Tuesday, May 8, 2018

वारस...



"टी.डी., टी.डी., टी.डी., टीडी..." रात्री बाराचा सुमार होता. जंगलाबाहेर उभारलेल्या दोन तंबूंपैकी एकात जय, अबीर, साशा व कामिनीचा गोंधळ चालला होता. नुकतंच कॉलेज संपल्याने चौघांनी ही अॅडव्हेंचर ट्रीप प्लॅन केली होती आणि ट्रूथ ऑर डेयर हा त्यांचा खेळ रंगात आला होता. चौघंही गोलाकार बसली होती आणि एक बाटली त्या गोलात गरागरा फिरत होती. काही क्षणात कामिनीकडे तोंड करून ती बाटली थांबली. अबीर म्हणाला, "कामिनी, तुझा नंबर... बोल काय करणार... ट्रूथ ऑर डेयर..." कामिनीने थोडा विचार केला व म्हणाली, "आय विल गो फॉर अ डेयर..." जय लगेच म्हणाला, "बघ हा... मागे नाही हटायचं. आहे कबूल... ओके. मी देतो तुला डेयर...

"या जंगलाबद्दल बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी प्रचलित आहेत. त्यातली एक आहे वॉल्टरची. अनेक वर्षांपूर्वी हे जंगल इथे नव्हतं. इथे एक ओसाड माळरान होतं आणि त्याच्या मधोमध होता वॉल्टरचा वाडा. वॉल्टरला ना मुलबाळ ना बायको. याचं कारण त्याचा सैतानी मेंदू. वल्टर एक व्हँपायर होता. व्हँपायर म्हणजे दिवसा मानवी रूपात असलेली, रक्तावर आपली पोट भरणारी आणि रात्री आपल्या मूळ रुपात परिवर्तीत होत असलेली वटवागुळं. वॉल्टर रोज रात्री वटवागुळाच्या रुपात या परिसरात घिरट्या घालायचा. सावज हेरून त्याच्या नरडीचा घोट घेत आपलं पोट भरायचा. त्याची दहशत आजूबाजूच्या गावातही पसरली. कहर तेव्हा झाला जेव्हा वॉल्टरने वटवागुळाच्या रुपात एका गावात शिरून स्वत:च्या भुकेसाठी एका बाईला मारलं...

किती काळ असं भितीखाली रहायचं या विचाराने गावकरी पेटून उठले. सकाळी गावकऱ्यांनी वाड्यावर हल्ला केला. खोलीत बेसावध झोपलेल्या वॉल्टरला जेरबंद करून दिवाणखान्यात आणलं. तिथे त्याला बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार वॉल्टर करू शकला नाही. गावकरी मारत असताना वॉल्टरच्या शरीरातून एक लाल किरण निघाला व समोर असलेल्या वॉल्टरच्या तस्बिरीवर आदळला. गावकऱ्यांनी पाहिलं तर वॉल्टर निपचित पडला होता. सर्व वाड्याबाहेर आले. त्यांच्यातल्याच एका मांत्रिकाने तंत्र-मंत्र वापरून वाड्याभोवती विभुतीचं कुंपण तयार केलं. म्हणाला, "आपण वॉल्टरला मारलं असलं तरी तो सैतान आहे आणि सैतान असे सहजासहजी मरत नाहीत. हा वाडा त्याच्या प्रेतासह पेटवून द्या. या कुंपणामुळे तो बाहेर पडू शकणार नाही आणि त्याला मुक्ती मिळेल..." गावकऱ्यांनी वाड्याला आग लावली. आगीच्या ज्वाळात वाडा जळून गेला. त्यानंतर या परिसरावर अवकळा पसरली. वस्ती कमी झाली आणि जंगल वाढू लागलं. कामिनी, आता तुझं डेयर ऐक... या जंगलाच्या मधोमध असलेल्या वॉल्टरच्या वाड्यावर जाऊन वाड्यासकट तुझा सेल्फी घ्यायचा..."

सर्वजण हे ऐकून स्तब्ध झाले. "जय, धिस मे बी डेंजरस... रात्रीच्या वेळी हे डेयर म्हणजे..." साशा जयला समजावण्याचा प्रयत्न करत होती. जयने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला व म्हणाला, "ओके. जर कामिनीला मान्य नसेल तर तिने कबूल करावं की ती भित्री आहे..." कामिनी चवताळून उठली. म्हणाली, "मी भित्री नाही. आत्मा असो की व्हँपायर, आय गिव अ डॅम...  आता एक नाही तर दोन सेल्फी काढून दाखवते तुम्हाला..." कॅमेरा सरसावत कामिनी जंगलाच्या दिशेने चालू लागली. बराच वेळ उलटून गेला पण कामिनीच्या येण्याची चिन्ह दिसेना तेव्हा अबीर म्हणाला, "इट्स हाय टाईम. कामिनीचा काहीच ठाव नाहीये. हेल विथ युअर डेयर जय, आपल्याला कामिनीला शोधायला हवं..." जय व साशाला अबीरचं म्हणणं पटलं. तिघंही कामिनीला शोधायला निघाले...

