Friday, January 26, 2018

अवंतिका...


दुपारचे चार वाजत आले होते. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. "रामूऽऽऽ ए रामू..." स्टडीमधून आवाज आला. रामू खोलीत आला तेव्हा लेखक अजिंक्य पुस्तक वाचनात गर्क होते. रामूला पाहताच ते म्हणाले, "आज पावसाचं काही खरं नाही. अजून वाढेल बहुतेक. रामू, साधारण तीन-चार कप चहा करून ठेव आणि काहीतरी खायलाही कर. आज एक मुलगी माझी मुलाखत घ्यायला येणार आहे. या पावसात कोण जाणे येईल की नाही पण आलीच तर काय घ्या... बरं हे झालं की तू घरी जा. बायको काळजीत असेल ना..." सर्व ऐकून रामू निघून गेला व अजिंक्य पुन्हा वाचनात गढून गेले...

सहा वाजून गेले होते. चहा व नाश्ता बनवून रामू घरी निघून गेला होता. अजिंक्य वाचनात इतके रमले होते की रामू निघून गेल्याचं त्यांना कळलंच नाही. ते भानावर आले बेलच्या आवाजामुळे. त्यांनी दार उघडलं तर समोर एक मुलगी हातात मोठाली पर्स व छत्री घेऊन उभी होती. "मि. अजिंक्य... नमस्कार, मी सानिका रघुनाथ शिंदे... तुमची मुलाखत घेण्यासाठी फोन केला होता..." अजिंक्य हसत म्हणाले, "मी वाटच पाहत होतो तुमची... वाटलं इतक्या पावसाचं येताय की नाही..." दोघं आत गेले. पावसाच्या थंड वातावरणात गरमागरम चहा पिऊन सानिकाला थोडं बरं वाटलं. तिने सुरुवात केली, "तर मि. अजिंक्य, करायची सुरुवात... सर्वप्रथम 'अवंतिका' या तुमच्या पुस्तकाबद्दल तुम्हाला बुकर पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन... एक उत्तम लेखक तर तुम्ही आहातच पण त्याच बरोबर एक व्यक्ती म्हणून तुमचं आयुष्य वाचकांसमोर यावं असं वाटतं... काय सांगाल तुमच्याबद्दल..." चहाचा घोट घेत मि. अजिंक्य यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचं जन्मगाव, शिक्षण, असं सर्व सांगत असताना ते लेखक कसे झाले या विषयापर्यंत ते पोहोचले...

सानिका मध्येच तोडत म्हणाली, "सर, तुम्हाला पुरस्कार तर मिळाला पण पुरस्काराचं स्रोत असलेलं तुमचं पुस्तक 'अवंतिका' याबद्दल काही सांगा ना..." मि. अजिंक्य यांनी कपात राहिलेला चहा संपवला व मागे रेलून बसत बोलायला सुरुवात केली, "अवंतिका एका मुलीची शोकांतिका आहे... ही अवंतिका शिक्षणासाठी घरापासून इतक्या लांब येते. ती ज्या जागी पेईंग गेस्ट म्हणून राहत असते तिथे समोरच राहणाऱ्या वयाने थोड्या मोठ्या असणाऱ्या व्यक्तिकडे ती आकर्षित होते. अल्लड वयातली अवंतिका त्या माणसाला प्रेमाची कबूली देते. तोही तिच्यात स्वत:चा एकांत विसरतो. एका मोहाच्या क्षणी दोघं मर्यादा ओलांडतात व एकमेकात एकरूप होतात. ते दोघं लग्न करण्याच्या विचारात असताना एक दिवस अचानक त्या माणसाचा अपघाती मृत्यू होतो आणि त्याच्यापासून दिवस गेलेल्या अवंतिकावर दु:खाचा डोंगर कोसळतो. समाजाच्या हिणकस नजरा अवंतिका सहन करू शकत नाही व आत्महत्या करते..."

मि. अजिंक्य बोलत असतानाच लाईट गेले. मेणबत्ती बाहेर काढायला उठलेले मि. अजिंक्य सानिकाच्या हसण्याने थबकले, "समाजाच्या हिणकस नजरा... चांगली कल्पना आहे... पण त्या नजरांना बिचारी अवंतिका सामोरी गेलीच नाही... कारण त्याआधीच तिची निर्घूण हत्या झाली होती... नाही का मि. अजिंक्य... आणि खूनी... तोच माणूस ज्याच्या प्रेमात ती आंधळी झाली होती... बरोबर ना..." बाजूला पडलेल्या माचिसच्या प्रकाशात त्यांनी पाहिलं तर सानिकाच्या हातात एक धारदार सुरा होता, तिचे केस विस्कटलेले होते. सानिकाचं ते रूप पाहून मि. अजिंक्यांना घाम फुटला. ते कसेबसे म्हणाले, "स... सानिका... क... काय म्हणायचं... त...तो माणूस..." सानिका मि. अजिंक्यांजवळ जात म्हणाली, "अजिंक्य, तो नीच माणूस तूच आहेस... जिनं तुझ्यासोबत जगण्याची स्वप्न पाहिली, आपलं सर्वस्व तिनं तुला बहाल केलं पण तू... स्वत:ला वाचवण्यासाठी तिचा जीव घेतलास... इतकं करूनही तुला चैन नाही पडलं आणि अवंतिकाची कथा छापून तू प्रशंसा मिळवलीस... अरे नराधमा... तुझ्या कथेमुळे तिच्या परिवाराची वाताहत झाली. तिचे आई-बाबा हाय खाऊन मेले आणि तू..."

