श्री गणेशाय नम:
१. मोरेश्वर
मोरेश्वर,
अष्टविनायकमधील हा पहिला गणपती. मोरेश्वराचे मंदिर पुणे जिल्ह्यातील मोरगाव या
स्थानी आहे. एके काळी या गावाच्या आसपास खूप मोर होते आणि या गावाचा आकारही
मोरासारखा होता. त्यामुळे या गावाला मोरगाव असे नाव पडले. मोरगावचा मयुरेश्वर
म्हणून देखील हा गणपती ओळखला जातो...
मोरगाव काऱ्हा
नदीच्या तीरावर वसलेले आहे. येथील मोरेश्वराचे मंदिर उत्तराभिमुखी असून एका प्रशस्त
गढीसारखेच आहे. बहामनी काळात बांधलेले हे मंदिर संपूर्ण काळ्या दगडापासून तयार
केले गेले आहे. या मंदिराला चारही बाजूंनी मनोरे उभारले आहेत. मोगल काळात देवळावर
आक्रमण होऊ नये म्हणून या मंदिराला मशिदीचे रूप दिले गेले असे सांगण्यात येते.
मोरेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक अशी आहे. मूर्ती बैठी आहे आणि
तिच्या दोन्ही डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले गेले आहेत. मूर्तीच्या मस्तकावर
नागराजाचा फणा असून मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळी
मूर्त्या आहेत. मयुरेश्वराची मूळ मूर्ती लहान आहे. शेंदुराचे लेपावर लेप त्यावर
चढत गेल्यामुळे मूर्ती मोठी भासते. वर्षांनी कधीतरी हे शेंदुराचे कवच गळून पडते आणि
ही रेखीव मूर्ती नजरेस पडते...
या
मंदिराबद्दलची एक प्रसिद्ध आख्यायिका अशी की, फार पूर्वी सिंधू नावाच्या राक्षसाने
उत्पात माजवला होता. अमरत्वाचे वरदान मिळाल्याने तो अधिकच उन्मत्त झाला होता.
त्याने पृथ्वी काबीज केली. इंद्रालाही हरवलं. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर
गणपतीची आराधना केली. गणपती आणि सिंधू राक्षसामध्ये युद्ध झालं आणि त्यात गणपतीने सिंधू
राक्षसाचा वध केला. गणपतीने मयुरावर म्हणजेच मोरावर स्वार होऊन सिंधूचा नाश केला
म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर हे नाव पडले. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ठ्य
म्हणजे मंदिरासमोर अर्धवट कोरलेल्या नंदीची मूर्ती आहे. असे म्हटले जाते की जवळच्याच
शंकराच्या देवळात नेण्यासाठी या नंदीचे कोरीव काम सुरू होते. नंदी अर्धवट अवस्थेत
असताना एका रथातून त्याची ही मूर्ती शंकराच्या मंदिरासाठी नेली जात होती. त्यावेळी
रथाचे चाक तुटले आणि नंदी मायुरेश्वरासमोर जो बसला तो तिथून हलेच ना. शेवटी नंदीची
इथेच स्थापना करण्यात आली...
भाद्रपद शुद्ध
चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेशजन्म, या दोन
दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. भाविकांची प्रचंड गर्दी जमते. त्यांच्या
भोजनाची, राहण्याची व्यवस्था येथील उपाध्ये मंडळींकडे होते. असेही म्हणतात की,
“सुखकर्ता दु:खहर्ता...” ही आरती समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली...
२. सिद्धीविनायक
अहमदनगर
जिल्ह्यात स्थित सिद्धटेकचा सिद्धीविनायक, अष्टविनायकांपैकी एक गणपती होय.