झाडाझुडुपातून, काट्याकुट्यातून जाणाऱ्या पाऊल वाटेवरून तिघंही पुढे जात होते. जाताना अधून मधून कामिनीला हाका मारत होते पण प्रतिसाद येत नव्हता. चालताना झाडीतून डोकावणारा वाडा त्यांना दिसला. कदाचित कामिनी तिथे असेल असा विचार करून तिघंही वाड्याच्या दिशेने गेले. जवळ पोहोचताच वटवागुळांचा प्रचंड मोठा झुंड त्यांच्याकडे येताना दिसला. अकस्मात झालेल्या हल्ल्याने तिघंही घाबरले आणि पळू लागले. वटवागुळं संख्येने खूप होती आणि तिघांनाही चावत होती. तिघंही रक्तबंबाळ झाले आणि जमिनीवर आडवे झाले. वटवागुळं त्यांच्या वाटेने निघून गेली तशी तिघंही उठले. वाड्याच्या गेटवर त्यांना कोणीतरी पडल्यासारखं वाटलं. त्या व्यक्तिचा चेहरा पाहून तिघंही अवाक झाले. ती कामिनी होती. साशाने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. "त...तो...फ....फो...ट..." इतकं बोलून कामिनीने मान टाकली. कामिनीचा कॅमेरा बाजूला पडला होता. साशाला तिच्या गळ्यावर दोन ठिपके दिसले. ती म्हणाली, "माय गॉड... हिला बहुतेक साप डसला आहे... पण साप इतक्या वर कसा डसेल..." जय विचार करत म्हणाला, "कामिनी कसल्यातरी फोटोबद्दल बोलते आहे बहुतेक. पण... कोणता फोटो... इथे तर काहीच नाही..." अबीर लगेच म्हणाला, "अत्ता ते महत्वाचं नाही. कामिनी बेशुद्ध आहे. आपणही त्या वटवागुळाच्या हल्ल्यात जख्मी झालो आहोत. आधी इथून निघून हॉस्पिटलला जाणं जास्त गरजेचं आहे..." सर्वांना अबीरचं म्हणणं पटलं. कामिनीला घेऊन सर्व तिथून लगेच निघाले...

हॉस्पिटलमध्ये सर्वांवर उपचार सुरू झाले. कामिनीला शुद्ध आली तेव्हा एक नर्स तिथे होती. तिने डॉक्टरला बोलावलं. डॉक्टरांनी कामिनीला तपासलं आणि म्हणाले, "ऑल ओके. तुम्ही ठणठणीत आहात. दुपारी तुम्हाला डिस्चार्ज देतो..." हळू हळू उठून बसत कामिनी म्हणाली, "माझ्यासोबत अजून तिघंजण होते ते कसे आहेत..." डॉक्टर थोडे गंभीर होत म्हणाले, "त्या तिघांवर उपचार सुरू आहेत. खरंतर तुम्हाला काहीच नव्हतं झालं. त्या तिघांच्या जख्मा साफ करताना आम्हाला जाणवलं की त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला होता. तुम्ही त्यांना पाहू शकता पण अजून ते शुद्धीवर आले नाहीत..." संध्याकाळी कामिनीला डिस्चार्ज मिळाला तेव्हा जाण्याआधी जय, अबीर व साशा ज्या खोलीत होते त्या खोलीत तिने डोकावलं. बेशुद्ध असलेले तिघंही तिला दिसले. कामिनीने एक कटाक्ष तिघांवर टाकला आणि मागे फिरून डिस्चार्ज घेऊन निघून गेली. काही वेळाने त्यांना शुद्ध आली. जयने कामिनीबद्दल विचारणा केली. डॉक्टर म्हणाले की कामिनीला डिस्चार्ज मिळालाय आणि ती घरी गेली. साशा म्हणाली, “हे काय... आम्ही तिला इथे घेऊन आलो, आणि ती... आम्हाला न भेटताच कशी निघून गेली... आपली मैत्रीण म्हणवते स्वत:ला आणि...” अबीर म्हणाला, “जाऊ दे साशा... आपण इथून बाहेर पडलो की जाऊ तिच्याकडे...” दोन दिवस तसेच गेले. जय, अबीर आणि साशा डिस्चार्ज होऊन बाहेर पडले आणि थेट कामिनीच्या घरी गेले...

एका महिलेने दार उघडले. कामिनीची आणि घराची देखभाल करणाऱ्या त्या मावशी होत्या. अबीर, जय व साशा यांना पाहून त्या हसल्या आणि तिघांनाही आत घेतलं. “मावशी, कामिनी कुठे आहे...” आत येत जय म्हणाला. मावशीने सर्वांना पाणी दिलं व म्हणाली, “अंघोळ करते आहे. काही कळत नाही हो काय झालंय कामिनीला... परत आल्यापासून जरा विचित्रच वागते आहे...” “विचित्र म्हणजे... काय म्हणायचं आहे तुम्हाला मावशी...” साशा पाणी पीत म्हणाली. मावशीने बोलायला सुरुवात केली, “आता काय सांगू... तुम्ही सर्व पिकनिकला गेलात त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे परवा कामिनी घरी परतली. मी दार उघडलं तर तिने माझ्याकडे असं पाहिलं जणू मी कोणी अनोळखीच आहे... मी माझी ओळख पटवून दिली तेव्हा कुठे कामिनी हसली आणि खोलीत निघून गेली. त्यानंतर दिवसभरात ती खोलीबाहेर पडलीच नाही. डाळ घातलेली तोंडलीची भाजी केली आणि तिला जेवणासाठी बोलवायला गेले तर म्हणाली मला तोंडली आवडत नाही. अहो कामिनीच्या वयाच्या दहाव्या वर्षापासून मी बघते आहे तिला... तोंडली म्हणजे तिचा जीव की प्राण... पण काल... मी खूप आग्रह केला तेव्हा चिडून तिने जेव्हा माझ्याकडे पाहिलं ना... ती नजर मी कधीच विसरू शकणार नाही. एवढंच कशाला, भूतांचे पिक्चर लागले की डोळे गच्च बंद करणारी कामिनी काल चक्क हसतमुखाने ते पिक्चर पाहत होती. मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या खोलीतून कसलेसे आवाज येत होते पण माझा धीरच होत नव्हता तिथे जायचा. मला तर खूप काळजी वाटते आहे तिची...” “काळजी करू नका मावशी... आम्ही आहोत... पर्वा रात्री जे झालं त्यामुळे जरा अपसेट असेल ती. तुम्ही हा माझा नंबर ठेवा. काही लागलं तर लगेच फोन करा...” एक छोटा कागद मावशीच्या हातात देत अबीर म्हणाला. मावशी चौघांच्या जवळ आली आणि कुजबुजत म्हणाली, “अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आज सकाळी कामिनीला दूध द्यायला गेले तर धक्क्याने ग्लास पडून फुटला. इतक्यात कामिनी तिथे आली आणि काच तिच्या पायात घुसली पण तिने काही...” “कोणाशी बोलताय मावशी...” वरच्या मजल्यावरून आवाज आला...

आवाजाच्या दिशेने सर्वांनी पाहिलं तर कामिनी जिन्यावरून खाली येत होती. वरवर हसत असली तरी तिची नजरमात्र संशयाने भरलेली होती. ती खाली येतच होती की साशा म्हणाली, "काय गं... आम्ही तुला हॉस्पिटलला नेलं आणि आम्हाला न भेटताच निघून गेलीस..." जय साशाला दुजोरा देत म्हणाला, "हो ना... यही तेरी दोस्ती यही तेरा प्यार..." कामिनीने स्मित केलं. अबीर म्हणाला, "अगं तिथे वाड्यावर काय झालं ते तरी सांग..." कामिनी मावशीकडे वळत म्हणाली, "मावशी, सर्वांसाठी चहा करा ना..." मावशीला आत जाईपर्यंत कामिनी पाहत राहिली. मग बोलती झाली, "अरे काय सांगू तुम्हाला... मी अंधारात अडखळत वाड्याजवळ गेले. तिथे चिटपाखरूही नव्हतं. वाडा भकास व उदासवाणा दिसत होता. मला खूप भिती वाटत होती. मी पटकन कॅमेऱ्यातलं नाईट व्हिजन चालू केलं आणि सेल्फी क्लिक केला. फ्लॅश पडला तसे असंख्य वटवागुळं वाड्याच्या मागून माझ्या दिशेने येऊ लागली. मी पळणार इतक्यात, "कामिनी..." असा बेसूर आवाज आला. मी थबकले. मागे वळले तर मला भोवळ आली. पुढचं काहीच आठवत नाही. मला जाग आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होते. अस्पष्टसा आठवतो एक मोठा दिवाणखाना आणि एका माणसाचा एक मोठा फोटो..." कामिनी बोलत असताना सर्व श्वास रोखून ऐकत होते. मावशीने आणलेल्या किटलीने शांततेचा भंग केला. अबीर म्हणाला, "असो... आपण सर्व सुखरूप आहोत हे काय कमी आहे... मला वाटतं कामिनी तू आराम कर. आम्हीही घरी जातो. उद्या भेटू नेहमीच्या ठिकाणी..." सर्वांना अबीरचं म्हणणं पटलं. सर्वजण पांगले. बाहेर पडताना जय थोडा गोंधळल्यासारखा वाटत होता. त्याने एकदा वळून पाहिलं आणि तो बाहेर पडला...

विचारात मग्न असलेला जय सर्वांचा निरोप घेऊन घराकडे चालू लागला. त्याला काहीतरी खटकत होतं पण कोणाशी बोलावं तेच समजत नव्हतं. "अरे जय... असा तंद्रीत कुठे चालला आहेस..." या आवाजाने त्याची विचारमालिका खंडीत झाली. त्याने पाहिलं तर समोर डेविडसर उभे होते. डेविडसर त्यांच्या कॉलेजमध्ये पॅरासायकोलॉजीचे प्रोफेसर होते. त्यांना पाहताच जयने त्यांना सर्व सांगण्याचं ठरवलं. डेविडसरांनाही जाणवलं की जयला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. ते त्याला घेऊन कॉफीशॉपमध्ये शिरले. खेळापासून ते आत्ता कामिनीच्या घरापर्यंतची सर्व हकीगत जयने डेविडसरांना सांगितली. डेविडसर गहन विचारात बुडाले. काही क्षण गेले आणि ते म्हणाले, "जय, बरं झालं हे तू मला सांगितलंस... वॉल्टरच्या त्या वाड्यात काहीतरी गडबड आहे हे नक्की. आत्ताच मला काही सांगता येत नाहीये. तू घरी जा आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस... मी स्वत: तुझ्या घरी येतो मग आपण सविस्तर बोलू..." डेविडसर त्यांच्या वाटेने निघून गेले. जय घरी येऊन पुन्हा विचारात बुडाला. तो इतका विचारात गढून गेला होता की मध्यरात्र झाली आहे हे त्याला समजलंच नाही. फोनच्या बेलने तो भानावर आला. अबीर बोलत होता, "जय, ताबडतोब कामिनीच्या घरी ये... तिथे काहीतरी गडबड आहे..." अबीर, जय आणि साशा कामिनीच्या घरी पोहोचले तेव्हा पहाट झाली होती. दिवाणखान्यात त्या मावशीचं प्रेत पडलं होतं आणि सोफ्यावर कामिनी बेशुद्ध पडली होती. अबीर आणि जयने कामिनीला तिच्या खोलीपर्यंत नेलं तर साशाने पोलीसांना फोन केला. तपास सुरू झाला. इंस्पेक्टर त्या तिघांकडे वळत म्हणाला, “इथे काय झालं तुमच्यापैकी कोणाला माहित आहे का...” अबीर बोलायला लागला, “सर, आम्ही सर्व कॉलेजचे मित्र-मैत्रिणी आहोत. आम्ही पिकनिकला गेलो असताना आमच्यावर वाटवागुळांचा हल्ला झाला. सकाळीच आम्ही सर्व हॉस्पिटलमधून बाहेर पडलो आणि इथे आलो. गप्पा झाल्यावर आम्ही घरी गेलो तर कामिनीच्या मावशीचा फोन आला. माझ्याकडे रेकॉर्डर आहे. हे ऐका...”

ऑडियो सुरू झाला, “अ...अबीर... लवकर ये... क...कामि... त...तू... हे काय... आ™™™™™™™™™™™™...” ऑडियो बंद झाला. इंस्पेक्टर ती क्लीप स्वत:कडे सेव्ह करत असताना कामिनी बाहेर आली, “कोण... पोलीस... इथे...” हे म्हणत असताना तिने मावशीचं प्रेत पाहिलं आणि जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या लेडी कॉन्स्टेबलने कामिनीला थांबवलं. इंस्पेक्टर बोलू लागला, “मिस कामिनी, या तुमच्या मावशी मारताना काय म्हणत होत्या... हे सगळं झालं आणि तुम्हाला काहीसुद्धा समजलं नाही... यात नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय...” इतर तिघांकडे वळत ते म्हणाले, “या बाई बहुतेक वरून खाली पडल्या असाव्यात आणि डोक्यावर आदळल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. आत्ताच काही सांगता यायचं नाही. पूर्ण तपासानंतरच काय ते समजेल. पण यांच्या मानेवर असलेल्या या दोन ठिपक्यांचा काय अर्थ असावा तेच समजत नाहीये...” इंस्पेक्टरने दाखवलेले मावशीच्या मानेवरचे ठिपके सर्वांनी पाहिले आणि सगळ्यांना धक्का बसला. जय म्हणाला, “कामिनी, तुझ्याही मानेवर असेच ठिपके होते जेव्हा आम्हाला तू त्या वाड्याबाहेर सापडली होतीस...” कामिनीने आपला दुपट्टा काढला. म्हणाली, “माझ्या मानेभोवती... कुठे... नाहीतर...” इंस्पेक्टर म्हणाला, “ठीक आहे. तपास होऊ दे मग समजेल. पण तोवर तुम्ही कोणीही शहर सोडून कुठेही बाहेर जाऊ नका...” इंस्पेक्टर बॉडी घेऊन गेला. साशा कामिनीजवळ बसली होती. जयने एकदा कामिनीकडे पाहिलं आणि म्हणाला, “कामिनी, खरं सांग... नक्की काय झालं मावशीला... हे तूच केलं आहेस... सकाळी आम्ही इथे आलो होतो तेव्हा इथे मुंग्यांची रंग होती. आम्हला त्या चावत असताना सारखी खाज येत होती पण त्याच मुंग्या तुला चावल्या तेव्हा तुला काहीच झालं नाही... हे नॉर्मल नाही... अबीर, साशा... हे नक्कीच नॉर्मल नाही...”

जय तणतणत बाहेर निघून गेला. कामिनी, अबीर व साशाला समजावू लागली, "अबीर, साशा अरे तुम्ही तरी समजावा जयला... तुम्ही मला ओळखत नाही का... मी हे असं कसं करेन... प्लीज बिलीव्ह मी यार... मला याबद्दल खरंच काहीच माहित नाही रे..." अबीर व साशाने एकमेकांकडे पाहिलं. अबीर म्हणाला, "हे बघ कामिनी, कोण खरं कोण खोटं हे मी तरी कसं सांगू... तुझं म्हणणं मानलं तर जयला खोटं ठरवल्यासारखं होईल आणि जयचं ऐकलं तर तुझ्यावर संशय येतो... मला कळतंच नाहीये काय करू ते. तुर्तास आपण शांत राहणंच योग्य. मॅटर पोलीसात आहे तर तेच काय ते बघतील. चल साशा..." अबीर निघाला. साशा कामिनीला मिठी मारत म्हणाली, "काळजी घे..." आणि अबीरसोबत निघून गेली. मागून दार बंद करण्याचा आवाज दोघांनाही आला. तिकडे घरी पोहोचताच जयने सिग्रेट सुलगावली व विचारात बुडून गेला. बराच वेळ विचार करूनही काही मार्ग न सापडल्याने त्याने डेविडसरांना फोन केला. "हॅलो डेविड सर... मी जय बोलतो आहे... सर तुम्ही..." जयचं वाक्य पूर्ण होण्याआधीच डेविड सर म्हणाले, "जय... मी तुलाच फोन करणार होतो. तू घरीच आहेस ना... मी आत्ता येतो अर्ध्या तासात. खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. आणि हो, बाकीच्यांनाही बोलाव..." फोन बंद झाला. जयने लगेच सर्वांना फोन करून घरी बोलवून घेतलं. अर्धा तास झाला असेल, अबीर जयच्या घरी पोहोचला. बेल वाजवणार इतक्यात, "अरे अबीर... आलास तू... बरं झालं..." असं म्हणत गेटमधून डेविडसर आत आले. दोघं अजून काही बोलणार इतक्यात, "आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ..."

आतून एक किंकाळी ऐकू आली. अबीर आवाज ओळखत म्हणाला, "हा जयचा आवाज आहे... जय... जय... दार उघड..." बराच वेळ बेल वाजवून, दार आपटूनही जय दार उघडत नाही म्हटल्यावर डेविडसर आणि अबीरने लाथा हाणून दार उघडलं. आत सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि हॉलच्या एका कोपऱ्यात असलेल्या रोमन सैनिकाच्या पुतळ्याच्या भाल्यात जय अडकला होता. भाल्याची पात जयच्या छातीच्या आरपार गेली होती आणि रक्ताळलेल्या हाताने जय अबीरला बोलवत होता. अबीर व डेविडसर त्याच्या जवळ गेले. "क...का...म..." असे अस्पष्ट उच्चार काढत जयने प्राण सोडले. इतक्यात साशा तिथे आली. जयची अवस्था पाहून तिने किंकाळी फोडली व भोवळ येऊन ती खाली पडली. पोलीसांना कळवण्यात आलं. तपास सुरू झाला. इंस्पेक्टर सर्वांकडे जात म्हणाला, “दोन दिवसात दोन संशयास्पद मृत्यू आणि प्रत्येक वेळी तुम्ही दोघं घटनास्थळी हजार असता पण हे काय तुमची ती मैत्रीण कामिनी कुठे दिसत नाही... आणि...” इंस्पेक्टरचं बोलणं पूर्ण होतं न होतं तोच साशा म्हणाली, “म्हणजे... कामिनी इथे नाही... असं कसं होईल... जायचा फोन आला आणि मी लगेच कामिनीला फोन केला... ती म्हणाली की ती पुढे होते म्हणून आणि तुम्ही म्हणताय...” “म्हणजे कामिनीला माहित होतं तुम्ही इथे येणार होता... ओह नो...” डेविडसर कुजबुजत असताना इंस्पेक्टर त्यांच्याजवळ आला व म्हणाला, “काय कुजबुजताय मिस्टर... कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय...”

डेविडसर बोलू लागले, “मी डेविड. यांच्या कॉलेजमध्ये पॅरासायकोलॉजीचा प्रोफेसर आहे. मरण्यापूर्वी जयचं आणि माझं फोनवर बोलणं झालं होतं. त्यांच्या जंगलातल्या घटनेबद्दल मला महत्वाची माहिती मिळाली आहे. इंस्पेक्टरसाहेब... हे प्रकरण साधं नाही... फार खोल आहे... अमानवी आहे...” इंस्पेक्टर म्हणाले, “अमानवी... बरोबर आहे प्रोफेसर... तुमचा विषयच तो आहे तर... पण आम्ही कायदा जाणतो... पुराव्यांच्या आधारावर निष्कर्ष काढतो. सध्यातरी समोर आलेल्या तपासावरून असं दिसतंय की हे प्री प्लॅनड मर्डरस आहेत... आम्ही ही बॉडी घेऊन जातोय... तुमचं चालू द्या... ते अमानवी वगैरे तुमच्या या विद्यार्थ्यांना शिकवा... पण तपास संपेपर्यंत शहर सोडून कुठेही जाऊ नका...” इंस्पेक्टर जयची बॉडी घेऊन निघून गेला. डेविडसर बोलू लागले, “पोलीस विश्वास ठेवणार नाहीत कदाचित पण अबीर, साशा आता मी जे काही सांगणार आहे ते सगळं अतर्क्य वाटलं तरी खरं आहे... जंगलात जयने तुम्हाला सांगितलेली वॉल्टरची व त्याच्या वाड्याची हकीगत अर्धवट आहे. वॉल्टरला अमरत्वाचं वरदान होतं. गावकऱ्यांनी जेव्हा त्याला मारहाण केली तेव्हा आपलं शरीर संपतंय हे समजताच वॉल्टरच्या आत्म्याने शरीर सोडून भिंतीवर असलेल्या फोटोमध्ये प्रवेश केला. सर्वांना वाटलं वॉल्टर संपला पण त्याचा आत्मा तिथेच त्या फोटोत होता. मांत्रिकाच्या विभूतीच्या कुंपणामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. त्याला या जगावर आपलं साम्राज्य स्थापित करायचं होतं आणि त्यासाठी त्याला गरज होती एका शरीराची...

कामिनी जेव्हा फोटो काढायला वाड्याजवळ गेली तेव्हा वॉल्टरला वाड्याबाहेर पडायची संधी मिळाली. तुम्हाला बेशुद्ध अवस्थेत कामिनी फोटोबद्दल सांगत होती ना... याचा अर्थ वॉल्टरच्या आत्म्याने कामिनीला आत बोलावलं आणि वश केलं. अबीर, साशा... तुम्हाला वाईट वाटेल पण कामिनी इज नो मोर... कामिनीच्या शरीराच्या रुपात आता वॉल्टर वाड्याबाहेर पडला आहे. भूक न लागणं, जखमा न होणं, क्षमतेपेक्षा चपळ व चलाख असणं... ही सर्व तीच लक्षणं आहेत. जय आणि कामिनीच्या त्या मावशीला बहुतेक हे सत्य समजलं असावं म्हणून त्यांचा मृत्यू ओढवला. आपण सर्व संकटात आहोत. वॉल्टरला रोखायचं असेल तर कामिनीचं शरीर संपवायला हवं आणि तेही त्या वाड्यात. मनुष्य रुपात असताना वॉल्टरची ताकद अर्धी असेल त्यावेळी कामिनीला पकडून त्या वाड्यात नेता येईल. आपण उद्या सकाळीच कामिनीला घेऊन वाड्यावर जाऊ...” अबीर आणि साशाला डेविडसरांचं म्हणणं पटलं. तिघंही सकाळची वाट पाहत आपापल्या घरी निघून गेले. साशा घरी पोहोचली तेव्हा घरात कोणीच नव्हतं. मस्त शॉव्हर घ्यावा आणि जेऊन लवकर झोपावं असा तिचा विचार होता. शॉव्हर घेत असताना अचानक लाईट गेले. अकस्मात झालेल्या अंधाराने साशा बावरली. पाणी बंद करून बाहेर आली. बाहेर काळोखाशिवाय काहीच नव्हतं. साशा कानोसा घेण्याचा प्रयत्न करू लागली. काहीतरी तिच्यामागून गेल्याचा साशाला भास झाला. साशाने झटक्यात मागे पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. ती पुढे जाणार इतक्यात, “चाललीस कुठे साशा...” या आवाजाने साशा थबकली. टेबलवर ठेवलेला टॉर्च तिने पेटवला आणि मागे वळली. पूर्ण काळ्या कपड्यात कामिनी जवळ जवळ साशाला खेटून उभी होती. साशा घाबरली. तिच्या हातून टॉर्च खाली पडला. साशा मागे जाताना खाली पडली. टॉर्चच्या प्रकाशात साशाने कामिनीकडे पाहिलं. ती हसत होती...

कामिनी म्हणाली, “साशा माझी मैत्रीण म्हणवतेस ना स्वत:ला... आणि मलाच संपवणाऱ्यांची मदत करतेस... का...” साशा पुरती घाबरली होती. थरथरत्या आवाजात म्हणाली, “त...तू कामिनी नाहीस... तू वॉल्टर आहेस... हो ना... डेविडसरांनी सर्व सांगितलं आहे आम्हाला...” कामिनी मोठ्याने हसत म्हणाली, “हुशार आहेस साशा. तुमच्या त्या डेविडने सांगितलेलं सगळं खरं आहे. मी वॉल्टरच आहे. कितीतरी काळ वाड्यात बंदिस्त होतो. त्या दिवशी कामिनी तिथे आली. मला वाड्याबाहेर पडण्यासाठी हवं असलेलं शरीर मला मिळालं. कामिनीला संमोहित करून मी वाड्यात बोलावलं. माझ्या तस्बिरीसमोर बसली असताना तिच्या मानेचा चावा घेतला. त्याचवेळी तिच्या आत्म्याने तिचं शरीर सोडून दिलं आणि मी त्या शरीरात प्रवेश केला. बाहेर पडत असताना तुम्ही तिघं वाड्याच्या दिशेने येताना मला दिसलात. मी तुमच्यावर वटवागुळांकरवी हल्ला करवला आणि त्याचा फायदा घेऊन मी वाड्याबाहेर आलो. त्या विभूतीमुळे माझी शक्ती गेली आणि कामिनीचं हे शरीर बेशुद्ध झालं. मला या जगावर स्वत:ची सत्ता पहायची आहे. पण... पण मी एकटा आहे... मला माझं साम्राज्य स्थापित करायला एका वारसाची गरज होती. मी त्या कामिनीच्या बाईला निवडलं. पण ती म्हातारी... तिचा चावा घेतला आणि तिचा तोल गेला. खाली पडून मेली ती आणि मी पुन्हा एकटाच राहिलो. तो जय... माझ्याबद्दल बरंच काही समजलं होतं त्याला...

त्या प्रोफेसर डेविडने सर्व सांगण्यासाठी तुम्हा सर्वांना जयच्या घरी बोलावलं. तू निरागसपणे कामिनीला म्हणजे मला सर्व सांगितलंस. मी तुम्हा सर्वांच्या आधी इथे आलो. जय तुमची वाट पाहत होता पण मला पाहून तो घाबरला. माझ्यापासून वाचण्यासाठी पळत असताना त्याचा पाय अडखळला आणि तो त्या पुतळ्यावर जाऊन अडकला. जयसुद्धा मारणार हे समजल्यावर मी त्याच्या रक्ताने माझी भूक भागवली आणि तिथून निघून गेलो. कामिनीची ती बाई आणि जय तर मेले, पण माझा वारस अजून मिळाला नाही मला. साशा... तुला काय वाटतं... हे सगळं का सांगितलं असेन मी तुला... कारण कामिनीप्रमाणेच तूही आता माझ्या या काळ्या साम्राज्याचा भाग होणार आहेस...” बोलता बोलता कामिनीच्या शरीरात असलेल्या वॉल्टरने कामिनीवर झडप घातली. अकस्मात झालेल्या हल्ल्याने साशा बावरली. कामिनी अजून काही करेल इतक्यात दोन्ही बाजूंनी तिला साखळदंडांनी वेढलं. एक टोक अबीरच्या हातात होतं तर एक टोक डेविडसर धरून होते. दोघांनीही दोन्ही बाजूंनी साखळदंड खेचून धरले. साखळदंडांनी जखडल्यामुळे कामिनी मागे सरकली. एखाद्या चवताळलेल्या जनावरासारखा तिचा चेहरा रागीट दिसत होता. “सोडा मला... सोडा... मी... मी सर्वांना संपवून टाकेन... सोडा...” दोन्ही हातांनी साखळदंड ओढत कामिनी म्हणाली. डेविडसर म्हणाले, “वॉल्टर... जय गेल्यावर आम्हाला खात्री होती, की तू पुन्हा हल्ला करणार. अबीर माझ्याबरोबर होता म्हणजेच साशावरच तू धावून येणार हे निश्चित होतं. म्हणून आम्ही दोघंही सर्व तयारीनिशी इथे आलो...” म्हणता म्हणता डेविडने एक क्रॉसचं लॉकेट कामिनीच्या डोक्याला लावलं. कामिनी बेशुद्ध झाली. डेविड म्हणाले, “हे शरीर आता शुद्धीवर नाही म्हणजेच क्रॉसमुळे वॉल्टरची अघोरी शक्ती जवाब देत आहे. हीच वेळ आहे... कामिनीला घेऊन आपण त्या वाड्यात जाऊ... लेट्स गो...”

अबीर, साशा आणि डेविड, कामिनीच्या शरीरात बंदिस्त असलेल्या वॉल्टरला घेऊन वाड्याजवळ पोहोचले आणि वाड्यातून बाराचे टोले ऐकू आले. गेटमधून आत जाताच वॉल्टर जागा झाला. सुटण्यासाठी झटापट करू लागला. आपल्या पाश्वी ताकदीने वॉल्टरने ते साखळदंड तोडले. त्या तिघांसमोर कामिनीच्या देहातला वॉल्टर अक्राळविक्राळ हसत म्हणाला, "मला संपवणार तुम्ही... पण ते इतकं सोपं नाही... तुम्ही तुमची शक्ती वाया घासवलीत... आता बघा माझी ताकद..." असं म्हणत असताना वॉल्टरने आपले दोन्ही हात हवेत नेले. त्याचबरोबर वाड्याच्या मागून असंख्य वटवागुळं वर आली. इतक्या मोठ्या संख्येने आले हे संकट पाहून तिघंही मागे पळणार तोच कामिनीने आपले दोन्ही हात त्यांच्या दिशेने केले. वटवागुळांचा प्रचंड मोठा पाऊस त्या तिघांवर कोसळला. काहींनी तर डेविड व अबीरला हवेत उचललं होतं. जख्मा होत असताना दोघांनी पाहिलं तर साशा जमिनीवर पडली होती आणि वॉल्टरने स्वत:ला वटवागुळात परिवर्तीत केलं होतं. अबीर व डेविडने त्यांच्याकडे असलेल्या चाकूच्या सहाय्याने स्वत:ला कसंबसं सोडवलं. दोघं साशाजवळ आले तर पूर्ण वटवागूळ झालेला वॉल्टर साशावर बसला होता. तो तिचा चावा घेणार इतक्यात डेविडने त्याचं क्रॉसचं लॉकेट त्या वटवागुळावर भिरकावलं. क्रॉस अंगावर पडताच ते वटवागूळ मागे सरकलं आणि बघता बघता गायब होत त्याजागी कामिनी दिसू लागली. अबीर व डेविडने राहिलेल्या साखळदंडांनी पुन्हा कामिनीला जखडलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या साशाला गाडीत ठेवलं आणि कामिनीला लगेच वाड्यातल्या वॉल्टरच्या तस्बिरीसमोर घेऊन आले. कामिनीच्या शरीरातला वॉल्टर तडफडत होता. सुटण्याचा प्रयत्न करत होता पण त्या क्रॉसमुळे त्याची शक्ती कमी पडत होती.

डेविडसर डोळे बंद करून छातीवर हात ठेऊन मंत्र म्हणू लागले. काही क्षणात डोळे उघडून हाताचा क्रॉस करत म्हणाले, "वॉल्टर... तुझा आता इथे काही संबंध नाही... कामिनीचं शरीर आणि हा मृत्यूलोक सोडून निघून जा... नाहीतर तुला कायमचा बंदिस्त करेन..." हे म्हणतानाच त्यांनी हाताचा क्रॉस सोडला. त्याचबरोबर कामिनीचं शरीर वितळू लागलं. वॉल्टरचा आत्मा लाल प्रकाशाच्या रूपात भेसूर ओरडत कामिनीच्या तोंडातून बाहेर आला आणि तस्बिरीवर आदळला. कामिनीचं शरीर पूर्ण वितळून नाहीसं झालं. अबीर म्हणला, " इट्स ऑल ओव्हर..." डेविडसर बाजूलाच उभे होते. म्हणाले, "नो इट्स नॉट... ही तस्बीर आणि हा वाडा जोवर आहेत तोवर वॉल्टर पण राहील... आपल्याला या दोन्ही गोष्टी नष्ट करायला हव्यात..." अबीरला डेविडसरांचं म्हणणं पटलं. त्याने ताबडतोब भिंतीला लावलेल्या कुऱ्हाडीने त्या तस्बिरीवर वार करत तस्बीर मोडून टाकली. सोबत आणलेल्या केरोसीनने तस्बीर पेटवून दिली. अबीर व डेविडसर बाहेर आले. त्यांनी केरोसीन बॉम्ब बनवून आणले होते. एकेक करून वाती पेटवत ते त्यांनी वाड्यावर भिरकावले आणि गाडीत बसून वेगाने निघाले. मागे प्रचंड मोठ्या आवाजासरशी स्फोट झाला आणि वाड्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. अबीरने गाडी थांबवत मागे वळून पाहिले. मागे बसलेले डेविडसर म्हणाले, "अखेर वॉल्टर नामक दुष्टशक्तीचा नाश झाला. व्हँपायर्सचं हे साम्राज्य पूर्ण नष्ट झालं. गॉड इज ग्रेट..." अबीरने पुन्हा गाडी सुरू केली. म्हणाला, "हो डेविडसर... तुमच्यामुळे हे शक्य होऊ शकलं... वॉल्टर इज नो मोर..." "वॉल्टर मेला असेल... पण त्याचा वारस अजून जिवंत आहे..." अचानक आलेल्या आवाजाने अबीर व डेविडसर चपापले. पाहिलं तर साशा खाली तोंड करून बसली होती. ती चेहरा वर उचलत हसली मात्र... तिचे पूर्ण काळे डोळे व सुळक्यासारखे बाहेर आलेले दोन दात पाहिले आणि दोघांनी किंकाळी फोडली... गाडी वेडीवाकडी होत झाडावर आदळली आणि तिचा प्रचंड स्फोट झाला. आगीच्या ज्वाळांना पार करत एक वटवागूळ आकाशात विहार करू लागलं...

समाप्त.

No comments:

Post a Comment