"साहब, कूली चाहिये... एक बस्ते का बीस रुपिया...
ठेसन के बाहर तक छोड़ेगा साहब...", "उसका मत सुनो
साहब, वह आपको बीचमें ही छोड़ देगा... आप समान मुझे दो...
एक का पंधरह रुपिया..." निज़ामुद्दीन स्टेशनवर पाऊलही ठेवलं नव्हतं की
कुलींच्या फौजेने ट्रेनच्या डब्ब्यातच मला घेराव घातला. बँकेत असल्याने बदलीवर मी
इथे आलो होतो. स्वत:च्या घरापासून, माणसांपासून इतक्या लांब
पहिल्यांदाच आल्याने आधीच थोडा सैरभैर झालो होतो, त्यात यांची भर. माझ्या दोन्ही
बॅगा घट्ट धरत त्या कूलीसेनेला कापत मी स्टेशन बाहेर पडलो...
आता हुश्श् करणार इतक्यात अजून एक लढाई माझी वाट
पाहत होती. एखादा नेता किंवा अभिनेता समोर येताच चाहते आणि पत्रकार त्याच्याभोवती
जसा पिंगा घालतात तसाच माझ्या समोरचा रिक्षावाले, टॅक्सीवाले, गाईड यांचा जमाव पाहून मी थक्क झालो.
"साहब किधर चलेंगे..."
"चलो साहब... देखो ए.सी. टॅक्सी है...", "होटल चलेंगे सर... ए वन इंतजाम करके दूँगा सर... फिक्स रेट..." अशा
वाक्यांच्या हल्ल्याने बेजार होत असताना रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या
रिक्षाकडे माझी नजर गेली. एक माणूस रिक्षाला टेकून पेपर वाचत होता...
मनात विचार पक्का केला आणि लगेच त्या रिक्षाकडे
निघालो. जवळ पोहोचताच पेपरमधून डोकं वर काढत ते गृहस्थ हसत म्हणाले,
"ऑटो चाहिये साहब..." त्यांचा आवाज आणि त्यांचं तिथे असणं
मनाला भावून गेलं. मी होकार देताच त्यांनी माझ्या बॅगा आत ठेवल्या. मी आत बसताच
त्यांना म्हणालो, "ब्लॉक २६, भोगल...
यहाँ जाना है..." तशी ते गृहस्थ पटकन म्हणाले, "अरे...
जयदीपजी की कोठी (दिल्लीमध्ये बंगल्यांना कोठी म्हणतात हे त्यावेळी मला समजलं...)
पर जाओगे..." त्यांचं उत्तर ऐकून मी उडालोच...
"आप जानते हैं उन्हें..." या माझ्या वाक्यावर ते हसत म्हणाले,
"अरे जयदीपजी तो हमारे भोगल की शान हैं. फौज में मेजर थे. अब
रिटायर होकर आराम की ज़िंदगी बसर कर रहें हैं. मैं भी भोगल में ही रहता हूँ. तो आप
हैं उनके नये किरायेदार..." त्या गृहस्थांच्या गप्पांच्या ओघात मला हवी
असलेली जागा कधी आली तेच समजलं नाही. मी पैसे विचारले तर म्हणाले, "साहब, वैसे तो मीटर के हिसाब से पचास रुपए होते हैं
पर मीटर खराब है तो जो मर्ज़ी हो दे दिजिए..." त्यांचं हे प्रामाणिक वक्तव्य
आवडलं मला. मी हसत पन्नासची नोट त्यांच्या हातावर ठेवली. सलाम करून ते जाऊ
लागले...
का कोणास ठाऊक, मला
ओळख वाढवावीशी वाटली. मी माझं नाव सांगितलं. ते गृहस्थ म्हणाले, "मेरा नाम इक़्बाल है, पर यहाँ के बाशिंदे मुझे ऑटोचाचा कहते हैं
साहब..." त्यांचं मला 'साहब' म्हणणं
मला पटत नव्हतं. मी पटकन म्हणालो, "चाचा, साहब मत कहो मुझे. मैं हूँ तो आपसे छोटाही..." ऑटोचाचा हसले.
