Thursday, March 22, 2018

चमत्कार...




"राजू, अरे ऊठ बघू... आजच्या चांगल्या दिवशी असं रुसून बसतात का... पटकन हात-पाय धुऊन ये... आज तुझ्या आवडीचाच बेत आहे बघ... गुलाब जाम, पुरी-भाजी, पुलाव... चल पटकन ये..." राजूची वहिनी राजूला विनवत होती. राजू दोन वर्षाचा असताना त्याचे आई-बाबा एका अपघातात गेले. त्याच्या मोठ्या भावाने तळहाताच्या फोडाप्रमाणे राजूला जपलं होतं. राजूची वहिनीतर पोटच्या पोराप्रमाणे राजूचं सर्व करायची. त्या दोघांना मूल-बाळ नसल्याने राजूवर त्यांचा जास्तच जीव होता. आज राजूचा वाढदिवस होता आणि त्याने व्हिडियो गेमचा हट्ट धरला होता. राजूचा दादा हा हट्ट आत्तातरी पूर्ण करू शकत नव्हता म्हणून सकाळी जरा रागावूनच तो कामासाठी बाहेर पडला. दादा व्हिडियो गेम देत नाही आणि वर रागावतो म्हणून राजू रुसून बसला होता. राजूची वहिनी परोपरीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती पण राजू ऐकतच नव्हता...

वहिनीच्या समजावण्याचा राजूवर काहीच परिणाम झाला नाही. तो हट्टालाच पेटला होता. "मला व्हिडियो गेम हवा म्हणजे हवाच... त्याशिवाय मी जेवणारच नाही जा..." असं म्हणत पाय आपटत राजू बाहेर निघून गेला. तो इतका रागावला होता की दारात उभ्या त्याच्या वहिनीचे हुंदकेही त्याला ऐकू आले नाहीत. राजू चालत चालत जंगलात शिरला. वाट फुटेल तिथे तो जात होता. काही वेळाने राजू थकला. एका मोठ्या डेरेदार झाडाखाली तो जाऊन बसला. आजू-बाजूची हिरवीगार झाडी पाहताना व पक्षांचे वेगवेगळे आवाज ऐकताना राजूला कधी झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही. काही वेळाने राजूला जाग आली तेव्हा अंधार पडला होता. पक्षांच्या किलबिलाटाची जागा रातकिड्यांनी घेतली. राजूला घराची आठवण येऊ लागली. तो उठला. जायला निघणार तोच त्याला प्रकाश दिसला. त्याने वळून पाहिलं तर झाडाच्या बुंध्यातून येणाऱ्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशाने राजूचे डोळे दिपले...

डोळे किलकिले करत राजूने पाहिलं तर ज्या झाडाखाली तो बसला होता त्याच झाडाचा बुंधा उघडला गेला होता. थंड वाऱ्याची एक झुळूक राजूला स्पर्श करून गेली आणि त्याच्या अंगावर शहारे आले. राजू घाबरला खरा पण त्याची उत्सूकताही तितकीच होती. त्या प्रकाशाच्या दिशेने जावं की नाही हा विचार करत राजू तिथेच रेंगाळत होता. शेवटी मन पक्क करत त्याने प्रकाशाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. राजूला वातावरणातला बदल जाणवायला लागला होता. एकदम थंडी वाजून राजूने दोन्ही हातांची घडी घातली. काही क्षणात राजू एका बोळातून बाहेर आला. त्याने पाहिलं तर सगळीकडे बर्फ होता. राजू विचार करू लागला, "अरेच्च्या... मी आत शिरलो तेव्हा रात्र होती आणि आता तर चक्क दिवस आहे..." वेळेत झालेल्या बदलाची आणि समोर असलेल्या बर्फाची राजूला गम्मत वाटली आणि राजू बर्फाशी खेळू लागला...

बर्फात लोळणे, बर्फ उडवून तो अंगावर झेलणे, बर्फाचा डोंगर करून त्यावरून उड्या मारणे, बर्फाचे गोळे करून क्रिकेटसारखं बॉलिंग करणे असे राजूचे खेळ सुरू होते. असेच गोळे फेकत असताना, "अरे अरे हळू... मला लागतंय ना..." या आवाजाने राजू दचकला. त्याने अवती भोवती पाहिलं पण कोणीच नव्हतं. बर्फातून वाट काढत आवाज कुठून आला ते शोधत राजू पुढे जाऊ लागला इतक्यात, "अरे इकडे तिकडे काय बघतो आहेस, खाली बघ तुझ्या पायाजवळ..." राजूने खाली पाहिलं तर एक गोंडस फूल आपल्या पानांचा हात करून वाकलं होतं. बोलणाऱ्या त्या फुलाला पाहून राजूला नवल वाटलं. तो त्या फुलापाशी बर्फात बसला. म्हणाला, “अरेच्चा... तू बोलतोस... किती गम्मत ना...” त्या फुलाने त्याच्या पाकळ्यांवरची पानं बाजूला केली. राजूला जवळ बसलेला पाहून त्याला बरं वाटलं. ते फूल हसलं व म्हणालं, “अरे मीच काय... इथली पानं, झाडं, प्राणी सगळे बोलतात... पण तुझं नाव काय...? आणि तू इथे कसा काय आलास...”

राजू म्हणाला, “माझं नाव राजू. मी माझ्या दादा-वाहिनीसोबत राहतो. हे झाड आहे ना... त्याच्या खाली मी बसलो होतो. एकदम ते उघडलं आणि त्यातून प्रकाश व थंड हवा आली. त्या प्रकाशाच्या दिशेने चालत मी इथे आलो. पण काय रे... इथे इतका बर्फ कसा काय... तुला थंडी नाही वाजत... आणि तुम्ही बोलता कसे... मी खरा आहे तरी कुठे...” ते फूल पाकळ्यांमधून हळूच हसत म्हणालं, “अरे राजू, हे आहे आनंदवन. या नगराच्या महाराजांनी म्हणजेच पृथ्वीसिंह यांनी त्यांच्या कन्येसाठी अर्थात आमच्या लाडक्या नीलमताईसाठी हे आनंदवन बनवलं. नगराचे जादुगार सोमदेव काकांनी या आनंदवनात जादू भरली आणि इथली हिरवळ व सृष्टीसौंदर्य अबाधित रहावं यासाठी वाड्याच्या कळसावर प्रेमज्योत पेटवली. मग काय... इथली पानं, फुलं, झाडं, जनावरं, सर्व बोलू लागले. झाडं आणि फुलं तर एका जागेवरून दुसरीकडेही जायचे. आमची नीलमताई आमच्यासोबत खेळायची, छान गाणी म्हणायची... असाच काळ पुढे सरकला आणि आमची नीलमताई मोठी झाली. ती इतकी सुंदर आणि गोड दिसायची म्हणून सांगू... नीलमताई कितीही मोठी झाली तरी आमच्याशी असलेलं तिचं नातं कधीच कमी झालं नाही. अशीच एकदा ती आमच्यासोबत खेळत होती तेव्हा शेजारच्या नगराचे राजकुमार समरसिंह गोड्यावरून रपेट करत तिथून जात होते...

नीलमताईचं गाणं ऐकून ते क्षणभर तिथेच थांबले. गाता गाता नीलमताईने समरसिंहांना पाहिलं आणि लाजून ती एका झाडामागे लपली. समरसिंह दोन पावलं पुढे झाले आणि नीलमताईची स्तुती करू लागले. त्याचं ते मधाळ बोलणं आणि ते देखणं रूप नीलमताईलाच काय तर आम्हालाही खूप आवडलं. नीलमताई झाडामागून हळू हळू बाहेर आली. तिला पाहिलं आणि समरसिंहांना शब्दच सुचेना. ते तसेच तिच्याकडे पाहत राहिले. काही क्षण तसेच पाहून ते म्हणाले, “वाह... आपल्यावर ईश्वराने कृपादृष्टीच टाकली आहे... हे आरसपानी सौंदर्य, हे मधुर स्वर, आपलं नाव कळू शकेल का...” आमच्यातल्याच एका फुलाला जवळ करत नीलमताई म्हणाली, “मी राजकुमारी नीलम... तुम्हीही देखणे आणि रुबाबदार आहात... आपलं नाव...” समरसिंह हसले. म्हणाले, “नीलम, खूप छान नाव आहे. आम्ही समरसिंह. संग्रामगढचे राजकुमार. राजकुमारी... तुमचं हे सौंदर्य आणि तुमचा आवाज आम्हास खूप आवडला, आणि... तुम्हीसुद्धा...” तिथेच एका गुडघ्यावर बसत समरसिंह म्हणाले, “राजकुमारी नीलम, आमच्यासोबत आमच्या नगरात याल... आमची पत्नी बनून...”

नीलमताई लाजून लाल झाली. तिने मानेनेच होकार दिला. महाराज पृथ्वीसिंहांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यांनी समरसिंहांना भेटायला बोलावलं. आम्हा सर्वांप्रमाणेच नीलमताईलाही वाटलं की महाराज क्रोधीत होतील पण झालं वेगळंच. महाराजांनी समरसिंहांचं नुसतं स्वागतच नाही केलं, तर समरसिंह आणि नीलमताई यांच्या विवाहास अनुमती देखील दिली. सर्वांना खूप आनंद झाला. आम्ही सर्व खूप खुश झालो. विवाह होईपर्यंत समरसिंहांनी इथेच निवास करावा शिवाय त्यांच्या मात्या-पित्यासही इथेच बोलवून घ्यावं... या महाराजांच्या प्रस्तावाला समरसिंह तयार झाले. समरसिंह यांचे माता-पिता म्हणजेच महाराज राजेश्वर आणि राणी कलादेवी यांचे आगमन होताच नीलमताई आणि समरसिंह यांचा साखरपुडा पार पडला. येत्या पुनवेला त्यांच्या विवाहाची तारीखही ठरली. सर्वत्र आनंदी आनंद पसरला. आमच्या आनंदाला तर पारावारच नाही राहिला. पण आमच्या या आनंदाला ग्रहण लागलं...

