Sunday, October 8, 2017

ईर्षा...

“सुजाता, या जन्मात आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. पण लक्षात ठेव, आम्ही पुन्हा जन्म घेऊ आणि त्यावेळी आमचं प्रेम सफल होण्यावाचून कोणीही रोखू शकणार नाही... तू ही नाही... प्रभाकर..........” मीरा खडबडून जागी झाली. ए.सी. असूनही तिला दरदरून घाम फुटला होता. मीराची विचारमालिका सुरू झाली, “पुन्हा तेच स्वप्न... कोण आहेत हे सगळे... माझ्याशी काय संबंध त्यांचा... का मला हेच स्वप्न पडतंय...” मीरा भानावर आली तिला येणाऱ्या फोनमुळे. दुसऱ्या बाजूला शशांक होता, “अगं काय मीरा, किती फोन करायचे तुला... कॉलेजच्या पहिल्याच दिवशी दांडी मारायची आहे का... चल, आटप लवकर. मी खाली वाट बघतो आहे...” फोन बंद झाला. मीराने पटापट आवरलं आणि खाली आली. बाईकवर बसलेला शशांक तयारच होता. मीरा येताच दोघं निघाले. मीरा पूर्ण रस्ताभर गप्प गप्प होती. कॉलेजजवळ पोहोचताच शशांकने बाईक थांबवली. मीराकडे वळत म्हणाला, “काय झालं... पुन्हा तेच पाहिलंस का...”

शशांकचा हात धरत मीरा म्हणाली, “हो ना रे... पुन्हा तेच स्वप्न पाहिलं मी... एक खूप मोठं झाड आहे. त्याला पानं, फुलं काही नाही. पाऊस आणि विजांमुळे ते झाड जास्तच भयानक दिसतंय. झाडाच्या समोर जमिनीवर एक माणूस पडलेला आहे. त्या माणसाच्या पोटात खंजीर खुपसलेला आहे. एक मुलगी त्या माणसाच्या बाजूला बसलेली आहे आणि एक मुलगी दुसऱ्या बाजूला उभी आहे. ती बसलेली मुलगी म्हणते, “सुजाता, या जन्मात आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. पण लक्षात ठेव, आम्ही पुन्हा जन्म घेऊ आणि त्यावेळी आमचं प्रेम सफल होण्यावाचून कोणीही रोखू शकणार नाही... तू ही नाही... प्रभाकर..........” अशी किंचाळून त्या माणसाच्या पोटात खुपसलेला खंजीर काढून स्वत:च्या पोटात खुपसते... शशांक, अरे मी हे स्वप्न रोज पाहते, पण आजपर्यंत मला कोणाचाच चेहरा दिसलेला नाही. सर्वकाही धुसर दिसतं...” शशांक तिला दिलासा देत होता की गेटजवळ एक रिक्षा थांबली...

एक सुंदर मुलगी रिक्षातून उतरली. तिला पाहून शशांक बोलायचं सोडून तिच्याचकडे पाहत बसला. शशांक बोलायचा बंद झालेला पाहून मीराने त्याच्या बघण्याच्या दिशेकडे पाहिलं तर ती रिक्षातून उतरणारी मुलगी त्यांच्या जवळ येऊन ठेपली होती. म्हणाली, “हाय... मी कॉलेजमध्ये नवीन आले आहे. मला जरा प्रिंसिपॉल सरांचं ऑफीस दाखवता प्लीज...” शशांकच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तो भारावल्यासारखा तिच्याकडे बघत होता. ती मुलगी शशांकच्या डोळ्यांसमोर हात हलवत म्हणाली, “एक्सक्यूज मी... जरा प्रिंसिपॉल सरांचं ऑफीस...” शशांक काही बोलणार इतक्यात मीरा पुढे आली. म्हणाली, “प्रिंसिपॉल सर ना... पहिल्या मजल्यावर डाव्या हाताला.” ती मुलगी गोड हसली आणि मार्गस्थ झाली. शशांक तिला जाताना मान वळवून वळवून पाहत होता. मीराने तिला हटकलं, “महाशय, म्हटलं आपली एंगेजमेंट झाली आहे बरं का...” हे ऐकून शशांक जरा लाजल्यासारखा झाला आणि दोघं हातात हात घालून लेक्चरला निघून गेली...

