सकाळचे सात वाजत
आले होते. गोपाळ दूध घेऊन परतला. दार उघडून आत येताच समोरच्या दृष्याने तो हबकला.
त्याचा रूम पार्टनर रमेश रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. "रमेऽऽऽश..."
गोपाळने रमेशला हाक मारली... तपास सुरू झाला. सब इंस्पेक्टर उमा व सब इंस्पेक्टर
सचिन बॉडी चेक करत होते. इंस्पेक्टर आनंद आजू-बाजूची जागा तपासत होता आणि सिनीयर
इंस्पेक्टर प्रधान गोपाळची जबानी घेत होते, "साहेब, मी बाहेर पडलो तेव्हा व्यवस्थित होता रमेश. परत आलो तर हे असं...” सी.इं प्रधान म्हणाले, "असं तर नाही की तूच खून केलास रमेशचा आणि तो
लपवण्यासाठी हा असा आव आणतो आहेस..." गोपाळ घाबरला. म्हणाला, "नाही हो साहेब. मी का मारेन रमेशला... आमची
चांगली मैत्री होती साहेब..." चौकशी सुरू असताना स.इं. सचिन म्हणाला, "सर, गोळी समोरून मारली आहे. आणि हा बघा एग्झीट वूंड. गोळी इथून आर-पार
गेली आहे..." इं. आनंदला काहीतरी सापडलं. तो म्हणाला, "सर, हे बघा... या भिंतीवर ही गोळी अडकली आहे..." आनंदने गोळी बाहेर
काढली. प्राधानांनी एकवार गोळी आणि प्रेत पाहिलं व म्हणाले, "या माणसाचे पाय खिडकीकडे आहेत, म्हणजे त्याच दिशेने गोळी आली असणार..."
बोलता बोलता त्यांनी खिडकी तपासली तर काचेच्या वरच्या बाजूला गोळीच्या आकाराचं एक
भोक पडलेलं दिसलं. प्रधान हसत म्हणाले, "गोपाळ, तुर्तास तरी तुझ्यावर फक्त संशय आहे. शहर सोडून जाऊ नकोस... उमा, ही बॉडी आणि ही गोळी डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये
पाठव... डॉ. गोखले आपले नवे फॉरेंसिक एक्सपर्ट आहेत. त्यांनी कालच सूत्र हाती
घेतली आहेत...
सर्वजण लॅबमध्ये
पोहोचले. डॉ. गोखले गोळीचं निरीक्षण करत होते. सर्वांना पाहताच डॉ. गोखले बोलू
लागले, “अरे वा... पूर्ण टीम आहे इथे... तुम्हा
सर्वांचे मनापासून धन्यवाद. मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी दिलीत... तर, या रमेशला समोरून गोळी लागली आहे हे बरोबर आहे
पण गोळी वरून खाली चालवली गेली आहे...” रमेशची बॉडी दाखवत ते बोलत होते, “हे बघा... रमेशला इथे छातीत गोळी लागली आहे आणि पाठीतून बाहेर पडली.
पण गोळी लागल्याची जखम आणि बाहेर पडल्याची जखम, या दोन्ही जखमा समांतर नाहीत तर वर-खाली आहेत. ही गोळी १८ एम.एम.
कॅलिबरची आहे. गोळीच्या प्रवासाची रेषा बघता जमिनीपासून साधारण ३२-३३ फूट वरून
गोळी चालवली गेली आहे...” सर्वजण
विचारात पडले. सी.इं. प्रधान म्हणाले, “रमेश चौथ्या मजल्यावर राहतो आणि गोळी जर ३२-३३ फूट वरून चालवली गेली
आहे... म्हणजेच सहावा मजला. रमेशला लागलेली गोळी छातीच्या आर-पार गेली आहे. याचा
अर्थ हे काम एखाद्या निष्णात शूटरचं आहे...” ते बोलतच होते की त्यांचा फोन खणखणला... “सिनीयर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय... काय...
आम्ही पोहोचतोच... टीम, प्रसिद्ध
उद्योगपती नितीश कुमार यांनी त्यांच्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
केली आहे... हा नितीश कुमार नुकताच भारतात आला आहे... आणि इथे येताच त्याने
आत्महत्या करावी... यात काहीतरी गडबड नक्कीच आहे... आनंद, तू आणि सचिन, रमेश राहतो त्या बिल्डींगच्या समोरच्या
बिल्डींगमध्ये जा. मी आणि उमा, नितीश
कुमारच्या घरी जातो...”
सी.इं.प्रधान
आणि स.इं.उमा नितीश कुमारच्या बंगल्यावर पोहोचले. सर्वत्र शांतता होती. एक बाई
सोफ्यावर शून्यात पाहत बसली होती. डॉक्टर तिला तपासत होते. घरातले नोकर
आजू-बाजूलाच उभे होते. सी.इं.प्रधानांना पाहून डॉक्टर म्हणाले, “या सर, मीच तुम्हाला कळवलं. मि. नितीश कुमार याचं प्रेत वरच्या खोलीत आहे.
