सोसाट्याचा वारा सुटला होता. अंधारातून वाट काढत
बर्फाच्या मोठ्या वाळवंटातून दोघंजण पुढे जात होते. एक हातात जाडजूड काठी घेतलेला, अंगावर घोंगडी असलेला असा ताकदवान गडी होता. तर दुसऱ्याने हातात बाक आलेली
काठी धरली होती आणि ती व्यक्ती कमरेत बऱ्यापैकी वाकली होती. बर्फाने झाकलेली एक
टेकडी समोर आली आणि दोघं थांबले. दुसऱ्याने एक चादर जमिनीवर हंतरली. त्यावर
पाण्याने भरलेलं वाडगं ठेवत काहीतरी पुटपुटलं. बघता बघता वाडग्यातलं पाणी हलायला
लागलं. पाण्याचा रंग काळा पडला आणि त्यातून एक वीज निघून समोरच्या टेकडीवर आदळली.
जमीन हादरू लागली. टेकडीवरचा बर्फ गळून पडला आणि टेकडीचं रूप पालटलं. समोर दिसू
लागली राक्षसाचं तोंड असलेली एक प्रचंड मोठी गुहा...
दुसऱ्याने पहिल्या माणसाला इशारा केला. तो पहिला
माणूस आत गेला. पुढे जात असताना त्या माणसाने पाहिलं तर सर्वत्र बर्फच बर्फ होता. बर्फाच्या
भिंतीत त्याचं प्रतिबिंबपण दिसत होतं. हळू हळू पुढे जाताना तो माणूस एका वनाशी
पोहोचला. भीत भीत त्याने वनात प्रवेश केला. आजू-बाजूला चकाकणारी झाडं होती.
त्याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. चित्रविचित्र आवाज येऊ लागले. कुठे ओरडण्याचा
आवाज तर कुठे पानांची सळसळ,
कुठे सापाचा "फस..." असा आवाज तर कुठे वाघाची डरकाळी
होती. तो माणूस खूप घाबरला. काही वेळ उभा राहिला. कानोसा घेऊन तो पुढे जाणार इतक्यात
त्याला मागून कोणीतरी बोलावलं. त्याने मागे पाहिलंमात्र... सगळा अंधार झाला.
जमिनीला फट पडली आणि, "आऽऽऽ..." असं ओरडत तो माणूस
त्यात पडून नाहीसा झाला...
ओरडण्याचा आवाज ऐकून गुहेबाहेर असलेल्या दुसऱ्या
व्यक्तीने आत डोकावलं. वाऱ्यासरशी त्याच्या अंगावरची चादर दूर झाली आणि समोर दिसली
मोठमोठ्या काजळ लावलेल्या डोळ्यांची, ओबडधोबड चेहऱ्याची,
वाकलेली लांबच लाब नखं असलेली एक चेटकीण. ती म्हणाली, "काय माझं मेलीचं नशीब... एकही जण ही गुहा पार करेल तर शपथ... कोणी
पाताळातच गेला तर कोणाचं भस्मच झालं... काय करू वेताळा काही समजत नाही..." ती
बोलत असतानाच जोरदार वाऱ्याच्या झोतासरशी ती चेटकीण गुहेबाहेर पडली. गुहेच्या
तोंडाचा तो राक्षस मोठ्या आवाजात म्हणाला, "चेटके... तू
आणलेला कोणीच मला पार करू शकला नाही... माझ्यातल्या विचित्र गोष्टीच देतील याची
ग्वाही... आता आण असा माणूस जो मला करेल पार... तोच ठरेल तुझा तारणहार..." हे
बोलत असताच ती गुहा लुप्त झाली पुन्हा बर्फाचं वाळवंट सभोवार दिसू लागलं...
थंडगार वाऱ्यात ती चेटकीण कुडकुडत म्हणाली,
“म...मी आहे ठकी चेटकीण... मला व्हायचंय अमर... त्यासाठी मला हवेत त्या
राक्षसाच्या घामाचे थेंब... त्या राक्षसाचा वाडा आहे त्या गुहेच्या पल्याड... मी
ही अशी म्हातारी, गुहा पार करताना मोडणार नाही का माझं हाड... आता वेताळालाच
पाचारण करते... तोच दाखवील मजं रस्ते...” असं म्हणत ठकीने आपली चादर पसरली. त्यावर
वाडगं ठेऊन त्यात पाणी भरलं आणि जोरजोरात मंत्र म्हणू लागली “अगडम् बगडम्... अगडम्
बगडम्... वेताळा वेताळा दाखव तिगडम्... आणील जो दाणे अमृताचे... पाहूदे मजं रूप
त्याचे...” वाडग्यातलं पाणी हलू लागलं आणि त्यातून एक वीज निघून आकाशात नाहीशी
झाली. मोठ्ठा गडगडात झाला आणि आकाशात दिसू लागला वेताळाचा अक्राळ विक्राळ चेहरा.
मोठमोठ्याने हसत वेताळ म्हणाला, “हा... हा... हा... ठके ठके कशाला बोलावलंस मला...
जे तू मिळवू शकली नाहीस असं काय हवंय तुला...”
ठकी म्हणाली, “वेताळा वेताळा, मला व्हायचंय
अमर... त्यासाठी हवेत राक्षसाच्या घामाचे थेंब... राक्षस राहतो त्या गुहेच्या
पलिकडे... मी अशी म्हातारी कशी बरं जाऊ तिकडे... दाखव मला असा कोणी, ज्याकडे असेल शक्ती
व युक्तीचे देणे... जो पार करून ती गुहा... आणेल ते अमृताचे दाणे...” वेताळ आपले
मोठ्ठे हात हवेत फिरवू लागला. आकाशात विजा चमकू लागल्या. एक वीज पाण्याच्या
वाडग्यात पडली. काही क्षणात वेताळ म्हणाला, “सापडला ठके सापडला तुझा माणूस... पार
तिकडे दक्षिणेला... आहे सुंदरनगर... तिथेच राहतो हा शंकर... वापर तुझी युक्ती, कर
त्याचे मन काबीज... तोच आणून देईल तुला, तुझ्या अमरत्वाचे बीज...” ठकीने पाण्यात
पाहिले. तिला शंकरचा चेहरा दिसला. वेताळ एकाएकी गायब झाला आणि ठकी “ही... ही...
ही...” अशी किळसवाणी हसू लागली...
तिकडे दक्षिणेला डोंगरांच्या पायथ्याशी आणि
समुद्राच्या किनाऱ्याशी वसलेलं सुंदरनगर खरंच खूप सुंदर होतं. नगराचा राजा
सुंदरसेन व राणी रूपमती खूप दयाळू आणि प्रेमळ होते. आपल्या प्रजेला मदत करायला ते नेहमी
तयार असायचे. त्यांची एकुलती एक कन्या राजकुमारी मोहिनी नुकतीच वयात आली होती.
दिसायला नक्षत्रासारखी, आवाज तिचा कोकिळेसारखा आणि स्वभावाने अत्यंत नम्र अशी
राजकुमारी मोहिनी सर्वांना खूप आवडायची. ती उपवर झाली तेव्हा प्रधानांनी तिच्या
स्वयंवराचा प्रस्ताव राजासमोर ठेवला. राजाला हा प्रस्ताव आवडला त्याने
स्वयंवरासाठी आजूबाजूच्या सर्व राजकुमारांना आमंत्रित केलं. राजकुमारी मोहिनी
म्हणाली, “पितामहाराज, आपण माझ्या विवाहासंदर्भात विचार करताय हे योग्यच आहे पण मी
अशी तशी नाही कोणाची निवड करणार... स्वयंवरात एक परीक्षा असेल... जो त्या परीक्षेत
खरा उतरेल... तोच माझ्या मनी वसेल...”
राजकुमारी मोहिनीच्या स्वयंवराची आणि ती घेणार
असलेल्या परीक्षेची बातमी नगरात सर्वत्र पसरली. त्याच नगरात शंकर राहत होता.
देखणा, बलदंड, उंचपुरा असा शंकर लाकडाच्या मोळ्या विकून आपला उदरनिर्वाह चालवी.
जंगलात लाकडं गोळा करत असताना एक-दोनदा त्याने घोडदौड करणाऱ्या राजकुमारी मोहिनीला
पाहिलंही होतं. मोहिनीबद्दल त्याच्या मनातही प्रेम होतंच. तो नेहमी स्वप्न पहायचा,
“जर राजकुमारी आणि माझं लग्न झालं तर... कित्ती मज्जा येईल...” स्वयंवराचा दिवस
उजाडला. तो सोहळा पाहण्यासाठी शंकर इतर सर्वांसोबत राजवाड्यात दाखल झाला.
राजवाड्याच्या मागच्या पटांगणात सर्व व्यवस्था केली होती. एकाबाजूला राजा, राणी
आणि राजकुमारी बसले होते. एका बाजूला आमंत्रित राजकुमार बसले होते आणि एका बाजूला
समस्त जनता. पण त्या पटांगणात काय होणार हे कोणालाच ठाऊक नव्हतं...
प्रधानांनी इशारा करताच घोषणा झाली, “महाराजांचा
विजय असो... आज राजकुमारी मोहिनी यांच्या स्वयंवराचा दिवस उगवला आहे... मोहिनीदेवी
आजच्या दिवशी त्यांचा भावी जोडीदार निवडणार आहेत. त्यासाठी त्या परीक्षा घेणार
आहेत. त्या परीक्षेविषयी मोहिनीदेवीने सर्वांना सांगावं अशी त्यांस नम्र
विनंती...” घोषणा संपली आणि राजकुमारी मोहिनी उठून उभी राहिली. एकवार सर्वांकडे
पाहत म्हणाली, “पितामहाराज आणि मातोश्रींना प्रणाम आणि समस्त आमंत्रितांचे स्वागत.
आज मी जी परीक्षा पाहणार आहे त्यात शक्ती आणि युक्ती दोघांचाही कस लागणार आहे. जो
कोणी होईल पारंगत या परीक्षेत... तोच मिळवील स्थान माझ्या मनाच्या कक्षेत...” बोलत
असताना मोहिनीने टाळी वाजवली. पटांगणाच्या दोन टोकांना असलेल्या दोन पिंजऱ्यांची
दारं उघडली आणि सात फुटी ऊंच व ताकदवान असलेले दोन राक्षसवजा इसम समोर आले. मोहिनी
म्हणाली, “परीक्षेचा पहिला भाग आहे या दोन शस्त्रधारी योध्यांना हरवणं आणि दुसरा
भाग म्हणजे मला स्पर्श न करता माझ्या डोळ्यात पाणी आणणं...”
पटांगणात फेऱ्या मारणाऱ्या त्या अजस्र माणसांना
पाहून सर्वांनी तोंडात बोटं घातली. शिवाय “स्पर्श न करता डोळ्यात पाणी...
अशक्य...” अशी कुजबूज सुरू झाली. आमंत्रित राजकुमारांपैकी एकेक पुढे होऊ लागला पण
त्या योद्धयांपुढे कोणीच काही करू शकलं नाही. बिचारे खाली मान घालून तिथूनच
राजवाड्याबाहेर निघून गेले. बघता बघता सर्व राजकुमार आपापल्या वाटेने निघून
गेल्यावर समस्त जनतेत शांतता पसरली. प्रधान म्हणाले, “महाराज, हे तर मोठं अघटित
घडलं... स्वयंवरात कोणाचीच निवड झाली नाही... निकालाविनाच हा समारंभ संपवायचा
का...” सगळे विचारात पडले. “महाराजांचा विजय असो...” शांतता भेदणारा हा आवाज
जनतेच्या दालनामधून आला. सर्वांनी तिथे पाहिलं तर शंकर त्याच्या जागेवर उभा होता.
शंकरचा देखणा चेहरा, पिळदार शरीर आणि तेजस्वी डोळे पाहून मोहिनीने स्मित केलं.
शंकर म्हणाला, “महाराज, आपली आज्ञा आणि राजकुमारीची परवानगी असेल तर मी परीक्षा
द्यायला तयार आहे...”
महाराजांनी एकवार मोहिनीकडे पाहिलं. तिचा हसरा
चेहरा पाहून त्यांनी शंकरला लगेच अनुमती दिली. महाराजांचा आज्ञेचा हात दिसताच
शंकरने उभ्या जागेवरून पटांगणात उडी घेतली ती थेट त्या दोन योद्ध्यांच्या मधोमध.
आपली कुऱ्हाड सरसावत त्याने एकेकदा दोघांकडे पाहिलं. इशारा होताच दोन्हीही योद्धे
शंकरकडे धावत आले. आपल्या कुऱ्हाडीने शंकरने काही काळ त्यांचा प्रतिकार केला खरा
पण त्यांच्या अजस्र ताकदीपुढे शंकरचा काही निभाव लागत नव्हता. शंकरला एक युक्ती
सुचली. आपापल्या भल्या मोठ्या तलवारी घेऊन ते दोन्हीही योद्धे शंकरकडे धावत आले.
शंकर तसाच उभा राहिला. सर्वांना वाटलं आता शंकरची काही खैर नाही... अगदी शेवटच्या
क्षणी शंकर खाली बसला. दोघांच्याही तलवारींचे घाव एकमेकांना बसले. दोघंही एका
क्षणात गतप्राण झाले. महाराजांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि आपल्या गळ्यातील
हार काढून शंकरकडे भिरकावला. शंकर म्हणाला, “धन्यवाद महाराज. आता दुसऱ्या
परीक्षेसाठी मी राजकुमारीला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या दालनात जाऊन सर्व
खिडक्या, झरोखे आणि दारं बंद करून घ्यावीत व मी सांगेपर्यंत उघडू नयेत...”
सर्वांनाच या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मोहिनीने
एकदा शंकरकडे पाहिलं आणि पुन्हां स्मित करून आपल्या दालनाकडे वळली. दालनाच्या
सगळ्या खिडक्या आणि दारं बंद केले गेले. मोहिनी दालनात एकटीच बसली होती. काही
क्षणातच दालनाच्या एका झारोख्यातून धूर आत येऊ लागला. धूर चांगलाच जळजळणारा
असल्याने मोहिनीला ठसका लागला आणि क्षणभरातच तिच्या डोळ्यांमधून घळाघळा पाणी येऊ
लागलं. शंकरने इशारा केला आणि दालनाचं दार उघडलं गेलं. महाराज सुंदरसेन आत आले.
त्यांनी पाहिलं तर मोहिनीच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ती हसत होती. म्हणाली,
“पितामहाराज, यांनी माझे दोन्ही पण पूर्ण केलेत आणि मला जिंकलं आहे... आपली आज्ञा
असेल तर...” महाराज सुंदरसेन यांनी मोहिनीचं मन ओळखलं. “शंकर, शक्तीपेक्षा युक्ती
श्रेष्ठ असते हे तू दाखवून दिलंस. माझी या विवाहाला अनुमती आहे...” असं म्हणत
दोघांच्याही डोक्यावर हात ठेवत महाराज सुंदरसेन यांनी विवाहाला परवानगी दिली. शंकर
आणि मोहिनीच्या विवाहाच्या बातमीने सर्वत्र आनंदी आनंद पसरला. महाराज सुंदरसेन
यांना त्यांचा भावी महाराज मिळाला होता तर मोहिनीला मिळाला तिच्या मनातील
राजकुमार. सगळीकडे असं आनंदी वातावरण असताना सुंदरनगरच्या जंगलाबाहेर ठकी चेटकीण
येऊन पोहोचली...
नगराच्या वेशीबाहेर असलेल्या जंगलात ठकीने एक
झोपडी बांधली. एका जख्ख म्हातारीचा वेश तिने घेतला आणि नगरात फेरफटका मारू लागली.
फिरताना ठकीची नजर शंकरला शोधत होती. नगरात फिरत असताना शंकर आणि मोहिनीच्या
लग्नाविषयी तिला समजलं. ठकी विचार करू लागली, “अरे माझ्या कर्मा... कसं हे अघटित
घडलं... इथे तर सर्व मंगलमय झालं... असं सगळं छान छान असताना... का बरं माझी मदत
करेल हा शहाणा... आता लढवले शक्कल... करते काहीतरी युक्ती... भाग पाडीन शंकरला...
मिळवेन अमर शक्ती...” विचित्र नजरांनी सगळीकडे पाहत ठकी तिच्या झोपडीकडे परतली. संध्याकाळ
सरत चालली होती. ठकी झोपडीत येरझारा घालत होती. काय करावं, कसं करावं हे काही
ठकीला सुचत नव्हतं. इतक्यात ठकीला एक युक्ती सुचली. तिने चादर पसरली. वाडग्यात
पाणी भारून त्यावर ठेवलं आणि मंत्र म्हणू लागली “अगडम् बगडम्... अगडम् बगडम्... ठके
ठके दाखव तिगडम्... सर्पदंश होऊ दे मोहिनीला... घालावे तिने आलिंगन निद्रेला...”
वाडग्यातील पाणी हलू लागलं. आतून निघालेल्या विजेने समोर एक गोळा तयार केला.
प्रकाशाने ठकीचे डोळे दिपले आणि समोरून “फस्स....” असा आवाज आला...
विजा नाहीशा झाल्या. ठकीने डोळे उघडले तर समोर
मोठ्ठा फणा उभारलेला, पिवळ्या डोळ्यांतून हिरवी बुबुळे असलेला एक काळा साप दिसत
होता. “ही... ही... ही...” डोळे मोठे करत ठकी किळसवाणी हसू लागली. दाराकडे बोट
दाखवत ठकी म्हणाली, “जा सर्पा जा... दंश कर राजकन्येला... निद्रेच्या कवेत जाईल
ती... शंकर तिच्यासाठी आणेल... मजं अमृताचे मोती... ही... ही... ही...” सापाने ठकी
दाखवत असलेल्या दिशेला पाहिलं आणि सरपटत दाराबाहेर निघून गेला. तिथे महालात मोहिनी
खिडकीबाहेर पाहत होती. शंकर आत येताच त्याची तलवार आणि अंगरखा घेत म्हणाली “आज
स्वारीला अंमळ उशीरच झाला म्हणायचा कक्षात यायला...” शंकर हसत म्हणाला, “प्रिये,
अगं आज समजतंय की महाराजांना किती काम असतं... प्रजेसाठी काही विकासाची कामे हाती
घेतली आहेत ना...” नाक मुरडत मोहिनी म्हणाली, “तर तर... प्रजेसाठी वेळच वेळ आणि
आमच्यासाठीमात्र दुष्काळ... हो ना...” मोहिनी पलंगाच्या काठावर जाऊन बसली. शंकर तिच्या
शेजारी बसत तिला मनवू लागला. वारा मंद मंद वाहत होता अशा या शांत वातावरणात ठकीने
पाठवलेला साप हळू हळू महालाकडे येत होता...
महालातले सर्व दिवे, पणत्या अचानक विजल्या.
कोणाला काहीच सुचत नव्हतं. शंकर म्हणाला, “प्रिये, तू इथेच पलंगावर बसून रहा. मी
पाहून येतो काय झालं ते...” जायला निघालेल्या शंकरचा हात घट्ट धरत मोहिनी म्हणाली,
“नको नको... तुम्ही इथेच थांबा माझ्यासोबत...” शंकरने तिला धीर दिला. तिला पलंगावर
बसवली आणि कक्षाबाहेर पडला. बाहेर दास-दासींची पळापळ चालू होती. एकाला थांबवून
शंकरने दिवे जाण्याचं कारण विचारलं तर तो म्हणाला, “कारण समजत नाही महाराज. अचानक
अंधार झाला. आम्हाला काही सुचायच्या आत “फस्स...” असा आवाज आला. इथे नक्कीच एखादा
सर्प शिरला असावा अंधारात...” शंकर जरा वेळ थबकला आणि तडक आपल्या कक्षाकडे वळला.
कक्षाकडे येत असताना, “आ...ई... गं... महा...रा...ज...” असा आवाज आला. शंकर कक्षात
शिरला आणि दिवे लागले. त्याने पाहिलं तर मोठ्ठे डोळे करून मोहिनी त्याच्याकडे येत
होती आणि पलंगाच्या जवळ एक मोठ्ठा काळा साप वेटोळे घालून फणा काढून उभा होता.
मोहिनी शंकरच्या कवेत शिरली आणि तिची शुद्ध हरपली. तो सापही अचानक शंकरच्या
डोळ्यांदेखत गायब झाला. झाडीत लपलेली ठकी चेटकीण हसत म्हणाली, “ही... ही... ही...
चला सर्पाने आपले काम चोख केले... राजकुमारीला त्याने निजवले... आता जाते महाली
घेऊन एक युक्ती... मिळवतेच ती अमरत्वाची शक्ती... ही... ही... ही...”
वैद्यांना पाचारण केले गेले. राणी रूपमतीची आसवं
थांबत नव्हती आणि महाराज सुंदरसेन तर खूपच हवालदिल झाले होते. वैद्यांनी मोहिनीला
तपासलं. गुटी उगाळून तिच्या तोंडात ते चाटण घातलं पण मोहिनी बरी होत नव्हती.
शंकरकडून घडलेला प्रकार समजल्यावर ते म्हणाले, "हा कसलातरी
जादूटोणा दिसतोय. ज्या अर्थी तो साप अदृष्य झाला त्याअर्थी तो सर्प साधा नाही. हे
प्रकरण माझ्या हाताबाहेर आहे. माफी असावी..." वैद्यबुवा निघून गेले आणि महाराज
व महाराणी यांना दु:ख अनावर झाले. शंकर त्यांना धीर देत होता पण त्याचाही धीर खचत
चालला होता. अखेर नगरात दवंडी पिटवली गेली, "डम...डम...डम...
ऐका हो ऐका... राजकुमारी मोहिनीला बरं करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वजनाइतकं सोनं
देण्यात येईल हो... डम...डम...डम..." सोन्याच्या लालसेपोटी अनेक जण पुढे आले
पण राजकुमारी मोहिनी बरी होण्याचं नाव घेईना... तिथे ठकीनेसुद्धा ही दवंडी ऐकली
होती. तिच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागलं...
तिने मनोमन विचार केला, "आता करते वेषांतर... गाठते राजवाडा... हा शंकरच आता पाडेल... माझ्यावर
अमृताचा सडा... ही... ही... ही..." विचित्र हसत ठकीने म्हातारीचं सोंग घेतलं
आणि थेट राजवाड्यावर पोहोचली. महाराजांनी परवानगी देताच ती मोहिनीच्या कक्षात दाखल
झाली. मोहिनीला तपासण्याचं नाटक करून झाल्यावर ती कक्षातून बाहेर आली. शंकर, महाराज
आणि महाराणी तिच्या मागेच होते. ठकी बाहेर येत म्हणाली, "राजकुमारीला ज्या सर्पाने दंश केला तो मंतरलेला होता. त्याच्या दंशाने
राजकुमारी मोहिनी निद्रितावस्थेत गेली आहे. तिला बरं करण्याचा एकच उपाय आहे पण खूप
कठिण आहे..." शंकरने कसलाही विचार न करता, "मोहिनीसाठी
मी कोणतेही दिव्य करेन..." असे सांगून टाकले. त्यावर ठकीने त्याला जंगलातल्या
तिच्या झोपडीत बोलावले व तिथून निघून गेली. शंकरने महाराज व महाराणीची समजूत
काढली. मोहिनीला त्यांच्याजवळ सोपवलं. प्रधानजींना कारभारावर लक्ष ठेवायला
सांगितलं आणि तो तडक निघाला...
एका घोड्यावर शंकर आणि त्याच्या मागे सैन्याची
एक तुकडी असे सगळे ठकीच्या झोपडीपाशी पोहोचले. सर्वांना बाहेर थांबायला सांगून
शंकर आत गेला. ठकी त्याचीच वाट पाहत होती. ठकी म्हणाली, “आलास शंकर... नीट ऐक मी
सांगते काय... दूर हिमालयात आहे मोहिनीच्या आजाराचा उपाय... हिमालयात एक लाबलचक
वाळवंट आहे. त्याच्या मधोमध आहे एकुलती एक टेकडी. त्या टेकडीच्या आत करावा लागेल तुला
एकट्यालाच प्रवेश... तेव्हा सापडेल तुला हिमासुराचा प्रदेश... पायऱ्या उतरून खाली
गेलास की लागेल तुला एक जंगल... तुझं ध्यान विचलित करण्या तिथले सर्व लढवतील शक्कल...
न लक्ष देता जाशील निळाईतून तू पुढे मात्र... लागेल तेव्हा तुला तलावाचे भले मोठे
पात्र... पार करून तो तलाव जाशील तू पल्याड... पण बाहेर पडण्याआधी त्यातले पाणी
जरूर काढ... समोर दिसेल तुला मोती नारळासारखा... ओत ते पाणी त्याच्यावर... निघेल
एक झाडं ऊंचपुरे जे घेऊन जाईल तुला वर... तिथे आहे हिमासुराचा वाडा प्रवेश त्यात
कर... घेऊन ये त्याचे घर्मबिंदू जे करतील मोहिनीला बरं लवकर...”
टेकडीचं द्वार उघडण्यासाठी लागणारं मंतरलेलं
पाणी, चादर, वाडगं आणि मंत्र असं सर्व ठकीने शंकरला दिलं. म्हातारीला नमस्कार करून
शंकर झोपडीबाहेर आला. आपल्या सैन्यास पाहून त्याने विचार केला, “जर जायचं आहे मला
एकट्यालाच गुहेत... तर का बरं एवढेजण सोबत हवेत...” शंकरने सेनाधिकाऱ्यास तिथे
जंगलातच तळ ठोकून म्हातारीचं रक्षण करण्याची आज्ञा दिली आणि आपला घोडा घेऊन निघाला
मोहिमेवर. झोपडीत, आपल्याला आता लवकरच अमरत्व प्राप्त होणार म्हणून म्हातारीच्या
वेशातली ठकी मनोमन सुखावली होती. मजल
दरमजल करत शंकर हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचला. पुढे डोंगरांची चढण आणि त्यापुढे
बर्फ त्यामुळे शंकरने घोड्याला तिथेच पायथ्याशी राहणाऱ्या एका माणसाला सुपूर्द
केले. त्याला थोड्याशा मोहरा देऊन घोड्याची निगा राखण्यास सांगून शंकर डोंगर चढू
लागला. हळू हळू डोंगराळ मातीचा प्रदेश मागे सरत गेला आणि गार गार वाऱ्याच्या
झोतांसरशी सगळीकडे बर्फच बर्फ दिसू लागला. म्हातारीने सांगितलेलं बर्फाचं ते लांबच
लांब पठार शंकरच्या नजरेस पडलं आणि दूरवर दिसत होती एक छोटीशी टेकडी...
शंकर जसजसा टेकडीजवळ पोहोचला तसतशी टेकडी मोठी
होत होती. राजवाड्याहूनही मोठ्या टेकडीच्या पायथ्याशी पोहोचताच शंकरने चादर पसरली,
त्यावर वाडगं ठेऊन त्यात म्हातारीने दिलेलं पाणी ओतलं. त्या टेकडीकडे पाहत
मोठमोठ्याने मंत्र म्हटला. बघता बघता वाडग्यातलं पाणी हलायला लागलं. पाण्याचा रंग
काळा पडला आणि त्यातून एक वीज निघून समोरच्या टेकडीवर आदळली. जमीन हादरू लागली.
टेकडीवरचा बर्फ गळून पडला आणि टेकडीचं रूप पालटलं. समोर दिसू लागली राक्षसाचं तोंड
असलेली एक प्रचंड मोठी गुहा. ते राक्षसाचं तोंड बोलू लागलं, “हा... हा... हा...
आता तू आलास... त्या ठकीने तुला तिच्या जाळ्यात ओढलं तर... असशील खरा शूरवीर तर
टाक पाऊल पुढे आणि कर आत प्रवेश...” शंकर मनातल्या मनात विचार करू लागला, “कोण
ठकी... कसलं जाळं... बहुदा हा मला विचलित करण्याचा प्रकार दिसतोय... पण मी असा
डगमगणार नाही...” तलवार सरसावत शंकर पुढे झाला. त्याला लांब गोलाकार जिना खाली
जाताना दिसला...
एकेक पायरी उतरत शंकर खाली आला. आजूबाजूचा
बर्फाळ प्रदेश नाहीसा होत ती जागा घनदाट जंगलाने घेतली. सगळीकडे चमकणारी झाडं होती.
कुठल्या दिशेला जावं तेच शंकरला समजत नव्हतं. अचानक एक निळ्या रंगाचा प्रकाश
त्याच्या समोरून गेला आणि त्या प्रकाशाने नागमोडी वळणाची एक वाट उघड करून दिली. त्या
निळ्या रंगाच्या वाटेवरून शंकर पुढे सरकत असताना त्याला चित्रविचित्र आवाज येऊ
लागले. कोणी त्याचे नाव पुकारत होतं, तर कुठे त्याला प्रत्यक्ष मोहिनी दिसत होती.
कुठे वाघाची डरकाळी होती तर कुठे हत्तींचे चित्कार होते. पण शंकर विचलित झाला
नाही. निळ्या प्रकाशाची वाट त्याने सोडली नाही. काही झाडांच्या फांद्या तर त्याची
वाट अडवून होत्या. पण शंकरने तलवारीने त्या कापून काढल्या. चालता चालता शंकरला पाण्याचा
आवाज आला. त्याने पाहिलं तर थोड्या अंतरावर त्याला तलाव दिसू लागला. तलावाजवळ
पोहोचताच शंकरने मागे टाकलेलं जंगल अचानक गायब झालं आणि त्याबरोबर गायब झाले त्यातून
येणारे आवाज आणि होणारे भास. तलावाच्या किनाऱ्यावर एक होडी होती. शंकर तीत बसला
आणि वल्हवू लागला. तलावाचं पाणी तसं शांत होतं. शंकर मधोमध पोहोचला आणि पाणी डचमळू
लागलं...
शंकरची होडी जोरजोरात हलू लागली. शंकर सावरतोय
तोच भली मोठी मगर पाण्यावर आली आणि आपला जबडा उघडून शंकरकडे झेपावली. शंकरने इतकी
मोठी मगर कधीच कुठेच पाहिली नव्हती. तिचा जबडा एखाद्या बोग्द्यासारखा वाटत होता. त्या
मगरीने एका घासातच होडीचा पार चेंदामेंदा केला. शंकरने वेळीच पाण्यात उडी मारली
म्हणून तो वाचला. आता तलावात शंकर आणि ती मगर असे दोघेच होते. आजूबाजूला होते
मगरीने नष्ट केलेल्या होडीचे तुकडे. एका तुकड्यावर शंकरची तलवार त्याला दिसली.
मगरीने तिचे हिरवेगार डोळे एकदा उघड-बंद केले आणि शंकरकडे झेपावली. शंकरने
तलवारीच्या दिशेने सूर मारला आणि तलवार पाण्यात पडायच्या आत हस्तगत केली. तलवार
सरसावून त्याने मगरीवर उडी घेतली. शंकरला पाडण्यासाठी ती मगर पाण्यात गरागरा फिरू
लागली. संधी हेरून शंकरने तिच्या पोटाच्या भागावर सपासप वार केले. मगर गतप्राण
होऊन पाण्यावर आदळली. काही क्षणातच ती महाकाय मगर पाण्यात विरघळून गेली. पाणी
पुन्हा शांत झालं. शंकर तलावाबाहेर आला पण तलावातले पाणी घ्यायला तो विसरला नाही.
तलावाबाहेर पडताच पाणी पूर्ण सुकून गेलं. जिथे ती मगर पाण्यावर आदळली तिथे जमिनीवर
काहीतरी चकाकणारी वस्तू शंकरला दिसली...
शंकर हळू हळू पुढे झाला. त्याने पाहिलं तर
शहाळ्याच्या आकाराचा पांढराशुभ्र मोती त्याला दिसला. शंकर तो मोती घ्यायला पुढे
वाकला आणि थबकला. तलावातून घेतलेलं पाणी त्याने मोत्यावर ओतलं. मोती हलायला लागला.
मोत्याचे दहा तुकडे झाले आणि दाही दिशांना फेकले गेले. खाली उरला हिरव्या रंगाचा
एक छोटा मणी. त्या मान्यातून एक वेल सरपटत वरवर जाऊ लागला. ढगांच्याही पलिकडे ऊंच
आकाशात गेलेला तो वेल हळू हळू वाढत जाऊन एका भल्यामोठ्या वृक्षात त्याचं रुपांतर
झालं. शंकरने तो वृक्ष चाचपडला. लोखंडासमान मजबूत अशा त्या वृक्षावर शंकर चढू
लागला. लाकडाचं काम करत लहानाचा मोठा झाल्याने वृक्षावर चढणं शंकरला सोप्पं गेलं.
वृक्षावर चढत शंकर ढगांच्याही वर पोहोचला. वृक्षाच्या शेवटच्या फांदीवर उभा राहून
शंकरने चौफेर नजर फिरवली. काळ्या ढगांमधून एक ऊंचच्या ऊंच मनोरा डोकावत होता. शंकर
विचार करू लागला, “तोच दिसतोय हिमासुराचा वाडा. पण तिथवर जायचं कसं... म्हातारीने
तर झाडापर्यंतचाच मार्ग दाखवला होता... आता...” विचार करताना शंकरला एक युक्ती
सुचली. त्याच वृक्षाच्या फांद्या आणि वेली वापरून शंकरने एक बेचकी तयार केली. तीत
स्वत:ला बसवलं आणि झाडाला अडकवलेला वेल तोडला. त्याबरोबर शंकर हवेत उडू लागला...
हवेत उडत शंकरने काळ्या ढगांना पार केलं आणि
समोर दिसू लागला मोठ्ठाला वाडा. त्या वाड्याच्या भोवताली सुकलेली झाडं होती.
त्यातल्या एका झाडाच्या वेली चा आधार घेत शंकर जमिनीवर उतरला. राजवाडा एखाद्या
पर्वतासारखा विशालकाय होता. मोठ्ठाल्या प्रवेशद्वाराला एक छोटीशी फट दिसत होती.
शंकर त्या फटीतून आत शिरला. त्याबरोब्बर वाडा प्रकाशमान झाला. शंकर चौफेर नजर
फिरवताना अवाक झाला. मोत्यांचे पडदे, हिरेजडित नक्षीकाम केलेली आसनं पाहून शंकरचे
डोळे दिपले. शंकर वाड्यात फिरत असताना, “शंकर... आलास तू...” हा आवाज वाडाभर
घुमला. शंकर थबकला आणि आवाज कुठून येतोय ते शोधू लागला. पुन्हा तोच आवाज घुमू
लागला, “अरे असा इथे तिथे पाहू नकोस... मीच तो... तुला हवा असलेला हिमासूर...
ये... जिना चढून वर ये...” शंकरने तलवार सरसावली आणि जिना चढून वर गेला. एका
लांबचलांब दालनाच्या शेवटी एक भीमकाय, अजस्त्र राक्षस बसला होता. संपूर्ण बर्फाने
वेढलेल्या त्या राक्षसाला एकच डोळा होता. शंकरला तलवार सरसावलेला पाहून हिमासूर
म्हणाला, “बाळ, अरे असा घाबरू नकोस... मी तुझीच वाट पाहत होतो...”
शंकर बुचकळ्यात पडला, “इतक्या मोठ्या राक्षसाला
माझ्या मदतीची काय गरज... आणि याला माझं नाव कसं माहित...” हिमासूर जागेवरून उठला
आणि शंकरकडे चालू लागला. त्याला येताना पाहून शंकरने त्याचे विचार झुगारून टाकत
तलवारीने वार केला. वार हिमासुराच्या डोळ्यावर बसला. त्यासरशी हिमासूर गायब झाला
आणि धुराचा एक लोट समोर दिसू लागला. हळू हळू धूर कमी होऊन एक माणूस समोर आला.
त्याने पूर्ण पांढरी वस्त्र परिधान केली होती आणि त्याच्या भोवती पांढऱ्या रंगाचं
वलय होतं. तो माणूस शंकरजवळ येत म्हणाला, “बाळ शंकर, मी एक देवदूत आहे... एकदा
स्वर्गातल्या देवदूतांचं आणि नरकातल्या असुरांचं तुंबळ युद्ध जुंपलं. त्यावेळी
असुरांना मी मदत केली आणि मला सहाय्य दिलं माझ्या भावाने. देवदूत युद्ध जिंकले आणि
माझं कृत्य उघकीस आलं. मला आणि माझ्या भावाला अनंत काळापर्यंत पृथ्वीवर राहण्याची
शिक्षा मिळाली. मी गयावया केली तेव्हा मला सांगितलं गेलं की शंकर नावाचा मुलगा
माझी आणि माझ्या भावाची या शिक्षेतून मुक्तता करेल...
या वाड्यात मी कैद झालो. माझ्यापर्यंत
पोहोचण्यासाठी ते जादूचं जंगल आणि तो तलाव निर्माण केला गेला. तलावात तू ज्या
मगरीला मारलंस तो माझा भाऊ होता. तो मुक्त झाल्याचं मला समजलं आणि मी मनोमन खुश
झालो. तूच तो एकमेव जो आम्हला मुक्त करू शकतो याची मला खात्री पटली. आता तुझी मदत
केली की मला मुक्ती मिळेल...” सर्व ऐकून शंकर म्हणाला, “म्हणजे तुम्ही माझी मदत
करणार... पण मला तर हिमासुराच्या घामाचे थेंब हवे होते आणि तुम्ही... आता माझी
मोहिनी कशी झोपेतून जागी होणार...” देवदूत हसत म्हणाला, “बाळ, हिमासुराच्या घामाचे
थेंब प्राशनकर्त्याला अमरत्व देतात हे मीच पसरवलं जेणेकरून तू इथे येशील किंवा
कोणीतरी तुला इथे येण्यास भाग पाडेल. राजकुमारी मोहिनीला जो साप दंश करून गेला तो
मंतरलेला होता. त्याला पाठवणारी होती ठकी चेटकीण. हो शंकर... तुला इथला मार्ग
मार्ग दाखवणारी जंगलातली ती म्हातारीच ठकी चेटकीण आहे. तिला संपवलंस तर तिची
जादूही संपेल आणि मोहिनी बरी होईल. तुला विश्वास बसणार नाही सहाजिक आहे. बघ या
आरशात...” शंकरने आरशात पाहिलं. गुहेत प्रवेश करण्यासाठी ठकीने दिलेल्या बळींपासून
तिने घेतलेल्या म्हातारीच्या रूपापर्यंत सर्वकाही शंकरला समजलं. देवदूत म्हणाला,
“शंकर, अजूनही तुझा विश्वास नसेल तर हा मोती घे...
त्या ठकीजवळ जाऊन तो जमिनीवर जोरात आदळ. जमिनीचा
स्पर्श होताच मोत्याच्या आसपास असलेली सर्व जादू, तंत्र-मंत्र नष्ट होईल आणि
त्याच्या प्रभावाखाली असलेले सर्व मुक्त होतील. सामान्यांवर त्याचा काहीएक परिणाम
होणार नाही. मी आता तुला गुहेच्या बाहेर पोहोचवतो...” असं म्हणत देवदुताने हात वर
केला. शंकर आणि देवदूत एकाएकी गायब झाले आणि थेट गुहेबाहेर प्रकटले. शंकरने
देवदूताला वाकून नमस्कार केला. देवदुताने त्याला आशीर्वाद तर दिलाच पण शंकरच्या
चांगुलपणावर प्रभावित होऊन अनेक हिरे, माणिक, मोती, सुवर्ण मुद्रा व एक पांढरा
शुभ्र घोडा उपहार म्हणून दिला. इतक्यात आकाशातून एक पांढरा प्रकाश त्या देवदुतावर
पडला. त्या प्रकाशात तो देवदूत आणि ती गुहा दोन्हीही अंतर्धान पावले. सर्व धन
आपल्या घोड्यावर लादून स्वत: देवदुताने दिलेल्या घोड्यावर स्वर होऊन शंकर माघारी
निघाला. मजल दरमजल करत शंकर नगराजवळ पोहोचला. आत प्रवेश करण्याआधी ठकीचा बंदोबस्त
करावा म्हणून जंगलात शिरला. ठकी आतुरतेने शंकरची वाट पाहत होती...
शंकर दिसताच तिने म्हातारीचा वेष धारण केला आणि
लगोलग बाहेर आली. म्हणाली, “बाळ शंकरा... आलास तू... मी तुझीच वाट पाहत होते रे...
दे ते हिमासुराच्या घामाचे थेंब मला दे पटकन... म्हणजे मोहिनीला आपण बरं करू
चटकन...” शंकर काहीही न बोलता झोपडीबाहेर पडला. ठकी त्याच्या मागेच होती. ती अजून
काही बोलणार इतक्यात शंकर म्हणाला, “ठके... तू चेटकीण आहेस ना... मला सगळं समजलं
आहे... माझ्या मोहिनीला तूच मूर्च्छित केलंस ना... थांब आता तुला चांगली अद्दल
घडवतो...” असं म्हणत शंकरने कमरपट्ट्यात लपवलेला मोती काढला आणि हात वर उचलला. हे
पाहून ठकी म्हातारीच्या रूपातून चेटकिणीच्या रुपात आली आणि मोठ्ठे डोळे करून
शंकरकडे झेपावली. शंकरने लगेच मोती जमिनीवर आदळला. मोत्याचे दोन तुकडे झाले आणि
त्यातून एक प्रचंड मोठं वावटळ निघालं. ते वावटळ पाहून चेटकीण घाबरली आणि पळू
लागली. ते वावटळ अजून मोठं होत गेलं. चेटकिणीसह तिच्या झोपडीलाही त्याने खेचलं.
“ना....ही... शं...कर... तुला सोडणा...र नाही... वेता...ळा...” ठकी असं किळसवाणं
ओरडत त्या वावटळात नाहीशी झाली. सगळीकडे शांतता पसरली...
ठकी संपल्याने जंगलावर पसरलेली अवकळा नाहीशी
झाली. तिथे महालात मोहिनीला हळू हळू जाग आली. सुंदरसेन महाराज व राणी रूपमती तिच्या
बाजूलाच बसले होते. मोहिनीने त्यांना आलिंगन दिलं. शंकर नगरात परतला. नगरात
सर्वत्र रोषणाई होती. प्रजा आनंदी दिसत होती. शंकरची मोहीम यशस्वी झाली होती हे
एव्हाना सर्वांना समजलं होतं. सोबत आणलेले धन शंकरने खजिन्यात जमा केले. मोहिनी
बरी झाली होती. शंकर एक कुशल राज्यकर्ता म्हणून प्रजेच्या मनात वसला होता. हे सर्व
पाहून सुंदरसेन महाराजांनी शंकरचा राज्याभिषेक करवला आणि मोहिनीला व सुंदर नगरीला
त्याच्या स्वाधीन करून राणी रूपमतीसह तीर्थयात्रेला निघून गेले. शंकर आणि मोहिनीच्या
सुखी संसारासोबत सुंदरनगरीसुद्धा प्रगतीशील झाली...
समाप्त.