नीलमताई एकदा आनंदवनात गात होती. समरसिंहांसह आम्ही सारे तिच्या गाण्याचा आनंद घेत होतो. त्याच वेळी कालीचरण त्याच्या गालिचावर स्वर होऊन आनंदवनावरून उडत जात होता. कट्यारीसारखी टोकदार दाढी आणि मिशा असलेला, काळा लांबसडक वेश पांघरलेला कालीचरण एक दुष्ट जादुगार आहे. नीलमताईचं गाणं ऐकून तो खाली आला. आम्ही सगळे गाण्यात इतके मग्न होतो की कधी कालीचरण खाली आला ते कळलंच नाही. नीलमताईचा हात पकडत कालीचरण म्हणाला, “हे सुंदरी... तुझा आवाज मला आवडला. तू आता फक्त माझ्यासाठी गाशील. फक्त माझ्यासाठी. चल...” नीलमताईने समरसिहांना साद घातली. समशेर सरसावत समरसिंहांनी कालीचरणला आव्हान दिलं, “सावधान... सोड राजकन्येला... नाहीतर मरणाला तयार हो दुष्टा...” कालीचरण जोरजोरात हसू लागला. म्हणाला, “तू माझा सामना करणार... माझा... या जादुगार कालीचरणचा... मग हे घे... कालीचरणजवळ असलेल्या काळ्या काठीवर बसवलेल्या कवटीचे डोळे चमकू लागले. त्यातून एक प्रखर विजेरी निघाली आणि कालीचरणवर चाल करून येणाऱ्या समरसिंहांच्या जागी एका सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त एक पांढरा पक्षी दिसू लागला. कालीचरण म्हणाला, “समरसिंह, तू बहादूर आहेस ना... मग सोडव स्वत:ला या पिंजऱ्यातून आणि ये काळ्या पहाडावर...”

महाराज पृथ्वीसिंह, महाराज राजेश्वर आणि राणी कलादेवी यांना येताना पाहून कालीचरण याने पुन्हा त्याच्या जादुई काठीने त्या तिघांवर विजेरी चालवली. क्षणार्धात त्यांची शरीरं दगडाची झाली. आम्ही काही करू इतक्यात त्याने वाड्याच्या कळसावर असलेल्या प्रेमज्योतीलाही काबीज केले. आमची हालचाल बंद पडली आणि आम्ही जागीच खिळलो. सोमदेव काकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण कालीचरणच्या सामर्थ्यासमोर त्यांची जादू थिटी पडली. कालीचरणच्या काठीतून निघालेल्या तीक्ष्ण विजेरीच्या झटक्याने सोमदेव काकांच्या गळ्यातील रत्नहार निखळून पडला. त्याबरोब्बर ते एकदम जख्ख म्हातारे दिसू लागले. त्यांच्या शरीरातलं त्राण निघून गेल्यागत ते जमिनीवर कोसळले. कालीचरणने तो हार स्वत:च्या गळ्यात घातला आणि त्याच्या संपूर्ण कायेभोवती एक गडद निळ्या रंगाचा प्रकाश दिसू लागला...

कालीचरण मोठमोठ्याने हसू लागला. “हा...हा...हा... मी सर्वशक्तिमान जादुगार कालीचरण...” असं म्हणून कालीचरण त्याच्या गालिचावर स्वार झाला आणि क्षणार्धात नीलमताईसह हवेत नाहीसा झाला. आनंदवनाच्या तोंडाशी त्याने एक गुहा तयार केली आणि त्यात राजकुमार समरसिंहांना ठेवलं. राजू, आम्ही अजून बोलतोय कारण ती प्रेमज्योत अजूनही तेवते आहे. ती मालवायच्या आत नीलमताई आणि ती ज्योत इथे परत नाही येऊ शकल्या तर अंध:कार...” राजूने सर्व ऐकून घेतलं. त्या फुलाला प्रेमाने कुरवाळत राजू म्हणाला, “काळजी करू नकोस, मी मदत करतो तुम्हा सर्वांना. पण हे मी एकटा कसं करू... मला राजकुमार समरसिंहांना आधी सोडवायला हवं. त्यांच्याच मदतीने हे शक्य होईल. मला सांग, कुठे आहे ते गुहा...” फुलाने राजूला गुहेकडे जाण्याचा मार्ग दाखवला. फुलाला टाटा करत राजू गुहेकडे निघाला. जात असताना त्याला, “पाणी... पा...णी...” असा आवाज आला...

राजूने पाहिलं तर एका झाडाखाली एक आजोबा बसले होते. ते सारखं पाणी मागत होते आणि ते झाड आपल्या फांद्यांनी त्यांना कुरवाळत होतं. राजू त्यांच्याजवळ जाऊन बसला. त्यांची ती अवस्था पाहून राजूला दया आली. तो म्हणाला, “आजोबा, तुम्हाला पाणी हवं आहे ना... थांबा मी आणतो पाणी...” राजूने लगेच झाडाच्या पानांचा द्रोण तयार केला. काही अंतरावर असलेल्या तलावातून पाणी आणून त्या आजोबांना पाजलं. आजोबा तृप्त झाले. राजू म्हणाला, “आजोबा, मी राजू. तुम्ही सोमदेव काका आहात ना... मला आनंदवनाबद्दल आणि कालीचरणबद्दल एका फुलाकडून सगळं समजलं आहे. मी गुहेकडेच जात होतो राजकुमार समरसिंहांना सोडवायला...” सोमदेव काका आपले थरथरते हात राजूच्या डोक्यावर ठेवत म्हणाले, “राजू, तू चांगला मुलगा आहेस. ती समोरची गुहा आहे ना तिथे आहेत राजकुमार समरसिंह. पण सांभाळून, त्या गुहेचे रक्षक आहेत कालीचरणचे चार राक्षस. त्यांना संपवायचं असेल तर त्यांच्या नाभीत वार करायला हवा. आणि हे घे, हा अंगरखा आणि हे बूट. हे बूट कोणीही घालो, त्याच्या पावलाच्या आकाराप्रमाणे आकार बदलतात शिवाय ते घातले की माणूस हवेत उडू शकतो. हा अंगरखा आपल्या भोवती गुंडाळला की आपण अदृश्य होतो. या मौल्यवान गोष्टी मी कालीचरणपासून लपवून ठेवल्या होत्या. जा बाळ, यांच्या सहाय्याने समरसिंहांना सोडव. कल्याण हो...”

सोमदेव काकांना नमस्कार करून राजू गुहेकडे निघाला. जवळ पोहोचताच त्याला चित्रविचित्र आवाज येऊ लागले. राजूने आत डोकावून पाहिलं. गुहेच्या मधोमध एक भला मोठा खड्डा होता ज्यात आग पेटली होती. आगीच्या ज्वाळा पार वरपर्यंत जात होत्या. त्याच आगीच्या वरच्या बाजूला एका सोन्याच्या पिंजऱ्यात एक पांढरा पक्षी उदास बसला होता. खड्ड्याच्या एका बाजूला एका नक्षीदार टेबलवर एक सोन्याची चावी ठेवली होती तर दुसऱ्या बाजूला उभी होती जमिनीत खोचलेली चांदीच्या सिंहाच्या मुठीची तलवार. पिंजऱ्याभोवती चार अक्राळविक्राळ पक्षी विचित्र आवाज काढत घिरट्या घालत होते. त्या पक्ष्यांना पाहून राजू घाबरला. त्याने लगेच पायात बूट घातले आणि अंगरखा पांघरला. राजू एकदम दिसेनासा झाला. त्याने एक-दोन पावलं पुढे टाकली. राजू अदृश्य असल्यामुळे ते राक्षसी पक्षी त्याला पाहू शकले नाही. राजूला हायसं वाटलं. त्याने टेबलवर ठेवलेली चावी आपल्या अंगरख्यात लपवली. वर पिंजऱ्यापर्यंत जाण्यासाठी राजूने बुटाच्या टाचा जोडल्या आणि बघता बघता तो हवेत उडू लागला...

