"अहो उठा... वाजले बघा किती... ते
टि.व्हीवाले आत्ता येतील... तुम्ही त्यांच्यासमोर असेच घोरत पडणार आहात
का..." विचित्र आवाजात घोरणाऱ्या चिंतामणला त्याची बायको जागं करत म्हणाली.
चिंतामण खडबडून जागे झाले. घड्याळात पाहिलं तर सात वाजून गेले होते. त्यांनी पटकन
आवरलं आणि बाहेर येऊन बसले. चहा संपलाच होता की बेल वाजली आणि कॅमेरा घेऊन दोघंजण
आत आले. एकजण म्हणाला, "Good morning Mr. Chintamani. I'm Sharad and he is Joseph my cameraman. Famous
in a day या कार्यक्रमाचे विजेते झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन..." मि. चिंतामण म्हणाले, "साहेब, माझं नाव
चिंतामणी नाही. चिंतामण निधडे आहे..." शरद हसून म्हणाला, "करायची सुरुवात..." चिंतामणने होकार देताच शरदने कॅमेरा सुरू
करायला सांगितला. शरद बोलू लागला, "Hello
friends. Famous in a day या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात तुमचं
स्वागत. आपण आहोत माहीममधल्या गुलमोहर कॉलोनीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत गेल्या
आठवड्यात झालेल्या स्पर्धेचे विजेते मि. चिंतामण. काय करता तुम्ही मि.
चिंतामण..."
या प्रश्नावर चिंतामण कसेबसे बोलले, "म...मी एल.सी. आपलं ते एल.आय.सी एजंट
आहे..." शरद पुढे बोलू लागला,
"Relax Mr. Chintaman, be natural... तुम्ही आता famous होणार आहात. आम्ही कॅमेरा घेऊन तुमच्यासोबत दिवसभर राहू. तुमच्या कामामध्ये
आम्ही येणार नाही. संध्याकाळी पाच वाजता पॅक-अप होईल. तुमचं आज झालेलं शूटिंग
उद्या आमच्या चॅनलवर दाखवलं जाईल. So, shall we start..." शूटिंग सुरू झालं. चिंतामण खाली उतरले.
डायरी पाहून म्हणाले, "रेमंड सोसायटी, कबुतरखाना, दादर... याची पॉलिसी द्यायची आहे तर..." ट्रेनमधल्या प्रवाशांचे धक्के
आणि शिव्या खात चिंतामण दादरला पोहोचले. रेमंड सोसायटीत पोहोचून चिंतामणने बेल
वाजवली. दार उघडले. मोठालं भोक असलेला पांढरा बनियन व चट्टेरी-पट्टेरी लुंगी
परिधान केलेले आणि रजनीकांतही लाजेल इतपत काळा रंग असलेले एक गृहस्थ दात विचकत
समोर आले. चिंतामणना आत घेत म्हणाले,
"वणक्कम् मि. चिंतामन. आई वाज वैटिंग फर यू... धिस्स क्यामरा...
व्हाई..." चिंतामणने सर्व सांगताच तो गृहस्थ म्हणाला, "अय्यो वेंकटेशा... म्येरेको बताने का ना
जी. मई रेड्डी होता ता ना. मि. क्यामरा ये दिकानेका नई जी..." चिंतामण हसत
म्हणाले, "मि. अय्यर, ही तुमची पॉलिसी घ्या. मी निघतो. अजून
कोणाची पॉलिसी काढायची असेल तर नक्की सांगा बरं का..." मि. अय्यरच्या हातात
एक कव्हर देत चिंतामण बाहेर पडले...
पुन्हा त्यांनी डायरी पाहिली. “भागवत चाळ,
अलंकार टॉकीजसमोर, परळ...” हा पत्ता वाचून चिंतामणने डोक्याला हात
मारून घेतला. “अरे देवा,
या म्हाताऱ्याकडे जायचं आहे होय... जाम कटकट आहे डोक्याला... चला, कामाला लागू...” मि. चिंतामण बसने अलंकार टॉकीजला उतरले.
बारा वाजत आले होते
त्यामुळे गेटजवळ सिनेमा बघायला आलेल्या प्रेक्षकांची वर्दळ दिसत होती. गर्दीतून
रेटा-रेटी करत ते पुढे जात असताना एका माणसाला त्यांचा धक्का लागला. सॉरी म्हणून
चिंतामण पुढे रवाना झाले. भागवत चाळीत जाऊन त्यांनी एका दाराची कडी वाजवली. पांढरा
नेहरू शर्ट आणि आकाशी पैजामा घातलेला एका वृद्ध माणूस दार उघडत म्हणाला, “या... आलात... पंचारतीनेच ओवाळतो आता...” चिंतामणला हसू आलं तर अजून चिडत ते आजोबा
म्हणाले, “वरून हसताय...
