दिवस मावळत चालला होता. दुपार टळून वेळ
संध्याकाळच्या प्रहरात शिरली होती. आकाशातले पक्षी आपापल्या घरट्याच्या दिशेने
जाताना दिसत होते. अशा वेळी सोनपरी मुक्त विहार करत आकाशातून जात होती. सोनेरी
पोषाख,
सोनेरी पंख, काचेची हिरा असलेली छडी आणि या सर्वांवर
कळस म्हणजे गोऱ्यापान चेहऱ्यावर फुललेलं मृदू हसू. उडत जाताना सोनपरीने सहज
धरतीकडे पाहिलं. एक सुंदर उद्यान तिच्या दृष्टीस पडलं. झाडांवर असलेली छान-छान फळं,
सुंदर फुलांच्या छोट्या छोट्या बागा, ठिकठिकाणी
वाहत असलेले पाण्याचे छोटे छोटे झरे, हे सर्व पाहून सोनपरी
भारावून गेली. ते उद्यान जवळून पाहण्यासाठी ती खाली उतरली. संध्याकाळ टळून जात
होती तरी उद्यानातला प्रकाश तसाच होता. फुलांच्या सुगंधाचा दरवळ सर्वत्र पसरला
होता. सोनपरी मुग्ध होऊन सगळीकडे पाहत होती. तिने गोडगोड फळं खाल्ली. झऱ्यांमधून
येणारं शीतल जल पिऊन आपली तहान भागवली. तिथे फुललेल्या फुलांपैकी काही स्वत:च्या
सोनेरी केसात माळली. तिथल्या रंगीबेरंगी फुलपाखरांशी खेळण्यात सोनपरी गर्क होऊन
गेली...
खेळत असताना सोनपरीचा तोल गेला आणि ती खाली
पडली. बाजूलाच एक मुनी ध्यानस्थ बसले होते. त्यांना सोनपरीच्या पायाचा स्पर्श झाला
आणि त्यांनी खाडकन डोळे उघडले. आपली आसनमांडी सोडत ते उभे राहिले. सोनपरीला पाहून
ते खूप संतापले. म्हणाले, "नादान सुंदरी,
तू माझा तपोभंग केला आहेस. तुझ्या कृत्याबद्दत मी तुला शाप देतो...
तुझं हे रूप कायमचं निघून जाऊन तू धरतीवरील सर्वात कुरूप स्त्री होशील. या माझ्या
उद्यानातच तू कायमची बंदिस्त होशील..." हे म्हणत असतानाच त्या ऋषींनी आपल्या
कपंडलूमधलं पाणी ओंजळीत घेऊन ते सोनपरीवर शिंपडलं. त्यासरशी सोनपरीचे पंख गायब
झाले. तिची सुवर्ण वस्त्र व तिचे अलंकार नाहीसे होऊन त्या जागी फाटकी मळकी वस्त्रे
आली. तिची सुंदर काया काळी पडून त्यावर जागो जागी फोड दिसू लागले. सोनपरीने
स्वत:कडे पाहिलं आणि ती रडू लागली. ऋषींच्या पायावर डोकं ठेऊन म्हणाली,
"क्षमा, क्षमा मुनीवर... आपण येथे आहात
हे मला ठाऊक नव्हतं. मला क्षमा करा साधू महाराज आणि या दुरावस्थेतून मला मुक्त
करा..."
सोनपरीच्या करुण याचनेने मुनी वरमले. सोनपरीला
उठवत ते म्हणाले, "उठ मुली...
मी माझा शाप परत नाही घेणार पण शापमुक्त होण्याचा एक मार्ग सांगतो... लांब
हिमालयातल्या एका गुहेत राहत असलेल्या एकाक्ष राक्षसाच्या डोळ्यातील अश्रू जेव्हा
तुझ्या कायेवर पडेल, तेव्हा तुझं रूप, तुझं
तेज तुला परत मिळेल. उत्तरेला हिमालयात मंगलगिरी पर्वत आहे. तो पर्वत पार करून
गेल्यावर नरभक्षक वृक्षांनी भरलेलं एक अरण्य लागेल. ते अरण्य पार केलं की एक
विषारी तलाव लागेल. तलावातल्या पाण्याला स्पर्श करताच अंगाची जळून राख होईल तेव्हा
सांभाळून. पुढे एका काळ्या अजगराशी सामना होईल. त्या अजगराच्या मुखातूनच एकाक्ष
राक्षसाच्या गुहेत जाण्याचा मार्ग आहे. कुठेही स्पर्श न करता अजगराच्या नाभीपर्यंत
पोहोचल्यास राक्षसाच्या गुहेचं द्वार उघडेल. त्याच्या डोळ्यातील अश्रू तुझ्यावर
पडताच तू पूर्ववत होशील. पण तोपर्यंत तुला इथून बाहेर पडता येणार नाही आणि या
काळात तुझ्या शक्तीचा फक्त तीन वेळा वापर करता येईल. कल्याण हो..."
इतकं बोलून ते ऋषी निघून गेले. नियतीला दोष देत, स्वत:कडे पाहत सोनपरी त्या उद्यानात फिरू लागली. पुढे काय करावं, या शापातून कसं
मुक्त व्हावं याचा विचार करत सोनपरी नदी किनारी पोहोचली. एका खडकावर बसून नदीकडे
पाहताना तिला किनाऱ्यावर काहीतरी पडल्यासारखं वाटलं. तिने जवळ जाऊन पाहिलं तर तो
एक तरुण होता. त्याची शुद्ध हरपली होती आणि त्याच्या अंगावर जखमा दिसत होत्या.
सोनपरीने त्या तरुणाला एका झाडाखाली ठेवलं. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्याभोवती
सोनेरी वलय दिसू लागलं. त्याच्या शरीरावरील रक्त नाहीसं झालं, त्याच्या सगळ्या
जखमा नाहीशा झाल्या. तो शुद्धीवर येऊ लागला. सोनपरीने त्या उद्यानातल्या फळांचा,
फुलांचा रस एकत्र करून त्या तरुणाला पाजला. तिच्या सुश्रुषेमुळे त्या तरुणाला बरं
वाटू लागलं. त्याने डोळे उघडले. त्याने समोर पाहिलं तर विकृत चेहऱ्याची एक बाई
बसली होती. तिचा तो अवतार पाहून तो तरुण घाबरला आणि मागे सरकू लागला. सोनपरी
म्हणाली, “घाबरू नकोस... मी तुला काहीही करणार नाही. पण तू इथे कसा काय... आणि या
जखमा...” त्या तरुणाने स्वत:कडे पाहिलं. त्याच्या जखमा बऱ्या झाल्या होत्या. रक्ताचा,
वेदनेचा लवलेशही नव्हता. त्या तरुणाच्या लक्षात आलं की याच बाईने आपल्यावर उपचार
केले...
जरा सावरून बसत तो तरुण म्हणाला, “मी हरी. इथून
जवळच असलेल्या भिवपुरी गावाच्या वेशीबाहेरच्या ओसाड माळावर एका पडक्या झोपडीत राहत
होतो. मी, आई आणि बाबा. आम्ही क्षुद्र, खालच्या जातीचे म्हणून गावाने आम्हाला
वाळीत टाकलं होतं. आमच्या छोट्याशा वाफ्यात भाजी पिकवून ती दुसऱ्या गावी जाऊन बाबा
विकत असत. त्यावरच आमची गुजरण चाले. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. बाबांनी पेरलेलं
बियाणं पाणी न मिळाल्यामुळे खराब झालं. त्या धक्क्याने बाबा गेले. त्यांच्या
क्रियेत लागणाऱ्या पैशांसाठी आमचा वाफाही गेला. माझ्या आईने मोठ्या कष्टाने मला
वाढवलं, मोठं केलं. कमावता झालो आणि
लाकडाच्या मोळ्या विकून मी आमच्या दोघांचा दिवस ढकलू लागलो. गावाबाहेरचं ते माळरान
जंगलाच्या तोंडावर होतं. लांडग्यांचा भयंकर सुळसुळाट होता तिथे. त्यामुळे
सूर्यास्तापूर्वी घरी परत यावंच लागे. एकदा जंगलात लाकडं तोडत असताना लांडग्यांनी
हल्ला केला. झुंडीने आलेल्या त्या जनावराशी मी फार काळ सामना करू शकलो नाही. चावे
घेऊन घेऊन त्यांनी मला घायाळ केलं. त्यांच्यापासून पळत असताना जखमांमुळे आणि
वेदनेमुळे मला भोवळ आली. शुद्धीवर आलो तेव्हा तुम्ही समोर होता...
पण... तुम्ही कोण...? आणि इथे या अवस्थेत...”
सोनपरी हसली. हरीच्या बाजूला बसत म्हणाली, “मी सोनपरी. परीराज्याच्या राजाची
एकुलती एक मुलगी. मी एक परी आहे हे तुला कदाचित पटणार नाही. मी सगळं सांगते
तुला...” आणि सोनपरीने इथे येण्यापासून ते ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सगळी हकीगत
हरीला सांगितली. हरीने आपले हात जोडत सोनपरीची क्षमा मागितली. म्हणाला, “मला माफ
कर परीताई, खरंतर मी तुला हडळ समजलो होतो. पण आता मला तुझी खरी ओळख पटली आहे. परीताई,
तू माझा जीव वाचवलास आता मीही तुला तुझ्या दु:खातून बाहेर यायला मदत करेन. त्या
राक्षसाच्या डोळ्यातलं पाणी मी आणेन. पण...” सोनपरीला हरीच्या मनातले विचार समजले.
तिने आपला डावा हात हरीसमोर धरला. तिच्या उजव्या हातातून सोनेरी किरणं निघाली आणि
डाव्या हातावर चांगली वस्त्र आणि एक तलवार प्रकट झाली. तोच उजवा हात तिने हरीच्या
उजव्या बाजूला नेला आणि तिथे चंदेरी रंगाचा आणि मोठाले पंख असलेला एक सुंदर घोडा
दिसू लागला. त्या घोड्याभोवती चंदेरी रंगाचं वलय होतं. त्या घोड्याने परीकडे पाहून
मान हलवली. त्याचवेळी सोनपरी कोसळली...
“परीताई... काय झालं...” हरी सोनपरीला सावरत
म्हणाला. कशीतरी सावरून बसत सोनपरी म्हणाली, “माझ्याकडे असलेल्या विद्येमुळे मी तग
धरून होते. आज तिचा तीन वेळा वापर झाला आणि माझी विद्या नाहीशी झाली आहे रे...”
सोनपरीला व्यवस्थित बसवत हरी उभा राहिला. म्हणाला, “काळजी करू नकोस परीताई, हा मी
निघालो ते अश्रू आणायला. सोनपरीने तिचा थरथरता हात हरीसमोर धरला. तिला नमस्कार
करून हरी घोड्यावर स्वार झाला. टाच मारताच घोड्याने आपले मोठाले पंख फडकावले आणि
हवेत झेप घेतली. वरवर जाणाऱ्या हरीने मागे पाहिलं तर सोनपरी आकाशाकडे पाहताना
त्याला दिसली. हरी म्हणाला, “अरेरे... किती दु:ख भोगावं लागतंय बिचाऱ्या
परीताईला...” “काळजी करू नकोस हरी, आपण लवकरच तिला या दु:खातून बाहेर काढू...” या
आवाजाने हरी चमकला. “आजूबाजूला तर कोणीच नव्हतं मग कोण बोललं...” हरी हा विचार करत
असताना घोड्याने मान मागे वळवली आणि म्हणाला, “हरी, अरे मीच बोलतोय हो...
सोनपरीच्या विद्येने निर्माण केलं आहे मला म्हणून मला बोलता येतं. तू आता सावरून
बस हं... मी आता अजून ऊंच झेप घेणार आहे...”
हरीने लगाम घट्ट धरला आणि घोडा अजून ऊंच उडू
लागला. आता खाली जमीन दिसत नव्हती तर ढगच ढग दिसत होते. मध्येच एखादा पक्षांचा थवा
दिसे. हरीला घोड्यासोबत उडताना पाहून पक्षांना नवल वाटे आणि ते या दोघांकडे पाहत
राही. मधूनच ढग दूर होत असताना जमिनीचे छोटे छोटे पुंजके दिसत, डोंगर तर हाताच्या
चिमटीत मावतील इतके लहान दिसत होते. हळू हळू घोडा खाली येऊ लागला. तो हरीला
म्हणाला, “हरी, हा मंगलगिरी पर्वत आहे. आता उतरायला तयार हो...” मंगलगिरी पर्वत
पार करून घोडा खाली उतरला. जमिनीवर येताच त्याचे पंख आणि त्याच्या भोवतीचं वलय
दोन्ही गोष्टी गायब झाल्या. घोडा म्हणाला, “हरी, हे समोर दिसतंय ना, ते आहे नरभक्षक
वृक्षांनी भरलेलं अरण्य. इथून त्या एकाक्ष राक्षसाची सत्ता सुरु होते. म्हणूनच
माझे पंख नाहीसे झालेत. आता आवाजही लुप्त होईल माझा. त्या आधी सांगतो, इथून परतीचा
मार्ग एकच आणि तो म्हणजे एकाक्षाचा वध. नाहीतर आपल्या दोघांचा मृत्यू...” घोडा
गप्प झाला. हरीला समजलं, की सोनपरीची सर्व विद्या लुप्त झाली आहे. आता स्वबळावर आत
जावं लागणार. हरीने घोड्याला प्रेमाने कुरवाळलं आणि म्हणाला, “काळजी करू नकोस
मित्रा. मी असं होऊ देणार नाही...” तलवार सरसावून हरीने अरण्यात प्रवेश केला...
ते अरण्य इतकं घनदाट होतं की सूर्यप्रकाशाचा
लवलेशही नव्हता. हरीने पुढे पाऊल टाकलं आणि “खस...खस...” या आवाजाने तो चपापला. हरीने
तलवारीवरची पकड अधिक घट्ट केली आणि डोळे किलकिले करून चहू बाजूंना पाहिलं तर
झाडांच्या फांद्या त्याच्याकडे येताना दिसल्या. हरीने सपासप सर्व फांद्या तोडल्या
आणि पुढे सरसावला. मध्येच एखादं झाड हरीला पकडी, त्यावेळी त्या झाडावर तलवारीने
वार करत हरी स्वत:ची सुटका करून घेई. झाडांशी सामना करत हरी बराच आत गेला. “किती
वेळ मी असा लढत बसणार आहे... या वृक्षांना अंतच नाही... एकाला कापलं तर दोन समोर
येत आहेत. काय करावं... पुढे कसं जावं...” हा विचार करत असताना हरीच्या दृष्टीस एक
मोठं झाड पडलं. त्याने पाहिलं तर ते झाड इतर झाडांच्या तुलनेत अधिक मोठं होतं आणि
त्याच्या भोवती एका प्रकारचं वलय होतं. त्या झाडातून निघालेल्या विविध फांद्या इतर
झाडांना मिळाल्या होत्या. हरी लगेच त्या झाडाकडे धावला. सपासप वर करून सर्व
फांद्या तोडून टाकल्या. ते झाड हलू लागलं आणि क्षणार्धात कोसळलं. त्यासरशी इतर
सर्व झाडं नाहीशी झाली. ते अरण्य नाहीसं झालं. कोसळलेलं झाड नाहीसं होऊन त्याजागी
एक माणूस दिसू लागला...
अंगभर ऊंची वस्त्रे, अलंकार, मुकूट परिधान
केलेल्या त्या माणसाभोवती एक वलय होतं. हरीला नमस्कार करून तो माणूस म्हणाला, “हे
मानवा, तुला शत शत धन्यवाद. मी एक देवदूत आहे. मला आणि माझ्या भावाला त्या एकाक्ष
राक्षसाने कैद करून आम्हाला या भयानक रूपात परिवर्तीत केलं. माझा भाऊ कुठे आहे ते
मी तुला नाही सांगू शकत, कारण जर मी तसं केलं तर त्याला कायमचा गमावून बसेन मी.
मला खात्री आहे तू त्यालाही सोडवशील. मला सोडवल्याबद्दल या पादुका ठेव तुला. या
जादूच्या पादुका आहेत. पायात घातल्यावर तुला हवेत उडता येईल. यशस्वी हो...” इतकं
बोलून आशीर्वाद देऊन तो देवदूत अंतर्धान पावला. हरीने त्याला नमस्कार केला आणि
पुढच्या प्रवासाला निघाला. एका चकाकणाऱ्या तळ्याने हरीची नजर वेधली. हरीला तहान
लागलीच होती. या तलावातलं पाणी पिऊन पुढे जावं हा विचार करून तो तलावाजवळ पोहोचला.
कमरेची तलवार आणि पादुका बाजूला ठेऊन हरी पाण्यात हात घालणार इतक्यात त्याला
सोनपरीने विषारी तलावाबद्दल सांगितल्याचं आठवलं. हरी मागे सरकला. बाजूला पडलेल्या
एका सुकलेल्या पानाला त्याने तलावात सोडलं. पाण्याचा स्पर्श होताच ते पान जळू
लागलं आणि एका क्षणात त्याची राख झाली...
हा तलाव पार करून पुढे कसं जायचं याचा विचार करत
असताना हरीची नजर पादुकांवर पडली. त्याने विचार केला, या पादुका घालून हवेत उडत
तलाव सहज पार करता येईल. हरीने पादुका चढवल्या आणि हवेत उडता झाला. तलावामधोमध हरी
पोहोचलाच होता की पाण्यात बुडबुडे यायला लागले आणि एक काळाकबिन्न, अजस्त्र विंचू
पाण्यावर आला. इतका मोठा विंचू हरीने कधीच पाहिला नव्हता. त्या विंचवाचे पाय
वडाच्या झाडाइतके जाडे होते तर नांगी नारळाच्या झाडाइतकी लांब होती. आपल्या
पुढच्या पंजांनी आणि नांगीने तो विंचू हरीला मारण्याचा प्रयत्न करू लागला. हरी
हवेत उडत असल्या कारणाने सहजासहजी आपला बचाव करू शकत नव्हता. या विंचवाला रोखायला
काहीतरी करायलाच हवं या विचारात असतानाच विंचवाच्या पंजाच्या प्रहाराने हरी
जमिनीवर येऊन आदळला. काही क्षण त्याची शुद्ध हरपली खरी पण जाग येताच त्याने पाहिलं
तर त्या विंचवाची नांगी भराभर खाली येत होती. हरी ताबडतोब बाजूला झाला आणि
तलवारीच्या एकाच वाराने त्याने नांगीच्या विषारी टोकाला छाटून टाकलं. तरीही तो
महाकाय विंचू अजून जिवंतच होता. हरीने लगेचच खाली पडलेलं नांगीचं टोक उचललं आणि
हवेत झेप घेऊन त्या विंचवाच्या मस्तकावर त्या टोकाने वार केला. स्तब्ध झालेला
विंचू पाण्यातच कोसळून नाहीसा झाला...
तलावातलं पाणी एकदम शांत झालं. एक माणूस
पाण्याबाहेर येऊन पाण्यावर उभा राहिला. हरीला नमस्कार करून तो माणूस म्हणाला,
“वंदन मानवा वंदन... आणि कोटी कोटी धन्यवाद. मी एक देवदूत आहे. एकाक्ष राक्षसाने
मला कैद करून हे भीषण रूप दिलं. पण आज तू मला मुक्त केलंस. या उपकाराची परतफेड
म्हणून हा घे अंगरखा. हा अंगरखा परिधान केल्यावर तू दिसेनासा होशील. कोणताही
सामान्य डोळा तुला पाहू शकणार नाही...” त्या माणसाला नमस्कार करत हरी म्हणाला,
“तुमचा कोणी भाऊ पण होता का ज्याला त्या राक्षसाने पडकलं होतं...” त्या देवदूताने
मानेने होकार देताच हरी पुन्हा म्हणाला, “काळजी करू नका. तेही आता मुक्त झालेत आणि
तुमच्या भेटीची त्याना ओढ आहे...” त्या देवदूताच्या डोळ्यात पाणी तरारलं. हरीला
आलिंगन देत तो म्हणाला, “मानवा, या दुरावास्थेतून तू आम्हा दोघांचा उद्धार
केलास... किती रे आभार मानू तुझे... या तुझ्या कामगिरीबद्दल ही कट्यार ठेव तुला.
बरं का... ही नुसती कट्यार नसून इंद्रदेवांच्या वज्राचा हा एक टवका आहे. याचा वापर
एकदाच करता येईल. या कट्यारीचं काम झालं की ती आपोआप इंद्रवज्रात जाऊ मिळेल. जा
मानवा, कल्याणमस्तु...” इतकं बोलून तो देवदूत आणि तो तलाव दोन्हीही गायब झाले. हरी
त्याला मिळालेली कट्यार आणि अंगरखा न्याहाळत होता इतक्यात, “फस्स्स्सssssss...”
आवाजाने हरी चपापला. त्याने इकडे-तिकडे पाहिलं
पण कोणीच दिसत नव्हतं. तलवार घट्ट धरून हरी सावधपणे पुढे जाऊ लागला तर पुन्हा,
“फस्स्स्सssssss...” या आवाजाने तो चरकला. हरीने समोर पाहिला तर दोन लाल दिवे दिसत
होते. हळू हळू दिवे मोठे होत गेले आणि अचानक एक प्रचंड मोठा काळा अजगर हरीच्या
समोर आला. त्या अजगराची जबड्यापासून शेपटापर्यंत मोजणी केली तर संपूर्ण शहर
व्यापून टाकेल इतका तो मोठा होता. त्या अजगराची काया तर डोंगरातल्या बोग्द्याइतकी
मोठी होती. ते लालबुंद डोळे जणू क्रोधीत होऊन आग ओकत होते. हरी विचार करू लागला,
“तलवारीने तो विंचू मेला खरा पण हा अजगर तर त्याहून मोठा आहे. ही तलवार म्हणजे
याच्यासाठी सुईच आहे की... काय करावं आता...” विचार करत असताना हरीला परीताईने
सांगितलेल्या अजगराबद्दल आठवलं आणि त्याला एक युक्ती सुचली. त्याने लगेच पादुका
घातल्या व अंगरखा परिधान केला. त्याबरोब्बर हरी दिसेनासा झाला आणि हवेत उडू लागला.
अजगराच्या विशालकाय जबड्यातून हरीने आत प्रवेश केला. हळू हळू जागा लहान होत गेली.
हरी अवघडल्यासारखा झाला. पण अजगराला स्पर्श करून चालणार नव्हतं. हरीला एका ठिकाणी
टणक जागा आढळली. हीच या अजगराची नाभी असावी असं हरीला वाटलं. त्याचा अंदाज खरा
ठरला. त्या टणक जागेवर जाऊन उभा राहताच, “खडखड करत डाव्या आणि उजव्या बाजूची दारं
उघडली...
चुकीच्या दारातून आत गेला असता हरी अजगराच्या
पोटात गेला असता. काय करावं याचा विचारच करत होता, की उजव्या बाजूने,
“खर्रर्रssssss...” असा आवाज त्याला आला. हा नक्कीच घोरण्याचा आवाज आहे हे हरीने
ताडलं आणि आपली पावलं त्या दिशेला वळवली. एका बोळातून हरीने आत प्रवेश केला. एका
अजस्त्र दिवाणावर प्रचंड देहाचा एक राक्षस घोरत पडला होता. त्याचं ते अवाढव्य शरीर
पाहून हरीला थोडी भीती वाटली. हवेतल्या हवेत हरीने त्या राक्षसाचं परीक्षण केलं.
मोठाली काळी शिंगं, लांबसडक केस, घनदाट मिशा, अंगभर पसरलेले केस आणि एखाद्या
राजवाड्याच्या दाराइतका मोठा एक आणि दोन त्याहून थोडे लहान असे तीन डोळे मस्तकावर.
हरीपुढे प्रश्न होता, “याच्या डोळ्यातले पाणी घ्यायचं कसं आणि याच्यापासून वाचायचं
कसं... याला एकाक्ष म्हणतात. अक्ष म्हणजे डोळा. पण याला तर तीन डोळे आहेत... मग
एकाक्ष... म्हणजे हा एकच डोळा खरा आहे आणि हे बाकी दोन डोळे म्हणजे या राक्षसाच्या
मायेचाच प्रकार असावा...” जमिनीवर एक बाटली पडली होती. हरीला एक युक्ती सुचली. उडत
जात हरी त्या राक्षसाच्या डोळ्याजवळ आला. पायाने हरीने त्या राक्षसाच्या मोठ्या
डोळ्यावर जोरात लाथ मारली. “ओssssssय...” असं मोठ्याने ओरडत एकाक्ष जागा झाला...
डोळा चोळत असताना त्याच्या डोळ्यातून पाण्याचा
थेंब बाहेर पडला. हरीने लगेच जवळ जात बाटलीत तो थेंब बरोब्बर घेतला. एकाक्ष उठून
बसला. त्याने जमिनीवर पाय ठेवताच भूकंप झाल्यासारखी जमीन हादरली. त्याने सर्वत्र
नजर फिरवली आणि भसाड्या आवाजात म्हणाला, “मला मानवाचा वास येतोय... इथे एखादा
मनुष्य नक्कीच आहे... थांब तुला शोधूनच काढतो...” असं म्हणत एकाक्षाने डोळे बंद
केले आणि हवेत हरी उभा होता त्या दिशेला पाहिलं. पुन्हा गर्जना करत म्हणाला,
“हम्म... तू तिथे आहेस तर... तुला काय वाटलं, तू मला दिसणार नाहीस... तो अंगरखा
आणि पादुका तुझ्याकडे आहेत म्हणजे त्या दोन देवदूतांना तू भेटलास तर... असो... आता
तुला माझ्या या पंजात पकडून एखाद्या किड्याप्रमाणे चुराडा करतो तुझा...” हे म्हणत
असतानाच आपले दोन्ही मोठाले हात एकाक्षाने दोन्हीही बाजूंनी हरीकडे नेले. हरी पटकन
खाली आला. दोन्ही हात एकमेकांवर आपटले आणि टाळीचा प्रचंड मोठा आवाज झाला. एकाक्ष वार
करत होता आणि हरी ते चुकवत होता. एकाक्षाचा डोळा अजूनही मिटलेलाच होता. एका
क्षणासाठी त्याने डोळा उघडला. हे दिसताच हरीने कट्यारीने डोळ्यावर एकच वार केला.
रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. “आssssss...” असं बिभत्स ओरडत एकाक्ष जमिनीवर
कोसळला आणि क्षणार्धात त्याचा देह जळू लागला...
क्षणार्धात जमिनीवर राख पसरलेली दिसली आणि ती
कट्यार त्या राखेत स्थिर उभी होती. हरी ती कट्यार उचलणार इतक्यात ती गायब झाली.
एकाक्ष राक्षस संपला होता. त्याबरोब्बर हरीच्या आजू-बाजूला असलेला काळोख नाहीसा
झाला. तो अजस्त्र अजगरसुद्धा दिसेनासा झाला. हरीने अंगरखा काढला. लांबवर हरीला
काहीतरी चमकताना दिसलं. तो तोच उडणारा घोडा होता ज्यावर बसून हरी इथे आला होता.
हरीने घोड्याला साद घातली. घोड्याने आपले पंख फडकवले आणि लगेच उडत उडत हरीजवळ
आला. हरीजवळ उभा राहत तो म्हणाला, “हरी, त्या राक्षसाचा वध करून तू त्याची मायाही
नष्ट केली आहेस. आता आपल्याला जराही विलंब करता कामा नये. लगोलग सोनपरीकडे
जाऊ...”हरीला घोड्याचं म्हणणं पटलं. हरी लगेच घोड्यावर स्वार झाला आणि घोडा हवेत
उडू लागला. नद्या, डोंगर पार करत घोडा उद्यानात उतरला. सोनपरी अत्यंत कृश अवस्थेत
एका झाडाखाली बसली होती. तिला बोलताही येत नव्हतं की हात-पायही हलवता येत नव्हते.
हरीने पटकन बाटलीत घेतलेला एकाक्ष राक्षसाच्या अश्रूचा थेंब सोनपरीच्या मस्तकावर
ओतला. थेंबाचा आणि मस्तकाचा स्पर्श होताच तेजोमय प्रकाश निर्माण झाला. प्रकाश इतका
प्रखर होता की हरी व घोडा दोघांचेही डोळे दिपले...
प्रकाश जसा कमी झाला तसं दोघांनी पाहिलं तर ती
कुरूप स्त्री गायब झाली होती आणि त्या जागी नितांत सुंदर अशी सोनपरी हसत उभी होती.
सुवर्ण पेहराव, सोनेरी पंख, हातात काचेची छडी आणि त्यावर चकाकणारा हिरा. शिवाय
सोनपरीचे देखणे मोहक रूप पाहून हरी तिच्याकडे पाहताच राहिला. सोनपरी हरीच्या जवळ
येत म्हणाली, “शाब्बास हरी, तू माझ्यासह त्या दोन देवदूतांचाही उद्धार केलास. तू
खूप चांगला आहेस. तू माझी एवढी मदत केलीस आता मीही तुझ्यासाठी काहीतरी करणार आहे...”
हे बोलत असतानाच सोनपरीने डोळे बंद केले आणि छडी उजवीकडे धरली. छडीवरचा हिरा चमकू
लागला. काहीवेळ चमकून हिरा शांत झाला. सोनपरी डोळे उघडत म्हणाली, “हरी, आता जा
तुझ्या गावाला. काळजी करू नकोस. ज्या गावाने तुला लाथाडलं तेच गाव आता तुला जवळ
करेल. धन-संपत्तीची तुला कधीही कमतरता भासणार नाही. आणि, हा घोडा, ही तलवार, हा
अंगरखा आणि या पादुका तुझ्याच आहेत. या सर्वांचा तू सदुपयोग नक्कीच करशील. माझे
आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत...” सोनपरी अंतर्धान पावली. हरी त्याच्या गावाला
परतला. वेशीवर सर्व गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं. गावाच्या मधोमध असलेल्या
आलिशान बंगल्यात त्याला नेलं. धन-धान्याने भरलेला बंगला आणि हरीवर लोकांचं प्रेम
पाहून हरीची आई आनंदाश्रू ढाळत होती. आपल्या कीर्तीने व सद्गुणांनी हरीने सर्वांची
माने जिंकली आणि हरीशेट म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाला...
समाप्त.