या त्यांच्या पत्नी. सध्या शॉकमध्ये आहेत.” प्रधान आणि उमा वर गेले. खोलीचा दरवाजा सताड उघडा होता. नितीश
कुमारचं प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. डोक्याच्या दोन्हीबाजूला जखम दिसत
होती. प्रेतापासून काही अंतरावर एक पिस्तूल पडलं होतं. जवळच रक्ताने माखलेला एक
कागदही पडला होता. उमा प्रेत तपासू लागली आणि प्रधान यांनी तो कागद उचलला. त्यावर
लिहिलं होतं,
“कसा आहेस
बंसी... मी रीनू...” प्रधानांनी
तो कागद खिशात ठेवला. उमा म्हणाली, “सर, पॉईंट
ब्लँक अंतरावरून गोळी मारली गेली आहे. हे खाली पडलेलं पिस्तूल आपलं हत्यार असावं.
उजवीकडून गोळी आत शिरून डावीकडून बाहेर पडली आहे. ही बघा या आरशात जाऊन अडकली
आहे...” म्हणता म्हणता उमाने आरशात अडकलेली गोळी काढली.
प्रधानांनी गोळी आणि पिस्तूल पाहिलं व म्हणाले, “मिसेस नितीशकुमार सध्या बोलण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. इथे काय
काय घडलं ते कोणी सांगू शकेल का...” एक मोलकरीण पुढे येत म्हणाली, “सायेब म्या सांगती... सकालधरनं समदं ठीक व्हतं... रोजच्या परमाने
सायेब उठले,
जॉगिंग करून आले, मंग आंघूल झाल्यावर नाश्ता बी घेतला. इतक्यात
त्यासनी कुरियरने एक पत्र आलं. पत्र घेऊन कापडं घालाया सायेब आत गेले. जरा येल
गेला आनी ठो असा आवाज आला... आम्मी समदे हितं आलू तर हे दिसलं...” प्रधान जरा विचार करत म्हणाले,
“Interesting… हा
रक्ताळलेला कागद म्हणजेच ते पत्र असावं... उमा, खोलीत कुठे पाकीट मिळतंय का बघ... ते पाकीट, गोळी, पिस्तूल आणि नितीशकुमारचं प्रेत सर्व डॉ. गोखलेंकडे पाठव...”
इकडे रमेश ज्या
बिल्डींगमध्ये मारला गेला त्याच्या समोरच्या बिल्डींगमध्ये आनंद आणि सचिन पोहोचले.
वॉचमनला सोबत घेत ते सहाव्या मजल्यावर पोहोचले. एका बंद घरासमोर ते थांबले.
शेजाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते घर गुप्ते नावाच्या माणसाचं होतं जे बरीच वर्ष
दुबईत स्थाईक होते. सेक्रेटरीकडून चावी मिळवून सचिनने दार उघडलं. हॉलमध्ये एका
टेबलवर दारूची एक बाटली, एक
ग्लास, एका थाळीत अर्ध खाल्लेलं अन्न होतं. आनंद जरा
दरडावतच म्हणाला, “जर
या फ्लॅटमध्ये कोणीच राहत नाही तर हे सर्व काय आहे...” आनंद बोलत होता इतक्यात सचिनने त्याला खिडकीजवळ
बोलावलं. म्हणाला, “सर, गोळी इथूनच चालवली गेली आहे. ती पहा रमेशच्या
खोलीची खिडकी आणि हे बुलेट शेल...” आनंद पुन्हा सर्व लोकांकडे वळत म्हणाला, “सेक्रेटरी साहेब, या बंद जागेचा उपयोग एका खुनासाठी झालाय... आता
खरं सांगा नाही तर...” सेक्रेटरी
थोडा घाबरत म्हणाला, “सर, मला खरंच काही माहित नाही... चावी माझ्याकडे
असते हे बरोबर आहे पण एक चावी वॉचमनकडेही असते. संध्याकाळी एक बाई घराची सफाई
करायला येते. तिला दार उघडून द्यायला वॉचमन स्वत:जवळची चावी वापरतो...” वॉचमन चांगलाच घाबरला होता. तो पुढे येत
म्हणाला, “साहेब, चावी माझ्याजवळ असते हे खरं पण मी काही केलं नाही हो... ती बाई
संध्याकाळी सहाला येते आणि अर्ध्या तासात जाते. माझी ड्युटी सकाळी सात ते
संध्याकाळी सात अशी आहे. संध्याकाळचा वॉचमन आल्यावर त्याच्याकडे मी चावी सोपवतो.
कालही ती बाई येऊन काम करून गेली पण तेव्हा सर्व व्यवस्थित होतं. मी स्वत: चेक
करून लॉक लावलं होतं...” सचिन
लगेच म्हणाला,
“खून झाला सकाळी
सातच्या आस-पास. या वॉचमनच्या म्हणण्यानुसार संध्याकाळी सर्व ठीक होतं म्हणजे तो
खुनी सात नंतर इथे आला असावा. सेक्रेटरी साहेब, तुमच्या संध्याकाळच्या वॉचमनला ताबडतोब बोलवा... तोच आता सगळं
सांगेल...”