अहो वाजले किती... तुम्हाला अकराला यायला सांगितलं होतं ना... हा कॅमेरा...” शूटिंग सुरू आहे हे लक्षात येताच, “आ...अरे मि. चिंतामण... य...या की बसा...
अहो तुम्ही आलात... मी गेलो असतो की हफ्ता भरायला... असो... आलाच आहात तर हा घ्या
हफ्ता... अगं ए... लवकर सगळ्यांना कळव... आपण टी.व्ही.वर येणार आहोत... अहो
कॅमेरावाले, जरा इथे पहा
ना... हे पहा आमचं घर आणि ही माझी पत्नी... अगं नमस्कार कर सगळे पाहत आहेत ना...” शरदने चिंतामणला इशारा केला तसे त्यांनी
त्या वृद्धाच्या हातात असलेले पैसे घेतले आणि नमस्कार करत मागे फिरले. “अहो अहो थांबा जरा. माझा मुलगा जरा बाहेर
गेलाय. तो आला की त्यालाही घ्या की टी.व्ही.वर...”
त्या आजोबांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सर्वजण दिसेनासे झाले...
खाली आल्यावर शरदने विचारले, “कुठे जायचंय आता...” चिंतामण म्हणाले, “आता आधी महालक्ष्मी आणि मग वाळकेश्वर की
झालं. दोन्ही ठिकाणी मला पॉलिसी मिळण्याची शक्यता आहे. वाळकेश्वरला तो हिरो आहे ना
अमर कुमार त्यांच्याकडे... माझी मुलगी भारी चाहती हो त्याची...” हे म्हणून चिंतामण पुढे निघाले. शरद आणि
जोसेफ मागेच होते. महालक्ष्मीला रेसकोर्सजवळ पोहोचले. चिंतामणने एकाला फोन लावला.
थोडं बोलून सर्व रेसकोर्सच्या आत गेले. समोर काही घोड्यांची दौड सुरू होती. बहुतेक
सराव असावा. एक माणूस खुर्चीत बसला होता. लाल पँट, निळ्या-पिवळ्या फुलांचा शर्ट, निळ्या काचा असलेला गोगल आणि आपले पेठेही
लाजतील इतके दागिने घातलेला तो माणूस या ठिकाणी जरा अजबच वाटत होता. शरद आणि जोसेफ
जरा मागूनच शूट करू लागले. चिंतामण त्या माणसाच्या जवळ जाताच तो उठून म्हणाला, “या या मि. चिंतामण. तुमचीच वाट पाहत
होतो. मला कृष्णपिंगाक्षचा विमा करायचा आहे. कृष्णपिंगाक्ष माझा जीव की प्राण आहे
हो... बँकेत खातंही सुरू करायचं आहे पण तूर्तास तरी विम्याने सुरुवात करावी म्हणून
तुम्हाला...” चिंतामणने लगेच
फॉर्म काढला. जुजबी माहिती भरून झाल्यावर चिंतामणने आवश्यक कागद मागितले तर तो
माणूस लगेच म्हणाला, “अहो डॉक्यूमेंट
वगैरे काही नाहीत. फक्त फोटो मिळेल...”
चिंतामणने फोटो पाहिला तर एक नाक फेंदारलेल्या काळ्या घोड्याचा तो फोटो
होता. चिंतामणने त्या व्यक्तीला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला पण तो अडूनच
बसला. त्याचे दोन बॉडीगार्ड्स चिंतामणला विमा काढायला सांगू लागले. कसा बसा
चिंतामण तिथून सटकला...
घामाघूम झालेला चिंतामण थोडा स्थिरावला.
स्वत:शीच पुटपुटत म्हणाला, “काय तरी माणसं
असतात... म्हणे घोड्याचा विमा... आणि नाव काय तर कृष्णपिंगाक्ष... ही पॉलिसी तर
गेली. आता वाळकेश्वरला तरी काहीतरी हाती लागेल माझ्या...” टेक्सीने सर्व वाळकेश्वरला पोहोचले. एका
आलिशान बंगल्याजवळ थांबले. रिसेप्शनवर बसलेल्या एक सुंदर मुलीकडे चिंतामण आ वासून
पाहू लागले. “Yes
sir, may I help you…” या तिच्या
उद्गारांनी ते भानावर आले. म्हणाले,
“अमर कुमारांना भेटायचं आहे. कालच आमच्या साहेबांशी बोलणं झालं. त्यांचा
विमा...” चिंतामण हे बोलत
असताना, “Sorry
come again…” हे त्या मुलीचे
शब्द त्यांच्या कानी पडले. त्यांना समजलं की ह्या बयेला मराठी येत नाही. चिंतामण
लगेच त्यांच्या मोडक्या-तोडक्या हिंदीत म्हणाले,
“वो अमर कुमार को मिलनेका है. मेरे साहेबसे बोलणं हुआ ना फोन पे. वो पॉलिसी
उतारनेका है...” हे ऐकताच त्या
मुलगी डायरी पाहून म्हणाली, “Mr.
Chintaman, right… Please have a seat. Mr. Amar Kumar will see you in a while…” त्या मुलीच्या
गोड शब्दांनी चिंतामण पाघळलेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. शरद आणि
जोसेफ हसू लागले तशी चिंतामण म्हणाले,
“हे टी.व्ही.वर दाखवू नका बरं का... आमची मंडळी तुम्हाला माहित नाहीत....” हे बोलत असताना सव्वा सहा फूट उंचीचा, सूट घातलेला एक देखणा तरुण समोर येत
म्हणाला, “Hello
Mr. Chintaman. I was expecting you. मि. पाटीलसे बात हुई थी कल. मेरी एक करोड
की पॉलिसी करानी है. मै फॉर्म साईन कर देता हू. बाकी आप भर लिजिये और जरुरी
डॉक्यूमेंट बाहर मेरी सेक्रेटरीसे ले लेना...”
चिंतामणला अवाक्षर बोलू न देता अमर कुमार सह्या करून निघून गेला. मागून
सर्व कागद एकत्र करत चिंतामणसुद्धा निघाले. चार वाजत आले होते. शरदने चिंतामणला
परत निघायला सांगितलं. पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. चिंतामणना त्यांच्या घरी
सोडून शरदने “Pack-up…” हे उद्गार काढले
आणि कॅमेरा बंद झाला...
“मी उभी आहे मनोरंजन चॅनलच्या इमारतीसमोर
जिथे तुम्ही बघू शकता की इमारतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, काचा तुटल्या आहेत, गाड्यांनाही आग लावण्यात आली आहे. २६/११
नंतर पुन्हा झालेल्या या हल्ल्यामुळे मुंबईत भीतीचं सावट पसरलं आहे. कॅमेरामन
सुशीलसह मी रागिणी, ताजी खबर...” सकाळचे नऊ वाजले होते. अशा बातम्यांनी
मनोरंजन चॅनलच्या इमारतीचा परिसर दुमदुमून निघाला होता. अनेक वृत्तपत्रांचे व
वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, सामान्यजन आणि पोलीस यांनी सर्व परिसर गजबजला होता. याला कारणही तसंच होतं.
मनोरंजन चॅनलच्या इमारतीवर हल्ला झाला होता. जी परिस्थिती बाहेर होती, आतली त्याहून वेगळी नव्हती. सामानाची
बऱ्यापैकी नासधूस झाली होती. जमिनीवर तुटलेल्या काचांचा सडा पडला होता. भिंतींवर
अनेक ठिकाणी छोटी छोटी छिद्र पडली होती जी तिथे झालेल्या गोळीबाराची साक्ष देत
होती. इंस्पेक्टर आनंद, सब इंस्पेक्टर
सचिन आणि सब इंस्पेक्टर उमा पुरावे
गोळा करत होते. सिनीयर इंस्पेक्टर प्रधान चॅनलच्या मालकाशी व इतर स्टाफशी बोलत
होते, “मि.
कुलकर्णी, तुम्ही मालक
आहात या चॅनलचे... काही माहित आहे का तुम्हाला या हल्ल्याबद्दल...” कुलकर्णी
नकारार्थी मान हलवत म्हणाले, “साहेब हा हल्ला रात्री झाला. मला फोन आला
तेव्हा हल्ला होऊन गेला होता. रात्रीचा गार्ड तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकेल...”
बिचकत बिचकत एक गणवेशधारी इसम पुढे येत
म्हणाला, “नमस्कार साहेब, मी दिनेश. माझ्यासोबत सखाराम नाईट
ड्युटीला असतो. काल रात्री साधारण दोन वाजता अचानक गोळीबार सुरू झाला. काचा
फोडल्या गेल्या. आम्हाला काही कळण्याच्या आत बेछूट गोळीबार करत चार-पाच मुखवटेधारी
गुंड आत आले. गोळीबार सुरू ठेवत त्यांनी इथल्या सामानाची, कॉम्प्यूटर्सची आदळ-आपट करायला सुरुवात
केली. मी आणि सखारामने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या आधुनिक
रायफाल्ससमोर आमच्या बंदुका निष्फळ ठरल्या. दोन गोळ्या सखारामलाही लागल्या. काही
वेळाने ती माणसं निघून गेल्यावर मी ताबडतोब साहेबांना कळवलं आणि सखारामला
हॉस्पिटलला पोहोचवण्याची व्यवस्था केली...”
