलं असेल. रश्मी समोरच्या घरात नक्की परत जाणार. काकू रश्मी समोरच्या घरात गेली की तुम्ही त्या घराला बाहेरून कडी लावून घ्या. मी आरशात गेल्यावर काका तुम्ही तिथे लक्ष ठेवा. काहीही झालं तरी माझा या दोराशी संपर्क तुटला नाही पाहिजे. मी रश्मीला बाहेर आणेन आणि हा आरसा तोडून टाकेन.” अजय हे बोलतच होता की त्यांना दार वाजल्यासारखं वाटलं. त्यांनी पाहिलं तर ती समोर होती. अजयला तिथे पाहून ती जरा बावचळली. म्हणाली, “अरे... तू इथे...” अजय काहीच घडलं नाही अशा आविर्भावात म्हणाला, “अगं माझं डोकं दुखत होतं म्हणून लवकर आलो. लिफ्टबाहेर पडलो तर काकूंच्या घरातून शिऱ्याचा वास आला. म्हणून इथे आलो. चल आता घरी जाऊ.” अजय तिला घेऊन गेला. जाताना मागे वळून पाहिलं तर काकांनी अंगठा दाखवला होता. इकडे तिचं चेहरामात्र गोंधळलेला पण रागीट दिसत होता...

रात्री तशी शांत जात होती पण ती जास्त काही जेवली नाही. अजयने अडून अडून आरशाचा विषय काढायचा प्रयत्न केला पण तिने त्याला साफ उडवून लावलं. निजानीज झाली. अजयने डोळे तर मिटले होते पण तो झोपला नव्हता. ती बाजूलाच झोपली होती. काही क्षणातच एखाद्या यंत्रमानवासारखी ती उठून बसली. अजय झोपला आहे याची खात्री करून ती आरशाजवळ गेली. पांघरूणाआडून अजय सर्व पाहत होता. आरशाजवळ पोहचताच तिने एकवार सगळीकडे पाहिलं आणि आरशाच्या एका कोपऱ्यातून आत गेली. लगेचंच बाहेर येऊन ती सरळ दाराकडे गेली. अजय हळू हळू तिच्या मागे गेला. त्याने पाहिलं तर ती समोरच्या घरात जात होती. हे पाहून अजयला घाम फुटला. तो लगेच आरशाजवळ गेला. हुशारी करून तो असा उभा राहिला जेणेकरून आरशात त्याचं प्रतिबिंब पडणार नाही. त्याला वाटलं आत्ताच आरशात जावं आणि रश्मीला सोडवावं. पण बाहेर असलेली रश्मीच्या रूपातली ती जर अचानक आली तर... हा विचार करतच होता की दार वाजल्याचा त्याला आवाज आला. अजय पुन्हा माघारी येऊन पांघरुणात शिरला. तीही काही क्षणातच परतली आणि बाजूला येऊन झोपली. अजयने संपूर्ण रात्र जागून काढली. त्याच्या मनात एकच विचार होता, उद्या काहीही झालं तरी रश्मीला सोडवायचंच...

