Monday, November 27, 2017

आहुती...



रात्रीचे अकरा वाजून गेले होते. जंगलातल्या मोकळ्या रस्त्यावरून संजय वेगात गाडी चालवत होता. संजयचा फोन वाजला. पलिकडे विनय होता, "हॅलो, विन्या, अरे ऑन द वे आहे बाबा. एकतर अंधारात रस्ता नीटसा दिसत नाहीये आणि त्यात तू..." संजय बोलतच होता की गाडी अचके देत बंद पडून थांबली. "विन्या, बघ काय केलं तुझ्या फोनने. गाडी बंद पडली माझी. आता ठेव फोन..." असं म्हणत संजय गाडीतून उतरला. बॉनेटमधून धूर निघत होता. डिक्कीतून पाण्याचा कॅन काढला तर तो रिकामा होता. संजयने आजूबाजूला पाहिले. अंधार आणि किर्र झाडी याखेरीज काहीच नव्हतं. चिडचिड करत संजय रस्ता सोडून जंगलात घुसला. बॅटरीच्या अंधूक प्रकाशात अडखळत, हळूहळू पावलं टाकत तो पुढे जात होता. पाण्याचा लवलेश दिसत नव्हता कुठे. संजयची चिडचिड अजूनच वाढली. "कोणाचं थोबाड बघून निघालो काय माहीत... कशाला इतक्या लांब ठेवली पार्टी... मुंबईत चांगला पब बूक केला असता की... आता घ्या..." संजय हे बोलतच होता की त्याला पाण्याचा आवाज आला. संजय आवाजाच्या दिशेने गेला तर नदीचा प्रवाह दृष्टीस पडला. संजय पाणी भरून मागे फिरणार इतक्यात...   ¯¯¯¯¯¯¯¯¯...

अस्पष्ट अशी धून ऐकून संजय जागीच थबकला. “किती छान धून आहे ही... पण अशा जंगलात आणि या वेळी... कोणीतरी वाट चुकलं असावं बहुतेक... जाऊन बघावं का...” हा विचार मनात येत असताना संजयने घड्याळ पाहिलं. पावणेबारा झाले होते. संजय ती धून शोधायला निघाला. काही अंतर गेला असेल, पुन्हा ती धून ऐकू आली. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. काहीक्षण धून ऐकू येऊन बंद झाली. आता मात्र ही धून रेकॉर्ड करायचीच असं ठरवून संजय तिथेच थांबला. काही क्षणात ऐकू आलेली धून संजयने रेकॉर्ड केली आणि, “विन्याला अशा जगावेगळ्या धून रिंगटोन म्हणून ठेवायची भारीच हौस ना... घे विन्या माझ्याकडून तुला गिफ्ट...” फाईल सेंड झाली इतक्यात विनयचा कॉल आला, “अरे विन्या, पनवत्या पुन्हा फोन केलास ना... बरोबर आहे रे... बारा नंतर तुझ्यासारखी भुतंच त्रास देतात. बरं चल, माफ केलं तुला... हो मेसेज बॉक्स बघ... आवडेल तुला...” संजय बोलतच होता की... ¯¯¯¯¯¯¯¯¯... पुन्हा तीच धून ऐकू आली. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. जणू काही तो वारा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, “आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ...” वाऱ्याच्या जोरदार झोतासरशी संजय हवेत उडाला आणि जंगलात खेचला गेला. त्याच्या हातात असलेला फोन झाडावर आदळला आणि खाली पडून बंद झाला. सर्वत्र निरव शांतता पसरली...

पहाटेचे चार वाजले होते. "तावडे, लवकर चालवा जरा. आपल्याला घटनास्थळी पोहोचायला हवं..." इंस्पेक्टर भट सांगत होते. "सर, ट्रॅकर उजव्या बाजूला दाखवतो आहे पण इथे तर जंगल आणि अंधाराशिवाय काहीच नाही..." हवालदार जाधव हातात यंत्र धरून दिशा दाखवत होते की विनय म्हणाला, "सर, ती बघा समोर संजयची गाडी..." काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध एक बॉनेट उघडं असलेली गाडी उभी होती. पोलीस जीप गाडीजवळ थांबली. हवालदार जाधव म्हणाले, "सर, मोबाईल शेवटचा याच परिसरात होता. इथेच सिग्नल ब्रेक झाला आहे. शेवटचं लोकेशन उजवीकडे जंगलात दाखवत आहे सर..." जाधव आणि तावडे एका बाजूने डावीकडे गेले तर इं. भट आणि विनय दुसऱ्या बाजूने उजवीकडे वळले. मोबाईल आणि टॉर्चच्या प्रकाशात सर्वजण संजय आणि त्याच्या मोबाईलला शोधू लागले. "सर, मोबाईल सापडला..." जाधवांच्या आवाजाच्या दिशेला सर्वजण गेले. एका ठिकाणी तुटलेला बंद मोबाईल पडला होता आणि जवळच पाण्याचा आडवा कॅनही पडला होता. "हा कॅन इथे पडला आहे. मोबाईल त्या झाडाच्या समोर पडला आहे. म्हणजे संजय इथे आला असणार पाणी भरायला... पण मग इथून पुढे कुठे गेला असेल... मि. विनय, तुमचा मित्र तुमची मस्करी तर करत नाही ना..." इं. भटांनी लावलेल्या तर्कावर विनय म्हणाला, "सर, संजयला मस्करीच करायची असती तर आमच्याकडे येऊन केली असती आणि स्वत:चा मोबाईल का तोडेल तो... तेही या जंगलात..." विनय बोलतच होता इतक्यात सर्वांना तावडेंचा आवाज आला, "सर, इकडे या... बघा काय आहे..."

एव्हाना संध्याकाळ सरत चालली होती. तावडेंच्या आवाजाचा माग घेत सर्वजण तिथे पोहोचले. एका ठिकाणी तुटलेलं घड्याळ पडलं होतं आणि तिथून जवळच संजयचा छिन्न-विछिन्न झालेला मृतदेह. त्याच्या छातीवर भली मोठी जखम होती आणि सर्वत्र रक्त पसरलं होतं. “संजयऽऽऽ...” असं ओरडत विनय मृतदेहाच्या जवळ जाऊ लागला तेव्हा इं. भट त्याला मागे खेचत म्हणाले, “मी. विनय, बॉडीला हात लाऊ नका... इतका अघोरी मृत्यू मी आजवर पाहिला नाही... असं वाटतंय छाती फाडून हृदय खेचून बाहेर काढलंय... बॉडी पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवा. मि. विनय काल नेमकं काय काय घडलं ते सांगा...” विनय धक्क्यातून जरा सावरला. एकवार त्याने संजयकडे पाहिलं आणि म्हणाला, “सर, काल माझा वाढदिवस होता. मी, संजय आणि आमची मैत्रीण तृप्ती, आम्ही सर्व फार्म हाऊस वर पार्टीसाठी भेटणार होतो. मी आणि तृप्ती पोहोचलो होतो आणि संजय मागाहून येत होता. त्याला उशीर झाला म्हणून मी त्याला कॉल केला तेव्हा गाडी बंद पडली आहे असं म्हणाला. अर्धा-पाऊण तास गेला असेल, मी पुन्हा संजयला कॉल केला तर मेसेज बॉक्स बघ असं म्हणाला. त्याचवेळी संजयच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि फोन बंद झाला...” सगळं ऐकून इं. भट म्हणाले, “हे प्रकरण साधं दिसत नाही... संजयने पाठवलेल्या मेसेजमधून काहीतरी धागा मिळाला तर... तुम्ही पाहिलात तो मेसेज...” विनय नकारार्थी मान हलवत म्हणाला, “नाही सर, सगळं इतक्या गडबडीत झाली की... आपण आत्ता पाहू तो मेसेज...” त्याने फोनसाठी खिशात हात घातला पण त्याचा चेहरा कसानुसा झाला. म्हणाला, “अरे... माझा फोन...”