सानिकाचं बोलणं ऐकून अजिंक्यला धाप लागली. त्याला बोलायचं होतं पण शब्दच फुटत नव्हते. "त...तू हे क...क...कोण..." या अजिंक्यांच्या तुटक शब्दांवर सानिका हसत म्हणाली, "मी तुला घरात येतानाच माझं पूर्ण नाव सांगितलं होतं... सानिका रघुनाथ शिंदे... पण तू इतका निर्ढावला आहेस, अवंतिकाच्या नावात इतका गुंतला आहेस की तुझ्या लक्षातच आलं नाही... मीच ती... बारा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तू मला मारलंस आणि बंगल्याच्या मागे पुरून ठेवलंस... माझा आत्मा तडफडत होता... तुझ्यासोबत मी माझ्या आयुष्यातले काही सोनेरी क्षण व्यतीत केले होते... त्या क्षणांसाठी मी तुला माझा खून माफ केला होता... पण माझं नाव बदलून तू कथा छापलीस... तुझ्यामुळे बतफैल मुलगी म्हणून समाज माझ्याकडे पाहू लागला... मी गायब आहे हे मनात ठेवत जगणाऱ्या माझ्या आई-वडिलांना अवंतिकामुळे मी कायमची सोडून गेल्याचं समजलं आणि ते अतीव दू:खाने गेले... तू मात्र आम्हा सर्वांच्या जिवांची पायरी करत यशाच्या शिखरावर पोहोचलास... पण आता नाही... तुलाही मरावंच लागेल..." मोठ्याने हसत सानिकाने हातातला सुरा अजिंक्यवर उगारला...

सकाळच्या पेपरात बातमी झळकली, "बुकर पुरस्कार विजेते लेखक मि. अजिंक्य यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या राहत्या घरी निधन..." बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र शोकाकूल वातावरण होतं. बंगल्याच्या मागच्या झाडावर एक कावळा समाधानाने बंगल्याकडे पाहत होता...

समाप्त.

Wednesday, January 17, 2018

मदतनीस...


रात्रीचे बारा वाजत आले होते. पाऊस मी म्हणत होता. प्रशांतने गेट ढकललं. पावसाच्या एवढ्या आवाजातही गेटच्या कर्कश आवाजाने प्रशांतच्या अंगावर काटा आला. कानोसा घेत प्रशांत दाराजवळ पोहोचला. बेल वाजवणार इतक्यात दार उघडलं गेलं. एक सुंदर मुलगी समोर उभी होती. साडी नेसलेली, कपाळावर चंद्रकोरीची टिकली असलेली ती मुलगी त्या वातावरणात अधिकच सुंदर दिसत होती. प्रशांत भारावल्यासारखा तिच्याकडे पाहत होता...

"तुम्हाला इथे येताना खिडकीतून पाहिलं म्हणून दार उघडलं. काही हवं आहे का तुम्हाला..." तिच्या बोलण्याने प्रशांत भानावर आला. "माझी गाडी बंद पडली आहे. मोबाईलला नेटवर्कही नाही. जरा तुमचा फोन वापरू शकतो का..." प्रशांतच्या बोलण्याला त्या मुलीने हसून प्रतिसाद दिला व मागे होत म्हणाली, "तुम्ही फोन करा. मी तुमच्यासाठी पाणी आणते. तिला पाठमोरी जाताना प्रशांत पाहतच राहिला. ती मुलगी आत गेल्यावर फोन करण्यासाठी त्याने रिसीव्हर उचलला तेव्हा फोन काम करत नसल्याचं त्याला समजलं. "पावसामुळे फोन बंद झाले असतील..." अचानक आलेल्या आवाजाने तो दचकून मागे वळला तर ती मुलगी हातात ग्लास घेऊन उभी होती...

ती म्हणाली, "पाऊस जरा जास्तच आहे ना... तुम्ही थोडावेळ इथेच थांबा. पाऊस कमी झाला की जा..." प्रशांतने सभोवार नजर फिरवत विचारलं, "हे काय... घरात कोणी..." त्या मुलीने स्मित केलं व म्हणाली, "नाही... मी एकटीच आहे... पण तुम्ही काळजी नका करू... मला सवय झाली आहे आता..." प्रशांत थोडा अडखळला पण लगेच सावरून बसला. ती मुलगी निवांत आहे पाहून त्यालाही धीर आला. "कॉफी घेणार का... मी घेणारच आहे... तुम्हीही घेतलीत तर सोबत होईल..." त्या मुलीचा गोड आवाज प्रशांतच्या कानी पडला. या थंड पावसाळी वातावरणात गरमागरम कॉफीचा मोह त्याला आवरता आला नाही. प्रशांतने मानेनेच होकार दिला. ती मुलगी कॉफी कपात ओतत असताना प्रशांत तिच्याशी ओळख करण्याच्या बहाण्याने म्हणाला, "काय पाऊस आहे ना आज... थांबतोय की नाही शंकाच आहे... बाय द वे, मी प्रशांत... सिव्हिल इंजिनियर आहे. इथून जवळच एका साईटच्या कामासाठी चाललो होतो पण हा पाऊस... जाऊ देत... अ... तुम्ही..." ती मुलगी गोड हसत म्हणाली, "मी गायत्री... पोस्ट ग्रॅजूएट आहे... आता घरीच असते... प्रशांत... मी तुमची इतकी मदत केली... तुम्ही माझी थोडी मदत कराल का..."

प्रशांतचा प्रश्नार्थक चेहरा पाहून गायत्री म्हणाली, "आधी कॉफी तर प्या... आणि जास्त काही नाही, हा दोर या झुंबरात अडकवून द्याल का... नाही, तुमची ऊंची आहे म्हणून..." प्रशांतने कपात राहिलेली कॉफी संपवली आणि टेबलवर ठेवलेला दोर झुंबरावरून टाकला. तो दोर बऱ्यापैकी खाली आला होता. प्रशांत हे पाहून अधिकच गोंधळला. तो काही बोलणार इतक्यात गायत्री जागेवरून उठली. गोड हसून म्हणाली, "थँक यू प्रशांत... तुम्ही खूप मदत केलीत माझी... कितीतरी काळ मी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करत होते... गच्चीवरून स्वत:ला झोकून देणार होते, पण खाली पाहून माझा धीर होईना... मानेवरून सुरा फिरवायला हिम्मत होत नव्हती... या झुंबराला दोर अडकवून त्या फासाला लटकण्याचा विचारही केला, पण काही केल्या दोर झुंबरात अडकेना... शेवटचा उपाय म्हणून कॉफीत विष घालून पिणार होते इतक्यात तुम्ही आलात..."

गायत्रीचं बोलणं ऐकलं मात्र, आणि प्रशांत घामाघूम झाला. त्याला गुदमरल्यासारखं झालं. हात-पाय लटपटू लागले. प्रशांत धडपडत फोनजवळ गेला तेव्हा फोनची वायर कापली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. "गायत्री तू..." हे म्हणत प्रशांत वळला तर झुंबरात अडकवलेल्या दोराच्या फासात गायत्री लटकलेली त्याला दिसली. डोळे बंद, साडी सुटलेली, केस विस्कटलेले गायत्रीचे प्रेत निपचित लटकत होते. प्रशांतचा थरकाप उडाला. प्रशांत कसातरी दाराजवळ पोहोचला. दार उघडणार इतक्यात, "प्रशांत..." या विचित्र आवाजाने प्रशांत थबकला व मागे वळला. आवाज गायत्रीच्या प्रेतामधून येत होता. डोळे उघडले होते. विकृत पाश्वी झाक त्यात होती. गायत्री म्हणाली, "प्रशांत... चाललास कुठे... जरा बघ तरी आत्महत्या करून कसं वाटतं ते... तू काहीच करू नकोस... ती कॉफीच करेल सगळं... हा...हा...हा..." राक्षसी हसत ते प्रेत झुलत होतं. प्रशांतला कोणीतरी त्याचा गळा दाबत आहे असं वाटलं. हळूहळू सगळं शांत झालं. चेतना त्याचं शरीर सोडून निघून गेली...

पन्नास वर्षांपूर्वी गायत्री आपल्या आई-वडिलांसोबत या बंगल्यात राहत होती. तिला आत्महत्येचं वेड होतं. तिने केलेले आत्महत्येचे अनेक प्रयत्न तिच्या आई-वडिलांनी निष्फळ ठरवल्यावर गायत्रीने कॉफीत विष घालून दोघांना मारलं आणि त्याच झुंबरात अडकवलेल्या दोरात मान अडकवून स्वत:लाही संपवलं. आजही गायत्रीचं पिशाच्च आत्महत्या करण्यासाठी मदतनीसाच्या शोधात असतं. तुम्ही चुकूनही त्या वाटेला गेलात तर त्या बंगल्यात अजिबात जाऊ नका... कदाचित, गायत्रीचे नवे मदतनीस तुम्हीच असाल...

समाप्त...