लेक्चर हॉलमध्ये मीरा तिच्या मैत्रिणींमध्ये बसली होती तर शशांक आपल्या मित्रांसोबत होता. लेक्चर सुरू होतं. सर्व शांतपणे ऐकत असताना, “सर, मे आय कम ईन...” सर्वांचं लक्ष दाराकडे गेलं. शशांक आणि मीराला भेटलेली तीच मुलगी दारात उभी होती. प्रोफेसरने परवानगी देताच ती मुलगी आत आली आणि मोकळी जागा बघून बसली. लेक्चर पुन्हा सुरू झालं. शशांक अडून अडून मीराच्या दिशेकडे बघत होता. मीराही सारखी शशांककडे पाहत होती आणि मधूनच हसत होती. काही क्षणातच तिच्या लक्षात आलं, की शशांक तिच्याकडे नाही तर तिच्याच मागे बसलेल्या त्या मुलीकडे पाहत होता. लेक्चर संपलं. ती मुलगी बाहेर गेली. शशांकसुद्धा तिच्या मागे गेला. तो इतक्या गडबडीत गेला, की मीरा त्याला बोलवत आहे याकडेही त्याचं लक्ष नव्हतं. ती मुलगी लायब्ररीत बसली होती. शशांक जाऊन तिच्या बाजूच्या खुर्चीवर बसला. ती मुलगी गोड हसली. शशांक उत्तरला, “सॉरी, मगाशी तुला पत्ता सांगू शकलो नाही. खरंतर तुला पाहून... असो... मला वाटतं आपण याआधी भेटलो आहोत.” त्या मुलीच्या मोठ्या झालेल्या डोळ्यांकडे पाहत शशांक म्हणाला, “नाही, नाही तसं नाही... सिरीयसली... मला वाटतंय आपण याआधीही भेटलो आहोत...” ती मुलगी हसली. म्हणाली, “तुला खरं सागू... मलाही तसंच वाटतंय... बाय द वे... मी निशा.” असं म्हणत त्या मुलीने हात पुढे केला...

शशांकने निशासोबत हस्तांदोलन केलं आणि स्वत:चं नाव सांगितलं. दोघांमध्ये स्मितहास्याची एक फेरी झाली आणि “हाय... मी मीरा...” असं म्हणत मीरानेही हात पुढे केला. निशाने हसत तिच्याशी हस्तांदोलन केलं. मीरा पुढे म्हणाली, “निशा... नाईस नेम... मी मीरा आणि हा शशांक... शशांक जिथे जिथे जातो, मी satelliteसारखी त्याच्यावर नजर ठेवते बरं का... आणि हो, currently we are happily engaged...” हे ऐकून निशाच्या भुवया उंचावल्या. तिने दोघांचंही अभिनंदन केलं. म्हणाली, “अरे वाह... congrates... पहिल्याच दिवशी इतके छान मित्र आणि मैत्रीण आणि त्यांची इतकी छान बातमी... पार्टी तो बनती है ना... उद्या शनिवार आहे. करुयात का पार्टी... त्यानिमित्ताने आपली मैत्री अजून बहरेल...” शशांकला ही कल्पना आवडली. त्याने लगेच होकार देऊन टाकला. बाजूला उभ्या असलेल्या मीराच्या चेहऱ्यावरचे बदलेले रंग त्याला दिसत होते पण त्याने दुर्लक्ष केलं. निशाशी ओळख करून घेताना मीरा जे काही बोलली होती ते शशांकला फारसं आवडलं नव्हतं...

शनिवार उजाडला. आज लेक्चर्समध्ये कोणाचंही विशेष लक्ष नव्हतं. तिघंही वाट पाहत होते ती संध्याकाळची. कॉलेज संपलं आणि शशांकने, मीरा आणि निशासोबत क्लबची वाट धरली. कोपऱ्यातल्या एका टेबलवर तिघं बसली. गप्पांची एक फेरी संपली आणि शशांक कॉल्ड ड्रिंक्स आणायला निघून गेला. काही क्षण शांततेत गेले आणि निशाने स्वर काढला, “काय गं मीरा, तुम्हा दोघांची भेट कुठे झाली सांग ना... प्रेमविवाह असेल ना तुमचा...” मीरा हसली. म्हणाली, “हो. गेली पाच वर्ष ओळखतोय आम्ही एकमेकांना. एफ.वाय.ला आमची भेट झाली. आधी भेट, मग ओळख आणि मग मैत्री. पण मैत्रीची जागा प्रेमाने कधी घेतली ते कळलंच नाही. आमच्या घरी समजलं तेव्हा तर मोठा गहजब झालाय असंच वाटत होतं. घरच्यांच्या समाधानासाठी आम्ही साखरपुडा केला खरा पण सर्वांना साफ सांगितलं की हे शेवटचं वर्ष आहे. डिग्री हातात आल्याशिवाय लग्न नाही करणार. शशांकचे आई-बाबा तर...” मीरा बोलत असताना शशांक वेटरसोबत आला. कोल्ड ड्रिंक्सचे तीन ग्लास टेबलवर ठेवले गेले. शशांकने एक ग्लास उचलला आणि निशासमोर धरत म्हणाला, “Cheers to Nisha, our new friend…” निशा हसली. शशांकचं हे वागणं मीराला खटकलं. “हा... तर निशा, मी काय म्हणत होते...” मीरा पुढे काही बोलणार इतक्यात शशांकने निशाला डान्ससाठी विचारलं. शशांक आणि निशा डान्स करत असताना पाहून क्लबमध्ये बदलणाऱ्या रंगांप्रमाणे मीराच्या चेहऱ्याचे रंग बदलू लागले...