सकाळी अजय नेहमीसारखा तयार झाला. तो सारखा गप्प गप्प होता. तिला त्याचं हे वागणं खटकलं. “काय रे... एकदम शांत शांत आहेस... काय झालंय...” तिने विचारलेल्या प्रश्नाला, “काही नाही गं. गेले दोन दिवस घरातल्या वातावरणामुळे कामात लक्ष लागत नाहीये ना. आज लवकर जाऊन काम पूर्ण करीन म्हणतो...” अजयने लगेच उत्तर दिले आणि बैग घेऊन तो बाहेर पडला. ती त्याच्या मागे दारापर्यंत आली. लिफ्ट आली. रोजच्या प्रमाणे अजय तिला टाटा करून लिफ्टमध्ये शिरला. तिनेही लगेच दार लाऊन घेतलं. हे पाहून अजय बाहेर आला आणि दामलेंच्या घरात शिरला. काका-काकू तयारच होते. अजय बोलता झाला, “तिला संशय नाही आलेला. आता ती समोरच्या घरात जाणार हे नक्की. रश्मीला आजच सोडवायला हवं कारण कालपर्यंत रश्मी आतून आवाज तरी देत होती पण आज तेही बंद झालेत...” काकू कीहोलमधून पाहत होत्या. त्यांनी हाताने दोघांना खुणावलं. कीहोलचं शटर थोडं उघडून तिघांनी पाहिलं तर ती समोरच्या घरात जात होती. अजय लगेच मागे फिरला. म्हणाला, “हीच संधी आहे. तयार ना...” काका-काकूंनी मान हलवली. दबकत दबकत तिघं अजयच्या घराजवळ आली. दामले काकूंनी हळूच समोरच्या घराची कडी लावली. तिघंही अजयच्या घरात शिरली. अजयने पटकन कपाटाच्या दाराला दोरखंडाची निरगाठ बांधली. एक टोक हातात घेत म्हणाला, “मी आत जातोय. तुम्ही दोराकडे लक्ष ठेवा. दोर सुटू देऊ नका...” रात्री ती जशी आत गेली त्याच कोपऱ्यातून अजय आत जाऊ लागला. काचेतून पार गेलेल्या अजयला पाहताना दामले दांपत्याच्या काळजात धस्स झालं. अजय आत आला. त्याने सभोवार पाहिलं. त्याला सगळं काही उलटं दिसत होतं, घड्याळातले आकडे, पेंटिंग, पडद्यावरचे नक्षीकाम, सगळंच... एका कोपऱ्यात हात आणि पाय बांधलेली रश्मी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. आजूबाजूला खेळती हवा नव्हती. अजयला समजलं की इथे प्राणवायूचा आभाव आहे. रश्मीला त्याने उचललं आणि दोरखंडाच्या सहाय्याने पुढे सरकू लागला...

बाहेर दामले काका-काकू आतुरतेने अजय आणि रश्मीची वाट पाहत होते. सारखे एकमेकांकडे पाहत होते. काही क्षण गेले आणि अचानक... “धाड...” जोराचा आवाज झाला. दचकलेल्या दोघांनी मागे पाहिलं तर समोरच्या घराचं दार कडीसकट जमिनीवर पडलं होतं आणि तिच्यासह एक बाई आणि मुलगा समोर उभे होते. क्षणाचाही अवकाश नव्हता की ते तिघं या दोघांसमोर उभे ठाकले. त्या बाईने दामले काकांना पकडलं तर मुलाने काकूंना धरलं. दोघांची पकड इतकी मजबूत होती की दामले दांपत्याला हलणंही शक्य होत नव्हतं. तिने पाहिलं तर दोरखंड कपाटाला बांधला होता आणि दुसरं टोक आरशाच्या आत गेलं होतं. ती समजली. तिने एकवार दामलेंकडे पाहिलं. तिची ती भेदक नजर पाहून दोघांचाही थरकाप उडाला. तिने गाठ सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण गाठ सुटणार नाही याची अजयने पूर्ण खबरदारी घेतली होती. तिने काडेपेटीने दोरखंड जाळण्याचा प्रयत्न केला. दोरखंड जाडजूड असल्याने सहजासहजी जळत नव्हता. तिने आतून सुरी आणून दोर कापायला सुरुवात केली तेव्हा “अजय...” दामले काकूंनी जोरदार किंकाळी फोडली. दोरखंड तुटला आणि त्याच वेळी रश्मीला घेऊन अजय आरशाबाहेर पडला. चिडलेल्या तिने अजयला मानेला धरून उचललं आणि फेकून दिलं. अजय टी.व्ही.च्या कपाटावर आदळून खाली पडला. खाली पडलेल्या अजयच्या छातीवर बसून तिने अजयची मान धरली. ती अजयची मान पिरगळणार इतक्यात रश्मी शुद्धीवर आली. रश्मीने आपल्या गळ्यातले ओम चे लॉकेट तोडले आणि तिच्यावर फेकले. तिचं अंगं जळू लागलं. अजयने संधी हेरली आणि तिला ढकलत आरशातून आत घातले. बाजूला ठेवलेल्या मोठ्या फुलदाणीला अजयने आरशावर भिरकावले. तिने हात बाहेर काढला खरा पण फुलदाणी वेळेतच आरशावर आदळली. काचेचा चक्काचूर झाला. काळ्या धुराचा एक डोंब त्या काचेच्या चुऱ्यातून बाहेर पडत हवेत विरून गेला. त्याचबरोबर काका आणि काकूंना पकडून असलेल्या त्या दोघांचाही धूर होऊन हवेत नाहीसा झाला. अजयने हातोड्याच्या सहाय्याने पूर्ण आरशा तोडून टाकला. दामले काकूंनी लगेच सर्वकाही पिशवीत भरले आणि अजयने ती पिशवी घरापासून लांब नेत नाल्यात फेकून दिली. रश्मीवरचं संकट टळलं होतं...

दुसऱ्या दिवशी बातमी झळकली, “शहरात भुताटकी... लोकांच्या डोळ्यांदेखत काही माणसं अचानक धूर होऊन हवेत विरून गेली...” बातमी वाऱ्यासारखी पसरली. जो तो आपला हीच बातमी वाचत होता. सर्वत्र घबराटीचं वातावरण निर्माण झालं. अशाच काळात एक जोडपं झाडाखाली बसलं होतं. एकमेकांच्या प्रेमळ सहवासात ते हरवलं होतं. सगळीकडे शांतता होती आणि, “ठक ठक...” शांतता भंग करणारा तो आवाज त्यांच्यातल्या मुलीने ऐकला. म्हणाली, “ए, तुला कसला आवाज येतोय का रे... मला वाटतं, खाली हा नाला वाहतो आहे ना त्यातून आवाज येत आहे... चल आपण पाहुया...”

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, September 4, 2017

अष्टविनायक

श्री गणेशाय नम:

१. मोरेश्वर

मोरेश्वर, अष्टविनायकमधील हा पहिला गणपती. मोरेश्वराचे मंदिर पुणे जिल्ह्यातील मोरगाव या स्थानी आहे. एके काळी या गावाच्या आसपास खूप मोर होते आणि या गावाचा आकारही मोरासारखा होता. त्यामुळे या गावाला मोरगाव असे नाव पडले. मोरगावचा मयुरेश्वर म्हणून देखील हा गणपती ओळखला जातो...

मोरगाव काऱ्हा नदीच्या तीरावर वसलेले आहे. येथील मोरेश्वराचे मंदिर उत्तराभिमुखी असून एका प्रशस्त गढीसारखेच आहे. बहामनी काळात बांधलेले हे मंदिर संपूर्ण काळ्या दगडापासून तयार केले गेले आहे. या मंदिराला चारही बाजूंनी मनोरे उभारले आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या मंदिराला मशिदीचे रूप दिले गेले असे सांगण्यात येते. मोरेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक अशी आहे. मूर्ती बैठी आहे आणि तिच्या दोन्ही डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले गेले आहेत. मूर्तीच्या मस्तकावर नागराजाचा फणा असून मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्त्या आहेत. मयुरेश्वराची मूळ मूर्ती लहान आहे. शेंदुराचे लेपावर लेप त्यावर चढत गेल्यामुळे मूर्ती मोठी भासते. वर्षांनी कधीतरी हे शेंदुराचे कवच गळून पडते आणि ही रेखीव मूर्ती नजरेस पडते...

या मंदिराबद्दलची एक प्रसिद्ध आख्यायिका अशी की, फार पूर्वी सिंधू नावाच्या राक्षसाने उत्पात माजवला होता. अमरत्वाचे वरदान मिळाल्याने तो अधिकच उन्मत्त झाला होता. त्याने पृथ्वी काबीज केली. इंद्रालाही हरवलं. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली. गणपती आणि सिंधू राक्षसामध्ये युद्ध झालं आणि त्यात गणपतीने सिंधू राक्षसाचा वध केला. गणपतीने मयुरावर म्हणजेच मोरावर स्वार होऊन सिंधूचा नाश केला म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर हे नाव पडले. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे मंदिरासमोर अर्धवट कोरलेल्या नंदीची मूर्ती आहे. असे म्हटले जाते की जवळच्याच शंकराच्या देवळात नेण्यासाठी या नंदीचे कोरीव काम सुरू होते. नंदी अर्धवट अवस्थेत असताना एका रथातून त्याची ही मूर्ती शंकराच्या मंदिरासाठी नेली जात होती. त्यावेळी रथाचे चाक तुटले आणि नंदी मायुरेश्वरासमोर जो बसला तो तिथून हलेच ना. शेवटी नंदीची इथेच स्थापना करण्यात आली...


भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेशजन्म, या दोन दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. भाविकांची प्रचंड गर्दी जमते. त्यांच्या भोजनाची, राहण्याची व्यवस्था येथील उपाध्ये मंडळींकडे होते. असेही म्हणतात की, “सुखकर्ता दु:खहर्ता...” ही आरती समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली...