“मि. विनय, हा माझा फोन घ्या आणि आधी तुमचा नंबर लावा. बघू चालू असेल तर...” विनयने फोन लावला. दोन रिंगमध्येच उचलला गेला. विनय म्हणाला, “मी विनय बोलतोय. तुमच्या हातात जो फोन आहे तो माझा आहे. तुम्ही कोण...?” पलिकडून लगेच आवाज आला, “अरे विन्या, मी तृप्ती. अरे तुझा फोन इथेच आहे. तू गडबडीत निघून गेलास तेव्हा विसरलास...” विनयला हायसं वाटलं. तो म्हणाला, “तृप्ती, एक वाईट बातमी आहे. आपला संजू गेला गं... इथे जंगलात त्याची बॉडी सापडली आहे. त...तृप्ती... सावर स्वत:ला. नीट ऐक... मरण्यापूर्वी संजूने माझ्या मोबाईलवर काहीतरी पाठवलं आहे. बघ काय आहे. मी आणि इंस्पेक्टर साहेबांसोबत येतोच. आणि तृप्ती आम्हाला यायला मध्यरात्र उलटून जाईल. माझ्याकडे चावी आहे. तू नीट रहा...” विनयने फोन ठेवला आणि पोलीसांसोबत पुन्हा फार्म हाऊसकडे निघाला. इकडे संजयच्या बातमीमुळे तृप्ती थोडी अस्वस्थ झाली. तिला काहीच सुचेना. बराच वेळ निघून गेला. मध्यरात्रीच्या आस-पास शांत झालेली तृप्ती विनयची वाट पाहू लागली. तिला विनयचं म्हणणं आठवलं. तिने लगेच विनयचा फोन पाहिला. एक वॉईस मेसेज होता. तृप्तीने तो ओपन केला. ¯¯¯¯¯¯¯¯¯... ही धून तृप्तीला खूप आवडली. तिने परत ऐकली आणि आपल्या मोबाईलवर सेंड केली. पुन्हा ती धून ऐकणार इतक्यात जोरदार वारा सुरू झाला. त्याच्या झोकात तृप्ती हवेत उडाली आणि खेचली गेली. पोलीस जीप गेटवर आली आणि “आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ...” किंकाळी ऐकून सर्व आत धावले. धडकी भरवणारं दृश्य त्यांची वाट पाहत होतं...

सगळीकडे धूळ पसरली होती. सामान असता-व्यस्त पडलं होतं. ट्यूब फुटल्या होत्या. हलत्या बल्बच्या अंधूक प्रकाशात बेडरूमच्या दारात कोणीतरी पडलं होतं. सर्वजण जवळ गेले. पडलेल्या व्यक्तीला पाहून अवाक झाले. ती तृप्ती होती. संजयप्रमाणेच तिच्याही छातीवर जखम होती आणि आजू-बाजूला रक्ताचा सडा पडला होता. पोलीस कामाला लागले. तपासणी करून हवालदार जाधव व तावडे मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी घेऊन गेले. विनयकडे पाहत इं. भट म्हणाले, "मि. विनय, या मुलीचाही खून झाल्यासारखा वाटतोय आणि तुमचा मित्र संजय जसा मेला तसाच हाही मृत्यू दिसतोय... खुन्याला आपण शोधून काढू. तूर्तास तरी यापलीकडे काहीच सांगता येत नाहीये. पण तुम्हाला काही कळलं तर आम्हाला खबर द्या आणि हो, तपास सुरू असेपर्यंत इथून जाऊ नका..." इं. भट गेल्यावर विनय स्वत:शीच बोलू लागला, "काय केलं होतं संजू आणि तृप्तीने की इतकं वाईट मरण त्यांच्या वाट्याला आलं... दोघांमध्ये असं काय साम्य होतं की एकाच पद्धतीने दोघं..." विनयला काहीतरी आठवलं. बाजूला पडलेला तृप्तीचा मोबाईल त्याने तपासला. त्याने विचार केला, "माझा कॉल... माझ्या कॉलमुळे हे झालं... तिथे जंगलात संजय आणि आता तृप्ती... दोघांनाही शेवटचा मीच कॉल केला आणि दोघांनीही जीव गमावला. पण... पण मी तर काहीच बोललो नाही..." विनयने मनाशी काहीतरी ठरवून मुंबईला कॉल केला. फोन ठेवला व स्वत:शीच पुटपुटला, "हे प्रकरण साधं नाही... याचा छडा लावायलाच हवा..."

विनयला हवं असलेलं सामान यायला संध्याकाळ उलटून गेली. स्वैपाकी जेवण तयार करून घेरी निघून गेला होता. विनयचं मात्र पूर्ण लक्ष होतं ते त्याने मागवलेल्या सामानावर. त्याने सगळी मांडामांड केली. माणसाच्या उंचीचा पुतळा सोफ्यावर बसवला. त्याच्या हातात तृप्तीचा मोबाईल ठेवला. दाराजवळच्या टेबलवर ठेवलेल्या पितळी शोपीसमध्ये व्हिडिओ रेकॉर्डर लपवून ठेवला. सर्व व्यवस्थित आहे हे पाहून विनयने रेकॉर्डींग सुरू केलं बाजूच्या खोलीत दाराआड लपून बसला. स्वत:च्या फोनवरून तुप्तीला फोन लावला. ¯¯¯¯¯¯¯¯¯... ही धून बराच वेळ वाजत राहिली पण काहीच झालं नाही. विनयने एक-दोनदा प्रयत्न केला पण काहीच घडलं नाही. एव्हाना रात्रीचे बारा वाजत आले होते. हताश झालेल्या विनयने शेवटी दहा पंधरा मिनिटात चार घास पोटात ढकलले आणि झोपायला गेला. रात्री कधीतरी झोपेत त्याचा मोबाईलवर हात पडला आणि स्पीड डायलवर असलेला तृप्तीचा नंबर लागला. “खळ ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ...” काचेचा आवाज झाला आणि विनयला जाग आली. त्याने बाहेर जाऊन पाहिलं तर सगळा दिवाणखाना असता-व्यस्त दिसत होता. ट्युबा फुटल्या होत्या. झुंबर खाली पडून ठिकऱ्या ठिकऱ्या झालं होतं. तो पुतळा छिन्न-विछिन्न झाला होता. तृप्तीचा फोनदेखील पार चेंदा-मेंदा होऊन कोपऱ्यात पडला होता. विनयने रेकॉर्डरच्या दिशेने पाहिलं. लाल प्रकाश त्याच्या नजरेस पडला आणि रेकॉर्डींग अजून चालू आहे हे पाहून त्याला हायसं वाटलं. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तो व्हिडिओ पाहिला. पाहताना त्याचे डोळे विस्फारले आणि त्याच्या जिवाचा थरकाप उडाला...

विनयने ताबडतोब इं. भटना फोन केला. पोलीस जीप बंगल्यात येऊन पोहोचली तेव्हा नुकतीच पहाट झाली होती. विनय म्हणाला, “सर, हे प्रकरण दिसतं तितकं सरळ नाही. तुम्ही प्रत्यक्षच बघा...” त्याने व्हिडिओ सुरू केला... वेळ अकराची... पुतळ्याच्या हातात असलेला तृप्तीचा फोन वाजला. बराच वेळ वाजत राहिला. नंतर पुन्हा एक-दोन वेळा वाजला. काहीच घडलं नाही. विनयने व्हिडिओ फॉरवर्ड केला. वेळ दोन वाजून चाळीस मिनिटे... तृप्तीचा फोन वाजला... ¯¯¯¯¯¯¯¯¯... ही धून ऐकू आली. काही क्षण गेले असतील... दरवाजा खाडकन उघडला... इथे विनयने व्हिडिओ थांबवला आणि स्लो मोशनमध्ये पुन्हा सुरू केला. काळ्या धुळीचं एक वावटळ आत आलं... पुतळ्याच्या हातातला मोबाईल पापडासारखा चुरा होऊन खाली पडला... पुतळा एखाद्या चुंबकासारखा वावटळात खेचला गेला... त्याच वावटळात पुतळ्याची छाती फाडली गेली... काही क्षण गेले आणि पुतळा पूर्ण फाडला गेला... वावटळ शमलं आणि एक प्रचंड मोठी आकृती समोर आली... आग ओकणारे मोठे डोळे... मोठी शिंग... चेहऱ्याच्या ठिकाणी लालभडक जळते निखारे असलेली कवटी... संपूर्ण शरीर काळे आणि खवल्यांनी भरलेले... ही विद्रूप आकृती व्हिडिओवर पाहूनसुद्धा सर्वजण एक पाऊल मागे सरकले... त्या आकृतीने पुतळा खाली फेकला... पुन्हा वावटळ निर्माण झालं आणि खोलीभर फिरलं ज्यात सगळ्या काचा फुटल्या, झुंबर तुटलं... आणि आल्या दिशेने ते वावटळ निघून गेलं...  विनयने व्हिडिओ बंद केला. सर्वजण नि:शब्द झाले होते. हवालदार जाधव म्हणाले, “साहेब, हे खूप भयानक आहे... आपल्याला हे नाही झेपायचं...”

