Saturday, October 28, 2017

चेहरा...


रात्रीचे अकरा वाजले होते. बस आपल्या मार्गाने चालली होती. उशीर झाल्याने गर्दी तुरळकंच होती. एका सीटवर एक मुलगी हेडफोन लाऊन बसली होती. तिच्याशिवाय ड्राव्हर, कंडक्टर आणि तीन-चार प्रवासी, इतकीच जणं... गाणी ऐकताना त्या मुलीची नजर सहज बाजूच्या सीट्सकडे गेली तर तिथे बसलेला माणूस तिच्याकडे पाहून हसला. त्या मुलीला त्याचं ते हसणं जरा खटकलं. तिने नजर वळवली. तिचा फोन वाजला, "हॅलो नीलम, हो मी येतेच आहे. बसमध्ये आहे, पोहोचेन अर्ध्या तासात..." फोन बंद झाला. तिने नजर वळवली तर तो हसणारा इसम त्याच्या सीटवर नव्हता. उतरला असेल असा विचार करून निर्धास्त होऊन ती गाणं ऐकणार इतक्यात मागून आवाज आला, "जय श्रीकृष्ण मॅडम..." त्या मुलीने दचकून मागे पाहिलं तर तो इसम दात विचावून हसत म्हणाला, "मॅडम, माझा नाव मनिलाल पटेल आहे. मी एक इव्हेंट मेनेजमेंट कंपनीचा मालक हाय. तुमच्यासारखी ब्यूटिफूल मुलगी आमच्याबरोबर असले तर कंपनीला चार चाँद लागेल नाय..." ती मुलगी क्षणाचाही विलंब न लावता, "Not interested..." असं म्हणून जरा पुढे जाऊन बसली. तो इसम तिच्या मागे येत म्हणाला, "मॅडम, आमची कंपनी लय मोठी हाय. तुम्हाला पगार पन भरपूर मिलेल. एकदा जॉईन तर करा..." ती मुलगी ताडकन उठली व कंडक्टरकडे पाहत म्हणाली, "दादा, हा माणूस मला त्रास देतोय. जरा बघा ना..."

कंडक्टर जवळ आला तसा तो इसम म्हणाला, "अरे अरे मॅडम, तुमचा गलती होते बघा. मी भगवानचा माणस आनी तरास देनार. रेहवांदे. हा माझा कार्ड ठेवा. गरज लागला तर कॉल करा. मी जाते. जय श्रीकृष्ण..." तो इसम उठला आणि मागे जाऊन बसला. घडलेल्या प्रकारामुळे गोंधळलेल्या त्या मुलीने ते कार्ड पर्समध्ये कोंबलं आणि बस सिग्नलला थांबली असताच ती उतरून गेली. तू काय पन कर... नाय तुला माझ्या कंपनीमदी घेतला तर नाव नाय लावनार... हूँ मनिलाल पटेल छूँ मनिलाल पटेल...असा विचार करून तो माणूससुद्धा उतरला आणि त्या मुलीच्या मागे चालू लागला. फुटपाथवरून चालताना त्या मुलीने एकवार मागे पाहिलं. त्या माणसाला पाहून ती अजून घाबरली आणि वेगाने चालू लागली. चालता चालता ती एका बोळात शिरली. तो माणूस काही क्षण तिथेच थांबला. थोडा हसला आणि त्या मुलीपाठी बोळात शिरला...

सकाळचे सात वाजले असतील. रेलचेल अजून सुरू झाली नव्हती. एका फुटपाथवरून साधारण साठीचे एक गृहस्थ त्यांच्या कुत्र्यासोबत चालले होते. त्या कुत्र्याचे, जमीन हुंगणे, थोडेसे गुरगुरणे, एखादा खांब दिसल्यास त्याला अंघोळ घालणे, असे नित्याचे कार्यक्रम सुरू होते. ते गृहस्थ फोनवर बोलत होते, "हॅलो, हो. पैसे कालच ट्रांस्फर झालेत अकाऊंटमध्ये. तुम्ही दिवाळीला येताय ना... तुझी आई तर दाराकडे डोळेच लाऊन बसली आहे. तुझ्या फ्लाईटची वेळ आणि दिवस कळव, मी गाडी पाठवतो..." ते गृहस्थ बोलतच होते की, "भोंऽ... भोंऽ..." ते कुत्रं भुंकू लागलं आणि पुढे पळण्याचा प्रयत्न करू लागलं. ते गृहस्थ काही करतील इतक्यात दोर सोडून ते कुत्रं पळालं... "अरे राजा, थांब रे... माझं पळण्याचं वय राहिलं नाही आता... अरे जरा हळू..." असं म्हणत ते गृहस्थ कुत्र्यामागे जाऊ लागले. कुत्रं एका बोळात शिरलं. काही क्षणात बाहेर येऊन त्या गृहस्थाकडे पाहून भूंकू लागलं. "राजाला काहीतरी सापडलंय बहुतेक... पाहू तरी काय आहे..." असा विचार करून ते गृहस्थ त्या बोळात शिरले. त्या निर्मनुष्य बोळाच्या मधोमध कोणीतरी जमिनीवर पडलं होतं. ते गृहस्थ जवळ गेले आणि त्यांना धक्काच बसला. "खूऽऽन... खूऽऽन... असं ओरडत ते बाहेर पळाले...

