Friday, May 28, 2021

मूक साक्षीदार - दुसरा व शेवटचा भाग...

पूर्वार्ध...

बागेत फिरायला गेलेल्या एका माणसाला जमिनीत पुरलेलं प्रेत सापडतं. पोलिस तपास सुरू होतो. संपूर्ण नग्नावस्थेतल्या आणि चेहेरा विद्रूप असलेल्या त्या प्रेताला डॉ. गोखलेंकडे पाठवलं जातं. डॉ. गोखले सांगतात की ते एका पुरुषाचं प्रेत असून त्याचा खून जवळ जवळ ३-४ महिन्यांपूर्वी झाला आहे. त्यावेळी प्रधानांना काहीतरी आठवतं. सगळे चौकीवर पोहोचतात आणि आठ महिन्यांपूर्वीची फडके बँक फ्रॉड केस आणि चार महिन्यांपूर्वीची प्रभाकर फडके यांच्या मृत्यूविषयीची केस समोर येतात...

केसबद्दल वाचत असताना ए. बी. सी. बँकेचे मॅनेजर मि. महेश देशमुख तिथे येतात. प्रभाकर फडकेंच्या मृत्यूविषयी त्यांना शंका असते आणि चार महिन्यांपूर्वी त्यांनीच याबद्दल तक्रार केलेली असते. महेश देशमुखांच्या बोलण्यातून प्रभाकर फडके आणि त्यांच्या कुटुंबाविषयी प्रधान आणि त्यांच्या टीमला समजतं. फडकेंच्या दोन्हीही केसेस आणि निनावी प्रेताची केस एकमेकांशी जुळलेल्या असाव्यात या तर्कावर प्रधान आणि त्यांची टीम ए. बी. सी. बँकेत पोहोचतात. तिथेच त्यांना प्रभाकर फडके यांच्या केयरटेकर नरेंद्रबद्दल समजतं...

बॅंकेतून हवे असलेले सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन प्रधान, उमा, आनंद आणि सचिन जेव्हा बाहेर पडतात तेव्हा प्रधानांना डॉ. गोखलेंचा फोन येतो. खुनाची केस सुरू असताना फडकेंच्या मृत्यूच्या केसमध्ये आपण अडकू नये असं सचिन आणि उमाला अजूनही वाटत असतं. पण प्रधान आणि आनंदचे विचार वेगळे असतात...



दुसरा व शेवटचा भाग...

लवकरच सर्वजण डॉ. गोखलेंच्या लॅबमध्ये पोहोचले. तिथे पोहोचताच प्रधान म्हणाले, "फडकेंची केस आणि या अज्ञात डेड बॉडीची केस जरी वेगवेगळ्या असल्या, तरी त्या घडल्या एकाच परिसरात आणि साधारण एकाच कालावधीत. आता सचिन आधी तारखेचं फुटेज सुरू कर..." फुटेज सुरू झालं. एक माणूस बँकेत आला. हातवारे करत काऊंटरवर काहीतरी बोलू लागला. प्रधानांनी फुटेज तिथेच पॉज करायला सांगून दुसऱ्या व्हिन्डोमध्ये १८ तारखेचं फुटेज सुरू करायला लावलं. १८ तारखेचं फुटेज सुरू झालं. काही वेळाने मि. फडके एका माणसासोबत आत आले. काऊंटरवर काहीतरी लिहून काऊंटरपलिकडच्या महिला कर्मचाऱ्यासोबत ते लॉकर रूमकडे वळले. मि. फडकेंसोबतचा माणूस तिथेच त्याचा मोबाईल पाहत बसला. त्याच क्षणी प्रधानांनी व्हिडियो पॉज करायला सांगितलं आणि विचारलं, "आता सांगा यात काय दिसतंय..." आनंद, उमा आणि सचिन बारकाईने ते पॉज झालेलं फुटेज पाहत होते. सचिन म्हणाला, "सर या माणसाचा अंगठा..."
 