रात्रीचा वॉचमन
येताच आनंदने त्याला रात्री या फ्लॅटमध्ये आलेल्या व्यक्तिबद्दल विचारलं. तो काहीच
बोलत नाही हे दिसल्यावर त्याची गचांडी पकडत आनंद म्हणाला, "या रिकाम्या फ्लॅटचा उपयोग एका खुनासाठी झाला
आहे. जे काही आहे ते खरं सांग, नाही
तर खुनात अडकून फुकटचा फासावर जाशील..." हे ऐकल्यावरमात्र तो वॉचमन चळचळा
कापू लागला. धीर एकवटून बोलता झाला, "साहेब, त्या माणसाबद्दल मला काहीच माहीत नाही. रात्री गस्तीच्या वेळी
मागच्या गेटजवळ त्याने मला अडवलं. मी काही बोलायच्या आत हजार रुपये हातावर ठेवले व
या फ्लॅटची चावी मागू लागला. त्याला एका रात्रीसाठीच हा फ्लॅट हवा आहे व सकाळी
अजून हजार देतो असं तो म्हणाला. एका रात्रीत दोन हजाराची कमाई होते म्हटल्यावर मी
त्याला गपचूप इमरजंसी जिन्यावरून वर घेऊन आलो. वर येताना त्याने सी.सी.टि.व्ही
कॅमेराही बंद केला. सकाळी सात वाजता पुन्हा मागच्या गेटजवळ तो मला भेटला. राहिलेले
हजार रुपये मला दिले व हे कोणाला सांगू नकोस अशी धमकी देत तो झाडीत नाहीसा झाला.
साहेब, याहून जास्त मला काही माहीत नाही हो..."
हे सर्व ऐकून सचिन म्हणाला, "सर, खुन्याने याच फ्लॅटची चावी मागितली. म्हणजे
त्याला माहीत होतं की हा फ्लॅट बंद आहे..." आनंद त्या वॉचमनला सचिनच्या
ताब्यात देत म्हणाला, "सचिन
घेऊन जा याला चौकीवर आणि याच्याकडून त्या माणसाचा चेहरा बनवून घे. ही दारूची बाटली, बुलेट शेल व हे राहिलेलं जेवण डॉ. गोखलेंकडे
पाठव. बघू खुन्याबद्दल काही माहिती मिळते का..."
प्रधान व उमा
डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये पोहोचले. त्यांना पाहून डॉ. बोलते झाले, "हॅलो प्रधानसाहेब. आहो अत्ताच जॉईन केलं मी आणि
एकदम दोनदोन केसेस... असो... आधी आपण नितीशकुमारबद्दल बोलू. या नितीशीकुमारने
पॉईंट ब्लँक रेंजवरून स्वत:वर गोळी झाडली आहे. गोळी उजव्या बाजूने डोक्यात शिरून
डाव्या बाजूने बाहेर पडली आहे. म्हणजे उजव्या हातात त्याने पिस्तूल पकडलं होतं.
इथेच मेख आहे प्रधानसाहेब... नितीशकुमार डावरा आहे... साधारणत: जो हात आपण वापरतो
त्या हातावर खुणा असतात. नितीशकुमारच्या डाव्या हातावर पेनचे डाग दिसत आहेत. शिवाय
ते पाकीटही डावीकडून उजवीकडे कापलं गेलं आहे. पेपरमधला नितीशकुमारचा हा फोटो बघा
ज्यात ते साईन करत आहेत... पेन त्यांच्या डाव्या हातात आहे... असं असताना माणूस
उजव्या हाताने गोळी का झाडेल... शिवाय त्याचे डोळे बघा... बुबुळं पसरली आहेत...
म्हणजेच हिप्नॉसिस... नितीशकुमारने स्वत:वर गोळी चालवावी यासाठी कोणीतरी त्याला
हिप्नोटाईज केलं आहे... प्रधान साहेब, ही आत्महत्या नाही तर खून आहे..."
डॉ. गोखले बोलत
असताना आनंद व सचिन लॅबमध्ये आले. सचिन म्हणाला, "सर, त्या रमेशच्या केसमध्ये वॉचमनने दिलेल्या वर्णनावरून जे स्केच तयार
झालं त्या व्यक्तीला असलेल्या दाढी-मिशा आम्हाला फेक वाटल्या. ते स्केच आपल्या
रेकॉर्ड्समध्ये चेक केल्यावर समजलं की तो..." सचिन पुढे बोलणार इतक्यात डॉ.
गोखले बोलते झाले, "जगन
आहे... प्रधानसाहेब, या
बाटलीवरचे बोटांचे ठसे व या राहिलेल्या अन्नातल्या लाळेचा डि.एन.ए. सांगतोय की
त्या फ्लॅटमध्ये जगनच होता. शिवाय ते बुलेट शेल व रमेशला लागलेली गोळी दोन्ही मॅच
होतात. रमेश ज्या गोळीने मेला ती त्याच फ्लॅटमधून चालवली गेली व जगनही तिथेच होता
हे सिद्ध होतं..." सी.इं.प्रधान विचारात पडले, "हा जगन तर एक काँट्रॅक्ट किलर आहे. पैसे घेऊन
खून करणारा. म्हणजे खरा गुन्हेगार वेगळाच आहे. त्याला शोधायला हवं... दुसरीकडे
नितीशकुमारलाही कोणीतरी हिप्नोटाईज केलं आहे..."
त्यांनी ताबडतोब
आनंद व सचिनला जगनचे सर्व अड्डे पिंजून, त्यांच्या खबऱ्यांची मदत घेऊन जगनला शोधायला सांगितलं. स्वत: उमासोबत
मिसेस नितीश कुमारकडे मोर्चा वळवला. एव्हाना त्या शॉकमधून बाहेर आल्या होत्या, "मिसेस कुमार, मला माहित आहे अशा वेळी काही विचारणं, बोलणं बरोबर नाही. पण मिस्टर नितीश कुमारने
आत्महत्या केली नाही तर त्यांचा खून झाला. आणि गुन्हेगाराला पकडायचं असेल तर
तुम्हाला मौन सोडावं लागेल. मला सांगा, भारतात परतल्यावर तुम्ही कुठे कुठे गेला होता..." हुंदके आवरत
डोळ्यांना पदर लावत त्या बोलत्या झाल्या, "आम्ही थेट मुंबईत येणार होतो पण नितीशला
मेडिटेशनची आवड होती म्हणून ते एयरपोर्टवरून इगतपुरीजवळ एका मेडिटेशन सेंटरमध्ये
गेले आणि मी इथे आले. दहा दिवसांचा कोर्स पूर्ण करून महिन्यापूर्वीच ते मुंबईत आले
आणि काल..." मिसेस कुमार पुन्हा रडू लागल्या तशा तिथे असलेल्या मोलकरणीने
त्यांना आत नेलं. प्रधान उमाशी बोलू लागले, "भारतात दाखल होताच नितीशकुमार इगतपुरीला जातो.
तिथून मुंबईत परत आल्यावर महिन्याभरात तो स्वत:वर गोळी चालवतो. डॉ. म्हणतात असं
करायला कोणीतरी नितीशकुमारला हिप्नोटाईज केलं आहे. म्हणजे या सगळ्यामधला दुवा आहे
ते विपश्चन्ना केंद्र... तिथे जाऊनच काहीतरी हाती लागेल..."
लपून बसलेल्या
जगनला आनंद आणि सचिनने शोधून काढलं. आधी तो काहीच बोलेना पण पोलीसी जरब बसताच तोंड
उघडत म्हणाला,
“साहेब, मी तर एक सुपारी किलर आहे... मला जो पैसे आणि
फोटो देतो त्याचं काम मी करतो... या माणसाचं नाव रमेश आहे की अजून काही ते नाही
माहित मला. या कामाचे मला कोणीतरी पन्नास हजार रुपये दिले होते... त्याच माणसाने
मला सगळा प्लॅन बनवून दिला. मला फक्त गोळी चालवायची होती. पैसे देणाऱ्याचा मी
चेहरा पाहू शकलो नाही पण त्याच्या हातातलं ब्रेसलेट अजून माझ्या लक्षात आहे.
त्यावर एन.के. ही दोन अक्षरं कोरली होती...” जगनने दिलेल्या माहितीनुसार तयार झालेल्या चित्राला पाहून आनंद विचार
करत म्हणाला,
“हे ब्रेसलेट मी
कुठेतरी पाहिलं आहे... पण कुठे... येस... नितीश कुमारच्या हातात. आणि एन.के. ही
अक्षरं... एन.के. म्हणजे नितीश कुमार...” सचिन गोंधळला. म्हणाला, “म्हणजे नितीश कुमार सामील आहे रमेशच्या खुनात... पण नितीश कुमार
तर...” सचिन बोलत असताना आनंदचा फोन वाजला... “बोला डॉक्टर... काय... ओके आम्ही बघतो...
धन्यवाद... सचिन, रमेशच्या
घरात आपण जे फोटो काढले होते त्या फोटोत बिल्डींगच्या बाहेरच्या झाडावर एक माणूस
बसलेला असल्याचं आढळलं आहे... त्यांनी झूम करून पाहिलं तेव्हा त्या माणसाच्या
टोपीवर आर.के.जे. असं लिहिलेलं त्यांना दिसलं...” सचिन आश्चर्यचकित होत म्हणाला, “सर, आर. के. जे... रॉनी क्रिश जासूस...” हा रॉनी क्रिश एक गुप्तहेर आहे आणि त्याच्या
डोक्यावरच्या टोपीवर आणि गळ्यातल्या लॉकेटमध्ये ही अक्षरं आहेत... सर हा रॉनी
क्रिश तिथे असणं म्हणजे कदाचित त्याने काही पाहिलं असेल... याला भेटायला हवं...”
इकडे उमा आणि
प्रधान इगतपुरीला पोहोचले. मेडिटेशन सेंटरमधलं वातावरण फार वेगळं होतं. सर्वत्र
शांतता पसरली होती. केंद्रात सहभागी होणारे आणि केंद्रातले कर्मचारी सर्व पांढऱ्या
शुभ्र पेहेरावात वावरत होते. सकाळचे दहा वाजले असतानाही वर्दळ, दगदग वगैरे काही नव्हतं. हे सर्व पाहून उमा
प्रधानांना म्हणाली, “सर, किती प्रसन्न आहे इथे... गर्दी नाही की गोंगाट
नाही... खूप छान वाटतंय ना...” प्रधानांनी
मानेनेच होकार दिला. समोरून येणाऱ्या माणसाला ते काही विचारणार इतक्यात त्या
माणसाने त्याचं बोट स्वत:च्या ओठांवर ठेवलं आणि एका पाटीकडे बोट दाखवलं. “शांतता राखणे. बोलू नये.” ही पाटी पाहून उमा आणि प्रधानांना नवल वाटलं.
प्रधानांनी एका कागदावर ऑफीस असं लिहून त्या माणसाला दाखवलं. त्याने एका इमारतीकडे
बोट दाखवत खुणेनेच तळमजल्यावरची खिडकी दाखवली व नमस्कार करून आपल्या वाटेने गेला.
