Tuesday, May 25, 2021

मूक साक्षीदार - पहिला भाग...

सकाळची वेळ होती. एक माणूस आपल्या कुत्र्याला घेऊन रस्त्याने चालला होता. कडेला बसलेल्या भाजीवाल्याने त्याला हटकलं, “कैसे हो साहब | सुबह सुबह सैरपर निकले हो क्या...?” भाजीवाल्याजवळ जात तो माणूस म्हणाला, “हां भैय्या, जरा इस जगह को देख लू | अब तो यही रहना है ना | अच्छा, चलता हूं |” इतकं बोलून तो माणूस निघून गेला. बागेजवळ पोहोचला तर तिथे जास्त कोणीच नव्हतं. तो माणूस कुत्र्यासह जसा गेटच्या आत शिरला, तसा तो कुत्रा जरा बिथरला. त्याने भुंकायला सुरुवात केली आणि पळण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाच्या हातात दोर असल्याने कुत्र्याला जोरात पळता येत नव्हतं. तो माणूसही मग कुत्र्यामागे जाऊ लागला. एका झाडाजवळ पोहोचताच कुत्र्याने माती उकरायला सुरुवात केली. काही क्षणातच आपल्या मालकाकडे पाहून कुत्रा भुंकू लागला. त्या माणसाने जवळ जाऊन पाहिलं आणि त्याला धक्काच बसला...

थोड्याच वेळात तिथे गर्दी जमली. पोलिस तपास सुरू झाला होता. सीनियर इन्स्पेक्टर प्रधान, इन्स्पेक्टर आनंद, सब इन्स्पेक्टर सचिन आणि सब इन्स्पेक्टर उमा झाडाच्या आजूबाजूला उभे होते. दोन माणसं झाडाखाली खणत होती. कुत्र्याचं भुंकणं सुरूच होतं आणि एक कुबट वासही येत होता. तो कुत्रा सारखा खणलेल्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता. प्रधानांनी पुढे होत सर्वांना आपलं आय.डी. कार्ड दाखवलं आणि म्हणाले, "मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान आणि हे माझे सहकारी. पोलिसात फोन कोणी केला होता..."

कुत्रा धरलेला माणूस बोलता झाला, "सर, मैंने फोन किया था | मेरा नाम जगदीश है | इसी एरिया में परसो ही रहने आया हूँ | आज मेरे जिगर को इस गार्डन की सैर कराने लाया था | इस पेड़ के पास पहुँचकर जिगर भौंकने लगा | पंजोंसे जमीन कुरेदने लगा | मुझे लगा कोई हड्डी-वड्डी मिली होगी उसे | मैंने पास जाकर देखा तो एक उंगली नज़र आयी | मैं डर गया और तुरंत पुलीस में खबर कर दी |" जगदीशच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "अच्छा किया आपने हमें खबर कर दी |" थोड्याच वेळेत खणून झालं आणि तो वास अजूनच उग्र झाला. चौघांनीही खणलेल्या ठिकाणी पाहिलं, तर एक प्रेत त्यांच्या नजरेस पडलं...

आनंद आणि प्रधान प्रेत पाहत असताना सचिन आणि उमा आजू-बाजूचा शोध घेऊ लागले. आनंद म्हणाला, “सर, प्रथमदर्शनी तर हे पुरुषाचं प्रेत दिसतंय. पण सर, एक गोष्ट खटकते. बॉडीवर कुठलाही कपडा नाही की पायात चप्पल किंवा बूट नाहीत. विवस्त्र आणि अनवाणी प्रेत आहे हे...” प्रेताकडे पाहत प्रधान म्हणाले, “यू आर राईट आनंद. या माणसाचा खून झालाय की याने आत्महत्या केली की अपघात झाला हे तर डॉकच सांगू शकेल, पण अंगावरचे कपडे पायातले जोडे दिसत नाहीत म्हणजेच यांची ओळख पटू नये म्हणून ते काढले असावेत. शिवाय यांचा चेहेरा इतका खराब झाला आहे की त्यावरूनही काही निष्कर्ष काढणं कठीण आहे...” ते बोलत असतानाच सचिन आणि उमा तिथे आले. सचिन म्हणाला, “सर, आम्ही सगळं चेक केलं. आशा कुठल्याही खुणा सापडल्या नाहीत ज्याचा संबंध या बॉडीशी लावता येईल...” आनंदला दुजोरा देत उमा म्हणाली, “सर, या बागेजवळ दोन बिल्डिंग आहेत. मी तिथेही चौकशी केली, पण काही विशेष हाती लागलं नाही...” हनुवटी चोळत प्रधान म्हणाले, “हम्म... ठीक आहे, ही बाग सील करा आणि ही बॉडी डॉककडे घेऊन चला...”