उत्तराभिमुखी असलेले आणि पेशवेकालीन महत्व लाभलेले सिद्धीविनायकाचे हे मंदिर भीमा
नदीच्या तीरावर बसलेले आहे. देवळाचे मखर पितळेचे असून देवाचे सिंहासन पाषाणाचे
आहे. संपूर्ण देवळाला प्रदक्षिणा घालायची झाली तर एक किलोमीटर इतकं अंतर चालावं
लागतं. छोट्याशा टेकडीवर असलेल्या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके
यांनी तयार केला. मात्र पंधरा फूट उंचीचे व दहा फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. जवळच शंकर, शिवाई आणि विष्णू यांचीही मंदिरे
आहेत...
श्री विष्णूला
सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धीविनायक, अष्टविनायकांत
उजव्या सोंडेचा पहिला गणपती आहे. सिद्धीविनायकाची मूर्ती स्वयंभू असून तीन फूट ऊंच
व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजव्या
बाजूला असल्याने सोवळे कडक पाळले जाते. गणपतीने एक मांडी घातली आहे आणि त्यावर
रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या प्रभावळीवर चंद्र, सूर्य आणि गरुड यांच्या
आकृत्या आहेत तर मध्यभागी नागराज आहेत. मूर्ती पाहून आपोआप आपले हात जोडले जातात.
मंदिर पहाटे उघडते. त्यावेळी काकडआरती आणि पंचोपचार पूजा होते. सकाळी षोडशोपचारे
पूजा केली जाते. रात्री धूपारती झाल्यावर मंदिर बंद होते...
सिद्धीविनायकाबद्दल
एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, फार वर्षांपूर्वी ब्रह्मदेवाने जेव्हा
सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा मधु व कैटभ हे दोन राक्षस श्री
विष्णूच्या कानातून जन्माला आले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना त्रास देण्यास सुरुवात
केली. ब्रह्मदेव हवालदिल झाले आणि सारे देव घाबरले. भगवान विष्णू या दोन आसुरांशी अनेक
वर्षे लढा देत होते पण त्यांना यश मिळत नव्हते. तेव्हा भगवान शंकरने श्री विष्णूला
गणपतीची आराधना करायला सांगितली. विष्णूची निष्ठा पाहून श्री विनायक प्रसन्न झाले
आणि त्यांस सिद्धी दिली. सिद्धी प्राप्त झालेल्या विष्णूने मग मधु आणि कैटभ या
राक्षसांना लीलया हरवले. ज्या ठिकाणी विष्णूने गणपतीची आराधना करून मधु आणि कैटभ
यांचा वध केला त्या ठिकाणाला पुढे सिद्धटेक असे नाव पडले आणि येथे असलेल्या
गणपतीला सिद्धीविनायक म्हणून ओळखले गेले...
येथील गणेशोत्सव
हा भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा असतो. माघ शुद्ध चतुर्थीला दुपारी
गणेशजन्माचे कीर्तन असते आणि रात्री पालखी निघते. सिद्धटेक येथे उपाध्ये मंडळींकडे
राहण्याची, भोजनाची व्यवस्था होते. मंदिरात सोवळेओवळे कडक असल्यामुळे या उपाध्ये
मंडळींकडूनच पूजा करावी लागते...
३. बल्लाळेश्वर
रायगड
जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली या गावी स्थित अष्टविनायकांमधील एक देवस्थान
म्हणजेच पालीचा बल्लाळेश्वर होय. पाली गावच्या अगदी टोकाला असलेले हे गणेश मंदिर
पूर्वाभिमुख असून मंदिरात एक प्रचंड मोठी घंटा आहे जी चिमाजी अप्पा यांनी अर्पण
केली होती. अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात हे मंदिर वसले असून सुधागड या भव्य
किल्ल्याची पार्श्वभूमी मंदिराला लाभली आहे...