सचिनकडे बोट दाखवत प्रधान म्हणाले, "राईट यू आर सचिन. याचा डावा अंगठा तुटलेला आहे. आता डॉक, तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचं होतं ते..." प्रधानांनी डॉ. गोखलेंना विचारल्यावर त्यांनी तिथेच असलेल्या दुसऱ्या कॉम्प्यूटरची बटणं दाबली आणि म्हणाले, "ग्राफिक्सच्या मदतीने मेलेल्या माणसाच्या कवटीवर मी चेहेरा तयार केला आहे. प्रेशर पॉईंट्स बरेच डॅमेज झाले होते पण तरीही मला थोडं यश आलं आहे. हॅव लूक..." सर्वांनी स्क्रीनकडे पाहिलं आणि उमा लगेच म्हणाली, "हा तर याच माणसाचा चेहेरा वाटतोय जो आणि १८ तारखेच्या फुटेजमध्ये होता. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मेलेल्या व्यक्तीच्या डाव्या हाताचा अंगठा अर्धा आहे. म्हणजे हा..." प्रधान लगेच म्हणाले, "बिंगो उमा. यावरून हे स्पष्ट होतंय की मेलेला माणूस मि. फडके यांचा केयरटेकर नरेंद्रच होता. बरं, या दोन्हीही व्हिडियोजमध्ये तुम्हाला अजून काही दिसतंय..."
 
सर्वांनी पॉज असलेले दोन्हीही व्हिडियोज नीट पाहिले आणि आनंद म्हणाला, "सर, पुन्हा अंगठा... १८ तारखेच्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या नरेंद्रचा अंगठा अर्धा आहे पण तारखेच्या फुटेजमधल्या नरेंद्रचा अंगठा पूर्ण आहे. म्हणजे... या दोन्हीही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत..." प्रधान स्मित करत म्हणाले, "परफेक्ट. १८ तारखेला आलेला माणूस खरा नरेंद्र होता, ज्याची सिद्धता या डेड बॉडीच्या अंगठ्याने केली. पण तारखेला आलेला माणूस तोतया होता. शिवाय ३१ तारखेला जेव्हा मि. फडके बँकेत आले तेव्हा हा नरेंद्र त्यांच्यासोबत नव्हता. आणि ३१ तारखेलाच मि. फडके यांचाही मृत्यू झाला. धिस कनक्लूड्स, बागेतल्या डेड बॉडीची केस आणि मि. फडकेंच्या मृत्यूची केस एकाच धाग्याचे दोन मणी आहेत. पण तो धागा कुठला... आपल्याला पुन्हा बँकेत जायला हवं. आपल्याला हवा असलेला तो धागा कदाचित बँकेच्या लॉकरमध्ये सापडेल... लेट्स गो..."
 
चौघंही लॅबच्या बाहेर आले. जीपकडे जात असताना प्रधानांनी आजूबाजूला पाहिलं. दुकानं बंद होती आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. घड्याळ पाहत प्रधान म्हणाले, "सकाळचे दहा वाजलेत. एरवी हा रस्ता गजबजलेला असतो, दुकानांसमोर गर्दी दिसते... आणि आज ही शांतता..." प्रधानांच्या बोलण्याने बाकी तिघांनीही सर्वत्र नजर फिरवली. स्मशान शांतता पाहून ते ही गोंधळले. कोण काही बोलेल इतक्यात एक गोळी येऊन सचिनच्या हातावर आदळली. सचिन जीपच्या मागे कोसळला आणि त्याच वेळी जीपच्या तीनही बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. आनंद, उमा आणि प्रधान सचिनजवळ गेले. त्याला हात लावत आनंदने विचारलं, "सचिन, आर यू ओके..." एक हात वर करत सचिन म्हणाला, "हो सर. गोळी फक्त चाटून गेली आहे हाताला. डोंट वरी..." बोलणं सुरू असताना प्रधान जीपच्या मागून सगळीकडे नजर फिरवत होते. खाली बसत प्रधान म्हणाले, "वन ऍट टेन, टू ऍट ट्वेल्व्ह एँड वन ऍट टू... अजूनही असू शकतील पण हे पाच जण आपल्या टप्प्यात आहेत. ब्रिंग देम डाऊन बट वन... आय रिपीट... ऍटलीस्ट वन वी हॅव टू कॅच अलाईव्ह... उमा, तू सचिनला कव्हर दे. कम ऑन आनंद..."
 
प्रधान जीपच्या बॉनेटच्या दिशेकडून गोळ्या झाडू लागले तर आनंद जीपच्या मागच्या चाकाकडून पिस्तूल चालवू लागला. सचिन उमाही ड्रायव्हिंग सीट आणि बॉनेटवरून समोरच्या बाजूने गोळ्या चालवू लागले. जीपच्या डाव्या बाजूला असलेल्या हल्लेखोराला प्रधानांनी उडवलं तर आनंदने जीपच्या उजव्या बाजूला असलेला हल्लेखोर टिपला. उमा सचिननेही समोरच्या झाडामागून गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना मारलं. त्याचवेळेस थोड्याशा अंतरावर एक व्हॅन मागे सरकताना दिसली. आनंद आणि प्रधानांनी व्हॅनवर गोळ्या चालवल्या. व्हॅनच्या काचा फुटल्या पण रेंजच्या बाहेर असल्याने प्रधान आनंद व्हॅनला रोखू शकले नाहीत. तेवढ्यात त्यांन कण्ह्याचा आवाज आला. त्यांनी पाहिलं तर एक मारेकरी घायाळ होऊन जमिनीवर पडला होता. तेवढ्यात डॉ. गोखले पिस्तूल घेऊन येताना दिसले. प्रधान म्हणाले, "आनंद आणि डॉक, तुम्ही याला आणि सचिनला हॉस्पिटलला घेऊन जा. मी आणि उमा बँकेत जातो..." आनंद व डॉ. गोखले, सचिन व हल्लेखोराला घेऊन गेले आणि त्याचवेळी प्रधानांनी डॉ. गोखलेंना फोन लावला. त्यांच्यात बोलणं झाल्यावर उमा आणि प्रधान बँकेकडे रवाना झाले...
 
प्रधान आणि उमा बँकेत पोहोचले. तडक मि. दिवेकरांच्या केबिनमध्ये शिरले. मि. दिवेकरांशी हस्तांदोलन केल्यावर ते म्हणाले, "सॉरी दिवेकर साहेब तुम्हाला पुन्हा त्रास देतोय, पण महिन्यांपूर्वी ३१ तारखेला मि. फडकेंनी जो लॉकर ऑपरेट केला होता तो पहायचा आहे आम्हाला. त्यासंदर्भात हे लेटरही आम्ही घेऊन आलो आहोत. कदाचित त्यातून काही नवे धागेदोरे हाती लागतील..." मि. दिवेकरांनी एकदा दोघांकडे पाहिलं आणि म्हणाले, "सर, तो लॉकर सुनयना मॅडमच्या नावे आहे. चाव्या आमच्या कस्टडीत आहेत हे खरं, पण त्या इथे नसताना तुम्हाला लॉकर उघडून देणं..." त्यांना तोडत उमा म्हणाले, "तुमचं म्हणणं बरोबर आहे मि. दिवेकर. तुम्ही एक करू शकता का... तुमच्याकडे असलेल्या सुनयना मॅडमच्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधा. मि. फडकेंच्या मृत्यूनंतर तुम्ही त्यांच्याशी बोलला असालच. तुम्ही आधी बोला, मग आम्ही बोलतो त्यांच्याशी..." मि. दिवेकरांना उमाचं म्हणणं पटलं आणि त्यांनी फोन लावला...
 
"हॅलो मॅडम, मी ए. बी. सी. बँकेचा मॅनेजर रंजन दिवेकर बोलतोय. मि. फडकेंच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पोलीस इथे आले आहेत. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. देऊ का त्यांना फोन... बरं..." मि. दिवेकरांनी प्रधानांकडे फोन दिला आणि प्रधान बोलू लागले, "हॅलो सुनयना मॅडम. मी सिनीयर इंस्पेक्टर प्रधान बोलतो आहे. तुम्ही वेळ देताय त्याबद्दल थँक यू... मॅडम, चार महिन्यांपूर्वी तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्याच संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे... मि. फडके ज्या दिवशी गेले, त्या दिवशी त्यांनी बँकेत जाऊन तुमच्या आणि त्यांच्या नावाने असलेला लॉकर ऑपरेट केला होता आणि त्यानंतर लगेचंच त्यांचा मृत्यू झाला होता. मॅडम तो लॉकर आम्हाला पहायचा आहे. कदाचित त्यात आम्हाला काही सापडू शकेल... ओके. मी मि. दिवेकरांना लगेच मेल पाठवायला सांगतो. थँक यू..." फोन ठेवत प्रधान म्हणाले, "मि. दिवेकर, सुनयना मॅडमचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना एक मेल पाठवा ज्यात आमचं लेटरही असेल. त्या मेलला रिप्लाय करत सुनयना मॅडम परवानगी देतील..."
 