डॉ. गोखले बराच वेळ बॉडीचं परिक्षण करत होते. थोड्या वेळात ते म्हणाले, "प्रधानसाहेब, तुमचा तर्क बरोबर आहे. ही बॉडी एका पुरूषाचीच आहे. ४०-४५च्या मधलं वय असेल त्याचं. याची ऊंची पावणे सहा फूट आहे आणि याच्या डाव्या हाताचा अंगठा अर्धा आहे. बॉडीची कंडिशन पाहता याला मरून साधारण साडे तीन ते चार महिने झाले असावेत. याचा चेहेरा पूर्ण खराब केला आहे. कदाचित याची ओळख पटू नये म्हणून असेल. याच्या कवटीवर चेहेरा बनवणं शक्य नाही. मी ग्राफिक्सच्या मदतीने याचा चेहेरा बनवण्याचा प्रयत्न करतो." उमा मध्येच म्हणाली, "याचा मृत्यू कसा झाला असेल..."

डॉ. गोखले म्हणाले, "याचा खून झाला हे नक्की. पण मृत्यू त्या पद्धतीने झाला नाही ज्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला गेला..." हे ऐकून सर्वच संभ्रमात पडले. डॉ. गोखलेंनी पुन्हा बोलायला सुरुवात केली, "खुन्याने याचा गळा दाबून याला मारण्याचा प्रयत्न केला आहे. याची श्वासनलिका दबलेली होती. पण याचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला नाही. माझा अंदाज आहे की श्वास बंद झाल्याने आणि शॉकमुळे याची शुद्ध हरपली आणि खुन्याने याचा चेहेरा विद्रूप करून याला गाडून टाकलं...

जमिनीत याला शुद्ध आली आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करताना हा माती उकरू लागला. पण मातीचा दाब आणि प्राणवायूचा आभाव जास्त असल्याने याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि गुदमरून याचा मृत्यू झाला. याच्या बोटाच्या नखात, तोंडात आणि नाकात मला मातीचे कण सापडले आहेत. त्यावरून मी हा निष्कर्ष काढला..." आनंद म्हणाला, "हा माणूस पावणे सहा फूट ऊंचीचा आहे. एवढ्या मोठ्या माणसाला कोणी मारत असताना त्याने काहीच हालचाल केली नाही. ती एक बाग आहे आणि बागेत तर ये-जा सुरूच असते. कोणी त्याच्या मदतीलाही आलं नाही. आश्चर्य आहे..."

त्यावर सचिन म्हणाला, "मला वाटतं या माणसाचा खून अशावेळी झाला असावा ज्यावेळी बागेत ये-जा नसेल. कदाचित एकदम सकाळी किंवा अपरात्री... " सर्वजण बोलत असताना प्रधान विचारात गढले होते. डॉ. गोखलेंनी प्रधानांना विचारलं तर ते म्हणाले, "ती बाग, तो परिसर, यांच्याशी संबंधित काहीतरी वाचल्यासारखं वाटतंय... सचिन, उमा, आनंद आपले रेकॉर्ड्स चेक करा. या परिसरासंदर्भात काहीतरी नक्कीच सापडेल..." तिघंही कामाला लागले. काही क्षणातच आनंद म्हणाला, "सापडलं सर, हे बघा. या परिसराशी संबंधीत दोन केसेस आहेत. पहिली आहे आठ महिन्यांपूर्वीची फडके बँक फ्रॉड केस आणि दुसरी आहे याच फडके नावाच्या माणसाच्या मृत्यूशी संबंधित चार महिन्यांपूर्वीची केस...

