Thursday, December 14, 2017

बँकिंगबद्दल बोलू काही...


मंडळी, बँक म्हटली की सामान्य माणसाच्या समोर काय असतं, तर पैसे भरणे आणि पैसे काढणे यासाठी असते ती जागा. या दोन गोष्टींसाठी रोख ही एकच पद्धत नसते, तर Clearing / ECS / Electronic Transfer, असे प्रकार असतात. वरील चार मुख्य प्रकारांबद्दल थोडी माहिती देण्याचा माझा हा प्रयत्न...

A. Electronic Transfer:- यातले दोन मुख्य प्रकार म्हणजे RTGS आणि NEFT...

RTGS:- Real Time Gross Settlement. या प्रकारात व्यवहार कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त दोन तासात पूर्ण होतो. दुपारी ४.१५ ही RTGS ट्रांस्फरची शेवटची वेळ असते. या वेळेआधी केलेले व्यवहार ग्राह्य धरले जातात पण वेळेनंतर केलेले व्यवहारमात्र आपोआप रद्द होतात. एक महत्वाची गोष्ट अशी की RTGS ट्रांस्फरचा वापर करायचा झाल्यास रक्कम कमीत कमी दोन लाख असायला हवी.

ग्राहकांच्या तक्रारी आणि निर्मुलन...
१. ग्राहक: मी अकरा वाजता फॉर्म भरून दिला. आता एक वाजला पण पैसे पोहोचले नाहीत...
उत्तर: दोन तासांची वेळ ही बँकेत व्यवहाराची नोंद झाल्यापासून लागू होते. ज्यावेळी फॉर्म दिला गेला त्यावेळी इतर फॉर्म समोर असावेत त्यामुळे त्या फॉर्मची वेळ यायला जरा विलंब झाला असावा. दुसरीकडे कदाचित समोरच्या खात्यांची दिलेली माहिती थोडीशी चुकीची असू शकते.
२. ग्राहक: मी RTGS करायला वेळेवर फॉर्म दिला मग व्यवहार झाला का नाही... पैसे परत का आले...
उत्तर: ही तक्रार साधारणपणे दुपारी दिलेल्या RTGSच्या फॉर्मबद्दल असते. ४.१५ पर्यंत RTGS करायचं असल्यास फॉर्म ४.१० पर्यंत द्यावा जेणेकरून पुढच्या पाच मिनिटात व्यवहाराची नोंद होऊ शकेल. ४.१५ नंतर केलेली नोंद आपोआप रद्द होते आणि पैसे परत येतात.

NEFT:- National Electronic Funds Transfer. या प्रकारात कोणतीही रक्कम ट्रांस्फर करण्याची मुभा असते. NEFTसाठी ९.००, ११.००.... असे वेगवेगळे गट पाडलेले असतात त्यामुळे दिवसभरात कधीही हा व्यवहार करता येतो. संध्याकाळी ७.००पर्यंत एखादं NEFT ट्रांस्फर केलं असेल तर इच्छित खात्यात ते त्याच दिवशी जमा होऊ शकतं. पण त्यानंतर केलेली ट्रांस्फर्समात्र दुसऱ्या दिवशी खात्यात जमा होतात...

ग्राहकांच्या तक्रारी आणि निर्मुलन...
१. ग्राहक: मी कालच दिला होता NEFTचा फॉर्म, मग पैसे काल का नाही पोहोचले...
उत्तर: एकतर ७.०० पर्यंत फॉर्म मिळाला नसेल आणि ७.०० नंतर केलेला व्यवहार दुसऱ्या दिवशी पूर्ण होतो किंवा कदाचित समोरच्या खात्यांची दिलेली माहिती थोडीशी चुकीची असू शकते.
२. ग्राहक: मी तर RTGSचा फॉर्म दिला होता, मग समोरच्या बँकेत NEFT कसं पोहोचलं...
उत्तर: ही तक्रार साधारणपणे दुपारी दिलेल्या फॉर्मबद्दल असते. ४.१५ पर्यंत RTGS करायचं असल्यास फॉर्म ४.१० पर्यंत द्यावाच लागतो जेणेकरून व्यवहाराची नोंद वेळेत होऊ शकेल. ४.१५ नंतर केलेली नोंद आपोआप रद्द होते आणि पैसे परत येतात. मग NEFTद्वारे तोच व्यवहार पूर्ण होऊ शकतो.