थोड्या वेळाने डान्स करून थकलेले शशांक आणि निशा टेबलवर येऊन बसले. निशा ग्लासमधला एक घोट घेणार इतक्यात मीराने तिला कोपर मारले. तशी पूर्ण ग्लास निशाच्या ड्रेसवर उलटला. “अरे... सॉरी सॉरी. चुकून धक्का लागला गं. चल तुला washroom दाखवते...” असं म्हणत मीरा निशाला घेऊन गेली. काही वेळा गेला. दोघी येत नाहीत म्हटल्यावर शशांक उठला आणि त्या गेल्या त्या दिशेकडे वळला. समोरून मीरा एकटीच येत होती. शशांकने तिला निशाबद्दल विचारलं तर ती म्हणाली, “अरे निशाला कोणाचातरी फोन आला आणि ती गडबडीत निघून गेली. चल आपणही जाऊ. उशीर होईल नाहीतर...” “अशी कोणाला न सांगता निशा निघून जाईल अशी तर ती वाटत नाही. मला नुसतं जाते म्हणाली असती तर... घरी जाऊन तिला फोन करावा हेच बरं...” शशांकने मीराला गाडीत बसवलं आणि दोघं निघाली. वाटेत मीराला कंठ फुटला, “काय रे... कालची आलेली निशा... खूप friendly वागत होतास तिच्याशी... cheers काय, डान्स काय... काही वेगळा विचार करू नकोस बरं का... नाहीतर आत्ता जे केलं त्याहून मोठं काहीतरी करेन बघ...” शशांकने गाडी थांबवली. म्हणाला, “आत्ता जे केलं... काय केलंस तू मीरा...” शशांकला काहीतरी आठवल्यासारखं झालं. तो म्हणाला, “मीरा... निशा कुठे आहे... बोल मीरा...” मीरा कुत्सित हसली. शशांक समजला. “Damn you मीरा...” असं म्हणत त्याने गाडी क्लबच्या दिशेने वळवली...

क्लबला पोहोचताच शशांकने एका स्त्री वेटरला washroomचा रस्ता विचारला आणि तिला सोबत चालण्याची विनंती केली. पाठोपाठ मीरा येतंच होती. शशांक तिथे पोहोचला तर बाहेरच्या दारावर, “Closed due to maintenance…” अशी पाटी लावली होती. ती स्त्री वेटर म्हणाली, “असं कसं होईल... आम्ही साफ सफाई सकाळीच करतो. आणि तासाभरापूर्वी ही पाती इथे नव्हती...” शशांकला खरा प्रकार समजायला वेळ नाही लागला. दार उघडून शशांक आणि ती वेटर दोघं आत गेली. आत मिट्ट काळोख होता. कुठूनतरी मुसमुसण्याचा आवाज येत होता. शशांकने मोबाईलचा प्रकाश मारला तर कोपऱ्यात अंगाची मुटकूळी करून कोणीतरी बसलं होतं. शशांकने निशा अशी हाक मारताच निशाने डोकं वर उचललं. शशांकला पाहताच ती उठली आणि धावत येऊन तिने शशांकला मिठी मारली आणि तिथेच निशाची शुद्ध हरपली. शशांकने एकवार मीराकडे पाहिलं आणि निशाला उचलून घेऊन गेला. शशांकने निशाला गाडीत बसवलं. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. निशा शुद्धीवर आली. म्हणाली, “सॉरी शशांक. माझ्यामुळे पार्टीचा बेरंग झाला. मीराने मला washroomमध्ये सोडलं. मी आत गेले तर सगळे दिवे बंद झाले. मी मीराला शोधायला वळले तर दार आपोआप बंद झालं. शशांक, मला अंधाराची खूप भीती वाटते रे आणि माझ्या पोटात दुखायला लागतं. काय करावं सुचेना... मी तशी कोपऱ्यात बसून राहिले... हे कसं झालं, मला खरंच माहित नाही...” शशांक निशाला दिलासा देत होता आणि मनात म्हणत होता, “मला समजलंय निशा, हे कशामुळे झालं...”

सकाळ झाली. मीरा तयार होऊन शशांकची वाट पाहू लागली. पण शशांक आलाच नाही. मीरा समजून गेली. ती लगेच कॉलेजला गेली. आवारात शशांक निशाशी बोलताना तिला दिसला. मीरा जवळ गेली. तिला काहीतरी बोलायचं आहे हे निशाला समजलं. शशांकला बाय करून ती प्रयोगशाळेकडे निघून गेली. मीरा काही बोलणार इतक्यात शशांकच म्हणाला, “मीरा, काल तू जे केलंस ते चुकीचं होतं. आणि त्याबद्दल जर तू माफी मागायला आली असशील तर निशाची माफी माग, कारण तू तिची खरी गुन्हेगार आहेस.” मीरा प्रयोगशाळेत गेली. निशा तिच्या प्रयोगात मग्न होती. मीरा म्हणाली, “सॉरी निशा. काल जे काही झालं ते घडायला नको होतं बघ. पण काय करू गं मी. शशांकला आजवर दुसऱ्या कोणत्याच मुलीसोबत पाहिलं नाही मी. तुम्हा दोघांना डान्स करताना पाहून मला राग आला आणि त्याभरात हे सगळं घडलं. सॉरी हा...” निशा हसली. म्हणाली, “जाऊ देत. झालं ते झालं. सोडून दे तो विचार. आणि मला माहित आहे शशांक चिडलाय तुझ्यावर. मी समजावेन त्याला. आपण उद्या field tripला जातोय ना, तिथे त्याची समजूत घालू. काळजी करू नकोस हं...” मीरा हसली आणि निशाला बाय करून निघून गेली. जाताना मात्र मीराच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. ती मनात म्हणत होती, “Field tripची तर मीही वाट बघते आहे निशा. आमच्यामध्ये येतेस काय... तुला शशांकपासून कायमचं दूर करण्याचा माझा बेत तिथेच पूर्ण होणार आहे...”