उमा व प्रधान ऑफीसमध्ये गेले. आतही, बाहेर होती तशीच पाटी होती. एक वृद्ध स्त्री समोर बसली होती. उमाने
एका कागदावर काहीतरी लिहून तिला दिलं. “माफ करा. आम्ही मुंबईहून आलो आहोत. हे सीनियर इंस्पेक्टर प्रधान आणि
मी सब इंस्पेक्टर उमा. एका केससाठी चौकशी करायला आम्ही आलो आहोत. काही
दिवसांपूर्वी इथे आलेल्या प्रसिद्ध उद्योगपती नितीश कुमारबद्दल काही माहिती देऊ
शकाल का...”
हा मजकूर लिहिलेली ती चिठ्ठी वाचून ती स्त्री
हसली आणि रजिस्टर पाहू लागली. एका रकान्यावर बोट ठेवत त्यांनी रजिस्टर
प्रधानांसमोर ठेवला आणि कागदावर काहीतरी लिहू लागली...
त्या महिलेने
दिलेला कागद प्रधान वाचू लागले, "बाळ, हा आश्रम आहे. इथे ना कोणी लहान ना मोठा. सगळेच
भक्त सारखे. रजिस्टरप्रमाणे नितीश कुमार इथे गेल्या आठवड्यात होते. इतरांप्रमाणेच
त्यांनाही सगळे नियम लागू होते. दिवसभर शांतता आणि दोन तास बोलण्याची, आप्तेष्ठांना दूरध्वनी करण्याची मुभा. ते इथे
असेपर्यंत फक्त आमच्या सोनू नावाच्या रहिवासी भाविकाशीच बोलायचे. त्यांची वेळ
झाल्यावर ते त्यांच्या क्षेत्रात परत गेले. याहून अधिक काहीच माहिती नाही.
क्षमस्व..." प्रधानांनी तो कागद खिशात ठेवला. त्या महिलेला नमस्कार करून
प्रधान व उमा बाहेर आले. ऑफीसच्या बाहेर; तिथे येणाऱ्या लोकांचे, देणगीदारांचे, तिथल्या
कार्यकर्त्यांचे फोटो लावले होते. ते पाहत असताना एक फोटो पाहून उमा अवाक झाली. ती
हलक्या आवाजात कुजबुजली, "सर, हा फोटो बघा... या फोटोतला हा कार्यकर्ता
रमेशसारखा दिसतोय आणि बाजूला, नितीश
कुमार..." दोघांनी एकमेकांकडे पाहिलंमात्र, उमा लगेच आत जाऊन त्या महिलेला घेऊन आली.
प्रधानांनी रमेश असलेला फोटो दाखवताच ती महिला आत गेली व पुन्हा एक कागद घेऊन आली.
त्यावर लिहिलं होतं, "हाच
सोनू आहे. हा दहा-बारा वर्षाचा असताना आमच्या प्राचार्यांना रस्त्यालगत रडत बसलेला
दिसला. ते सोनूला आश्रमात घेऊन आले. तेव्हापासून सोनू इथला एक भाग झाला. नितीश
कुमार इथून गेल्याच्या दोन दिवसानंतर सोनूही अचानक निघून गेला. कोणालाही काहीही न
कळवता..." प्रधान उमासोबत आश्रमाबाहेर येत म्हणाले, "म्हणजे नितीश कुमार आणि सोनू ऊर्फ रमेश
एकमेकांना ओळखत होते तर. हे दोन्हीही मृत्यू एकमेकांशी कनेक्टेड आहेत. या
दोघांमधला लपलेला दुवा शोधून काढायला हवा..."
तिथे आनंद आणि
सचिन रॉनी क्रिशच्या ऑफीसात पोहोचले. माहिती घेऊन चौकीवर परत आले तर समोर प्रधान
आणि उमा उभेच होते. त्यांना पाहताच सचिन बोलू लागला, “सर, रमेशच्या घरात काढलेल्या फोटोमध्ये रॉनी क्रिश गुप्तहेर पण होता.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर असं समजलं की त्याला रमेशवर लक्ष ठेवण्याची कामगिरी
सोपवली गेली होती. इगतपुरीच्या मेडिटेशन सेंटरपासून हा रॉनी रमेशवर लक्ष ठेऊन
होता. रमेशचा खून झाला तेव्हाही हा रॉनी तिथेच झाडावर होता. रात्री दोनच्या
सुमारास त्याला रमेश ज्या खोली मेला त्या खोलीत एक लाल प्रकाश दिसला. तो बहुतेक
लेझर लाईट होता. जगन समोरच्या बिल्डींगमधून खुनाची दिशा ठरवत असेल पण रात्रीच्या
अंधारात रॉनीला जगन दिसला नाही. सकाळी घरावर नजर ठेवली असताना रमेश खिडकीत आला व
अचानक कोसळला. रॉनीला समजलं की रमेशवर कोणीतरी गोळी झाडली होती. हे सर्व पाहून तो
परत जात असताना आपण येताना त्याने पाहिलं आणि अजून काही माहिती मिळेल म्हणून तो
तिथेच झाडावर थांबून राहिला. सर, अजून
एक धक्कादायक माहिती अशी की रॉनीला रमेशवर पाळत ठेवायला नितीश कुमारनेच सांगितलं
होतं...” प्रधानांनी भुवया उंचावल्या. म्हणाले, “म्हणजे हा गुप्तहेर एक बनाव होता तर... रमेश
मेला की नाही हेच जाणून घ्यायचं होतं नितीश कुमारला पण त्याआधीच नितीश कुमारही
मेला. रमेशला नितीश कुमारने मारलं, तर नितीश कुमारला कोणी... Something is missing… आपल्याला रमेशचं आत्ताचं घर, केंद्रातलं घर आणि नितीश कुमारचा बंगला सर्व
नीट चेक करायला हवं. तिथेच काहीतरी हाती लागेल...”
