"रवी... ए रवी..." वाचनात गर्क असलेला रवी या आवाजाने चपापला. आवाज घरातून येत होता. "घरात मी एकटाच असताना हा दुसरा आवाज कोणाचा..." या विचाराने गोंधळलेला रवी आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. अंधारात चाचपडत आवाज ज्या खोलीतून आला त्या खोलीत रवी पोहोचला. कानोसा घेत असताना, "रवी... आलास..."
रवीने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोरच्या आरशात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. मोबाईलच्या अंधूक प्रकाशातही रवीला त्याचं प्रतिबिंब वेगळं वाटलं. रवी हसत नव्हता पण ते प्रतिबिंब कुत्सीत हसत होतं. रवी काही बोलणार इतक्यात ते प्रतिबिंब म्हणालं, "रवी... तुला मी इथे का बोलवलं माहीत आहे... कळेलच आता..." ते प्रतिबिंब बोलत असतानाच रवीच्या मागची भिंत फाडून दोन हात बाहेर आले आणि त्यांनी रवीचा गळा आवळला...
रवी एकदम जागा झाला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. समोर टि.व्ही चालू होता पण काळ्या पडद्याने व्यापला होता. "म्हणजे... पिक्चर पाहताना मला झोप लागली आणि स्वप्नात हे दिसलं..." रवी स्वत:शीच पुटपुटला. त्याने टि.व्ही बंद केला. सी.डी. काढून ठेवली व झोपायला गेला. जाताना रवीने घराचा कोपरा अन कोपरा तपासला. सर्व दारं बंद केली आणि बिछान्यावर पडला...
रात्रीचे अडीच वाजले होते. स्वप्नामुळे किंवा त्याच्या भीतीमुळे रवीला झोपच लागत नव्हती त्याला दरदरून घाम फुटला होता. रवीने परत झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप कुठल्याकुठे विरून गेली होती. त्याला बाथरूममधून पाणी टपकण्याचा आवाज आला. "यावेळी पाणी कसं टपकतंय..." विचाराने त्याच्या पोटात गोळा आला. रवी हळूहळू बाथरूमजवळ गेला. त्याने दार ढकललं. दाराच्या आवाजाने रवीच्या अंगावर काटा आला. त्याने आत डोकावलं. नळातून येणारे पाण्याचे थेंब त्याखाली ठेवलेल्या बादलीत पडत होते. रवीने एकदा छातीवर हात ठेवला. नळ बंद करून तो वळला...
परत येताना त्याने आरशात पाहिलं तर केस मोकळे सोडलेल्या बाईची आकृती त्याला दिसली. तो नि:शब्द होऊन ती आकृती पाहत होता. ती आकृती हलली आणि रवीच्या मनात आलं, "आरशात दिसते म्हणजे ती... माझ्या मागे..." रवीने आरशावरून नजर हटवली व हळूहळू मान वळवली. त्याच्या मागे कोणीच नव्हतं. त्याने पुन्हा आरशात पाहिलं तर तिथेही कोणी नव्हतं. रवीचा थरकाप उडाला. घामाने ओल्याचिंब झालेल्या रवीने आपला चेहरा शर्टाच्या बाहीला पुसला. बाथरूमचे दार बंद करून तो बेडवर पडला...
रवीला बाथरूमकडे पहायचीही छाती होत नव्हती. हॉलच्या दिशेने तोंड करून तो बिछान्यावर पहुडला होता. त्याची नजर दाराकडे गेली. अर्धवट उघडलेलं दार पाहून रवीच्या छातीत धस्स झालं. "मी तर दार बंद केलं होतं... मग हे उघडलं कसं... कोणी उघडलं..." या विचाराने रवीच्या हृदयाचे ठोके वाढले होते. भिंतीचा आधार घेत रवी हलक्या पावलांनी दाराजवळ आला. कानोसा घेत त्याने दार लोटलं. बाहेर सर्वत्र अंधार पसरला होता. त्या भयाण शांततेत घड्याळातल्या सेकंद काट्याची "टिक् टिक् टिक्..." रवीला फार विचित्र वाटू लागली. रवी बेडकडे वळला आणि "खळऽऽऽऽ..."
काच तुटल्याच्या आवाजाने रवी थबकला. आवाज किचनमधून आला होता. रवीने आवंढा गिळला. थरथरत्या पावलांनी तो किचनकडे जाऊ लागला. सर्वत्र असलेला अंधार, घड्याळाची टिक् टिक् आणि पसरलेली शांतता यामुळे रवीला अजूनच भीती वाटत होती. त्याने किचनमध्ये डोकावलं. आत काहीच नव्हतं. आपल्याला भास झाला या विचारात रवी बेडरूमकडे वळला तर बाथरूममध्ये दिसलेली ती आकृती त्याच्या समोर उभी होती आणि एक रक्ताने भरलेला हात त्याच्याकडे येत होता. हे पाहून रवी प्रचंड घाबरला. त्याला ओरडायचं होतं पण त्याचा श्वासच अडकला आणि रवी तसाच आ वासून उभा राहिला...
पहाटेचे पाच वाजत आले होते. रवीला जाग आली. रात्रीचा प्रसंग अजूनही त्याला आठवत होता. पण सकाळ झाल्याने त्याला जरा हायसं वाटलं. रवी बाहेर आला तर हॉलमध्ये वर्दळ दिसली. जमिनीवर एक कपडा पसरला होता. पोलीस तपास करत होते. समोर सोफ्यावर रवीची बायको ज्योती रडत होती. तिच्या शेजारी एक महिला काँस्टेबल बसली होती. ज्योती बोलत होती, "काय सांगू साहेब, मी ट्रीपला गेले होते. रात्री दीडच्या पुढे आले. पाहिलं तर टि.व्ही अर्धवट बंद केला होता आणि बाजूला सी.डी. पडली होती. मी आत आले तर ह्यांची सारखी चुळबूळ चालू होती. दोनच्या पुढे कधीतरी मी उठले व वॉशरूमला जाऊन आले. माझ्या मागून हेही बाथरूमजवळ आले. मला पाहून ते दचकले. मी लगेच मागे झाले व पाणी प्यायला गेले. माझ्या हातून ग्लास पडून फुटला. काचा उचलताना एक माझ्या हाताला लागली व रक्त वाहू लागलं. मी हात धुणार इतक्यात हे मागून आले. ते परत जाताना मी त्यांच्या जवळ गेले तेव्हा ते इतके घाबरले की... मी त्यांना किती सांगितलं की रात्रीचे भुतांचे चित्रपट पाहू नका... काल रात्रीही त्यांनी भुताचाच सिनेमा पाहिला आणि..."
ज्योती पुन्हा रडू लागली. ती महिला काँस्टेबल म्हणाली, "बाई, सावरा स्वत:ला. भीती हा माणसाच्या विचारांचा सर्वात मोठा शत्रू आहे. भीतीचा पगडा मनावर बसला की काही सुचत नाही..." रवी अजून गोंधळलेलाच होता. रात्रीचे सर्व प्रसंग ज्योतीला कसे माहीत याच विचारात रवी असताना जमिनीवर पसरलेली चादर बाजूला झाली आणि निपचित पडलेला रवीच त्याला दिसला...
समाप्त.
No comments:
Post a Comment