"ठिक है बेटा. नहीं कहूँगा... अच्छा, अब चलता हूँ.
ख़ुदाहाफ़ीस..." इतकं बोलून ते रिक्षा घेऊन निघून गेले. दिवस सरला. सकाळी
नव्या ब्रांचमध्ये जायचं म्हणून जरा लवकरच निघालो. खाली येऊन पाहतो तर समोर
ऑटोचाचा रिक्षा घेऊन उभे...
"अरे ऑटोचाचा, इतनी सुबह सुबह आप यहाँ..." हा
प्रश्न मी विचारणार इतक्यात तेच म्हणाले, "आ गए बेटा...
चलो, तुम्हें तुम्हारे दफ़्तर छोड़ देता हूँ... कहाँ जाना
है..." माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ते बाहेर आले. माझ्या खांद्यावर हात
ठेवत म्हणाले, "बेटा, कल स्टेशनपर
समान के साथ तुम्हें अकेले देखा तभी समझ गया, की तुम यहाँ तबादला होकर आए हो. नया
शहर, नये लोग, इसलिए सोचा कहीं पहलेही
दिन दफ़्तर ढूँढ़ते तुम परेशान ना हो जाओ..." ऑटोचाचांचा हा आपलेपणा मला खूप
आवडला. मी रिक्षात बसून त्यांना बँकेचा पत्ता सांगितला आणि आमचा प्रवास सुरू
झाला...
त्यांच्या खमंग गप्पांमध्ये माझी ब्रांच कधी आली
तेच समजलं नाही. दिवसभराचं काम उरकून पाचला मी बाहेर पडलो तर समोर ऑटोचाचा उभे.
“अरे, ऑटोचाचा... आप यहाँ...” माझ्या या प्रश्नावर ते हसत म्हणाले, “बेटा, आज
तुम्हारा पहला दिन था... अब इस वक्त कहाँ भीड में धक्के खाओगे... अब तो मीटर भी
ठीक हो गया है... आज मै छोड़ देता हूँ कल से खुद चाले जाना...” मी रिक्षात बसत
म्हणालो, “ऑटोचाचा, सुबह की बात और है, पर शाम को मेरा निकलने का टाईम फिक्स नहीं
है... हाँँ, पर हर सुबह मैं आपका इंतजार करुँगा...” ऑटोचाचा फक्त हसले. दुसऱ्या
दिवसापासून तर आमच्यात हा अलिखित ठरावच पास झाला. रोज सकाळी ऑटोचाचा मला
ब्रांचपर्यंत सोडायचे आणि संध्याकाळी मी माझा माझा परत यायचो...
साधारण साडे-पाच फूट ऊंची, निम-गोरा वर्ण, काळ्या
भिंगाच्या चष्म्याआड लपलेले पिंगट डोळे, आणि साठीकडे झुकलेल्या ऑटोचाचांचं वजन
असेल साधारण साठ-सत्तर किलो. त्यांच्या वयामुळे, कामामुळे आणि कदाचित त्यांच्या
आपलेपणाने बोलण्यामुळेही असेल कदाचित पण ऑटोचाचा हे नाव त्यांच्यावर जमून गेलं.
त्यांच्याकडे पाहून कधी कधी वाटायचं त्यांच्या घरच्यांची माहिती करून घ्यावी पण
ऑटोचाचांना आवडेल नाही आवडणार म्हणून कधी विचारलं नाही. अशातच आठवडा सरून गेला.
येणारा रविवार इतरांसाठी कसाही का असेना पण माझ्यासाठी कंटाळवाणा होणार होता. दिवसभर
काय करावं हा यक्षप्रश्न मनात घेऊन शनिवारी मी झोपी गेलो...
रविवारची सकाळ जरा निवांत होती. चहा-नाश्ता करता
करता दहा वाजले. मी सहज बाल्कनीमध्ये आलो तर खाली ऑटोचाचा दिसले. मी खाली येत
म्हणालो, “अरे, ऑटोचाचा आप... लेकीन आज तो छुट्टी है...” ऑटोचाचा लगेच म्हणाले,
“मुझे पता है बेटा... मैंने सोचा आज मैं भी छुट्टी ले लूँ... चलो, आज तुम्हें दिल्ली
की सैर करा दूँ...” मलाही कुठेतरी फिरायला जाण्याची इच्छा होतीच, पण एकट्याने कुठे
जायचं शिवाय ऑटोचाचांना किती त्रास द्यायचा म्हणून मी गप्प होतो. ऑटोचाचांचे शब्द
ऐकले आणि मला हुरूप आला. मी म्हणालो, “ठीक है ऑटोचाचा, चालते हैं... पर...” बहुतेक ऑटोचाचा
समजले असावेत. म्हणाले, “अरे ठीक है बेटा, यह लो, मीटर शुरू कर दिया है. जो भी
होगा वह दे देना, ठीक है...” मी हसलो आणि रिक्षात बसलो...
आधी हुमायूँचा मक़बरा मग लाल किल्ला पाहिला. तिथेच असलेल्या
प्रसिद्ध पराठेवाली गलीमध्ये आम्ही दोघं जेवलो. निघता निघता चार वाजून गेले.
आम्ही दोघांनी चहा घेतला. ऑटोचाचा म्हणाले, “बेटा, इस ट्राफिक में घर जाते जाते
शाम हो जायेगी अगर और थोड़़ी देर रुक सको तो इंडिया गेट का चक्कर लगा लें...”
नाहीतरी घरी जाऊन मी काय करणार होतो... मी होकार दिला आणि ऑटोचाचाने रिक्षा चालू
केली. संध्याकाळच्या वेळी प्रकाशमान झालेलं इंडिया गेट आणि त्याच्या सभोवतालचा
रस्ता, हे सगळं दृष्य अत्यंत मनोरम होतं. ऑटोचाचांनी एका जागी रिक्षा थांबवली.
रस्त्यालगतच्या एका गाडीवर आम्ही शिकंजी प्यायलो. शिकंजी पिता-पिता आमच्या गप्पा
सुरू झाल्या. एकेक वळणं घेत गप्पांची गाडी एकमेकांच्या कुटुंबावर आली. मी मुंबईत
असलेली माझी आई आणि सहा महिन्यापूर्वीच लग्न करून आलेली बायको यांबद्दल सांगितलं. आईला
दिल्लीची हवा मानवणार नव्हती म्हणून ती मुंबईतच राहणार होती आणि बायकोने तर
राजीनामाच दिला होता पण तिला इथे यायला अजून महिनाभर होता हेही सांगून ऑटोचाचांना
त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं. ऑटोचाचा बोलू लागले...
“मैं लाहोर का बाशिंदा हूँ. बँटवारे के वक्त मेरी
अम्मी और अब्बा मुझे यहाँ ले आये. हम तीनों का पेट भरने के लिए यह ऑटो... आधी ज़िंदगी गुजर गयी तीन ज़िंदगियाँ सँवारने में. अम्मी और अब्बा गुज़र गये पर यह ऑटो हाथ
से नहीं छूटा...” ऑटोचाचा गप्प झाले. मीही माझी शिकंजी संपवली. अशावेळी बोलून काही
उपयोग नसतो हे माहित होतं मला. हा रविवार अविस्मरणीय असा गेला होता. आता तर मी
रविवारची वाट पाहू लागलो जेव्हा ऑटोचाचा मला कुठे ना कुठेतरी फिरायला नेत असत.
सोबत असायच्या असंख्य गप्पा आणि ऑटोचाचांचे खुसखुशीत किस्से. दिवस भराभर सरत गेले.
तेजू आली आली माझा एकटेपणा जणू पळूनच गेला. ऑटोचाचाशी मी तिची ओळख करून दिली आणि
आम्हा तिघांचं रविवार विशेष आयुष्य सुरू झालं. एखाद्या दिवशी ऑटोचाचा आम्हाला काही-बाही
खायला आणत तर कधी तेजू त्यांच्यासाठी गोड-धोड करून पाठवत असे. ईदीच्या दिवशी ऑटोचाचाने
त्यांची खास शेवयांची खीर आणली होती आमच्यासाठी. ऑटोचाचांच्या रूपाने आम्हा
दोघांनाही घरापासून इतक्या लांब एक वडीलधारी हात मिळाला होता...
बघता बघता दीड वर्ष कसं निघून गेलं हे समजलंच
नाही. अखेर तो दिवस उजाडला. माझी पुन्हा मुंबईला ट्रांस्फर झाल्याची ऑर्डर माझ्या
हातात पडली. घरी परत जाण्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून काही हलत नव्हता. घरी येऊन
तेजूला ही बातमी दिली. तीही भलतीच खुश झाली. ही बातमी आम्ही छान सेलिब्रेट केली.
सकाळी ऑटोचाचा मला न्यायला आले आणि माझा हसरा आनंदी चेहरा पाहून म्हणाले, “आज बहुत
खुश लाग राहे हो बेटा... क्या बात है...” मी त्यांना माझ्या ट्रांस्फरची बातमी
सांगितली. “तो तुम वापस जाओगे...” हे शब्द उच्चारताना ऑटोचाचांच्या आवाजातील फरक
मला प्रखर्षाने जाणवला. त्या दिवशी ऑटोचाचा फारसे काही बोलले नाहीत. असेच सहा दिवस
निघून गेले. शनिवारी जेव्हा ऑटोचाचाने मला ब्रांचमध्ये सोडले तेव्हा मी त्यांना
विचारलं, “ऑटोचाचा, कल हम वापस जा राहे हैं... हमें एयरपोर्ट छोड़ने आयेंगे ना...” ऑटोचाचा
काही बोलले नाहीत, फक्त हसले...
आमचा जाण्याचा दिवस उजाडला. सर्व तयारी करून
बाल्कनीमध्ये आलो तर खाली ऑटोचाचा उभे होते. आम्ही सामान घेऊन खाली आलो. रिक्षा
सुरू झाली. पूर्ण प्रवासभर ऑटोचाचा गप्पच होते. एयरपोर्टला आम्ही उतरलो. ऑटोचाचांना
नमस्कार करावा असं आम्हा दोघांनाही वाटलं. आम्ही तसं केलंही. ऑटोचाचा ओशाळले.
आवंढा गिळत म्हणाले, “खुश रहो तुम दोनों... यह जोड़़ी हमेशा सलामत रहे...” मी मीटरचे
पैसे काढले तर ऑटोचाचा म्हणाले, “नहीं बेटा, आज पैसे नहीं लूँगा. आज मेरी यह बेटी
अपने ससुराल जा राही है, उसकी बिदाईही समझलो... कभी वापस आना तो इस ऑटोचाचा को
ज़रूर याद करना... अच्छा ख़़ु़ु़ुदा ख़़ैर करे...” आम्ही आत गेलो. मागे वळून पाहिलं तर ऑटोचाचा
रिक्षात बसून आपले डोळे पुसताना दिसले. आज सहा वर्ष झाली आम्हाला दिल्ली सोडून, पण
आजही ऑटोचाचांच्या आठवणी तशाच आहेत. काही माणसं आयुष्यभर आपल्या सोबत असूनही आपल्या
मनाचा कौल घेत नाहीत, पण ऑटोचाचांसारखी काहीच माणसं असतात, जी अल्पकाळातल्या सहवासातसुद्धा
आपल्या मनात पक्कं स्थान मिळवतात. नाही का...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment