Sunday, May 20, 2018

चंद्र आहे साक्षीला...



हॉटेलच्या एसी केबीनमध्ये सिनीयर इंस्पेक्टर प्रधान, इंस्पेक्टर आनंद, सब इंस्पेक्टर सचिन, सब इंस्पेक्टर उमा व डॉ. गोखले जेवत होते. मजा मस्करी चालू होती तेव्हा सि.इं. प्रधानांचा फोन खणखणला... "काय प्रधान साहेब, अहो सुट्टीच्या दिवशी तरी फोन बाजूला ठेवा..." डॉ. गोखलेंच्या या वाक्यावर सि.इं.प्रधान हसले व त्यांनी फोन घेतला, "हॅलो, सिनीयर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय... हॅलो... हॅ... अरे, फोन कट झाला... कोणीच बोलत नव्हतं पण एक गाणं वाजत होतं, "खोया खोया चाँद... खुला आसमाँ..." हो हेच गाणं होतं... काय अर्थ असावा याचा... नंबर तर प्रायव्हेट आहे..." डॉ. गोखले हसत म्हणाले, "प्रधान साहेब, कोणीतरी मस्करी केली आहे तुमची... जाऊ दे हो... गरज असेल तर येईल परत फोन. तुम्ही टेंशन नका घेऊ..." सि.इं. प्रधान फोन बाजूला ठेऊन त्यांच्या टीमसोबत मिसळले खरे, पण तो आलेला फोन त्यांना अस्वस्थ करत होता...

दुसऱ्या दिवशी चौकीवर नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. इतक्यात फोन वाजला. तो आनंदने घेतला, "हॅलो, इंस्पेक्टर आनंद बोलतोय... काय... कुठे... आम्ही पोहोचतोच... सर, पनवेल जवळच्या जंगलात एक डेड बॉडी सापडली आहे. फोन करणारा खूप घाबरलेला वाटत होता. बहुतेक डेड बॉडी पाहून असावा..." प्रधान हनवटीला हात लावत म्हणाले, "लेट्स गो..." टीम घटनास्थळी पोहोचली. डेड बॉडी रस्ता सोडून थोडी खालच्या बाजूला जंगलात होती. विचित्र पद्धतीने डेड बॉडी ठेवली होती. तपास सुरू झाला. सचिन म्हणाला, "सर, बॉडी एका मुलीची आहे. पूर्ण गोलाकार आकारात ही बॉडी ठेवली आहे. संपूर्ण शरीरावर कसलातरी काळ्या रंगाचा लेप आहे. शरीरावर कुठल्याही मोठ्या जखमा नाहीत, कदाचित गाळा दाबून किंवा विषप्रयोग करून हा खून घडवला असावा..." आनंद पुढे होत म्हणाला, “सर, बॉडीजवळ ही पर्स सापडली आहे. काही पैसे आणि हे आयडेंटीटी कार्ड आहे. मुलीचं नाव छाया असून एल.के. कॉलेजची ही स्टुडंट आहे...” प्रधानांना विचारात पाहून उमा म्हणाली, "सर, हे काहीतरी नवीनच दिसतंय... बॉडीला काळ्या रंगाचा लेप देऊन ही अशी गोलाकार का ठेवली असावी..." प्रधान काही बोलणार इतक्यात त्यांचा फोन वाजला, "हॅ..." प्रधान काही बोलणार इतक्यात, "आधा है चंद्रमा रात आधी..." हे गाणं वाजू लागलं. फोन कट झाला. प्रधानांनी नंबर पाहिला तर पुन्हा प्रायव्हेट नंबर...

