रात्रीचे बारा
वाजत आले होते. पाऊस मी म्हणत होता. प्रशांतने गेट ढकललं. पावसाच्या एवढ्या
आवाजातही गेटच्या कर्कश आवाजाने प्रशांतच्या अंगावर काटा आला. कानोसा घेत प्रशांत
दाराजवळ पोहोचला. बेल वाजवणार इतक्यात दार उघडलं गेलं. एक सुंदर मुलगी समोर उभी
होती. साडी नेसलेली, कपाळावर
चंद्रकोरीची टिकली असलेली ती मुलगी त्या वातावरणात अधिकच सुंदर दिसत होती. प्रशांत
भारावल्यासारखा तिच्याकडे पाहत होता...
"तुम्हाला
इथे येताना खिडकीतून पाहिलं म्हणून दार उघडलं. काही हवं आहे का तुम्हाला..."
तिच्या बोलण्याने प्रशांत भानावर आला. "माझी गाडी बंद पडली आहे. मोबाईलला
नेटवर्कही नाही. जरा तुमचा फोन वापरू शकतो का..." प्रशांतच्या बोलण्याला त्या
मुलीने हसून प्रतिसाद दिला व मागे होत म्हणाली, "तुम्ही फोन करा. मी तुमच्यासाठी पाणी आणते.
तिला पाठमोरी जाताना प्रशांत पाहतच राहिला. ती मुलगी आत गेल्यावर फोन करण्यासाठी
त्याने रिसीव्हर उचलला तेव्हा फोन काम करत नसल्याचं त्याला समजलं. "पावसामुळे
फोन बंद झाले असतील..." अचानक आलेल्या आवाजाने तो दचकून मागे वळला तर ती
मुलगी हातात ग्लास घेऊन उभी होती...
ती म्हणाली, "पाऊस जरा जास्तच आहे ना... तुम्ही थोडावेळ इथेच
थांबा. पाऊस कमी झाला की जा..." प्रशांतने सभोवार नजर फिरवत विचारलं, "हे काय... घरात कोणी..." त्या मुलीने
स्मित केलं व म्हणाली, "नाही...
मी एकटीच आहे... पण तुम्ही काळजी नका करू... मला सवय झाली आहे आता..."
प्रशांत थोडा अडखळला पण लगेच सावरून बसला. ती मुलगी निवांत आहे पाहून त्यालाही धीर
आला. "कॉफी घेणार का... मी घेणारच आहे... तुम्हीही घेतलीत तर सोबत
होईल..." त्या मुलीचा गोड आवाज प्रशांतच्या कानी पडला. या थंड पावसाळी
वातावरणात गरमागरम कॉफीचा मोह त्याला आवरता आला नाही. प्रशांतने मानेनेच होकार
दिला. ती मुलगी कॉफी कपात ओतत असताना प्रशांत तिच्याशी ओळख करण्याच्या बहाण्याने
म्हणाला, "काय पाऊस आहे ना आज... थांबतोय की नाही शंकाच
आहे... बाय द वे, मी
प्रशांत... सिव्हिल इंजिनियर आहे. इथून जवळच एका साईटच्या कामासाठी चाललो होतो पण
हा पाऊस... जाऊ देत... अ... तुम्ही..." ती मुलगी गोड हसत म्हणाली, "मी गायत्री... पोस्ट ग्रॅजूएट आहे... आता घरीच
असते... प्रशांत... मी तुमची इतकी मदत केली... तुम्ही माझी थोडी मदत कराल
का..."
प्रशांतचा
प्रश्नार्थक चेहरा पाहून गायत्री म्हणाली, "आधी कॉफी तर प्या... आणि जास्त काही नाही, हा दोर या झुंबरात अडकवून द्याल का... नाही, तुमची ऊंची आहे म्हणून..." प्रशांतने कपात
राहिलेली कॉफी संपवली आणि टेबलवर ठेवलेला दोर झुंबरावरून टाकला. तो दोर बऱ्यापैकी
खाली आला होता. प्रशांत हे पाहून अधिकच गोंधळला. तो काही बोलणार इतक्यात गायत्री
जागेवरून उठली. गोड हसून म्हणाली, "थँक
यू प्रशांत... तुम्ही खूप मदत केलीत माझी... कितीतरी काळ मी स्वत:ला संपवण्याचा
प्रयत्न करत होते... गच्चीवरून स्वत:ला झोकून देणार होते, पण खाली पाहून माझा धीर होईना... मानेवरून सुरा
फिरवायला हिम्मत होत नव्हती... या झुंबराला दोर अडकवून त्या फासाला लटकण्याचा
विचारही केला,
पण काही केल्या दोर झुंबरात अडकेना... शेवटचा
उपाय म्हणून कॉफीत विष घालून पिणार होते इतक्यात तुम्ही आलात..."
गायत्रीचं बोलणं
ऐकलं मात्र,
आणि प्रशांत घामाघूम झाला. त्याला
गुदमरल्यासारखं झालं. हात-पाय लटपटू लागले. प्रशांत धडपडत फोनजवळ गेला तेव्हा
फोनची वायर कापली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. "गायत्री तू..." हे
म्हणत प्रशांत वळला तर झुंबरात अडकवलेल्या दोराच्या फासात गायत्री लटकलेली त्याला
दिसली. डोळे बंद, साडी
सुटलेली, केस विस्कटलेले गायत्रीचे प्रेत निपचित लटकत
होते. प्रशांतचा थरकाप उडाला. प्रशांत कसातरी दाराजवळ पोहोचला. दार उघडणार इतक्यात, "प्रशांत..." या विचित्र आवाजाने प्रशांत
थबकला व मागे वळला. आवाज गायत्रीच्या प्रेतामधून येत होता. डोळे उघडले होते. विकृत
पाश्वी झाक त्यात होती. गायत्री म्हणाली, "प्रशांत... चाललास कुठे... जरा बघ तरी
आत्महत्या करून कसं वाटतं ते... तू काहीच करू नकोस... ती कॉफीच करेल सगळं...
हा...हा...हा..." राक्षसी हसत ते प्रेत झुलत होतं. प्रशांतला कोणीतरी त्याचा गळा
दाबत आहे असं वाटलं. हळूहळू सगळं शांत झालं. चेतना त्याचं शरीर सोडून निघून
गेली...
पन्नास
वर्षांपूर्वी गायत्री आपल्या आई-वडिलांसोबत या बंगल्यात राहत होती. तिला
आत्महत्येचं वेड होतं. तिने केलेले आत्महत्येचे अनेक प्रयत्न तिच्या आई-वडिलांनी
निष्फळ ठरवल्यावर गायत्रीने कॉफीत विष घालून दोघांना मारलं आणि त्याच झुंबरात
अडकवलेल्या दोरात मान अडकवून स्वत:लाही संपवलं. आजही गायत्रीचं पिशाच्च आत्महत्या
करण्यासाठी मदतनीसाच्या शोधात असतं. तुम्ही चुकूनही त्या वाटेला गेलात तर त्या
बंगल्यात अजिबात जाऊ नका... कदाचित, गायत्रीचे नवे मदतनीस तुम्हीच असाल...
समाप्त...
No comments:
Post a Comment