ते एका मुलीचं प्रेत होतं. पोलीस तपास सुरू झाला. सब इंस्पेक्टर उमा प्रेत तपासत होत्या. सिनीयर इंस्पेक्टर प्रधान त्या गृहस्थाशी बोलत होते, "फोन तुम्ही केलात ना... सांगा, काय पाहिलंत तुम्ही..." ते गृहस्थ बोलते झाले, "साहेब, माझं नाव माधव गानू. मी इथून जवळंच असलेल्या गंगासागर सोसायटीत राहतो. रोज सकाळी राजासोबत या परिसरात वॉक घ्यायला येतो. आजंही सकाळी आलो. राजा भुंकायला लागला म्हणून येऊन पाहिलं तर हे प्रेत दिसलं. साहेब, गेली पाच वर्ष मी इथे राहतो आहे पण आजवर असं पाहिलं नव्हतं. काही अंतरावरच खाटकाचं दुकान आहे. त्याच्या वासामुळे ह्या बोळात जास्त कोणी नसतंच कधी..." मि. गानू बोलत होते की एस.आय. उमा म्हणाल्या, "सर, डोक्यात गोळी मारली गेली आहे. गोळी लागताच ही मेली असावी. गन सापडली नाही. गोळी अजून आतंच आहे, कारण exit wound नाहीये. मी पर्स चेक केली. यात, काही पैसे आहेत, मुलीचं आयकार्ड आहे, हे बसचं तिकीट आहे, एटिएम कार्ड आहे आणि हे व्हिजिटिंग कार्ड आहे. मृत्यू मध्यरात्री नंतर झाला असावा, कारण Rigor Mortisमुळे बॉडी आखडली आहे..."

सी.इं. प्रधान एकेक वस्तू पाहू लागले, "माधूरी सबनीस, Executive, Capitas Investments. या मुलीच्या ऑफीसचं आयडी कार्ड दिसतंय... हे बसचं तिकीट, पैसे, मोबाईल आणि हे व्हिजिटिंग कार्ड. नाव काय लिहिलंय... मणिलाल पटेल, Its Entertainment... हिच्या मोबाईलवर बारा मिस कॉल्स आहेत पण कीपॅड लॉक आहे. चला, मि. गानूंनी सांगितलेल्या दुकानात चौकशी करू.सर्वजण दुकानाकडे गेले. चौकडीची लुंगी आणि जाळीचा मळकट बनियन घातलेला, भरघोस दाढी असलेला एक इसम तिथे बसलेला होता. पोलीसांना पाहून तो उभा राहिला. काय हो, ह्या खुनाबद्दल तुम्हाला काही माहित आहे का...इं. आनंदने विचारलेल्या प्रश्नावर नकारार्थी मान हलवत तो इसम म्हणाला, “नाय सायेब. मी तर आत्ताच दुकान उघडलं. अजून बोहनी पन नाय केली...सी.इं. प्रधानांनी एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, “ठीक आहे पण काही समजलं, काही आठवलं तर आम्हाला कळवा...आपल्या सहकाऱ्यांकडे वळत म्हणाले, “बॉडी पी.एम.साठी पाठवा. हा मोबाईल आपल्या Tech Expertकडे पाठवा. तो अनलॉक झाला तर अजून माहिती मिळू शकेल. एस.आय. उमा, तुम्ही ह्या मुलीचा फोटो आपल्या रेकॉर्डसशी जुळवून बघा काही मिळतंय का. एस.आय. सचिन, तुम्ही या Capitas Investmentsमध्ये जाऊन माधुरीची अधिक माहिती मिळवा. मी आणि इंस्पेक्टर आनंद या तिकीटाचा माग काढतो. आणि हो, ह्या मणिलाल पटेलला चौकशीसाठी बोलवा... Let’s crack this one..."