मि. दिवेकरांनी प्रधानांकडून लेटर घेऊन स्कॅन केलं आणि लगेच मेल पाठवला. पाचव्या मिनिटाला समोरून मेल आला. त्यात लॉकर ऑपरेट करण्याबाबतची परवानगी होती. परवानगी मिळताच मि. दिवेकर, प्रधान, उमा आणि ती लेडी ऑफिसर सारिका, लॉकर रूमकडे गेले. प्रधान आणि उमाला बाहेर थांबायला सांगून मि. दिवेकर आणि सारिका आत गेले. काही क्षणातच सारिकाने प्रधान उमाला आत बोलावले. लॉकर उघडला गेला. प्रधानांनी टॉर्च लाऊन आत डोकावलं. आत काही कागदपत्र आणि एक मोबाईल होता. प्रधानांनी सर्वकाही आपल्या ताब्यात घेतलं आणि म्हणाले, "हा मोबाईल इथे... हा मोबाईल जर मि. फडकेंचा आहे तर तो इथे कसा !! आणि कोणाला समजलं कसं नाही..." उमा लगेच म्हणाली, "सर, फोन ऑफ करून आत ठेवला असू शकतो..." प्रधानांनी मान डोलावली आणि मि. दिवेकरांकडे पाहत म्हणाले, "मि. दिवेकर, हे सर्व आम्ही ताब्यात घेतो. केस संपली की पुन्हा तुम्हाला आणून देऊ. धन्यवाद..." हस्तांदोलन करून प्रधान आणि उमा बाहेर पडले तेव्हा प्रधानांचा फोन वाजला...
 
"बोल आनंद... ओके. आम्ही तिकडेच येत आहेत तोपर्यंत हे लीक होऊ देऊ नकोस..." फोन ठेवत त्यांनी जीप चालू केली आणि उमाला म्हणाले, "आपल्या हल्लेखोरांपैकी ज्याला आपण पकडलं तो आत्ताच ऑपरेशन थियेटरमध्ये मरण पावला. आता फक्त हा मोबाईल आहे ज्यातून काही इंफो मिळू शकेल. - महिने हा बंद होता. उमा, याला चार्जिंगला लाव..." फोन चार्जिंगला लावत उमा म्हणाली, "सर, हा एक साधा बटणांचा मोबाईल आहे. स्क्रीन मोठी आहे इतकंच. पण हा मोबाईल मिळाला मि. फडकेंच्या लॉकरमधून. यात नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार..." दोघांची बोलणी सुरू असतानाच जीपने हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश केला. आनंद आणि डॉ. गोखले दुसऱ्या मजल्यावर त्यांची वाटच पाहत होते. दोघांना लिफ्टमधून बाहेर पडताना पाहताच आनंद त्यांच्याकडे येत म्हणाला, "सर, डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, बट नो लक..." त्याचवेळी प्रधानांचा फोन वाजला. आलेल्या मेसेजकडे पाहून आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले, "अजून कोणाला समजलंय याबद्दल..." आनंदने नकारार्थी मान हलवताच प्रधान म्हणाले, "वेल, मि. फडकेंच्या लॉकरमधून काही कागद आणि एक मोबाईल मिळालाय. उमा, चेक कर त्यात काय आहे..."
 
उमाने मोबाईल सुरू केला. त्यात सगळे फोल्डर्स पाहत असताना ती म्हणाली, "सर, एक व्हिडियो दिसतोय..." उमाने व्हिडियो प्ले केला. त्यात नरेंद्र एका झाडाला पाठ लावून उभा असलेला दिसला. त्याच्या समोर दोन माणसं होती. त्यातल्या एकाने नरेंद्रचा गळा आवळला. काही क्षणात नरेंद्र कोसळला. त्याचवेळी एका माणसाने कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि दुसऱ्या माणसाला हलवून तिथे बोट दाखवलं. दुसऱ्या माणसानेही कॅमेऱ्याकडे पाहिलं. कॅमेरा हलला आणि मागे मागे जात बंद झाला. आनंद म्हणाला, "सर हा दुसरा माणूस तर..." होकारार्थी मान हलवत प्रधान म्हणाले, "राईट यू आर आनंद. ही इज वन. आपल्यावर हल्ला करवणाराही कदाचित हाच असेल..." मोबाईलकडे बोट दाखवत उमा म्हणाली, "सर, पुरावा तर आहे. पण याला पकडायचं कसं..." ते बोलतच होते की डॉक्टर समोर येत म्हणाले, "इंस्पेक्टर प्रधान, खाली न्यूज रिपोर्टर्स आलेत. त्यांना तुमच्याशी बोलायचंय. ते वर आले तर इथे गोंधळ होईल. प्लीज तुम्ही खाली येता का..." हे ऐकताच आनंद, उमा डॉक्टरांकडे पाहत प्रधान म्हणाले, "आय हॅव ऍन आडिया... डॉक्टर मला तुमची थोडी मदत लागेल..."
 
सर्वजण खाली आले. तिथे रिपोर्टर्सचा जमाव उभाच होता. प्रधानांना पाहून ते सर्व पुढे सरसावले आणि, "सर तुमच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल काय सांगाल...?", "आम्हाला कळलं त्या हल्ल्यात तुमचा ऑफिसर जख्मी झाला...", "तुम्ही हल्लेखोरांना पकडलंत का...?" अशा प्रश्नांचा भडिमार केला. प्रधानांनी हात उंचावत सांगितलं, "आमच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्वच निषेध करतो. आमच्या ऑफिसरला गोळी लागली हे खरं आहे. तो इथे ऍडमिट आहे. त्या हल्लेखोरांपैकी एकाला आम्ही ताब्यात घेतलंय पण तोसुद्धा जख्मी आहे. याबद्दल तुम्हाला डॉक्टर नीट सांगू शकतील..." माईक्स डॉक्टरकडे वळले तेव्हा ते म्हणाले, "हो, सब इंस्पेक्टर सचिन यांची प्रकृती चिंताजनक आहे पण तो हल्लेखोर मात्र वाचला आहे. इथेच दुसऱ्या मजल्यावर रुम नंबर २०८ मध्ये तो बेशुद्धावस्थेत आहे. सकाळपर्यंत त्याला शुद्ध यायला हवी..." रिपोर्टर्स निघून गेले आणि सर्वजण आत आले. आनंद आणि उमाच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे पाहून प्रधान म्हणाले, "आत्तापर्यंत घडलेल्या घटना पाहता हा खूनी उतावीळ आणि भित्र्या स्वभावाचा जाणवतो. आपण दिलेली ही माहितीच त्याला बाहेर आणेल. आता आजची रात्र महत्वाची..."
 
रात्रीचे दहा वाजत आले होते. रुम नंबर २०८च्या बाहेर आनंद, उमा आणि प्रधान बसले होते. इतक्यात एक डॉक्टर समोर आला आणि आत जाऊ लागला. प्रधानांनी त्याला हटकलं तेव्हा तो म्हणाला, "पेशंटचं सलाईन बदलायचं आहे. इथल्या डॉक्टरची ड्यूटी संपली म्हणून मी आलो..." प्रधानांनी त्या डॉक्टरला विचारलं, "डॉक्टर, तुम्ही आलाच आहात तर थोडावेळ इथे थांबू शकता का... म्हणजे आम्ही तिघं जरा आमच्या ऑफिसर सचिनला पाहून येतो..." डॉक्टरने होकारार्थी मान हलवल्यावर प्रधान, उमा आनंद लिफ्टकडे वळले. लिफ्टचं दार बंद होताच डॉक्टरने स्मित केलं आणि खोलीत प्रवेश केला. बेडजवळ येत डॉक्टर म्हणाला, "साला... दिलेलं काम तर केलंच नाही... आणि आता शुद्धीत आल्यावर मलाच अडकवणार आहेस का... आता जा ढगात..." असं म्हणून त्याने सलाईन बंद केलं आणि पेशंटचा गळा आवळू लागला. इतक्यात त्याच्या गालावर एक जबरदस्त हात पडला आणि डॉक्टर बाजूला ढकलला गेला. डॉक्टरने वळून पाहिलं तर चादर बाजूला झाली होती आणि हातात रिव्हॉल्वर घेऊन एक माणूस बेडवर बसला होता...
 
त्याच वेळी डॉ. गोखले, प्रधान, उमा, आनंद आणि हॉस्पिटलचे डॉक्टर दार ढकलून आत आले. प्रधान, उमा आनंदच्या हातात रिव्हॉल्वर्स होत्या. रिव्हॉल्वर समोर रोखत प्रधान म्हणाले, "सुमित, होल्ड इट. युअर गेम इस अप. वेल डन सचिन. आणि सुमित यू आर अंडर अरेस्ट..." आपलं पितळ उघडं पडलंय हे पाहताच सुमितने चेहेऱ्यावरच्या खोट्या दाढी-मिशा काढल्या आणि हात वर करत तो उभा राहिला. सचिनने लगेच सुमितच्या हातात बेड्या अडकवल्या आणि आनंद सचिन त्याला धरून उभे राहिले. मग डॉक्टरांकडे वळत त्यांच्याशी हस्तांदोलन करत प्रधान म्हणाले, "थँक यू डॉक्टर साहेब. तुमची खूप मदत झाली आम्हाला. थँक यू व्हेरी मच. आनंद, सचिन, घेऊन चला याला चौकीवर..." बेड्या अडकवलेल्या सुमितला घेऊन प्रधान, उमा, सचिन, आनंद आणि डॉ. गोखले चौकीकडे रवाना झाले...
 
चौकीच्या आतल्या खोलीत प्रधान, आनंद, उमा, सचिन आणि डॉ. गोखलेंच्या गराड्यात एका खुर्चीवर सुमितला बसवलं गेलं. कपाळावरचा घाम पुसत सुमितने बोलायला सुरुवात केली, "मी कबूल करतो. मीच त्या नरेंद्रचा खून केला... मी न्यूझीलंडला कधीच गेलो नाही. कॉलेजला असताना मला ड्रग्सचं व्यसन लागलं. हे व्यसन इतकं पराकोटीला गेलं की ड्रग्स मिळवण्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी होती. मला घरून जेवढे पैसे मिळायचे, तेवढ्यात माझी ही गरज भागणार नव्हती. माझा भाऊ, बहिण बाप यांच्यात कितीही मतभेद असले तरी पैशांच्या बाबतीत ते तिघंही चोख होते. पैशांच्या खटपटीत असतानाच मला सन्नी भेटला. मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये ड्रग्स पुरवणाऱ्या गँगच्या लीडर सन्नीशी माझी चांगली ओळख झाली. काही वेळा त्याने मला फुकटच ड्रग्स देऊ केली. पण माझी मागणी वाढत गेली. तेव्हा सन्नीने मला ड्रग्स पोहोचवायचं काम दिलं. ड्रग्ससाठी मी तयार झालो. पण मी कॉलेज नाही सोडलं. सन्नीने सांगितलं होतं, की काळा छुपा धंदा लपवण्यासाठी कायदेशीर आणि पांढरं काम उपयोगी पडतं...
 
एकीकडे माझं कॉलेज सुरू होतं तर दुसरीकडे ड्रग्सचा हा धंदा मला रास येऊ लागला. वेगवेगळ्या ड्रग्सच्या किमती मला कळू लागल्या. एक दिवस सन्नीने दिलेलं पॅकेट मी सहज उघडलं आणि माझ्या लक्षात आलं, की मी पोहोचवत असलेला माल जास्त आहे आणि मिळणारा मोबदला कमी आहे. मी सन्नीला याबद्दल विचारलं तर त्याने मला उडवून लावलं. "करायचं असेल तर कर, नाही तर जा..." असं त्याने सांगितल्यावर मला राग आला. आपच्यात झटापट झाली आणि सन्नीच्याच पिस्तुलाने मी त्याच्यावर गोळी झाडली. गोळीच्या आवाजाने तिथे आलेल्या सन्नीच्या माणसांनी जेव्हा सन्नीला जमिनीवर पडलेला पाहिला तेव्हा ते घाबरले. सन्नी देत होता त्याच्या दुप्पट पैसे देण्याचं कबूल करून मी त्या माणसांना माझ्या बाजूने वळवलं. सन्नीच्या बॉडीला पोत्यात भरून समुद्रात फेकून दिलं आणि सन्नीचा सारा धंदा मी काबीज केला. माझं कॉलेजही संपत आलं होतं. घरात बसून हा धंदा चालवणं मला शक्य नव्हतं. कारण माझा बाप आणि भाऊ हे कायदा पाळणाऱ्या काही मूर्ख लोकांपैकी होते. म्हणून न्यूझीलंडची फेक नोकरी, फेक घर, फेक अकाऊंट असा दिखावा करून मी बाहेर पडलो आणि पूर्णपणे या ड्रग्सच्या धंद्यात शिरलो...
 
माझा या धंद्यात आता चांगला जम बसला होता. दिवसागणिक लाखोंची उलाढाल आणि माझ्या स्वत:साठी हवे तेव्हा आणि हवे तितके ड्रग्स, मी खूप खुश होतो. पण तेवढ्यात, आठ महिन्यांपूर्वी एक घोळ झाला. म्हाताऱ्यासाठी ठेवलेली ती मालती चोर निघाली आणि तिच्याजागी नरेंद्रची नेमणूक झाली. हा नरेंद्र दुसरा तिसरा कोणी नसून स्वत: सन्नीच होता. कामावर लागल्याच्या महिन्या भरात त्याने मला शोधून काढत मला फोन करून सांगितलं की गोळी लागल्यावर तो मेला नव्हता तर बेशुद्ध होता. पाण्यात त्याला शुद्ध आली. कसाबसा पोत्यातून बाहेर पडताना काही मासेमाऱ्यांनी त्याला वाचवलं. मुंबईला परतल्यावर त्याला समजलं की त्याचा धंदा माझ्या ताब्यात आलाय. बदला घेण्यासाठी त्याने ब्लॅकमेलचं साधन निवडलं. "मागेन तेवढे पैसे देत जा नाहीतर पोलिसात जाईन..." अशी धमकीही त्याने मला दिली. सन्नीला हवे तेव्हा आणि हवे तितके पैसे मी देत गेलो. सन्नी खुश होता पण मला आता हे असहाय्य झालं होतं. धोका मी पत्करायचा आणि मेवा सन्नीने खायचा हे मला मान्य नव्हतं. सन्नीचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या हेतूने मी त्या पाच कोटी देऊ केले. वेळ आणि जागा त्यानेच ठरवली. त्या येड्याने मला सकाळी सकाळी त्या बागेत बोलावलं...
 
सकाळी बागेत फारसं कोणी नसतं आणि म्हाताराही बागेच्या अर्ध्या भागातच घुटमळत असतो हे मला माहित होतं. बागेतल्या एकदम कोपऱ्यातल्या एक झुडुपामागे मी आणि माझा माणूस जावेद, सन्नीची वाट पाहत होतो. सन्नी येताच जावेदने त्याचे हात धरले आणि मी त्याचा गळा आवळला. सन्नी कोसळला पण जावेदला समोरच्या झाडामागे लपलेला, हातात मोबाईल घेतलेला माझा म्हातारा दिसला. त्यालाही नेमकं त्याचवेळी तिथे कडमडायचं होतं. आम्हाला पाहून म्हातारा पळाला. मी जावेदला त्याच्यामागे पाठवून दिलं आणि सन्नीला तिथेच जमिनीत पुरायला लागलो. ओळख पटू नये म्हणून सन्नीचे सगळे कपडे आणि बूट काढून त्याच्या चेहेरा विद्रूप केला. सन्नीला पुरून मी जावेदला कॉल केला. म्हातारा बँकेत गेल्याचं त्याने सांगितलं. तिथून निघून तो घराकडे गेल्याचंही सांगितलं. जिना चढताना जावेदला पाहून म्हातारा घाबरला. मागे वळताना जावेदने म्हाताऱ्याला ढकलून दिलं. जिन्यावरून धडपडत खाली आल्याने म्हातारा तिथेच संपला. माझं रहस्य जाणणारे सगळे संपले होते. राहिला होता तो मोबाईल. पण जावेद म्हणाला की म्हाताऱ्याजवळ कोणताच मोबाईल नव्हता. नरेंद्रचा खून लपवण्यासाठी मी जावेदला नरेंद्रचा चेहेरा लाऊन तिथेच थांबायला सांगितलं...
 
दुसऱ्या दिवशी नरेंद्रचाच चेहेरा लाऊन जावेदने बँकेत आसपास मोबाईलची शोधला. पण त्याला मोबाईल सापडला नाही. सुहास दादाने हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन नरेंद्रला काढून टाकलं. त्यामुळे नरेंद्रच्या चहऱ्याचा रोल आता संपला होता. जावेद तिथल्या परिसरावर गुप्तपणे पाळत ठेऊन होता. या गोष्टीला महिना झाला. मध्येच तो देशमुखसुद्धा तक्रार घेऊन आला पण काही हाती लागलं नाही. मला वाटलं शांत झालं सगळं पण सन्नीची बॉडी सापडली आणि चक्र पुन्हा सुरू झालं. तुम्ही आणि तुमची टीम अजून खोलात शिरताय हे पाहून मी घाबरलो आणि जावेदला तुम्हाला मारायला पाठवलं. पण तुम्हाला मारायच्या ऐवजी हा जावेद स्वत: हॉस्पिटलमध्ये आडवा झाला. माझी सगळी रहस्य जाणणारा हा एकमेव माणूस तुमच्या ताब्यात आला होता. त्याला मारण्यासाठी मी इथे आलो आणि..."
 
त्याचवेळी प्रधान बोलते झाले, "आणि तू अलगद आमच्या तावडीत सापडलास. सुमित, तुझा तो जावेद, ऑपरेशनच्या वेळीच दगावला होता. तुला इथे आणण्याचा हा आमचा बनाव होता. तुला जावेदने नाही, तर तुझ्या उतावीळपणाने आणि मि. फडकेंच्या नियमित वागण्याने अडकवलं. सन्नीवर तू गोळी झाडलीस. आणि तो मेला की नाही याची खात्री करताच त्याला समुद्रात फेकलंस. तिथून वाचून तो पुन्हा तुझ्या समोर आला तेव्हा तू त्याचा गळा आवळलास. तो त्याही वेळी मेला नव्हता. उतावीळपणाने तू त्याला जिवंतच पुरलंस. वर येण्याच्या प्रयत्नात सन्नीचा श्वास अपुरा पडला आणि तो गुदमरून मेला. पण त्याच्या बोटाचा थोडासा भाग वर आला ज्याने त्याचा पत्ता सांगितला. तू मि. फडकेंचा मोबाईल सगळीकडे शोधलास, पण मि. फडके तुझ्याहून हुशार निघाले. बँकेतल्या लॉकरचा योग्य वापर करत त्यांनी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करून त्यात ठेवला, जेणेकरून तो फक्त त्यांना किंवा पोलिसांनाच मिळेल. ते कोणाला काही सांगतील याआधी जावेदने त्यांना संपवलं खरं, पण बँकेत येण्याच्या मि. फडकेंच्या वेळेतली तफावत ब्रांच मॅनेजर देशमुखांच्या लक्षात आली...
 
या दोन्हीही घटना एकाच परिसरातल्या आणि जवळ जवळ एकाच वेळी घडल्या असल्याने यांचा एकमेकांशी संबंध असल्याचं आम्हाला जाणवलं. शिवाय, यांमध्ये मि. फडकेंच्या आसपासची व्यक्तीच सामिल आहे, हे ही लक्षात आलं. आमच्यावर झालेला हल्ला आमच्या पथ्यावरच पडला. आमच्या सचिनला गोळी लागली आणि तो अत्यावस्थ आहे असं सांगून आम्ही त्याला पडद्याआड केलं. गुप्तपणे सचिनेने मि. फडकेंची आणि त्यांच्या आसपासच्या माणसांची कुंडली मिळवली. त्यात तुझी खोटी नोकरी आणि बँक खात्यांबद्दल समजलं. मि. फडकेंचे तुझ्या नावे असलेले पैसे तुझ्या खात्यात ट्रांस्फर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तू ते अकाऊंट बंद केलेस हेसुद्धा कळलं. या सगळ्यामागचा खरा सूत्रधार तूच असशील या मतापर्यंत मी पोहोचलो होतो आणि यावर शिक्कामोर्तब केलं मि. फडकेंच्या मोबाईल मधल्या त्या व्हिडियोने. हा मोबाईलच तुझ्या कृत्यांचा मूक साक्षीदार बनला. सुमित, खुनी कितीही लपून राहिला, तरी एक ना एक दिवस खुनाला वाचा फुटतेच...
 
समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.