सर्व ऐकून घेत सि.इं. प्रधान म्हणाले,
“मि. कुलकर्णी, तुम्हाला किंवा
तुमच्या स्टाफपैकी कोणालाही धमकीचे फोन किंवा पत्र आली आहेत का... कोणाशी तुमचं
शत्रुत्व आहे का...” पुन्हा नकारार्थी
मान हलवत कुलकर्णी म्हणाले, “नाही साहेब, असं काही नाही. अहो आमचं चॅनल तर सर्व
चॅनल्समध्ये सर्वात लोकप्रिय आहे. फक्त निखळ मनोरंजन हेच आमचं ध्येय आहे. आजवर
कधीही असं झालं नाही आणि आज अचानक अशी घटना... आम्ही नव्या कार्यक्रमाची
सुरुवात करतो काय आणि हा हल्ला होतो काय... हे तर माझ्या
कल्पनेच्या पलिकडचं आहे साहेब...” कुलकर्णी बोलत
असताना प्रधानांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून बाजूलाच उभा असलेला एका माणूस
म्हणाला, “सर, मी सांगतो...”
सर्व त्याच्याकडे पाहू लागले. तो माणूस
बोलू लागला, “सर, मी मधुकर राऊत, चॅनलचा प्रमोशनल हेड. सर, आजपासून आमचा “Famous in a Day…” हा अनोखा कार्यक्रम सुरू होणार होता. यात
एका स्पर्धेतल्या भाग्यवान विजेत्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत टी.व्हीवर
झळकण्याची संधी मिळते. याच कार्यक्रमाचा पहिला भाग आज प्रसारित होणार होता.
मागच्या आठवड्यात घेतलेल्या स्पर्धेत चिंतामणी नावाचे एक विमा एजंट विजेते ठरले.
काल सकाळी आठपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची त्यांची दिनचर्या आम्ही शूट केली.
आजच्या पहिल्या भागात तेच शुटींग आम्ही दाखवणार होतो पण त्या हल्लेखोरांनी... आमचा
सर्व्हरसुद्धा पार बिघडवला हो त्यांनी. तो रिस्टोर झाल्यावरच तुम्ही पाहू शकाल...” सर्व ऐकून घेत सि.इं. प्रधान म्हणाले, “याचा अर्थ,
त्या शुटींगमध्ये असं काही आहे जे सर्वांपर्यंत पोहोचू नये असं कोणालातरी
वाटतंय. सर्व्हर ठीक होईपर्यंत सचिन,
एक काम कर... त्या प्रथम विजेत्याचा,
मि. चिंतामणीचा नंबर यांच्याकडून घेऊन त्याला इथे बोलवून घे... कदाचित
त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीमधून आपल्या हाती काही लागू शकेल...”
काही वेळात साधारण चाळीशीचा, हाफ शर्ट व पँट घातलेला, जाड भिंगाचा चष्मा लावलेला एक माणूस
आस-पासच्या परिस्थितीचा अंदाज घेत आत येताना दिसला. मि. राऊत यांनी त्याच्याकडे
बोट दाखवत तोच चिंतामणी असल्याचं सांगितलं. सी.इं. प्रधान पुढे झाले. म्हणाले, “तुम्हीच मि. चिंतामणी आहात का...” त्या माणसाने प्रधानांना वरपासून
खालपर्यंत न्याहाळत म्हणाला, “आहो साहेब, मी कालपासून
कोकलून सांगतोय हो... माझं नाव चिंतामणी नाही... मी,
चिंतामण निधडे... पण इथले सगळेजण मला चिंतामणी म्हणतात हो...” सी.इं. प्रधान थोडे हसून म्हणाले, “हा,
ठीक आहे. तुम्हाला इथे बोलवायचं कारण वेगळं आहे. काल तुमचं दिवसभर जे
शूटिंग झालं त्याबद्दल विचारायचं आहे... कालच्या दिवसात काही विचित्र घटना घडल्या
का ते सांगा...” चिंतामणने सर्वांकडे पाहिलं आणि ते बोलू लागले, “साहेब,
कालचा दिवस तर खूप छान होता. फार काही वेगळं घडलं नाही. कबुतर खान्याजवळ
एका मामाशी... सॉरी सॉरी... एका ट्राफिक हवालदाराशी बाची-बाची झाली. त्यांची काही
चूक नाही हो, गर्दीच्या वेळी
मी रस्त्याच्या मधोमध चालत होतो ना... असो... तर,
तिथून पुढे अलंकार टॉकीजजवळ एका माणसाला माझा धक्का लागला. साहेब पण धक्का
लागला तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली. साहेब जिथे माणूस स्वत:ची चूक असूनही ती चूक
दुसऱ्याच्या माथी मारून भांडण उकरून काढतो तिथे तो माणूस माझा धक्का लागूनही शांत
होता. निर्विकार चेहऱ्याने थंड नजरेने माझ्याकडे पाहून मग टॉकीजकडे वळला... बस...