एस.आय. सचिन, Capitas Investmentsच्या ऑफीसमध्ये पोहोचले. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीला माधुरीचा फोटो दाखवत म्हणाले, “मी सब इंस्पेक्टर सचिन. ह्या मुलीला ओळखता तुम्ही...रिसेप्शनवरच्या मुलीने फोटो पाहिला आणि ती घाबरली. म्हणाली, “ही तर माधुरी सबनीस. तीनच महिने झालेत हिला इथे जॉईन होऊन... पण ह...ही तर... थांबा मी हिच्या डिपार्टमेंट हेडना बोलावते...तिने कोणालातरी फोन केला आणि क्षणार्धात चार-पाच माणसं समोर आली. त्यातला एक माणूस पुढे येऊन म्हणाला, “हॅलो ऑफीसर, मी आकाश, डिपार्टमेंट हेड, आणि ही माझी टीम... काय झालं सर...एस.आय. सचिन बोलू लागला, “तुमच्या टीममध्ये काम करणाऱ्या माधुरी सबनीसचा काल रात्री खून झालाय. तुम्हाला कोणाला काही माहिती आहे माधुरीबद्दल...

सर्व नाकारात्क मान हलवत होते. आकाश म्हणाला, “साहेब माधुरीने तीनच महिने झाले इथे येऊन. त्यामुळे तिच्याबद्दल जास्त माहिती नाहीये आम्हा कोणाला. आम्हा कोणासोबत ती जास्त मिक्स होत नव्हती. तिची ड्यूटी दुपारी बाराला सुरू होऊन रात्री साडे नऊला संपते आणि कंपनीच्या गाडीने ती घरी जाते. तशी पॉलीसी आहे आमची. पण काल माधुरी ज्या गाडीने गेली ती गाडी वाटेत बिघडली आणि माधुरी बसने पुढे गेली असं मला समजलं. आज अजून ती ऑफीसला आली नाही तर आम्ही तिला फोनच करत होतो की तुम्ही आलात...सचिन म्हणाला, “ठीक आहे. माधुरीच्या घरचा पत्ता द्या. ही बातमी तिच्या घरी पोहोचवायला हवी...रिसेप्शनिस्टने दिलेला पत्ता सचिनने वाचला, “प्रगती वर्किंग वूमन हॉस्टेल, मालवणी, मालाड...

इकडे सी.इ. प्रधान आणि इं. आनंद बस डेपोमध्ये पोहोचले. प्रधान साहेब एका टी.सी.जवळ जाऊन म्हणाले, “मी सिनीयर इंस्पेक्टर प्रधान आणि हे इंस्पेक्टर आनंद. आम्ही एका केसच्या संदर्भात चौकशी करायला आलो आहोत. हे तिकीट बघा. सांगू शकता का याबद्दल...टी.सी.ने ते तिकीट पाहिलं आणि म्हणाले, “हे कालचे ४५९चे रात्री १०च्या बसचे तिकीट आहे. हिरानंदानी ते मालवणी हे अंतर आहे. बसचे चालक आहेत काशीराम आव्हाड पण ते आज सुट्टीवर आहेत. कंडक्टर जाधव इथे आहेत. ते तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतील. थांबा मी त्यांना पाठवतो...काही क्षणात जाधव तिथे आले. त्यांनी ते तिकीट उलट-सुलट करून पाहिलं. म्हणाले, “हो साहेब. हे तिकीट मीच फाडलं आहे. माझ्या शेवटच्या फेरीचं आहे. अरे, हे तर त्याच मुलीचं तिकीट आहे...

साहेब, काल रात्री हिरानंदानीवरून एक मुलगी बसमध्ये चढली. तिने पाचशेची नोट दिली. माझ्याजवळ सुट्टे नव्हते मग तिने दोनशेची नवी नोट दिली. काही वेळानंतर एक चाळीशीचा माणूस बसमध्ये चढला. त्या मुलीला त्रास देऊ लागला. तिने माझ्याकडे तक्रार केल्यावर तो मागे येऊन बसला. ती मुलगी इतकी घाबरली होती की चिंचोली सिग्नललाच उतरून गेली आणि नवल म्हणजे तो माणूससुद्धा तिच्या मागे उतरला...इं. आनंदने दाखवलेला फोटो पाहून जाधव म्हणाले, “साहेब, हीच ती मुलगी. प....पण ही तर...त्याला मधेच तोडत प्रधान साहेब म्हणाले, “खून झाला आहे तिचा काल रात्री पण हे तिकीट ह्याच मुलीचं आहे हे तुमच्या लक्षात कसं...जाधव म्हणाला, “साहेब, आज सात वर्ष झाली मी याच मार्गावर कंडक्टर आहे. हिरानंदानीवर इतक्या रात्री एकटी-दुकटी मुलगी प्रवास करण्याची शक्यता कमीच. शिवाय जी मुलगी दोनशेची नवी नोट देते, तिला कसा विसरेन साहेब...प्रधान साहेब आनंदकडे वळत म्हणाले, “आनंद, यांना चौकीवर घेऊन चल. ज्या मणिलाल पटेलला आपण बोलावलं आहे कदाचित माधुरीला त्रास देणारा तोच माणूस असावा. यांच्या मदतीने ह्या गोष्टीची शहानिशा करू...

सी.इं. प्रधान आणि इं आनंद, कंडक्टर जाधवसोबत चौकीवर पोहोचले तर तिथे एक माणूस आधीच येऊन बसला होता. प्रधानसाहेबांना पाहून सर्व उभे राहिले तसा तो माणूसही उभा राहत म्हणाला, "जय श्रीकृष्ण सायेब... हूँ मनिलाल पटेल छूँ... तुम्मी मला बलवला काय..." तो बोलत असतानाच जाधव त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाले, "साहेब, हाच तो माणूस, काल रात्री त्या मुलीला त्रास देणारा..." प्रधान साहेबांनी एकवार मणिलाल पटेलकडे पाहिलं आणि जाधवकडे वळत म्हणाले, "मि. जाधव, तुमचं काम आत्तातरी झालं आहे. तुम्ही जाऊ शकता. गरज लागली तर पुन्हा तुम्हाला बोलवू. धन्यवाद..." मणिलाल पटेलला फोटो दाखवत म्हणाले, "काय मि. पटेल, ह्याच मुलीचा पाठलाग केलात ना काल... हिचा खून झालाय आणि त्या जाधवनेसुद्धा ओळखलंय तुम्हाला. तेव्हा आता खरं बोला, नाहीतर असा पाठलाग करणं गुन्हा आहे, माहित आहे ना..."

पटेल थोडा घाबरला आणि बोलू लागला, "अरे नाय नाय सायेब, अशा काय पन करू नका. मी सांगते सगडा... त्या छोकरीचा मी पीछा करत होता पन ते तिला जॉब द्यायला. आमच्या eventsमदी आम्माला शुंदर पोरी लागतात. पन अशातशा काम नाय, फक्त मेनेजमेंटवास्ते. मी तीन-चार दिवस तिला फॉलो करते. काल चानस मिडाला वार्ता करायचा. तेचासाठी मी हे छोकरीच्या मागे गेला. बोलात गेला तर हे पोरगी मदीच उभा होता. मी जवड जानार तोच हे पडला. मी पाहिला तर तिचा डोला उघडा आनी माथ्यावर घाव... मी घाबरला आनी पलून गेला..."

पटेल बोलतंच होता की एक हवालदार एक पाकीट घेऊन आला. प्रधान साहेबांनी पाहिलं तर तो पोस्ट मॉर्टम रिपोर्ट होता...
Type of death: Unnatural.
Cause of death: Fatal injury to forehead by bullet.
Hit distance: 20 ft. approx.
Make: 0.32 calibre.
Time of death: Between 23.30 to 0.00.

प्रधान साहेबांनी रिपोर्ट वाचला आणि पटेलकडे वळत म्हणाले, "मला सांगा, तुम्ही बोळात शिरलात तेव्हा तुम्हाला गोळी चालण्याचा आवाज आला का...ह्यावर पटेलने नकारार्थी मान हलवली. सी.इं. प्रधान म्हणाले, “मि. पटेल, हा रिपोर्ट सांगतोय की खून त्याच दर्म्यान झाला ज्या वेळी तुम्ही त्या मुलीचा पाठलाग करत होता. तुम्ही सध्यातरी जाऊ शकता पण आम्ही बोलवू तेव्हा इथे यावं लागेल..." पटेल गेला आणि एस.आय. सचिन आला. म्हणाला, "सर, मी Capitasमध्ये जाऊन आलो. माधुरीनं तीनच महिन्यांपूर्वी कंपनी जॉईन केल्याने तिथे कोणाला फारशी माहिती नाही. माधुरी हॉस्टेलवर राहते. तिथे तिच्या रुममेटकडे, नीलमकडे चौकशी केली तेव्हा समजलं की माधुरीचे वडील हयात नाहीत आणि तिची आई नागपूरला असते. झडतीमध्ये तिचं आधार कार्ड सापडलं ज्यावर नागपूरचा पत्ता आहे..."