मंदिराची
संपूर्ण बांधणी दगडी चिरेबंदी असून भक्कम आहे. या मंदिराची रचना वैशिष्ठ्यपूर्ण
आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. मंदिराच्या
दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत ज्याचे पाणी रोज पूजेसाठी वापरले जाते. मंदिरापासून
जवळच उन्हेरे नावाच्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत आणि सरसगड हा प्राचीन
किल्लादेखील आहे. देवळापुढील सभामंडप चाळीस फूट लांब आणि वीस फूट रूंद आहे. आत
पंधरा फूट उंचीचा गाभाराही आहे. गाभाऱ्यात दगडी मखर आहे ज्यावर सुंदर नक्षीकाम
केलेले आहे. हे मंदिर जेव्हा बांधले गेले तेव्हा संपूर्णपणे लाकडाचे बांधले गेले
होते. पुढे नाना फडणवीसांनी या लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याचे दगडी
मंदिरात रुपांतर केले. पालीचा बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती आहे जो
त्याच्या भक्ताच्या नावाने म्हणजेच बल्लाळ या नावाने ओळखला जातो. मूर्ती थोडी रुंदट
असून तीन फूट उंचीची आहे. मूर्तीसमोर मंदिराबाहेर असलेला उंदराचा गाभारा सुमारे
बारा फूट उंचीचा आहे आणि उंदीर आपल्या पुढील दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे
पाहत आहे. स्वयंभू असलेल्या बल्लाळेश्वराचे डोळे हिऱ्यापासून बनवले आहेत. गणपतीचे कपाळ
मोठे आहे आणि त्याच्या अंगावर उपकरणे आणि अंगरखा अशी वस्त्रे आहेत...
बल्लाळेश्वरबद्दलची
आख्यायिका अशी की, कृत युगात पल्लीपूर नावाचे नगर होते (ज्याला आपण आज पाली म्हणून
ओळखतो). तेथे कल्याण नावाचा वैशवाणी राहत असे. त्याला बल्लाळ नावाचा सुपुत्र झाला.
बल्लाळ लहानपणापासून ध्यानधारणा आणि गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न
करता बल्लाळ भक्तीमार्गाला लागला. शेवटी कल्याणशेठने बल्लाळचा गणपती दूर फेकून
दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. बल्लाळने हा देह तुलाच अर्पण करेन अशा
दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. बल्लाळच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने ब्राह्मण
रुपात प्रकट होऊन बल्लाळला मुक्त केले. आपण येथे राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण
कराव्यात अशी विनंती बल्लाळने गणपतीला केली तेव्हा तेथे स्वयंभू मूर्ती प्रकट होऊन
श्री गणेश त्या मूर्तीत अंतर्धान पावले. तीच ही पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्ती
होय...
४. वरदविनायक
रायगड
जिल्ह्यातील महड येथील श्री वरदविनायकाचे देवस्थान हे अष्टविनायकांमधले एक
देवस्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन
असून हेमांडपंथी आहे. श्री वरदविनायकाचे मंदिर अत्यंत साधे आणि कौलारू असून
मंदिराला घुमट आहे. आठ बाय आठ फूट असलेल्या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे आणि
कळसाचा सर्वात वरचा भाग सोन्याचा आहे. शिवाय कळसावर नागाची नक्षीही कोरलेली आहे...
हे मंदिर
पूर्वाभिमुखी असून एखाद्या कौलारू घरासारखे दिसते. मुख्य देऊळ कोरीव दगडांचे असून देवळाच्या
चारही बाजूला चार हत्तींच्या मूर्ती आहेत. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही
म्हणतात. मंदिरात दगडी महिरप असून वरदविनायकाची मूर्ती सिंहासनारूढ आहे. १६९० साली
धोंडू पौढकर या भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्याच्या पाण्यात पडलेली
गणपतीची मूर्ती दिसली. दुसऱ्या दिवशी त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना मूर्ती
सापडली. तीच या मंदिरातली प्रतिस्थापना केलेली वरदविनायकाची मूर्ती होय. पुरातनकाळापासून
गणपती, समृद्धी आणि यश देणारा म्हणून येथे वास्तव्य करून आहे. पूर्वाभिमुख
असलेल्या या वरदविनायकाच्या मूर्तीशेजारी एक दिवा सतत पेटवलेला असतो. असे म्हणतात
की हा दिवा १८९२ पासून निरंतर पेटता आहे...