२. सिद्धीविनायक

अहमदनगर जिल्ह्यात स्थित सिद्धटेकचा सिद्धीविनायक, अष्टविनायकांपैकी एक गणपती होय. उत्तराभिमुखी असलेले आणि पेशवेकालीन महत्व लाभलेले सिद्धीविनायकाचे हे मंदिर भीमा नदीच्या तीरावर बसलेले आहे. देवळाचे मखर पितळेचे असून देवाचे सिंहासन पाषाणाचे आहे. संपूर्ण देवळाला प्रदक्षिणा घालायची झाली तर एक किलोमीटर इतकं अंतर चालावं लागतं. छोट्याशा टेकडीवर असलेल्या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. जवळच शंकर, शिवाई आणि विष्णू यांचीही मंदिरे आहेत...

श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धीविनायक, अष्टविनायकांत उजव्या सोंडेचा पहिला गणपती आहे. सिद्धीविनायकाची मूर्ती स्वयंभू असून तीन फूट ऊंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजव्या बाजूला असल्याने सोवळे कडक पाळले जाते. गणपतीने एक मांडी घातली आहे आणि त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या प्रभावळीवर चंद्र, सूर्य आणि गरुड यांच्या आकृत्या आहेत तर मध्यभागी नागराज आहेत. मूर्ती पाहून आपोआप आपले हात जोडले जातात. मंदिर पहाटे उघडते. त्यावेळी काकडआरती आणि पंचोपचार पूजा होते. सकाळी षोडशोपचारे पूजा केली जाते. रात्री धूपारती झाल्यावर मंदिर बंद होते...

सिद्धीविनायकाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, फार वर्षांपूर्वी ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा मधु व कैटभ हे दोन राक्षस श्री विष्णूच्या कानातून जन्माला आले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव हवालदिल झाले आणि सारे देव घाबरले. भगवान विष्णू या दोन आसुरांशी अनेक वर्षे लढा देत होते पण त्यांना यश मिळत नव्हते. तेव्हा भगवान शंकरने श्री विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. विष्णूची निष्ठा पाहून श्री विनायक प्रसन्न झाले आणि त्यांस सिद्धी दिली. सिद्धी प्राप्त झालेल्या विष्णूने मग मधु आणि कैटभ या राक्षसांना लीलया हरवले. ज्या ठिकाणी विष्णूने गणपतीची आराधना करून मधु आणि कैटभ यांचा वध केला त्या ठिकाणाला पुढे सिद्धटेक असे नाव पडले आणि येथे असलेल्या गणपतीला सिद्धीविनायक म्हणून ओळखले गेले...


येथील गणेशोत्सव हा भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा असतो. माघ शुद्ध चतुर्थीला दुपारी गणेशजन्माचे कीर्तन असते आणि रात्री पालखी निघते. सिद्धटेक येथे उपाध्ये मंडळींकडे राहण्याची, भोजनाची व्यवस्था होते. मंदिरात सोवळेओवळे कडक असल्यामुळे या उपाध्ये मंडळींकडूनच पूजा करावी लागते...

३. बल्लाळेश्वर

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली या गावी स्थित अष्टविनायकांमधील एक देवस्थान म्हणजेच पालीचा बल्लाळेश्वर होय. पाली गावच्या अगदी टोकाला असलेले हे गणेश मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात एक प्रचंड मोठी घंटा आहे जी चिमाजी अप्पा यांनी अर्पण केली होती. अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात हे मंदिर वसले असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी मंदिराला लाभली आहे...

मंदिराची संपूर्ण बांधणी दगडी चिरेबंदी असून भक्कम आहे. या मंदिराची रचना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत ज्याचे पाणी रोज पूजेसाठी वापरले जाते. मंदिरापासून जवळच उन्हेरे नावाच्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत आणि सरसगड हा प्राचीन किल्लादेखील आहे. देवळापुढील सभामंडप चाळीस फूट लांब आणि वीस फूट रूंद आहे. आत पंधरा फूट उंचीचा गाभाराही आहे. गाभाऱ्यात दगडी मखर आहे ज्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. हे मंदिर जेव्हा बांधले गेले तेव्हा संपूर्णपणे लाकडाचे बांधले गेले होते. पुढे नाना फडणवीसांनी या लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचे दगडी मंदिरात रुपांतर केले. पालीचा बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती आहे जो त्याच्या भक्ताच्या नावाने म्हणजेच बल्लाळ या नावाने ओळखला जातो. मूर्ती थोडी रुंदट असून तीन फूट उंचीची आहे. मूर्तीसमोर मंदिराबाहेर असलेला उंदराचा गाभारा सुमारे बारा फूट उंचीचा आहे आणि उंदीर आपल्या पुढील दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहत आहे. स्वयंभू असलेल्या बल्लाळेश्वराचे डोळे हिऱ्यापासून बनवले आहेत. गणपतीचे कपाळ मोठे आहे आणि त्याच्या अंगावर उपकरणे आणि अंगरखा अशी वस्त्रे आहेत...