"सर, हे आपल्या कल्पनेपलिकडचं आहे... हा कुठल्यातरी प्रचंड पाशवी ताकदीचा प्रकार दिसतोय..." हवालदार जाधवच्या बोलण्याला दुजोरा देत हवालदार तावडे बोलते झाले. सर्व ऐकून घेत इं. भट म्हणाले, "हम्ऽऽ... त्या जंगलाच्या जवळच युगांधर नावाचा एक वृद्ध फॉरेस्ट ऑफिसर राहतो. कदाचित त्याला काही माहीत असेल याबद्दल... आपण त्याची मदत घेऊ..." सर्वांनी होकार दिला आणि युगांधरच्या घरी सर्वजण पोहोचले. जंगलातल्या संजयसोबतच्या शेवटच्या संभाषणापासून ते व्हिडिओपर्यंतची सर्व हकीगत विनयने त्यांना सांगितली. ऐकत असताना युगांधरांच्या डोळ्यात भिती दिसू लागली. त्यांनी कपाटातून एक डायरी काढली. डायरी बरीच जुनी असल्याने त्यातले कागद झिजत चालले होते. एका पानावर त्यांची नजर स्थिरावली. युगांधर बोलू लागले, "म्हणजे ते सगळं खरं आहे तर... ही कथा मला माझ्या आजोबांनी सांगितली. त्यांनी त्यांच्या आजोबांकडून ऐकली. आधी माझा विश्वास नव्हता. पण आता मात्र विश्वास ठेवायलाच हवा...

हजारो वर्षांपूर्वी इथे एक खुशाल गाव होतं. सर्व गावकरी खूप आनंदी आणि समाधानी राहत असत. त्याच गावात दुष्यंत नावाचा एक माणूस होता. म्हणतात की तो खूप विक्षिप्त होता. त्याला अमर होण्याचं वेड लागलं होतं. त्यासाठी त्याने अनेक पूजा-अर्चा केल्या पण उपयोग झाला नाही. एक दिवस त्याला कळलं, की मध्यरात्र उलटल्यानंतर सूर्य उगवायच्या आधी काही विशिष्ट मंत्रांचा वापर करून सैतानाला जागृत केलं आणि त्याला तृप्त केलं तर हवं ते मिळतं. दुष्यंत जंगलात गेला. मंत्रांच्या सहाय्याने त्याने सैतानाला जागृत केलं. त्याने सैतानाला हवी असलेली मानवी हृदयाची आहुती कबूल केली आणि अमरत्व व चिरतारुण्याचं दान त्याच्याकडे मागितलं. दररोज रात्री मनुष्य प्राण्याच्या हृदयाची आहुती जोवर मिळत राहील तोवर दुष्यंत जिवंत आणि तरूण राहील असं वचन सैतानाने दुष्यंतला दिलं. आहुती तयार आहे हे सैतानाला कळावं यासाठी दुष्यंतने एक धून तयार केली. धून ऐकून सैतानाने आहुती स्वीकारण्यास यावं हे ठरलं. त्यानंतर दररोज रात्री गावातील आणि आस-पासच्या परिसरातील माणसं गायब होऊ लागली. यामागे दुष्यंतच असावा ही शंका गावकऱ्यांना आली...

दुष्यंत एका माणसाला भुलवून जंगलात नेत असताना गावकऱ्यांनी त्याला पाळत ठेऊन पकडलं आणि बेदम मारहाण केली. रक्तबंबाळ झालेला दुष्यंत कसाबसा जंगलातल्या आहुतीच्या जागी पोहोचला. त्याच्या शरीरातून येणारे रक्ताचे थेंब जवळच उगवलेल्या रोपावर पडले. तंत्र-मंत्राने विषाळलेल्या दुष्यंतच्या रक्तामुळे ते रोपटं होरपळलं आणि त्याला छोटी छोटी भोकं पडली. अतीव वेदनेमुळे दुष्यंतची शुद्ध हरपली. त्याच्या रक्ताने भोकं पडलेल्या रोपाची पानं वाऱ्यामुळे हलली आणि त्यातून तीच धून प्रवर्तित झाली. सैतान प्रकट झाला. समोर आहुती नाही हे पाहून चवताळला. त्याचवेळी दुष्यंत शुद्धीवर आला आणि सैतानाची गयावया करू लागला. दुष्यंतने शब्द मोडला म्हणून सैतानाने आहुतीसाठी त्याचंच हृदय घेतलं. दुष्यंतचा अंत झाला खरा पण त्याच्या रक्तामुळे ते रोप अमर झालं. नंतर दररोज रात्री त्या रोपाच्या पानांची विशिष्ट सळसळ होऊन धून प्रवर्तित होत राहिली आणि आस-पासची माणसं बळी पडत गेली. वस्ती कमी झाली, जंगल वाढू लागलं पण ते रोप आजही ती धून वाजवून सैतानाला बोलावतं आणि त्या परिसरात जो कोणी असेल त्याचा अंत दुर्दैवी होतो..."

युगांधर कथा सांगत असताना सर्व भितीयुक्त चेहऱ्याने ऐकत होते. कथा संपवून डायरी ठेवत युगांधर म्हणाले, “मि. विनय, तुम्ही आत्तापर्यंतची सांगितलेली हकीगत आणि या डायरीत लिहिलेली कथा, दोघांचाही मेळ बसतोय. या मृत्युंसाठी तो सैतानच जबाबदार आहे. पण हेही खरं की तो खूप शक्तिशाली आहे आणि आता तर धून ऐकू येऊन आहुती न मिळाल्यामुळे तो डिवचल्यासारखा झालाय. अशावेळी त्याचा सामना तुम्ही करू शकणार नाही. त्याला थोपवण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे ती धून नष्ट करणे...” हे समजताच विनयने स्वत:च्या आणि तृप्तीच्या मोबाईलमधली ती धून डीलीट केली. हे बघून युगांधर म्हणाले, “नुसतं हे करून भागणार नाही. त्या धुनेचा उगम म्हणजेच दुष्यंतच्या विषारी रक्ताने सिद्ध झालेलं ते रोपटं. ते नष्ट व्हायला हवं...” विनयने राहिलेल्या तिघांकडे पाहिलं. कोणीच बोलत नाही हे कळून तो स्वत:च बोलू लागला, “इं. साहेब, तुम्ही येताय माझ्यासोबत ते रोपटं नष्ट करायला...” तिघंही एकमेकांकडे पाहत होते आणि विनय बोलत होता, “त्या सैतानाने माझ्या मित्राला मारलं. तृप्ती, जिच्यावर माझं मनापासून प्रेम होतं तिला माझ्यापासून दूर नेलं... त्याला मी सोडणार नाही. त्या सैतानाचा मी अंत करू शकत नसेनही पण ते रोप नष्ट करून ही खुनांची मालिका तर थांबवेन... तुम्ही येत असाल तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय...”

विनय निघाला आणि कर्तव्याची जाणीव होऊन इं. भट, हवालदार जाधव आणि तवडेही त्याच्यासोबत निघाले. सकाळचे अकरा वाजले होते. जीप जंगलाजवळ पोहोचली. संजयचा मृतदेह जिथे सापडला होता तिथे पोहोचून इं. भट म्हणाले, “इथून आपल्याला चौफेर शोध घ्यायला हवा. ते रोपटं याच परिसरात असायला हवं. मि. विनय, तुम्ही तावडेसोबत या बाजूला जा. मी आणि जाधव या बाजूला शोधतो. लक्षात ठेवा, आपल्याला ते रोप नष्ट करायचं आहे. तावडे, हा वॉकी-टॉकी ठेवा. ज्याला ते रोप सापडेल त्याने दुसऱ्याला खबर द्या. All the best. सार्वजण पांगले. इतक्या गडद जंगलात एक छोटं रोप शोधणं सोप्पं नव्हतं. हळू हळू अंधार वाढू लागला. “सर, रात्र झाली आहे. अजून आपल्याला ते रोप सापडलं नाही. थोड्याच वेळात बारा वाजतील. सर, आपण जाऊया परत...” जाधव बोलतच होते की इं. भटच्या घड्याळात बाराचा गजर वाजला. ते म्हणाले, “जाधव, you are right. ते रोप असं अंधारात खचितच सापडेल. आपण उद्या पुन्हा याचं जागेवरून शोध मोहीम सुरू करू. Let’s go back...” इं. भट आणि हवालदार जाधव परत फिरले. इतक्यात... ¯¯¯¯¯¯¯¯¯... ही धून ऐकू आली. जाधव म्हणाले, “सर, हीच धून. आवाज मोठा आणि स्पष्ट ऐकू येतोय. म्हणजे ते रोप इथेच कुठेतरी आहे...” इं. भटने लगेच वॉकी-टॉकीवरून तावडेशी संपर्क साधला, “तावडे, मला ती धून ऐकू येत आहे. खूप जवळून... ते रोप इथेच आहे. काय... तुम्हालाही ऐकू आली... तुम्ही आणि मि. विनय ताबडतोब दक्षिण दिशेला या...” इं. भट बोलतच होते की अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. झाडं हलू लागली. एक वावटळ समोरून येताना दिसलं. कोणी काही करू शकेल इतक्यात जाधव त्यात खेचले गेले आणि बघता बघता गायब झाले. वावटळ शांत झालं. टॉर्चच्या प्रकाशात इं. भट जाधवला शोधू लागले...

एका झाडाजवळ इं. भटना जाधवचा मृतदेह दिसला. जाधवचीसुद्धा तीच अवस्था होती जी संजय आणि तृप्तीची होती. त्यांची छातीही तशी फाडली गेली होती. त्याची ही अवस्था पाहून इं. भटना दरदरून घाम फुटला. आजू-बाजूला भयाण शांतता पसरली होती. इं. भट, विनय आणि हवालदार तावडेची वाट पाहू लागले. इतक्यात... ¯¯¯¯¯¯¯¯¯... ही धून पुन्हा ऐकू आली. भट दचकले. झाडे-पाने हलायला लागली... सोसाट्याचा वारा सुरू झाला... इं. भट पिस्तूल सरसावून उभे राहिले... ते काही करू शकतील इतक्यात त्या काळ्या वावटळाने त्यांना गिळंकृत केले... मागे उरला तो त्यांच्या पिस्तुलातून निघालेल्या गोळ्यांचा आवाज... विनय आणि हवालदार तावडे आवाजांचा माग काढत घटनास्थळी पोहोचले. तिथे पडलेले बूट, टॉर्च, काठी यावरून शोधत शोधत आधी हवालदार जाधव आणि पुढे इं. भटांच्या मृतदेहापर्यंत पोहोचले. दोघांचाही थरकाप उडाला. तावडे म्हणाले, “जाधव आणि साहेब दोघंही... नाही नाही... मि. विनय, मी आता इथे नाही थांबणार...” तावडे चालू लागले. विनय त्याला थांबवायला पुढे जाणार तोच... ¯¯¯¯¯¯¯¯¯... ही धून ऐकू आली. विनयला अगदी जवळून धून ऐकल्यासारखं वाटलं. तो तावडेना बोलवू लागला. तेही परत फिरले आणि इतक्यात... काळ्या वावटळाने विनयच्या समोर तावडेना खेचत नेले. विनय स्तब्ध उभा होता... शून्यात हरवल्यासाखी त्याची नजर वावटळ गेलं त्या दिशेकडे लागली होती. काही क्षणात विनय भानावर आला. त्याने सभोवार नजर फिरवली. आपण एकटेच उरलोत ही त्याला जाणीव झाली आणि भीतीने त्याच्या अंगावर काटा आला. एका क्षणासाठी त्याला वाटलं पळून जावं. तो वळणार इतक्यात झाडीच्या आड लपलेलं एक रोप त्याला दिसलं...

संपूर्ण लाल रंगाच्या त्या रोपावर छोटी छोटी छिद्र होती. दुष्यंतच्या विषारी रक्ताने शापित झालेलं हेच ते रोप आहे याची विणायला खात्री पटली. इतक्यात वारा वाहू लागला आणि त्या रोपाच्या छिद्रातून ¯¯¯¯¯¯¯¯¯... ही धून प्रवर्तित झाली. विनय चपापला. “आता तो सैतान येईल आणि मलाही घेऊन जाईल त्याची आहुती म्हणून... पण ध्येयाच्या इतक्या जवळ पोहोचून मी हार मानणार नाही. दुष्यंत, तुझ्या कुकर्माने अनेक जणांचा बळी घेतला पण या पुढे नाही. हे रोपच नष्ट करतो आता...” असं म्हणत विनयने धून प्रवर्तित होणाऱ्या त्या रोपाला मुळासकट उपटलं आणि तोडून टाकलं. ते रोप जाळण्यासाठी विनयने लायटर पेटवतच होता की सोसाट्याचा वारा सुरू झाला. वावटळात गुरफटलेला तो सैतान प्रकट झाला. विनय जवळ येत ते वावटळ शमलं आणि विनयसमोर उभा राहिला साधारण अकरा-बारा फूट ऊंचीचा, आग ओकणारे डोळे असलेला, मोठाली शिंग असलेला, जळत्या निखाऱ्याची कवटी आणि  खावल्यांचं शरीर असलेला अक्राळ-विक्राळ सैतान. रोपाची दुर्दशा पाहून तो सैतान चवताळला. आपल्या अजस्त्र हातांनी जोरजोरात छाती आपटत ओरडू लागला. विनयचा थरकाप उडाला. त्याला समजलं, आता त्याची काही खैर नाही. सैतानाचं पुन्हा वावटळात रुपांतर झालं आणि हवेच्या जोरावर विनय खेचला गेला. त्याचवेळी विनयने लायटर पेटवला आणि रोपावर भिरकावला. वावटळ विनयला घेऊन गेलं पण त्याने फेकलेल्या लायटरने आपलं काम चोख बजावलं. रोप जाळून गेलं आणि जंगल सैतानाच्या कचाट्यातून मुक्त झालं...

काल पुढे सरकत गेला. जंगलातून किंवा आजू-बाजूच्या परिसरातून कोणी गायब झाल्याची घटना समोर नाही आली. एक दिवस कॉलेजचं एक टोळकं ट्रीपसाठी त्या परिसरात आलं. जंगलात फिरत असताना एका ठिकाणी त्यांना काही भाग जाळल्यासारखा वाटला. कॅम्पसाठी जागा साफ करत असताना एक छोटं लाकूड त्यांना मिळालं. एकजण म्हणाला, “अरे हे बघा... काय विचित्र लाकूड आहे... बासरीसारखं दिसतंय... वाजतंय का बघू का... त्याने लाकडात हवा फुकली... सोसाट्याचा वारा सुरू झाला... काळ्या रंगाचं एक वावटळ तयार झालं...

समाप्त...

No comments:

Post a Comment