प्रधान अजून गोंधळले. रात्री आलेला फोन आणि आत्ता आलेला फोन, हे दोन्ही नंबर प्रधानांनी उमाला ट्रेस करायला सांगितले आणि सचिन व आनंद सोबत बॉडी डॉ. गोखालेंकडे पाठवली. त्यांनी फोन काढून कोणाचातरी नंबर लावला, “हॅलो... ऋतू... अगं मी मामा बोलतोय. मला सांग, तू छाया नावाच्या मुलीला ओळखतेस का... हो... बरं... एक काम कर, लगेच चौकीवर ये... मीही पोहोचतोच आहे...” त्यांनी फोन ठेवला आणि बाकीची तपासणी करून चौकीकडे निघाले. तिथे बॉडीची तपासणी करत असताना डॉ. गोखले आनंद आणि सचिनला म्हणाले, “मुलीचं वय साधारण १९-२० आहे... तिचे हात, पाय आणि तोंड दोरखंडाने बांधून मग तिचा गळा दाबण्यात आला आहे. खून काल रात्री झाला आहे. तिच्यावर बलात्कार झालेला नसून फक्त खून करण्यासाठीच तिला असं बांधलं असावं जेणेकरून गळा दाबताना या मुलीने ओरडा-आरडी किंवा प्रतिकार करू नये. तिच्या डोक्याला जखम आहे. बहुतेक ही मुलगी कशावर तरी आपटली असावी. खुन्याला या मुलीबद्दल खूप राग असावा... कारण तिचे हात-पाय एकदम करकचून बांधले होते... हा काळा रंग एकदम साधा आहे. बिल्डिंग रंगवताना जो रंग वापरतात तोच आहे. कुठल्याही रंगाच्या दुकानात मिळेल. पण अशा पद्धतीने तो बॉडीला फासलाय हे जरा विचित्र आहे. शिवाय ही मुलगी मेल्यानंतर हे रंगकाम झालंय कारण बॉडीच्या आत मला रंगाचे ट्रेसेस नाही मिळाले...” आनंदने लगेच प्रधानांना फोन लावला...

तिथे चौकीवर प्रधान येताच उमा म्हणाली, “सर, हे दोन्ही नंबर मी ट्रेस करत होते. पहिला नंबर होता अब्दुल खान नावाच्या माणसाचा पण हा माणूस गेल्या वर्षीच एका अपघातात दगावला आहे. दुसरा नंबर आहे जगन पटेलचा आणि तोही या जगात नाही... सर कॉल ड्यूरेशन इतकं कमी होतं की लोकेशन ट्रेस नाही होऊ शकली...” प्रधानांनी स्क्रीनकडे पाहिलं आणि मागे वळले. इतक्यात दारातून एक मुलगी आत आली. तिला पाहून उमा उभी राहिली, “अरे... ऋतुजा... तू इथे...” ऋतुजा आत येत म्हणाली, “हो. मामाने बोलावलं मला... काय झालंय मामा... मला इथे का बोलावलंस... आणि छायाचं काय...” प्रधानांनी तिला बसवलं. म्हणाले, “ऋतू... छाया तुझी कॉलेजची मैत्रीण आहे ना... एक वाईट बातमी आहे. तिचा खून झालाय... आज सकाळी पनवेलजवळच्या जंगलात तिची डेड बॉडी सापडली आहे...” हे ऐकून ऋतुजाला रडू फुटलं. उमाने तिला धीर दिला, तिला पाणी पाजलं आणि म्हणाली, “ऋतुजा... यावेळी काही विचारणं योग्य नाही. पण तरीही तपास करायला हवा ना... छायाबद्दल तुला काही माहित असेल तर सांग...” हुंदके आवरत ऋतुजा म्हणाली, “छाया आणि मी ज्यूनीयर कॉलेजपासून मैत्रिणी होतो. आम्ही सतत एकत्र असायचो. आता ती नाही तर... हे पहा, मागच्याच महिन्यात आम्ही पिकनिकला गेलो होतो तिथला हा फोटो...” ऋतुजाने दाखवलेला फोटो प्रधान आणि उमाने पाहिला. त्यात छाया आणि ऋतुजासोबत अजून दोघीजणी होत्या. उमाने विचारलं, “या कोण आहेत ऋतुजा...” ती काही बोलणार इतक्यात, “माझी मुलगी हरवली... तिला शोधा हो कोणीतरी...”

ओरडा-आरडी करत एक बाई चौकीत शिरली. तिला ऋतुजाने ओळखलं. म्हणाली, “काकू तुम्ही... मामा, या देसाई काकू. या फोटोमध्ये छायाच्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या स्नेहलच्या आई...” उमाने त्या बाईला पाणी दिलं आणि काय झालं ते विचारलं. त्या बाई बोलू लागल्या, “काय सांगू हो... सकाळी स्नेहल जॉगिंग करून परत आली. मी गॅलरीत उभी होते. स्नेहलने मला हात केला. ती आत येणार इतक्यात एक पांढरी गाडी गेटजवळ थांबली. दार उघडलं आणि कोणीतरी स्नेहलला आत खेचलं. मी ओरडले पण काही करू शकले नाही. खाली पोहोचेपर्यंत गाडी निघून गेली होती. मला काय करू समजत नव्हतं. म्हणून मी इथे आले. माझी मदत करा साहेब. माझ्या मुलीला शोधा हो..." उमाने त्या बाईला शांत केलं आणि त्या गाडीबद्दल किंवा आतल्या व्यक्तीबद्दल अजून काही माहिती मिळावी यासाठी आत नेलं. ऋतुजा म्हणाली, “काय झालं हे मामा, छाया पुण्याला जाणार होती आणि कुठे पोहोचली...” प्रधानांनी तिला धीर दिला आणि घरी पाठवलं. तपासात सहा दिवस निघून गेले. सकाळी प्रधान चौकीवर आले. सर्वांना आत बोलवत म्हणाले, “टीम... सहा दिवस झाले. छायाच्या खुनाचा आणि स्नेहलच्या अपहरणाचा अजून छडा लागलेला नाही. मिडिया मागे लागली आहे. लेट्स गेट तू वर्क...” सगळे आपापल्या कामाला लागणार इतक्यात फोन खणखणला, “हॅलो सब इंस्पेक्टर सचिन बोलतोय... काय... कुठे... आलोच आम्ही... सर, परळजवळच्या बंद कारखान्यात एका मुलीचं प्रेत सापडलं आहे...”

सगळे घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू झाला. उमा आणि सचिन बॉडी तपासू लागले तर प्रधान आणि आनंद तिथे असलेल्या लोकांशी बोलत होते. आनंद म्हणाला, “फोन कोणी केला होता... बोला, काय झालं... काय पाहिलंत तुम्ही...” एक माणूस बोलता झाला, “साहेब, या कारखान्याच्या मागे असलेल्या झोपडपट्टीत आम्ही राहतो. कामाला जायचं तर या कारखान्याला वळसा घालून स्टेशनला जावं लागतं. हा कारखाना बंद असल्याने आम्ही या वाटेचा वापर करून स्टेशनवर लवकर पोहोचतो. आज कारखान्याचा हा दरवाजा उघडा दिसला. इथे येऊन बघतो तर हे प्रेत...” बाजूला उभ्या असलेल्या गार्डला उद्देशून प्रधान म्हणाले, “हा कारखाना बंद आहे ना... मग इथे हा प्रकार घडलाच कसा... तू याला सामील तर नाहीस ना...” ते बोलत असताना त्यांचा फोन वाजला, “सिनीयर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय...” काही क्षणात फोन बंद झाला. प्रधान अचंभित होऊन आनंदकडे पाहू लागले. म्हणाले, “पुन्हा प्रायव्हेट नंबर... यावेळी गाणं वाजलं, “धीरे धीरे चल चांद गगन में...” काय अर्थ असावा याचा... आणि मलाच का हे फोन यावेत...” ते बोलत असतानाच उमा म्हणाली, “सर, छायाच्या खुनाप्रमाणे सेम मोडस ऑप्रेंडी आहे. यावेळी बॉडीच्या अर्ध्या भागाला रंग फासला आहे आणि ती गोलाकार रचून ठेवली आहे...” सचिन म्हणाला, “सर, या मुलीच्या पर्समध्ये असलेल्या वस्तूंवरून समजतंय की या मुलीचं नाव स्नेहल आहे आणि हीसुद्धा त्याच कॉलेजची स्टूडंट आहे ज्यात...” सचिन बोलत असताना आनंदला काहीतरी आठवलं. तो म्हणाला, “स्नेहल... सर पाच दिवसांपूर्वी जी मुलगी नाहीशी झाली तीही स्नेहलच होती...”

प्रधानांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, “वेट अ सेकंड... मला पहिला फोन आला तेव्हा गाणं वाजलं, “खोया खोया चांद...” पहिला खून झाला अकरा तारखेला रात्री बारा वाजता... म्हणजेच बारा तारखेला... आणि बारा तारखेला होती अमावस्या... तिथे आपण पोहोचलो तेव्हा मला दुसरा फोन आला... गाणं वाजलं, “आधा है चंद्रमा रात आधी...” दोन दिवसांनी स्नेहलचं अपहरण... आज एकोणीस तारखेला स्नेहलचा खून... अमावस्येनंतरचा आजचा सातवा दिवस आणि यावेळी आकाशात चंद्र बरोब्बर अर्धा असतो... आत्ता आलेल्या तिसऱ्या फोनमध्ये गाणं वाजलं, “धीरे धीरे चल चांद गगन में...” डॅम इट, देयर इज अ लिंक... खूनी त्याच्या प्रत्येक कृत्यातून आपल्याला पुढील घटनेची सूचना देत आहे... त्याप्रमाणे पुढचा खून सत्तावीस तारखेला होईल कारण त्या दिवशी पौर्णिमा आहे... ऋतूच्या ट्रीपचा फोटो आठवतो... ऋतू, स्नेहल आणि छायासोबत त्यात अजून एक मुलगी आहे... म्हणजेच पुढचा खून एकतर त्या मुलीचा नाहीतर... ऋतू...” ते बोलत असतानाच त्यांचा फोन खणखणला, “बोल ऋतू... काय... कधी... तू ठीक आहेस ना... डोंट वरी... मी बघतो...” फोन बंद झाला. प्रधान म्हणाले, “टीम... ऋतूच्या मैत्रिणीला कोणीतरी पळवलं आहे. त्या दोघी भेटल्या असताना कोणीतरी अज्ञात इसमाने तिला घाडीत खेचून नेलं... सचिन आणि आनंद, तुम्ही ही बॉडी डॉ. गोखलेंकडे पाठवा. उमा तू माझ्यासोबत चौकीवर चल... ऋतू तिथे आपली वाट पाहते आहे...”

डॉ. गोखले बॉडीला तपासत म्हणाले, “सचिन... आनंद... ही मुलगीही मागच्या मुलीप्रमाणेच मेली आहे. हिच्या डोक्यावर आघात झाला, हिचे हात-पाय बांधले गेले आणि मग गळा दाबून खून... खुनानंतर अंगाला रंग फासणं... सगळं तसंच... याहून अधिक माहिती आत्तातरी नाही देता येत... खूनी सीरियल किलर दिसतोय... आणि खूप रागावला आहे... ज्याप्रमाणे मुलींचे हात-पाय करकचून बांधले गेलेत आणि त्यांचा गळा आवळला गेलाय त्यावरून तरी असंच वाटतंय...” आनंदने प्रधानांना फोन लावला. तिथे प्रधान आणि उमा चौकीवर पोहोचले तेव्हा ऋतुजा त्यांची वाटच पाहत होती. प्रधान समोर येताच ती धावतच त्यांना बिलगली. प्रधान तिला शांत करत घटनेबद्दल विचारू लागले. ऋतुजा म्हणाली, “मामा, मी आणि शशी कॉफी शॉपमधून बाहेर पडलो त्यावेळी एक गाडी अचानक समोर आली आणि क्षणार्धात शशीला कोणीतरी आत खेचलं...” प्रधानांनी तिला खाली बसवलं आणि स्नेहलच्या खुनाबद्दल सांगितलं. ऋतुजाला रडूच कोसळलं. ती म्हणाली, “आधी छाया मग स्नेहल आणि आता... मामा शशीला तरी वाचव रे... उद्या तिचं काही बरं-वाईट झालं, तर मग माझा नंबर... म...मामा...” उमाने तिला दिलासा दिला. प्रधान काही बोलणार इतक्यात प्रधानांचा फोन वाजला, “बोल आनंद... बरं. तुम्ही दोघं चौकीवर या... उमा, डॉ. गोखलेंकडूनही काही खास हाती लागलं नाही. त्याचं म्हणणं आहे की ही सीरियल किलिंगची केस आहे...

का कोण जाणे, पण मला हा वेगळाच प्रकार वाटतोय... सीरियल किलर असता तर कोणाचाही खून झाला असता. इथे तर फक्त ऋतूच्या...” बोलता बोलता त्यांची नजर फोटोवर गेली... त्यांनी तो फोटो निरखून पाहिला. मग जमवलेल्या कागदांना चाळू लागले. एक कागद उचलून तो डोळ्यांजवळ नेला. त्यांचे डोळे मोठे झाले. येस... उमा धागा सापडला... ऋतू लवकरच मी खुन्याला...” बोलत असताना बाहेर धांदल ऐकू आली. “सर, प्रेसवाले आलेत... केसबद्दल चौकशी करत आहेत...” सचिन आत येत म्हणाला. प्रधानांनी त्यांना इशाऱ्याने आत पाठवायला सांगितलं. दार उघडताच पत्रकारांची एक तुकडी आत शिरली आणि प्रधानांवर प्रश्नांचा भडीमार केला. प्रधान बोलते झाले, “लेट मी स्पीक प्लीज... मला माहित आहे की केस सोडवण्यात दिरंगाई होत आहे पण हे प्रकरण साधं नाही... सीरियल किलिंगची केस आहे. आत्तापर्यंत झालेले दोन्ही खून एकाच प्रकारे झालेत. खुन्याच्या पद्धतीप्रमाणे आधी सावजाचं अपहरण आणि मग खून. त्याप्रमाणे आता तिसऱ्या मुलीचं अपहरण झालं आहे. आमच्यासमोर तरी सध्या इतकंच आहे. कारण खुन्याने कसलाही सबळ पुरावा मागे ठेवलेला नाही. खूनी खूपच हुशार आहे. पण तुम्हाला आणि जनतेला मी आश्वस्त करतो की तिसरा खून होऊ देणार नाही. आणि खुनीही लवकरच पकडला जाईल...” प्रेसवाले गेले आणि आनंद म्हणाला, “सर, तुमच्याकडून नकारात्मक विचार... आजवर असं झालं नाही कधी...” आनंदला दुजोरा देत उमा म्हणाली, “हो ना... खूनी हुशार आहे, दिरंगाई होत आहे, हे असं बोलणं तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं सर...”

प्रधान काहीच बोलत नव्हते. काही वेळात ऋतुजाकडे वळत म्हणाले, “ऋतू, तू घरी जा. अक्का यात्रेला गेल्यामुळे तू एकटीच आहेस ना... डोंट वरी. उमा येईल आजपासून तुझ्या सोबतीला. तिसरा खून आम्ही थांबवू शकू की नाही, मला माहित नाही पण तुझं संरक्षणही तितकंच महत्वाचं आहे. ओके. बी सेफ. जा आता घरी. उमा येईल थोड्या वेळात...” ऋतुजाने डोळे पुसले आणि निघून गेली. प्रधानांनी बाकी तिघांसोबत मिटिंग घेतली आणि पुढचा आराखडा तयार केला. संध्याकाळपर्यंत उमा ऋतुजाच्या घरी पोहोचली. ऋतुजा तिची वाटच पाहत होती. म्हणाली, “बरं झालं तुम्ही आलात... मला तर खूप एकटं वाटत होतं आणि भितीसुद्धा वाटत होती...” उमा म्हणाली, “डोंट वरी ऋतुजा... मी आले आहे ना... आता तू माझी जबाबदारी आहेस... शशीला आम्ही वाचवू शकलो नाही तर त्यानंतर तुझंही अपहरण होऊ शकतं म्हणून ही खबरदारी. प्रधान सर, आनंद सर आणि सचिन, तिघंही शशीचा माग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तिला वाचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. तूही आता मला सोबत नेल्याशिवाय घराबाहेर जायचं नाहीस... ओके... आणि ऋतुजा मला अगं-तुगं केलंस तर चालेल... उलट जास्त आवडेल मला...” ऋतुजा हसली. तपासात आठवडा निघून गेला पण पोलीसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. ना खुन्याचा पत्ता लागला ना शशीचा. संध्याकाळचे नऊ वाजले होते. उमा व ऋतुजा खोलीत बसून गप्पा मारत होत्या. उमा म्हणाली, “ऋतू, कोल्ड कॉफी प्यावीशी वाटते गं पण घरात दूध नाहीये...” ऋतुजा म्हणाली, “थांब मी आपल्यासाठी फोन करून मागवते...”

ऋतुजाने कॉफी शॉपमध्ये फोन केला. फोन ठेवल्यावर म्हणाली, “ताई, ऑर्डर दिली आहे पण होम डिलिव्हरी करायला त्यांच्याकडे माणसं नाहीत...” उमाने थोडा विचार केला. म्हणाली, “काही हरकत नाही. मी जाऊन आणते. पण तू घराबाहेर पडू नकोस...” उमा बाहेर निघून गेली. ऋतुजा विचार करत बसली, “काय होऊन बसलं हे सगळं. छाया, स्नेहल आणि शशीने कोणाचं काय वाईट केलं होतं... शशीचा काहीच पत्ता लागला नाही अजून... उमाताईही बाहेर गेली आहे... माझंही कोणी अपहरण केलं तर...” ऋतुजाच्या अंगावर काटा आला. ती आतल्या खोलीत जाऊ लागली आणि लाईट गेले. मिट्ट अंधार झाला. ऋतुजाने आवंढा गिळला. उमाला फोन करावा म्हणून तिने रिसिव्हर उचलला तर फोन डेड होता. तिने विचार केला, “मगाशीच तर मी कॉफीसाठी फोन केला आणि आता फोन डेड... म...म्हणजे इ...थे न...नक्कीच कोणीतरी...” भितीने ऋतुजाचा थरकाप उडाला. अडखळत चाचपडत ती खोलीकडे जाऊ लागली. इतक्यात कोणीतरी मागून तिला धरलं आणि तिचं तोंड दाबलं. तिला भिंतीकडे ढकललं. भिंतीलगतच्या टेबलाला अडखळून ऋतुजा खाली पडली. म्हणाली, “क...कोण... कोण आहे... क...काय... म...मी...” ऋतुजाला काहीच दिसत नव्हतं. फक्त टॉकटॉक असा आवाज आला. ऋतुजाने कानोसा घेतला. तिला आवाज ओळखीचा वाटत होता. ऋतुजाचे डोळे भिरभिरत होते. अंधारात ती आवाजाची दिशा शोधत म्हणाली, “त...तू... तू...” इतक्यात सर्व लाईट लागले. एकदम आलेल्या प्रकाशाने समोरच्या व्यक्तीने आपला चेहरा लपवला...

“होल्ड इट देयर... तुझा खेळ संपला आहे...” पिस्तूल सरसावत प्रधान म्हणाले. त्या व्यक्तीने पाहिलं तर ती चारही बाजूंनी वेढली गेली होती. उमाने त्या व्यक्तीचे हात खाली घेतले आणि ऋतुजाला धक्का बसला. “कोण... शशी... तू... तू पकडलं होतंस मला...” उमा म्हणाली, “नुसतं पकडलं नव्हतं ऋतू... तर तुला मारायला आली आहे ही... इतकंच कशाला, तुझ्या दोन्ही मैत्रिणींचे खूनसुद्धा हिनेच केलेत...” ऋतुजा म्हणाली, “शशी... तू केलंस हे सगळं... का... काय वाईट केलं आम्ही तुझं...” शशी डोळे मोठे करत म्हणाली, “काय वाईट केलंत तुम्ही माझं... अगं चांगलं कधी केलंस गं... कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आपण मैत्रिणी... तुम्ही तिघी पैसेवाल्या आणि मी गरीब... तुमच्या प्रत्येक वागण्यात मला माझ्याबद्दल सहानुभूती दिसायची. नुसता पैसा कशाला... तुम्ही तिघी प्रत्येक परीक्षेत पहिल्या विसात असायच्या आणि मी मात्र जेमतेम पास व्हायचे. ती छाया तर प्रत्येकवेळी मला हरवायची. डान्स कॉमपिटीशनमध्ये मला हरवून तिने बक्षीस मिळवलं, अॅन्यूअल फंग्शनच्या वेळी नाटकातला मेन रोल छायाने माझ्यापासून हिरावून घेतला. मी आतल्या आत जळत होते. यावर तुम्ही तिघींनी कळस चढवलात, मागच्या महिन्यात जेव्हा आपण ट्रीपला गेलो होतो तेव्हा. संकेत... संकेत राजाध्यक्ष मला खूप आवडतो. मनापासून प्रेम आहे माझं त्याच्यावर. तो छायालाही आवडतो म्हणून तू आणि स्नेहलने छायाला मदत करायचं ठरवलं. माझा विचारही नाही केलात. तेव्हाच मी ठरवलं. छायासोबत तुम्हा दोघींनाही संपवायचं...

ऋतुजा, तू अनेकवेळा तुझ्या मामाबद्दल बोलली होतीस. त्यावरून मी प्लॅन तयार केला. तुझ्या मामाच्या नकाखाली मी तुम्हा तिघींचा काटा काढेन आणि त्यांची पत धुळीला मिळवेन. त्याप्रमाणे मी माझ्या एका मित्राकरवी छाया आणि स्नेहलचं अपहरण करवलं मग एकेक करून दोघींचे खून केले. तुझ्या मामला खिजवण्यासाठी त्याला फोनवरून गाणी ऐकवून हैराण करत राहिले. तुझाही खून करण्याचा मनसूबा होता माझा पण...” शशीला मध्येच तोडत प्रधान बोलते झाले, “पण ऋतुजाचा मामाच आड आला तुझ्या. नाही का शशी... असं दाखवलं गेलं की ही सीरियल किलिंग आहे पण तसं नव्हतं हे मला स्नेहलच्या खुनाच्या वेळी जाणवलं. तुझ्या अपहरणाचं नाट्य झालं तेव्हा काही वेळ असं वाटलं की तुझा जीव धोक्यात आहे... पण तुमच्या फोटोने माझं मत बदललं. बघ हा फोटो... यात तुम्हा चौघींशिवाय अजून एक व्यक्ती आहे... कोपऱ्यात एक व्यक्ती हातात ग्लास घेऊन उभी आहे... तोच आहे तुझा मित्र ज्याने तुला मदत केली... सचिन घेऊन ये त्याला...” सचिन आणि आनंद एका माणसाला घेऊन आले. त्याला पाहून ऋतुजा म्हणाली, “याला तर ट्रीपच्या वेळी फार्म हाऊसजवळ घुटमळताना पाहिलं होतं मी पण लक्ष दिलं नाही...” प्रधान म्हणाले, “हा जॉन. शशीच्या घराजवळ राहतो. याचं शशीवर प्रेम आहे आणि तिच्यासाठी तो वाट्टेल ते करू शकतो असं याचं म्हणणं आहे... शशीने याचाच वापर केला. या प्रकरणात अजून कोणीतरी आहे याची खात्री पटली या फोटोमुळे. यात या मुलाच्या हातावर हा विंचू बनवला आहे. स्नेहलच्या मावशीने अपहरणकर्त्याचं जे वर्णन केलं त्यात हातावर एक चित्र पण होतं. तोच हा विंचू... हा बघा याचा हात. सबळ पुरावा...

त्याचवेळी आम्हाला समजलं की खूनी तूच आहेस शशी आणि दिशाभूल करण्यासाठी तू तुझं अपहरण करवलंस. खुनाच्या फ्लोप्रमाणे तू हा खून आज, पौर्णिमेलाच करणार हे माहित होतं. म्हणून उमाने कॉफी मागवली आणि ती आणायला स्वत: बाहेर पडली. तू इथे येणार हे नक्की होतं आणि तसंच झालं. यू आर अंडर अरेस्ट शशी...” शशी चवताळली. स्वत:ला सोडवत म्हणाली, “नाही... नाही... मी प्रत्येकवेळी हरले पण यावेळी नाही... आय अॅम नॉट अ लूझर...” असं म्हणत शशीने स्वत:ला सोडवलं. बाजूला पडलेल्या सुऱ्याने स्वत:चा गळा कापला आणि तडफडत असताना जमिनीवर पडून स्वत:च्या शरीराचा गोलाकार आकार बनवला. ऋतुजा शशीजवळ बसून रडू लागली. प्रधान म्हणाले, “मत्सरासाठी हुशारी वाया घालवलीस शशी. गुन्हेगार कधीच जास्त वेळ लपून राहत नाही आणि इथे तर स्वत: चंद्रच गुन्हेगार आणि तोच साक्षीदार...”

समाप्त.

No comments:

Post a Comment