फार वर्षांपूर्वी एका गावात गोपाळ नावाचा एक माणूस
आपल्या आईसोबत रहायचा. गावाच्या मधोमध एक छानसा बंगला. सावकारीचा जोमात चाललेला
व्यवसाय. असा त्याचा थाट. गावकऱ्यांकडून वस्तू, घर,
जमीन गहाण ठेऊन त्यावर भरघोस व्याज आकारून गावकऱ्यांना लुबाडत गोपाळ
गब्बर झाला होता. "इतकं व्याज घेऊन गावकऱ्यांना त्रास देऊ नकोस. देवाचा कोप
होईल..." अशा त्याच्या आईच्या विनवण्यांना गोपाळने कधीही दाद दिली नाही.
सर्वकाही छान चालू असताना एक दिवस देवाचा कोप झालाच. गोपाळच्या घरात एक समारंभ
असताना एक ठिणगी पडली आणि कोळशाच्या पोत्यांनी व तेलाच्या डब्यांनी पेट घेतला.
क्षणार्धात बंगला जळून बेचिराख झाला. त्यात गोपाळच्या हिशोबवह्या, गहाणखतं, पैसा, धान्य, संपत्ती, सर्वांची राख झाली. हे पाहून गावकरी
सुखावले पण गोपाळमात्र अजून दु:खात बुडाला. त्यात गावात आलेल्या तापाच्या साथीने
गोपाळच्या आईला ग्रासलं. तिच्या औषधोपचारात राहता बंगलाही विकावा लागला. त्याच
आजारपणात गोपाळची आई गेली आणि गोपाळ पुरता कफल्लक झाला...
गोपाळला गावात आश्रय मिळेना तेव्हा त्याने गाव
सोडलं आणि गावाबाहेर असलेल्या जंगलाच्या तोंडावर एक झोपडी बांधून तो राहू लागला.
एकेकाळी पंगतीने जेवणावळी उठवणाऱ्या गोपाळला आता एकावेळच्या जेवणाची भ्रांत पडू
लागली. जंगलातली कंदमुळं, फळं खात तो दिवस
घालवू लागला. "असं किती दिवस कुढत जगायचं. लांब कुठेतरी जाऊन काही काम मिळतंय
का पाहू..." असा विचार करत होतं-नव्हतं ते सामान बोचक्यात बांधून गोपाळ
निघाला. तो बराच वेळ चालत होता. भुकेने आणि थकव्याने त्याला आता चालवेना. तेव्हा
तो एका झाडाखाली बसला. जरा डोकं टेकतो तोच गोपाळला पाण्याची खळखळ एकू आली.
"अन्न नाही तर नाही, निदान पाणी तरी मिळालं..." या
विचाराने गोपाळ आवाजाच्या दिशेने गेला. त्याला एक छोटा ओढा दिसला. थंडगार पाणी
पिऊन थोडं पाणी त्याने तोडांवर मारून घेतलं. गोपाळ तिथून उठणार इतक्यात पाण्यात
काहीतरी चमकताना त्याला दिसलं. त्याने पाण्यात हात घालून ती चकाकणारी वस्तू बाहेर
काढली. तो एक सुंदर हिरा होता. हिरा पाहून गोपाळचे डोळे दिपले. पुढच्या गावी हा
हिरा विकावा असा विचार करून गोपाळने हिरा कमरेला खोचून ठेवला...
गोपाळ पुन्हा झाडाखाली येऊन बसला. डोकं बुंध्याला
टेकून डोळे मिटून विचार करू लागला, "काय ही माझी अवस्था... एकेकाळी दिवसातून तीन-तीन वेळा जेवणारा मी आज पानं,
काटक्या खाऊन, पाणी पिऊन दिवस काढतो आहे. अर्धपोटी
असा किती काळ मी तग धरू शकणार... काहीतरी छान पोटभर खायला मिळावं असं
वाटतंय..." गोपाळ अशा विचारात मग्न असतानाच खमंग अशा वासाने त्याची
विचारमालिका भंग झाली. गोपाळने डोळे उघडले, तर जिलेबी,
गुलाबजाम, पुऱ्या, भाजी,
भात, वरण, अशा
पदार्थांनी भरलेली ताटं त्याच्या पुढ्यात होती. ते पदार्थ पाहून गोपाळचे डोळे
विसफारले. त्याने आजू-बाजूला पाहिलं. जवळ कोणीच नव्हतं. त्याने जिलेबीला हात
लावला. ती खरी आहे हे समजताच वर पाहून त्याने हात जोडले आणि एकेक पदार्थाचा आस्वाद
घेऊ लागला. आज बऱ्याच दिवसांनी गोपाळ पोटभर जेवला होता. पुन्हा देवाचे आभार मानून
बोचक्याची उशी करून गोपाळ झोपी गेला. रात्र जशी वाढू लागली तसा थंडीमुळे गोपाळ
कुडकुडू लागला. काही केल्या त्याला झोप येईना. गोपाळ पुन्हा विचारात बुडाला,
"माझीच कुकर्म अशी मला छळत आहेत... कुठे माझा तो आलिशान बंगला
आणि कुठे ही मळकट पथराळ जमीन...
मी गरीबांना लुबाडून श्रीमंती मिळवली आणि
त्यांच्याच तळतळाटांनी आज माझी ही अवस्था झाली. माझा बंगला,
नोकर-चाकर, धन-संपत्ती मला परत मिळावी... तसं
झालंच तर यावेळी मी त्याचा नक्कीच सदुपयोग करेन..." विचारात मग्न असलेल्या
गोपाळला अखेर झोप लागली. सूर्यप्रकाश डोळ्यांवर पडताच गोपाळची झोप चाळवली. त्याने
डोळे किलकिले करून पाहिलं तर दोन जणं साफ-सफाई करत होते, एकजण
पाण्याचा पेला घेऊन उभा होता आणि दोघं गोपाळच्या डोक्याजवळ उभे होते. गोपाळने
आजू-बाजूला हात लावला तर मऊशार गादीचा स्पर्श त्याला जाणवला. गोपाळ ताडकन उठून
बसला. त्याने पाहिलं तर तो त्याच्याच बंगल्यात होता. त्याच्याच बिछान्यावर. गोपाळशेट
उठले म्हणून सर्व नोकरांची लगबग चालू होती. या सगळ्याने गोपाळमात्र पार गोंधळून
गेला होता. तो विचार करू लागला, “रात्री तर मी फाटक्या कपड्यात आणि उठलो तर ही
ऊंची वस्त्र, हा बंगला... चमत्कारच की...” इतक्यात एक नोकर जवळ येत म्हणाला, “शेट,
आपल्याला भेटायला काही गावकरी खाली आलेत...”
गोपाळ आवरा-आवर करून खाली दिवाणखान्यात आला. तिथे
काही माणसं बसली होती. गोपाळला पाहताच सर्व हात जोडून उभे राहिले. कोणी जमीन गहाण
ठेवायला आलं होतं तर कोणी आपलं सामान विकायला आलं होतं. गोपाळला आपण पूर्वी कसे वागत
होतो याची आठवण झाली. तो सर्व माणसांना सामोरा जात म्हणाला, “मंडळी, यापूर्वी मी
तुम्हा गावकऱ्यांशी खूप वाईट वागलो. पण आता तसं होणार नाही. माझ्याकडे पुष्कळ धन
आहे. तुमची ही मिळकत मला नको. तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे घेऊन जा. जेव्हा
तुमच्याकडे येतील तेव्हा परत द्या. मला व्याजही नको...” गोपाळचे हे शब्द ऐकून
गावकऱ्यांनी एकाच जल्लोष केला. एक गावकरी पुढे होत म्हणाला, “शेट, आम्मासनी वाटलं
व्हतं तुम्मी परतला म्हंजी आता पुन्यांदा आम्मासनी तरास द्येनार पर तुम्मी हे
बोललात आम्मासनी लई बरं वाटलं बगा...” गोपाळचे आभार मानून सर्व निघून गेले. थोड्या
वेळात अंघोळ करून, न्याहारी उरकून गोपाळ गावात फेरफटका मारायला गेला. जंगलात
मिळालेला हिरा जवळ ठेवायला तो विसरला नाही...
एका झाडाखाली एक माणूस डोक्याला हात लावून बसला
होता. गोपाळने त्याच्या जवळ जात असं बसण्याचं कारण विचारलं, तर तो म्हणाला, “आता
काय सांगू तुम्मासनी शेट... म्या श्येताकडं ग्येलतो आन मागनं चोरट्यांनी घर फोडलं
की माजं. पोरीच्या लग्नासाठी म्हनून दागिने पुरून ठेवले होते त्ये समदे न्येले की...
आता काय करू म्या...” गोपाळने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, “काका, रडणं
बंद करा बघू आधी... हे बघा, तुमचे दागिने तुम्हाला नक्की परत मिळतील. ते चोरच ते
परत आणतील बघा. आणि तुमच्या मुलीसाठी चांगलं स्थळसुद्धा तुमच्या दाराशीच चालत
येईल...” गोपाळ हे बोलून पुढे निघालाच होता की मागून आवाज आला. गोपाळने वळून
पाहिलं, तर दोन माणसं त्या झाडाखाली बसलेल्या माणसाचे पाय धरत होती. त्यातला एक
म्हणाला, “आम्हाला माफी करा. तुम्मी हितं दागिने पुरलेत ह्ये आम्मी पायलं आन त्ये
चोरले. आम्मी म्होट्टी चूक क्येली. दागिन्यांचा ह्यो डबा परत घ्या आन आम्माला माफी
करा. पुन्यांदा आम्मी आसं न्हाय करनार...”
बाजूलाच एक फेटा घातलेला माणूस, एक नववारी साडी
नेसलेली बाई आणि एक देखणा तरुण उभे होते. तो फेटेधारी त्या माणसाला म्हणाला,
“आम्ही पल्याड गावचे सरपंच बरं का... आन ह्ये आमचं कुटुंब. तुमची मुलगी लग्नाची
हाय ह्ये समजलं म्हनून मुलासनी घेऊनच आलो बगा. जर मुलगी पसंत पडली तर बोलनी करूनच
परत जाऊ. आनी, आम्मासनी फकस्त सून हवी. बाकी काय बी नको...” त्या माणसाचे डोळे
पाणावले. त्याने जाऊन गोपाळच्या पायावर लोटांगण घातलं. म्हणाला, “गोपाळशेट, तुम्मी
आलात आन माजे हरिवलेले दागिने माला मिळाले, माज्या पोरीचं लगीन ठरलं. तुम्मी द्येव
हायसा गोपाळशेट द्येव हायसा...” त्या माणसाला गोपाळने उठवलं. पाठीवर थाप मारत
म्हणाला, “आता कसलीही काळजी करू नका. तुमची मुलगी म्हणजे माझी बहीणच आहे की. लग्न
ठरलं तर सगळा खर्च मी करेन. नमस्कार...” हे म्हणून गोपाळ पुढे चालू लागला.
त्याच्या चेहऱ्यावरमात्र मोठ्ठ प्रश्नचिन्ह दिसत होतं...
गोपाळ पुढे गेला. एका झोपडीबाहेर एक म्हातारी रडत
बसली होती. गोपाळने तिला रडण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली, “शेट, माज्या नातवाला
साप डसला हो. आपल्या गावामंदी वैदू बी न्हाय. माजा मुलगा शेजारच्या गावाकडं ग्येला
हाय वैदू आनाया. पर त्यो बी आजून आला न्हाय. माला तर लई कालजी लागी हाय बगा...”
म्हातारीला धीर देत गोपाळ म्हणाला, “मावशी, काही काळजी करू नका. तुमचा नातू नक्की
बरा होईल. मी तर म्हणतो तो आत्ता आजी आजी करत बाहेर येईल...” गोपाळनं हे
म्हणण्याचा अवकाश, की, “आजी आजी...” अशा हाका ऐकू आल्या आणि पाठोपाठ एक मुलगा धावत
येऊन त्या म्हातारीला बिलगला. आपले डोळे पुसत गोपाळकडे पाहत म्हातारी म्हणाली, “हे
तुम्मी क्येलं शेट... माला वाटलं तुम्मी आम्माला काय बी बोलाल, पर... तुमचे लई
उपकार जाले बगा...”
गोपाळ जे बोलतो ते सगळं खरं होतं ही बातमी
वाऱ्यासारखी गावात पसरली. शिवाय गोपाळ आता पूर्वीसारखा राहिला नाही, तो पुरता
बदललाय हेही सर्वांना समजलं. आता गोपाळला चांगल्या अर्थाने गावात मान मिळू लागला.
लोक त्याला घरी बोलवू लागले. गोपाळलाही आपण चांगलं काम करतोय, लोकांच्या चेहऱ्यावर
हास्य फुलवतोय हे पाहून समाधान वाटत होतं. पण त्याला सारखा एक प्रश्न भेडसावत
होता, “या आधी तर असं कधीच झालं नाही. त्या जंगलातून परतल्यापासून हे सगळं सुरू
झालं. असं काय घडलं असेल त्या जंगलात की मला ही शक्ती मिळाली... मी जी इच्छा
व्यक्त करतो ती खरी होते याचं गुपीत मला समजावं...” “गोपाळ, तुला कुठलीही शक्ती
मिळालेली नाही. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो आहे...” गोपाळ विचारच करत होता, की
त्याला हा आवाज आला. त्याने पाहिलं तर त्याच्या खिशातून प्रकाश येत होता. गोपाळने
खिशात हात घातला त्याच्या हाताला तो हिरा लागला. गोपाळने हिरा बाहेर काढला आणि तो
हवेत तरंगू लागला. गोपाळ म्हणाला, “तू जादूचा हिरा आहेस का... हे सगळं तूच केलं
आहेस का...” आणि तो हिरा बोलू लागला...
“हो गोपाळ. हे सगळं मीच केलं. माझी जादू मला धारण
करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेवर चालते. तू मला धारण केलंस. तुझ्या इच्छा बोलत गेलास
आणि मी त्या पूर्ण करत गेलो...” हे ऐकून गोपाळला आनंद झाला. तो म्हणाला, “हो ना...
मग माझ्या आईलाही परत आणून दे ना...” तसा तो हिरा म्हणाला, “गोपाळ, अरे तुझं
गेलेलं वैभव, तुझा मान-सन्मान मी तुला परत मिळवून दिला खरा, पण विधीलिखित कधीच
बदलता येत नाही. ज्या व्यक्तीचं आयुष्य जितकं लिहिलं असतं, त्याला ते तितकंच
मिळतं. विधात्यापुढे जादूही काहीच करू शकत नाही. हिऱ्याचं म्हणणं ऐकून गोपाळ थोडा
खजील झाला खरा, पण निसर्गनियमापुढे आपण काहीच करू शकत नाही हे लक्षात आल्यावर
त्याने तो विषय बदलत विचारलं, “पण मग तू त्या ओढ्यात कसा काय पडलास... कुठून आलास
तू...”
हिरा म्हणाला, “मी नीलमपरीच्या जादुई छडीवर
विराजमान होतो. एकदा एका उद्यानात फिरत असताना मायासूर नावाच्या राक्षसाने तिला
पाहिलं आणि आपल्या काळ्या शक्तीच्या जोरावर तिला एका पक्षाचं रूप देऊन एका सोन्याच्या
पिंजऱ्यात कैद केलं. नीलमपरी पक्षाच्या रूपात परिवर्तीत होताच तिच्या हातून तिची
छडी खाली पडली आणि जमिनीवर आदळल्याने मी छडीपासून वेगळा होऊन त्या ओढ्यात पडलो. त्यावेळी
सगळं इतकं वेगाने घडलं की नीलमपरी काहीच करू शकली नाही. माझ्या समोर तो पिंजरा
गायब झाला आणि नुसतं पाहण्याखेरीज मलाही काहीच करता आलं नाही. मला नीलमपरीला
वाचवण्याची खूप इच्छा आहे. पण शेवटी मी एक दगड आहे. मला ना हात, ना पाय. आणि त्या
मायासुराची काळी शक्तीही माझ्याहून प्रबळ आहे...”
तो हिरा गप्प झाला आणि गोपाळच्या हातात विसावला.
गोपाळ म्हणाला, “आजपासून तू नुसता दगड नाहीस, तर माझा मित्र आहेस... तू माझ्या
सर्व इच्छा पूर्ण केल्यास. आता तुझी ही इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य समजतो मी.
त्या मायासुराच्या तावडीतून नीलमपरीला सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मला त्या
मायासुराच्या राज्यात घेऊन चल...” हिरा पुन्हा तेजवान होऊन तरंगू लागला. तो
म्हणाला, “गोपाळ, तू खूप चांगला माणूस आहेस. पण तो मायासूर, एक महाशक्तीशाली आणि
कपटी राक्षस आहे. त्याच्याशी लढायला मी तुला काही आयुधं देतो. हिऱ्यामधून एक
प्रकाश किरण बाहेर पडली आणि समोर एक तलवार प्रकट झाली. हिरा म्हणाला, “ही तलवार
जोवर तुझ्या हातात राहील तोवर तुला कोणीही हरवू शकणार नाही...” पुन्हा हिऱ्यातून
एक प्रकाश किरण बाहेर पडली आणि गोपाळच्या अंगावर चिलखत आणि हातात एक दोरखंड आला.
हिरा म्हणाला, “हे चिलखत जोवर तुझ्या शरीरावर असेल तोवर तुला कोणतीच जखम नाही
होणार आणि हा दोरखंड भिरकावल्यावर टोकाचा स्पर्श होताच एक घट्ट गाठ आपोआप बांधली
जाईल. तू दोरखंड सोडताच गाठ आपोआप सुटून दोरखंड तुझ्या हातात येईल. आता मी तुला
मायानगरात घेऊन चालतो. तिथे पोहोचल्यावर माझं तेज लुप्त होईल...”
गोपाळ अचानक गायब झाला आणि एका मोठ्या पर्वताजवळ
पोहोचला. त्याच्यासमोर हवेत तरंगत असलेल्या हिऱ्याचं तेज गायब झालं आणि तो खाली
पडू लागला. गोपाळने त्याला झेललं. त्याने पाहिलं तर एक काळा दगड त्याच्या हातात
होता. गोपाळ स्वत:शीच म्हणाला, “म्हणजे मी मायानागरात पोहोचलो तर... आता त्या
मायासुराचा समाचार घेतो...” गोपाळ हे बोलतच होता की पर्वताला मोठी फट पडली. आतून
एक लांबसडक सरकता दगडी रस्ता बाहेर आला आणि लांबवर जाऊन थांबला. काही क्षण गेले
असतील. एक अस्वल गोपाळच्या वासावर तिथे येऊन पोहोचलं. तो लाल डोळ्यांचा, सात-आठ
फूट ऊंच हिंस्त्र प्राणी गोपाळने पाहिला आणि त्याने तलवार बाहेर काढली. ते अस्वल
गोपाळवर धाऊन आलं. त्या सरकत्या रस्त्यावर अस्वलाचा पाय पडताच तो रस्ता हलला आणि
स्वत:ची गुंडाळी करत क्षणार्धात अस्वलासकट पुन्हा पर्वतात गेला. ती फट बंद झाली
आणि सगळं शांत झालं...
हे सगळं पाहून गोपाळला अचंभा वाटला. “काय असेल
त्या पर्वताच्या फटीत, इतकं मोठं ते अस्वल आणि असं अचानक गायब झालं... कुठे जातो
तो सरकता दगडी रस्ता... त्या मायासुरापर्यंत तर जात नसेल...” हा विचार करत गोपाळ
तिथेच उभा होता, की पुन्हा पर्वतात फट दिसू लागली आणि तोच सरकत दगडी रस्ता बाहेर
येऊन लांबवर गेला. गोपाळ विचार करू लागला, “जर मी या रस्त्यावर उभा राहिलो तर
कदाचित आत जाता येईल मला...” गोपाळने मनाशी पक्क केलं आणि त्या रस्त्यावर तो पाय
ठेवणार इतक्यात रस्ता हलला. गोपाळने मागे पाहिलं तर तो रस्ता स्वत:ला गुंडाळत होता.
त्याच्या मार्गात एक हत्ती आला होता. आता मात्र गोपाळला घाई करण्याखेरीज गत्यंतर
नव्हतं. त्या दगडी रस्त्याच्या विळख्यात जर गोपाळ अडकला असता तर त्याच्या हाडांचा
चेंदा-मेंदा झाला असता. गोपाळ त्या सरकत्या रस्त्यावरून पर्वतातल्या फटीकडे धावत
सुटला. फटीजवळ पोहोचताच त्याला एक गुहा दिसली. गोपाळ तसाच धावत राहिला...
गुहेतच एक खोल दरी होती. तो सरकता रस्ता हत्तीला
घेऊन मागून येतच होता. गोपाळला अचानक वरच्या बाजूला एक दगड दिसला. गोपाळने लगेच उडी
घेतली आणि त्या दगडाला जाऊन लटकला. तो सरकता रस्ता फटीतून आत आला. फट बंद झाली.
अचानक पाण्याचं कारंजं यावं तसं चहू बाजूंनी पाण्याच्या लाटा आल्या आणि तो हत्ती त्या दरीत फेकला गेला. गुहेच्या
वरच्या बाजूला दगडाला लटकलेला गोपाळ हे सर्व पाहत होता. गुहेतून त्या हत्तीचे
चित्कार येणं बंद झालं. सगळीकडे भयाण शांतता पसरली. गोपाळने खाली उडी मारली.
त्याने सर्वत्र नजर फिरवली. प्रचंड मोठ्या त्या गुहेच्या वरच्या बाजूला आणि
खालच्या बाजूला ठराविक अंतरावर गोपाळला सुळके दिसले. गोपाळ विचारात पडला, “इतक्या
जोरात येणारं ते पाणी, ही खोल दरी, हे सुळके... काय प्रकार असावा हा... आणि आता आपण
कुठे जायचं...” विचार करता करता गोपाळच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला...
"तो सरकता रस्ता, ते पांढरे दगड, ही दरी... म्हणजे... मी या राक्षसाच्या तोंडात आहे तर..." हा विचार
गोपाळच्या मनात आला आणि भितीने त्याचा थरकाप उडाला. काय करावं हे त्याला सुचत
नव्हतं. इतक्यात, "मला कोणीतरी वाचवा हो..." असा
आवाज गोपाळला ऐकू आली. गोपाळने कान देऊन ऐकलं तर गुहेच्या वरच्या बाजूने ती हाक
ऐकू आली होती. गोपाळचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं, "आवाज
तर गुहेच्या वरच्या बाजूने येत आहे. पण मी तर या राक्षसाच्या तोंडात आहे... मग वर
कसा जाणार..." गोपाळला एक युक्ती सुचली. गोपाळने पुन्हा उडी मारून तो दरीच्या
वर असलेला दगड गाठला. त्याने दोरखंडाला वरच्या बाजूला भिरकावलं. दोरखंड एका ठिकाणी
जाऊन अडकला...
गोपाळ त्याच्या सहाय्याने वर जाऊ लागला. मायासुराला
आपण इथे आहोत हे कळलं तर नसेल ना, याचा तो
अधून-मधून कानोसा घेत होता. पण मायासुराच्या बलाढ्य शरीरापुढे गोपाळ म्हणजे अगदीच
मुंगी होता. त्यामुळे त्याला हायसं वाटत होतं. गोपाळ वर पोहोचला. तिथे त्याला दोन
मोठाल्या गुहा दिसल्या. त्यातून वारा सारखा आत-बाहेर करत होता. त्या मायासुराच्या
नाकपुड्या होत्या हे समजायला गोपाळला वेळ लागला नाही. यातून बाहेर जाण्याचा मार्ग
नक्कीच असेल, हा विचार करत गोपाळ पुढे गेला. येत्या-जात्या
वाऱ्याचा जोर इतका होता की गोपाळ सारखा मागे फेकला जात होता. तो जरा वेळ थांबला.
येणाऱ्या व जाणाऱ्या वाऱ्यामध्ये काही क्षणांचा अवधी होता. गोपाळच्या हे लक्षात
येताच त्याने त्या क्षणांची वाट पाहिली आणि संधी साधून तो पर्वताच्या बाहेरपर्यंत
पोहोचला. गोपाळ बाहेर जाणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं, “अरेच्चा... जर आपण
बाहेर पडलो तर कदाचित वर असलेल्या मायासुराच्या डोळ्यांनी मला पाहिलं तर...”
हा विचार मनात आला आणि गोपाळ थांबला. तो पुन्हा
मागे फिरला आणि हवेच्या झोतापासून स्वत:ला वाचवत पुन्हा दरीपर्यंत पोहोचला. गोपाळने
पुन्हा दोर वरच्या बाजूला भिरकावला. वर वर जात दोर एका ठिकाणी अडकला. दोराच्या
सहाय्याने गोपाळ अजून वर गेला. सर्वत्र अंधारच अंधार होता. त्याला एका बाजूने वारा
आल्यासारखं जाणवलं. गोपाळ वाऱ्याच्या दिशेने जात राहिला आणि काही क्षणातच तो
गुहेच्या बाहेर पडला. त्याने खाली डोकावून पाहिलं तर जमीन खूपच खाली दिसत होती.
गोपाळ विचार करू लागला, “खाली मी ज्या गुहेतून बाहेर पडलो ते जर मायासुराचं नाक
होतं, तर हा कदाचित त्याचा कान असावा. म्हणजे आता मायासूर आपल्याला पाहू शकणार
नाही...” गोपाळला जरा हायसं वाटलं आणि आता पुढे काय याचा विचार तो करत असतानाच,
“वाचवा... मला वाचवा...” अशी हाक त्याला ऐकू आली...
गोपाळने कानोसा घेतला. आवाज वरच्या बाजूने येत
होता. गोपाळ पुन्हा विचारात पडला, "हा जर
मायासुराचा कान आहे, तर कानाच्या वर केस आणि मस्तक असतं. आणि
येणारा आवाजही तिथूनच येत आहे. म्हणजे, आता मला या राक्षसाच्या
डोक्यावर जावं लागणार तर... हाकेला ओ द्यावी का... पण नको. मायासुराला ऐकू गेलं
तर..." गोपाळने पुन्हा एकदा प्रयत्नपूर्वक ती हाक ऐकली. विचार पक्का करत
त्याने दोर वर भिरकावला. दोर वर जाऊन एका झाडाला अडकला. गोपाळ दोराच्या सहाय्याने
वर जाऊ लागला. त्याच्या लक्षात आलं, की तो एका जंगलातून वर
चालला आहे. हे जंगल म्हणजे कानापासून सुरू झालेले मायासुराचे केस होते हे समजायला
गोपाळला वेळ लागला नाही. हळू हळू जंगल अजून दाट होत गेलं. गोपाळ दोराच्या
टोकापर्यंत पोहोचला. झाडाला धरत तो खाली उतरला. काही वेळातच, "वाचवा... मला वाचवा..." ही हाक पुन्हा त्याच्या कानी पडली. हाकेचा कानोसा
घेत दबक्या पावलांनी गोपाळ पुढे जात राहिला. वाटेत येणाऱ्या साप आणि विंचवांना
चंद्राच्या मंद प्रकाशातही तो शिताफीने चुकवत पुढे जात राहिला...
बरंच अंतर पार केल्यावर अखेर गोपाळ जंगलाच्या
मधोमध पोहोचला. तिथे एका पिंजऱ्यात एक पक्षी बसला होता. गोपाळ पिंजऱ्याच्या जवळ
जात कुजबुजला, "तूच, हाक
दिलीस का..." त्या पक्षाने गोपाळला पाहिलं आणि जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला,
"हो. मीच हाक मारत होते. मी नीलमपरी. हा मायासूर त्याच्या
प्रबळ विद्येच्या जोरावर मला इथे घेऊन आला. मला खात्री होती, की कधी ना कधी कोणीतरी मला वाचवायला येईल. म्हणून मी हाक देत राहिले. आणि
आज तू आलास..." गोपाळ पुन्हा कुजबुजत म्हणाला, "परीताई,
मी गोपाळ. तुझ्या छडीत असलेल्या हिऱ्याने मला सगळं सांगितलं आहे.
मला सांग बरं, मी तुला यातून कसा सोडवू..."
नीलमपरी बोलू लागली, "गोपाळ, हा मायासूर खूप शक्तिवान आहे. त्याची विद्या
माझ्याहूनही प्रबळ आहे. मायेच्या बळावर तू त्याला नाही हरवू शकणार, पण त्याची माया
नष्ट होताच एका सामान्य राक्षसात त्याचं रूपांतर होईल. मगच त्याच्याशी लढून तुला
विजय मिळवता येईल. या मायासुराच्या माथ्यावर एक काचेचा मणी आहे. त्यातूनच चंद्र व
सूर्याच्या सहाय्याने या मायासुराला शक्ती मिळते. तो मणी तुटताच मायासुराची जादू
संपेल आणि त्याचा वध केल्यावर मलाही या पिंजऱ्यातून मुक्ती मिळून माझं रूप मला परत
मिळेल. पण गोपाळ, एकाच वारात तो मणी तुटायला हवा. नाहीतर जागच्या जागी तुझी राख होईल.
आणि हो, मणी तुटताच तू खाली जा. या चिलखतामुळे तुला इजा होणार नाही. जा गोपाळ,
माझे आशीर्वाद आहेत तुझ्या सोबत..."
पक्षी गप्प झाला. गोपाळने पिंजऱ्याला हात लावला व
म्हणाला,
"काळजी करू नकोस परीताई. मी सोडवेन तुला यातून. मला फक्त
त्याच्या माथ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखव..." पक्षाने दाखवलेल्या
मार्गावरून जात गोपाळ जंगलाच्या बाहेर पडला. त्याने खाली पाहिलं तर खोल दरी त्याला
दिसली आणि तो उभा होता त्या जागेपासून खाली काही अंतरावर काहीतरी चमकत असल्याचं
त्याला जाणवलं. गोपाळची विचार मालिका पुन्हा सुरू झाली, "मी जंगलाच्या बाहेर पडलोय म्हणजे आत्ता मी या मायासुराच्या माथ्यावर आहे
तर... आणि ती चमकदार वस्तू म्हणजे तो मणी असावा. मला एकाच घावात तो मणी फोडायला
हवा. कदाचित मायासूर दुसरा वार करण्याची संधीच देणार नाही..."
गोपाळने मनाशी काही ठरवलं आणि जंगलाच्या तोंडावर
असलेल्या एका झाडावर दोर भिरकावला. दोराने झाडाच्या फांदीला घट्ट गाठ मारली. आता
गोपाळ सज्ज झाला होता. त्याच्याकडे असलेल्या रुमालाचे त्याने दोन भाग करून दोन्ही
हातांना गुंडाळले. दोराला पकडून घसरतच तो खाली येऊ लागला. मण्याजवळ पोहोचताच
गोपाळने जोरदार लाथ मारली. लाथ बरोब्बर मण्यावर बसली. काचेला तडा गेला आणि
क्षणार्धात काच फुटली. खाली येत गोपाळने दोर सोडून दिला आणि जमिनीवर कोलांटी उडी
मारत उभा राहिला. काही क्षणातच तो महाकाय पर्वत हलू लागला. मोठ्या स्फोटानिशी
पर्वताच्या ठिकऱ्या उडाल्या. धुळीच्या वाळवंटात गोपाळला,
"हा...हा...हा..." असा जोर जोरात हसण्याचा आवाज आला...
वाळवंट नाहीसं झालं आणि गोपाळसमोर उभा होता जवळपास
दोन पुरुष ऊंचीचा एक अजस्त्र राक्षस. लालभडक मोठाले डोळे, काळीकुट्ट केसाळ काया,
सुळक्यांसारखे बाहेर आलेले मोठाले दात, अशा आविर्भावातला तो राक्षस मायासूरच होता.
त्याच्या हातात तो पिंजरा होता आणि पिंजऱ्यात होती पक्षाच्या रूपातली नीलमपरी.
मायासुराने पिंजरा खाली ठेवला. बाजूलाच पडलेला एक खडक उचलून त्याने गोपाळवर
भिरकावला. तो प्रचंड दगड गोपाळवर आदळणार इतक्यात गोपाळ बाजूला झाला. दगड जमिनीवर
आपटून त्याचा चक्काचूर झाला. मायासुराने पुन्हा बाजूला पडलेले दगड उचलले आणि
गोपाळकडे भिरकावले. गोपाळने चपळाई करत दोन्ही दगडांपासून स्वत:चा बचाव केला. हे
पाहून मायासूर चवताळला. त्याने हात समोर धरला आणि क्षणार्धात त्याच्या हातात
भलीमोठी तलवार प्रकट झाली. “हा...हा...हा...” असं किळसवाणं हसत मायासूर गोपाळवर
धाऊन आला...
तलवारींच्या पाती एकमेकींवर आदळल्या. घर्षणामुळे
ठिणग्या निर्माण होऊ लागल्या. मायासूर जरी धिप्पाड असला तरी गोपाळ त्याला बरोब्बर
पुरून उरत होता. लढता लढता गोपाळला एक खडक मायासुराच्या पायाशी दिसला. वाऱ्याच्या
वेगासरशी गोपाळ धावला आणि खडकावर पाय देऊन त्याने हवेत उडी घेतली. तलवारीच्या एका
वारानिशी त्याने मायासुराचं शीर धडावेगळं केलं. शीर जमिनीवर आपटताच प्रचंड स्फोट
झाला पण मायासुराचं धड अजून तसंच उभं होतं आणि वार करत राहिलं. पिंजऱ्यात असलेल्या
नीलमपरीने ओरडून सांगितलं, “गोपाळ, मायासुराच्या हृदयात अमृतकुंभ आहे. त्याचं हृदय
नष्ट कर, तरच मायासुराचा अंत होईल. नाहीतर काही क्षणातच त्याला त्याचं शीर परत
मिळेल...” गोपाळला समजलं. त्याने पाय अडकवून मायासुराच्या धडाला खाली पाडलं.
त्याच्या छातीवर बसून तलवार त्याच्या हृदयात खुपसली आणि पूर्ण ताकदीनिशी बाहेर
काढली. त्यासरशी मायासुराचं हृदय हवेत उडालं आणि जमिनीवर पडून स्फोट होऊन नष्ट
झालं...
मायासुराचा अंत झाला होता. त्याचं शरीर हळू हळू
वितळत जाऊन नाहीसं झालं. पिंजऱ्याचीही वाफ झाली आणि एक सुंदर परी त्या ठिकाणी दिसू
लागली. गोपाळच्या अंगरख्यातला खिसाही चमकू लागला आणि तो हिरा तेजोमय होऊन बाहेर
येऊन हवेत तरंगू लागला. नीलमपरीने हात पुढे केल्याबरोब्बर तो हिरा अलगद तिच्या
हातात विसावला. हिरा आणि नीलमपरीचा एकमेकांशी स्पर्श होताच नीलमपरी भोवती एक
सोन्याचं वलय तयार झालं. नीलमपरी म्हणाली, “गोपाळ, तू आधी कोण होतास, कसा वागलास
आणि आत्ता कसा वागतो आहेस याची मला पूर्ण जाणीव आहे. तू केलेल्या साहसामुळे मी परत
आले आणि तुझ्या गावातही तुझ्या चांगुलपणामुळे अनेकजण सुखी झाले. म्हणूनच मी हा
हिरा तुला भेट देणार आहे. या हिऱ्याचा तू नक्की सदुपयोग करून अजून मोठा होशील...”
हे बोलून नीलमपरीने हात मोकळा केला. हिरा पुन्हा हवेत तरंगत जाऊन गोपाळच्या हातात
विसावला. नीलमपरी अंतर्धान पावली. हात जोडत गोपाळ म्हणाला, “परीताई, मी या माझ्या
मित्राचा योग्य मान राखेन...”
समाप्त.