बाकी काही नाही...” सि.इं. म्हणाले, “मि. चिंतामण आत्ता तुम्ही जाऊ शकता पण
अजून काही लक्षात आलं तर आम्हाला जरूर कळवा. “सर, सर्व्हर रिस्टोर
झालाय आपण व्हिडियो पाहू शकतो...” मि. राऊतचा आवाज ऐकताच सर्व प्रोजेक्टरकडे वळले...
व्हिडियो सुरू झाला. मि. चिंतामणने
सांगितल्याप्रमाणे हवालदाराशी झालेली बाचाबाचीही दिसली आणि आणि अलंकार टॉकीजजवळ
मि. चिंतामण व एका माणसाची धडक पण दिसली. व्हिडियो पुढे सरकला. सी.इं. प्रधान पटकन
म्हणाले, “Stop
it… थोडं मागे न्या... अलंकार टॉकीजच्या शॉटला चिंतामणचा धक्का लागला तिथे...” त्या शॉटपासून व्हिडियो पुन्हा स्लो
मोशनमध्ये सुरू झाला. मि. चिंतामणचा धक्का ज्या माणसाला लागला त्याच्यावर कॅमेरा
येताच सी.इं. प्रधान यांनी पुन्हा थांबवून झूम करायला सांगितलं. म्हणाले, “या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं
वाटतंय... पण कुठे...” ते बोलत होते
इतक्यात इं. आनंदला फोन आला, “येस, इं. आनंद
बोलतोय... काय... कधी... बरं आम्ही पोहोचतो... सर... अलंकार टॉकीजमध्ये स्फोट
झालाय...” ऐकून सगळे सुन्न
झाले. सी.इं प्रधान म्हणाले, “What… My God… उमा, तू हा विडीयो घेऊन चौकीवर जा... बघ काही
हाती लागतंय का... आनंद, सचिन... आपण
अलंकार टॉकीजला जाऊ... Let
move…” तिघंही घटनास्थळी
पोहोचले. टॉकीजबाहेर बरीच गर्दी जमली होती. कुजबुज चालू होती आणि भीतीचं वातावरण
पसरलं होतं. गर्दीतून मार्ग काढत सी.इं. प्रधान,
इं. आनंद आणि स.इं. सचिन आत गेले. लोवर बाल्कनीचा पुढचा भाग पूर्ण विच्छिन्न झाला होता. खुर्च्या फाटल्या
होत्या. भिंतींवरसुद्धा काळे डाग दिसत होते. सी.इं. प्रधान सगळीकडे नजर फिरवत
असताना इं. आनंद आणि सब.इं. सचिन कामाला लागले. सचिन म्हणाला, “सर,
आर.डी.एक्स वापरलं आहे. कंट्रोलरने बॉम्ब ट्रिगर केला असावा. बॉम्ब जास्त
मोठा नसावा कारण फक्त या दहा खुर्च्यांचंच नुकसान झालंय. बाकी थोडेफार डाग पडलेत
फक्त. “सर,
याबद्दल मला थोडं बोलायचं आहे...”
आवाजाच्या दिशेने तिघंही पाहू लागले तर
प्रवेशद्वारावरच्या गर्दीतून साधारण २०-२२ वर्षांचा एक मुलगा पुढे येताना दिसला.
प्रधान म्हणाले, “कोण आहेस तू...