प्रधानांनी सांगितल्याप्रमाणे
सचिन नितीश कुमारच्या बंगल्यावर गेला तर आनंद रमेशचा खून झाला त्या घरात गेला.
प्रधान व उमा पुन्हा मेडिटेशन सेंटरसाठी रवाना झाले. आनंद व सचिनने दोन्ही
ठिकाणं पिंजून काढली. रमेशच्या घरात काही विशेष हाती लागलं नाही पण नितीश
कुमारकडेमात्र सचिनला कपाटाच्या चोर कप्प्यात एक ड्रायव्हिंग लायसन्स सापडलं.
त्यावर नितीश कुमारच्या जुना फोटो होता. पत्ता लिहिला होता, "बंसी शिंदे, धारगाव, इगतपुरी..."
बंसी हे नाव वाचून सचिन गोंधळला पण इगतपुरी हे नाव वाचून त्याची ट्यूब पेटली व
त्याने लेगच आनंदशी संपर्क साधला. आनंद नितीशकुमारच्या घराबाहेर सचिनला भेटला.
लायसन्स पाहून जरा विचार करून आनंद म्हणाला, “नितीश कुमारकडे लायसन्स असेल तर ते त्याच्या नावाचं असेल... हा बंसी
शिंदे कोण असावा... आणि त्याचं लायसन्स नितीश कुमारकडे... एक मिनीट एक मिनीट...
बंसी... नितीश कुमारच्या बॉडीजवळ जो कागद सापडला होता त्यावरसुद्धा बंसी आणि रीनू
ही नावं लिहिली होती... कोण असावेत हे... आणि यांचा रमेश व नितीश कुमारशी काय
संबंध असावा... प्रधान सरांना कळवायला हवं...” आनंदने प्रधानांना फोन लावला...
तिकडे
इगतपुरीच्या मेडिटेशन सेंटरमध्ये ऑफीसमधून परवानगी घेऊन प्रधान आणि उमा, रमेशच्या म्हणजे सोनूच्या खोलीची झडती घेऊ
लागले. उमाला एका पुस्तकात ठेवलेले दोन फोटो सापडले. फोटो बरेच जुने झाले होते.
उमा फोटो प्रधानांना दाखवत म्हणाली, “सर, हे
दोन फोटो सापडलेत. दोन्हीमध्ये ही तरुण मुलगी कॉमन आहे. एका फोटोमध्ये हा लहान
मुलगा आहे तर दुसऱ्या फोटोत... सर, नितीश कुमारसारखा दिसतोय... केसांचं वळण बदललं आणि मिशा काढल्या तर
आत्ताच्या नितीश कुमारसारखाच दिसेल...” प्रधान ते दोन्ही फोटो न्याहाळत विचार करू लागले, “नितीश कुमारचा फोटो या रमेशकडे कसा... आणि ही
मुलगी कोण असावी...” त्यांनी
बारकाईने ते फोटो पाहिले. फोटोच्या मागे एक अस्पष्ट शिक्का होता, मल स्ट धार... उमाकडे वळत म्हणाले, “उमा, या फोटोच्या मागे हा शिक्का दिसतोय... काय असावा...” उमानेही निरखून पाहिलं आणि म्हणाली, “सर, फोटो स्टूडियोचं नाव तर नसेल... मल म्हणजे विमल किंवा कमल या
अर्थाने... स्ट म्हणजे स्टूडियो... पण हे धार समजत नाही...” उमाने लगेच गूगलवर धार आणि इगतपुरी शोधलं तर
धारगाव हे नाव समोर आलं. इतक्यात प्रधानांचा फोन व्हायब्रेट झाला, “बोल आनंद, हम्म... आम्हालाही इथे दोन फोटो सापडलेत ज्यात धारगावचाच उल्लेख आहे.
तुम्ही दोघं ताबडतोब इथे या... कदाचित आपल्या केसचा मिसिंग पीस या धारगावमध्ये
असेल...” प्रधानांनी फोन ठेवला आणि उमाला म्हणाले, “सचिन आणि आनंदला नितीश कुमारच्या घरात एक
ड्रायव्हिंग लायसन्स सापडलंय ज्यावर इथला पत्ता आहे. मी सचिन आणि आनंदला इथे
बोलावलं आहे. हा बघ आनंदने त्या लायसन्सवरचा फोटो पाठवलाय...”
फोटो पाहून
दोघंही चक्रावले. लायसन्सवरच्या फोटोमधला चेहरा आणि उमाला सापडलेल्या फोटोमधल्या
तरुणाचा चेहरा दोन्हीही सारखेच होते. उमा म्हणालीसुद्धा, “सर, हे दोन्ही फोटो सारखेच आहेत... हा लायसन्सवरचा फोटो जर नितीश कुमारचा
आहे तर नितीश कुमार आधी इथे राहत होता...” प्रधानांनी दोन्ही भुवया उंचावल्या. म्हणाले, “सचिन आणि आनंद येऊ दे. आपण ताबडतोब धारगावला
जाऊ. तिथेच बहुतेक सर्व गोष्टींचा उलगडा होईल...” थोड्या वेळात सचिन आणि आनंद धारगावच्या
कमानीजवळ उमा व प्रधानांना भेटले. मिळालेले पुरावे एकमेकांना दाखवत चौघांनी गावात
प्रवेश केला. गाव तसं लहानखोरच होतं. जुनी कौलारू बैठी घरं, अधूनमधून दिसणारी वस्ती, छोटे छोटे रस्ते सगळं कसं जपून ठेवल्यासारखं.