पुरातन काळात
महडचे नाव मणिपूर किंवा मणिभद्र होते. तेथे वचकनवी नावाचे एक ऋषी होते. एकदा
त्यांच्या आश्रमाला राजा रुक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी मुकुंदाने राजाच्या
रूपावर मोहित होऊन त्यास आश्रमात बोलावले. पण राजाने तिथे जाण्यास नकार दिला. हे
देवांच्या राजाला म्हणजेच इंद्राला समजले तेव्हा त्याने रुक्मांगदाचे रूप घेऊन
ऋषीपत्नीचा उपभोग घेतला. मुकुंदाला इंद्रापासून झालेला पुत्र म्हणजे गुत्समद.
त्याला अनौरस पुत्र म्हणून खूप हिणवले गेले तेव्हा चिडून त्याने “तू बोरीचे झाड
होशील” असा मातेला शाप दिला. आईला दिलेल्या शापाचं प्रायश्चित्त म्हणून गुत्समद
ऋषींनी मणिभद्र येथील अरण्यात जाऊन “ओम गंगणपतये नाम:” या मंत्राची अनेक वर्षे
तपश्चर्या केली. गणपती प्रसन्न झाले तेव्हा गुत्समद ऋषींनी त्यांना इथेच राहून
भक्तांची मनोकामना पूर्ण करण्याची विनंती केली. गुत्समद ऋषींनी गणपतीची येथे
स्थापना केली आणि मंदिरही बांधले. तेच हे वरदविनायकाचे मंदिर...
माघ शुद्ध
प्रतिपदा ते पंचमी हे पाच दिवस आणि भाद्रपदातले पहिले पाच दिवस येथे मोठा उत्सव
साजरा केला जातो. त्यावेळी भजन, कीर्तन असे नित्य कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. हे
दहा दिवस महड गावाला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं...
५. चिंतामणी
पुणे
जिल्ह्यातील थेऊर या ठिकाणी वसले आहे चिंतामणी गणपतीचे भव्य मंदिर. थेऊर गावाला
मुळा-मुठा नदीचा तीन बाजूंनी वेढा आहे. डाव्या सोंडेचा, आसन घालून पूर्वाभिमुख
बसलेला हा चिंतामणी गणपती थोरले माधवराव पेशवे आणि सती रमाबाई यांच्या
वृन्दावनामुळे अष्टविनायकांमध्ये सर्वात प्रसिध्द गणपती आहे. मंदिराचा महादरवाजा
उत्तराभिमुखी आहे. मंदिराभोवती ओवऱ्या आहेत...
मूर्ती स्वयंभू
असून तिच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे संपूर्ण मंदिर लाकडाने तयार
केले गेले असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. युरोपियांकडून पेशव्यांना
मिळालेल्या दोन मोठ्या पितळ्याच्या घंटांपैकी ही एक. धारानिधर महाराज देव यांनी हे
मंदिर बांधले. शंभर वर्षानंतर पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तेथे
आकर्षक आणि भव्य मंदिर बांधले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी माधवराव पेशव्यांना
क्षयरोगाने ग्रासले. त्यावेळी त्यांना येथे आणण्यात आले. आजार वाढत जाऊन शेवटी
गजानन गजानन म्हणत थोरल्या माधवरावांनी एखाद्या योग्याप्रमाणे डोळ्यांद्वारे प्राण
सोडले. त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी सतीची दाने दिली आणि माधावरावांसोबत त्या सती
गेल्या. मुळा-मुठेच्या काठावर सती रमाबाईंचे सुंदर वृंदावन आहे...
थेऊरच्या
चिंतामणीबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, राजा अभिजीत आणि राणी गुणवती
यांचा मुलगा गणा याने एकदा कपिलमुनींकडे असलेले चिंतामणी हे रत्न बळजबरीने हिरावून
घेतले. कपिलमुनींना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न परत आणण्याची
विनंती केली. गणपतीने गणाचा वध करून कपिलमुनींचा चिंतामणी त्यांना परत आणून दिला
मात्र कपिलमुनींना त्या
रत्नाचा मोह राहिला नव्हता. त्यांनी हे रत्न गणपतीलाच अर्पण करत त्यांच्या गळ्यात
घातले, तेव्हा कपिलमुनींच्या साऱ्या चिंता दूर झाल्या.
त्यामुळे ह्या गणपतीला चिंतामणी ह्या नावाने ओळखले जाते...
अजून एक कथा अशी
की, गौतमऋषी आणि त्यांची सुस्वरूप भार्या अहिल्या एका नदीकाठी वास्तव्य करत होते.
अहिल्येच्या रूपाची मोहिनी इंद्रदेवास पडली. गौतमऋषी स्नानास गेले असता इंद्राने
गौतमऋषींचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला. गौतमऋषींनी अंतरज्ञानाने हे जाणले आणि
इंद्राला शाप दिला. त्या शापामुळे इंद्राच्या अंगाला हजारो छिद्रे पडली. छिद्रातून
दुर्गंधी येऊ लागली. इंद्राने गयावया केली तेव्हा गौतमऋषींनी त्यास गणेश पूजन
करण्यास सांगितले. गणपती प्रसन्न झाले आणि छिद्रातून येणारी दुर्गंधी बंद झाली.
शिवाय गौतमऋषींच्या उ:शापामुळे इंद्राला त्या सर्व छिद्रातून दिसू लागले आणि तो
सहस्त्राक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या कदंब वृक्षाखाली बसून इंद्राने गणपतीची
उपासना केली आणि पुढे त्याच्या अवतीभोवती वाढलेली वस्ती म्हणजेच आजचे थेऊर गाव...
६. गिरिजात्मज
अष्टविनायकांपैकी
सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मज होय. कुकडी नदीच्या तीरावर वसलेल्या
लेण्याद्री या गावाजवळच्या डोंगरात हे मंदिर वसलेले आहे. लेण्याद्री हा तीस बौद्ध
लेण्यांचा समूह आहे. लेणी क्रमांक सहा आणि चौदा चैत्यगृह आहेत तर बाकी बौद्ध भिक्षुकांची
निवारागृहे आहेत. या सर्व लेण्या बौद्ध धर्मातील हनियान पंथातील असून पहिल्या ते
तिसऱ्या शतकादरम्यान त्यांची निर्मिती झाली असावी. हा भाग बोळेगाव या हद्दीमध्ये
असून या ठिकाणाचा उल्लेख जीर्णापूर किंवा लेखन पर्वत या नावाने केला जातो.
पायथ्यापासून सुमारे तीनशे सात पायऱ्या चढून वर गेल्यावर लेण्याद्रीच्या
मंदिरापर्यंत आपण पोहोचतो...
पायऱ्या चढून वर
गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते. त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपतीचे
मंदिर आहे. डोंगरावरील तीस लेण्यांपैकी सातव्या लेणीमध्ये गणपतीचे मंदिर आहे. हे
सातवे लेणे सर्वात उंचावर असून इतर लेण्यांमध्ये सर्वात प्रशस्त आहे. मंदिर या
वास्तू संकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर अशा कुठल्याच गोष्टी इथे नाहीत. एकसंध
शिळेत कोरली गेलेली सत्तावन्न फूट लांब आणि बावन्न फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे.
या गुहेला कुठेही खांबाचा आधार नाही. येथे पाण्याच्या चार टाक्या असून त्यात
वर्षभर पाणी असते. या गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे
की जोवर आकाशात सूर्य असेल तोवर प्रकाश आत येत राहील...