काय बोलायचं आहे तुला...” तो मुलगा बोलू
लागला, “सर, मी राहुल. दादरला राहतो आणि
व्ही.जे.टी.आयमध्ये शिकतो. सेकंड इयरला आहे. आज इथे पिक्चर बघायला आलो होतो...” हे ऐकताच आनंद म्हणाला, “यावेळी... पण लेक्चर्स... बंक केलेस
ना... असं करून तू स्वत:चंच नुकसान करतो आहेस माहित आहे ना तुला...” राहुल ओशाळत म्हणाला, “सॉरी सर,
परत नाही करणार...” प्रधान म्हणाले, “ठीक आहे. बोल पुढे...” राहुल बोलता झाला, “सर,
हे थियेटर थोडं आड आहे आणि इथे फक्त डब केलेले इंग्रजी पिक्चर्स लागतात
त्यामुळे इथे जास्त गर्दी नसते. मी मागून दुसऱ्या रोमध्ये बसलो होतो. माझ्यापासून
तीन-चार सीट सोडून एक माणूस बसला होता. दाढी,
गॉगल्स आणि हातात बॅग होती. इंटरव्हलपर्यंत सर्व ठीक होतं. इंटरव्हलनंतर पिक्चर सुरू
झाला तेव्हा तो माणूस जिथे स्फोट झाला तिथे जाऊन बसला. थोड्या वेळात फोन कानाला
लावत तो बाहेर गेला आणि काही क्षणातच स्फोट झाला. त्यानंतर इतकी गडबड झाली की
काहीच समजत नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की त्या धकाधकीत तो माणूस गायब झाला आणि
फोनवर बोलत बाहेर जाताना त्याचे हातही रिकामे होते. सर मला संशय येण्याचं कारण असं
की काही कॉमेडी सीन्स सुरू असतानाही हा माणूस हसत नव्हता. शिवाय पिक्चरऐवजी त्याचं
लक्ष घड्याळाकडे होतं. सर मी त्याच्या नकळत त्याचा फोटो काढला आहे. हा बघा...”
प्रधानांनी तो फोटो पाहताच त्यांना
लक्षात आलं की चिंतामणच्या व्हिडियोमध्ये चिंतामण ज्या माणसावर जाऊन आदळला होता तो
हाच होता. ते म्हणाले, “हा माणूस... हा
तर तोच आहे ना जो त्या व्हिडियोमध्ये पाहिला... तो चिंतामणचा व्हिडियो काल शूट
झाला. रात्री त्या मनोरंजन चॅनलच्या बिल्डींगची
नासधूस झाली आणि आता हा स्फोट... आनंद,
सचिन काही लक्षात येतंय का...”
आनंद आणि सचिनने एकमेकांकडे पाहिलं. सचिन म्हणाला, “सर,
कालचा तो हल्ला आणि आजचा स्फोट,
हे दोन्ही एकाच केसचे दोन पैलू आहेत...”
“Exactly... मलाही हेच म्हणायचं आहे...”
प्रधान हे बोलतच होते की त्यांचा फोन खणखणला... “बोल उमा... काय... ओके... उमाने
व्हिडियोमधून इमेजेस काढून ट्रेस केल्या. आपल्या रेकॉर्ड्समध्ये नाही पण इंटरपोलने
पाठवलेल्या रेकॉर्ड्समध्ये यातला एक चेहरा आहे. तो चेहरा आहे हा...” प्रधानांनी उमाने पाठवलेला फोटो दाखवला.
तो पाहून आनंद आणि सचिन दोघं उडालेच. आनंद म्हणाला,
“सर हा... वसीम खान... अंतरराष्ट्रीय दहशदवादी... हा मुंबईत... सर याचा
अर्थ...” प्रधानांचं उत्तर
तयारच होतं, “अर्थ एकच...
थियेटरमधला स्फोट घडवला गेला आहे. त्या बॉम्बची तीव्रता बघण्यासाठी... मनोरंजन
वाहिनीवर झालेला हल्लासुद्धा वसीम मुंबईत आहे हे कोणाला समजू नये म्हणूनच झाला.
यामागचा सूत्रधार वसीम खानच आहे. खरा बॉम्ब दुसरीकडेच पेरण्यात येणार आहे... किंवा
आत्तापर्यंत बॉम्ब पेरलाही असेल...”
हे बोलत असताना दारातून पत्रकार आत येताना दिसले. प्रधान हसले आणि त्यांना
सामोरे जात म्हणाले, “हा स्फोट कशामुळे
झाला याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. कदाचित कोणीतरी धुम्रपान केलं असेल आणि
त्यामुळे हे घडलं असेल. राहिला प्रश्न मनोरंजन चॅनलवरील हल्ल्याचा तर तीही केस आम्ही लवकर सोडवू. धन्यवाद...”
प्रधान,
आनंद आणि सचिन चौकीवर पोहोचले. त्यांना पाहताच उमा जागेवरून उठली व म्हणाली, “सर,
तो इंटरव्ह्यू... सर तुम्ही वसीम खानबद्दल का नाही सांगितलं...” प्रधान हसले व म्हणाले, “सापाला बिळातून बाहेर काढायचं असेल तर
शक्ती नाही युक्तीचा प्रयोग करावा लागतो. तुझ्या आणि लाखो प्रेक्षकांप्रमाणे वसीम
खाननेही कुठेतरी हा इंटरव्ह्यू पाहिलाच असेल. त्याचं नाव न घेतल्यामुळे तो
निश्चिंत होऊन बाहेर येईल आणि त्याचा मुख्य प्लॅन एग्झीक्यूट करेल. All
of you… आपला सामना एका अशा अतिरेक्यांशी आहे ज्याला शोधणं शक्य नाही. He
is a master of disguise… त्याला फक्त
पकडलं जाऊ शकतं... वसीम खानला पकडायचं असेल तर त्याचा प्लॅन आपल्याला कळायला
हवा... मुंबईत होणाऱ्या सर्व मोठ्या फंशंसची माहिती काढा. वसीम खानचं टार्गेट
यांच्यापैकीच किंवा ते सगळे असावेत...”
सर्वजण कामाला लागले. काही वेळातच प्रधानांना हवी असलेली माहिती मिळाली.
सचिन म्हणाला, “सर, या महिन्यात मुंबईत चार लग्न आणि तीन
वाढदिवस आहेत. पण आज, पनवेलला एक मोठं
फंशन आहे जे आपल्या जवानांच्या गौरवार्थ आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये
आजवर झालेल्या सर्व युद्धांचा आढावा तिथे व्हिडियोद्वारे घेतला जाणार आहे. या
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत कर्नल डोग्रा ज्यांचा कारगील युद्धात सहभाग
होता....” उमा व आनंदने
एकमेकांकडे पाहिलं. प्रधान म्हणाले,
“येस... हेच फंशन... इंटरपोलच्या माहितीत समजलंय की वसीम खानचे वडील आणि भाऊ
कारगील युद्धामध्ये सामील होते आणि याच कर्नल डोग्रांनी पाठवलेल्या बटालियनच्या
हल्ल्यात ते मारले गेले. त्याचाच बदला घ्यायला आलाय हा वसीम खान...”
प्रधानांनी घड्याळ पाहिलं. सहा वाजले
होते. ते म्हणाले, “जर वसीम खानला
स्फोट करायचाय आणि त्याचा उद्देश कर्नल डोग्रा यांना मारण्याचा आहे तर तो नक्कीच
अशी वेळ निवडेल, ज्यावेळी सर्वांचं
लक्ष कर्नल डोग्रांकडे असेल. Come on… We have to get there fast… Lets go…” सार्वजण निघाले. थोड्याच वेळात पोलीस जीप
समारंभाच्या ठिकाणी पोहोचली. सर्वांनी वेषांतर केलं आणि पार्टीमध्ये मिसळून गेले.
प्रधांनांनी दाढी आणि मिशा लावल्या,
आनंद आणि सचिन वेटरच्या वेषात वावरत होते तर उमा पार्टीतल्या
पाहुण्यांप्रमाणे दिसत होती. सर्वांचं लक्ष एकच होतं... वसीम खान... वेळ पुढे सरकत
होती तशी समारंभ रंगात येत होता. चौघांच्याही नजरा चौफेर भिरभिरत आपल्या सावजाला
शोधात होत्या. व्हिडियो सुरू होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या
युद्धांचा आढावा, सैनिकांच्या
मुलाखती सर्व सुरू होते. व्हिडियो संपला. व्यवस्थापकांनी कर्नल साहेबांना मंचावर
बोलावले. ते बोलत असताना एक वेटर पाण्याचा ट्रे धरून मंचावर जाऊ लागला. प्रधानांनी
त्याच्याकडे पाहिलं मात्र, त्यांनी सर्वांना
इशारा केला. एका बाजूने आनंद तर दुसऱ्या बाजूने सचिनने त्या वेटरला घेरलं. समोर
उमा आणि प्रधान पिस्तूल सरसावून उभे होते. प्रधान दरडावतच म्हणाले, “वसीम खान... तू लाख वेष बदलशील पण तुझ्या
हातावरचा मार्क नाही लपवू शकणार. चिंतामणच्या व्हिडियोमध्ये आणि राहुलने काढलेल्या
फोटोमध्ये तुझा हा मार्क स्पष्ट दिसत होता... तुझा खेळ संपला... आम्ही तुला
ओळखलेलं आहे...”