समोरच्या एका दुकानात शिरून सचिनने फोटो दाखवला पण त्या तरुणीबद्दल किंवा
स्टूडियोबद्दल त्या दुकानदाराला काहीच माहित नव्हतं. इतरही कोणाला स्टूडियो किंवा
त्या फोटोबद्दल काही माहीत नव्हतं. पुढे काय करायचं या विचारात सर्व असतानाच, "पावनं, गावात नवीन दिसताय... न्हाय, कवा पाइलं न्हाय म्हनुनशान इचारलं..." या आवाजाने सर्व भानावर
आले. समोर काठी धरलेला मळकट धोतर नेसलेला, सदरा घातलेला, डोळ्यांवर
चष्मा असलेला एक म्हातारा उभा होता. त्याला पाहून सचिन पुढे होत म्हणाला, "आजोबा, आम्ही पोलीस आहोत. तुम्ही गावात जुने दिसताय... हा फोटो बघा... या
पैकी कोणाला ओळखता का तुम्ही..."
सचिनने दिलेला
फोटो डोळ्यांजवळ नेत त्या म्हाताऱ्याने नीट न्याहाळला. त्याचे बारीक डोळे मोठे करत
म्हणाला, "रीनू... सायेब ही तर आमची रीनू हाय... आवो याच
गावामंदी ही रीनू, तिचा
धाकला भाऊ सोनू आन तिचे आय-बा ऱ्हात व्हते. माज्या अंगा-खांद्यावर ही रीनू आन सोनू
खेलत व्हते. यक दिस ही रीनू कुनाबरुबर तरी पलून गेली. तिच्या बानं तिचं नाव टाकलं.
त्या दिसापासून रीनूची काय बी खबर न्हाय बगा... स्हा वरीस उलटली. येक दिस समदाच
इस्कोट जाला. रीनूचा बा ग्येला, तिची
आय याड लागून घरातून पलाली आन सोनू तिच्या मागं मागं ग्येला. तवापासनं आजपात्तूर
त्या दोगांचा काय बी पत्त्या न्हाय बा..." प्रधानांनी त्या म्हाताऱ्याकडून
रीनूच्या घराचा पत्ता मिळवला. त्या म्हाताऱ्याचे आभार मानून सर्व रीनूच्या घराकडे
निघाले. जाता जाता प्रधान म्हणाले, "या रमेशचं खरं नाव सोनू होतं आणि या रीनूच्या
भावाचंही नाव सोनूच निघावं... डॉ. गोखले म्हणाले त्याप्रमाणे नितीश कुमारचा खून
झालाय... मग बदला घेण्याच्या भावनेतून रमेशनेच हे कृत्य केले नसेल... पण कसं...
रमेशचा तर आधीच खून झाला होता... रीनूच्या घरात जाऊन काही मिळतंय का पाहू..."
सर्वजण रीनूच्या घरी पोहोचले. मोडकळीस आलेल्या त्या घरात जळमटं आणि धुळी खेरीज
दुसरं काहीच नव्हतं. सर्वांनी शोधाशोध सुरू केली. आतल्या खोलीतल्या कपाटात उमाला
एक पाकीट सापडलं. त्यावर लिहिलं होतं, "प्रिय आई..." उमा ते पाकीट बाहेर घेऊन
आली. धुळ भरलेलं ते पाकीट प्रधानांनी अलगद उघडलं. आत एक पत्र होतं. प्रधानांनी ते
वाचायला सुरुवात केली...
“आई, कशी आहेस... तू कुठे आहेस माहित नाही. हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचेल
त्यावेळी मी कदाचित या जगात नसेन. तू घरातून गेलीस तेव्हा तुझी मानसिक स्थिती
चांगली नव्हती. हे असं का झालं ते तुला आठवणार नाही बहुतेक. म्हणून सर्व
पहिल्यापासून सांगतो... हो, प्रसिद्ध
उद्योगपती नितीश कुमारचा वध मीच केला. हो वधच... कारण नितीश कुमार हा एक गुन्हेगार
होता... त्याचं खरं नाव बंसी. आपल्या धारगाव व आसपासच्या परिसरात तो रिक्षा
चालवायचा. रीनू,
माझी ताई त्याच्या प्रेमात पडली. मला तिने
बंसीचा फोटोही दाखवला होता. ५-६ वर्षांचा मी, मला काय समजणार... पण तुम्हा दोघांना तो बंसी मान्य नव्हता. त्याच्या
प्रेमात आंधळ्या झालेल्या माझ्या ताईने घरातून पळ काढला. बाबांनी ताईचं नाव टाकलं.
मी अधून मधून उल्लेख करायचो तर ते मला बोलायचे, मारायचे. अशातच सहा वर्ष लोटली आणि एक दिवस बाबांच्या नावाने ताईचं
पत्र आलं. त्यात तिने लिहिलं होतं की बंसी वाईट माणूस होता. ताईला फसवून त्याने
कुंटणखाण्यात विकलं. तिने पळ काढण्याचा खूप प्रयत्न केला पण शारीरिक व मानसिक छळ, उपासमार यामुळे शेवटी माझी रीनू ताई त्यांना
हवं तसं वागायला तयार झाली. तिच्या सततच्या शारीरिक विटंबनेमुळे नको त्या आजाराने
तिला ग्रासलं म्हणून तिने आत्महत्या केली... पत्रासोबत बंसी आणि ताईचा फोटो होता.
बाबांनी हे पत्र वाचलं आणि धक्का बसून ते जागीच गेले. पत्र आणि फोटो गळून खाली
पडले. मी ते दोन्ही उचलले, त्याचवेळी
पत्रातून कळलेली मुलीची दैना ऐकून आणि समोर नवऱ्याचा मृतदेह पाहून तू किंकाळी
फोडलीस, घरभर आदळआपट करू लागलीस आणि मग घराबाहेर पळत
सुटलीस. १०-१२ वर्षांचा मी तुला कसा सांभाळणार होतो... तुझ्यामागे मीही धावलो पण
तू नाहीशी झालीस आणि मी तिथेच कडेला रडत बसून राहिलो...
जाणाऱ्या
येणाऱ्यांचे लक्ष माझ्याकडे गेलेच नाही. मी बराच वेळ रडत बसलो होतो तेव्हा
मेडिटेशन सेंटरचे प्राचार्य जगदीशचंद्र यांनी मला मदतीचा हात दिला. तिथल्या
शांत वातावरणात मला घटनांचा विसर पडू लागला. मी तिथेच शिकून मोठा झालो. आम्हाला
दिलेल्या दोन तासात मी भक्तांशी बोलायचो, त्यांच्या क्षेत्राबद्दल माहिती घ्यायचो आणि माझ्या ज्ञानात भर
घालायचो. एका सायकोलॉजीच्या प्रोफेसरकडून हिप्नॉटीझम पण शिकून घेतलं. दिवस छान जात
होते की अचानक एक दिवस बंसी माझ्यासमोर आला. प्रसिद्ध उद्योगपती नितीश कुमार बनून
आलेल्या या बंसीला पाहताच माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. रीनू आणि बाबांचं जाणं, तुझी अवस्था... सारं परत आठवलं. त्याला तिथेच
संपवावा असं वाटलं पण ते योग्य ठरलं नसतं. त्याच्या विरुद्ध पोलीसात गेलो असतो तर
पुराव्या अभावी आणि पैशाच्या बळावर तो बंसी सुटला असता. शिवाय आपल्या परिवाराची
अजून बदनामी झाली असती. म्हणून मी त्याच्या खुनाचा कट रचला. त्या दहा दिवसात मी
बंसीला माझी ओळख पटवून दिली. त्याला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून त्याचं ब्रेसलेट
मिळवलं. बंसीला हिप्नोटाईज करून रीनू हे नाव ऐकलं किंवा वाचलं की उजव्या हाताने
स्वत:वर गोळी झाडून घ्यायची हे त्याच्या मनावर बिंबवलं. तो परत गेल्यावर मीही
त्याचे मागे गेलो. एका हॉटेलमध्ये नोकरी पत्करली. रीनूचं नाव लिहून चिठ्ठी बंसीला
पाठवली. बंसी मरणार हे निश्चित होतं. माझ्या जगण्याला आता ध्येयच उरलं नव्हतं
म्हणून बंसीने दिलेलं ते ब्रेसलेट घालून मी जगन नावाच्या माणसाला मलाच मारण्यासाठी
पैसे दिले... रीनू ताईची चिठ्ठी याच पाकिटात आहे. आई, मी खूनी नाही. गुन्हेगाराला कठोर शासन व्हावं
म्हणून मी हे पाऊल उचललं... तुझाच, सोनू...”
प्रधानांसकट
सर्व सुन्न झाले होते. आनंद बोलता झाला, “सर, घडलेलं
सर्व फार विचित्र आहे. आपण समजत होतो की नितीश कुमारने जगनकरवी बंसीला मारलं आणि
ही खबर त्याला मिळावी म्हणून त्याने बंसीवर लक्ष ठेवायला रॉनी क्रिशला पाठवलं...
पण इथे तर वेगळंच चित्र समोर आलं आहे...” सचिनने बोलायला सुरुवात केली, “हो ना... या दोन्ही खुनांचा खरा सूत्रधार हा सोनू म्हणजेच रमेश स्वत:
होता तर... त्याला बहुतेक माहित नसावं की नितीश कुमार डावरा आहे...” उमाने डोळे पुसले. म्हणाली, “मला तर रीनू आणि तिच्या आईची दया येते. बिचारी
रीनू, नाहक बळी पडली... कुठे असेल तिची आई, जिवंत तरी असेल का...” प्रधान काहीही न बोलता पत्राकडे एकटक पाहत
होते. काही वेळाने ते बोलते झाले, “Hats off सोनू... तुझ्या परिवारासाठी तू जे पाऊल उचललंस ते कौतुकास्पद आहे. पण
कायद्याचा रक्षक म्हणून मी याला पाठिंबा देऊ शकत नाही... मान्य आहे की कायद्यात
खूप त्रुटी आहेत पण मी तुला वाचन देतो सोनू... रीनूची जी अवस्था झाली ती इतरांची
नाही होऊ देणार मी. हे दुष्टचक्र थांबून इतर असंख्य रीनूंची या जाचातून मी सुटका
करेन... It’s a
promise...”
समाप्त.