सकाळी शशांक मीराला घेऊन कॉलेजला पोहोचला तर बस तयारच होती. निशासुद्धा येऊन जागेवर बसली होती. सर्वजण हळू हळू जमले आणि बस निघाली. गाणी, अंताक्षरी यांच्या संगतीनं प्रवास चालू होता. शशांक अंताक्षरीमध्ये सारखा निशाला मदत करत होता आणि मीरामात्र तिचा राग आतल्या आत ढकलत होती. बस जंगलाजवळ पोहोचली. सर्वजण आपापल्या कामाला लागले. खडकात दडलेले विविध कीटक वेचणे, वेगवेगळ्या पानांची आणि फुलांची माहिती करून घेणे हे सर्व चालू होते. मीरा निशाजवळ जाऊन म्हणाली, “निशा, चल आपण जरा आत जाऊया... आपल्याला अजून वेगवेगळ्या वनस्पती पहायला मिळतील...” निशाला मोह आवरता आला नाही. दोघी गप्पा मारत जंगलात जाऊ लागल्या. बरंच आत गेल्यावर निशा म्हणाली, “अगं मीरा, आपण गप्पांच्या ओघात कुठे आलो कळतंच नाही गं...” मीरा हसली. म्हणाली, “आपल्याला नाही... तुला कळत नाहीये निशा... काय गं... कोण समजतेस तू स्वत:ला... शशांकला समजावशील... आणि तो ऐकेल तुझं... का म्हणून... परवा शशांक मधे आला नसता तर तू तिथेच अडकून पडली असतीस... पण आता नाही... तुला इथेच बांधून मी परत जाईन. येतानाचा मार्ग मी बरोब्बर लक्षात ठेवला आहे. आता तू प्राण्यांचं तरी भक्ष्य बनशील किंवा तहान-भुकेने तरी मारशील.” असं म्हणून हातातली जाड पर्स मीरा निशाच्या डोक्यावर मारणार इतक्यात शशांकने तिचं हात धरला...

“मीरा, मला अंदाज होताच, की तू अशी कशी काय सुधारशील... मी तुमच्या मागावरच होतो. मला वाटलं कदाचित तुला खरोखरच पश्चात्ताप झालाय. पण नाही मीरा... आता तर तुझ्यावर प्रेम केल्याची लाज वाटते मला...” शशांकच्या या बोलण्याने जास्तच दुखावलेली मीरा म्हणाली, “लाज वाटते... शशांक, तुला माझी लाज वाटते... आपण गेली पाच वर्ष ओळखतो एकमेकांना. आजवर आपल्यात कधीही भांडण झालं नाही आणि काल आलेल्या या निशामुळे तू माझ्यावर ओरडलास... म्हणून मला हिला सोडायचं नाहीये. निशा, तुझ्यामुळे माझा शशांक माझ्यापासून दुरावत चाललाय. हे मी सहन नाही करणार. तुला आमच्या आयुष्यातून जावंच लागेल...” मीरा बोलत असतानाच बाजूला पडलेला लाकडाचा ओंडका तिने उचलला आणि निशाला ती मारणार इतक्यात जमीन दुभंगली आणि निर्माण झालेल्या दरीत शशांक, मीरा आणि निशा कोसळले. अकस्मात बसलेल्या धक्क्याने तिघांचीही शुद्ध हरपली. काही वेळाने तिघांनाही जाग आली. अवती-भोवती अंधार होता. बाजूला पडलेल्या दगडांना एकमेकांवर घासून शशांकने ठिणगी निर्माण केली आणि पडलेल्या पाचोळ्यावर टाकली. जाळ निर्माण झाला. त्या प्रकाशात समोरच्या भिंतीवर अडकवलेली मशाल त्याला दिसली. शशांकने मशाल पेटवली. तिघंही आजू-बाजूला नजर फिरवू लागले. शशांक, मीरा आणि निशा जिथे होते, तो एखादा महाल असावा. जुन्या पद्धतीच्या भिंती, त्यावरचं नक्षीकाम, झरोखे, सगळं कसं राजमहालासारखं भासत होतं. सभोवार पाहता पाहता एका भिंतीवर असलेल्या दोन तैलचित्रांनी तिघांचं लक्ष वेधून घेतलं. शशांकने मशाल जवळ नेली आणि चित्रे पाहून तिघंही अवाक झाले...

दोन्ही चित्रातले चेहरे हुबेहूब मीरा आणि निशासारखे दिसत होते. मीराचा चेहरा असलेल्या चित्राखाली विशाखा हे नाव लिहिलं होतं पण चित्र फाडल्यासारखं वाटत होतं तर निशाचा चेहरा असलेल्या चित्राखाली सुजाता असं लिहिलं होतं. दोन्ही चित्रांच्या मधोमध एक पुस्तक आणि एक कट्यार ह्या वस्तू ठेवल्या होत्या. शशांकने ते पुस्तक उचललं आणि वाचू लागला, “हा ग्रंथ तुम्ही वाचताय म्हणजे आज तुम्ही या वास्तूत पोहोचला आहात. हा वसंत महाल आहे. फार वर्षांपूर्वी सुंदरगढ संस्थांचे राजे, महाराज प्रतापसिंह यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीसाठी, राजकन्या विशाखा हिच्यासाठी हा वसंत महाल बांधला होता. राजकन्या विशाखा आणि तिची जिवलग मैत्रीण सुजाता दोघी या महालात खेळायच्या, एकमेकींसोबत इथे वेळ घालवायच्या. राजकन्या विशाखा रूपवान आणि देखणी होती तिथेच सुजाता गरीब आणि दिसायलाही सामान्य होती. असं असूनही या दोघींमध्ये घनिष्ट मैत्री होती. या दोघींमध्ये कधीच वाद किंवा भांडण झाले नव्हते. प्रजेला आणि स्वत: महाराजांना या गोष्टीचा हेवा वाटायचा…”

मधली पानं अस्पष्ट असल्याने शशांकने काही पानं उलटली. एका पानावर त्याची नजर स्थिरावली, “या दोघींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती चित्रकार प्रभाकरमुळे. ही दोन्ही चित्रे प्रभाकारनेच रेखाटली होती. चित्राचे काम सुरू असताना प्रभाकर आणि विशाखा एकमेकांच्या प्रेमात पडले. सुजाताला हे मान्य नव्हते कारण तीही प्रभाकारवर भाळली होती असे सांगितले जाते. त्या तिघांमध्ये काय झालं ते कोणालाच ज्ञात नाही. ही चित्रे रंगवल्यानंतर काही दिवसातच प्रभाकरने आणि राजकन्या विशाखाने त्यांचे प्राण गमावले. प्रभाकर आणि विशाखाच्या मृत्युला सुजाता जबाबदार आहे हे समजल्यावर प्रजेने सुजाताला देहांताची शिक्षा दिली. त्यानंतर या महालासकट सुंदरगढ संस्थानालाही उतरती कळा प्राप्त झाली आणि काळाच्या ओघात हा महाल जमिनीखाली दडवला गेला...”

शशांक वाचायचा थांबला. तिघंही नि:शब्द होऊन एकमेकांकडे पाहत होते. “म्हणजे मागच्या जन्मात मी राजकन्या विशाखा होते आणि ही सुजाता होती. हिच्यामुळे माझा मृत्यू झाला होता तर. मागच्या जन्मी सुजताच्या रुपात हिने प्रभाकरला माझ्यापासून तोडलं आणि आता निशा बनून तुला माझ्यापासून लांब नेऊ पाहते आहे शशांक...” मीरा जीवाच्या आकांताने बोलत होती, “निशा, मागच्या जन्मी तुला मिळालेली देहांताची शिक्षा कमी होती म्हणून तू परत आलीस... मागच्यावेळी तू यशस्वी झालीस खरी पण आता नाही. मी तुला जिंकू देणार नाही...” असं म्हणत मीराने चित्रांच्या पुढे ठेवलेली कट्यार उचलली आणि निशावर धाऊन गेली. शशांक निशाच्या बाजूलाच उभा होता. मीरा हल्ला करणार इतक्यात लख्ख प्रकाश पडला. तिघांचेही डोळे दिपले. प्रकाश नाहीसा झाला तेव्हा निराळंच दृष्य समोर आलं. अवती-भोवती महाल नव्हता, तो ग्रंथही नव्हता. होतं ते एकही पान शाबूत नसलेलं एक झाड. झाडाच्या डाव्या बाजूला शशांक आणि निशा उभे होते तर उजव्या बाजूला हातात कट्यार घेतलेली मीरा उभी होती. तिघंही विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या झाडाकडे पाहत होते. काही क्षणातच झाडाचा बुंधा उघडला गेला. लख्ख प्रकाशाचा एक झोत तिघांचे डोळे दिपवून गेला. डोळे उघडल्यावर त्यांना दिसला तो वसंत महाल...

“अगं सुजाता, पहा बरं... बाबांनी माझ्यासाठी किती सुंदर महाल उभारलाय... अहाहा...! किती सुंदर ते नक्षीकाम...” राजकन्या विशाखा महालासमोर उभी राहून सुजाताशी बोलत होती. सुजातासुद्धा डोळे भरून महाल पाहत होती. म्हणाली, “हो की गं... महाराजांचं खूपच प्रेम हो तुझ्यावर... एखादं छानसं नाव दे की या महालाला...” विशाखा हसली. म्हणाली, “येणाऱ्या वसंताची चाहूल घेऊन आलाय हो हा महाल... आजपासून या महालाला वसंत महाल असे संबोधले जाईल... तुझा काय बरं होरा सुजाते...” सुजाताने मान डोलावली. दोघीही हातात हात घालून नाचत नाचत महाल फिरू लागल्या. “महाराजांचा विजय असो...” या लालकारीने दोघी बाहेर आल्या. पहारेकऱ्यासह एक माणूस समोर उभा होता. विशाखा आणि सुजाता समोर येताच पहारेकरी म्हणाला, “राजकुमारीजी, ह्यांचं नाव प्रभाकर आहे. हे फार मोठे चित्रकार आहेत. या महालात तुमचं चित्र असावं अशी महाराजांची इच्छा आहे. सुजाताला प्रभाकर बघताक्षणीच आवडला पण विशाखा समोर होती म्हणून ती काही बोलली नाही. विशाखालाही मनापासून वाटत होतं की आपलं छानसं चित्र असावं. चित्र लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्यात काही व्यत्यय येऊ नये म्हणून महाराजांनी प्रभाकरला तिथेच राहण्याची परवानगी दिली. सकाळी सजून-धजून विशाखा प्रभाकरसमोर बसायची आणि प्रभाकर त्याची कला पणाला लावायचा. प्रभाकर आणि विशाखाच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था सुजाता बघायची. हाच नित्याचा कार्यक्रम असायचा...