सी.इं. प्रधान बोलू लागले, "हा मणिलाल पटेल लंपट दिसत असला तरी तो खून करेल असं वाटत नाही कारण पी.एम रिपोर्ट सांगतो गोळी पुढून चालवली गेली. या फोनमधले बारा मिस कॉल्स नीलम नावाच्या मुलीचे होते. सचिनने सांगितल्याप्रमाणे नीलम ही माधुरीची रूममेट होती. बाकी फोनमध्ये काही संशयास्पद नाही, काही नंबर्स, काही मेसेज...प्रधान साहेब बोलत असताना एस.आय. उमा म्हणाली, “सर, हा फोटो आपल्या रेकॉर्डसमध्ये आहे. नागपूरची खुनाची केस आहे, पण मुलीचं नाव नाही दिलेलं. Complaint करणारे आहेत डॉक्टर प्रभू, अभय हॉस्पिटल, नागपूर. तक्रार दोन वर्षांपूर्वीची आहे. खूनी अद्याप पकडला नाही गेला...डॉक्टर प्रभू हे नाव ऐकताच प्रधान साहेबांना आठवलं की माधुरीच्या फोनमध्ये सुद्धा एक नंबर डॉक्टर प्रभू म्हणून सेव्ह केला होता. शिवाय माधुरीच्या घरचा पत्ताही नागपूरचाच होता. ते म्हणाले, “जर डॉक्टर प्रभूंनी दोन वर्षांपूर्वी ह्या मुलीच्या मर्डरची केस नोंदवली होती तर ही मुलगी काल कशी मेली... एकाच मुलीचा दोन वेळा खून... इं. आनंद आणि एस.आय. उमा, तुम्ही नागपूरला जा. डॉक्टर प्रभूंना भेटून केसचे डिटेल्स घ्या. ती केस हाताळणाऱ्या ऑफीसरला भेटून अधिक माहिती मिळते का बघा आणि आधार कार्डवरच्या पत्त्यावर जाऊन माधुरीच्या आईला ही बातमीही द्या...


आनंद आणि उमा नागपूरला पोहोचले. माधुरीच्या घरी गेले. एका महिलेने दार उघडलं. उमाने त्यांची ओळख करून देताच त्या महिलेने दोघांना आत घेतलं. उमा म्हणाली, “तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. आम्हाला माधुरीचं प्रेत सापडलंय...हे ऐकून ती महिला खुर्चीत कोसळली आणि ओक्सा-बोक्षी रडू लागली. तिला शांत करत असताना उमाला टेबलवर ठेवलेला एक फोटो दिसला. फोटो एका मुलीचा होता. आनंदने फोटो उचलला आणि ती महिला म्हणाली, “ही माझी माधुरी...दोघं गोंधळली. ही जर माधुरी आहे, तर मुंबईत जिचं प्रेत मिळालं ती मुलगी कोण...?” हा विचारच करत होती की ती महिला पुन्हा बोलती झाली, “काय तिचं नशीब आहे हो... आधी तो अपघात आणि आता हे...दोघांनी कान टवकारले. ती महिला बोलत होती, “दोन वर्षांपूर्वी माधुरीचा भीषण अपघात झाला होता. तेव्हा मी एका विपश्चन्ना केंद्रात होते त्यामुळे मला ही खबर मिळू शकली नाही. अभय हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार झाले आणि एका नव्या चेहऱ्यासह माधुरीला नवं आयुष्य मिळालं. या धक्क्यातून माधुरीला सावरायला वर्षाहून जास्त काळ गेला. नव्याने आयुष्य सुरू करायचं म्हणून माधुरीने मुंबईत नोकरी पत्करली. सहा महीनेही नव्हते झाले आणि...ती महिला पुन्हा रडू लागली. तिचं सांत्वन करून माधुरीचा खरा फोटो घेऊन दोघं बाहेर पडली...