पिंजऱ्याजवळ पोहोचताच राजू कुजबुजला, “राजकुमार समरसिंह, मी राजू. तुम्हाला सोडवायला आलो आहे. ही बघा चावी...” राजूने अंगरख्यातून चावी बाहेर काढली. कुलूप उघडताच त्या चारही पक्षांना समजलं. ते पिंजऱ्याकडे झेपावले. तो पांढरा पक्षी पिंजऱ्याबाहेर पडला आणि त्याचं भस्म झालं. समोर दिसू लागले राजकुमार समरसिंह. हवेत कोलांटी उडी मारत त्यांनी सिंहाची मूठ असलेली तलवार उचलली. त्याबरोबर ते पक्षी गायब होऊन चार भयंकर राक्षस प्रकट झाले आणि समरसिंहांवर धावले. राजू अजूनही अंगरख्यात लपून बसला होता. एक डोळा आणि एक शिंग असलेल्या त्या काळकभिन्न राक्षसांनी समरसिंहांना घेरलं. त्यांच्या अजस्त्र तलवारी आणि सिंहाच्या मुठीची समरसिंहांची समशेर एकत्र भिडत होत्या. समरसिंहांनी एका राक्षसाचं मुंडकं छाटलं पण त्याचं शरीर तसंच लढत राहीलं. राजूने लगेच समरसिंहांना त्या राक्षसाच्या नाभीत वार करायला सांगितलं. समरसिंह एकेका राक्षसाच्या नाभीत वार करत गेले. नाभीवर वार होताच ते राक्षस भस्मसात झाले. चारही राक्षस संपले तेव्हा राजू अंगरख्यातून बाहेर आला. त्याने बुटांच्या टाचा पुन्हा जोडल्या आणि तो खाली उतरला. समरसिंह राजूला म्हणाले, “धन्यवाद राजू. तू आम्हास सोडवलेस. आता राजकन्येला सोडवायला हवं पण आधी इथून बाहेर पडू. चल...” दोघंही बाहेर पडले...

राजू आणि समरसिंह बाहेर पडलेले पाहताच जादुगार सोमदेवांना आनंद झाला. झाडाचा आधार घेत ते उभे राहिले. राजूच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले, “राजू, खूप धाडसी आहेस तू. आमच्या समरसिंहांना सोडवून तू खूप मोठं काम केलं आहेस... राजकुमार, तुम्ही सुटलात खरे पण आमच्या राजकन्या नीलमला सोडवणं अजून शिल्लक आहे. मी अंतरज्ञानानं जाणलं आहे की दूर उत्तर दिशेला काळ्या पहाडावर जादुगार  कालीचरणचं साम्राज्य आहे. काळ्या पहाडाच्या सुरुवातीला असलेले चार मोठे पर्वत कालीचरणचे द्वारपाल आहेत. ते तुमच्या येण्याची खबर कालीचरणला नक्की देतील. तो तुमच्यावर हल्ला करेल. त्याच्या मायावी राक्षसांचा सामना करताना त्यांच्या नाभीत वार करा. राक्षस भस्मसात होतील. कालीचरणला महादेवाच्या वरदानामुळे अमरत्व प्राप्त आहे. महादेवांनी त्याच्या मस्तकात स्थानापन्न केलेला अमृतकलश कालीचरणने स्वत:च्या सामर्थ्याने एका पोपटात लपवला आणि त्या पोपटाला तिथेच कैद केले. त्या पोपटाला मारल्यावर कालीचरणचा अंत करणे सोपे जाईल. कालीचरणला संपवायचं असेल तर त्याचा शिरच्छेद करून ते शीर कुठेही स्पर्श न होता कालीचरणनेच निर्माण केलेल्या जहरी तलावात पडले तरच त्याचा अंत होईल. राजकुमार, आम्हा सर्वांची इच्छा आहे की या कामगिरीवर तुम्ही राजूलाही सोबत न्यावे. तो लहान असला तरी हुशार आहे... जा मुलांनो. यशस्वी होऊन या. कल्याण हो...”

राजकुमारने जादूचे बूट घातले. अंगरखा राजूकडे होताच. राजकुमारने राजूचा हात धरला आणि बुटांच्या टाचा जुळवल्या. दोघंही हवेत उडू लागले. ते इतक्या वेगाने गेले की अचानक दिसेनासे झाले. पांढऱ्या ढगांमधून उडत, विहारणाऱ्या पक्षांना मागे टाकत दोघं काळ्या पहाडावर पोहोचले. त्यांना खाली चार पर्वत दिसले आणि त्या पर्वतांच्या मधोमध एक चमकणारा तलाव होता. तोच होता तो विषारी तलाव. समरसिंहांनी बुटाचा टाचा जुळवल्या तसे ते राजूसकट खाली आले. त्या पर्वतांच्या पायथ्याशी पोहोचताच समरसिंह म्हणाले, “राजू, आपण आता जादुगार कालीचरणच्या मुलुखात आहोत. आपण एकत्र राहिलो आणि जर पकडले गेलो तर राजकुमारीला सोडवणं कठीण होईल. तू हे बूट आणि हा अंगरखा घेऊन राजकुमारीला शोध आणि मी इथे कालीचरणच्या राक्षसांच्या तावडीतून तुला मार्ग दाखवतो...” राजूने मान डोलावली. बूट घातले व अंगरखा पांघरला तसा तो अदृश्य झाला. इकडे कालीचरणला द्वारपालांनी वर्दी दिल्यावर कालीचरण म्हणाला, “म्हणजे तो राजकुमार इथवर पोहोचला तर... पण तू नरकात आला आहेस समरसिंह...” आपल्या दोन्ही मुठी दुमडून कालीचरण म्हणाला, “आम हो...”

कालीचरणने हे म्हणण्याची खोटी की एक डोळा, एक शिंग असलेल्या अजस्र राक्षसांचं प्रचंड मोठं सैन्य निर्माण झालं. आपल्या हातातली हत्यारे सरसावत ते राक्षस समरसिंहांच्या दिशेने धावून आले. इकडे अदृश्य झालेल्या राजूने उडताना ते चारही पर्वत पार केले. त्याला समोर दोन ऊंच मनोरे दिसले. एकामध्ये एक सुंदर तरुणी साखळदंडांमध्ये बंदिस्त उदासवाणी होऊन बसली होती. तीच होती राजकन्या नीलम. राजू तिथे पोहोचला व म्हणाला, “नीलमताई... ए नीलमताई... अगं इथे बघ...” राजकन्या नीलमला आवाज तर येत होता पण कोणी दिसत नव्हतं. तिने सगळीकडे नजर फिरवली पण कुणीच दिसेना. राजूने लगेच अंगरखा दूर केला तसा तो दिसू लागला. बुटांच्या टाचा जुळवून राजू खाली आला. राजकन्या नीलमजवळ जाऊन तो म्हणाला, “नीलमताई, मी राजू. मी आणि राजकुमार समरसिंह तुला सोडवायला आलो आहोत...” राजूने सर्वत्र नजर फिरवली आणि भिंतीवर अडकवलेल्या चावीने बेड्या काढत म्हणाला, “या अंगरख्यात ये म्हणजे तुला बाहेर पडताना कोणी पाहू शकणार नाही. राजकुमारी नीलमने राजूचा हात धरला. दोघं अंगरख्यात शिरून अदृश्य झाली. राजूने बुटांच्या टाचा जुळवल्या तशी दोघं हवेत उडून मनोऱ्याबाहेर आली...

मनोरा खूप ऊंचीवर असल्याने आजू-बाजूचा संपूर्ण प्रदेश दिसत होता. राजूला एका बाजूने काळ्या रंगाच्या धुळीचं वादळ दिसलं तर दुसऱ्या बाजूला ते चार पर्वत पार करून राजकुमार समरसिंह मोकळ्या मैदानात आलेले दिसले. राजूने राजकन्या नीलमला ते काळ्या धुळीचं वादळ दाखवलं तशी ती म्हणाली, “अरे परमेश्वरा, ही तर कालीचरणच्या राक्षसांची प्रचंड सेना समरसिंहांवर चाल करून येत आहे आणि समरसिंह एकटेच आहेत. आपल्याला त्यांना मदत करायला हवी. राजू, चल पटकन. त्या बाजूच्या मनोऱ्यात कालीचरणने प्रेमज्योत ठेवली आहे. तीच आता आपली सहायता करू शकेल. कालीचरणला कळायच्या आत आपण ती हस्तगत करू...” दोघंही दुसऱ्या मनोऱ्याकडे झेपावली. निळ्या रंगाचा एक प्रकाश तिथे दिसत होता. राजकन्या नीलमने तो प्रकाश हातात घेतला आणि त्याचक्षणी तिच्या कायेभोवती निळ्या प्रकाशाची एक लकेर तयार झाली. निळ्या प्रकाशाचा प्रचंड मोठा स्रोत आला आणि राजूचे डोळे दिपले. त्याने डोळे उघडले तर राजकुमारी नीलमचं रूप बदललेलं. तिच्या हातात एक चांदीची काठी दिसू लागली. त्या काठीच्या एका टोकाला चांदणीच्या आकाराचा चकाकणारा हिरा होता. राजकुमारी नीलमच्या पाठीवर पंख आले आणि ती एखाद्या सुंदर परीसारखी दिसू लागली. राजू तिच्याकडे पाहतच राहिला. राजकुमारी नीलमने ती काठी समरसिंहांच्या दिशेने रोखली. हिरा चमकला आणि एक प्रखर विजेरी त्यातून निघाली...

राजकुमार समरसिंह तलवार सरसावून मोकळ्या मैदानात आले होते. समोरून येणाऱ्या काळ्या वादळाच्या धुळीचा सामना करण्यासाठी ते सज्ज झाले होते. इतक्यात एक विजेरी त्यांच्या दिशेने आली आणि तिथे निर्माण झाली पांढरा वेष परिधान केलेल्या सैनिकांची प्रचंड मोठी सेना. त्यातला एक सैनिक म्हणाला, “राजकुमार समरसिंह... आम्हाला राजकुमारी नीलमने पाठवले आहे. तुमच्या सोबत असणाऱ्या राजूने कालीचरणच्या नकळत त्यांना मनोऱ्यातून बाहेर काढले आहे. आपला खात्मा करून या सैन्याचा पूर्ण विश्व काबीज करण्याचा मनसूबा आहे. आपण सर्व मिळून त्यांचा प्रतिकार करू...” राजकुमार समरसिंहांनी स्मित केलं. त्या सैनिकाच्या खांद्यावर हात ठेवला. एकवार त्या वादळाकडे पाहिलं आणि पूर्ण जोशात, “आक्रमण...” ही ललकारी दिली. एका बाजूने पांढरा प्रकाश तर दुसऱ्या बाजूने काळे वादळ एकमेकांना भिडले. तुंबळ युद्ध जुंपलं. ऊंचावर असलेला राजू नीलमला म्हणाला, “नीलमताई, तू या जादूच्या काठीने त्या राक्षसांना मारून का नाही टाकत...” राजकुमारी नीलम गोड हसून म्हणाली, “राजू... ही प्रेमज्योत आहे. गरज असल्यावर ती मला आणि स्वत:ला अशी बदलते. पण ती कोणाचाही जीव नाही घेऊ शकत. ही लढाई समरसिंहांची आहे. ते सक्षम आहेत. आपण आता त्या पोपटाला शोधू ज्यात कालीचरणचा प्राण आहे...”

तिकडे कालीचरण त्याच्या वाड्यात बसून सर्व पाहत होता. नीलम मनोऱ्यातून बाहेर आलेली त्याने पाहिली आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मैदानात समरसिंह त्याच्या सैन्यासह एकेका राक्षसाचा समाचार घेत होता तसं ते सैन्य कमी होत होतं. कालीचरण प्रचंड चिडला. आपली जादूची काठी हातात घेत तो गालिचावर स्वार झाला. दुसरीकडे मनोऱ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका गुहेत एका पोपटाला बेड्या घालून कैद केलं होतं. राजकुमारी नीलमने तिची काठी बेड्यांच्या दिशेने रोखली. काठीतील विजेरी त्या बेड्यांवर पडताच त्या वितळून गेल्या. तो पोपट आता मुक्त झाला होता पण तरीही तो उडू शकत नव्हता. नीलमने त्याला कारण विचारलं तसा तो म्हणाला, “राजकुमारी नीलम, आपण माझी सुटका केलीत याबद्दल मी आपला आभारी आहे. पण त्या दुष्ट जादुगाराने त्याचे प्राण माझ्या गळ्यातल्या या मण्यात ठेवले आहेत. त्याच्या वजनामुळे मला उडता येत नाहीये. या मण्याला कोणीही हात लाऊ शकत नाही. लावलाच तर माझं भस्म होईल आणि माझ्या जागी दुसरा एखादा पक्षी किंवा मानव अडकून बसेल...” राजकन्या नीलम हसली. तिने जरा विचार केला आणि तिच्या काठीतून विजेरी सोडली. बारीक विजेची लकेर त्या मण्याभोवती फिरू लागली. त्या माण्याभोवती असलेली साखळी वितळून गेली आणि मणी जमिनीवर पडताच त्याचे दोन तुकडे झाले. आतून लाल रंगाची प्रखर विजेरी गुहेबाहेर गेली...

कालीचरणला सगळं समजलं होतं. एका बाजूला समरसिंह तर दुसऱ्या बाजूला आपला प्राण धारण केलेला पोपट यांपैकी कोणाकडे आधी पहायचं या विचारात गालिचावर उडत तो बाहेर आलामात्र, लाल रंगाची ती प्रखर विजेरी त्याच्या शरीरातून आर-पार गेली. कालीचरणला काहीतरी जाणवल्यासारखं झालं. त्याने त्याच्या जादूच्या काठीचा प्रयोग केला पण काठीवर बसवलेल्या कवटीचे डोळे चमकलेच नाहीत. कालीचरणला समजलं की तो मणी नष्ट झाला आहे आणि आता कालीचरण स्वत:चं जादूचं सामर्थ्य गमावून बसला आहे. त्याने त्याचा मोर्चा समरसिंहांकडे वळवला. समरसिंहांनी व त्या सैन्याने मिळून कालीचरणच्या सर्व राक्षसांना नष्ट केलं होतं. समरसिंहांचा निरोप घेत राजकन्या नीलमने पाठवलेलं सैन्यही अंतर्धान पावलं. परी असलेली राजकुमारी नीलम आणि राजू, समरसिंहांजवळ आले. समरसिंह राजकुमारी नीलमचं ते रूप पाहून स्तब्धच झाले. ते तिघं एकमेकांना भेटणार इतक्यात गालिचावर स्वार झालेला कालीचरण त्यांच्या पुढ्यात येत म्हणाला, “समरसिंह... तू माझ्याच नगरात येऊन माझ्याच सैन्याचा नाश केलास... आता मरणाला तयार हो... आम हो...”

कालीचरणने गालिचावरून खाली उडी मारली आणि समरसिंहांवर धावून आला. समरसिंह आणि कालीचरणचं तुंबळ द्वंद्व जुंपलं. कधी कालीचरण समरसिंहांवर ताबा मिळवी तर कधी समरसिंह वरचढ होत होते. राजू लगेच राजकुमारी नीलमला म्हणाला, “ताई, तू तुझ्या जादूच्या छडीने कालीचरणला धडा का नाही शिकवत...” राजकुमारी नीलम हसली. म्हणाली, “राजू... अरे जादूलाही मर्यादा असते. आणि समरसिंहांना त्यांचा लढा स्वत:च लढू दे की... माझं प्रेम आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या पाठीशी...” द्वंद्व सुरु असताना समरसिंहांच्या जोरदार प्रहाराने कालीचरणचं डोकं छाटलं गेलं. कालीचरणचं डोकं उडत जाऊन चार डोंगरांपैकी एकावर आदळलं आणि स्फोट होऊन क्षणार्धात त्याची वाफ झाली. त्याबरोब्बर कालीचरणच्या धडावर नवं डोकं दिसू लागलं. कालीचरण मोठमोठ्याने हसत होता. राजू जोरात ओरडला, “राजकुमार समरसिंह, त्या कालीचरणचं डोकं त्याने बनवलेल्या तलावात पडलं तरच तो मारेल...” राजकुमारी नीलमला काहीतरी सुचलं. ती म्हणाली, “समरसिंह, कालीचरणचा प्राण असलेला मणी नष्ट झाला आहे पण सोमदेवकाकांचा रत्नहार अजून त्याच्या गळ्यात आहे. तो काढल्याशिवाय कालीचरणचा अंत होऊ शकणार नाही...”

समरसिंहांनी हे ऐकलं न ऐकलं तोच कालीचरणने पलटवार केला. समरसिंह खाली पडले खरे पण त्यांनीही शिताफीनं कालीचरणच्या हातातली तलवार वेगळी केली. हत्यार वेगळं झालं आणि कालीचरण घाबरला. उलटपावली पळत जाऊन गालिचावर स्वार झाला. गालिचा उडू लागला तसं समरसिंहांनी त्यांची तलवार गालिचावर फेकली. तलवारीच्या पातीने गालिचाला भेदलं आणि जमिनीत रुतून बसली. कालीचरण ती तलवार काढणार त्याआधीच समरसिंहांनी गालिचावर उडी मारली आणि जमिनीत खुपसलेली तलवार हातात घेतली. गालिचा हवेत उडून घिरट्या घालू लागला. समरसिंहांनी तलवार सरसावून कालीचरणवर वार केला. वार कालीचरणच्या छातीवर बसला. त्याच्या गळ्यातला जादुगार सोमदेवचा रत्नहार निखळून पडला. जादू संपली असूनही कालीचरणची ताकद प्रचंड होती. समरसिंहांचा तलवारीचा वार रोखत कालीचरणने त्यांच्या पोटात गुद्दा मारला. तलवार खाली पडली. आता दोघांचं द्वंद्व पुन्हा सुरु झालं. कालीचरणची अजस्त्र ताकद विरुद्ध समरसिंहांची चपळाई असं द्वंद्व सुरु असताना गालिचावर पडलेली समरसिंहांची तलवार कालीचरणच्या हाती लागली. त्याने केलेला वार समरसिंहांच्या हातावर बसला...

समरसिंहांच्या दंडातून रक्त वाहू लागलं. तरीही समरसिंह मागे नाही हटले. आपल्या जखमी हातांनी त्यांनी कालीचरणचा वार रोखला. चपळाईने कालीचरणच्या हातावर फटका मारून तलवार हस्तगत केली. कालीचरण काही करू शकेल त्याआधीच समरसिंहांनी एका वारानिशी त्याचं मुंडकं धडावेगळं केलं आणि एक लाथ मारून त्याच्या शरीराला गालिचावरून खाली ढकललं. कालीचरणचं मुंडकं हसत होतं तर त्याचं शरीर हवेत तरंगत खाली जात होतं. लांबवर असलेला राजू राजकुमारी नीलमला म्हणाला, “नीलमताई, ते चार पर्वत त्या तलावाचं रक्षण करतात आणि त्याला झाकून ठेवतात. ते बघ कालीचरणचं मुंडकं त्याच दिशेने चाललंय. काहीतरी कर ना...” राजकुमारी नीलम हसली. तिने तिच्या जादूच्या काठीने प्रखर विजेरी पर्वतांच्या दिशेने सोडली. चारही पर्वत दुभंगले आणि तो विषारी तलाव दिसू लागला. कालीचरणचं मुंडकं तलावात पडलं आणि जळून गेलं. त्याबरोबर हवेत तरंगत असलेलं कालीचरणचं शरीर जळू लागलं आणि जमिनीवर येत येत त्याची राख झाली...