बल्लाळेश्वरबद्दलची आख्यायिका अशी की, कृत युगात पल्लीपूर नावाचे नगर होते (ज्याला आपण आज पाली म्हणून ओळखतो). तेथे कल्याण नावाचा वैशवाणी राहत असे. त्याला बल्लाळ नावाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणापासून ध्यानधारणा आणि गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्तीमार्गाला लागला. शेवटी कल्याणशेठने बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. बल्लाळने हा देह तुलाच अर्पण करेन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. बल्लाळच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने ब्राह्मण रुपात प्रकट होऊन बल्लाळला मुक्त केले. आपण येथे राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी विनंती बल्लाळने गणपतीला केली तेव्हा तेथे स्वयंभू मूर्ती प्रकट होऊन श्री गणेश त्या मूर्तीत अंतर्धान पावले. तीच ही पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्ती होय...

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळात येथे फार मोठा उत्सव साजरा केला जातो. चतुर्थीला रात्री महानैवेद्य आणि पंचमीला दहीकाला असा कार्यक्रम असतो. माघ शुद्ध प्रतिपदेला गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवसात रोज विविध कीर्तनकारांकरवी कथाकीर्तने केली जातात...


४. वरदविनायक

रायगड जिल्ह्यातील महड येथील श्री वरदविनायकाचे देवस्थान हे अष्टविनायकांमधले एक देवस्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून हेमांडपंथी आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर अत्यंत साधे आणि कौलारू असून मंदिराला घुमट आहे. आठ बाय आठ फूट असलेल्या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे आणि कळसाचा सर्वात वरचा भाग सोन्याचा आहे. शिवाय कळसावर नागाची नक्षीही कोरलेली आहे...

हे मंदिर पूर्वाभिमुखी असून एखाद्या कौलारू घरासारखे दिसते. मुख्य देऊळ कोरीव दगडांचे असून देवळाच्या चारही बाजूला चार हत्तींच्या मूर्ती आहेत. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. मंदिरात दगडी महिरप असून वरदविनायकाची मूर्ती सिंहासनारूढ आहे. १६९० साली धोंडू पौढकर या भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्याच्या पाण्यात पडलेली गणपतीची मूर्ती दिसली. दुसऱ्या दिवशी त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना मूर्ती सापडली. तीच या मंदिरातली प्रतिस्थापना केलेली वरदविनायकाची मूर्ती होय. पुरातनकाळापासून गणपती, समृद्धी आणि यश देणारा म्हणून येथे वास्तव्य करून आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या वरदविनायकाच्या मूर्तीशेजारी एक दिवा सतत पेटवलेला असतो. असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून निरंतर पेटता आहे...

पुरातन काळात महडचे नाव मणिपूर किंवा मणिभद्र होते. तेथे वचकनवी नावाचे एक ऋषी होते. एकदा त्यांच्या आश्रमाला राजा रुक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी मुकुंदाने राजाच्या रूपावर मोहित होऊन त्यास आश्रमात बोलावले. पण राजाने तिथे जाण्यास नकार दिला. हे देवांच्या राजाला म्हणजेच इंद्राला समजले तेव्हा त्याने रुक्मांगदाचे रूप घेऊन ऋषीपत्नीचा उपभोग घेतला. मुकुंदाला इंद्रापासून झालेला पुत्र म्हणजे गुत्समद. त्याला अनौरस पुत्र म्हणून खूप हिणवले गेले तेव्हा चिडून त्याने “तू बोरीचे झाड होशील” असा मातेला शाप दिला. आईला दिलेल्या शापाचं प्रायश्चित्त म्हणून गुत्समद ऋषींनी मणिभद्र येथील अरण्यात जाऊन “ओम गंगणपतये नाम:” या मंत्राची अनेक वर्षे तपश्चर्या केली. गणपती प्रसन्न झाले तेव्हा गुत्समद ऋषींनी त्यांना इथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करण्याची विनंती केली. गुत्समद ऋषींनी गणपतीची येथे स्थापना केली आणि मंदिरही बांधले. तेच हे वरदविनायकाचे मंदिर...


माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे पाच दिवस आणि भाद्रपदातले पहिले पाच दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी भजन, कीर्तन असे नित्य कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. हे दहा दिवस महड गावाला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं...


५. चिंतामणी

पुणे जिल्ह्यातील थेऊर या ठिकाणी वसले आहे चिंतामणी गणपतीचे भव्य मंदिर. थेऊर गावाला मुळा-मुठा नदीचा तीन बाजूंनी वेढा आहे. डाव्या सोंडेचा, आसन घालून पूर्वाभिमुख बसलेला हा चिंतामणी गणपती थोरले माधवराव पेशवे आणि सती रमाबाई यांच्या वृन्दावनामुळे अष्टविनायकांमध्ये सर्वात प्रसिध्द गणपती आहे. मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुखी आहे. मंदिराभोवती ओवऱ्या आहेत...

मूर्ती स्वयंभू असून तिच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे संपूर्ण मंदिर लाकडाने तयार केले गेले असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. युरोपियांकडून पेशव्यांना मिळालेल्या दोन मोठ्या पितळ्याच्या घंटांपैकी ही एक. धारानिधर महाराज देव यांनी हे मंदिर बांधले. शंभर वर्षानंतर पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेथे आकर्षक आणि भव्य मंदिर बांधले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोगाने ग्रासले. त्यावेळी त्यांना येथे आणण्यात आले. आजार वाढत जाऊन शेवटी गजानन गजानन म्हणत थोरल्या माधवरावांनी एखाद्या योग्याप्रमाणे डोळ्यांद्वारे प्राण सोडले. त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी सतीची दाने दिली आणि माधावरावांसोबत त्या सती गेल्या. मुळा-मुठेच्या काठावर सती रमाबाईंचे सुंदर वृंदावन आहे...

थेऊरच्या चिंतामणीबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, राजा अभिजीत आणि राणी गुणवती यांचा मुलगा गणा याने एकदा कपिलमुनींकडे असलेले चिंतामणी हे रत्न बळजबरीने हिरावून घेतले. कपिलमुनींना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गणाचा वध करून कपिलमुनींचा चिंतामणी त्यांना परत आणून दिला मात्र कपिलमुनींना त्या रत्नाचा मोह राहिला नव्हता. त्यांनी हे रत्न गणपतीलाच अर्पण करत त्यांच्या गळ्यात घातले, तेव्हा कपिलमुनींच्या साऱ्या चिंता दूर झाल्या. त्यामुळे ह्या गणपतीला चिंतामणी ह्या नावाने ओळखले जाते...


अजून एक कथा अशी की, गौतमऋषी आणि त्यांची सुस्वरूप भार्या अहिल्या एका नदीकाठी वास्तव्य करत होते. अहिल्येच्या रूपाची मोहिनी इंद्रदेवास पडली. गौतमऋषी स्नानास गेले असता इंद्राने गौतमऋषींचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला. गौतमऋषींनी अंतरज्ञानाने हे जाणले आणि इंद्राला शाप दिला. त्या शापामुळे इंद्राच्या अंगाला हजारो छिद्रे पडली. छिद्रातून दुर्गंधी येऊ लागली. इंद्राने गयावया केली तेव्हा गौतमऋषींनी त्यास गणेश पूजन करण्यास सांगितले. गणपती प्रसन्न झाले आणि छिद्रातून येणारी दुर्गंधी बंद झाली. शिवाय गौतमऋषींच्या उ:शापामुळे इंद्राला त्या सर्व छिद्रातून दिसू लागले आणि तो सहस्त्राक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या कदंब वृक्षाखाली बसून इंद्राने गणपतीची उपासना केली आणि पुढे त्याच्या अवतीभोवती वाढलेली वस्ती म्हणजेच आजचे थेऊर गाव...


