Thursday, June 7, 2018

बेटाचे रहस्य...



सकाळची वेळ होती. चौकीवर नेहमीप्रमाणे काम चालू होते. इतक्यात तिघंजण आत शिरले. समोर सब इंस्पेक्टर सचिन होता. त्या तिघांमधला एक म्हणाला, “सर, आमच्या मित्राला वाचवा हो... तो हरवला आहे...” सचिन सकट सर्वाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. तो माणूस पुन्हा बोलता झाला, “सर, मी विकास, हा अविनाश आणि हा रमण. आम्ही तिघं आणि सिद्धांत कॉलेजचे मित्र आहोत. डिग्री मिळाली आणि आम्ही चौघांनी पार्टनरशीपमध्ये नवा बिझिनेस सुरू करायचं ठरवलं. पुढच्या आठवड्यात आमच्या नव्या कंपनीचं ओपनिंग आहे. त्याआधी थोडा समुद्रविहार करावा असा चौघांचा विचार ठरला. आम्ही एक बोट भाड्याने घेतली आणि समुद्रसफर सुरू केली. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या सात बेटांना भेट द्यावी असं आम्ही ठरवलं. फिरत असताना बुचर आयलंडच्या दक्षिणेला आम्हाला एक बेट दिसलं. ते आजवर कधी पाहण्यात आलं नव्हतं. बुचर आयलंडचा नकाशा पाहिला तर हे बेट या आयलंडचाच एक भाग असावा असं दिसतं. आम्ही तिथे गेलो तर एका मोठ्या विंचवाने आमचं स्वागत केलं. त्याच्यापासून वाचून आम्ही पुन्हा किनाऱ्याला येत असताना सिद्धांतचा पाय एका सापळ्यात अडकला. आम्हाला तिघांना तिथून त्याने जायला सांगितलं. आम्हाला त्याला सोडून जायचं नव्हतं पण जे काही आम्ही पाहिलं त्यामुळे आम्हीही घाबरलो होतो. तिथून निघालो आणि तडक इथे आलो...” प्रधान हनवटी चोळत म्हणाले, “इंटरेस्टिंग... आनंद आणि सचिन तुम्ही चला माझ्याबरोबर. उमा तू इथेच थांब. इथून आमच्या संपर्कात रहा. लेट्स गो...”

उमाला प्रधानांचं म्हणणं पटलं नाही. ती म्हणाली, “सर, तिथे जर खरंच असं काही... आणि तुम्ही म्हणताय मी इथेच राहू...” प्रधान उमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, “उमा, डोंट गेट इमोशनल... हे तिघं त्या बेटाचं जे वर्णन करत आहेत, कदाचित तिथे धोका असू शकतो. जर आम्ही तिथे अडकलो किंवा आमचा संपर्क तुटला तर बेटाच्या बाहेर असणारी तू आमची मदत करू शकशील... सो... स्टे हियर... आनंद, सचिन... तयारी करा... आपण तासाभरात निघतोय...” थोड्याच वेळात प्रधान, आनंद, सचिन आणि सहा पोलीस अशी नऊ जणांची तुकडी सफरीवर निघाली. बुचर आयलंडला वळसा घालून बोट त्या अज्ञात बेटाकडे वळली. जवळ पोहोचताच पाण्याखाली लपलेल्या खडकावर बोट आदळली आणि थांबली. प्रयत्न करूनही बोट पुढे जात नाही हे पाहिल्यावर प्रधानांनी सर्वांना उतरायला सांगितलं. पाण्यातून हळू हळू पुढे जात सर्व किनाऱ्यावर पोहोचले. प्रधान म्हणाले, “टीम, आपलं प्राईम टार्गेट आहे सिद्धांतला शोधणं आणि त्याच बरोबर या बेटाचं रहस्य जाणून घेणं. सो आनंद, तू या दोघांना घेऊन डाव्या बाजूने जा. सचिन, या दोघांसोबत तू उजव्या बाजूने जा आणि मी या दोघांसोबत या मधल्या वाटेने जातो. सतत संपर्कात रहा... ऑल दी बेस्ट...” तीन तुकड्या तीन दिशांना गेल्या. प्रधान, आनंद आणि सचिन आपापल्या तुकड्यांचं प्रतिनिधित्व करत होते. फांद्या कापत सर्व पुढे जात होते. सचिनला कसलासा आवाज ऐकू आला...

तो म्हणाला, “थांबा. कसलातरी आवाज येत आहे... रातकिड्याचा वाटतोय...” ते हवालदार व सचिन आवाजाचा शोध घेऊ लागले. हळू हळू आवाज वाढत जाऊ लागला. एक हवालदार म्हणाला, “सर, आवाज तर वाढत चाललाय... हा एका रातकिड्याचा आवाज वाटत नाही... आणि रातकिडे दिवसा का असतील...” दुसरा हवालदार वॉकीटॉकीवरून इतरांशी संपर्क साधतच होता की आवाजाची पट्टी प्रचंड वाढली. आवाज इतका वाढला की तिघांनी दोन्ही कानांवर हात ठेवले. तिघांच्याही कानातून रक्त येऊ लागलं. जसजशी आवाजाची पातळी वाढत होती तसतसं त्यांना ते असह्य झालं. वॉकीटॉकी घेतलेला हवालदार कोसळला. सचिन आणि दुसरा हवालदार त्या कोसळलेल्या हवालदाराच्या जवळ जात असताना दुसरा हवालदारही कोसळला. सचिनने पटकन वॉकीटॉकी उचलला आणि आवाजाच्या उलट्या दिशेने पळू लागला. त्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न कला पण वॉकीटॉकी काम करत नव्हता. पुन्हा तोच रातकिड्यांचा आवाज येऊ लागला. सचिनने कानावर हात ठेवले पण उपयोग झाला नाही. सचिन खाली पडून सरपटत जाण्याचा प्रयत्न करू लागला.  तिथे आनंद आणि त्याचे दोन साथीदार पुढे जात असताना त्यांना एकदम अंधार झालेला जाणवला. एका हवालदाराने टॉर्च पेटवला. त्यांच्या तीन बाजूंनी धुक्यासारखं येताना दिसलं. तिघंही स्तब्ध उभे होते. काही क्षणातच धुक्याने त्या तिघांना वेढलं...

आनंदसह ते हवालदार हळू हळू खोकायला लागले. जसं धुकं दाट होत गेलं तसं त्यांचं खोकणंही  वाढू लागलं. या धुक्यात काहीतरी गडबड आहे हे आनंदला जाणवलं. एका हवालदाराच्या खोकल्यातून रक्त पडू लागलं. तो हवालदार कोसळला आणि श्वासासाठी तडफडू लागला. काही क्षणातच तो मेला. हा विषारी धूर आहे हे एव्हाना आनंद आणि राहिलेल्या हवालदाराच्या लक्षात आलं होतं. दोघंही धुक्यापासून लांब पळू लागले. धुकं त्यांचा पाठलाग करू लागलं. पळता पळता आनंदचा पाय एका दगडावरून सरकला. आनंद गडगडत एका खड्ड्यात पडला. “सर... सर... खोक... ख...खोक...” आनंद धडपडत असताना वर हवालदाराचा येणारा आवाज हळू हळू कमी होत बंद झाला. आनंद ज्या खड्ड्यात पडला होता त्यावर धुक्यानं एक गडद पडदा बनवला... “कम इन आनंद... हॅलो, सचिन... शीट... कोणीच जवाब देत नाहीये... काय झालं असेल त्यांच्यासोबत...” प्रधान गोंधळून गेले होते. त्यांच्या वॉकीटॉकीवर खरखरीशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं. ते पुढे चालू लागले. त्यांचा पाय खाली असलेल्या पाचोळ्यावर पडला आणि त्याच क्षणी झाडाचा एक मोठा ओंडका त्यांच्यादिशेने येऊ लागला. प्रधानांवर तो ओंडका आदळणार हे दिसताच एका हवालदाराने त्यांना धक्का दिला. प्रधान जमिनीवर पडले पण त्या ओंडक्याने त्या हवालदारावर आघात केला. तो हवालदार जागीच गतप्राण झाला. त्याची ही दशा पाहून प्रधान विव्हळले. राहिलेल्या हवालदारासोबत पुढे जाताना दोघांनाही “खसखस...” असा आवाज ऐकू आला. काहीतरी सरपटत जात आहे हे त्यांच्या लक्षात आलं...

प्रधान आणि तो हवालदार सभोवार पाहू लागले. हवालदाराला जमिनीवर काहीतरी दिसलं. “सर... तो बघा एक दोर जमिनीवरून चालला आहे...” असं म्हणत हवालदाराने प्रधानांना जमिनीवरून तेजीने सरपटत जाणारा दोरखंड दाखवला. आपल्या बाजूने जमिनीलागत जाणारा दोरखंड पाहत असताना दोरखंडाने प्रधानांच्या पायाला विळखा घातला. प्रधान खेचले गेले आणि म्हणता म्हणता झाडाच्या फांदीवर जाऊन अडकले. त्याच वेळी लाकडाचे भाले बसवलेली एक मोठी शिडी त्याच झाडाच्या मागून आली आणि खाली उभ्या असलेल्या हवालदाराच्या शरीरात घुसली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि तो हवालदार उभ्या उभ्याच मरण पावला. पायामध्ये दोरखंड फसल्याने झाडावर अडकलेले प्रधान नुसतं पाहत बसण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत. त्यांनी धडपड केली. कसेतरी ते पायापर्यंत पोहोचले. बुटाच्या चेनमध्ये ठेवलेला चाकू त्यांनी बाहेर काढला आणि एका झटक्यात दोरखंड कापला. त्यासरशी ते खाली आले. पिस्तूल सरसावत प्रधानांनी दोन्ही हवालदारांची पाहणी केली. “दे आर डेड... इथे काहीतरी गडबड आहे... सचिन आणि आनंद ठीक असावेत...” प्रधान हे बोलत असतानाच त्यांना झुडपातून हालचाल जाणवली. त्यांनी त्या दिशेने पाहिलं तर सचिन येताना दिसला. “थँक गॉड सचिन तू ठीक आहेस... समथिंग इज फिशी हियर... आपल्याला आनंदला शोधायला हवं. चल...” हे बोलत असताना प्रधानांनी सचिनकडे पाहिलं तर त्याचा चेहरा बदलेला जाणवला...

सचिनच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. थंड नजरेने तो प्रधानांकडे पाहत होता. प्रधानांनी एक-दोनदा त्याला हलवून पाहिलं पण शुन्यात हरवल्यासारखा सचिन एकटक पाहत होता. सचिनने हातात त्याचं पिस्तूल धरलं होतं. प्रधानांना ढकलत सचिनने त्यांच्यावर पिस्तूल रोखलं. प्रधान जरा पुढे झाले आणि सचिनने गोळी चालवली. प्रधान खाली वाकले आणि गोळी झाडावर बसली. प्रधानांनी एकवार झाडाकडे पाहिलं आणि विस्फारलेल्या नजरेने सचिनकडे पाहू लागले. सचिन दुसरी गोळी झाडणार इतक्यात आनंदने त्याच्या हातावर लाथ मारली. सचिनच्या हातून पिस्तूल खाली पडताच प्रधानांनी सचिनच्या जोरदार मुस्कटात मारली. त्या जोरासरशी सचिन झाडावर आपटला आणि खाली पडला. काही क्षण डोकं धरून मग वर पाहत म्हणाला “प्रधान सर... आनंद सर... हे काय... मी असा इथे...” आनंद सचिनला उठायला मदत करत म्हणाला, “सचिन, तू आत्ता सरांवर गोळी झाडलीस... गोळीच्या आवाजाच्या दिशेने इथे आलो तर तू दुसरी गोळी झाडणार होतास. आपलं नशीब चांगलं म्हणून सर वाचले. पण सचिन, तू सरांवर गोळ्या का झाडल्यास...” सचिनचं डोकं अजूनही ठणकत होतं. तो सावरत म्हणाला, “मी गोळी झाडली... नाही आनंद सर... मी असं कसं करेन... त्या हवालदारांसोबत जात असताना कान सुन्न होतील असा आवाज येऊ लागला. आम्ही पळू लागलो. ते दोन्ही हवालदार एकेक करत मरण पावले पण मी तिथून सटकलो. थोडं पुढे गेलो तर माझ्या डोक्यावर आघात झाला. त्यानंतर आत्ता तुमच्यासमोर शुद्धीवर आलो...”

सर्व ऐकून प्रधान म्हणाले, “सचिन, तुला कोणीतरी हिप्नोटाईज केलं होतं आणि आमच्या विरुद्ध तुझा हत्यार म्हणून वापर केला. आता माझ्यासोबत काय झालं... मला वाचवताना ओंडक्याच्या आणि झाडाच्या मध्ये सापडून एक हवालदार गेला तर दुसरा भाल्यासारखी टोकं असलेली लाकडं शरीरात शिरून गतप्राण झाला. इथे खूप मोठी गडबड आहे. काहीतरी असं आहे ज्यापर्यंत आपल्याला पोहोचू दिलं जात नाहीये...” आनंद याला दुजोरा देत म्हणाला, “मलाही तसंच वाटतंय... आम्ही जात होतो त्या दिशेने विषारी धुक्याने आम्हाला वेढलं. मला श्वास रोखून धरता येतो म्हणून मी वाचलो. पण माझ्यासोबतच्या हवालदारांना नाही वाचवू शकलो सर...” प्रधान म्हणाले “येस... व्हेरी राईट... इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड दिसतंय. त्याच्या किरणांमुळे आपले वॉकीटॉकी निकामी झालेत. शिवाय नेटवर्क सिग्नल्सपण ब्लॉक केलेत ज्यामुळे आपले फोन्सही चालत नाहीयेत... आपल्या तिघांवर वेगवेळ्या प्रकारे झालेले हल्ले हेच दाखवत आहेत... आपल्याला सावधपणे पुढे जायला हवं. लेट्स मूव्ह...” प्रधान बोलत असतानाच पायाखालची जमीन हलू लागली आणि एखादी मोठी वस्तू जमिनीवर आदळावी तसा “थड... थड... थड... थड...” असा आवाज येऊ लागला. आजूबाजूची वृक्ष हलायला लागली. प्रधान, आनंद आणि सचिन सर्वत्र नजर घुमवू लागले. प्रधानांनी समोर पाहिलं तर एक खूप मोठी वस्तू वेगाने खाली येत होती. आनंद आणि सचिनवर ती वस्तू आदळणार इतक्यात प्रधान ओरडले, “वॉच आऊट...”

आनंद आणि सचिनने वर पाहिलं. झाडाच्या मागून एक काळी वस्तू त्यांच्या बाजूने येत होती. दोघांनीही विरुद्ध दिशेला उद्या मारल्या. त्या काळ्या वस्तूने जमिनीला खड्डा केला आणि पुन्हा वर गेली. आजूबाजूची झाडं तुटली आणि समोर एक काळाकभिन्न विंचू दिसू लागला. त्याचा आकार जवळ जवळ बारा फुटाइतका होता. डोळे जळत्या निखाऱ्याप्रमाणे आग ओकत होते. त्या अजस्र विंचवाला पाहून तिघंही अचंभित झाले. पहिला वार फोल गेल्याने तो विंचू अजून त्वेषाने हल्ला करायला सिद्ध झाला. प्रधान, आनंद आणि सचिनने पिस्तूल, लाकडाचा ओंडका असं मिळेल ते हत्यार घेऊन सज्ज झाले. आनंदने उगारलेला ओंडका त्या विंचवाने आपल्या एका पायात पकडून जोरात जमिनीवर आपटला. त्या ओंडक्याचा पार भुगा झाला. दुसऱ्या पायाने त्या विंचवाने सचिनला जबर धक्का दिला. सचिन झाडावर आदळून खाली पडला. दुसऱ्या बाजूने आनंदनेही वार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीही सचिनसारखीच दशा झाली. त्या विंचवाचं लक्ष आपल्याकडे नाही असं दिसताच प्रधानांनी त्यावर ओंडका फेकून मारला. टण असा आवाज होऊन ओंडका खाली पडला. प्रधान विचार करू लागले “म्हणजे... हा विंचू नसून एक मशीन आहे तर... कुठेतरी याचं कंट्रोल असणारच...” त्यांनी निरखून पाहिलं तेव्हा त्या विंचवाच्या लालभडक डोळ्यांच्या मधोमध एक चौकोनी ठिपका दिसला. सचिन आणि आनंद त्या विंचवाला अडकवून ठेवत होते तेव्हा प्रधानांनी पिस्तुलाने बरोब्बर नेम साधला. गोळी त्या चौकोनात शिरली. त्या विंचवाच्या डोळ्यांचा लाल रंग एकदम लुप्त झाला आणि तो विंचू जमिनीवर कोसळला...

तिघंही सगळीकडे पाहू लागले. चहू बाजूला झाडीच झाडी दिसत होती. सर्वत्र शांतता पसरली होती. वाऱ्यामुळे होणारा पानांचा काय तो आवाज होता फक्त. सचिन म्हणाला, “सर, नकाशाप्रमाणे विचार केला तर हे बेट मुख्य बेटाचा वेगळा झालेला भाग आहे. पण सर, जंगल असूनही इथे जनावरं नाहीत की पक्षी नाहीत... कोळ्यांची जाळीसुद्धा दिसत नाहीत... दिसतात ती फक्त मेलेली आणि जिवंत झाडं...” सचिनच्या म्हणण्याला दुजोरा देत प्रधान म्हणाले, “यू आर राईट सचिन... रोबॉट्स, विषारी धूर, कानाचे पडदे फाडणारा आवाज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड या सर्वांमुळे इथले प्राणी नष्ट झाले असावेत किंवा इथून निघून तरी गेले असावेत. झाडांनाही याची झळ बसली आहे पण ती बिचारी हलूच शकत नाहीत... पण हे सगळं का... जाणून घेण्याचा एकच मार्ग... वी हॅव्ह टू गो डीप इन द वूड्स... पण यावेळी एकत्र जाऊ... काय माहित अजून काय वाढून ठेवलं आहे आपल्यासमोर...” प्रधान बोलतच होते की समोरून पानांची सळसळ ऐकू आली. त्यासरशी तिघंही पावित्रा घेऊन सज्ज झाले. काही क्षणात एक आकृती झाडीमागून बाहेर आली. चिखलानं माखलेले कपडे पाहून हा माणूस आहे हे तिघांनाही लक्षात आलं. प्रधान त्याच्या जवळ जात पिस्तूल रोखत म्हणाले, “कोण आहेस तू... इथे काय करतो आहेस...” तो माणूस काही बोलणार इतक्यात आनंदने त्याला ओळखत विचारलं, “तू... सिद्धांततर नाहीस ना...”

त्या माणसाने होकारार्थी मान हलवली. म्हणाला, “हो सर. मी सिद्धांतच आहे. माझ्या मित्रांसोबत ट्रीपला निघालो होतो. या बेटावर आम्ही पोहोचलो तेव्हा एका मोठ्या विंचवाने आमच्यावर हल्ला केला. त्यापासून पळताना माझा पाय सापळ्यात अडकला. मी माझ्या मित्रांना तिथून निघून जायला सांगितलं. मोठ्या मुश्किलीने सापळ्यातून पाय सोडवला पण मला चकवा लागला आणि मी दलदलीत पडलो. कसाबसा तिथून बाहेर पडलो पण वाटच सापडेना... गनशॉट ऐकले तेव्हा जरा हायसं वाटलं. मनात विचार आला की मला सोडवायला आलं असेल कोणीतरी. आवाजाच्या दिशेने मी इथे पोहोचलो. मला वाचवा सर, हे बेट खूप विचित्र दिसतंय. मला इथे मारायचं नाही. सर, मला परत घेऊन चला...” आनंद त्याला धीर देत म्हणाला, “सिद्धांत, डोंट व्हरी. तू आता आमच्यासोबत आहेस. तुला काहीही होणार नाही. पण आम्ही माघार नाही घेऊ शकत...” प्रधानही पुढे होत म्हणाले “राईट आनंद. सिद्धांत, तू आता सुखरूप आहेस. पण या बेटाच्या रहस्याची उकल झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. सो एव्हरी वन स्टे टुगेदर. लेट्स गो...” प्रधान, आनंद, सचिन आणि त्यांच्या मागे असलेला सिद्धांत असे सर्व पुढे जाऊ लागले. काही क्षण पुढे गेल्यावर अचानक जमीन हलू लागली. कोणाला काही कळायच्या आता जमिनीला मोठं भगदाड पडलं आणि सर्वजण त्यात पडले. जमिनीखालून जाणाऱ्या पाण्याच्या घसरगुंडीतून वाहत सर्व वेगवेगळ्या दिशाना जात एका मोठ्या गुहेत असलेल्या लोखंडी पिंजऱ्यात येऊन पडले. ते पुढे काही करणार इतक्यात “टॉकटॉक...” असा आवाज येऊ लागला. लगेचच कोणीतरी जोरजोरात हसतंय असंही जाणवलं...

गुहेतले लाईट लागले. प्रधान, आनंद आणि सचिन वेगवेगळ्या लोखंडी पिंजऱ्यात अडकले होते. तिघांनी समोर पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारले. ती हसणारी व्यक्ती दुसरी-तिसरी नसून सिद्धांत होता. एका निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा तो हसत होता. गुहेत सर्वत्र मशीनगनधारी माणसं होती. सिद्धांत म्हणाला, “प्रधान, तू आणि तुझे हे चेले फारच शूर आहात... माझ्या रचलेल्या सापळ्यातून वाचलात तर वाचलात शिवाय माझ्या रोबो विंचवालाही निकामी केलंत... नाईस व्हेरी नाईस... मारणार तर तुम्ही आहातच पण त्याआधी, प्रधान तुझी शेवटची इच्छा पूर्ण करतो मी. हे सगळं का चाललंय ते जाणून घ्यायचं आहे ना तुला... आणा रे सर्वांना वर...” असं म्हणून सिद्धांत निघून गेला. काही क्षणातच चारचार मशीनगनधारी गुंडांनी वेढलेले प्रधान, आनंद आणि सचिन मोकळ्या मैदानात आले. त्यांच्यासमोर एक मोठी इमारत होती. सिद्धांत त्या इमारतीसमोर उभा होता. त्या तिघांजवळ येत म्हणाला, “हे बघा. या बिल्डिंगला लपवत होतो मी. इथे सोनं बनवतो मी. मानवजातीला जगण्याची मजा देणारं सोनं... नाही समजलं... ड्रग्स... हो. इथे ड्रग्स बनवतो आणि देशभरात विकतो. आम्हाला कोणी जगासमोर आणू नये म्हणून इथे ही सगळी यंत्र बसवली. ही जागा चारही बाजूंनीच नाही तर आकाशातूनही सुरक्षित आहे. आमच्या कक्षेत येणारं एखादं विमान किंवा हेलिकॉप्टर जर धोक्याचं वाटलं तर त्याला उडवायला इथे मिसाईल्स पण आहेत... सो प्रधान. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत अशी आशा करतो आणि तुम्हा तिघांना मरणाची शिक्षा बहाल करतो...”

सिद्धांतने जवळ येत प्रधानांच्या कपाळाला पिस्तूल लावलं. चाप ओढणार इतक्यात मोठा स्फोट झाला आणि बिल्डिंगच्या ठिकऱ्या उडाल्या. भिंतीला पडलेल्या खिंडारातून मागे पिस्तूल घेऊन उभी असलेली उमा सर्वांना दिसली. तिने गोळी चालवली आणि सिद्धांतच्या हातून पिस्तूल दूर उडालं. हळू हळू पुढे येत उमा बिल्डिंगच्या बाहेर आली. आनंदने विचारलं, "उमा, तू इथे कशी काय..." सिद्धांतच्या कानाजवळ पिस्तूल लावत उमा म्हणाली, "जेव्हा एकाच वेळी तुम्हा तिघांकडून येणारे सिग्नल्स आणि तुमचे मोबाईल फोन्स बंद झाले तेव्हा तुम्ही संकटात असल्याचं मला जाणवलं. मी पोलीसांची एक फळी घेऊन तडक निघाले. बेटाच्या ज्या बाजूने तुम्ही आत शिरलात तिथून न येता बेटाला वळसा घालून मागच्या बाजूला उतरले. ही बहुतेक यांची ड्रग्सची ने-आण करण्याची जागा असावी, कारण तिथे गुंडांची संख्या जास्त होती. आम्ही सर्व गुंडांचा समाचार घेतला. पोलीसांची फळी मागे राहिली आणि मी एकटीच पुढे आले तर ही बिल्डिंग दिसली. गुंडांच्या नजरा चुकवत मी आत शिरले. सर्व पुरावे गोळा करतच होते की समोरून आवाज आले. पाहिलं तर तुमच्या प्राणांशी गाठ होती. मी सोबत आणलेल्या एक्सप्लोझिव्सने पूर्ण बिल्डिंग उडवली..." प्रधानांनी सर्व ऐकून उमाशी हस्तांदोलन केलं. म्हणाले, "वेलडन उमा. वी आर प्राऊड ऑफ यू... सिद्धांत... जेव्हा पार्वती दुर्गेचं रूप घेते तेव्हा दुष्टांना पळता भुई थोडी होते ती अशी... एनीवेज... लेट्स गो सिद्धांत..."

सर्वजण जायला निघाले. बेसावध उमाला धक्का देऊन तिचं पिस्तूल सिद्धांतने हिसकावलं आणि प्रधानांवर गोळी झाडली. त्याचबरोबर सिद्धांतच्या गुंडांनी बेछूट गोळीबार करायला सुरुवात केला. उमा, सचिन, आनंद व प्रधानांनी प्रतिकार करत एकेका गुंडाला ठार केलं. शेवटी सर्वांनी सिद्धांतला घेरलं. सचिन म्हणाला, "बस सिद्धांत. आता शरण येण्याखेरीज तुझ्याजवळ काहीच शिल्लक नाही. मुंबईतलं मोठं घर तुझी वाट बघत आहे..." सर्वजण मुंबईला पोहोचले. येताना प्रधानांनी सिद्धांतच्या तिघा मित्रांनी चौकीवर बोलवून घेतलं. सिद्धांतला बेड्या घातलेलं पाहिलं आणि तिघांना धक्का बसला. प्रधान म्हणाले, "हा तुमचा हरवलेला मित्र आणि त्या बेटावरच्या रहस्यांचा खरा सूत्रधार. सिद्धांत, बोल आता..." सर्वांच्या गराड्यात बसलेला सिद्धांत बोलू लागला, "हो. मी गुन्हेगार आहे पण खरा सूत्रधार मी नाही. तो होता उस्मान पारकार... आमच्या घरची परिस्थिती बरी होती. खाऊन-पिऊन  आम्ही सुखी होतो. फक्त पोट भरणं म्हणजे आयुष्य नाही होत. चैन, मजा हे असतं खरं आयुष्य आणि त्यासाठी लागतो पैसा. कॉलेजमध्ये मला ड्रग्सचं व्यसन लागलं. त्यासाठी हवा असलेला पैसा घरातून मिळेनासा झाला. त्याचवेळी माझी भेट उसमान पारकरशी झाली. माझी हुशारी पाहून त्याने मला पार्टनर केलं व त्या बेटावर घेऊन गेला. तिथल्या कामाची व सापळ्यांची मी माहिती करून घेतली. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण काही महिन्यांपूर्वी उसमान पोलीस एनकाऊंटरमध्ये मारला गेला...

उसमानचा सगळा धंदा मला मिळाला. सगळा प्रॉफिट मला मिळणार याच आनंदात मी होतो. पण तीन दिवसांपूर्वी माझ्या या मूर्ख मित्रांनी समुद्र सफर ठरवली आणि त्या बेटावर पोहोचले. मी तो विंचू पाठवला. आम्ही सर्व पळत असताना मला माझ्या माणसाचा फोन आला. मी स्वत:ला सापळ्यात अडकवून घेतलं आणि यांना जाऊ दिलं. मला वाटलं हे घाबरतील पण हे तुम्हा सर्वांना घेऊन आले. तुम्हा सर्वांना संपवण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तुम्ही सर्वांनी माझे सर्व सापळे हाणून पाडलेत आणि मी पकडलो गेलो..." प्रधान त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "सिद्धांत, तुझ्या फायद्यासाठी तू स्वत:चंच नाही तर मानवजातीचं आणि निसर्गाचंही नुकसान केलं आहेस... तुला कठोरातली कठोर शिक्षा होईल..."

समाप्त.

No comments:

Post a Comment