"अहो, खिडकीतून बाहेर काय बघताय..." खिडकीबाहेर
टक लावून बसलेल्या आजोबांना आजीने हटकलं. आजीकडे पाहत आजोबा म्हणाले,
"काही नाही गं... गेले चार महिने आपण ज्याची वाट पाहत होतो,
तो क्षण आलाय... त्यांनी आपल्याला जे दिलं त्याची परतफेड
करण्याचा..." आजी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, "हो का... चला, म्हणजे ज्या कामासाठी आपण इथे आलो ते
अखेर होणार तर... आता तुम्ही वर आपल्या खोलीत जा बघू... मी आलेच मागून..."
आजी आत निघून गेल्या व आजोबा जिना चढू लागले...
सकाळचे अकरा वाजले असतील,
मुख्य रस्त्यापासून जरा आत असलेल्या निर्मनुष्य गल्लीच्या मध्यावर असलेल्या
त्या बंगल्याजवळ एक बाईक थांबली. एक खोका हातात धरत तो गेटमधून आत शिरला. दाराकडे
जाताना त्याची नजर चहूबाजूला फिरत होती. त्याने बेल वाजवली. आजीने दार उघडलं. टोपी
घातलेल्या हातात खोका घेतलेल्या त्याच्याकडे पाहत आजीने विचारलं, "काय काम आहे...? कोण हवं आहे तुम्हाला...?" त्या माणसाने आत झाकण्याचा प्रयत्न केला पण सेफ्टीडोर बंद असल्याने
त्याला काहीच दिसत नव्हतं. खोका वर करत तो म्हणाला, "कुरियर
आहे तुमचं..." सेफ्टीडोरच्या फटीतून आजीने पत्ता पाहिला, "घाटपांडे, बंगला नंबर चार..." हे पाहून आजी
म्हणाल्या, "हा बंगला नंबर चार नाही..." त्या दार
बंद करणार इतक्यात तो म्हणाला, "ओह... माफ करा... इतका
उन्हाळा आहे, जरा पाणी मिळेल का..." आजीने दार उघडलं
आणि पाणी आणायला त्या आत गेल्या...
त्या माणसाने लगेच शिट्टी वाजवली आणि भिंतीमागे
लपलेला दुसरा माणूस बाहेर आला. दाराजवळ तो येताच दोघांनी बॉक्स खाली ठेवला. भराभर
तो उघडत आत असलेले हातमोजे घातले आणि बंगल्यात प्रवेश केला. हातमोजे घातलेल्या
दोघांना आत आलेलं पाहून त्या आजींच्या हातून ग्लास खाली पडला. "अहो,
खाली या... ह...हे ब...घा कोण..." ती बोलतच होती की एकाने तिचं
तोंड दाबलं आणि म्हणाला, "आजी, असं
अनोळखी माणसासाठी दार उघडू नये... रघ्या, ही कोणालातरी बोलवत
आहे. बघ वर कोण आहे. हिला मी बघतो. थोबाड तर ओळखीचं वाटतंय हिचं..." रघ्या
जिना चढू लागला. इकडे त्या माणसाने एक हात त्या बाईच्या तोंडावर ठेवत दुसऱ्या
हाताने तिचा गळा आवळायला सुरुवात केली. "उं... उं..." हा आवाज कमी होत
गेला आणि ऐंशी पार केलेल्या त्या आजीने काही क्षणातच प्राण सोडले...
तिला तशीच टाकून हा माणूस उठला आणि
दिवाणखान्यातली कपाटं ढुंडाळू लागला. इतक्यात, "जग्गू... ए जग्गू वर ये. तिजोरी इकडे आहे..." या आवाजाने जग्गू वळला
अन् भराभर जिना चढू लागला. खोलीच्या दारातून त्याने आत पाहिलं. मोठा पलंग, बाजूला एक टेबल आणि समोर आरशाचं कपाट अशी ती साधी खोली होती. आरशाला टेकून
दाराकडे पाठ करून एक माणूस उभा होता. "रघ्या... ए रघू... असा का उभा आहेस... ए रघू..." असं म्हणत
जग्गूने रघूला हलवलं. त्यासरशी रघू जमिनीवर कोसळला. त्याचे डोळे उघडे होते आणि जीभ
बाहेर आली होती. जग्गूने त्याच्या नाकाला बोट लावलं आणि चपापून उठून उभा राहिला.
त्याच्या चेहऱ्यावर भितीचं सावट पसरलं होतं. "ह...हा तर म....मेला..."
हे म्हणत तो आसपास पाहू लागला इतक्यात, "पाणी..."
या आवाजाने जग्गू चरकला. त्याने हळू हळू मागे पाहिलं आणि...
पोलीस तपास सुरू झाला. खोलीचे व तिथल्या सर्व
वस्तूंचे फोटो काढले जात होते. इंस्पेक्टर तिथे जमलेल्यांची जबानी घेत होते. एक जण
म्हणाला,
"साहेब, हा बंगला एका वृद्ध जोडप्याचा
आहे. त्यांच्या मुलाने दुसरीकडे मोठं घर घेतलं. वर्षातले काही दिवस हे जोडपं तिथे
मुलासोबत रहायला जातं. चार महिन्यांपूर्वी ते दोघं असेच मुलाकडे गेले होते. मुलगा,
सून व नातू बाहेर गेले असताना अज्ञात इसमांनी घरावर हल्ला केला
म्हणे. मंडळी परतली तेव्हा दोघांचे मृतदेह सापडले. घरातल्या वस्तूही चोरीला गेल्या
होत्या. त्यांच्या मुलाला हे दु:ख सहन नाही झालं आणि तो कायमचा हा देश सोडून निघून
गेला. त्याने स्वत:चं घर विकलं पण आई-बाबांची आठवण म्हणून हा बंगला तसाच ठेवला व
चाव्या आमच्याकडे दिल्या. महिन्यातून एकदा आम्ही बंगला उघडून साफ करून घेतो. आज
बंगल्याच्या दिशेने, "लवकर ये... तिजोरी..." असा
ओरडा ऐकू आला तेव्हा आम्हाला नवल वाटलं कारण इथे कोणीच राहत नाही. चोर आले असं
वाटून आम्ही इथे आलो तर हे दोघं इथे मरून पडले होते..."
सगळं बोलणं ऐकून इंस्पेक्टर म्हणाला,
"हम्म... गेले सहा महिने चाललेल्या हत्या व चोरीच्या मालिकेतला
हा प्रकार दिसतोय. या मृत व्यक्तींच्या पेहरावावरून व त्यांनी घातलेल्या
हातमोजांवरून वाटतंय, की हे तेच गुन्हेगार आहेत व चोरीच्या इराद्याने घरात घुसले
असावेत. पण... यांचा खून... कोणी केला असेल यांचा खून...”
समाप्त.
No comments:
Post a Comment