वसीम खान म्हणाला, “तो वो मुलाकात नकली थी... लेकीन जो बॉम्ब
मै लाया हू वो असली है... मेरे वालीद और भाईजान का बदला तो यह बॉम्ब ले लेगा और
साथ ही तुम सब को यह इशारा देगा कि हम अब अंदर तक आ चुके है... सीधी तरह कश्मीर
हमारे हवाले कर दो... वरना तुम्हारी तबाही के जिम्मेदार तुम लोग ही होंगे...
इंशाल्लाह फतेह हमारी होगी..." हे म्हणत असतानाच वसीमने ट्रे फेकला आणि बॉम्ब
ट्रिगर केला. आनंद आणि सचिनने त्याला पकडला पण त्यांना धक्का मारून वसीम खानने
पिस्तूल काढलं. त्याबरोबर समारंभात पसरलेल्या त्याच्या साथीदारांनीही त्यांच्या
रायफल्स बाहेर काढल्या. प्रचंड गोळीबार सुरू झाला. मिळेल त्या रस्त्याने सर्व
बाहेर पळू लागले. वसीमने गर्दीचा फायदा घेत सटकण्याचा प्रयत्न केला. त्याचे सर्व
साथीदार मारले गेले आणि उमा, सचिन, आनंद आणि
प्रधानने वसीमला घेरलं. "अब कुछ नाही हो सकता. टायमर शुरू हो चुका
है..." असं म्हणत वसीमने स्वत:च्या गळ्यात अडकवलेली गोळी तोंडात सरकवली आणि
कोसळला. वसीम मेला होता पण बॉम्ब अजून जिवंत होता प्रधानांनी सर्वांना बाहेर जायला
सांगितलं. चौघंही बॉम्ब शोधू लागले. उमाला टेबलवर ठेवलेल्या कर्नल डोग्रांना
दिल्या जाणऱ्या शील्डमध्ये टिकटिक ऐकू आली. तिने सर्वांना तिथे बोलावलं. ५० सेकंद... प्रधान, आनंद, सचिन आणि
उमा यांनी बॉम्बला घेरलं. वेळ कमी होता त्यामुळे बॉम्ब काढणं शक्य नव्हतं. बॉम्ब
निकामी करण्याचा एकच पर्याय होता. बॉम्बला पाच वायर्स जोडल्या होत्या. आनंदने लाल
वायर कापली पण टायमर दहा सेकंदांनी कमी झाला. ३२ सेकंद... सचिनच्या सांगण्यावर
आनंदने काळी वायर कापली आणि बॉम्ब आणखी दहा सेकंदांनी कमी झाला. १८ सेकंद... उमा
म्हणाली, “या वायर्स
डमी आहेत... वायर तोडली की टायमर कमी होतोय...” प्रधान म्हणाले, “या
पट्ट्याच्या मागे हे बटन आहे... इतक्या गर्दीतही हा बॉम्ब फुटला नाही म्हणजेच याचा
कंट्रोल या बटनात असणार... आनंद... ते बटन प्रेस कर... १ सेकंद राहिला असताना
आनंदने बटण प्रेस केलं. बॉम्बचा टायमर १ सेकंदावर थांबला. सर्वांनी सुटकेचा श्वास
सोडला...
प्रधान वसीमच्या प्रेताकडे पाहत म्हणाले, "वसीम खान, खुदा हो या भगवान... कभी गाद्दरों को मदद नहीं करता..." कर्नल डोग्रा पुढे आले. त्यांनी चौघांचं अभिनंदन केलं. प्रधान म्हणाले, “कर्नलसाहेब... आमच्यासारखे लाखो असतात पण तुमच्यासारखा एखादाच असतो... सीमेचं रक्षण जसं तुमच्या हातात आहे तसंच तुमच्यासह शहरातल्या सर्वांचं रक्षण ही आमची जबाबदारी आहे... पण मला एक गोष्ट समजली नाही... या वसीम खानला जर तुम्हाला मारायचंच होतं तर ते तो कधीही करू शकला असता... आजचाच दिवस का निवडला त्याने...” कर्नलसाहेब हसले. म्हणाले, “प्रधानसाहेब... आज माझा वाढदिवस आहे...” प्रधानही हसले. त्यांच्यासह सर्वांनी कर्नल डोग्रांना शुभेच्छा दिल्या आणि परत निघाले. पाठमोऱ्या प्रधान, आनंद, सचिन आणि उमाला पाहून कर्नल डोग्राने सेल्यूट केलं व तिथे आलेल्या प्रत्येकाने टाळ्यांच्या गजरात चौघांना निरोप दिला...
समाप्त.
No comments:
Post a Comment