६. गिरिजात्मज

अष्टविनायकांपैकी सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मज होय. कुकडी नदीच्या तीरावर वसलेल्या लेण्याद्री या गावाजवळच्या डोंगरात हे मंदिर वसलेले आहे. लेण्याद्री हा तीस बौद्ध लेण्यांचा समूह आहे. लेणी क्रमांक सहा आणि चौदा चैत्यगृह आहेत तर बाकी बौद्ध भिक्षुकांची निवारागृहे आहेत. या सर्व लेण्या बौद्ध धर्मातील हनियान पंथातील असून पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यान त्यांची निर्मिती झाली असावी. हा भाग बोळेगाव या हद्दीमध्ये असून या ठिकाणाचा उल्लेख जीर्णापूर किंवा लेखन पर्वत या नावाने केला जातो. पायथ्यापासून सुमारे तीनशे सात पायऱ्या चढून वर गेल्यावर लेण्याद्रीच्या मंदिरापर्यंत आपण पोहोचतो...

पायऱ्या चढून वर गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते. त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपतीचे मंदिर आहे. डोंगरावरील तीस लेण्यांपैकी सातव्या लेणीमध्ये गणपतीचे मंदिर आहे. हे सातवे लेणे सर्वात उंचावर असून इतर लेण्यांमध्ये सर्वात प्रशस्त आहे. मंदिर या वास्तू संकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर अशा कुठल्याच गोष्टी इथे नाहीत. एकसंध शिळेत कोरली गेलेली सत्तावन्न फूट लांब आणि बावन्न फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे. या गुहेला कुठेही खांबाचा आधार नाही. येथे पाण्याच्या चार टाक्या असून त्यात वर्षभर पाणी असते. या गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे की जोवर आकाशात सूर्य असेल तोवर प्रकाश आत येत राहील...

इतर अष्टविनायकांसारखी गिरिजात्मजाची मूर्ती आखीव रेखीव नाही. हे गणेशाचे स्वयंभू स्थान आहे. मूर्ती अतिशय प्रसन्न असून दगडात कोरलेली आहे. मंदिराच्या परिसरातल्या खडकांमध्ये नक्षीदार खोदकाम आणि कोरीवकाम केले आहे. त्यावर वाघ, हत्ती, सिंह असेही कोरीवकाम आढळते. मंदिरातून दिसणारे भोवतालचे दृश्य फार विलोभनीय आहे. समोरच नदीचा प्रवाह आणि त्या तीरावर वसलेले जुन्नर गावही दिसते. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांच्या काळात झाला असे म्हटले जाते. समोरच्या डोंगरात गणेशमूर्ती आहे. गिरिजात्मज भक्तांकडे पाठ करून बसला आहे. त्याचे मुख पलीकडच्या डोंगरात आहे. अनेक भक्तांसमावेत खुद्द नाना फडणीस यांनीही गणेशमुख शोधण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा गजमुख सापडले नाही तेव्हापासून मात्र पाठमोऱ्या आकृतीचीच पूजा करावी लागते...


लेण्याद्रीच्या गिरीजात्मजाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी, फार वर्षांपूर्वी पुत्रप्राप्तीसाठी देवी पार्वतीने या डोंगरात सलग बारा वर्षे कठोर तप केला. ही तपश्चर्या फळाला येऊन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गजानन बटूरुपात प्रकट झाले. म्हणाले, “माते, मी तुझ्या पोटी जन्म घेईन.” देवी पार्वतीला काही दिवसांनी मुलगा झाला. त्याचे नाव तिने गणेश ठेवले. देवी पार्वती म्हणजे गिरीजा आणि पुत्र म्हणजे आत्मज. देवी पार्वतीचा पुत्र म्हणून इथल्या गणपतीला गिरिजात्मज असे नाव पडले...


७. विघ्नेश्वर

ओझर या पुणे जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील ठिकाणी अष्टविनायकांपैकी एक गणपती विराजमान आहे. या गणपतीला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे देखील म्हणतात. विघ्न म्हणजे कार्यात येणाऱ्या अडचणी, आणि हर म्हणजे दूर करणारा. येणारी संकटं आणि अडचणी दूर करणारा देव म्हणून या गणपतीला विघ्नहर अथवा विघ्नेश्वर असे संबोधले जाते...

विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुखी आहे. ते पूर्ण बंदिस्त असून चारी बाजूंनी उत्तम अशी तटबंदी आहे. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला की दोन ऊंच दीपमाला दिसतात. त्रिपुरी पौर्णिमेला त्यावर दीपोत्सव साजरा केला जातो. मुख्य देवळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले द्वारपाल आहेत. बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना हरवून वसईचा किल्ला सर केल्यानंतर विघ्नेश्वराचे हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला. मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह असून आतील गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे. कुकडी नदीच्या तीरावर स्थित विघ्नेश्वराचे हे मंदिर एक जागरूक देवस्थान आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवसांचा फार मोठा उत्सव साजरा केला जातो...

