Saturday, December 30, 2017

सावधान... वळण धोक्याचे आहे...


रात्री साधारण एकच्या पुढचा सुमार होता. निर्मनुष्य रस्त्यावरून एक बाईक सुसाट वेगाने चालली होती. त्या नीरव शांततेत बाईकचा आवाज सर्वत्र घुमत होता. अचानक ती बाईक पुढच्या चाकावरून हवेत उडाली. चालकाचा ताबा सुटून तो काही अंतरावर असलेल्या झाडावर आदळला. बाईक हवेत गटांगळ्या खात जमिनीवर कोसळली. चालकाचे डोळे उघडे होते व डोक्यातून घळाघळा रक्त येत होतं. बाईक चालक जागीच गतप्राण झाला होता...

पहाटेचे सहा वाजले होते. पोलीस तपास करत होते व तिथले रहिवासी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते, "साहेब, आम्ही आत्ता कामाला निघालो होतो, हा प्रकार पाहिला आणि तुम्हाला कळवलं. बाकी काही ठाऊक नाही पण रात्री दीड वाजता मोठा आवाज करत एक बाईक इथून गेली म्हणून जाग आली. काही क्षणात तिचा आवाज बंद झाला मग आम्ही पुन्हा झोपी गेलो..." पोलीस हे ऐकत होते. एक हवालदार म्हणाला, "सर, त्याच प्रकारे अपघात झालाय. बाईक मोशनमध्ये असताना कंट्रोल सुटून अपघात आणि मृत्यू. या आठवड्यातला हा दुसरा अपघात आहे सर..." इंस्पेक्टर सर्व ऐकून म्हणाले, "अपघात व्हायचाच तर कोणाचाही होईल, कधीही होईल. रात्रीच का... आणि बाईकवाल्यांचाच का... नाही हवालदार... हा आणि तीन दिवसांपूर्वीची घटना, हे दोन्ही अपघात नसून खून आहेत...

पण, खून का झाले असतील... आणि कसे... हे मात्र अजूनही एक गूढ आहे... असो. तुर्तास बॉडी पी.एम.ला पाठवा. रिपोर्ट आल्यावर ठरवू..." देवन्हावे परिसरातला पूल पार केल्यावर येणाऱ्या वळणापलिकडे अपघाती मृत्यू होतात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्वत्र भीतीचं सावट होतं. अशा वेळी काही दिवसांनी सुशांत आपली नवी कोरी रेसर बाईक हाणत त्याच परिसरात पोहोचला. पूल पार करताना अपघातांबद्दल विचार मनात आला आणि त्याने बाईक बाजूला लावली व चालत जरा अदांज घेऊ लागला. चिटपाखरूही नसणाऱ्या या रस्त्यावरून चालताना सुशांतचा थरकाप उडाला होता. एका झाडाखाली कोणीतरी उभं आहे हे दिसताच सुशांतला हायसं वाटलं व तो तिथे जाऊ लागला. सुशात झाडाजवळ पोहोचला. साधारण सत्तरीचे, सदरा-लेंगा परिधान केलेले, डोळ्यांवर चष्मा व हातात काठी असलेले एक गृहस्थ समोर उभे होते. अशावेळी त्याचं तिथे असणं सुशांतला खटकल्यावाचून राहिलं नाही...

सुशांत म्हणाला, "आजोबा, तुम्ही यावेळी इथे..." तो गृहस्थ हसून म्हणाला, "अरे बाळा, झोप येत नव्हती म्हणून जरा शतपावली करत होतो. तुझ्या मोटार सायकलचा आवाज ऐकला म्हणून थांबलो. पण तू काय करतो आहेस इथे..." सुशांत लगेच उत्तरला, "मी व राजीवने म्हणजे माझ्या मित्राने नवीन बाईकस घेतल्या आहेत. त्यावरच आम्ही सुधागडला निघालो आहेत. राजीव मागे राहिला पण मी मात्र पुढे आलो. इथे होणाऱ्या अपघातांबद्दल ऐकलं होतं म्हणून जरा थांबलो. बघा, आलाच राजीव..." सुशांत बोलत असतानाच बाईकचा आवाज आला. इतक्यात आजोबांची काठी खाली पडली म्हणून ती उचलण्यासाठी सुशांत वाकला आणि जोराचा आवाज झाला. सुशांतने पाहिलं तर राजीवची बाईक हवेत गटांगळ्या खाऊन खाली पडली आणि राजीव त्याच झाडावर आदळला जिथे सुशांत उभा होता...