हळू हळू विशाखा सुजातापासून दूर होत गेली आणि तेच प्रभाकारवर मोहित होऊ लागली. सुजातामात्र विशाखाच्या या वागण्याने उदास झाली. तिनेही प्रभाकरला तिचे चित्र काढण्याची विनंती केली. सकाळी प्रभाकर विशाखाचे चित्र रेखाटायचा आणि संध्याकाळी सुजाताच्या चित्राचे काम करायचा. एकदा प्रभाकरसमोर बसलेली सुजाता म्हणाली, “प्रभाकर, बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. माझे मन तुमच्यावर जडले आहे. मनापासून प्रेम आहे माझे तुमच्यावर. प्रभाकर हसला. म्हणाला, “सुजाता, तुमच्या मनाला मी आडवू इच्छित नाही, पण माझ्या मनात कोणीतरी आधीच घर केलं आहे. मी आज एक पत्र लिहून तिच्या खोलीत ठेऊन आलो आहे. आता उत्तराची प्रतीक्षा...” प्रभाकर निघून गेला. सुजाता विचार करत बसली आणि विशाखा धावतच तिच्याजवळ आली. “सुजू, सुजू आज मी खूप आनंदात आहे... अगं हे बघ... प्रभाकरने मला पत्र लिहिलं आहे. ते इथे आल्या दिवसापासून माझ्या मनात भरलेत आणि आज त्यांनी माझं मन ओळखलं. उद्या आपल्या दोघांची चित्रे पूर्ण होतील. मी उद्याच बाबांना प्रभाकरबद्दल सांगणार आहे...” विशाखा खूप खुशीत दिसत होती. ती निघून गेली आणि सुजाताच्या रागाचा पारा अजून चढला. “का ही विशाखा आजही माझ्या मार्गात आली... प्रभाकर मला मनापासून आवडतात पण ही विशाखा... हरकत नाही. उद्या जेव्हा महाराजांना समजेल तेव्हा ते स्वत:च प्रभाकारना राज्याबाहेर काढतील. मग मी त्यांना मदत करेन आणि त्यांच्या मनात स्थान मिळवेन...” असा विचार करून सुजाता मनोमन सुखावली आणि झोपी गेली...

सकाळी पूर्ण लव्याजम्यासह महाराज प्रतापसिंह वसंत महालात आले. विशाखा आणि सुजाता यांची तैलचित्रे पाहून ते खूप खुश झाले. त्याची कोणतीही एक इच्छा पूर्ण करण्याचे वचन महाराजांनी दिले. प्रभाकरने एकवार विशाखाकडे पाहिलं आणि तो महाराजांना म्हणाला, “महाराज, तुम्हाला माझं काम पसंत पडलं ह्यात मला आनंद आहे. महाराज क्षमा असावी. लहान तोंडी मोठा घास घेत आहे, पण आपल्या कन्येवर, राजकन्या विशाखावर माझे मनापासून प्रेम आहे आणि त्यांच्याशी विवाह व्हावा ही इच्छा आहे...” हे ऐकून विशाखा लाजून लाल झाली आणि सुजाताला मात्र कुत्सित हसून फुटले. ती विचार करू लागली, “आता प्रभाकरचं काही खरं नाही. महाराज त्याला चांगलीच शिक्षा देतील आणि मग मी त्यांना जवळ करेन...” सुजाताच्या विचारांची मालिका भंग झाली महाराजांच्या बोलण्याने, “प्रभाकर, तुम्ही एक उत्तम चित्रकार आहात आणि तुमच्या मनातली गोष्ट स्पष्टपणे मांडून तुमचा खरेपणाही सिद्ध केलाय तुम्ही. तुम्ही पूर्ण केलेल्या या चित्रांची बक्षिसी म्हणून ही कट्यार मी तुम्हाला देत आहे, आणि तुमच्या खरेपणासाठी तुमच्या आणि विशाखाच्या विवाहास मी अनुमती देत आहे. येत्या पुनवेला हा सोहळा याच वसंत महाली पार पाडण्यात येईल.” प्रभाकरने महाराजांचे पाय धरले आणि विशाखा लाजून आत निघून गेली. सुजातामात्र ईर्षा आणि रागाच्या आगीत जळू लागली...

निजानीज झाली आणि सुजाता प्रभाकरच्या खोलीत आली. झोपायच्या तयारीत असलेला प्रभाकर सुजाताला यावेळी पाहून आश्चर्यचकित झाला. सुजाता म्हणाली, “प्रभाकर, या वेळी मी इथे येणं तुम्हाला आवडलं नसेल कदाचित पण माझा नाईलाज होता. प्रभाकर, अहो विशाखा तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही दिसायला देखणे आहात केवळ म्हणून... उद्या तुमचं वय वाढलं की पहा ती कसा तुमचा छळ करेल. तिचं तुमच्यावर अजिबात प्रेम नाहीये प्रभाकर...” तिचं सर्व ऐकून घेऊन प्रभाकर म्हणाला, “सुजाता, माझी विशाखा तशी नाही. तिचं मन मी वाचलं आहे. नितळ प्रेमाने भरलं आहे तिचं मन. पण तो शुध्दपणा तुझ्याकडे नाही. इथे आल्या दिवसापासून मी पाहतो आहे. तू विशाखाचा द्वेष करतेस... इथेही तू आलीस ते तुझ्या प्रेमासाठी नाही, तर विशाखावरच्या ईर्षेपोटी... नाहीतर स्वत:च्या बालमैत्रिणीसाठी तू असे उद्गार कधीच काढले नसतेस... जितकं प्रेम माझं विशाखावर आहे, आज तुझ्याबद्दल तितकीच घृणा वाटते आहे. निघून जा इथून, तुझं तोंडही पहायची इच्छा नाही माझी...” ऐकताना सुजाताच्या डोळ्यांतून पाणी येत होतं पण तिच्या नजरेतून अंगार बरसात होते. काहीही न बोलता सुजाता तशीच निघून गेली. जाताना दिवाणखान्यात लावलेल्या विशाखाच्या चित्राकडे तीच नजर गेली...

दिवस उजाडला. विशाखा आज खूप खुश होती. आवरून-सवरून बाहेर आली तर समोर मिठाईने भरलेली एक नक्षीदार परात तिची वाट पाहत होती. बाजूलाच उभी असलेली सुजाता म्हणाली, “विशाखा, आज खूप आनंदाचा दिवस आहे, नाही का गं... आपल्या दोघींची चित्र पूर्ण झाली, शिवाय महाराजांनी तुमच्या प्रेमाला अनुमतीही दिली... मग हा दिवस सणापेक्षा कमी का आहे... साजरा नको करायला... घे, तोंड गोड कर...” असं म्हणत सुजाता विशाखाला मिठाई भरवू लागली. इतक्यात प्रभाकर तिथे आला आणि, “राजकुमारी...” अशी कळवळून हाक मारली. आवाजाने विशाखा आणि सुजाता दोघीही थबकल्या. प्रभाकर पुढे होऊन म्हणाला, “विशाखा, नको खाऊस ती मिठाई... कारण ते विष आहे... तुझा घात करण्यासाठी या मिठाईत घातलेलं... तुला ठाऊक आहे हे कृत्य कोणी केलं... ये अशी बाहेर ये दिवाणखान्यात...” दिवाणखान्यात विशाखाला तिचं फाडलेलं चित्र दिसलं आणि तिचे डोळे विस्फारले. प्रभाकर म्हणाला, “तुझं हे चित्र फाडणारी आणि तुझ्या मिठाईत विष मिसळवणारी एकच व्यक्ति आहे... आणि ती...” प्रभाकर अजून काही बोलणार इतक्यात सुजाताने फुलाची कुंडी प्रभाकरच्या डोक्यात मारली. प्रभाकर कोसळला. सुजाता म्हणाली, “विशाखा, तुझ्या जिवाला धोका आहे इथे... हा प्रभाकरच याला कारणीभूत आहे... त्यानेच चित्र फाडलं तुझं... चल, आधी इथून चल...” विशाखाला काही उमगण्याच्या आत सुजाता विशाखाला घेऊन बाहेर पडली...

महालापासून काही अंतरावर असलेल्या टेकडीवर दोघी पोहोचल्या. सुजाता पुढे जात होती की विशाखाने तिला थांबवलं, “थांब सुजाता... मला शंका येऊ लागली आहे... तू म्हणतेस तसं काही प्रभाकर करतील असं नाही वाटत मला... ही गोष्ट इतकी साधी नाही... त्यांना चित्र फाडायचंच असतं तर त्यांनी ते पूर्णच का केलं असतं... आणि ते मला विष का देतील... आमचं एकमेकांवर प्रेम आहे... आमचा विवाह झाला की हे ऐश्वर्य, हे वैभव सर्व त्यांच्या पायाशी लोळण घेत येईल... मग प्रभाकर असं का करतील... नाही सुजाता, तू खोटं बोलते आहेस...” सुजाता वळली. म्हणाली, “मी खोटं बोलते आहे... विशाखा, अगं काल आला तो चित्रकार आणि त्याची जागा तुझ्या मनी इतकी मोठी झाली की मी दिसेनाशी झाले... अशी काय जादू केली त्याने... एक चित्र तर काढलं फक्त... त्या चित्रातही त्याने तुला माझ्याहून सुंदर दाखवलं... म्हणून मी...” सुजाता बोलायची थांबली. विशाखाने लगेच प्रतिप्रश्न केला, “काय म्हणायचं आहे तुला सुजाता... खरं सांग... तूच केलंस ना हे...” सुजाताचा चेहरा रागाने बदलला. ती बोलू लागली, “हो... हो... मीच... फाडलं तुझं चित्र... रात्री चित्राच्या बाजूला ठेवलेल्या प्रभाकरच्या या कट्यारीने चित्रावर वार केले... आपण एकाच दिवशी जन्मलो. तू श्रीमंतीच्या राशीवर विराजमान झालीस, आणि मी... माझ्यावर उपकार म्हणून तू मला जवळ केलंस हे मला कळत नव्हतं असं वाटतं तुला... रुपानं, गुणानं तू नेहमीच उजवी राहिलीस... काय गुन्हा झाला माझा की माझ्या आयुष्यात एकही चांगली गोष्ट घडली नाही... आणि आज, प्रभाकर मला आवडला तर तू त्यालाही स्वत:च्या जाळ्यात ओढलंस... पण आता नाही... याच कट्यारीने मी तुझा अंत करणार...” हे बोलत असतानाच सुजाताने विशाखावर वार केला आणि...

सुजाताने उगारलेली कट्यार विशाखाचे पोट भेदत आरपार जाणार इतक्यात प्रभाकर मध्ये आला आणि विशाखावरचा वार त्याने स्वत:वर झेलला. कट्यारीने तिचे काम चोख बजावले. रक्ताच्या चिळकांडया उडाल्या आणि प्रभाकर जमिनीवर कोसळला. विशाखाने त्याचं डोकं मांडीवर घेतलं, “विशाखा, माझ्या जन्माचं सार्थक झालं. तुझ्यावरचं संकट टळलं...  आता मला अजून काही नको...” प्रभाकरने हे म्हणत असताना डोळे बंद केले. काही क्षण शांततेत गेले आणि विशाखा म्हणाली, “नाही प्रभाकर, मला असे सोडून जाऊ नका... उठा प्रभाकर...” प्रभाकर विशाखाला सोडून खूप दूर निघून गेला होता. अश्रू भरल्या डोळ्यांनी विशाखा सुजाताकडे पाहत म्हणाली, “सुजाता, या जन्मात आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. पण लक्षात ठेव, आम्ही पुन्हा जन्म घेऊ आणि त्यावेळी आमचं प्रेम सफल होण्यावाचून कोणीही रोखू शकणार नाही... तू ही नाही... प्रभाकर..........” विशाखाने आर्त किंकाळी फोडली आणि प्रभाकरच्या पोटातली कट्यार काढून स्वत:च्या पोटात खुपसली. सुजाताला काही कळण्याच्या आत येणाऱ्या लोकांचा आवाज आला आणि सुजाता तिथून पळाली. गावकऱ्यांनी विशाखा आणि प्रभाकरचे मृतदेह तर पाहिलेच पण पळून जाणारी सुजाताही त्यांना दिसली. गावकरी सुजाताच्या मागे पळू लागले. टेकडीच्या टोकाशी येऊन सर्व थांबले. गावकरी तिला पकडणार इतक्यात सुजाताचा पाय घसरला आणि ती दरीत कोसळली...

सर्वकाही गोठलं. रिव्हर्समध्ये सर्व घटना पुन्हा डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या आणि वसंत महालातल्या कालच्या रात्रीत पोहोचल्या. पुन्हा चित्र गोठलं आणि एकेक घटना फॉर्वरड करावी तशी दिसू लागली. चित्र त्याच झाडापाशी येऊन थांबलं. झाडाच्या डाव्या बाजूला प्रभाकर आणि विशाखा उभे होते तर उजव्या बाजूला हातात कट्यार घेतलेली सुजाता उभी होती. काही क्षण गेले आणि लख्ख प्रकाश पडला आणि काळ आजच्या घडीला परत आला. झाडाच्या डाव्या बाजूला शशांक आणि निशा उभे होते तर उजव्या बाजूला हातात कट्यार घेतलेली मीरा उभी होती. झाडाचा बुंधा बंद झाला. मीराने हातातली कट्यार पाहिली आणि निशाकडे पाहून म्हणाली, “म्हणजे... मागच्या जन्मी तू नाही तर मी सुजाता होते... जसा त्रास मी तुला त्यावेळी दिला तसाच आजही दिला... माझ्यामुळे त्यावेळी प्रभाकर आणि विशाखा एक होऊ शकले नाहीत... आणि यावेळी... तेच अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आपल्या दोघींचा पुनर्जन्म झाला. मागच्या जन्मात आणि या जन्मातही, मी खूप चुका केल्या पण आता मी सर्व चुका सुधारणार आहे...” बोलत असतानाच मीराने हातातली कट्यार स्वत:च्या पोटात खुपसली. रक्ताचे तुषार उडाले आणि मीरा कोसळली. शशांक आणि निशा मीरा जवळ जाऊन बसले. निशाचा हात शशांकच्या हातात देत मीरा म्हणाली, “निशा, माफ कर मला... आणि विशाखा तूही मला क्षमा कर... माझ्याकडून राहिलेलं अपूर्ण काम मी पूर्ण करते आहे... देवाने मला माफ करावं हीच इच्छा...” इतकं बोलून मीराने प्राण सोडले...

समाप्त.

No comments:

Post a Comment