फडके बँक फ्रॉड केसमध्ये मि. प्रभाकर फडकेंच्या मुलाने, सुहास फडकेने ही तक्रार केली होती, की त्यांच्या वडिलांची खोटी सही घेऊन बँकेतून पैसे काढले गेले होते. त्यात मि. प्रभाकर फडके यांच्या केयरटेकरला अटक झाली. दुसरी केस होती स्वत: मि. प्रभाकर फडके यांच्या मृत्यूची केस. कोणा मि. महेश देशमुख यांनी चार महिन्यांपूर्वी तक्रार केली होती, की मि. प्रभाकर फडके यांच्या मृत्यूविषयी त्यांना शंका वाटते. या केसमध्ये जास्त काही नमूद केलेलं दिसत नाही. मि. फडके रहायचे त्या सोसायटीतल्या लोकांच्या, मि. फडकेंच्या मुलांच्या आणि बँकेतल्या लोकांच्या जबान्या घेतल्या गेल्या आहेत. आत्ता या दोन्हीही फाईल्स क्लोज केल्या आहेत... पण सर, या दोन्हीही केसेसचा आणि आत्ताच्या या केसचा काय संबंध..." सर्व ऐकून प्रधान म्हणाले, “संबंध कदाचित असेल नसेल, पण लक्षात घेण्यासारखी बाब ही, की या तीनही केस एकाच परिसरातल्या आहेत. आपण आता चौकीवर जाऊ आणि या केसेस तपशीलवार अभ्यासू. सचिन, दुसऱ्या केसची तक्रार करणाऱ्या महेश देशमुखला चौकीवर बोलावून घे. लेट्स गो...”

चौघंही चौकीवर पोहोचले. दोन्हीही केसेसच्या फाइली त्यांच्यासाठी तयार होत्या. सचिन पहिली फाईल वाचू लागला, “सर, ही आठ महिन्यांपूर्वीची खारच्या प्रभाकर फडके यांची बँक फ्रॉडची केस. प्रभाकर फडके यांच्या मुलाने सुहास फडकेने आठ महिन्यांपूर्वी, प्रभाकर फडके यांची केयरटेकर मालती, हिच्या विरुद्ध ही केस केली होती. प्रभाकर फडके यांच्या खात्यातून एन..एफ.टी. आणि चेकद्वारे मोठ्या रकमा दुसऱ्या बँकेत फिरवल्या गेल्या. चौकशी नंतर समजलं, की ही मालतीच हे सगळं करत होती. खार पोलीसांनी तिला पकडलं आणि थोडा धाक दाखवताच तिने तिचा गुन्हा कबूल केला. सध्या ती शिक्षा भोगते आहे. ओपन अँड शट केस..." उमाने दुसरी फाईल हातात घेतली आणि बोलू लागली, “आणि सर, चार महिन्यांपूर्वी कोणी मि. महेश देशमुख यांनी प्रभाकर फडके यांच्या मृत्यूविषयी संशय असल्याची तक्रार नोंदवली होती, ती ही केस. लोकल पोलिसांनी बँकेत आणि फडके राहत असलेल्या आदिनारायण सोसायटीत चौकशी केली होती. पण काही विशेष हाती लागलं नाही म्हणून फाईल बंद केली गेली...”

"सर, आत येऊ का..." उमा बोलत असतानाच आलेल्या या आवाजाने सर्वांनी त्या दिशेला पाहिलं. दारात साधारण पन्नाशी पार केलेला एक माणूस उभा होता. आनंदने त्या माणसाला आत येण्याचा इशारा केला. तो माणूस आत आला. उमाने दिलेल्या खुर्चीत बसला आणि बोलता झाला, "माझं नाव महेश देशमुख आहे. चार महिन्यांपूर्वी .बी.सी. बँकेच्या खार ब्रांचमधून मॅनेजर म्हणून मी रिटायर झालो. तुमचा फोन आला म्हणून तडक इथे आलो. माफ करा पण आत्ता तुम्ही जे बोलत होता ते कानावर पडलं माझ्या. मी त्यावेळीही बोललो होतं आणि आजही माझं तेच मत आहे, की फडके काकांचा मृत्यू सरळ साधा नाही. आठ महिन्यांपूर्वी तो प्रकार घडला. मि. फडकेंच्या खात्यांची तपासणी करून मीच हा प्रकार उघडकीस आणला होता ज्यात मालतीला शिक्षा झाली....