अष्टविनायकांमध्ये सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या विघ्नेश्वराची मूर्ती लांब आणि रुंद आहे. मूर्ती पूर्णाकृती आणि बैठी असून डौलदार कमानीत बसली आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक असून नाभी आणि कपाळावर हिरे जडले आहेत. विघ्नेशाची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. विघ्नेश्वराच्या दोन्ही बाजूस कमानीत रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. गाभाऱ्यात चारी बाजूला छोटे छोटे कोनाडे असून त्यात पंचायतनाच्या मूर्ती आहेत...


या विघ्नेश्वराची एक आख्यायिका अशी की, राजा अभिनंदनने त्रीलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला. त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने हा यज्ञ थांबवण्यासाठी विघ्नासूर नावाच्या राक्षसाची उत्पत्ती केली. पण विघ्नासुराने एक पाऊल पुढे जात सर्वच यज्ञात विघ्न आणायला सुरुवात केली. तेव्हा या विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी ऋषीमुनींनी गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नावही भाविकांच्या मुखी यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली आणि विघ्नहर या नावाने गणपती येथे वास्तव्य करू लागला...


८. महागणपती

पुणे जिल्ह्यातील रांजणगावी स्थित गणपती हा अष्टविनायकांत महागणपती म्हणून ओळखला जातो. या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. मंदिराचा सभामंडप इंदूरचे सरदार किबे यांनी बांधला तर गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधून दिला. शिंदे, होळकर आदि सरदारांनी इनामांच्या स्वरूपात सढळ हस्ते बांधकामासाठी मदत केली. या मंदिराची रचना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात दिशासाधन साधले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील अशी बांधणी असल्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायणात व मध्यान्हकाळीही मूर्तीवर सूर्याची किरणे पडत राहतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्याच्या दोन दिवस आधी या मंदिरात मुक्त प्रवेश असतो...

अष्टविनायकांपैकी सर्वात शक्तिमान असे रांजणगावच्या महागणपतीचे रूप आहे. गणपतीची ही मूर्ती दर्शनी आहे. सूर्याची किरणे मूर्तीवर पडताच शेंदूर लावलेली ही महागणपतीची मूर्ती अधिक सुंदर दिसते. मूळ मूर्ती तळघरात असून वीस हात व दहा सोंडी असावी असा तर्क आहे. हे तळघरदेखील माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी बांधले होते. या तळघरात असलेल्या मूर्तीला मोहोक्तट असे म्हणतात. मंदिरातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे. मोठ्या कपाळाची आसनमांडी घातलेली ही मूर्ती अत्यंत मोहक आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी असून दारापाशी जय व विजय हे दोन रक्षक आहेत...


महागणपतीबद्दलची एक आख्यायिका अशी की, फार पूर्वी गृत्समद या ऋषीच्या पुत्राने तिन्ही लोक जिंकण्याच्या निश्चयाने “गणानांत्वा” या मंत्राचा जप करत गणेशोपासना केली. श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी या मुलाला अलौकिक सामर्थ्याचा वरदहस्त दिला. “भगवान शंकराशिवाय तुझा वध कोणीही करू शकणार नाही.” असा वर तर दिलाच शिवाय भेट म्हणून लोखंड, रूपे आणि सुवर्ण यांची तीन नगरेही दिली. तीन धातूंच्या नगरीचा राजा म्हणून तो मुलगा त्रिपुरासूर या नावाने ओळखला जाऊ लागला. मिळालेल्या वरदानामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. स्वर्गलोक आणि पृथ्वीलोक येथील सर्वांना तो त्रास देऊ लागला. त्याला रोखण्यासाठी सर्व देवांनी शंकराची आराधना केली. भगवान शंकराने याच रांजणगावी गणपतीची पूजा केली. ज्या ठिकाणी गणपतीची पूजा झाली तिथे त्यांनी एक मंदिर उभारले आणि त्या गावाला मणिपूर असे नाव दिले. पुढे भगवान शंकर आणि त्रिपुरासूर यांचे तुंबळ युद्ध झाले ज्यात अखेर भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला...

@ अनिकेत परशुराम आपटे.