RTGS आणि NEFTसाठी वेळेचं फार महत्व आहे. मुख्यत्वे RTGSसाठी कारण या व्यवहारासाठी वेळेची मर्यादा असते. वेळेचं बंधन जसं ग्राहकाला लागू असतं तसंच ते बँक कर्मचाऱ्यालाही लागू असतं. असं नाही की चुका फक्त ग्राहकाकडून किंवा समोरच्या बँकेकडून होतात पण तक्रार करण्याआधी जर थोडा विचार केला तर अधिक सोयीस्कर होईल...

B. Clearing:- पैशांच्या व्यवहारातला हा सर्वात वेळखाऊ मार्ग आहे. यातले दोन मुख्य प्रकार आहे, Outward Clearing आणि Inward Clearing...

Outward Clearing म्हणजे दुसऱ्या बँकेचा चेक आपल्या खात्यात जमा होण्याचा प्रवास. तीन दिवस हा प्रवास चालतो. पहिल्या दिवशी ग्राहक खात्यात चेक जमा करतो. त्याच दिवशी संध्याकाळी तो चेक रिझर्व्ह बँकेत पोहोचतो. तिथे चेकचं स्कॅनिंग केलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कॅन केलेल्या चेकचा फोटो त्याच्या बँकेत पोहोचवला जातो, खात्यातून रक्कम वजा होते आणि पैसे रिझर्व्ह बँकेकडे पोहोचवले जातात. त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत पैसे चेक जमा केलेल्या बँकेत पोहोचतात पण ती वेळ जवळपास आठच्या पुढे असल्याने त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी खात्यात रक्कम जमा होते. चेक जर १०:३०पूर्वी खात्यात जमा केला गेला तरच तो त्या दिवसाच्या प्रवासात सामील केला जातो. अन्यथा त्याला दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू होण्याची वाट पहावी लागते...

चेक परत करण्याची कारणे:-
१. Funds Insufficient - चेक ज्या खातेदाराचा आहे त्याच्या खात्यात चेक आला त्या दिवशी पैसे नसणे.
२. Exceeds Arrangement - चेक ज्या खातेदाराचा आहे त्याने आपल्या खात्यात रकमेची तरतूद केली पण चेक त्यापेक्षा अधिक रकमेचा असणे.
३. Effects Not Clear - चेक ज्या खातेदाराचा आहे त्याने त्याच्या खात्यात जमा केलेल्या चेकच्या समोर हा चेक देणे पण त्याचा तो चेक न वेळेवर वठणे.
४. Payment Stopped - चेक ज्या खातेदाराचा आहे त्याने चेक न वठण्यासाठी त्याच्या बँकेत तसे लेखी कळवलेले असणे.
५. Signature Missing / Signature Differs / Signature Not As Per Mandate / - अनुक्रमे सही नसणे / सही वेगळी असणे / बँकेत लेखी दिलेल्या विशेष सूचनेप्रमाणे सही नसणे.
६. Alterations On Chq - चेकवर कुठेही खाडाखोड असणे.
७. Refer To Drawer - खातेदाराचे काही मुद्दे असणे ज्यामुळे चेक न वठणे.
८. Refer To Drawer's Bank - बँकेची त्या खात्यावर विशेष नजर असणे.
९. Paper Not Received – काही चेकसाठी काही बँकांना फोटो सोबत खुद्द चेक लागतो. असा चेक वाठण्याच्या वेळी जर खुद्द चेक समोर नसेल तर तो परत होतो.
१०.Out Of Date / Post Dated – अनुक्रमे चेकवर तीन महिने अर्थात नव्वद दिवस आधीची तारीख असणे / चेकवर आजच्या तारखेनंतरची तारीख असणे.

Clearingचा दुसरा प्रकार म्हणजे Inward Clearing अर्थात आपण एखाद्याला दिलेला चेक त्याच्या खात्यात जमा होण्याचा प्रवास. हा प्रवास समोरच्याने चेक जमा केल्यापासून दोन दिवस चालतो. ज्या दिवशी समोरची व्यक्ती त्याच्या खात्यात तो चेक जमा करते त्याच दिवशी तो रिझर्व्ह बँकेत पोहोचतो. तिथे तो चेक स्कॅन केला जातो आणि तो फोटो दुसऱ्या दिवशी आपलं खातं असलेल्या बँकेत पोहोचतो. जर सर्व ठीक असेल तर आपल्या खात्यातून चेकची रक्कम वजा केली जाते. इथेही वर नमूद केलेले सर्व मुद्दे चेक परत करण्यासाठी वापरले जातात फक्त दोन मुख्य फरक आहेत. Stop Payment हे चेक लागण्याच्या आधीच द्यायचे असते. ज्यादिवशी चेक लागेल त्या दिवशी Stop Payment सहसा कुठलीही बँक स्विकारत नाही. शिवाय, तारखेमध्ये चूक किंवा खाडाखोड असेल आणि तिथे योग्य सही असेल तर फक्त विमा / फी / बिलं या गोष्टींसाठी दिलेले चेक, ग्राहकाचं पत्र घेऊन बँक वठवू शकते. अन्य चेकमात्र परत केले जातात.

ग्राहकांच्या तक्रारी आणि निर्मुलन...
१. ग्राहक: मी शुक्रवारी दुपारी माझ्या खात्यात चेक भरला होता. आज सोमवार झाला तरी अजून पैसे जमा झाले नाहीत...
उत्तर: शुक्रवार दुपारी भरलेला चेक शनिवारच्या क्लीयरिंगला गेला कारण चेक भरण्याची शेवटची वेळ सकाळी ११.०० आहे...
२. ग्राहक: मला समजलंय चेकवर खाडाखोड आहे. तो परत करू नका मी येतोच सही करायला...
उत्तर: बँकेत खुद्द चेक येत नाही फक्त फोटो येतो त्यामुळे तो वठू शकत नाही...
३. ग्राहक: माझ्याकडे असलेला एक जुन्या धाटणीचा चेक मी सोमवारी भरला पण आज बुधवार संपला तरी तो वठला नाही...
उत्तर: जुन्या धाटणीचा म्हणजेच Non-CTS चेक. असा चेक ज्यावर तारखेच्या ठिकाणी आडवी रेष असते, खालच्या बाजूला सहसा खातेदाराचं नाव नसतं आणि बारकोडचा चौकोन नसतो. असा चेक शुक्रवारी आणि शनिवारीच क्लीयरिंगला जातो आणि मंगळवारी खात्यात जमा होतो.
४. ग्राहक: तारखेची मर्यादा तीन महिने आहे मग चेकवर ०४.१०.२०१७ ही तारीख असताना आज ०४.०१.२०१८ला Out Of Date (Stale) म्हणून तो परत का केला गेला...
उत्तर: तारखेची मर्यादा तीन महिने म्हणजे नव्वद दिवसांची आहे. ०४.१०.२०१७पासून नव्वद दिवस मोजले तर ऑक्टोबरचे २८ + नोव्हेंबरचे ३० + डिसेंबरचे ३१ + जानेवारीचे ३ = ९२ दिवस होतात म्हणून चेक परत गेला...

C. ECS:- Electronic Clearing Service. ठरवलेल्या दिवशी ठरलेली रक्कम खात्यातून वळती होणे किंवा खात्यात जमा होणे. Debit ECS Credit ECS या उपप्रकारांखेरीज ECSचे दोन मुख्य प्रकार आहेत, ते म्हणजे DECS आणि NPCI ECS...

DECS हे रिझर्व्ह बँकेचे असते. संख्या जास्त असल्यास हे ECS रात्री बँकेत पोहोचवले जाते नाहीतर सकाळी पोहोचवले जाते. DECS फक्त एकदाच येते आणि याची शेवटची वेळ दुपारी १.३० असते. या वेळेआधी खात्यात पैसे असल्यास ECS पुढे जाते नाहीतर परत जाते. खूप आधीपासून रिझर्व्ह बँक हे ECS पहायची त्यामुळे विम्याचा हफ्ता / जुन्या जमा रकमेचं व्याज / वीज अथवा फोन बिलांचे पैसे / जमा रकमेचं व्याज अशा प्रकारे ठराविक दिवशी ठराविक रक्कम खात्यातून वळती केली जाते किंवा खात्यात जमा होते. आधी ECS मर्यादेत यायचे पण हळू हळू Mutual Funds / New Fixed Deposits येऊ लागल्याने रिझर्व्ह बँकेवर ताण वाढू लागला तेव्हा स्वत:जवळ फक्त काही Debit ECS हाच उपप्रकार ठेऊन इतर सर्व Debit ECS Credit ECSसाठी रिझर्व्ह बँकेने NPCI National Payments Corporation of India ही संष्ठा निर्माण केली...

NPCIने NACH म्हणजेच National Automated Clearing House या विभागाद्वारे Debit ECS Credit ECSची देवाण-घेवाण सुरू केली. सर्व नवीन Mutual Fundsचे हफ्ते / खाजगी कंपन्यांच्या विम्यांचे हफ्ते / नव्या जमा रकमेचे व्याज NPCIद्वारे येऊ लागले. यालाच NPCI ACH ECS म्हणतात. दिवसभरात या ECSच्या तीन ते चार फाईली येतात. ACH DEBIT ECSची शेवटची वेळ ते ECS आल्याच्या वेळेपासून ठरवली जाते. ECS हे बँकेच्या वेळेनुसार नाही तर RBI NPCIच्या वेळेनुसार असते. ECSची महत्वाची गोष्ट अशी की Debit असो किंवा Credit, ते येण्याची तारीख ग्राहकाला ठाऊक असते. Debit ECS येण्याच्या आदल्या दिवशीच जर खात्यात पैशांची तरतूद करून ठेवली तर जास्त त्रास होणार नाही. एकदा सुरू झालं की साधं stop payment letter देऊन ते थांबवता येत नाही. ते जर थांबवायचं असेल तर ECSचा फॉर्म जिथे भरून दिला होता तिथेच ते थांबवता येऊ शकतं...

ECS परत जाण्याची कारणे:-
१. Balance Insufficient – ECS ज्या दिवशी येईल त्यावळी आणि वेळ संपेपर्यंत खात्यात पैसे नसणे.
२. Payment Stopped - चेक ज्या खातेदाराचा आहे त्याने चेक न वठण्यासाठी त्याच्या बँकेत तसे लेखी कळवलेले असणे.
३. Details Not As Per Mandate – फॉर्मच्या माहितीत आणि आलेल्या ECSमध्ये फरक असणे.

ग्राहकांच्या तक्रारी आणि निर्मुलन...
१. ग्राहक: माझं ECS आज लागलं. अजून बँक बंद झाली नसताना ते परत का गेलं...
उत्तर: कदाचित येणारं ECS हे RBIकडून आलं असेल तर त्याची वेळ दुपारी १.३० असते आणि तुम्ही त्या नंतर आला असाल...
२. ग्राहक: सकाळी माझं ECS परत गेलं होतं मी पैसे भरून ते मार्गी लावलं पण तरीही ECS परत जाण्याचा दंड आकारला गेला...
उत्तर: ECS परत गेलं असेल आणि पैसे भरून ते मार्गी जरी लागलं असेल तरी दंड भरावाच लागतो. तो परत करता येत नाही...
३. ग्राहक: माझं ECS लागणार आहे. ते थांबवा...
उत्तर: ECS लागण्याच्या दिवशी जर खात्यात पैसे असतील तर ते थांबवता येत नाही. शिवाय ECS थांबवण्यासाठी जिथे फॉर्म भरला तिथेच जाऊन सांगावं लागेल...

No comments:

Post a Comment