Saturday, April 28, 2018

ओळख...



सकाळचे नऊ वाजले होते. गाडी भरधाव वेगाने अंतर कापत होती. विकी, रोहन, अंजू आणि मुग्धा खिडकीबाहेर पाहत सफरीचा आनंद घेत होते. विकी शांतता भंग करत म्हणाला, "फार बोर झालं यार. अजून तासभर तरी लागेल पोहोचायला. अंताक्षरी खेळायची का...ए रोह्या, कानातले बुच्चू काढ तुझ्या. तर मी आणि अंजू एक टीम, रोहन आणि मुद्धा एक टीम... करायची सुरुवात..." एकामागून एक गाणी येऊ लागली तसं त्यांना प्रवासाचं अंतर कमी वाटू लागलं. त्यांच्या खेळात गाडीने कधी मुख्य रस्ता सोडला व कधी ती जंगलाच्या वाटेला लागली हे त्यांचं त्यांना कळलं नाही. गाडी थांबली तसे सर्व भानावर आले. समोर झाडीतून डोकावणारा छानसा बंगला दिसत होता. गेटवर पाटी होती, "ग्रीनस् कॉटेज..."

सर्वजण उतरले. "विकी, तू पुन्हा असा सुरात गायलास ना तर याद राख... अरे हे सूर म्हणायचे की आसूर रे..." रोहनच्या विनोदावर सर्व हसू लागले. त्यांचा आवाज ऐकून बंगल्यातून एक माणूस धावत बाहेर आला. नमस्कार पावनं. तुम्मी विकी ना... म्या म्हादू. हितं कामाला हाय. वाईस ल्येट जाला तुम्मासनी... या..." सर्वजण कॉटेजकडे जाऊ लागले. अजून एक जीप दारात उभी होती. तिला पाहून मुग्धाने विचारलं, "हे काय... अजून कोणी आहे का इथे..." म्हादू म्हणाला, "व्हय जी. येक जोडपं आलं हाय काल सांच्याला. तुमचं त्ये काय त्ये... छ्या... मला लाज वाटती..." "हनीमून रे म्हादू... कालपासून किती वेळा सांगितलं आहे तुला..." म्हादूच्या बोलण्याला उत्तर म्हणून हा आवाज आला. सर्वांनी पाहिलं तर दारात एक जोडपं उभं होतं. त्यातला पुरूष पुढे होत म्हणाला, "हाय... मी गौरव. ही माझी बायको नुपूर. वी आर हनीमूनर्स... तुम्ही..." विकीने गौरवशी हस्तांदोलन केलं. म्हणाला, "हॅलो. मी विकी. हा रोहन, ही मुग्धा आणि ही अंजू. सर्वांनी स्मित केलं. "काय हो... नाही म्हणजे हनीमून आणि जंगलात..." अंजू पुढे होत म्हणाली. नुपूर शेजारीच उभी होती. ती लगेच बोलती झाली, "अगं, मीही गौरवला तेच म्हणाले... तर हा म्हणतो कसा... सांग ना आता सांग..." गौरव हसत होता. ते म्हणाला, "पर्वतांवर, सागरतिरी कोणीही जातं पण असं निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळंच थ्रील आहे, नाही का..."

गौरवच्या बोलण्यावर सर्व मनमुराद हसले. म्हादूने आणलेल्या कांदा भजी, वडे, चहा, कॉफी यावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला. पोटाची खळगी भरली तसं सर्वांच्या मनात भटकंतीचे विचार येऊ लागले. म्हादू म्हणाला, "आसं बगा,  हिकडं डाव्या अंगाला वाईस आत येक छोटासा धबधबा हाय आन उजव्या अंगाला येक तलाव हाय. बाकी समदं जंगल. पर लई येगयेगळी झाडं, फुलं, पक्षी हायेत. फोटू झ्याक येत्याल तुमचं. आन हो... हितून तासभर लांब येक किल्ला बी हाय. तेला उद्या जावा, कसं..." सर्वजण आपापसात चर्चा करू लागले. नुपूरला पेंटिंगची आवड असल्याने नुपूर व गौरवने तलावाकडे जाण्याचे तर ही चौकडी धबधब्याच्या दिशेने जाते म्हणली. म्हादू पुढे म्हणाला, "म्या आसं करतू... मस्त पोहे करुनशान डबा देतू तुम्मासनी. म्हनजी वाईस भूक लागली तर कालजी नगं... हा पर सायेब, उन्हं उतरेपातूर परत या बरं... न्हाय, लई वंगाळ गोष्टी ऐकन्यात हायेत या जंगलाच्या... पाच वरीस अदुगर हितं एक परोफेसर बरेटो म्हनून आलता. तेला या जंगलातल्या झाडांचा आभ्यास करायचा व्हता. त्यो यक दिस तलावाकडं ग्येला त्यो ग्येलाच... दुसऱ्या दिशी त्येचं प्रेत गावलं. तवाधरनं या जंगलात कसले कसले आवाज येत्यात आन गाववालं म्हनत्यात परोफेसर बरेटोचं भूत बी दिसतंय कवा कवा... म्हनून म्हनतो, उन्हं उतरेपातूर परत या..."

भुताच्या गोष्टी कानी पडताच मुली घाबरल्या. वातावरण थोडं हलकं करायला गौरव म्हणाला, "काय हो... ते भूत, ते आवाज इथे बंगल्यात येत नाहीत का..." विकी, गौरवच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला, "अरे कसं येणार... हे म्हादू काका आहेत की खमके... कोणी घाबरू नका रे. जर भुतं इथे आलीच तर हे म्हादू काका घोस्ट बस्टरचं कामही करतील. हो ना काका..." विकीच्या बोलण्यावर सर्व हसले त्यात म्हादूही समाविष्ट झाला. तो म्हणाला, "सायेब, आपापल्या इस्वासाचा भाग हाय ह्यो. आसं म्हनत्यात की जितं आगळिक घडतं थितंच या वाईट शक्ती असत्यात. हितं आजवर तसं काय बी वाईट जालं न्हाय बगा... आन हो, जर म्येलेल्या मानसाची काय बी इच्चा पुरी करायची आसल किंवा तेचं तुमच्याकडं काय बी काम आसल तवाच फकस्त भुतं दिस्त्यात..." "गपा हो काका... काय सकाळी सकाळी डोक्याला शॉट देताय... काही होत नाही. भुतं वगैरे काही नसतात. चला रे आपण निघू. उगाच अजून उशीर नको..." म्हादूच्या बोलण्यावर थोडा त्रस्त झालेला रोहन म्हणाला. सर्वजण तयार झाले. मुलींच्या मनात थोडी धाकधूक होती पण मुलं सोबत आहेत म्हटल्यावर आणि एकटं रहायला तयार नसल्याने त्याही तयार झाल्या. सर्व बाहेर पडले. गौरव-नुपूर तलावाच्या दिशेने गेले तर बाकीची मंडळी धबधब्याच्या दिशेला लागली...