कालीचरण संपताच त्याचं साम्राज्य असलेला काळा पहाडही नाहीसा झाला आणि तिथे दिसू लागली सुंदर हिरवीगार झाडं, नदी, पक्षी, फुलं. गालिचावर स्वार असलेले समरसिंह खाली आले तर दुसरीकडे राजू आणि राजकुमारी नीलमदेखील खाली उतरले. समरसिंहांनी राजकुमारी नीलमचा हात धरला आणि राजूच्या केसातून हात फिरवला. गालिचावर स्वर होऊन तिघंही आनंदवनात परत आले. कालीचरण संपला त्याच वेळी त्याची मायाही नष्ट झाली होती. महाराज पृथ्वीसिंह, महाराज राजेश्वर आणि राणी कलादेवी पूर्ववत झाले होते. तिघांना परत येताना पाहून सर्व आनंदित झाले. राजकुमारी नीलमला परीच्या अवतारात पाहून सर्वांचे डोळे दिपले. राजकुमार समरसिंहांनी जादुगार सोमदेवांचा रत्नहार त्यांना दिला. तो गळ्यात घालताच ते पुन्हा पहिल्यासारखे दिसू लागले. राजकुमारी नीलमने तिच्या हातातली जादूची काठी जादुगार सोमदेवांकडे देताच ती काठी नाहीशी झाली. राजकुमारी नीलमचे पंख अदृश्य झाले आणि परीचा अवतार लुप्त होऊन राजकुमारी नीलम पहिल्यासारखी दिसू लागली...

सोमदेवांनी प्रेमज्योत तिच्या जागी स्थानापन्न करताच त्यातून एक विजेची लकेर सगळीकडे पसरली. सगळा बर्फ नाहीसा झाला. झाडं, पानं, फुलं पुन्हा हलू लागली, जागा बदलू लागली. महाराज पृथ्वीसिंहांनी राजकुमार समरसिंहांचे कौतूक करत राजकुमारी नीलमचा हात राजकुमार समरसिंहांच्या हाती सोपवला. राजकुमारी नीलम गोड हसली तशी तिचे गाल खळी पडून गुलाबी दिसू लागले. सर्वत्र आनंदी आनद पसरला होता. त्यावेळी राजूने तो जादूचा अंगरखा आणि बूट जादुगार सोमदेवांकडे सोपवले. तो थोडा उदास झाला होता. खाली मान घालून उभ्या असलेल्या राजूला पाहून जादुगार सोमदेव म्हणाले, “बाळ, तुला तुझ्या घरची आठवण येते का... आम्ही सर्व जाणतो. चल आमच्यासोबत...” राजू, जादुगार सोमदेव आणि बाकी सगळे त्याच झाडाजवळ आले जिथून राजू आत आला होता. जादुगार सोमदेव म्हणाले, “राजू, हट्टीपणा केला की काय होतं हे तू जाणलंस ना. पाहिलीस ना कालीचरणची अवस्था... तू शहाणा आहेस राजू. तू असा हट्टीपणा नाही करणार ठाऊक आहे आम्हास... आता तुला तुझ्या घराची वाट दाखवतो...”

जादुगार सोमदेवांनी झाडाकडे बोट केलं तसा झाडाचा बुंधा उघडला आणि आतून पांढरा प्रकाश दिसू लागला. जादुगार सोमदेव राजूला म्हणाले, “बाळ राजू, हाच मार्ग तुला तुझ्या घराकडे घेऊन जाईल. तू हुशार आहेस, साहसी आहेस. राजकुमारी नीलमला सोडवण्यात तू समरसिंहांची मोलाची मदत केलीस त्याबद्दल ही माझी अंगठी तुला बक्षीस...” ती रत्नजडित अंगठी पाहून राजूचे डोळे दिपले. त्याने जादुगार सोमदेवांसहित सर्वांना वाकून नमस्कार केला. राजकुमारी नीलम राजूला जवळ घेत म्हणाली, “तुझी खूप आठवण येईल राजू... जा आता तुझ्या घरी. आणि बरं का राजू... मागे वळून पाहू नकोस हो...” सर्वांना टाटा करून राजू झाडाच्या बुंध्यात शिरला. त्याला राहवेना. त्याने मागे पाहिलं तर सगळं धूसर दिसू लागलं आणि सर्वत्र अंधार पसरला. राजू गटांगळ्या खाऊ लागला. “वाचवा... वाचवा... मला वाचवा...” असा ओरडत असताना, “राजू, ए राजू... अरे ऊठ... कोणापासून वाचवा म्हणतो आहेस... ए राजू...” या आवाजाने तो जागा झाला. त्याने पाहिलं तर तो त्याच झाडाखाली बसला होता जिथून तो आत गेला. आजूबाजूला अंधाराशिवाय काहीच नव्हतं. राजूने विचार केला, “बहुतेक स्वप्न पडलं मला...” त्याचा दादा समोर उभा होता. दादाला पाहून राजू त्याला बिलगत म्हणाला, “दादा... I am sorry. मी परत हट्ट नाही करणार. मला माझी चूक समजली...” राजूचा दादा हसत म्हणाला, “राजू, तू शहाणा आहेस राजा... अरे आजच्या चांगल्या दिवशी कशाला रडतोस... घरी चल. तुझी वाहिनी तुझी वाट बघते आहे...”

दोघंही घराकडे चालू लागले. दारात वहिनी डोळ्यात प्राण आणून राजूची वाट पाहत होती. तो दिसताच तिने पटकन त्याला मिठीत घेतलं आणि त्याचे पापे घेऊ लागली. म्हणाली, “राजू... अरे कुठे गेला होतास राजा... मी किती काळजीत होते... आता मला सोडून जाणार नाहीस ना... चल हात-पाय धुवून घे. अरे आज तुझा वाढदिवस आहे. तुझी सगळी मित्रमंडळी येतील बघ पार्टीला आणि तू असा राहणार आहेस का... जा, पळ पटकन...” वहिनीचे डोळे पुसून राजू खोलीत पळाला. कपडे बदलताना त्याला विजारीचा खिसा जड वाटला. त्याने हात घालून मुठीत काहीतरी बाहेर काढलं. पाहतो तर जादुगार सोमदेवांची रत्नजडित अंगठी... अंगठी पाहून राजूच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. तो विचार करू लागला, “अरेच्च्या... म्हणजे जे घडलं ते खरं होतं की स्वप्न... हा काय अजब चमत्कार...”

समाप्त.

Monday, March 5, 2018

जंगल...


रात्रीची वेळ होती. किर्र झाडी... रातकिड्यांचा आवाज... मध्येच कधीतरी कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येत होता... नुकताच पाऊस पडून गेला होता. त्यामुळे रस्ता चिखलाने माखलेला होता... अशावेळी समीर जंगलातून सैरा-वैरा पळत होता. चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ... शर्टावर रक्ताचे डाग... अशा अवस्थेत, "वाचवा... कोणीतरी मला वाचवा..." असं ओरडत तो वाट फुटेल तिथे जात होता. रस्त्यावर पोहोचताच त्याने मोबाईल काढला. रेंजची एकच दांडी दिसत होती. समीरने फोन लावला. बेल वाजत होती पण कोणी उत्तर देत नव्हतं. “प्रदीप, अरे उचल रे फोन... प्लीज उचल...” समीर स्वत:शीच पुटपुटत होता. चालता चालता त्याला मागून आवाज आल्यासारखा जाणवला. त्याच्या कानाच्या बाजूने एक घामाचा थेंब खाली ओघळला. समीरने वळून पाहिलं आणि त्याचा थरकाप उडाला. त्याच्यासमोर एक कुत्रा उभा होता. बुबुळे बाहेर आलेली, रक्ताळलेला जबडा पाहून समीरचा श्वास अडकला. तो पळायला लागला पण अडखळून चिखलात पडला. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण तो चिखलात रुतत चालला होता. त्याने पुन्हा वर हात केला तर समोर होती एक किळसवाणी भयावह आकृती. त्या माणसाच्या मानेचा लचका तोडलेला होता, डोळे बाहेर आले होते, चेहराभर रक्त पसरलेलं होतं... तो माणूस मेला होता पण त्याचं शरीर जिवंत होतं. त्या आकृतीने समीरवर झडप घातली. समीरने आर्त किंकाळी फोडली...

सकाळचे १० वाजले असावेत. एक जीप त्याच रस्त्यावरून जात होती. एक ड्रायव्हर आणि एक जोडपं असलेली ती जीप वेगाने रस्ता कापत होती. “काय हो, तुम्ही म्हणालात हा शॉर्टकट आहे... लवकर पोहोचू... पण हे जंगल तर संपायचं नावच घेत नाहीये... अरुण, मी तुला सांगत होते इथून नको जायला पण तू ना...” त्या जोडप्यातली मुलगी बोलत होती. तिला दिलासा देत तिचा नवरा म्हणाला, “अगं सीमा, किती घाबरतेस... धीर धर जरा. पोहोचू आपण... शिवाय असा साहसी हनीमून परत कधी येईल सांग पाहू...” दोघांचा संवाद चालू असताना ड्रायव्हरला रस्त्याच्या कडेला कोणीतरी पडल्यासारखं जाणवलं. तो गाडी थांबवत म्हणाला, “साहेब, ते बघा... कोणीतरी पडलंय. जाऊन बघायचं का...” अरुणने मानेनेच होकार दिला. सीमामात्र गाडीतून उतरायला धजावत नव्हती पण अरुण सोबत होता म्हणून ती हिम्मत करत उतरली. तिघंही त्या पडलेल्या व्यक्तीच्या जवळ गेले. ड्रायव्हरने चिखलाने माखलेल्या त्या व्यक्तीला सरळ केले. तो समीर होता. त्याच्या नरडीचा घोट घेतला गेला होता. सीमासह अरुण आणि तो ड्रायव्हरसुद्धा चरकला. सीमा म्हणाली, “अरुण, लगेच चल इथून. हे कुठल्यातरी जनावराचं काम दिसतंय... चल लवकर.” तिघं वळली तशी सीमाचा पाय अडकला. पाहिलं तर त्याच मेलेल्या व्यक्तीने सीमाचा पाय पकडला होता. बाहेर आलेले डोळे, उघडं राहिलेलं तोंड... फार विद्रूप दिसत होता तो. अरुण सीमाच्या मदतीला धावला पण तोवर समीरच्या प्रेताने सीमाचा चावा घेतला होता. समीरचं प्रेत सीमाचे लचके तोडत असताना ड्रायव्हरने अरुणला खेचत नेलं आणि तिथून तातडीने गाडी घेऊन गेला. सीमाच्या किंकाळ्या हळू हळू विरत गेल्या...

अरुणचे अश्रू थांबत नव्हते. लग्नाची सुरुवात आणि असं काही होईल हे त्याच्या स्वप्नातसुद्धा आलं नसावं. ड्रायव्हरही काही बोलत नव्हता. त्याला कळत होतं की अशावेळी बोलून काहीच उपयोग नसतो. ड्रायव्हरने गाडी थेट पोलीस स्टेशनात नेली. अरुण अजूनही शॉकमध्ये होता. त्याला सोबत घेऊन ड्रायव्हर आत गेला. समोर एक इंस्पेक्टर बसला होता. त्याच्याकडे जात ड्रायव्हर म्हणाला, “साहेब, आत्ता जंगलातून येताना फार वाईट प्रकार घडलाय... यांच्या बायकोला...” तो काही बोलणार इतक्यात तीन-चार जण एकदम आत शिरत म्हणाले, “सर, आमची आठ माणसं बेपत्ता आहेत...” इंस्पेक्टरने त्यांना हातानेच शांत रहायला सांगितलं व एकाने कोणीतरी बोला असा इशारा केला. त्यातला एक बोलू लागला, “सर, मी प्रदीप. हा जगदीश, ही ललिता आणि हा तपन. आम्ही सर्व डॉक्टर चंद्रांकडे कामाला आहोत. डॉ. चंद्रांना एक प्रयोग करायचा होता. कसला प्रयोग माहित नाही. पण त्यासाठी त्यांना शांत जागा हवी होती. इथून जवळच असलेल्या जंगलाच्या मधोमध आम्ही सर्वांनी मिळून एक प्रयोगशाळा उभारली. डॉक्टर आणि त्यांचे दोन साथीदार, मैथिली आणि सुशील तिथेच राहिले आणि आम्ही बाकी सर्व शहरात परतलो. तीन दिवसांपूर्वीपर्यंत त्या तिघांशी नियमित संपर्क स्थापित होत होता. त्यांचा प्रयोग पूर्ण झाला होता. फक्त चाचणी राहिली होती. अचानक तीन दिवसांपूर्वी त्या तिघांशी आमचा संपर्क तुटला. सुशीलचं शेवटचं वाक्य होतं, “ते आले... ते जवळ आले... वाचवा...” समीर नावाचा आमचा एक सहकारी आमच्यातल्याच चार जणांना घेऊन डॉ. चंद्राच्या शोधात गेला. पण आता तर त्यांचाही काही संपर्क नाही. काल रात्री समीरने मला फोन केला होता. मी उचलला पण समोरून कट झाला. मी परत केल्यावर फोन वाजत राहिला पण कोणी उत्तर नाही दिलं. हे डॉ. चंद्रा आणि बाकी सात जणांचे फोटो...”

प्रदीपने फोटो टेबलवर ठेवले. अरूण शेजारीच उभा होता. फोटोतल्या समीरला त्याने ओळखले. त्याच्यावर बोट ठेवत अरूण म्हणाला, "हाच तो, ज्याने माझ्या सीमाचा... पण हा असा दिसत नव्हता..." इंस्पेक्टर अरूणकडे वळले तेव्हा अरूणच्या बाजूला उभा असलेला ड्रायव्हर म्हणाला, "साहेब हेच मी सांगत होतो... यांच्या मिसेसवर हल्ला झाला. त्या माणसाचा चेहरा खूप भयानक होता. डोळे बाहेर आले होते, तोंड उघडं होतं आणि मानेचा काही भाग गायब असून तिथे रक्त दिसत होतं. तो हाच माणूस होता जो साहेबांनी सांगितला..." प्रदीप हे सर्व ऐकत होता. तो लगेच उत्तरला, "हे कसं शक्य आहे... समीर खूप चांगला माणूस होता आणि तुम्ही म्हणताय तसं जर त्याच्या मानेची ती अवस्था असेल तर तो जिवंत तरी असेल का..." इंस्पेक्टर विचारात पडले होते. काही क्षणात ते म्हणाले, "हे प्रकरण काहीतरी वेगळं जाणवतंय... तुम्ही सर्व घरी जा, आम्ही त्या जंगलात जाऊन तपास करतो..." अरूण पुढे होत म्हणाला, "सर, मी येणार तुमच्यासोबत. माझी सीमा तिथे एकटी आहे. तिला गरज असेल माझी..." अरूणचं ऐकत प्रदीपही बोलता झाला, "सर, आम्हीपण येतो. डॉ. चंद्रा आणि आमच्या इतर सहकाऱ्यांचं काय झालंय ते कळायलाच हवं आम्हाला. शिवाय त्यांच्या लॅबपर्यंतचा रस्ता दाखवू शकतो आम्ही..." इंस्पेक्टरने थोडा विचार केला व म्हणाले, "ठिक आहे. तुम्ही सर्व चला सोबत." ड्रायव्हरकडे पाहत म्हणाले, "तू ही चल रे... दोन गाड्या घेऊन जाऊ आपण. एक तू चालव, एक आमचे जाधव चालवतील... लेट्स गो..."

इंस्पेक्टर, त्यांचे तीन हवालदार; जाधव, शिंदे आणि खरात; प्रदीप, जगदीश, ललिता, तपन, अरुण आणि तो ड्रायव्हर असे दहा जण मोहिमेवर निघाले. जंगलाच्या तोंडावर सर्व पोहोचले. जीपमधून खाली उतरल्यावर जाधव आणि त्या ड्रायव्हरकडे पाहत इंस्पेक्टर म्हणाले, “तुम्ही दोघं इथेच थांबा. काही गडबड झाली तर तुम्हीच शहरात जाण्याचा एकमेव मार्ग असाल. शिंदे, तुम्ही आणि जगदीश डाव्या बाजूने जा. मि. तपन, तुम्ही खरातांसोबत उजव्या बाजूने जा. मी, अरुण आणि प्रदीप समोरून जातो. ललिता मॅडम, तुम्ही इथवर तर आलात, पण पुढे येणं धोक्याचं आहे. तुम्ही गाडीतच थांबा. शिंदे, खरात, आपापल्या बंदुका चेक करून घ्या आणि हो वायरलेसवरून संपर्कात रहा. मूव्ह...” ठरल्या प्रमाणे सार्वजण वेगवेगळ्या दिशेने जंगलात शिरले. जंगल जसे दाट होत गेले तसा अंधार वाढत गेला. इंस्पेक्टर, अरुण आणि प्रदीप पुढे जाताना समोरून काहीतरी येताना दिसलं. नीट पाहिलं तर एक मानवाकृती होती. अरुणने लगेच ओळखलं. ती सीमा होती. “सीमा... सीमा... असं ओरडत अरुण तिच्याकडे जाऊ लागला. इंस्पेक्टर आणि प्रदीप त्याला थांबवायला गेले पण तो पुढेच जात राहिला. अरुण सीमाजवळ पोहोचला आणि तिला पाहून हबकला. लाळ गळावी तसं तिच्या उघड्या जबड्यातून रक्त सांडत होतं. शरीरभर चाव्यांचे ठसे होते. अरुणने काही करायच्या आत सीमाने त्याच्यावर झडप घातली. सीमा अरुणचे लचके तोडू लागली. इंस्पेक्टर आणि प्रदीप स्तब्ध होऊन सर्व पाहत असताना डाव्या बाजूने तशीच मानवाकृती येताना दिसली. प्रदीपने त्याला लगेच ओळखलं. तो डॉ. चंद्राच्या सहकाऱ्यापैकी एक होता. प्रदीप पुढे जाणार इतक्यात इंस्पेक्टरने त्याला अडवलं...

तो सहकारी तसाच दिसत होता जशी सीमा होती. इंस्पेक्टरने लगेच त्यावर गोळी झाडली. गोळी त्याला लागली. तो थोडा मागे ढकलला गेला पण पुन्हा पुढे येऊ लागला. आवाजाने सीमाही उठली आणि काही क्षणात जमिनीवर पडलेला अरूणही उठून इंस्पेक्टर आणि प्रदीपच्या दिशेने चालू लागला. गोळी लागूनही काही परिणाम न झालेली मेलेली शरीरं तीन बाजूंनी अंगावर येताना पाहून इंस्पेक्टर आणि प्रदीप घाबरले व उलट्या दिशेला पळू लागले. तपन आणि खरात हळू हळू पुढे जात होते. तपनला समोर झाडीत पानांची सळसळ दिसली. त्याने खरातांना सांगताच पिस्तुल सरसावत खरात झाडीकडे गेले. पिस्तूल पकडलेल्या हाताने त्यांनी झाडी हलवली. काहीच हालचाल जाणवली नाही म्हणून खरात तपनकडे पाहू लागले त्याच वेळी ते झाडीत खेचले गेले. “खरात... खरात...” तपन ओरडत होता पण खरात झाडीत गायब झाले. त्याने ताबडतोब वायरलेस चालू केला. पलिकडे शिंदे होते. तपन काही बोलणार इतक्यात झाडीतून दोन-तीन मानवाकृत्या बाहेर आल्या. त्यातले एक खरात होते. तपन मागे सरकला. मागूनही अशाच दोन आकृत्या येत होत्या. तपन सर्वबाजूंनी घेरला गेला होता. तो काही करणार इतक्यात खरातांच्या शरीराने त्याच्यावर हल्ला केला. तपनने आर्त किंकाळी फोडली. “खरात... खरात... काय झालं... मि. तपन... बोला काहीतरी... मि. जगदीश, तुमचे सहकारी तपन आणि हवालदार खरातसोबत काहीतरी घडलंय... आपल्याला त्यांच्या मदतीला जायला हवं... चला मि. जग...” शिंदे बोलत होतेच की समोरचं दृश्य पाहून त्यांचा थरकाप उडाला...

त्यांनी खुणेनेच जगदीशला मागे बघायला सांगितलं. मागे दोन जंगली कुत्रे उभे होते. रक्ताळलेला त्यांचा उघडा जबडा, वखवखलेले डोळे, अर्धवट चीर पडलेलं डोकं, हे सर्व पाहून जगदीश व हवालदार दोघंही घाबरले. ते पळायच्या तयारीतच होते की शिंदेंच्या मागून तसाच एक कुत्रा येताना दिसला. एका बाजूला दोन तर दुसऱ्या बाजूला एक कुत्रा असताना काय करावं या विचारात असताना समोरून एक मानवाकृती आली. समीरसोबत डॉ. चंद्रांना शोधायला गेलेल्यांपैकी तो एक होता हे जगदीशने ओळखलं. जगदीश व शिंदे आता घेरले गेले होते. शिंदेंनी पिस्तूल काढलं. कुत्र्यांनी आणि त्या माणसाने एकदम शिंदे व जगदीशवर झडप घातली. एकामागून एक गोळ्यांचे आवाज येऊ लागले आणि काही क्षणातच वेदनादायी किंकाळ्यांपाठेपाठ भयाण शांतता पसरली. "शिंदे कम इन शिंदे... खरात, कोणीतरी बोला... हॅलो..." इंस्पेक्टर त्यांच्या वायरलेसवरून इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. काहीच उत्तर आलं नाही तेव्हा इंस्पेक्टर व प्रदीप एकमेकांकडे पाहू लागले. दोघांच्याही डोळ्यात भिती आणि काळजी एकदम दिसत होती. प्रदीप म्हणाला, "सर, आपल्यावर जसा हल्ला झाला तसाच तुमच्या हवालदारांवर व माझ्या सहकाऱ्यांवर झाला असू शकेल. या जंगलात आता फिरण्यात मला धोका वाटतोय. आपण सरळ डॉ. चंद्रांच्या लॅबकडे जाऊ. तिथून शहरात संपर्क साधू..." इंस्पेक्टरला प्रदीपचं म्हणणं पटलं आणि दोघंही भराभर पावलं टाकू लागले...

अंधार आणि झाडीतून वात काढत धडपडत ठेचकाळत इंस्पेक्टर आणि प्रदीप पुढे जात होते. एका ठिकाणी झाडीत दडलेले तंबू आणि काही खिडक्या दिसल्या. प्रदीपने तिथे बोट दाखवलं. तिच डॉ. चंद्रांची प्रयोगशाळा होती. ते प्रयोगशाळेत शिरणार इतक्यात कोणीतरी इंस्पेक्टरवर झडप घातली. प्रदीपने पाहिलं तर तो सुशील होता. प्रदीपने खाली पडलेलं इंस्पेक्टरचं पिस्तूल उचललं आणि गोळी झाडली. सुशील तसाच चालत होता. प्रदीप मागे सरकला. त्याने डावीकडे पाहिलं तर तो इंस्पेक्टर उभा होता. तसाच निर्जीव पण भयानक. तोही हळू हळू प्रदीपकडे चालू लागला. प्रदीपने पिस्तूल सुशीलवर फेकलं आणि पळत प्रयोगशाळेत गेला. कुठे जावं, काय करावं याचा विचारच करत होता की प्रदीपला डॉ. चंद्रांची लपलेली खोली आठवली. प्रयोगशाळेच्या एका कोपऱ्यात त्या खोलीत जायचा रस्ता होता. प्रदीप त्या कोपऱ्यात पोहोचला. त्याने एकवार सगळीकडे पाहिलं आणि फरशी बाजूला सारली. खाली जाण्यासाठी एक दोराची शिडी होती. प्रदीप आत गेला. फरशी परत सारखी करून तो शिडीने खाली उतरला. खाली बऱ्यापैकी अंधार होता. टॉर्चच्या प्रकाशात प्रदीपला एका कोपऱ्यातल्या खोलीत हालचाल जाणवली. त्याने दार ढकललं. त्या अंधुक प्रकाशात त्याने पाहिलं तर डॉ. चंद्रा एका कोपऱ्यात उभे होते. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्यांच्या हातात एक सुरा होता आणि भेदरलेली नजर खोलीभर फिरत होती. “डॉ. चंद्रा... डॉ. चंद्रा... मी आहे मी, प्रदीप... डॉ. चंद्रा...” त्यांच्या जवळ जात प्रदीप म्हणाला. थोडा पुढे आल्यावर डॉ. चंद्रांनी त्याला ओळखलं. “प्र... प्रदीप... तू आलास... मी इथे पूर्ण अडकलोय... काय सांगू तुला... काय घडलं इथे...

मेलेल्या व्यक्तीला जिवंत करता येतं की नाही हा माझा प्रयोग होता. त्यासाठी या जंगलाची मी निवड केली. या जंगलात अनेक उपयुक्त वनस्पती आहेत. त्यांच्या सहाय्याने मी मृत शरीराला जिवंत करण्याचं औषध तयार केलं. प्रयोग तर झाला होता. फक्त चाचणी बाकी होती. सुशीलला जंगलात एक मेलेलं कुत्र सापडलं. प्रयोगाच्या चाचणीसाठी तो ते इथे घेऊन आला. मी हे औषध त्याच्या शरीरात इंजेक्ट केलं. काही क्षणात त्या कुत्र्याचं शरीर गरम होऊ लागलं. मला वाटलं माझा प्रयोग यशस्वी होत आहे. पण सगळं चित्रच बदललं. त्या कुत्र्याचं शरीर भाजू लागलं. त्याला छोटी छोटी भोकं पडू लागली. ते कुत्र उठलं पण त्यात जीव नव्हता. जणू काही मेलेलं शरीर आमच्या समोर उभं होतं. तेव्हा मला समजलं की माझं औषध फक्त शरीराला जागं करतं. त्यात चेतना नाही भरू शकत. मला हे कळेपर्यंत उशीर झाला होता. त्या कुत्र्याने मैथिलीवर झडप घातली होती. त्या कुत्र्याचं ते रूप आणि मैथिलीची अवस्था पाहून सुशील खूप घाबरला. त्याने तिथून पळ काढला. ते कुत्रही सुशीलच्या मागे धावलं. मी मैथिलीजवळ गेलो. ती निपचित पडली होती. तिला उठवणार इतक्यात तिने चेहरा वळवला. ती वखवखलेली नजर आणि तो उघडा जबडा पाहून माझा थरकाप उडाला. मी तिथून लगेच पळालो आणि इथे येऊन लपलो. पुढे काय मला काहीच माहित नव्हतं. ते औषध असलेली एक सिरींज माझ्याजवळ होती. इथे बसून मी त्यावर पुन्हा प्रयोग सुरू केला आणि हा अँटीडोड बनवला. जवळच मारून पडलेल्या झुरळावर आधी ते औषध टाकलं. ते झुरळ उडू लागलं. मी लगेच तो अँटीडोड त्यावर टाकला. त्याबरोबर ते झुरळ होतं तिथेच स्तब्ध झालं आणि हळू हळू जळून गेलं. माझा अँटीडोड यशस्वी झाला होता. पण तरीही बाहेर जायला मी धजावत नव्हतो. तू आलास... आता माझी हिम्मत परत येत आहे...”

प्रदीप सर्व ऐकत होता. त्याने डॉ. चंद्रांना धीर दिला. म्हणाला, “डॉ., तुमचे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले खरे पण जंगलात हाहाकार माजला आहे. नुसत्या प्राण्यांनी भरलेलं हे जंगल आता अतिभयानक अशा हिंस्त्र पशूंनी व्यापलं आहे. जंगलातलीच नाही तर तुमच्या शोधार्थ आलेले आपले सहकारी आणि पोलीससुद्धा या वायरसच्या कचाट्यात सापडलेत. आपल्याशिवाय दुसरं कोणीच आता इथे जिवंत नाही. आपल्याला वाचायचं असेल तर इथून बाहेर पडलं पाहिजे. इथे तर छोटंसं झुरळ होतं पण बाहेर... डॉ., अजून काही साधन आहे ज्याने आपण या अँटीडोडचा वापर करू शकतो...” डॉ. चंद्रांनी जरा विचार केला आणि म्हणाले, “इंजेक्शन गन्स आहेत प्रयोगशाळेत. त्यांच्या सहाय्याने आपण अँटीडोड फायर करू शकतो... पण इथून बाहेर पडलो आणि त्यांनी आपल्याला धरलं तर...” डॉ. चंद्रा भितीने कापत होते. प्रदीप त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “डॉ. चंद्रा... आपण मारले जाऊ या भितीने आपण इथेच बसून राहणार आहोत का... जरा विचार करा... या घडीला ती बाधित माणसं आणि जनावरं इथे जंगलात आहेत. पण... ते बाहेर पडले तर मानवजातीवर केवढं मोठं संकट ओढवेल... नाही डॉ. आपल्याला हे धाडस करायलाच हवं. ते औषध हा एकमेव उपाय आहे. मी हे काम एकटा नाही करू शकणार पण आपण दोघं मिळून हे करू शकतो... चला डॉ...” डॉ. चंद्रा हसले. त्यांनी प्रदीपशी हस्तांदोलन केलं. दोघंही दोराच्या शिडीने वर जाऊ लागले...

प्रदीपने फरशी थोडी किलकिली करून सभोवार नजर फिरवली. अंधाराशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. प्रदीप आणि डॉ. चंद्रा वर प्रयोगशाळेत आले. टेबलवर पडलेल्या दोन इंजेक्शन गन्सपैकी एक त्यांनी प्रदीपला दिली. सोबत आणलेले अँटीडोड सिरींजेसमध्ये भरून त्यातल्या अर्ध्या प्रदीपच्या हवाली केल्या. म्हणाले, “आपण इथून नक्कीच बाहेर पडू. लेट्स होप फॉर दि बेस्ट...” दोघं हात मिळवून वळले तर डॉ. चंद्राच्या समोर मैथिली उभी होती. ती काही करणार इतक्यात प्रदीपने गन चालवली. मैथिली जागच्या जागी खिळली. हळू हळू तिच्या शरीरातून वाफ येऊ लागली. तिचं शरीर आतल्या आत भाजत गेलं आणि काळठिक्कर पडलं. प्रदीप आणि डॉ. चंद्रा हसले आणि बाहेर पडले तर समोर सुशील होता आणि त्याच्या हातात इंस्पेक्टरचं पिस्तूल होतं. पुढे येत येत सुशीलने पिस्तुलातून गोळी झाडली. डॉ. चंद्रांनी ती चुकवली आणि सुशीलवर गन चालवली. सुशीलचीही अवस्था मैथिलीसारखीच झाली. सुशीलने चालवलेली गोळी डॉ. चंद्रांना चुकवून थेट प्रयोगशाळेच्या इलेक्ट्रिक सर्कीटवर आदळली. शॉर्ट सर्कीट होऊन प्रचंड स्फोट झाला आणि प्रयोगशाळा भस्मसात झाली. डॉ. चंद्रांनी एकवार प्रयोगशाळेकडे पाहिलं आणि डोळे पुसून ते प्रदीपसोबत चालू लागले. जंगलात आले तेव्हा डॉ. चंद्रानना माहित होतं की इथे दोन-तीन जंगली कुत्रे आहेत. दोघांनी आधी त्या कुत्र्यांचा शोध घेतला. इंजेक्शन गन्सच्या मदतीने आधी त्यांचा खात्मा केला. एकेक करत जंगलात बाधलेल्या आपल्या सहकाऱ्यांवर, पोलिसांवर आणि इतर बाधित जणांवर गन्सच्या सहाय्याने अँटीडोड फायर करत त्यांना संपवत प्रदीप आणि डॉ. चंद्रा अखेर मुख्य रस्त्यावर आले. समोर उभ्या असलेल्या जीप्स पाहून प्रदीपला हायसं वाटलं. तो म्हणाला, “डॉ... तीन इंजेक्शन्स शिल्लक आहेत अजून आणि आपण बाहेर आलो. वी मेड इट डॉ...” डॉ. चंद्रांना तिथेच उभं करून प्रदीप हळू हळू जीपकडे जाऊ लागला...

प्रदीप जीपजवळ पोहोचला. दारं सताड उघडी होती. आत कोणीच नव्हतं. प्रदीप विचारात पडला, "हवालदार जाधव, तो ड्रायव्हर व ललिता कुठे गेले..." प्रदीप वळला आणि डॉ. चंद्रांना पाहून घाबरला. त्यांनी गन प्रदीपसमोर ताणली होती. तो काही बोलणार इतक्यात डॉ. चंद्रांनी फायर केलं. गनमधून सुटलेल्या इंजेक्शनने प्रदीपमागून येणाऱ्या हवालदार जाधवचा बरोब्बर वेध घेतला होता. डॉ. चंद्रा पुढे झाले. प्रदीपजवळ येणार इतक्यात त्यांचा पाय कोणीतरी धरला. तो तोच ड्रायव्हर होता जो जीप घेऊन आला होता. डॉ. चंद्रा काही करणार इतक्यात त्या ड्रायव्हरने त्यांच्या पायाचा चावा घेतला. प्रदीपने गन फायर केली आणि तो ड्रायव्हर संपला. डॉ. चंद्रा आणि प्रदीप दुसऱ्या जीपजवळ गेले. प्रदीपने आत डोकावलं तर ललिता सीटच्या खाली जीव मुठीत घेऊन बसली होती. “ललिता... नशीब तू ठीक आहेस. मला वाटलं त्या ड्रायव्हर आणि हवालदार जाधवप्रमाणे तूही... “प्रदीप तिला बाहेर काढत म्हणाला. ललिता जरा स्थिरस्थावर होत म्हणाली, “अरे काय सांगू तुला... तुम्ही गेलात आणि इथे आमच्यावर दोन कुत्र्यांनी हल्ला केला. त्यातल्या एकाने माझ्यावर झेप घेतली पण ड्रायव्हरने मला वाचवलं. मी लगेच सीटखाली लपून बसले. सारखे आवाज येत होते पण बाहेर पडण्याची किंवा बघण्याची मला भीती वाटत होती... हळू हळू आवाज बंद झाले पण तरीही मी इथेच लपून राहिले. प्रदीप, चल आपण जाऊ इथून...” प्रदीपने ललिताला धीर दिला. तो डॉ. चंद्रांकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर विजयी आनंद दिसत होता. तो म्हणाला, “डॉ. चंद्रा, आपण जिंकलो. हे बघा... एक इंजेक्शन शिल्लक असताना आपण सर्व बाधीत जनावरं आणि माणसं यांचा खात्मा केला...” डॉ. चंद्रा नकारार्थी डोकं हलवत म्हणाले, “नाही प्रदीप... अजून सर्व संपले नाहीत. एकजण अजून बाकी आहे...” बोलता बोलता डॉ. चंद्रांनी त्यांचा पाय दाखवला...

डॉ. चंद्राच्या पायाला घोट्याजवळ एक जखम दिसत होती. ती हळू हळू वाढत होती. ती जखम दाखवत डॉ. चंद्रा म्हणाले, “प्रदीप, तू त्या माणसावर गन चालवलीस खरी पण त्याआधीच त्याने माझ्या पायाचा चावा घेतला होता. मीही बाधीत झालोय... प्रदीप, तुझ्याकडे राहिलं हे शेवटचं इंजेक्शन बहुतेक माझ्याचसाठी होतं. नाईस वर्किंग विथ यू प्रदीप. माझा प्रयोग यशस्वी झाला पण वेगळ्या पद्धतीने. तुझ्याकडे ते औषध आहेच... तू त्यावर रिसर्च कर. तूही नक्की यश मिळवशील. गुड लक. आय अॅम रेडी... शूट...” प्रदीप गन चालवायला तयार नव्हता. काही क्षणातच प्रदीपच्या डोळ्यांदेखत डॉ. चंद्रा बदलले. वखवखलेल्या डोळ्यांचे, उघडा जबडा असलेले डॉ. चंद्रा पाहून प्रदीप चरकला. त्याने “सॉरी डॉक्टर...” म्हणत गन चालवली. डॉ. चंद्रा तसेच स्तब्ध झाले. आतल्या आत जळत जाऊन काळे पडले. प्रदीपने हात वर करून, “गुड बाय डॉक्टर...” म्हटलं आणि ललिताला गाडीत बसायला सांगितलं. गाडी वेगाने शहराकडे निघाली. प्रदीप ललिताशी बोलू लागला, “डॉ. चंद्रा आपल्यासोबत येऊ शकले नाहीत... पण त्यांच्या या औषधावर अजून प्रयोग करून आपण त्याचं नाव अमर करू शकतो... हो ना...” ललिता एकटक खिडकीबाहेर पाहत होती. आपल्या बोलण्याकडे ललिताचं लक्ष नाही म्हटल्यावर प्रदीपने तिला स्वत:कडे वळवलंमात्र... तिचे वखवखलेले डोळे, उघडा जबडा पाहून प्रदीपने किंकाळी फोडली. जीप वेडीवाकडी पळत एका झाडावर आदळली. सर्वत्र शांतता पसरली. काही क्षणात दोन्ही बाजूंचे दरवाजे उघडले. प्रदीप आणि ललिता बाहेर पडले आणि चालू लागले. तेच वखवखलेले डोळे आणि उघडे जबडे... दोघं चालत होते त्या दिशेला रस्ता संपतो तिथे लांबवर शहरामधल्या बिल्डींगचे वरचे माजले दिसत होते...

समाप्त.