इतर
अष्टविनायकांसारखी गिरिजात्मजाची मूर्ती आखीव रेखीव नाही. हे गणेशाचे स्वयंभू
स्थान आहे. मूर्ती अतिशय प्रसन्न असून दगडात कोरलेली आहे. मंदिराच्या परिसरातल्या
खडकांमध्ये नक्षीदार खोदकाम आणि कोरीवकाम केले आहे. त्यावर वाघ, हत्ती, सिंह असेही
कोरीवकाम आढळते. मंदिरातून दिसणारे भोवतालचे दृश्य फार विलोभनीय आहे. समोरच नदीचा
प्रवाह आणि त्या तीरावर वसलेले जुन्नर गावही दिसते. या मंदिराचा जीर्णोद्धार
पेशव्यांच्या काळात झाला असे म्हटले जाते. समोरच्या डोंगरात गणेशमूर्ती आहे.
गिरिजात्मज भक्तांकडे पाठ करून बसला आहे. त्याचे मुख पलीकडच्या डोंगरात आहे. अनेक
भक्तांसमावेत खुद्द नाना फडणीस यांनीही गणेशमुख शोधण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा
गजमुख सापडले नाही तेव्हापासून मात्र पाठमोऱ्या आकृतीचीच पूजा करावी लागते...
लेण्याद्रीच्या
गिरीजात्मजाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी, फार वर्षांपूर्वी
पुत्रप्राप्तीसाठी देवी पार्वतीने या डोंगरात सलग बारा वर्षे कठोर तप केला. ही
तपश्चर्या फळाला येऊन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गजानन बटूरुपात प्रकट झाले.
म्हणाले, “माते, मी तुझ्या पोटी जन्म घेईन.” देवी पार्वतीला काही दिवसांनी मुलगा
झाला. त्याचे नाव तिने गणेश ठेवले. देवी पार्वती म्हणजे गिरीजा आणि पुत्र म्हणजे आत्मज.
देवी पार्वतीचा पुत्र म्हणून इथल्या गणपतीला गिरिजात्मज असे नाव पडले...
७. विघ्नेश्वर
ओझर या पुणे
जिल्ह्यातील आणि जुन्नर तालुक्यातील ठिकाणी अष्टविनायकांपैकी एक गणपती विराजमान
आहे. या गणपतीला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असे देखील म्हणतात. विघ्न म्हणजे
कार्यात येणाऱ्या अडचणी, आणि हर म्हणजे दूर करणारा. येणारी संकटं आणि अडचणी दूर
करणारा देव म्हणून या गणपतीला विघ्नहर अथवा विघ्नेश्वर असे संबोधले जाते...
विघ्नेश्वराचे
मंदिर पूर्वाभिमुखी आहे. ते पूर्ण बंदिस्त असून चारी बाजूंनी उत्तम अशी तटबंदी
आहे. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला की दोन ऊंच दीपमाला दिसतात. त्रिपुरी
पौर्णिमेला त्यावर दीपोत्सव साजरा केला जातो. मुख्य देवळाच्या प्रवेशद्वाराच्या
दोन्ही बाजूला दगडात कोरलेले द्वारपाल आहेत. बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा
यांनी पोर्तुगीजांना हरवून वसईचा किल्ला सर केल्यानंतर विघ्नेश्वराचे हे देऊळ
बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला. मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह असून आतील
गाभारा दहा बाय दहा फुटाचा आहे. कुकडी नदीच्या तीरावर स्थित विघ्नेश्वराचे हे
मंदिर एक जागरूक देवस्थान आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी
धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवसांचा फार मोठा
उत्सव साजरा केला जातो...
अष्टविनायकांमध्ये सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या विघ्नेश्वराची मूर्ती लांब आणि
रुंद आहे. मूर्ती पूर्णाकृती आणि बैठी असून डौलदार कमानीत बसली आहे. श्रींच्या
डोळ्यात माणिक असून नाभी आणि कपाळावर हिरे जडले आहेत. विघ्नेशाची ही मूर्ती
स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. विघ्नेश्वराच्या दोन्ही बाजूस कमानीत रिद्धी-सिद्धीच्या
पितळी मूर्ती आहेत. गाभाऱ्यात चारी बाजूला छोटे छोटे कोनाडे असून त्यात
पंचायतनाच्या मूर्ती आहेत...
या
विघ्नेश्वराची एक आख्यायिका अशी की, राजा अभिनंदनने त्रीलोकाधीश होण्यासाठी यज्ञ
सुरू केला. त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने हा यज्ञ थांबवण्यासाठी विघ्नासूर
नावाच्या राक्षसाची उत्पत्ती केली. पण विघ्नासुराने एक पाऊल पुढे जात सर्वच यज्ञात
विघ्न आणायला सुरुवात केली. तेव्हा या विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी
ऋषीमुनींनी गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण
गेला. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नावही
भाविकांच्या मुखी यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती
गणपतीने मान्य केली आणि विघ्नहर या नावाने गणपती येथे वास्तव्य करू लागला...
८. महागणपती
पुणे
जिल्ह्यातील रांजणगावी स्थित गणपती हा अष्टविनायकांत महागणपती म्हणून ओळखला जातो.
या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. मंदिराचा सभामंडप इंदूरचे
सरदार किबे यांनी बांधला तर गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधून दिला.
शिंदे, होळकर आदि सरदारांनी इनामांच्या स्वरूपात सढळ हस्ते बांधकामासाठी मदत केली.
या मंदिराची रचना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात दिशासाधन साधले
आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील अशी बांधणी असल्यामुळे
उत्तरायणात, दक्षिणायणात व मध्यान्हकाळीही मूर्तीवर सूर्याची किरणे पडत राहतात.
गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्याच्या दोन दिवस आधी या मंदिरात मुक्त प्रवेश
असतो...
अष्टविनायकांपैकी
सर्वात शक्तिमान असे रांजणगावच्या महागणपतीचे रूप आहे. गणपतीची ही मूर्ती दर्शनी
आहे. सूर्याची किरणे मूर्तीवर पडताच शेंदूर लावलेली ही महागणपतीची मूर्ती अधिक
सुंदर दिसते. मूळ मूर्ती तळघरात असून वीस हात व दहा सोंडी असावी असा तर्क आहे. हे
तळघरदेखील माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी बांधले होते. या तळघरात असलेल्या मूर्तीला
मोहोक्तट असे म्हणतात. मंदिरातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची
आहे. मोठ्या कपाळाची आसनमांडी घातलेली ही मूर्ती अत्यंत मोहक आहे. मूर्तीच्या
दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धी असून दारापाशी जय व विजय हे दोन रक्षक आहेत...
महागणपतीबद्दलची
एक आख्यायिका अशी की, फार पूर्वी गृत्समद या ऋषीच्या पुत्राने तिन्ही लोक
जिंकण्याच्या निश्चयाने “गणानांत्वा” या मंत्राचा जप करत गणेशोपासना केली. श्री
गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी या मुलाला अलौकिक सामर्थ्याचा वरदहस्त दिला. “भगवान
शंकराशिवाय तुझा वध कोणीही करू शकणार नाही.” असा वर तर दिलाच शिवाय भेट म्हणून
लोखंड, रूपे आणि सुवर्ण यांची तीन नगरेही दिली. तीन धातूंच्या नगरीचा राजा म्हणून
तो मुलगा त्रिपुरासूर या नावाने ओळखला जाऊ लागला. मिळालेल्या वरदानामुळे
त्रिपुरासूर उन्मत्त झाला. स्वर्गलोक आणि पृथ्वीलोक येथील सर्वांना तो त्रास देऊ
लागला. त्याला रोखण्यासाठी सर्व देवांनी शंकराची आराधना केली. भगवान शंकराने याच
रांजणगावी गणपतीची पूजा केली. ज्या ठिकाणी गणपतीची पूजा झाली तिथे त्यांनी एक
मंदिर उभारले आणि त्या गावाला मणिपूर असे नाव दिले. पुढे भगवान शंकर आणि
त्रिपुरासूर यांचे तुंबळ युद्ध झाले ज्यात अखेर भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध
केला...
@ अनिकेत
परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment