सुजानगढ, भारताच्या
मध्यावर वसलेलं एक सुंदर, आनंदी आणि प्रगतीशील राज्य. राज्याचे महाराज कुमारसिंह
आणि महाराणी सुलेखादेवी खूप प्रेमळ आणि प्रजेला हवेहवेसे होते. राज्यात सर्वकाही
छान होतं पण एकच सल होता. महाराज आणि महाराणीच्या विवाहाला दहा वर्षे सरून गेली
तरी त्यांना मूल-बाळ नव्हते. राजपुरोहितांनी त्यांना त्यांच्या पारंपारिक मंदिरात
जाऊन देवाला साकडं घालण्यास सांगितले. महाराज आणि महाराणी पूजा करून परतत असताना
त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी पाहिलं तर देवळाच्या मागच्या बाजूला
वाहत असलेल्या नदीच्या किनारी एका परडीत ते बाळ होतं. सुलेखादेवीने ते बाळ उचललं. महाराज
म्हणाले, “उगवतीच्या वेळी सूर्यदेवाने दिलेला हा प्रसाद म्हणून आजपासून याचं नाव
आदित्य...” महाराजांनी आदित्यच्या दोन्ही हातांवर असलेलं गोंदण पाहिलं. त्याच्या
उजव्या हातावर एक पक्षी होता तर डाव्यावर एक ज्योत होती. आदित्य ज्या परडीत होता
त्यात एक छोटा कागदही होता. त्यावर लिहिलं होतं, “जेव्हा हे हात एकत्र येतील
तेव्हा आकाशाला सीमा नसेल आणि अग्नीचा पाऊस पडेल...” या ओळीचा अर्थ कोणालाच उलगडत
नव्हता पण त्यावेळी महाराज आणि महाराणी यांनी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही.
महाराज आणि महाराणीने आदित्यला त्यांच्यासोबत नेलं. त्यांच्या छायेत आदित्य महालात
राहू लागला. एक वर्ष सरून गेलं...
अखेर नवस फळाला आला आणि
महाराणी सुलेखादेवीच्या पोटी एका नक्षत्रासारख्या सुंदर मुलीने जन्म घेतला. त्या
मुलीचं नाव अवंतिका ठेवलं गेलं. आदित्य आणि अवंतिका एकत्र वाढू लागले. आदित्य
शस्त्रास्त्र बनवण्यात तरबेज होता आणि अवंतिका तलवार चालवण्यात पारंगत होती. तलवार
युद्ध दोघांच्याही आवडीचा खेळ होता. त्यांना जेव्हा संधी मिळे तेव्हा महालाच्या
पटांगणात ते दोघं तलवार युद्धात रमून जात. राजकुमारी अवंतिका तलवार युद्धात कुशल
होत आहे हे पाहून महाराज आणि महाराणी मनोमन सुखावत होते पण अवंतिका व आदित्यचे
गुरू आणि सिंहासनाचे रक्षक भीमसिंह यांनामात्र आदित्य आणि अवंतिकाची ही जवळीक
फारशी रुचत नव्हती. एकाएकी काळाने पावलं फिरवली आणि महाराज कुमारसिंह आजाराने
ग्रस्त झाले. त्याच आजारात ते गेले आणि राजकुमारी अवंतिकासह सुजानगढची जबाबदारी
महाराणी सुलेखादेवींवर आली. महाराणी सुलेखादेवीने आपल्या मुलासारखा राज्याचा
सांभाळ केला पण वृद्धापकाळामुळे त्यांना अडचणी येऊ लागल्या. तेव्हा सुलेखादेवीने
राजकुमारीचा स्वयंवर आयोजित केला जेणेकरून राजकुमारीच्या वराला राज्याभिषेक करवून
राज्याचा कारभार त्याच्यावर सोपवला येईल...
स्वयंवराचा दिवस उजाडला.
आज कोणीतरी राजकुमारीला पसंत करेल, तिला मागणी घालेल म्हणून महाराणी सुलेखादेवी
बेहद खुश होत्या. अवंतिकाला सजवण्यासाठी दासींना दालनात पाठवण्यात आले पण अवंतिका
कुठे होती तिथे. ती तर पटांगणात आदित्यसोबत तलवार युद्धाचा सराव करत होती.
आदित्यचा एकेक वार ती चुकवत होती आणि संधी मिळेल तसा पलटवारही करत होती. तलवारी
खणखणल्या आणि एका क्षणी आदित्यने अवंतिकाला डोळा मारला. अवंतिकाचं लक्ष विचलित
झालं आणि आदित्यने संधी हेरून अवंतिकाच्या हातावर फटका मारला. त्यासरशी तलवार गळून
पडली. आदित्य म्हणाला, “राजकुमारी अवंतिका... हरलीस बरं का तू... तलवार चालवताना
लक्ष विचलित होऊन नाही चालत...” अवंतिका हसली आणि तिने हार स्वीकारत तलवार म्यान
केली. म्हणाली, “आदित्य, आपण लहानपणापासून एकत्र खेळलो, शिकलो, मोठे झालो पण एक
शंका तुला विचारायची राहूनच जाते बघ... हे तुझ्या हातांवरील गोंदण... काय अर्थ
असावा यांचा...” आदित्यने एकवार गोंदणांकडे पाहिलं. म्हणाला “मलाही काहीच माहित
नाही. महाराजांना मी जेव्हा सापडलो तेव्हा ही गोंदणं माझ्या हातांवर होती म्हणे
आणि सोबत एक चिठ्ठी होती ज्यात लिहिलं होतं, “जेव्हा हे हात एकत्र येतील तेव्हा
आकाशाला सीमा नसेल आणि अग्नीचा पाऊस पडेल...” मला तर काहीच कळत नाही याबद्दल पण एक
गोष्ट नक्की, जेव्हाही अग्नी दिसे किंवा मी अग्नीच्या संपर्कात येत असे तेव्हा
हातावरची ही ज्योत चमकत असे आणि अग्नी मला पिसासारखा भासे... याखेरीज या गोंदणांचा
काय अर्थ तेच समजत नाही...” दोघं बोलत असताना एक भालदार तिथे येत म्हणाला,
“महाराणींचा विजय असो...”
राजकुमारी, आपणाला
राणीसरकारने दालनात पाचारण केले आहे. स्वयंवरानिमित्ते इतर राज्यांचे राजकुमार
येण्याची वेळ झाली आहे...” भालदार निघून गेला. अवंतिकाला चिडवत आदित्य म्हणाला,
“चला... आता राजकुमार येणार... आपल्याशी बोलायचं असेल तेव्हा आता स्वारींची अनुमती
घ्यावी लागणार...” अवंतिकामात्र या स्वयंवरासाठी फारशी उत्सूक दिसत नव्हती. तिच्या
मनात फक्त आदित्य होता पण गरीब व श्रीमंत या फरकामुळे ती कधी आदित्यला सांगू शकली
नाही. सुलेखादेवींच्या आग्रहाखातर तयारी करून अवंतिका दरबारात आली. अनेक
राज्यांच्या राजांनी व राजकुमारांनी दरबार भरला होता. हातात वरमाला घेऊन अवंतिका
सर्वांवर एकेक कटाक्ष टाकत होती. तिने ठरवलं होतं, सर्वांकडे पहायचं पण पसंती न
दर्शवताच माघारी जायचं. अवंतिका माघारी निघाली आणि इतक्यात सरबताचे पेले घेऊन
चाललेला सेवक पाय अडखळून पडला आणि पेला एका राजकुमारावर उपडा झाला. तो राजकुमार
क्रोधीत झाला आणि तलवार उपसून त्या सेवकावर धावून गेला. अवंतिकाने वरमाला झुगारून
बाजूलाच उभ्या असलेल्या सैनिकाच्या म्यानातली तलवार उपसून त्या राजकुमाराचा वार
थांबवला. तो सेवक चळचळा कापत होता. अवंतिका म्हणाली, “हात आवरा राजकुमार... एका
छोट्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नाही असू शकत... आणि तुम्ही विसरताय राजकुमार, हा
आमच्या मातोश्रींचा म्हणजे महाराणी सुलेखादेवींचा दरबार आहे...”
दुसऱ्या हाताने अवंतिकाला
दूर ढकलत तो राजकुमार म्हणाला, “आम्ही थंबोरचे राजकुमार कालीसिंह आहोत. या तुच्छ
सेवकाने आमचा अपमान केला आहे. याचा शिरच्छेद झालाच पाहिजे. नाहीतर...” कालीसिंह
पुढे बोलणार इतक्यात अवंतिकाने त्याच्या मुस्कटात मारली. गाल चोळत कालीसिंह मागे
झाला पण काळ्या पोशाखातला भरघोस दाढी-मिशा असलेला एक इसम उभा राहत म्हणाला,
“महाराणी सुलेखादेवी... आम्ही थंबोरचे महाराज दुर्जनसिंह आहोत. आम्हास वाटले होते,
स्वयंवरात अवंतिका कालीसिंहांचा स्वीकार करेल आणि हे राज्य आम्हास मिळेल. पण आता
असं वाटतंय वेगळा मार्ग निवडायला हवा...” बोलत असताना दुर्जनसिंह टाळ्या वाजवल्या.
काळे कपडे परिधान केलेल्या सैनिकांनी प्रचंड प्रमाणात दरबारात प्रवेश केला. येताना
वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला तलवारीने ठार करत ते पुढे सरकले. अचानक झालेल्या
हल्ल्यामुळे सगळे सैरभैर झाले. अवंतिका कालीसिंहशी लढत होती तर सुलेखादेवींवर चाल
करून आलेल्या दुर्जनसिंहला भीमसिंह थोपवत होता. आदित्य एकीकडे काळ्या सैन्याशी
मुकाबला करत असताना संधी साधून दुर्जनसिंहाने सुलेखादेवींवर वार केला. वार वर्मी
बसला. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवरून सरपटत जाणाऱ्या सुलेखादेवींवर कालीसिंहाने
तलवार चालवली आणि त्यांचा अंत केला. आपल्या आईची दुर्दशा पाहून तिच्याकडे
झेपावणाऱ्या अवंतिकाला भीमसिंह व आदित्य थोपवत मागे घेऊन गेले. दुर्जनसिंहचं सैन्य
प्रचंड होतं आणि भीमसिंह व आदित्यकडे दुसरा पर्याय नव्हता. “मातोश्री, मी स्वस्थ
बसणार नाही... दुर्जनसिंह मी परत येईन...” असं म्हणणाऱ्या अवंतिकाला दोघं चोर
दाराकडे घेऊन गेले...
चोर दरवाजाजवळ पोहोचताच मागे
जाण्यासाठी झगडणाऱ्या अवंतिकाला भीमसिंहकडे सोपवत आदित्य म्हणाला, “अवंतिकाच्या
सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे गुरूदेव. आपल्या
मागे येणाऱ्या सैन्याला मी थोपवतो. ते अवंतिकापर्यंत पोहोचता कामा नयेत. अवंतिका, आपल्याला
सुजानगढ परत मिळवायचा आहे पण आत्ता दुर्जनसिंहाचं सैन्य जास्त आहे. तेव्हा तूर्तास
माघार घेणं आवश्यक आहे...” भीमसिंहांना आदित्यचं म्हणणं पटलं पण अवंतिका मानत
नव्हती. आदित्यने तिला त्यांच्यातल्या मैत्रीची शपथ घातली तेव्हा अवंतिका जायला
तयार झाली. बाहेर जात असताना अवंतिका म्हणाली, “आदित्य, मला तुझी साथ हवी आहे...
मी परत येईन आदित्य...” अवंतिका आणि भीमसिंह चोरवाटेने बाहेर धावत होते आणि मागे
खणखणणाऱ्या तलवारींचे आवाज हळू हळू कमी होत होते. महालाबाहेर मागच्या बाजूच्या
जंगलात अवंतिका आणि भीमसिंह पोहचले. त्यांना काय करावं सुचत नव्हतं.
काट्याकुट्यातून वाट काढत ते दोघं पुढे जात होते. तिकडे महालात समोर आलेल्या
सैन्याशी आदित्य लढत होता. आदित्यवर अग्निबाण आणि भाल्यांचा वर्षाव होऊ लागला पण
आगीचे चटके न लागता आदित्यला अधिक शक्तीचा भास होऊ लागला. त्याच वेळी त्याच्या डाव्या
हातावरील ज्योत प्रकाशमान होताना त्याला दिसली. आदित्यचं लक्ष विचलित झालं आणि त्याच
वेळी दुर्जनसिंहाच्या सैनिकांनी त्याला पकडून त्याच्या हातात बेड्या अडकवल्या.
दुर्जनसिंह आणि कालीसिंह तिथे पोहोचले. कालीसिंहाने तलवार उपसून आदित्यवर वार केला
पण दुर्जनसिंह तो थोपवत म्हणाले, “थांब काली... आत्ता नाही... आधी आपली शक्ती तर
पाहू दे याला... याच शक्तीने मृत्यू देऊ याला. आदित्य, बहादूर आहेस ना मग
बहादुरासारखाच मृत्यू देऊ तुला... प्रतीक्षा कर...”
आदित्यला
कोठडीत बंद केलं गेलं. सर्वजण निघून गेल्यावर कोठडीच्या दुसऱ्या बाजूला वर
असलेल्या झारोख्याखाली येत आदित्यने शिळ घातली. त्यासरशी एक गरुड त्या झारोख्यावर
आला आणि आत येण्याचा प्रयत्न करू लागला. आदित्य म्हणाला, “राजा, उगा त्रास नको
करूस. तुला या सळ्यांमधून आत येता येणार नाही. एक काम कर... अवंतिका सुखरूप आहे का
ते पाहून ये. आणि हो, मला पकडल्याचं तिला सांगू नकोस. क्रोधाच्या भरात नको ते धाडस
करायला सरसावेल ती. जा, लवकर जा मित्रा...” राजाने आकाशात झेप घेतलीच होती की
पावलांचा आवाज आला. आदित्य लगेच पुढच्या बाजूला येऊन बसला. कालीसिंह आपल्या
सैनिकांसह तिथे आला. आदित्यकडे पाहत म्हणाला, “चला राजे, आपल्या मृत्यूचं साधन कसं
आहे ते पारखून घ्या... घेऊन या रे याला बाहेर...” कालीसिंह निघून गेल्यावर
हुकुमानुसार सैनिकांनी आदित्यलाही अजून बेड्या घालून बाहेर आणलं. पटांगणात एक
प्रचंड मोठी तोफ होती. तोफेला बत्तीची जागाच नव्हती पण माणसाची मूठ जाईल इतकीच
जागा होती. साखळदंडाने एका मुलीला तोफेला बांधून ठेवलं होतं. त्या मुलीच्या जवळच
एक बाई हातात लांबसडक चाबूक घेऊन उभी होती. दुर्जनसिंह आणि कालीसिंह तोफेच्या
दोन्ही बाजूंना उभे होते. आदित्यला पाहताच दुर्जनसिंह म्हणाला, “ये आदित्य... बघ
आमची क्षमता... तेजा, दाखव आम्हाला हे हत्यार...” तेजाने चाबूक उगारला आणि तोफेला
बांधलेल्या मुलीवर चालवत म्हणाली, “तोफ चालव...” त्या मुलीला फटका बसला खरा पण
चेहऱ्यावर वेदना नसून क्रोध होता. तिने हातांचे पंजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला
फिरवत अग्नी निर्माण केला. तोफेला बत्ती मिळाली. क्षणार्धात लाल रंगाचा प्रचंड
मोठा गोळा तोफेच्या मुखातून बाहेर पडला आणि समोरच्या भिंतीला खिंडार पडलं...
आश्चर्यचकित
नजरेने तोफेकडे पाहणाऱ्या आदित्यकडे येत दुर्जनसिंह म्हणाला, “उद्या याच तोफेने
तुला भस्मसात करू आम्ही. तोवर आराम कर कोठडीत. त्या मुलीने प्रतिकार करण्याचा
प्रयत्न करताच तिच्या हातातल्या साखळदंडातून आपोआप काटे निघाले आणि त्या मुलीच्या
हातात रुतले. तेजा म्हणाली, “तू कितीही प्रतिकार केलास तरी तुझी सुटका नाही.
महाराज, ही मुलगीच ही तोफ चालवेल तेव्हा हिलाही बंद करावे पण तिच्या हातांना
स्पर्श करू नये...” दुर्जनसिंहाने टाळ्या वाजवल्या आणि सैनिक त्या मुलीला
भाल्यांनी ढकलत कोठडीकडे घेऊन गेले. दुर्जनसिंह आणि तेजाही महालात निघून गेल्यावर
आदित्यकडे पाहत कालीसिंह म्हणाला, “तुला आत्ताच मारलं असतं पण आमचे पिताश्री... जाऊ
दे... आजची रात्र जगून घे... उद्यामात्र... हा...हा...हा...” कालीसिंह पाय आपटत
महालात निघून गेला. सैनिकांनी आदित्यला पुन्हा कोठडीत फेकले. बाजूच्याच कोठडीत
त्या मुलीला बंदिस्त केलं गेलं होतं. तिच्याकडे सरकत आदित्य म्हणाला, “मी पाहिलं,
तुझ्या हातातून अग्नी निर्माण झाला आणि तोफ चालवली गेली. तू हे कसं केलंस...” त्या
मुलीने आदित्यकडे पाहिलं. साखळदंडाच्या आड आदित्यच्या दोन्ही हातांवरची गोंदणं
तिला दिसताच आदित्य जवळ येत ती म्हणाली, “जेव्हा हे हात एकत्र येतील
तेव्हा आकाशाला सीमा नसेल आणि अग्नीचा पाऊस पडेल...” हे ऐकून आदित्यचे डोळे
विस्फारले. आपल्या आयुष्यातलं हे इतकं महत्वाचं वाक्य जे आपल्याला, अवंतिकाला,
महाराजांना आणि महाराणींनाच ठाऊक होतं ते या मुलीला कसं माहित याचा विचार करत
आदित्य म्हणाला, “हे... हे वाक्य... तुला... कोण आहेस तू...” ती मुलगी अजून जवळ येत म्हणाली, “मी
ज्वाला. तुझ्याप्रमाणे मीही अग्नीखग पंथात जन्मले. हे बघ...” आदित्यने पाहिलं तर
त्याच्याच प्रमाणे ज्वालाच्या हातांवरही तशीच गोंदणं होती...
ज्वाला
पुढे बोलती झाली, “अग्नीखग पंथावर सूर्यदेवाची कृपा आहे. शंभर वर्षांनी एक दिवस
असा येतो जेव्हा सूर्यातून तेजस्वी किरण निघतात. त्या दिवशी जन्माला येणाऱ्या
बालकांमध्ये ते किरण शिरताच त्या बाळांना सूर्याची दाहकता तर मिळतेच शिवाय अवकाशात
भरारी मारण्याची शक्तीसुद्धा प्राप्त होते. माझे बाबा सांगायचे की मी आणि माझा भाऊ
एकाच दिवशी एकाच वेळी जन्मलो. माझा भाऊ माझाहून काही क्षणांनीच मोठा होता. तो दिवस
होता सूर्यदेवाच्या तेजस्वी किरणांचा दिवस. माझ्यावर आणि माझ्या भावावर त्या
किरणांची कृपादृष्टी झाली खरी पण त्याच वेळी निसर्गाचा प्रकोप झाला. भूकंप आणि
जलप्रलय एकाच वेळी आले आणि गाव वाहून गेलं. माझा भाऊ माझ्या आईजवळ होता. आई
पाण्यात वाहून गेली आणि मी बाबांजवळ राहिले. आमचं गाव नष्ट झालं. बाबांनी मागे
राहिलेल्या गावकऱ्यांना सोबत घेऊन गाव पुन्हा बसवलं. मी माझ्या भावाबद्दल बाबांना
नेहमी विचारायचे आणि त्याचं एकच उत्तर असायचं, की माझ्या हातांवरची ही चिन्हच मला
माझ्या भावापर्यंत पोहोचवतील...” ज्वाला बोलत असताना आदित्यच्या डोळ्यात पाणी
तरारलं. तो म्हणाला, “म्हणजे आपण... तू माझी बहिण...” ज्वालाने मानेनेच होकार
दिला. आदित्यला ज्वालाची गळाभेट घ्यायची होती पण कोठडीला आणि अंगभर असलेल्या
सळ्यांमुळे ते शक्य होत नव्हतं. आदित्य म्हणाला, “पण ज्वाला... तू इथे कशी काय
आलीस... आणि तीही अशी... बेड्यांमध्ये अडकलेली...”
ज्वालाने
एकवार बेडयांकडे पाहिलं आणि बोलू लागली, “हे कृत्य त्या तेजाचं आहे. तेजा, आधुनिक
आणि यंत्रवत हत्यार बनवण्यात तरबेज आहे. ती एकदा गावात आली होती. बाबांकडे व
माझ्याकडे असलेली शक्ती तिने ओळखली आणि त्याचा वापर हत्यारांसाठी करावा म्हणून
आमच्याकडे विचारणा केली. आम्ही दोघांनी ठाम नकार दिला तेव्हा तोच राग मनात ठेऊन
तेजा निघून गेली. काही दिवसांनी अचानक गावावर हल्ला झाला. आधुनिक हत्यारबंध
सैनिकांनी चारही बाजूंनी गावाला घेरलं. मी काही करण्याच्या आतच माझ्या हातात
बेड्या अडकवल्या गेल्या. बाबांनी सामना केला खरा पण वयोमानामुळे त्यांना तितका
प्रतिकार करणं जमलं नाही. गाव उध्वस्त झालं. तेजाच्या पहारेकऱ्यांनी गावाला वेढा
घातला आणि सर्वजण तिथेच बंदिस्त झाले. मी काही करण्याचा प्रयत्न करताच या
बेड्यांमधून निघालेले धारदार काटे मला टोचतात. आपलं गाव आणि बाबा तेजाच्या ताब्यात
आहेत. त्यांच्यासाठी तेजा सांगेल तसं वागणं भाग आहे मला. मी तितकाच जोर लावू शकते
जितका अग्नीचा लोळ तयार करण्यासाठी लागतो. जास्त जोर लावल्यास हे काटे... पण
आदित्य, तुझ्या हातात तर साध्या सळ्या आहेत. तू लावू शकतोस की शक्ती... आपल्या
दोघांमध्ये ही शक्ती आहे. या शक्तीचा स्रोत आहे क्रोध पण तोही योग्य
मार्गासाठी...” ज्वाला गप्प झाली. तिकडे वनामध्ये अवंतिका आणि भीमसिंह पुढे जात
असताना झाडं सळसळण्याचा आणि पावलांचा आवाज आला. अवंतिका आणि भीमसिंहने पाहिलं तर
दुर्जनसिंहाने पाठवलेल्या सैनिकांनी दोघांनाही घेराव घातला होता...
भीमसिंह
व अवंतिका दोघांनी तलवारी उपसल्या व त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या दुर्जनसिंहाच्या
सैनिकांचा ते समाचार घेऊ लागले. दोघांच्या तुलनेत सैनिक जास्त होते. एक मारला गेला
की त्याच्या जागी दोन येत होते. हार न पत्करता अवंतिका व भीमसिंह लढत होते. एकदा त्यांनी
घेराव तोडला खरा पण पुन्हा ते घेरले गेले. या दोघांची मुंडकी दुर्जनसिंह महाराजांना
दाखवल्यावर ते बक्षीस देतील हे माहित असल्याने सर्व सैनिकांनी तलवारी उंचावल्या. इतक्यात
झाडीच्या आडून सपासप येणाऱ्या बाणांनी सर्व सैनिकांचा वेध घेतला. सारे निपचित पडलेले
पाहून अवंतिका व भीमसिंह आश्चर्यचकित झाले. ते काही बोलणार इतक्यात झाडीतून काही आदिवासी
त्यांच्याकडे येताना दिसले. या आदिवास्यांनी आपली मदत केली ही जाणीव अवंतिका व भीमसिंह
दोघांनाही होती. तरी दोघांनी तलवारी सोडल्या नाहीत. ते आदिवासी पुढे आले आणि त्यांच्यातल्याच
एकाने स्वत:च्या छातीला हात लावत कमरेत वाकून दोघांना नमस्कार करून बोलायला सुरुवात
केली, "राजकुमारी अवंतिका, तुम्ही आम्हाला ओळखत नसाव्यात कारण आपली कधी भेटच नाही झाली. मी भैरव. यांचा
सरदार. आम्ही आदिवासी याच जंगलात राहतो. आम्हाला आधाराची गरज असताना खुद्द महाराजांनी
आमची वस्ती बसवली, महालातली धान्यांची कोठारे आमच्यासाठी खुली
केली. महाराज गेल्यावर महाराणींनी जातीने आमच्या पोरी-बाळींची काळजी घेतली...
आम्हाला
समजलं की दुर्जनसिंहाने महाराणींना मारलं आणि महालावर कबजा केला. तुम्ही भीमसिंहांसोबत
तिथून निसटल्याचं समजलं म्हणून तुम्हाला शोधत आम्ही इथवर आलो. तुमच्या शाही पोषाखाकडे
पाहून तुम्हीच आमच्या राजकुमारी आहात हे आम्ही ओळखलं..." भैरवच्या खांद्यावर हात
ठेवत भीमसिंह म्हणाले, "धन्यवाद भैरव.
तुम्ही सारे आमच्या मदतीला धावून आलात... राजकुमारी..." भीमसिंहांनी अवंतिकाकडे
पाहिलं. अवंतिकाने स्मित केलं व भैरवला नमस्कार करत म्हणाली, "भैरव, तुमच्यासारखी माणसं आमच्यासोबत आहेत म्हणून आम्ही
खंबीर आहोत अजून. आता वेळ न घालवता त्वरित महालावर हल्ला करू आणि..." "माफी असावी राजकुमारी..." अवंतिकाचे वाक्य तोडत भीमसिंह बोलते झाले,
"क्रोधाच्या भरात कुठलाही निर्णय घेण्याची घाई करू नये. दुर्जनसिंहाने
पाठवलेल्या मूठभर सैनिकांना आपण सहजतेने नमवू शकलो नाही. तिथे महालात त्याचं किती सैन्यबळ
असेल, शस्त्रसाठा किती असेल या सगळ्याची आपल्याला काहीच कल्पना
नाही. याक्षणी आपण तिथे पुन्हा गेलो तर कदाचित आयतेच दुर्जनसिंहाच्या तावडीत सापडू
आणि आदित्यने जिवावर उदार होऊन जे केलं ते निष्फळ ठरेल..." भैरवने मान हलवत सहमती
दर्शवली व म्हणाला, "राजकुमारी, भीमसिंह
म्हणतात ते बरोबर आहे. आपण माझ्यासोबत आमच्या वस्तीवर चलावं आणि पुढील योजना आखावी..."
अवंतिकाला
भीमसिंह व भैरवचं म्हणणं पटलं. सर्वजण भैरवच्या वस्तीकडे निघाले. इतक्यात आकाशातून
चित्काराचा आवाज आला. सर्वांनी वर पाहिलं तर एक गरूड आकाशात घिरट्या घालत होता. अवंतिकाने
त्याला ओळखलं. तो राजाच होता. शीळ घालून तिने त्याला जवळ बोलावलं. ओळखीची शीळ ऐकून
राजा खाली आला आणि एका फांदीवर बसून चित्कारू लागला. चित्कार ऐकून अवंतिकाच्या चेहऱ्यावर
हसू उमटलं. ती म्हणाली, "गुरूदेव,
आनंदाची बातमी... आदित्य वाचला व सुखरूप आहे. सध्या तो भूमिगत आहे आणि
आपल्याच प्रतीक्षेत आहे. परमेश्वरा तुझीच कृपा... राजा, तू आमच्यासोबत
चल. थोडा आराम कर, मग आदित्यला आम्ही सुखरूप असून लवकरच हल्ला
करू ही खबर दे..." भैरवच्या वस्तीवर सर्व पोहोचले. भाले आणि धनुष्य-बाण हाती
घेतलेले अनेक सैनिक अवंतिकाने पाहिले व स्मित केलं. भैरव म्हणाला, “महाराणी
अवंतिका, हे सर्व सैनिक आपल्या बाजूने लढायला तयार आहेत. महाराणी अवंतिका हे शब्द
ऐकून अवंतिकाला नवल वाटल्याचं पाहून भैरव म्हणाला, “महाराणी सुलेखादेवींनंतर आता
आपणच राज्यकर्त्या आहात. आणि आपल्यात एका कुशल नेत्याचे सर्व गूण आहेत. आता
तुम्हीच सुजानगढ व आमच्या महाराणी...” अवंतिकाने भीमसिंहकडे पाहिलं. त्यांनी
मानेने होकार देताच अवंतिका म्हणाली, “तुमच्या या मान-सन्मानाबद्दल धन्यवाद. माझ्या
बाजूने तुम्ही सगळे लढायला तयार आहात हे जाणून आता मलाही हुरूप आला आहे. परंतु
भैरव, हे सैन्य दुर्जनसिंहाचा सामना करण्यासाठी कमी पडेल. शिवाय सैन्याची रसद आणि
शास्त्रसाठा यासाठी लागणारं धनही सध्या आपल्याजवळ नाही...”
अवंतिकाला
दुजोरा देत भीमसिंह म्हणाले, “अगदी खरं बोललात महाराणी अवंतिका. पण आपण आपल्या
मित्रराष्ट्राला कनकपूरला कसे काय विसरलात... महाराज कनकसिंह आपल्या महाराजांचे
जवळचे स्नेही होते व राजकुमारी सोना आपल्या बालपणापासूनच्या मैत्रीण आहेत. आपण
त्यांना आवाहन केल्यास कनकपूर नक्कीच मदतीचा हात पुढे करेल...” अवंतिकाला
भीमसिंहांचं म्हणणं पटलं. राजाला आदित्यकडे रवाना करून अवंतिका, भीमसिंह आणि भैरव
कनकपूरकडे रवाना झाले. तिकडे राजाने आदित्यच्या कोठडीजवळ येत चित्कार केले.
अवंतिका सुखरूप असल्याचं त्याला समजताच आदित्यला हायसं वाटलं. कोणी पहायच्या आत
राजाला तिथून जायला सांगून आदित्य ज्वालाकडे वळत म्हणाला, “अवंतिका सुखरूप आहे तर.
आता कनकपूरच्या मदतीने ती हल्ला चढवणार...” आदित्य बोलत असतानाच दोघांनाही आर्त
चित्कार ऐकू आला. आदित्यने हा चित्कार राजाचाच आहे हे ओळखलं. लगोलग तो झरोख्याखाली
आला. दूरवर त्याला राजा हवेत गटांगळ्या खाताना दिसला. आदित्यने झरोख्याकडे पाहत,
“राजा...” अशी पुकार दिली पण त्याचा उपयोग झाला नाही आणि राजा, आदित्यच्या
नजरेसमोर खाली पडत नाहीसा झाला. कोठडीच्या सळ्यांना गदागदा हलवत आदित्य ओरडत होता,
“राजा... माझा सखा राजा... कोणी मारलं त्याला... राजा...” ज्वाला त्याला शांत
करण्याचा प्रयत्न करत होती पण आदित्य ऐकतच नव्हता. इतक्यात कोठडीजवळ पावलांसह
हसण्याचे आवाज ऐकू आले...
“हा...हा...हा...
तुझा सखा... तो पक्षी... त्याला आमच्या युवराज कालीसिंहांनी एका बाणानिशी मारलं.
काय अचूक निशाणा साधला त्यांनी... त्या तुझ्या पळपुट्या अवंतिकाला संदेश पोहोचवत
होतास काय... चला रे...” हे सर्व बोलत जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या सैनिकाकडे पाहत
आदित्यला राग अनावर होऊ लागला. त्याच्या डोळ्यात आग दिसू लागली. ज्वाला आदित्यकडे
येत म्हणाली, “आदित्य, हाच तो क्रोध ज्याची गरज आहे तुला. बघ तुझ्या हातांकडे...”
आदित्यने पाहिलं तर त्याच्या हातावरील ज्योतीचं गोंदण चमकू लागलं होतं. त्याचे हात
लालबुंद झाले होते व त्यातून धूर येत होता. त्याने धरलेल्या कोठडीच्या सळ्या वितळू
लागल्या. आदित्यला अचंभा वाटला. ज्वाला म्हणाली, “आदित्य, तुझी शक्ती जागरूक होत
आहे... तुझे दोन्ही हात एकमेकांच्या उलट्या बाजूला फिरव...” आदित्यने त्याचे
दोन्ही हात एकमेकांच्या उलट्या बाजूला फिरवले तर हातांमध्ये एक आगीचा गोळा तयार
झाला. त्या गोळ्याची दाहकता इतकी होती की त्याच्या हातातल्या बेड्या वितळून गळून
पडल्या. वितळलेल्या सळ्यांमुळे निर्माण झालेल्या भागदाडातून आदित्य बाहेर आला आणि
तो गोळा ज्वालाच्या कोठाडीवर भिरकावला. त्या आगीच्या गोळ्याने ज्वालाच्या हातांचा
वेध घेत तिच्या हातातल्या बेड्यांची पार राखराख केली. ज्वालाही बाहेर येत म्हणाली,
“चल आदित्य, आपल्याला त्वरित निघायला हवं. आपल्या माणसांना, आपल्या वडिलांना आपली
गरज आहे...”
आदित्यने
मानेनेच होकार दिला. दोघंही आपापल्या हाताने आगीचे गोळे बनवून समोर येणाऱ्या
सैनिकांवर भिरकावत त्यांची राख करू लागले व पुढे जाऊ लागले. पटांगणात ठेवलेल्या
तोफेपाशी दोघं पोहोचले. ज्वाला म्हणाली, “थांब आदित्य. या तोफेमुळे हे दुर्जनसिंह
व कालीसिंह इतके माजलेत ना... या तोफेलाच नष्ट करू आपण. लाव शक्ती...” दोघांनीही
आपापले हात एकमेकांच्या विरुद्ध फिरवत आगीचे गोळे निर्माण केले आणि ते तोफेवर
भिरकावले. प्रचंड स्फोटासह तोफेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. आवाज ऐकून दुर्जनसिंह
व कालीसिंह तेजासह पटांगणात आले. त्यांनी पाहिलं तर ज्वाला आणि आदित्य दोघंही
त्यांच्या हातातून आग निर्माण करून सैनिकांना मारत आहेत. कालीसिंहाला पाहून आदित्य
त्याच्याकडे झेपावणार इतक्यात ज्वाला म्हणाली, “नाही आदित्य. आत्ता याची वेळ नाही.
आधी आपल्याला आपल्या वडिलांसह आपल्या गावाला मुक्त करायला हवं. शिवाय तुझ्या
शक्तीची तुला पुरेपूर कल्पना नाही आली अजून. त्याचा वापर चुकीचा झाला तर आपलाच डाव
आपल्यावर उलटेल. आदित्यला ज्वालाचं म्हणणं पटलं पण राहून राहून राजा त्याच्या समोर
येत होता. आदित्यने आगीचा एक गोळा भिंतीकडे भिरकावला. काही क्षणातच समोरच्या
भिंतीला मोठं खिंडार पडलं आणि ज्वाला व आदित्य त्यातून पसार झाले. कालीसिंह आपल्या
सैन्याला फर्मान सोडणार इतक्यात दुर्जनसिंहाने त्याला थांबवलं. म्हणाला, “काली,
जाऊ दे त्यांना. त्यांच्यावाचून आपलं काही अडत नाही. मला काळजी आहे ती त्यांनी
नष्ट केलेल्या तोफेची...”
“काळजी
नसावी महाराज...” तेजा पुढे होत म्हणाली, “एक हत्यार नष्ट झालं म्हणून त्रागा करू
नये. हा तर एक छोटा नमूना होता. माझ्याकडे आपल्यासाठी अनेक हत्यारांचा साठा आहे.
आपण माझ्यासोबत चलावं. अशा अनेक आधुनिक हत्यारांची ओळख मी तुम्हाला करून देईन
ज्यांना चालवण्यासाठी कुठल्याही ज्वालाची गरज भासणार नाही...” तेजाच्या बोलण्याने
दुर्जनसिंहाने स्मित केलं. कालीसिंहाकडे वळत म्हणाला, “आम्ही तेजासोबत नव्या
हत्यारांसाठी जात आहोत. काली, आता इथली जबाबदारी तू सांभाळायची आहेस. क्रोधाच्या
भरात आतातायी पाऊल उचलून त्या आदित्यच्या मागावर आपले सैनिक पाठवू नकोस. तो आपलं
काहीएक वाकडं करू शकणार नाही. राहिला प्रश्न त्या अवंतिकाचा, तर तिची व्यवस्थाही
आम्ही करून ठेवली आहे...” दुर्जनसिंह आणि तेजा नव्या हत्यारांसाठी निघून गेले.
तिकडे, अवंतिका, भीमसिंह आणि भैरव यांनी कनकपूर गाठलं. महालात त्यांच्या येण्याची
वर्दी देण्यात आली तशी राजकुमारी सोना त्यांच्या मंत्य्रांसोबत स्वागतासाठी आल्या.
अवंतिका आणि सोनाची गळाभेट झाली आणि सर्व आत जाऊ लागले. भीमसिंहांनी सहज विचारले,
“राजकुमारी, महाराज दिसत नाहीत ते...” या प्रश्नावर राजकुमारी सोना थोड्या
बावचळल्यासारख्या झाल्या पण लगेच सावरत म्हणाल्या, “ते ना, ते आहेत की... नगराच्या
कामकाजात व्यस्त आहेत. लवकरच भेट होईल...” हे बोलत असताना सोनाच्या चेहऱ्यावरील
गोंधळ सर्वांना जाणवला...
अतिथीदालनात
सर्वांना घेऊन आल्यावर राजकुमारी सोना म्हणाल्या, “अवंतिका, तू प्रवासाने थकली
असशील. अंमळ आराम घ्यावा, सांजेच्या समयी भोजनाचे वेळी छान गप्पा करू आपण...” असं
म्हणत कोणालाही काहीही बोलण्याचा अवसर न देता राजकुमारी सोना दालनाबाहेर निघून
गेल्या. दालनात भीमसिंह, भैरव व अवंतिका चर्चा करत होते. भैरव म्हणाला, “राणी
अवंतिका, माझ्या बोलण्याची माफी असावी पण तुमच्या व राजकुमारी सोनाच्या
मैत्रीबद्दल आणि महाराज कुमारसिंह व महाराज कनकसिंह यांच्या मैत्रीबद्दल जे
भीमसिंहांनी सांगितलं ते ऐकता इथलं वातावरण ठीक दिसत नाही. महाराज कनकसिंह कुठेही
दिसत नाहीत...” भैरवला दुजोरा देत भीमसिंह म्हणाले, “हो राणी... महाराज स्वागताला
नाही आले इथवर ठीक होतं पण अजूनही त्यांची भेट झाली नाही हे पटत नाही. शिवाय
कनकपूरचे सैनिक सोन्याचे कवच घालत असत. आणि इथे काही सैनिकांचे कवच काळ्या रंगाचे
दिसते. यात नक्कीच पाणी मुरतंय...” अवंतिकाने थोडा विचार केला व म्हणाली,
“राजकुमारी सोना आणि महाराज कनकसिंह काही दगा करतील असं नाही वाटत आम्हाला. कदाचित
नवीन सैनिकांचा भरणा केला असावा... तरीही सावध राहणं योग्य हेच खरं...” तिकडे या
सगळ्यापासून लांब जंगलातून वाट काढत ज्वाला आणि आदित्य त्यांच्या गावाजवळ पोहोचले.
तीन डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या त्या छोट्याशा गावात सगळीकडे सामसूम दिसत
होतं. गावाला वेढा घातलेली काही यंत्रे दिसत होती. ती अजब यंत्रे पाहून आदित्यला
अचंभा वाटला...
ज्वाला
बोलती झाली, “याच यंत्रांनी अकस्मात आमच्यावर हल्ला केला. सर्वप्रथम मला व आपल्या
बाबांना जेरबंद केलं आणि गावावर ताबा मिळवला. बाबांना साखळदंडात अडकवून तेजा मला
तिच्यासोबत घेऊन गेली. तेव्हापासून तेजा सांगेल ते करणं मला भाग होतं. अन्यथा या
यंत्रांमधून निघालेल्या आगीच्या गोळ्यांनी बाबा आणि आपलं गाव दोघांनाही संपवलं
असतं. तेजाने बनवलेल्या नव्या यंत्रांना ऊर्जा देण्यासाठी तिने माझा वापर केला.
यातून सुटका कशी करावी हाच एक विचार मनी असताना आदित्य, तू भेटलास मला...”
आदित्यने ज्वालाच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाला, “काळजी करू नकोस ज्वाला. आपण
दोघंही खंबीर आहोत. पण यावेळी त्वरित हालचाल करायला हवी. गावाला तीन बाजूंना
डोंगराने वेढलं आहे. हा एकमेव मार्ग आहे गावात प्रवेश करण्याचा. इथे जी यंत्र दिसत
आहेत तेवढीच असणार. डोंगरांमध्ये जरी यंत्र असली तरी त्यांना आपला वेध घेण्यासाठी
खाली यावंच लागेल. तू डाव्या बाजूने प्रहार कर, मी उजवी बाजू सांभाळतो. पण हल्ला
एकाच वेळी व्हायला हवा. मी तुला एक शीळ ऐकवतो जी मी माझ्या लाडक्या राजासाठी
वापरात असे. तू आक्रमणाच्या जागी पोहोचलीस की शीळ घाल. मला समजेल. लगेचच आपण हल्ला
सुरू करू...” आदित्यने ज्वालाला हलक्या आवाजात शीळ ऐकवली. ज्वाला झाडीतून डाव्या
बाजूला जात नाहीशी झाली. काही क्षणातच आदित्यला शीळ ऐकू आली. त्याने स्मित केलं.
डोळे बंद करून ध्यान केलं. डोळे उघडले तर ते लालबुंद दिसत होते. त्याच्या हातावरचं
ज्योतीचं गोंदण चमकू लागलं...
आदित्यचे
हात लाल दिसू लागले आणि त्यातून धूर येऊ लागला. त्याने आपले हात एकमेकांच्या
विरुद्ध बाजूला फिरवले. आगीचा गोळा तयार झाला. गोळा बऱ्यापैकी मोठा होताच त्याने
तो समोर दिसणाऱ्या यंत्रावर भिरकावला. गोळा यंत्रावर आदळताच प्रचंड स्फोट होऊन
यंत्राच्या ठिकऱ्या समोर दिसू लागल्या. त्याप्रकारे डाव्या बाजूनेही स्फोटाचा आवाज
आला. ज्वाला आणि आदित्य, आपल्या सामर्थ्याने एकेक यंत्राचा समाचार घेत पुढे जाऊ
लागले. अचानक येणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने गावकरी काळजीत पडले. त्यांनी बाहेर
येऊन पाहिलं तर धुराचे मोठ मोठे ढग आकाशात दिसत होते आणि ती अजस्त्र यंत्र तुकडे
होऊन जमीनदोस्त झाली होती. धूर हटला तशी ज्वाला त्यांना समोर दिसू लागली. ज्वालाला
पाहताच गावकरी आनंदित झाले. ते पुढे येणार इतक्यात डोंगराळ भागात लापलेल्या तीन
यंत्रांनी ज्वालाला घेरलं. ती यंत्र काही करणार इतक्यात त्यांच्यात स्फोट झाले आणि
ती पार भुईसपाट झाली. आगीच्या ज्वाळा मंदावल्या आणि आदित्य समोर दिसू लागला. सर्व
यंत्र नष्ट झाली होती. गाव मुक्त झालं होतं. गावकरी जल्लोष करत होते. त्यावेळी
ज्वाला आदित्यला घेऊन गावच्या मंदिराच्या मागे असलेल्या दरीत उतरली. तिथे जमिनीत
असलेल्या एका कोठडीत आदित्य व ज्वालाच्या वडिलांना बेड्या घालून कैद केलं होतं.
बेड्या पाहताच आदित्यने आगीचा गोळा तयार करून त्या वितळवल्या. आदित्यच्या
हातांवरील गोंदणं पाहून बाबांनी त्याला ओळखलं. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि धावत
जाऊन त्यांनी आदित्यची गळाभेट घेतली...
बाप-लेकाची
ही भेट पाहून ज्वालासह गावकरीही आनंदित झाले. ज्वालाच्या डोळ्यात तर पाणी तरारलं
होतं. आदित्यने ज्वाला आणि त्याच्या वडिलांचे डोळे पुसले. तो म्हणाला, “बाबा, मला
तर माहीतच नव्हतं मी कोण आहे. मला माझ्या जन्मदात्यांनी वाऱ्यावर सोडलं याच
गैरसमजात मी तुम्हाला दोष देत राहिलो. पण ज्वालाची भेट झाली आणि सगळी हकीगत समजली.
बाबा, आपली भेट झाली खरी पण मला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. तिथे अवंतिकाला
माझी गरज आहे. मला तिथे जायला हवं...” महाराज कुमारसिंहांनी सांभाळ केल्यापासून
दुर्जनसिंहाच्या हल्ल्यापर्यंतची सगळी हकीगत सांगून आदित्य जायला वळला त्याचवेळी
ज्वाला त्याला अडवत म्हणाली, “थांब आदित्य. तुझ्यातल्या शक्तीचा पूर्ण वापर करायला
तू अजून तयार नाहीस. आपल्या छोट्याशा गावावर हल्ला करायला त्या तेजाने इतके घातक
हत्यार वापरले, तर अवंतिकासाठी अजून किती हत्यार असतील तिच्याजवळ. कदाचित
त्यांसाठी तुझे हे आगीचे गोळे कमी पडतील...” दोघांचे बाबा ज्वालाच्या म्हणण्याला
दुजोरा देत म्हणाले, “खरं आहे आदित्य. तुझी शक्ती प्रखर असली तरी ती पूर्ण नाही.
तुला याचा अभ्यास करायला हवा. चल माझ्यासोबत. ज्वाला, तू इथेच थांब. पुन्हा जर
संकट आलं तर तुझी गरज भासेल गावाला...” आदित्यला घेऊन त्याचे बाबा गावच्या मागे
असलेल्या एका डोंगराकडे गेले. डोंगर चढून वर गेल्यावर आदित्यने आत डोकावलं तर
सोनेरी रसात बुडबुडे आलेले दिसत होते...
आदित्यने
त्याच्या वडिलांकडे पाहिलं. ते म्हणाले, “आदित्य, हा धगधगता ज्वालामुखी तुझा
शक्तीस्रोत आहे. याच ज्वालामुखीच्या तोंडावर बसून तुला अग्निदेवाची तपश्चर्या
करायची आहे. काळजी करू नकोस, तुझ्या शक्तीची दाहकता या ज्वालामुखीपासून तुझं रक्षण
करेल. जेव्हा तुझी शक्ती पूर्ण जागृत होईल तेव्हा आकाशाला
सीमा नसेल आणि अग्नीचा पाऊस पडेल...”
त्याच्या बाबांच्या या उद्गारांनी आदित्य चपापला. त्यांना नमस्कार करून
ज्वालामुखीत उतरला. आसनमांडी घालून दोन्ही हात जोडून डोक्याच्या वर नेले आणि, “ओम
अग्निदेवाय नम:” या मंत्राचा जप सुरू केला. तिथे कनकपुरात जेवणाच्या वेळीही महाराज
कनकसिंह भेटीसाठी आले नाहीत म्हणून भैरव, भीमसिंह आणि अवंतिका तिघांनाही नवल वाटलं
होतं. राजकुमारी सोनाची वागणूकही संशयास्पद वाटत होती. जेवणं झाली. भैरव व भीमसिंह
आपापल्या कक्षात गेले. अवंतिका आणि सोना बराच वेळ गप्पा मारत होत्या पण सोनाचं
लक्ष वेगळ्याच ठिकाणी लागलं होतं. अवंतिकाच्या हे लक्षात आलं होतं पण तिने तसं
दाखवलं नाही. काही वेळाने अवंतिका तिच्या दालनात निघून गेली. निजानीज झाली. दिवे
मालवले गेले. सर्वत्र सामसूम झालं होतं. त्या शांत वातावरणात चार काळ्या सावल्या
दिसू लागल्या. तलवारी घेतलेल्या त्या सावल्या हळू हळू पुढे सरकत होत्या.
भीमसिंहांच्या कक्षाबाहेर एक, भैरवच्या कक्षाबाहेर एक आणि अवंतिकाच्या दालनाबाहेर
दोन अशा त्या चार सावल्या उभ्या होत्या...
अवंतिकाच्या
दालनाची दारं हळू हळू उघडली आणि काळ्या वेशातले दोन तलवारधारी सैनिक आत शिरले.
अवंतिका डोक्यावरून चादर घेऊन झोपलेली त्यांना दिसली. दोन्ही सैनिकांनी एकमेकांकडे
पाहिलं आणि तलवारीचा एकच वार केला. काहीच हालचाल झाली नाही तेव्हा दोघं जवळ गेले
आणि त्यातल्या एकाने चादर हटवली. अवंतिकाच्या जागी उशा ठेवलेल्या पाहून दोघंही
गोंधळले. इतक्यात पडद्यामागून अवंतिका बाहेर आली आणि काही कळायच्या आत तिने एकाएका
वारानिशी दोन्ही सैनिकांचा खात्मा केला. तलवार सरसावून अवंतिका दालनाबाहेर आली.
काळ्या सैनिकांची एक तुकडी तिच्या स्वागताला तयारच होती. एकेका सैनिकाचा समाचार
घेत ती दिवाणखान्यात आली. तिथे भैरव आणि भीमसिंह काही सैनिकांच्या गराड्यात उभे
होते. अवंतिकाने त्या सैनिकांच्यामध्ये उडी घेतली आणि तिघांनी मिळून सर्व
सैनिकांना संपवलं. इतक्यात दारामागून राजकुमारी सोना बाहेर आली. अवंतिकाने तिला
खेचून मध्ये आणलं आणि तिच्या मानेला तलवार लावत म्हणाली, “का केलंस सोना... का दगा
केलास माझ्याशी... काय मिळालं तुला असं वागून...” राजकुमारी सोना हुंदके देऊन रडू
लागली. अवंतिकाकडे पाहत ती म्हणाली, “अवंतिका, मी तुझ्या मैत्रीच्या लायक नाही
गं... मैत्रीशी दगा केला मी. पण मी हतबल होते. दुर्जनसिंहाने माझ्या वडिलांना कैद
केलं आहे आणि तेही याच महालाच्या तळघरात. या सर्व सैनिकांना माझ्यावर पाळत ठेवायला
सांगितलं होतं त्या दुष्टाने. मी या काळ्या सैनिकांचं ऐकलं नसतं तर तिथे तळघरात
माझे वडील...”
अवंतिकाने
सोनाच्या खांद्यावर हात ठेवला. तिला धीर देत ती म्हणाली, “काळजी करू नकोस सोना.
आपण सगळे मिळून सोडवू महाराजांना...” अवंतिकाने भैरव आणि भीमसिंहांकडे पाहिलं.
त्यांनी मानेनेच होकार दिला. काळोखाचा फायदा घेत अवंतिका, भीमसिंह, भैरव आणि सोना
तळघराशी पोहोचले. सोना तळघरात उतरत असताना अवंतिका, भैरव आणि भीमसिंह काळ्या
सैनिकांशी लढत होते. अखेर महाराज कनकसिंह बाहेर आले. सर्वांना मनापासून धन्यवाद
देत त्यांनी राजकुमारी सोनाला कडकडून मिठी मारली. डोळे पुसत महाराज म्हणाले,
“महाराणी अवंतिका, आजपासून दुर्जनसिंहाविरुद्ध पुकारलेल्या या लढ्यात कनकपूर तुमची
पुरेपूर मदत करेल. अवंतिकाने हात जोडून महाराजांना धन्यवाद दिले. रात्र संपली.
सकाळ होताच कनकपुराच्या मोठ्या पटांगणात अवंतिका, भीमसिंह, राजकुमारी सोना, महाराज
कनकसिंह आणि भैरव आले. समोर कनकपुराचं सैन्य आणि सोबत भैरवचे निष्ठावान सैनिक उभे
होते. सर्वांना उद्देशून अवंतिका म्हणाली, “माझ्या मित्रांनो, आज ती वेळ आली आहे
जेव्हा दुर्जनसिंह आणि कालीसिंहच्या जुलुमांचा अंत होईल. तुम्हा सर्वांच्या समक्ष
आज मी हा लढा पुकारते आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात...” अवंतिकाचं हे म्हणण्याचा
अवकाश की सर्व सैनिकांनी एकच गर्जना केली. अवंतिका गरजली, “दुर्जनसिंह, आपल्या
मरणाला तयार हो...” तिथे कालीसिंहाच्या हेराने अवंतिका वाचल्याची आणि सुजानगढवर
चाल करून येत असल्याची खबर देताच कालीसिंह कुत्सित हसत म्हणाला, “हा...हा...हा...
येऊ देत तिला... यावेळी ती खात्रीने संपलीच...”
तिथे
ज्वालामुखीच्या तोंडावर आदित्य तप करत होता. त्याला वाटत होतं तो अथांग अशा
काळ्या आकाशात उभा आहे. त्याला समोर एक सफेद प्रकाशाचा रस्ता दिसला. रस्त्याच्या
दुसऱ्या टोकाला ज्वाला आणि आदित्यचे वडील उभे होते. आदित्य त्या रस्त्यावर पाऊल
ठेवणार इतक्यात त्याला चित्कार ऐकू आला. त्याने मागे पाहिलं तर घायाळ झालेला राजा
गटांगळ्या खात खाली येताना त्याला दिसला. जमिनीवर रक्तबंबाळ झालेली अवंतिका निपचित
पडलेली त्याला दिसली. आदित्यने राजाला झेललं आणि अवंतिकाकडे पोहोचला. शुद्ध
हरपण्यापूर्वी, “आदित्य... आ...ला...स... तू...” इतकं म्हणून अवंतिकाने डोळे
मिटले. वर आकाशात एका बाजूला दुर्जनसिंह आणि दुसऱ्या बाजूला कालीसिंह क्रूर हसत
होते. आदित्यने, “अवंतिका...” असं ओरडत डोळे उघडले. आपली ध्यानमुद्रा सोडून आदित्य
बाहेर आला. बाहेर ज्वाला आणि त्यांचे वडील उभे होते. आदित्यला मधूनच बाहेर पडलेला
पाहून दोघंही चक्रावले. ते काही बोलणार इतक्यात आदित्य म्हणाला, “क्षमा करा बाबा.
पण आत्ता या क्षणी अवंतिकाला माझी जास्त गरज आहे. मला सुजनगढला परत जायलाच हवं.
दुर्जनसिंह आणि कालीसिंह कपटी आहेत, नीच आहेत. त्यांच्या विळख्यातून मी महाराणीला
वाचवू शकलो नाही. पण अवंतिकाला मी नक्कीच वाचवणारच...” आपल्या वडिलांना नमस्कार
करून ज्वालाच्या डोक्यावर हात ठेऊन आदित्य निघून गेला. ज्वालाने ज्वालामुखीत
पाहिलं आणि ती अवाक झाली...
तिने
लगेच बाबांना बोलावलं. त्यांनीही ज्वालामुखीत पाहिलं. लाव्हा पूर्ण शांत झाला
होता. उकळणाऱ्या सोनेरी रसाची जागा काळ्या मातीने घेतली होती. ज्वाला काही
बोलायच्या आत तिचे बाबा म्हणाले, “ज्वालामुखी शांत झाला... म्हणजे... आदित्य...
त्याची शक्ती पूर्ण जागरूक झाली आहे... पण अजून त्याला याची कल्पना नाही. तो आता
लढायला निघाला आहे... ज्वाला...” ज्वालाने तिच्या बाबांचा रोख ओळखला आणि
होकारार्थी मान हलवली. तिथे सैन्यबळासह अवंतिकाने सुजानगढच्या किल्ल्यावर आक्रमण
केलं. अवंतिकाचे शीलेदार कालीसिंहाच्या काळ्या सैन्यावर तुटून पडले. भीषण युद्धाला
सुरुवात झाली. तलवारी खणखणल्या. बाणांचा वर्षाव होऊ लागला. किल्ल्याच्या एका
बाजूला लावलेल्या तोफांमधून आगीच्या गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. अवंतिका, भैरव
आणि भीमसिंह या तिघांनी मिळून एक योजना आखली आणि त्यानुसार भैरव आपल्या काही
साथीदारांसह तट चढून वर गेला. तोफांना चालवणाऱ्या काळ्या सैनिकांचा सामना करत
भैरवने तोफा तर निकामी केल्याच पण त्या बाजूला असलेला किल्ल्याचा दरवाजाही उघडला.
हे पाहताच कालीसिंहाने भैरववर बाण चालवला पण आपल्या छातीचा कोट करून भीमसिंहांनी
तो बाण अडवला. भैरवच्या हातात वीरमरण पत्करताना भीमसिंह म्हणाले, “रा...राणी
अवंतिका... मी आप...ली सेवा क...रू शकलो नाही... क्षमा असावी...” सुजानगढच्या
दाराकडे पाहून आपल्या थरथरत्या रक्ताळलेल्या हातांनी त्यांनी नमस्कार केला आणि
प्राण सोडले. अवंतिका तिथे पोहोचली पण उशीर झाला होता. भीमसिंहांचीच तलवार हाती
घेत अवंतिकाने गर्जना केली, “काली... मरणाला तयार हो...”
अवंतिका
आणि भैरव सैनिकांसह पुढे सरकत गेले आणि काळे सैनिक हळू हळू मागे हटू लागले होते.
मिनारावर उभा असलेला कालीसिंह हे सर्व पाहत होता. आता काही वेळातच अवंतिका आणि
तिचं सैन्य कालीसिंहावर मात करत किल्ल्यावर विजय मिळवणार असं दिसत असतानाच
आकाशातून आगीचे गोळे येऊन त्यांच्यावर आदळले. सैनिक होरपळून निघाले. सर्वांनी
आकाशाकडे पाहिलं तर मोठमोठ्या जहाजांना हवेने भरलेले प्रचंड मोठे फुगे बांधलेले
होते आणि ती जहाजं हवेत उडत होती. हे दृष्य पाहून अवाक झालेले सगळे आगीच्या
गोळ्यांनी भानावर आले. अवंतिकाने बारीक नजर करून पाहिलं तर त्यातल्या एका जहाजावर
दुर्जनसिंह होता तर दुसऱ्यावर एक बाई उभी होती. ती तेजा होती. आपल्या खास
हत्यारांनी ती दुर्जनसिंहाची मदत करत होती. ती जहाजं आगीचे गोळे बरसू लागली आणि
अवंतिकाचं सैन्य सैरावैरा पळू लागलं. तिकडे जंगल पार करून सुजानगढच्या दिशेने
येणाऱ्या आदित्यला तलवारींचा खणखणाट ऐकू आला आणि तो अधिक वेगाने पळू लागला.
आकाशातून येणाऱ्या जहाजांनी त्याचं लक्ष वेधलं. झुडूपाआड उभा राहून ती जहाजं काय
करत आहेत हे पाहत असताना त्या जहाजांनी आगीचे गोळे सोडायला सुरुवात केल्याचं
त्याला दिसलं. आदित्यने पुन्हा किल्ल्याच्या दिशेने जायला सुरुवात केली. जहाजावर
दुर्जनसिंहाला पाहताच अवंतिकाला तिची आई आठवली आणि रागाच्या भरात ती मोकळ्यावर
आली. मुख्य सावज टप्प्यात आलंय हे पाहताच दुर्जनसिंहाने एका जहाजाला अवंतिकावर
हल्ला करण्यास सांगितलं. आदित्य जीवाच्या आकांताने धावत होता. त्याने पाहिलं तर एक
जहाज बरोब्बर अवंतिकाच्या डोक्यावर होतं, “अवंतिका...” अशी त्याने हाक मारली...
आदित्यच्या
लक्षात आलं की तो नुसता धावत नसून वर वर धावत जात आहे. त्याचे हात आगीने भडकू
लागले. बघता बघता आदित्य जहाजांच्या समांतर पातळीवर आला आणि एकाएकी त्याचा सदरा
फाडून दोन्ही बाजूंनी दोन पंख बाहेर पडले. त्याचा चेहरा आवळल्यासारखा झाला आणि
बघता बघता आदित्य एका विशालकाय पक्षात परिवर्तीत झाला. त्याच्यासमोर तेच जहाज होतं
जे अवंतिकावर निशाणा साधून होतं. ते जहाज आगीचा गोळा टाकणार इतक्यात आदित्यने तोंड
उघडलं. त्याच्या तोंडातून आगीच्या ज्वाळा निघाल्या आणि ते जहाज भस्मसात झालं.
सर्वजण हे दृष्य पाहून आश्चर्यचकित झाले. आदित्य एकेका जहाजाचा फडशा पाडत असताना
काही जहाजांनी आदित्यला घेरलं आणि त्याच्यावर आगीच्या गोळ्यांचा मारा सुरू केला.
इतक्यात एका जहाजाचा प्रचंड स्फोट झाला आणि मागून तसाच अजून एक पक्षी येताना
दिसला. आदित्यने त्या पक्षाला ओळखलं होतं. ती ज्वाला होती. मग काय, वर आकाशात
आदित्य आणि ज्वाला जहाजांना उध्वस्त करत होते तर खाली अवंतिका आणि भैरव बाकी
सैन्यासह काळ्या सैनिकांवर तुटून पडत होते. ज्वालाने एका जहाजावर तेजाला पाहिलं
आणि तिला क्रोध अनावर झाला. तिच्या तोंडून आगीची एक लकेर बाहेर पडली आणि थेट
तेजाच्या जहाजावर आदळली. तेजाने लगेच बाहेर उडी घेतली. दुर्जनसिंहाने वेळेवर आपलं
जहाज तिथे नेलं आणि तेजाला खाली पडण्यापासून वाचवलं. इतक्यात आदित्यने
दुर्जनसिंहाच्या जहाजालाही खिंडार पाडलं. जहाज हवेत गटांगळ्या खात खाली येऊ
लागलं...
जहाज
जमिनीवर आदळणार इतक्यात तेजा आणि दुर्जनसिंहाने जहाजातून उद्या घेतल्या.
दुर्जनसिंहाला समोर पाहून अवंतिकाला तिची आई आठवली. “दुर्जनसिंह, तुझा अंत जवळ आलाय...”
असं म्हणत त्वेषाने अवंतिकाने तलवार चालवली. तिचा वार अडवत दुर्जनसिंह म्हणाला,
“एवढीशी चिमुरडी तू... आणि माझा, दुर्जनसिंहचा सामना करणार... आपल्या आईला तर
माझ्यापासून वाचवू शकली नाहीस... पळून गेलीस, आणि आता आलीस परत स्वत: मरायला...
तुझं मुंडकंच छाटून टाकतो आता...” दोघंही तलवारीचे वार करत होते आणि एकमेकांचे वार
चुकवत होते. तेजाला जमिनीवर उभं राहिलेलं पाहून ज्वाला खाली आली. जमिनीला स्पर्श
होताच ज्वालाचे पंख अदृश्य झाले आणि ती पुन्हा मनुष्य रुपात परिवर्तीत झाली.
ज्वालाला पाहून तेजा तलवार उपसून तिच्यावर धाऊन गेली. तिने जोरदार प्रहार केला. पण
त्याच वेळी भैरवने दिलेल्या तलवारीनिशी ज्वालाने तेजाचा वार अडवला. आपल्या गावावर
तेजाने आणलेली संकटं ज्वालाला आठवली आणि ती तेजावर सपासप वार करू लागली. आकाशातील
सर्व जहाजांचा फडशा पाडून आदित्य काळ्या सैनिकांवर तुटून पडला. त्याच्या तोंडातून
येणाऱ्या आगीच्या ज्वाळा क्षणार्धात त्या सैनिकांना बेचिराख करत होत्या. हे सुरू
असतानाच आदित्यने पाहिलं तर मिनारावर कालीसिंह धनुष्यबाण घेऊन सज्ज झाला होता.
बाणाचा रोख ज्वालाकडे होता. बाण सुटला आणि आदित्यने तिथे झेप घेतली. आपल्या
अजस्त्र पंजात बाण पकडून तो मोडून टाकला. आदित्यची नजर कालीसिंहवर रोखली होती. तो
मिनारावर कुत्सित हसत होता. आदित्य मिनाराच्या बाजूच्या तटावर उतरला आणि त्याचे
पंख गायब होऊन तो पुन्हा मनुष्यरुपात दिसू लागला...
“कालीसिंह...”
अशी गर्जना करत, बाजूलाच निपचित पडलेल्या सैनिकाची तलवार हाती घेऊन आदित्य
कालीसिंहकडे धावला. कालीसिंहानेही त्याची तलवार बाहेर काढली आणि पातींचा खणखणाट
झाला. आगीच्या ज्वाळांनी आणि अवंतिकाच्या सैनिकांमुळे घाबरलेले काळे सैनिक रणभूमी
सोडून पळू लागले. भैरवने काही काळ त्यांचा पाठलाग केला खरा पण मूठभर राहिलेले ते
सैनिक जंगलाच्या दिशेने गेले हे पाहून तो मागे फिरला. किल्ल्यात आता तीन वेगळ्या
द्वंद्वांना सुरुवात झाली होती. मैदानात तेजा विरुद्ध ज्वाला, तटावर कालीसिंह
विरुद्ध आदित्य आणि महालात दुर्जनसिंह विरुद्ध अवंतिका. तेजाने केलेला प्रत्येक
वार चुकवत ज्वाला तिच्यावर वार करत राहिली आणि शेवटी तिची तलवार हातावेगळी करत
ज्वालाने तेजाला निशस्त्र केलं. ज्वालाने तलवार उंचावली खरी पण ती तशीच जमिनीत
खुपसत म्हणाली, “तुला संपवायची माझी खूप इच्छा आहे पण तुला गावकऱ्यांसमोर नेण्याचं
वाचन दिलं आहे मी बाबांना. आता गावकरीच तुझा न्याय करतील...” तेजाला एक चपराक
लगावून भैरवने दिलेल्या दोरखंडाच्या मदतीने ज्वालाने तेजाला जेरबंद केलं. वर
मिनारावर कालीसिंह आणि आदित्य यांच्यात द्वंद्व पेटलं होतं. कधी कालीसिंह वरचढ होत
होता तर कधी आदित्य. लढता लढता आदित्य ताटावरून तोल जाऊन खाली पडू लागला. त्याने
तटाच्या दगडाचा आधार घेतला. त्याच्या हातून तलवार निखळून खाली पडली. कालीसिंहाने
संधी साधत वार केले. काही वार आदित्यने चुकवले पण एक वार त्याच्या खांद्यावर बसला.
आदित्यने पाहिलं तर कालीसिंह पुन्हा वार करण्यासाठी तलवार उगारत होता. आदित्यने
वाऱ्याच्या वेगासरशी कालीसिंहचा पाय खेचला आणि हवेतच कोलांटी उडी मारून पुन्हा
मिनारावर उभा राहिला...
पाय
खेचल्याने तोल गेलेला कालीसिंह मिनारावरून खाली येऊ लागला. हे पाहून बाजूला पडलेली
तलवार उचलून, “काली, वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या माझ्या मित्राला तू हवेत
निर्घूणपणे मारलंस... तूही तसाच मर...” अशी गर्जना करत आदित्यने कालीसिंहाकडे झेप
घेतली. हवेत गटांगळ्या खात असलेल्या कालीसिंहाने वरून येणाऱ्या आदित्यला पाहिलं
आणि त्याचे डोळे विस्फारले. क्षणार्धात आदित्यची तलवार कालीसिंहाच्या छातीच्या
आरपार गेली आणि त्याचक्षणी कालीसिंह खाली पडून तशाच फाटलेल्या डोळ्यांनिशी मेला.
आदित्य खाली आला आणि कालीसिंहाची अवस्था पाहून, “राजा...” असं जोरात ओरडला.
आदित्यचा आवाज ऐकून महालात अवंतिकाशी लढत असलेला दुर्जनसिंह बाहेर आला. कालीसिंह
आणि तेजाची दुर्दशा पाहून तो चवताळला, “काली, माझा युवराज... आदित्य, तू त्याला संपवलंस...
मी आता कोणालाच सोडणार नाही...” असं म्हणत तलवार उगारून दुर्जनसिंह आदित्यवर धाऊन
गेला. त्याच्या आणि आदित्यमध्ये अवंतिका वाऱ्याच्या वेगाने उभी राहिली. “नाही
दुर्जन... तू माझा अपराधी आहेस... माझ्या आईचा अपराधी आहेस... मीच तुला संपवणार
आहे...” असं म्हणत असतानाच दुर्जनसिंहाच्या तलवारीचा वार अवंतिकाने तिच्या
हातातल्या तलवारीने अडवला. दोघांच्याही तलवारी खणखणल्या. त्वेषाने दोघंही
एकमेकांवर वार करू लागले. हळू हळू अवंतिकाला थकवा जाणवू लागला. याच संधीचा फायदा
घेत दुर्जनसिंहाने तिच्या हातातली तलवार पाडली आणि वार केला. वार तिच्या
खांद्यापासून खाली जात पोटापर्यंत गेला. जखमेने विव्हळत अवंतिका खाली कोसळली...
तिने
वर पाहिलं तर दुर्जनसिंह पुन्हा वार करण्याच्या तयारीत होता. वेदना झुगारून अवंतिका
उठली. दुर्जनसिंहाने वार केला. बाजूलाच पडलेल्या एका काळ्या सैनिकाच्या ढालीने तिने
तो अडवला. दुर्जनसिंह वार करत राहिला आणि अवंतिका त्याचे वार अडवत राहिली, चुकवत
राहिली. अवंतिकाचा थकवा अधिक वाढला. दुर्जनसिंहाने तिच्या हातातली ढालही पाडली आणि
तिला एक जोराची लाथ मारली. लाथेच्या धक्क्याने अवंतिका एकदम मागे गेली आणि सैनिकांच्या
शवांच्या ढिगावर जाऊन आदळली. वेदना आणि थकव्यामुळे अवंतिकाला उठताही येत नव्हतं.
रक्ताने तिचं अंग ओलंचिंब झालं होतं. अवंतिका पडल्याचं पाहताच सर्वजण तिच्याकडे
धावले. अवंतिकाने आपला रक्ताळलेला थरथरता हात वर नेत सर्वांना थांबायला सांगितलं.
दुर्जनसिंह मोठमोठ्याने हसत म्हणाला, “हा...हा...हा... बस... झालं... इतकंच... मी
तर ऐकलं होतं राजकुमारी अवंतिका खूप शूर लढवय्यी आहे... पण तूही तुझ्या आईसारखीच
निघालीस... एकाच वारात तिचा खात्मा केला होता मी... आणि आता तुझाही तसाच अंत
करणार... हा...हा...हा...” हे म्हणत असतानाच दुर्जनसिंहाने तलवार उगारली. अवंतिकाने
डोळे मिटले. क्षणभरात महाराणी सुलेखादेवीचा चेहरा तिच्या समोर आला. अवंतिकाने
जमिनीत हात खुपसला. तिच्या हाताला तलवारीची मूठ लागली. अवंतिकाने डोळे उघडले आणि, “दुर्जनसिंह...”
अशी गर्जना करत तिच्यावर चाल करून येणाऱ्या दुर्जनसिंहावर एकच वार केला.
त्याचक्षणी दुर्जनसिंहाचं शीर धडावेगळं झालं. त्याचं शरीर अवंतिकाच्या पायाशी
पडलं. युद्ध संपलं होतं. अवंतिकाच्या विजयाचा जल्लोष होऊ लागला. दिवस मावळला.
दुसऱ्या दिवशी अवंतिकाने दैदिप्यमान अशा सोहळ्यात महाराणी पदाची सूत्र हाती घेतली.
त्या सिंहासनाधीश झाल्या. त्यांच्या मस्तकावर राजमुकूट स्वत: महाराज कनकसिंहांनी चढवला.
महाराणी अवंतिकाने पहिला आदेश दिला, “दुर्जनसिंह आणि कालीसिंह यांनी दिलेले सर्व
आदेश रद्द करण्यात यावेत आणि त्यांनी लादलेल्या सर्व करांमधून नागरिकांची मुक्तता
व्हावी...” या पहिल्याच आदेशामुळे सर्वात आनंदाची लाट पसरली, “महाराणी अवंतिकाचा
विजय असो...” या लालकारीने पूर्ण सुजानगढ निनादत होता. हात उंचावून महाराणी
अवंतिकाने सर्वांना शांत केलं. त्या पुढे बोलू लागल्या, “या लढ्यात माझ्यासोबत
अनेक वीर लढले. काहींना वीरमरण आले आणि काही जखमी झाले. त्या सर्वांच्या
कुटुंबियांची जबाबदारी आता आम्ही आमच्या खांद्यावर घेत आहोत...” बोलता बोलता
अवंतिकाचे डोळे पाणावले. डोळे पुसत त्या म्हणाल्या, “आमचे तीर्थस्वरूप, आमचे अंगरक्षक
भीमसिंह, आज आमच्या सोबत नाहीत याची आम्हास खंत आहे...
आम्ही
ज्वाला आणि तिच्या वडिलांना विनंती करतो की त्यांनी इथेच सुजानगढमध्येच रहावं. म्हणजे
ज्वालाच्या रूपाने आम्हास राजकुमारी सोनाप्रमाणेच अजून एक हक्काची बहिण, मैत्रीण
मिळेल आणि तिच्या वडिलांच्या रुपात मायेचं छत्र सदैव आमच्या सोबत असेल. त्यांच्या
संपूर्ण गावाची निगा आजपासून सुजानगढ राखेल. भीमसिंहांच्या जाण्याने सैन्यात जी
पोकळी निर्माण झाली आणि ती भैरवने भरून काढावी अशी आमची इच्छा आहे. भैरव आजपासून
आमचा मुख्य सेनापती असेल...” हे बोलत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या आदित्यकडे
अवंतिकाने पाहिलं. त्याच्या डोळ्यातलं कौतुक आणि मनातलं प्रेम दोन्हीही तिला समजलं
होतं. आपलंही आदित्यवर प्रेम आहे याचीही तिला जाणीव होती. ती पुढे जाण्यास कचरत
होती. आदित्य हसला आणि पुढे झाला. सर्वांसमक्ष अवंतिकासमोर गुडघ्यावर बसत तो
म्हणाला, “महाराणी अवंतिका, आपण आज राणी झालात पण तरीही आपण माझ्यासाठी त्याच
अवंतिका आहात. माझ्या लहानपणापासूनच्या माझ्या साथीदार. महाराणी अवंतिका, आपल्या
जीवनाशी माझं जीवन जोडलं जावं ही एकच इच्छा आहे...” अवंतिकाने लाजून एकदा
सर्वांकडे पाहिलं. सर्वांच्या नजरेत होकार होता. यथावकाश अवंतिका आणि आदित्यचा
विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. जुलूमाच्या चिखलातून सुजानगढ कमळासारखा पुन्हा
फुलला आणि सर्वत्र आनंदी आनंद पसरला...
समाप्त.
No comments:
Post a Comment