आनंद आणि उमा अभय हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर प्रभू, ह्या मुलीला ओळखता तुम्ही...?” माधुरीचा खरा फोटो दाखवत आनंदने विचारलं. डॉक्टर प्रभूने नकारार्थी मान हलवली तेव्हा उमाने माधुरीचा आत्ताचा फोटो दाखवला. डॉक्टर प्रभू म्हणाले, “हिला कसा विसरेन मी. नाव माहित नाही पण दोन वर्षांपूर्वी ह्याच मुलीची डेड बॉडी इथे आणण्यात आली होती. खून असल्याने आधी मी पोलीसांना कळवलं. इंस्पेक्टर जगताप ही केस हाताळत होते. त्याचवेळी एक accident caseसुद्धा आली होती. मुलीचा चेहरा पूर्ण खराब झाला होता. आम्हाला emergency operation करावं लागणार होतं. अपघातीत मुलीची काही ओळख न पटल्याने इं. जगतापांच्या परवानगीने तिला त्या मेलेल्या मुलीचा चेहरा दिला...डॉक्टर प्रभूंना धन्यवाद करून आनंद आणि उमा बाहेर पडले आणि थेट पोलीस चौकीवर गेले. इं. जगतापांनी हवी असलेली सर्व माहिती पुरवली. शिवाय मृत मुलीच्या हातात अडकलेला एक कापडाचा तुकडाही दिला. काळाच्या ओघात जुनाट झालेल्या त्या कपड्यावर “YS ies” अशी धूसर अक्षरे होती आणि दोन मासोळ्यांची चित्र होती...

कदाचित खुन्याशी झालेल्या झटापटीत हा तुकडा त्या मुलीच्या हातात आला असेल... जगतापसाहेब, तुम्ही ह्याचा तपास नाही केला...आनंदने विचारलेल्या ह्या प्रश्नावर जगताप थोडे गोंधळले. म्हणाले, “साहेब, आता दोन वर्षांपूर्वीची गोष्ट ही... झाली असेल चूक... पण आता तुम्ही आलात ना... करा की तपास तुमच्या परीने...आनंदला जगतापचं हे बोलणं फारसं आवडलं नाही. त्याने ताबडतोब कपड्याचा फोटो काढून प्रधान साहेबांना पाठवला. तिथे सचिनने तो फोटो नेटवर चेक केला आणि “AYS Fisheries, Goa” हे नाव समोर आलं. सचिनने आनंदला फोन करून ही माहिती देताच आनंद जगतापला म्हणाला, “बघा साहेब, त्यावेळी जरा मेहनत घेतली असती तर त्या मुलीचा खूनी कधीच पकडला गेला असता... पण... असो...आनंद आणि उमा तिथे निघून गेले. इकडे प्रधान साहेब म्हणाले, “ह्या केसमध्ये हाती लागलेला हा एकमेव पुरावा. आता हाच आपल्याला खुन्यापर्यंत पोहोचवेल...

सी.इं. प्रधान आणि त्यांचे सहकारी गोव्याला पोहोचले. AYS Fisheriesमध्ये जाऊन माधुरीचा आत्ताचा फोटो रिसेप्शनवर दाखवला पण समोर उभ्या असलेल्या मुलीने नकारार्थी मान हलवली. इतक्यात चहाचा ट्रे घेऊन जाणाऱ्या एका माणसाची नजर फोटोकडे गेली, “अरे, जेनी मॅडम...त्याचा आवाज ऐकून सर्वांनी कान टवकारले. तो माणूस बोलू लागला, “साहेब, जेनी मॅडम तीन वर्षांपूर्वी इथे काम करत होत्या. एक दिवस अचानक त्या यायच्या बंद झाल्या. याहून जास्त मला काही माहित नाही. हो, पण आमचे मॅनेजरसाहेब सागू शकतील त्यांच्याबद्दल...तो माणूस बोलत असताना एक सूट घातलेला माणूस समोर आला. म्हणाला, “Excuse me... आपण कोण...? आणि काय काम आहे...प्रधान साहेबांनी स्वत:ची ओळख करून देत फोटो दाखवला तर तो माणूस म्हणाला, “सर, ही तर जेनी आहे. आमच्याकडे रिसेप्शनिस्ट होती. तीन वर्षांपूर्वी तिने कामावर येणं अचानक बंद केलं. सर आम्ही तिला खूप फोन केले पण काही समजू शकलं नाही. सर आम्हाला complaint करायची होती पण एका रिसेप्शनिस्टमुळे कंपनीची बदनामी होऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो. AYS Fisheriesमधून मिळालेला जेनीचा पत्ता प्रधान साहेबांनी वाचला, “Welma Dcruz, 302, Velmonte, Old Church Road, Goa...”

एस.आय. उमा आणि सी.इं. प्रधान जेनीच्या घरी पोहोचले. एका महिलेने दार उघडले. उमा म्हणाली, “नमस्कार, मी सब इन्स्पेक्टर उमा आणि हे सिनीयर इन्स्पेक्टर प्रधान. आम्ही मुंबईवरून आलो आहोत. तुमच्या मुलीबद्दल, जेनीबद्दल चौकशी करायची आहे...जेनीचं नाव ऐकताच ती महिला म्हणाली, “नाव घेऊ नका तिचं ह्या घरात. आमचा धर्म, घराची इज्जत, सर्वकाही सोडून ती पळून गेली तिथेच ती मला मेली. रघुवीर नावाच्या एका मुलावर म्हणे तिचं प्रेम होतं आणि तिला त्याच्याशी लग्नही करायचं होतं. कोण कुठला रघुवीर... एकतर तो Christian नव्हता. चला हे मी विसरले असते पण ना त्याच्या घराण्याचा काही ठिकाणा आणि ना रहायला स्वत:चं घर... कुठल्यातरी कंपनीच्या outhouseमध्ये रहायचा. मी कसं हो म्हणणार होते... पण जेनी प्रेमात आंधळी झाली होती. मी नाही म्हणाले तेव्हा माझ्याशी भांडण करून ती घर सोडून निघून गेली. त्यानंतर आजपर्यंत ना ती मला भेटायला आली ना तिने मला कधी फोने केला...उमाने एकवार प्रधान साहेबांकडे पाहिलं आणि त्या महिलेला म्हणाली, “Mrs. Dcruz, I am sorry to say, Jennie is dead… दोन वर्षांपूर्वी नागपूरला तिचं प्रेत सापडलं. काहीच ओळख पटली नसल्याने तुमच्यापर्यंत बातमी पोहोचू शकली नाही...हे ऐकून ती महिला कोलमडली. तिला उमाने सावरून बसवलं आणि जेनीच्या खोलीची झडती घेऊ लागली. काही वेळात ती बाहेर आली. तिच्या हातात एका पुस्तकात ठेवलेला एक फोटो होता. त्या महिलेला फोटो दाखवून हाच रघुवीर असल्याची शहानिशा करून घेतली. फोटो पाहून प्रधान साहेबांना काहीतरी सुचलं. त्यांनी जवळ पडलेल्या पेनसिलीने फोटोवर काहीतरी खरवडलं आणि त्यांना धक्का बसला...


प्रधानांनी ताबडतोब मुंबईला संपर्क साधला. म्हणाले, “हॅलो, आनंद, तू आणि सचिन ताबडतोब चिंचोली बंदरला जा. दुकानात बसलेल्या ज्या माणसाशी आपण बोललो त्याला उचला. त्याच्या दाढी-मिशा खोट्या आहेत. तो सुटता कामा नये...” फोन बंद झाला. आनंद आणि सचिन लगेच निघाले. दुकानाशी पोहोचले तर ते बंद होतं. आजू-बाजूला विचारलं तर लोक म्हणाले, “साहेब हे दुकान त्याच दिवसापासून बंद आहे जेव्हा इथे खून झाला आणि तुम्ही चौकशी केलीत. सचिनने कुलूप तोडलं आणि दोघं आत गेली. सगळीकडे मांसाचा वास येत होता. शोध घेताना आनंदला एका ठिकाणी टेबलाखाली पोकळी असल्यासारखं जाणवलं. त्याने जोर लावला तर दार उघडलं आणि एक जिना दिसू लागला. ते एक छोटंसं तळघर होतं. मांसाचा कुबट वास सगळीकडे पसरला होता. दोघांनी आजूबाजूला पाहिलं तर त्यांना सफेद पावडरीचे कण सापडले. तपास केला तेव्हा लक्षात आलं की ती ड्रग्स होती. आनंद आणि सचिन ताबडतोब बाहेर आले. आनंदने कंट्रोल रूमला संपर्क साधून प्रधान साहेबांनी पाठवलेले दोन्ही फोटो सर्व राज्यातल्या चौक्यांमध्ये, विमानतळावर, बस थांब्यावर, जेट्टीवर नावासकट प्रसिद्ध करायला सांगितलं. त्याला खात्री होती की जनमानसांपैकी कोणीतरी नक्कीच मदत करेल...

तसं झालंही. दोन दिवसांनी फोन आला. रघुवीरसारखा दिसणारा एक माणूस मालगुंडला दिसला होता. इं. प्रधान आणि त्यांचे सहकारी मालगुंडला पोहोचले. रघुवीर ज्या घरात दडला होता ते घर शोधून काढलं. आत जाणार तोच रघुवीर आणि त्याच्या माणसांनी घरातून गोळीबार सुरू केला. इं. प्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या हिमतीने सामना केला. गोळ्यांचं धुमशान सुरू होतं. रघुवीरचा एकेक माणूस मारला गेला. रघुवीरने शेवटचा प्रयत्न म्हणून एस.आय. उमाला वेठीस धरून पाळण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण तो पकडला गेला. चारही पोलीस अधिकाऱ्यांच्या गराड्यात फसलेल्या रघुवीरने अखेर तोंड उघडले, “हो साहेब. मीच रघुवीर आहे. मीच मारलं जेनीला. आजपासून चार वर्षांपूर्वी मी गोव्यात रहायचो. तिथे माझं आणि जेनीचं जमलं. वर्षभर आम्ही एकमेकांसोबत फिरलो. ती Christian, शिवाय मला रहायला घर नाही, म्हणून जेनीची आई आमच्या लग्नाला परवानगी देत नव्हती. मग एक दिवस आम्ही तिथून पळालो आणि नागपूरला येऊन लग्न केलं. सर्वकाही छान चालू होतं पण दोन वर्षांपूर्वी एक गडबड झाली. जेनीला माझ्या ड्रग्सच्या धंद्याचा सुगावा लागला. ती पोलिसात जायला निघाली. मी तिला वाटेत पकडलं आणि गळा दाबून तिला मारून टाकलं. घाईघाईत परत जात असताना वाटेत एका मुलीला माझ्या गाडीने उडवलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मुलीला पाहून मला वाटलं ती मेली. तिला कोणी ओळखू नये म्हणून झाडावर तिचा चेहरा आपटून खराब केला आणि तिथून निघून गेलो. मी नागपूर सोडलं आणि मुंबईत आलो. खाटकाच्या दुकानाची आड घेऊन ड्रग्सचा व्यवसाय करू लागलो...

मार्वे बीच वर माल उतरवून घेत असताना एक दिवस मला जेनी दिसली. मी घाबरलो. तिचा पाठलाग केला. जेनी दुपारी पवईला जायची आणि रात्री उशीरा मालवणीला परत यायची. मला वाटलं कदाचित जेनी विसरली असावी किंवा मी इथे आहे हे तिला माहित नसावं. मी निर्धास्त होऊन माझा धंदा करू लागलो पण जेनीचा पाठलाग सोडला नाही. त्याही दिवशी मी तिच्या मागावर होतो. मला वाटलं ती जाईल तिच्या वाटेने पण जेनी मधेच उतरली. ती माझ्या दुकानाच्या जवळ पोहोचली तेव्हा मी पकडला जाईन अशी मला भीती वाटली आणि मी तिच्यावर गोळी झाडली...” सगळं ऐकून घेत इं. प्रधान म्हणाले, “रघुवीर, जेनी तेव्हाच, मेली जेव्हा दोन वर्षांपूर्वी तू तिला मारलंस. आत्ता तुझ्यासमोर आलेली मुलगी जेनी नव्हती तर तू गाडीने ज्या मुलीला धडक दिलीस ती मुलगी म्हणजे माधुरी होती. योगायोग बघ. दोन्ही मुलींना एकाच हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं जिथे plastic surgeryच्या सहाय्याने माधुरीला जेनीचा चेहरा दिला गेला. दुसरा योगायोग म्हणजे माधुरी त्याच भागात आली जिथे तू तुझा ड्रग्सचा धंदा करत होतास. जेनीच्या खुनाच्या वेळी तू सुटलास पण ह्या योगायोगानेच तुझा घात केला. रघुवीर, गुन्हेगार कितीही अट्टल असला, तरी त्याने केलेला गुन्हा कधीही लपून राहत नाही...”

समाप्त.

No comments:

Post a Comment