“राजीव... राजीव अरे...अहो आजो...” सुशांतच्या ओरडण्याचा काही उपयोग नव्हता. राजीव जागीच ठार झाला होता आणि तो गृहस्थही नाहीसा झाला होता. सुशांतने ताबडतोब पोलीसांना कळवलं. हवालदार म्हणाला, “सर, ही तिसरी घटना. पण आपलं नशीब जोरावर आहे. यावेळी घटनेचा आय व्हिटनेस समोर आहे सर... बोला, काय पाहिलंत तुम्ही...” सुशांतने घडलेलं सगळं सांगितलं व म्हणाला, “सर, काठी पडली म्हणून मी वाकलो आणि हे झालं. ते आजोबाही गायब झाले. मला काही कळेना म्हणून मी तुम्हाला फोन केला...” इंस्पेक्टर म्हणाले, “म्हणजे अपघात झाला त्यावेळी तुमच्यासोबत अजूनही कोणी होतं तर... त्या व्यक्तीचं नाव माहित आहे का... किंवा पत्ता वगैरे...” सुशांतने नकारार्थी मान हलवताच इंस्पेक्टर ने सुशांतला त्या माणसाचा चेहरा बनवण्यास मदत करायला सांगून हवालदारासोबत चौकीवर पाठवलं...

इंस्पेक्टर चौकीवर पोहोचले तेव्हा सुशांतच्या वर्णनावरून चित्रकाराने त्या गृहस्थाचा चेहरा बनवून ठेवला होता. तो चेहरा पाहून इंस्पेक्टर अचंबित झाला. सुशांतला म्हणाला, “साहेब, तुम्हाला नक्की हाच माणूस भेटला होता... बरं... चला माझ्यासोबत...” इंस्पेक्टर, हवालदार व सुशांत त्या अपघाती रस्त्याच्या जवळ असलेल्या एका घरात गेले. “सर तुम्ही... या वेळी... आबांच्या मृत्यूबद्दल काही समजलं का... सर, आज दोन महिने झालेत पण आबा कसे गेले ते अजून समजलं नाही... त्यांना कसलाही आजार नव्हता हो...” एका मुलीने दार उघडत विचारलं. इंस्पेक्टर सुशांतकडे पाहत म्हणाले, “आता कळलं का तुम्हाला...” त्यांनी त्या मुलीला धीर दिला आणि मागे फिरले. सुशांतला काहीच समजत नव्हतं. तो तिथेच उभा राहून विचार करत होता. तो मागे फिरणार इतक्यात त्याला समोरच्या भिंतीवर एक हार घातलेला फोटो दिसला. फोटो पाहून त्याचा वरचा श्वास वर आणि खालचा खाली राहिला...

कसाबसा सुशांत रस्त्यावर आला. घामाच्या धारांनी तो पूर्ण चिंब झाला होता. त्याला काहीच समजत नव्हतं. तो विचारच करत होता की त्याच्या खांद्यावर एक हात पडला. सुशांतने मागे पाहिलं तर तोच मगाचचा म्हातारा होता. तो म्हातारा हसत म्हणाला, “काय, पाहून आलास माझा फोटो... त्या दिवशी शतपावली करत असताना मोटार सायकलच्या जोरदार आवाजाने माझ्या काळजात धस्स झालं. त्या आवाजाने माझं बिचारं काळीज इतकं घाबरलं की माझी साथ सोडून गेलं. त्या मोटार सायकलवाल्याचा चेहरा पण पाहू शकलो नाही मी... तेव्हापासून येणाऱ्या प्रत्येक मोटार सायकलच्या आवाजासोबत मी तिच्यासमोर जातो. मला त्या चालकाचा चेहरा पहायचा असतो. पण मला रस्त्याच्या मधोमध पाहताच ते घाबरतात आणि ताबा सुटून या झाडावर आदळतात... यांच्याप्रमाणेच तुझ्याही मोटार सायकलचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला पण तू माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी तुझा मित्र आला माझ्याकडे... हा हा हा हा...” विचित्र आणि मोठ्याने हसत तो गृहस्थ गायब झाला. सुशांत आ वासून मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिला आणि काही क्षणात गतप्राण होऊन जमिनीवर कोसळला...

आज इतका काळ लोटला तरी अजून देवन्हावे परिसरात होणाऱ्या अपघाती गूढ मृत्यूंचा ससेमिरा चालूच आहे. तुमच्याकडे जर बाईक असेल तर सावधान... देवन्हावे परिसरात वेगाने बाईकचा मोठा आवाज करत जाऊ नका... ते वळण धोक्याचे आहे...

समाप्त.

No comments:

Post a Comment