नुपूरने तलाव पाहिला आणि ती भारावून गेली. ते निसर्गरम्य दृश्य पाहून तिने तिथेच थोडावेळ बसण्याचा हट्ट केला. गौरव भलताच रोमँटिक मूडमध्ये होता. नुपूरच्या जवळ येत म्हणाला, ऐ मेरे नूरेनज़र... इस हसीन पल को यादगार बनाएँ..." नुपूर गोड हसत म्हणाला, "तुझ्यातला शायर जागा झाला तर... मला हेच तर हवं होतं. या रम्य ठिकाणी माझा लग्नाआधीचा गौरव सापडला मला..." नुपूरच्या हातून पेंटिंगचं साहित्य गळून पडलं आणि ती अलगद गौरवच्या कवेत विसावली आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तिकडे धबधब्याजवळ पोहोचताच विकी, रोहन, अंजू आणि मुग्धा सेल्फी काढू लागले, व्हिडीओ काढू लागले. बराच वेळ झाला तेव्हा त्यांना भुका लागल्या. म्हादूने दिलेल्या पोह्यांच्या डब्यावर सर्वांनी आपापली पोटं भरली. थोडावेळ आराम करावा मग परतीच्या प्रवासाला लागावं असाच सर्वांचा विचार होता. तलावाजवळ गौरव आणि नुपूर बराच वेळ बसून होती. एकमेकांबद्दल प्रेमळ बोलत, गौरवची शायरी ऐकत वेळ छान चालला होता. इतक्यात अंधार पडू लागला. गौरवने घड्याळात पाहिलं तर तीन वाजले होते. "यावेळी अंधार..." दोघांनाही अचंबा वाटला. ते निघायच्या तयारीत होते इतक्यात विजांचा कडकडाट झाला आणि एकदम पाऊस कोसळू लागला. "अशा अवेळी पाऊस... तोही इतका..." गौरवने शंका बोलून दाखवली. नुपूरही थोडी आश्चर्यचकित झाली होती. म्हणाली, "गौरव, चल आपण कॉटेजला परत जाऊ. हे काहीतरी विचित्र वाटतंय. काय रे, ते चौघंजण कुठे असतील... काय करत असतील..."

अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे धबधब्यात मौज करत असताना चौघंही घाबरले. अंजू म्हणाली, “हे काय विचित्र... इतका अंधार... आणि तोही या वेळी... हे फक्त मलाच जाणवतंय की तुम्हालासुद्धा...” बाकी तिघांनीही माना डोलवल्या. त्यांनाही हा बदल विचारांच्या पलीकडचा वाटला. पुढे कोणी काही बोलणार इतक्यात पाऊस कोसळू लागला. गोंधळलेले चौघंही इकडे-तिकडे पळू लागले. रोहन म्हणाला, “आपण त्या झाडाखाली थांबू आणि पाऊस कमी झाला की कॉटेजला जाऊ...” सर्वांना रोहनचं म्हणणं पटलं. एकमेकांचा हात धरून सर्व झाडाखाली येऊन उभे राहिले. ते झाड त्या चारही जणांना बऱ्यापैकी आसरा देईल इतपत मोठं होतं. चौघं तिथेच झाडाखाली बसले. पावसाचा जोर हळू हळू वाढत चालला होता. विजा चमकत होत्या. तिकडे गौरव व नुपूर कसे बसे कॉटेजवर पोहोचले. जोरदार पावसामुळे लाईट गेले होते. म्हादू कंदील घेऊन दारात उभा होता. गौरव आणि नुपूरला गेटवर पाहताच छत्री घेऊन धावत आला. गौरव म्हणाला, “हा असा अवेळी पाऊस कसा काय... आणि इतका अंधार... तोही चार वाजता...” नुपूर गौरवच्या जोडीनेच चालत होती. म्हणाली, “हो ना... माझं सामानही तिथेच राहिलं ना...” नुपूरला मध्येच थांबवत गौरव म्हणाला, “अगं सामानाचं काय घेऊन बसलीस... अशा वातावरणात आपण इथवर पोहोचलो हे काय कमी आहे... म्हादू, ते चौघं आले का परत...” म्हादू छत्री सावरत हळू हळू चालत म्हणाला, “सायेब... म्या बी तेंच्याच कालजीत हाय... आजूनतरी त्ये परत आले न्हाईत... तुम्मी आत चला. पाऊस वाईस कमी जाला की त्यासनी हुडकू आपन...” तिघंही आत गेले...

पावसाचा जोर कमी होत होता. गौरव म्हादूला म्हणाला, “म्हादू, पाऊस कमी वाटतोय... चल, आपण त्या चौघांना शोधायला जाऊ. नुपूर, तू इथेच थांब. रात्र पडायच्या आधी आम्ही परत येतो...” छत्र्या सांभाळत गौरव आणि म्हादू बाहेर पडले. तिकडे झाडाखाली बसल्या बसल्या चौघांचा डोळा लागला होता. मुग्धाला जाग आली. आजूबाजूला पाहिलं तर पावसाचा जोर कमी झाला होता. वारा मंद मंद वाहत होता. मुग्धाने बाकी तिघांना उठवलं. रोहनने घड्याळ पाहिलं तर पाच वाजले होते. तो म्हणाला, “बाप रे... पाच वाजले... म्हणजे जवळ जवळ दोन तास होतो आपण इथे...” अंजूने परिस्थितीचा अंदाज घेतला व म्हणाली, “हो ना... आणि पाऊस अजून थांबलाच नाहीये... काय विचित्र वातावरण...” विकी काहीच बोलत नव्हता. एकटाक एका झाडाच्या दिशेने पाहत होता. रोहन, मुग्धा आणि अंजू विकीजवळ आले. विकीला हलवत रोहन म्हणाला, “विक्या... अरे झाडाकडे काय बघतो आहेस असा... ए विकी...” विकी स्तब्ध उभा होता. “गाईज... मी झाडाकडे पाहत नाहीये... झाडाच्या मागे बघा...” असं म्हणत विकीने झाडाकडे बोट दाखवलं. सर्वांनी तिथे पाहिलं तर एक माणूस उभा होता. काळा कोट, काळी टोपी आणि हातात काठी... त्या माणसाचा चेहरा बराच विद्रूप होता. एका बाजूने पूर्ण भाजल्यासारखा दिसत होता. सर्वजण निश्चल होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्या माणसाने एका बाजूला हात दाखवला पण तिथे कोणीच बघायला तयार नव्हतं. तो माणूस हळू हळू पुढे आला आणि बघता बघता झाडाच्या आरपार होत त्या चौघांसमोर येऊन उभा राहिला...

मुग्धा आणि अंजू एकदम किंचाळल्या आणि चौघंही त्या माणसाच्या विरुद्ध दिशेला पळू लागले. थोडा वेळ अडखळत पळत असताना रोहनने मागे पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. “अरे थांबा... तो माणूस आपल्या मागे नाहीये...” रोहनच्या बोलण्याने सगळे पळायचे थांबले. ते पळत आले त्या दिशेला पाहत काही वेळ चौघंही तिथेच उभे राहिले. कोणीच दिसलं नाही तेव्हा सर्वांना जरा हायसं वाटलं. पळून पळून थकलेले ते चौघंही तिथेच दम खात बसले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. जंगलाशिवाय काहीच दिसत नव्हतं. “आपण बहुतेक हरवलो आहोत यार... जिथे जावं तिथे जंगलच जंगल... आपलं कॉटेज कुठे दिसतच नाहीये...” अंजूच्या बोलण्यावर सर्व विचार करू लागले. विकीने फोन करण्यासाठी खिसा चाचपडला तर त्याचा फोन गायब होता. तो म्हणाला, “माझा फोन... बहुतेक पडला असावा...” रोहननेही खिसा पाहिला आणि तोही म्हणाला, “माझासुद्धा फोन गायब आहे...” अंजू आणि मुग्धा एकमेकांकडे पाहत म्हणाल्या, “आमच्या पर्स...” सर्वजण गोंधळलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहत होते. कोणी काही बोलणार इतक्यात त्यांना कसलासा आवाज येऊ लागला. आवाजाच्या दिशेला सर्वांनी पाहिलं तर दोन झाडांना जोडणारा, जमिनीलगत आलेला आणि झोपाळ्यासारखा दिसणारा एक जाडजूड वेल हलत होता. तो हलणारा वेल पाहून सर्व अवाक झाले. हळू हळू जवळ गेले. तो वेल आपोपाप हलत होता. विकीने तो हलणारा वेल थांबवला. काही काळ गेला आणि चौघंही मागे फिरले तसा तो वेल पुन्हा हलू लागला. यावेळी मुग्धाने तो वेल थांबवला. रोहनने लगेच तो वेल पुन्हा ढकलला. इतक्यात जोरात किंकाळी ऐकू आली आणि तो वेल हलला. कोणीतरी धावत गेल्याचा भास चौघांनाही झाला...

कोणाला काहीच सुचत नव्हतं. मुग्धा थरथरत्या सुरात म्हणाली, “मला काही हे ठीक दिसत नाही... आपण लवकरात लवकर निघायला हवं इथून... चला लवकर चला...” सर्वांना मुग्धाचं म्हणणं पटलं आणि कॉटेजचा शोध सुरु झाला. तिकडे या चौघांना शोधायला कॉटेजवरून निघालेले गौरव आणि म्हादू काही अंतर पुढे आले तेव्हा गौरव म्हणाला, “पाऊस तर थांबला आहे पण ते चौघं आहेत कुठे काही समजत नाहीये... कुठे शोधायचं त्यांना... त्यांना फोन करावा तर एकही जण फोन उचलत नाहीये... काय करावं सुचतच नाहीये...” म्हादू शेजारीच उभा होता. तो म्हणाला, “सायेब, आता या रानावनात कुटं हुडकायचं त्यासनी... म्या म्हंतू आपन माघारी जाऊ... व्हयनी यकल्याच हायेत न्हावं... माजं ऐका सायेब...” दोघंही थोडा वेळ तिथेच थांबले. पाऊस ओसरला होता पण आता अंधार वाढायला लागला होता. गौरव म्हणाला, “ते सगळं खरं रे पण ती बिचारी कॉलेजची मुलं-मुली... तीही वाट शोधत असतीलच की... आम्ही पाऊस सुरु व्हायच्या आधी पोहोचलो आणि ते अडकले... नुपूर कॉटेजवर आहे. ती सुरक्षित आहे. आपण त्या चौघांना अजून थोडं पुढे जाऊन शोधू...” म्हादूला गौरवचं म्हणणं पाटलं. दोघंही पुढे चालू लागले. इकडे अडखळत ठेचकाळत विकी, मुग्धा, अंजू आणि रोहन कसेबसे कॉटेजच्या गेटजवळ पोहोचले. बंगला पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आणि सगळे आत गेले...

आत सगळं सामसूम जाणवत होतं. कोणाचाही वावर दिसत नव्हता. अंजू म्हणाली, "हे काय... गौरव आणि नुपूर दिसत नाहीत कुठे... म्हादूकाका पण गायब आहेत... गेलेत कुठे सगळे..." सर्वांनी बंगल्यात प्रवेश केला. स्मशान शांतता पसरली होती. रोहन म्हणाला, "मला वाटतं गौरव व नुपूर अजून परतले नसणार. ते पावसामुळे कुठेतरी थांबले असावेत..." मुग्धा रोहनला दुजोरा देत म्हणाली, "मलाही तेच वाटतं... आपण इथेच थांबू. त्यांच्यापैकी कोणी परत आलं तर..." सर्व बेलत असताना कसल्यातरी आवाजाने विकीने कान टवकारले, "गाईज गाईज... शूऽऽऽ... ऐका... पाण्याचा आवाज येतेय..." सर्वांनी नीट ऐकलं तर आतल्या खोलीतून शॉवरचा आवाज येत होता. सर्वजण तिथे पोहोचले. बाथरूमचा लाईट जळत होता आणि शॉवरसह गुणगुणण्याचा आवाज येत होता. जणू कोणी अंघोळ करत होतं. विकी आत गेला. त्याने पाहिलं तर शॉवरमधून पाणी पडत होतं आणि एका जागी आपली दिशा बदलत होतं. पाण्याखाली कोणीतरी उभं आहे असं जाणवत होतं. विकीने शॉवर बंद केला. त्याबरोबर गुणगुणण्याचा आवाजही बंद झाला. विकी बाहेर जायला वळला तोच शॉवर पुन्हा सुरू झाला. आतामात्र विकीसह रोहन, मुग्धा व अंजूपण घाबरले. विकीने पुन्हा शॉवर बंद केला व बाहेर आला. मुग्धाने लाईट विजवला आणि रोहनने बाथरूमचं दार बंद केलं. त्याचबरोबर एक किंकाळी ऐकू आली आणि एक अस्पष्ट आकृती बाथरूमच्या बाहेर जाताना सर्वांनी पाहिली...

त्या आकृतीला पाहून सर्व स्तब्ध झाले. कोणालाही शब्द फुटत नव्हता. अंजू थरथरत्या स्वरात म्हणाली, “त... ते काय होतं... इ...थे आपल्याशिवाय अ...जून कोणी आहे का...” हे बोलत अंजू मुग्धाजवळ गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याबरोबर मुग्धा दचकली पण अंजू आहे हे समजल्यावर जरा सावरली. इथे काहीतरी वेगळा प्रकार सुरु आहे हे एव्हाना चौघांच्याही लक्षात आलं होतं. रोहन म्हणाला, “आता इथे थांबण्यात अर्थ नाही... ते गौरव-नुपूरही दिसत नाहीत आणि तो म्हादूपण कुठे गेला काय माहित. आपण लगेच निघू...” सर्व रोहनच्या मागे जाऊ लागले. विकीमात्र एकटक खिडकीबाहेर पाहत होता. मुग्धा त्याला हलवत म्हणाली, “अरे विकी चल रे... असा तंद्रीत कुठे बघतो आहेस...” विकीने खिडकीबाहेर बोट दाखवलं. खिडकीबाहेर झाडाखाली तोच माणूस उभा होता जो जंगलात दिसला होता. तो माणूस हळू हळू पुढे सरकत होता. खिडकीपर्यंत तो आला आणि काही क्षण थांबला. अंजूने धावत जाऊन दारंखिडक्या लाऊन घेतल्या. सर्वजण एकत्र त्या बंदिस्त घरात उभे होते. खिडकीचं तावदान झटक्यासोबत उघडलं. तो माणूस भिंतीतून आरपार होत आत आला. सगळेजण श्वास रोखून हे दृष्य पाहत होते. आत आलेल्या त्या माणसाला पाहून सर्व खूपच घाबरले. अंजू आणि मुग्धाने तर किंकाळी फोडली. रोहन आणि विकीने दार उघडलं. सर्वजण बाहेर पळणारच होते की तो माणूस म्हणाला, “थांबा... मी इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा करायला आलो नाही तर तुम्हाला तुमची ओळख पटवून द्यायला आलो आहे. मी आहे प्रोफेसर ब्रेट्टो...

प्रोफेसर ब्रेट्टो हे नाव सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. रोहन म्हणाला, "प्रोफेसर ब्रेट्टो... पण ते तर..." प्रोफेसर ब्रेट्टोने मान हलवली. म्हणाले, "बरोबर आहे तुझं. तोच मी. इथे संशोधनासाठी आलो होतो. जंगलात तलावाकडे काम करत असताना अचानक पाऊस पडू लागला, विजा चमकू लागल्या... मी जिवाच्या आकांताने कॉटेजकडे पळू लागलो. विजा चमकतच होत्या. त्यातलीच एक माझ्या अगदी जवळ पडली. मी तरीही पळत पळत कॉटेज गाठलं. तिथे कोणीच नव्हतं. माझ्या लक्षात आलं की इतकं पळूनसुद्धा मला दम नाही लागला. त्या गडबडीत माझ्या गळ्यातला क्रॉस कुठेतरी पडला होता. तो शोधत मी पुन्हा तलावाकडे आलो. मला तिथे काहीतरी वेगळं वाटलं. मी नीट लक्ष्य दिलं तेव्हा काळंठिक्कर पडलेलं एक प्रेत दिसलं आणि आजूबाजूला बरीच गर्दी जमली होती. प्रेताच्या हातातली अंगठी पाहून मी ओळखलं की तो मीच होतो. अचानक मृत्यू झाल्याने मला ते समजलं नाही... आज मी इथे आहे ते त्याच कारणासाठी..." बोलणं सुरू असताना विकीची नजर सहजपणे आरशाकडे गेली आणि तो हबकला. "ह...हे क...काय..." त्याचा कापरा आवाज ऐकून सर्वांनी तिथे पाहिलं. आरशात कोणाचंच प्रतिबिंब दिसत नव्हतं. मुग्धा म्हणाली, "आरशात आपण दिसत नाही म...म्हणजे..." मुग्धाला दुजोरा देत अंजू म्हणाली, "आ...पणही य...या प्रोफेसरसारखे..." प्रोफेसर ब्रेट्टो स्मित करत म्हणाला, "अचूक ओळखलंत तुम्ही... तुम्हीदेखील माझ्याचप्रमाणे हे जग सोडून दुसऱ्या जगाच्या उंबरठ्यावर उभे आहात... विचार करा... इतकी धावपळ करूनही तुम्हाला थकवा जाणवत नसेल, तहान-भूक जाणवत नसेल... म्हणजेच या गरजांसाठी लागणारं शरीर तुमच्याकडे नाही. तुम्हाला अजूनही पटत नसेल तर चला माझ्याबरोबर..."

चौघंही प्रोफेसर ब्रेट्टोच्या मागे जंगलात गेले. सगळे एका मोठ्या झाडाजवळ येऊन थांबले. ते झाड दुसरं तिसरं नसून तेच होतं जिथे पावसापासून वाचायला हे चौघं थांबले होते. तिथे कोणीच नव्हतं. सर्वांनी नवल वाटून प्रोफेसर ब्रेट्टोकडे पाहिलं. प्रोफेसर ब्रेट्टो म्हणाले, “सर्वांनी आपले डोळे बंद करा... कॉसंट्रेट...” सर्वांनी डोळे बंद केले. त्यांना कसले कसले आवाज ऐकू आले. सर्वांनी डोळे उघडले. झाडासमोर काही माणसं उभी होती. त्यातल्या म्हादूला सर्वांनी ओळखलं. तो सर्वांना सांगत होता, “लय चांगली व्हती बगा... काय बी तरास न्हाय... फिरायला म्हनून आलते... आन आसं वंगाळ जालं... हितं या जंगलामंदीच कायतरी इपरीत हाय बगा... आदी परोफेसर बरेटो आनी आता ह्ये...” चौघांनाही काहीच समजत नव्हतं. रोहन म्हणाला, “कोणाबद्दल बोलत आहे हा म्हादू... गौरव-नुपूर तर नसतील...” “अरे गौरव तर तिथे उभा आहे...” मुग्धा एका बाजूला बोट दाखवत म्हणाली. अंजू म्हणाली, “प्रोफेसर ब्रेट्टो... हे काय चाललंय... कोण आहे तिथे... आणि तुम्ही आम्हाला इथे का आणलंत...” प्रोफेसर ब्रेट्टो हसले व म्हणाले, “तुम्हाला तुमची खरी ओळख पटवून द्यायला. प्रत्यक्षच जाऊन बघा म्हणजे सगळं कळेल...” विकी सर्वांना पुढे ढकलत म्हणाला, “चला रे... कोण आहे तिथे ते पाहू...” माणसांच्या घोळक्याजवळ पोहोचताच सर्वांना धक्का बसला. झाडाखाली काळेठिक्कर पडलेले चार मृतदेह त्यांना दिसले. ते ब्रेट्टोकडे वळणार इतक्यात त्यांना नुपूर धावत येताना दिसली. धापा टाकत ती गौरवजवळ आली. ती इतकी घाबरली होती की तिला बोलायचीही शुद्ध नव्हती. म्हादूच्या बाजूलाच एक छोटी मुलगी उभी होती. ती बोलू लागली, “मला तर लय भ्या वाटतंया... म्या जंगलामंदी खेळत व्हते, झोके घेत व्हते. तवा अचानक त्यो येल थांबला. म्या पुन्यांदा झोका घेतला तर त्यो येल परत थांबला. म्या लय घाबरले. थितं म्या यकलीच व्हते. म्या पुन्यांदा झोका घेनार तर त्यो येल आपनच हलायला लागला. म्या लागलीच उतरले आन थितनं पळून गेले...”

रोहनला एकदम काहीतरी आठवलं. तो म्हणाला, “म्हणजे काही वेळापूर्वी तो वेल आपोआप हलत होता तो आमचा गैरसमज होता तर... तो वेल स्वत: हलत नव्हता, तर ही मुलगी झोके घेत होती. आपण तो वेल थांबवला तेव्हा ती घाबरली कारण... कारण तिला आपण दिसलोच नाही...” तो पुढे काही बोलणार इतक्यात नुपूर बोलती झाली, “ही मुलगी म्हणते ते बरोबर आहे... गौरव, अरे माझ्यासोबत काय झालं मगाशी... मी अंघोळीला गेले होते तेव्हा अचानक पाणी चालू-बंद झालं. मग बाथरूममधले लाईट चालू-बंद झाले. मला तर काही सुचेच ना... मी लगोलग बाहेर आले आणि काहीतरी चढवून तुला शोधत इथवर पोहोचले. गौरव, या जंगलात काहीतरी गडबड आहे आणि ते आता कॉटेजपर्यंत येऊन पोहोचलं आहे...” मुग्धा आश्चर्याने म्हणाली, “म्हणजे कॉटेजमध्ये तो शॉव्हर, तो लाईट... ती नुपूर होती आणि आपल्याला पाहू शकली नाही म्हणून तीही घाबरली...” प्रोफेसर ब्रेट्टो हसत म्हणाले, “आता समजलं असेल तुम्हाला, की तुम्ही आता या जगात नाहीत. ती वीज कोसळली त्याचवेळी तुमचा या जगाशी संपर्क तुटला. अनंतात तुमचा प्रवेश झाला नव्हता आणि हे जग तुम्ही मागे टाकलं होतंत अशा त्रिशंकू अवस्थेत तुम्ही सर्व अडकलात. जेव्हा मृत्यूने अचानक मला गवसणी घातली तेव्हा माझीही अशी अवस्था झाली होती. कदाचित तुम्हा सर्वांना तुमची खरी ओळख पटवून देण्यासाठीच मला मुक्ती मिळाली नव्हती... माझं या जंगलात भटकणंच कदाचित इथल्या रहिवाशांना वेगळं काहीतरी भासत असेल... चला निघूया... आपल्याला खूप लांबच्या प्रवासाला जायचं आहे...”

प्रोफेसर ब्रेट्टो पुढे चालू लागले. रोहन, मुग्धा, अंजू आणि विकी त्यांच्या मागून जाऊ लागले. चालता चालता सर्वांच्या भोवती एक पांढरं वलय तयार झालं. चालत असताना रोहन आणि मुग्धाने एकमेकांना मिठीत घेतलं. रोहन म्हणाला, “आपलं लग्न झालं नाही, पण कायमची एकरूपता मिळाली हे काय कमी आहे...” मुग्धा रोहनच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, “रोहन, आज खऱ्या अर्थाने आपलं लग्न झालं...” विकी या दोघांकडे पाहत होता. तो अंजूला म्हणाला, “आज खूप खुश आहे मी. आता अनंतात तुझ्यासोबत अनंतकाळाचा सहवास... नाही का... अंजू, तुला कधी बोललो नाही मी... पण तुझा सहवास कायमचा मिळावा ही एकाच इच्छा होती माझी जी आज पूर्ण झाली...” विकीचा हात हातात घेत अंजू म्हणाली, “माझीसुद्धा...” प्रोफेसर ब्रेट्टो या दोन्ही जोडप्यांकडे पाहत हसला. पांढरं वलय वाढत गेलं आणि प्रोफेसर ब्रेट्टोसह चौघंही अनंतात विलीन झाले...

समाप्त.

No comments:

Post a Comment