.बी.सी.बँकेच्या खार ब्रांचमधल्या श्रीमंत कस्टमर्सपैकी एक मि. प्रभाकर फडके होते. त्यांना तीन मुलं. मोठा सुहास पुण्यात असतो. तिथे त्याचा मोठा बिझिनेस आहे. मधली सुनयना लग्न करून दुबईत सेटल्ड झाली आणि सर्वात लहान सुमित न्यूझिलंडला नोकरी करतो. इथे मिस्टर आणि मिसेस फडके दोघेच राहत. त्यांच्या खात्यात साधारण एक ते दीड लाखापर्यंत रोख रक्कम असायचीच. वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षीसुद्धा मि. फडके त्यांचे सर्व बँकेचे व्यवहार जातीने पहायचे. दर महिन्याच्या १५ ते २० तारखेदर्म्यान ते एक दिवस बँकेत यायचे. लॉकरपासून ते रोख रक्कम काढण्यापर्यंतची सगळी कामं त्याच एका दिवसात करून केलेल्या सर्व कामांची पडताळणी त्यांच्याकडे असलेल्या डायरीतल्या नोंदणींशी करून ते आल्या पावली परत जायचे. मी तीन वर्षांपूर्वी या ब्रांचला आलो होतो आणि तेव्हा पासून मि. फडके यांच्या बँकेत येण्याचं सातत्य पाहत आलो आहे. साधारण वर्षभरापूर्वी मिसेस फडके गेल्या आणि फडके काका थोडे सैरभैर झाले...

त्यांची मुलं आपापली कामं सोडून इथे येऊ शकत नव्हती आणि मि. फडकेही इथून दुसरीकडे जायला तयार नव्हते. शेवटी मि. फडकेंच्या तीनही मुलांनी मालतीला मि. फडकेंकडे केयरटेकर म्हणून नेमले. ही मालती तिथेच रहायची, मि. फडकेंची काळजी घ्यायची, घरातली कामं करायची आणि महिन्यातून एकदा मि. फडकेंसोबत बँकेत यायची. पैसा, एकटा म्हातारा हे पाहून मालतीची मती फिरली आणि पुढे काय झालं हे तुम्हाला माहितच आहे. मालती गेल्यावर नरेंद्र म्हणून एक माणूस तिथे नेमण्यात आला. चार महिन्यांपूर्वी एकतीस तारखेला मी रिटायर झालो. त्या दिवशी माझ्या सेंडऑफची धांदल सुरू होती आणि मि. फडकेही तेव्हा बँकेत आले होते. साधारण पाचेक मिनिटात ते निघून गेले. माझा शेवटचा दिवस होता त्यामुळे त्याच्या येण्याकडे जाण्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं नाही. सर, त्याच दिवशी मि. फडकेंचा मृत्यू झाला...

मलाही त्या दिवशी समजलं नव्हतं. नव्या मॅनेजरच्या हातात ब्रांचची सूत्र सोपवून मला हेड ऑफिसला रिपोर्ट करायचं होतं. मी वेळेच्या तासभर आधीच ब्रांचमधून निघालो तो थेट हेड ऑफिससाठी. तो दिवस पार पडला. हेड ऑफिसमधूनही मला शुभेच्छांसह रीतसर सेंडऑफ मिळाला. दुसऱ्याच दिवशी माझी फ्लाईट होती. माझी मुलगी कॅनेडाला असते. मी तिच्याचकडे गेलो होतो आणि महिन्याभरात भारतात परतलो. सर्वांना भेटावं म्हणून ब्रांचमध्ये गेलो तर मि. फडकेंच्या मृत्यूची बातमी समजली. तेव्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, की मि. फडकेंच्या महिन्यात दुसऱ्यांदा बँकेत येण्याचा आणि त्यांच्या मृत्यूचा काहीतरी संबंध असला पाहिजे..."

आनंदने लगेच विचारलं, "मि. देशमुख, मी असं ऐकलं आहे की खातेदाराचा मृत्यू झाल्यावर त्याची खाती, लॉकर्स बंद केली जातात... मग मि. फडकेंच्या मृत्यूनंतरही..." आनंदला मध्ये तोडत मि. देशमुख म्हणाले, "बरोबर आहे तुमचं. मि. फडकेंचं खातं बंद केलंही असेल ब्रांचने, पण लॉकर्स... मला नाही वाटत. मि. फडकेंचे तीन लॉकर्स होते. तीनही मुलांची त्यात पहिली नावं आणि मि. फडके स्वत: सेकंड होल्डर म्हणून होते..." सर्व जाणून घेतल्यावर प्रधान म्हणाले, "मि. देशमुख, तुम्ही आम्हाला ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. यात काही काळंबेरं असेल तर आम्ही नक्कीच त्याचा तपास करू. मि. फडकेंचा मृत्यू झाला त्या दिवशी तुम्ही बँकेत होतात. म्हणून तुमचीही पुन्हा चौकशी करावी लागू शकते. तर आम्हाला सांगितल्याशिवाय शहर सोडून जाऊ नका प्लीज. या आता..."

मि. देशमुख निघून गेल्यावर आपल्या साथिदारांकडे वळत प्रधानांनी विचारलं, "सो टीम, काय वाटतं तुम्हाला..." उमा लगेच म्हणाली, "विचार करण्यासारखी गोष्ट आहे खरी..." उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, "उमा इज राईट सर. मि. फडकेंना अचानकपणे बँकेत येण्याचं काय कारण..." आनंद उमाला साथ देत सचिन म्हणाला, "सर, आपण या दोन्हीही केसेस पुन्हा पाहिल्या, पण या केसेसचा आत्ताच्या खुनाच्या केसशी काय संबंध असू शकतो..." प्रधानांनी हनवटी चोळली आणि म्हणाले, "असेलही नसेलही, पण आत्ताची केस आणि फडकेंच्या केसेस, याच परिसरात घडल्या आहेत. आपल्याला सर्व बाबी तपासून पहायलाच हव्यात. लेट्स गो टू द बँक फॉर फरदर इन्फो..."

चौघंही बँकेत पोहोचले तेव्हा दुपारचा दीड वाजत आला होता. शटर बंद होतं आणि एक गार्ड बाहेर बसला होता. प्रधान आणि त्यांच्या टीमला पाहून तो गार्ड उठला आणि त्यांना हटकत म्हणाला, "माफ करना साहब | लंच टाईम है | अभी पाँच मिनट में शटर खुलेगा | तब तक यहीं रुकिये |" प्रधानांनी घड्याळ पाहिलं आणि समोरचा बोर्ड पाहून मान हलवली. शटर वर होताच सर्व टीम आत गेली. प्रधान थेट मॅनेजर केबिनमध्ये गेले आणि त्यांची टीम बाहेर उभी राहिली. मॅनेजरला आपलं आय.डी. कार्ड दाखवत ते म्हणाले, "मी सीनियर इन्स्पेक्टर प्रधान, आणि ही माझी टीम. चार महिन्यांपूर्वी मरण पावलेल्या मि. प्रभाकर फडकेंबद्दल थोडी चौकशी करायची होती..."

समोर पोलीस आलेत हे पाहून तो मॅनेजर थोडा चरकला पण स्वत:ला सावरत म्हणाला, "सर, मी रंजन दिवेकर. मीसुद्धा चारच महिने झाले इथे ट्रान्स्फरवर आलो. मि. फडकेंच्या मृत्यूबद्दल आणि त्या मालतीबद्दल पोलिस आधीच चौकशी करून गेले आहेत. मग आता पुन्हा...” प्रधानांनी सांगितलं, “मि. दिवेकर, इथून जवळच असलेल्या बागेत एक प्रेत सापडलं आहे, आणि त्या व्यक्तीचा खूनसुद्धा चार महिन्यांपूर्वीच झाल्याचं लक्षात आलं आहे. म्हणून सर्व संबंधित गोष्टींची चौकशी करणं गरजेचं आहे. सो प्लीज...”

हे ऐकताच मि. दिवेकर म्हणाले, “मी माझ्या स्टाफला इथे बोलावतो. ते कदाचित तुम्हाला सांगू शकतील..." मॅनेजरने फोन उचलताच प्रधान म्हणाले, "नो नो मि. दिवेकर. त्याची काहीच गरज नाही. मी टाईमिंग पाहिलं तुमचं. तासाभरात कस्टमर टायमिंग संपेल. तेव्हा बोलू आम्ही सर्वांशी. तोवर तुम्ही मला मि. फडकेंच्या घराचा पत्ता द्या..." कॉम्प्यूटरकडे पाहत मि. दिवेकर म्हणाले, "मागच्याच गल्लीत असलेल्या आदिनारायण सोसायटीत सी विंगमध्ये मि. फडके रहायचे पण सध्या ते घर बंद आहे..."

सचिन आणि उमाला आत बोलवत प्रधान म्हणाले, "तुम्ही दोघं या आदिनारायण सोसायटीत जाऊन चौकशी करा. एँड कम बॅक हियर. आम्ही इथेच असू..." सचिन आणि उमा बाहेर निघून गेले आणि प्रधानांनी मि. दिवेकारांना एकतीस तारखेचं सी.सी.टी.व्ही. फुटेज दाखवण्याची विनंती केली. आनंद आणि प्रधान दोघांनीही ते फुटेज पाहिलं ज्यात फडके दिसत होते. थोड्याच वेळात शटर पुन्हा बंद झालं. बँकेत असलेला शेवटचा माणूस बाहेर पडला आणि प्रधानांनी मि. दिवेकरांकडे पाहिलं. केबिनबाहेर येत मि. दिवेकर म्हणाले, "जरा इकडे लक्ष द्या... हे आहेत सीनियर इन्स्पेक्टर प्रधान. चार महिन्यांपूर्वी त्या मि. फडकेंच्या मृत्यूबद्दल चौकशी करायला आले आहेत. त्यांना कोऑपरेट करा प्लीज..." आनंद पुढे होत म्हणाला, "मी इन्स्पेक्टर आनंद. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आम्ही जास्त वेळ नाही घेणार तुमचा. दोन-चार प्रश्न बस...”

सगळे कर्मचारी काऊंटर्ससमोर येऊन जमा झाले. तेव्हा आनंद पुढे बोलू लागला, "आम्ही चार महिन्यांपूर्वीचं सी.सी.टि.व्ही. फुटेज पाहत होतो. त्यात असं समजलं की मि. फडके :३७ला आत आले. काऊंटरवर काही क्षण उभे राहून तुमच्या या लेडी ऑफिसरसोबत आत गेले. :४३ला ते बाहेर येऊन दारात उभे राहिले. मग मागे वळून हात हलवून :४७ला बाहेर निघून गेले. कोणी सांगू शकतं का याबद्दल..." ती लेडी ऑफिसर पुढे होत म्हणाली, "सर, मी सारिका. इथे लोन आणि लॉकर सांभाळते. फडके आजोबांनी लॉकरचा फॉर्म भरला. मग मी त्यांना लॉकररूममध्ये घेऊन गेले. काही क्षणात ते बाहेर आले आणि दाराशी घुटमळत राहिले..."

"पुढचं मी सांगतो सर..." एक माणूस पुढे होत बोलता झाला, "सर मी दिपक. इथे काऊंटर सांभाळतो. फडके काका जवळ-जवळ - मिनिटं दारात उभे होते. कदाचित बाहेर कोणालातरी पाहत असावेत. मी त्यांना विचारलंही, “काका काही हवं आहे का...” तर त्यांनी नुसता हात हलवला आणि बाहेर निघून गेले. त्यावेळी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं नाही आम्ही. महिन्याभरापूर्वी जेव्हा पोलिस चौकशी करून गेले होते, तेव्हा असे प्रश्न नव्हते विचारले, पण आज पुन्हा तो प्रसंग आठवल्यावर दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. त्या म्हणजे वेळ आणि दिवस. चार महिन्यांपूर्वी फडके काका त्यांच्या ठरलेल्या दिवसात म्हणजे १८ तारखेला त्यांच्या ठरलेल्या वेळेवर म्हणजे वाजता येऊन गेले होते. पण एकतीस तारखेला जेव्हा ते आले, तेव्हा सकाळ होती. शिवाय ती त्यांची बँकेतली दुसरी खेप होती. असं त्या आधी कधीच झालं नाही..."

हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "हम्म्म... वेळेची तफावत... बरं, मिं फडके गेले हे तुम्हाला कसं समजलं..." तेव्हा मि. दिवेकर म्हणाले, "सर, आम्ही इथे एक पद्धत ठरवली आहे. संध्याकाळी आम्ही सर्व एकाच वेळी मागच्या दाराने बाहेर पडून ब्रांच बंद करतो. बँकेचं मागचं दार आदिनारायण सोसायटीच्या समोर उघडतं. त्या दिवशी आम्ही बाहेर पडलो तेव्हा सोसायटीत गर्दी दिसली. विचारपूस केली तेव्हा मि. फडके गेल्याचं समजलं..." प्रधान आणि आनंद सगळं ऐकत होते. प्रधानांनी पुन्हा विचारलं, "बरं, याशिवाय कोणाला अजून काही माहिती आहे... एखादी खास गोष्ट जी आधी किंवा नंतर घडली..." एक मुलगा उभा राहत म्हणाला, "सर, मी संतोष. इथे सब-स्टाफ आहे. दोन वेगळ्या गोष्टी घडल्या होत्या. एक म्हणजे फडके आजोबा सकाळी आले तेव्हा ते पँट-शर्टमध्ये नव्हते. शिवाय त्यांचा केयरटेकर, नरेंद्रही त्यांच्यासोबत नव्हता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी तोच नरेंद्र ब्रांचमध्ये येऊन आजोबांच्या मोबाईलबद्दल विचारत होता..."

संतोष बोलतच होता की सचिन आणि उमा ब्रांचच्या दारात आले. सचिनने प्रधान आणि आनंदला एका बाजूला बोलावलं. सचिन म्हणाला, "सर आम्ही आदिनारायण सोसायटीत चौकशी केली. मि. फडके त्यांच्या विंगचे खजिनदार होते. या वयातही सर्व गोष्टी जातीने लक्ष घालून करायचे. त्यांनी दिलेले हिशोब नेहमी चोख असायचे. कोणाशी काही वाद नाहीत, भांडणं नाहीत की साधे गैरसमजही नाहीत. वर्षभरापूर्वी मिसेस फडके गेल्या आणि मि. फडके जरासे हलले. त्यांच्याच्याने सोसायटीचं काम होईना म्हणून त्यांनी राजिनामा दिला. त्यांची दिनचर्या साधीच होती. सकाळी सातला बाहेर पडून बागेत फेरफटका मारायचे. नऊला परत आल्यावर सोसायटीतल्या त्यांच्या रहिवाशांसोबत वेळ घालवायचे. त्याचं त्यांच्या मुलांशी कधीच पटलं नाही. त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशीही फक्त मोठा मुलगा सुहासच आला होता. सगळे विधी करून परत निघून गेला..."

हे ऐकून प्रधान म्हणाले, "ओके. त्यांच्या मृत्यूविषयी काही समजलं..." या प्रश्नावर उमा पुढे होत म्हणाली, "चार महिन्यांपूर्वी ३१ तारखेला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. रहिवासी सांगतात की ते जिन्यावरून घसरले आणि डोकं आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना प्रथम पाहिलं ते त्यांच्या केयरटेकर नरेंद्रने. तो केयरटेकर आता तिथे नाहीये. मि. फडकेंच्या मोठ्या मुलाने त्याला काढून टाकलं. आम्ही इथल्या चौकीत जाऊन माहिती मिळवली. त्यांच्या तपासातही डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागल्याने मृत्यू झाला असंच लिहिलं आहे. तीस-पस्तीस वर्ष जुनी सोसायटी असल्याने तिथे सी.सी.टि.व्ही. कॅमेरा नाही..." हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "हम्म्म... समथिंग इज राँग समव्हेयर... लेट्स गो इनसाईड..."

सगळे आत गेल्यावर बँकेतल्या कर्मचाऱ्यांना उद्देशून प्रधानांनी विचारलं, "मि. फडकेंनी शेवटचा कोणता लॉकर ऑपरेट केला..." एका कर्मचाऱ्याने रेकॉर्ड पाहत सांगितलं, "सर, बी . त्यांच्या मुलीच्या त्यांच्या नावावर असलेला लॉकर..." सचिनने प्रश्न केला, "मि. फडके गेल्यानंतर त्यांच्या इथल्या डिपॉझिट्सचं काय स्टेटस आहे..." मि. दिवेकर पुढे होत म्हणाले, "सर, मि. फडके गेल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी मि. सुहास फडके इथे आले होते. मि. प्रभाकर फडकेंचं डेथ सर्टिफिकेट देऊन मि. सुहासने त्यांच्या नावावर असलेला लॉकर सरेंडर केला आणि त्यांची डिपॉझिट्स त्यांच्या पुण्याच्या बँकेत फिरवून घेतली. मि. फडकेंची मुलगी सुनयना आणि त्यांचा धाकटा मुलगा सुमित इथे आलेच नाहीत. दोघांनीही इमेलद्वारे आम्हाला पत्र लिहिली. त्यानुसार मि. सुमित यांच्या नावे असलेले डिपॉझिट्स त्यांना ट्रान्स्फर केले गेले पण ते इथे येऊ शकत नसल्याने त्यांचा लॉकरमात्र तसाच ठेवला. त्याचं भाडं आम्हाला आजतागायत वेळेवर मिळत आहे. सुनयना मॅडमने सांगितलं की त्या स्वत: ३-४ महिन्यात भारतात येतील तेव्हाच इथे येऊन सर्व व्यवहार पूर्ण करतील. दोघांचे लॉकर्स सील केले आहेत आणि चाव्या मात्र आमच्याकडे वॉल्टमध्ये ठेवल्या आहेत..."

मि. दिवेकर बोलायचे थांबले आणि आनंद पुढे होत म्हणाला, "तुम्ही सांगितलंत दुसऱ्या दिवशी तो नरेंद्र मोबाईलची चौकशी करायला आला होता. त्याचं फुटेज आम्हाला दाखवू शकाल का..." मि. दिवेकरांनी एक तारखेचं फुटेज दाखवलं ज्यात एक ऊंचपुरा काळा सावळा माणूस काऊंटरवर काहीतरी बोलून लगेच निघून गेला. फुटेज पाहून झाल्यावर प्रधान म्हणाले, “मि. दिवेकर, ज्या दिवशी मि. फडकेंचा मृत्यू झाला, त्याच महिन्यात ते १८ तारखेला बँकेत आले होते. त्याचं फुटेज पाहायला मिळेल का...” मि. दिवेकरांनी फुटेज सुरू केलं. त्यात मि. फडके दिसत होते. सोबत त्यांचा केयरटेकर नरेंद्रही दिसत होता. काही क्षणात मि. फडके लॉकर रूमकडे गेले आणि नरेंद्र तिथेच बॅंकेतले काही कागद वाचत असलेला दिसला. फुटेज पुढे गेलं आणि प्रधान लगेच म्हणाले, “स्टॉप. जरा मागे न्या... हां बस पॉज करा...”

प्रधान एकटक स्क्रीनकडे पाहत होते. काही क्षणातच ते मॅनेजरला म्हणाले, "मि. दिवेकर, तुम्ही आम्हाला १८ तारखेचे, ३१ तारखेचे आणि तारखेचे फुटेज द्या. शिवाय मि. फडकेंच्या तीनही मुलांचे कॉन्टॅक्ट डीटेल्स पण द्या..." स्वत:कडे असलेली पेन ड्राईव्ह मि. दिवेकरांकडे सोपवत प्रधान बाकीच्या कर्मचाऱ्यांना म्हणाले, "हे बघा, आमच्या इथे येण्याबद्दल तूर्तास तरी कोणाशी काही बोलू नका. आणि कदाचित आम्हाला पुन्हा चौकशीसाठी यावं लागेल. काळजी करू नका तुम्हाला जास्त त्रास देणार नाही..." प्रधान बोलतच होते की मि. दिवेकर पेन ड्राईव्ह घेऊन येत म्हणाले, "सर, ही घ्या तुमची ड्राईव्ह. यात ते तीनही व्हिडियोज आहेत आणि या कागदावर मि. फडकेंच्या मुलांचे नंबर्स आहेत..." पेन ड्राईव्ह हातात घेऊन मि. दिवेकरांना धन्यवाद देत प्रधान आपल्या टीमसोबत बाहेर आले...

जीपपर्यंत ते पोहोचले तेव्हा सचिन म्हणाला, "सॉरी सर पण, बागेत सापडलेल्या मृतदेहाची केस अजून ओपन आहे. त्यात आपल्याला काहीच धागेदोरे सापडलेले नाहीत, असं असताना या फडकेंच्या केसमध्ये..." सचिनला दुजोरा देत उमा म्हणाली, "हो म्हणजे, मि. फडके गेल्याला चार महिने झाले असताना त्यात इतकं का गुंततोय आपण..." जीप सुरू झाली आणि चौकीच्या दिशेने जाऊ लागली. प्रधान काही बोलणार इतक्यात त्यांचा फोन वाजला, "येस डॉक. ओके. नाही आम्ही तिथेच येतो. ओके..." फोन पुन्हा खिशात ठेवत प्रधानांनी विचारलं, "आनंद, तुझं काय मत आहे..." समोरची नजर हलवता आनंद म्हणाला, "सर, काही अंशी मला सचिन आणि उमाचं पटतं. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या दोन्हीही केसेस एकाच परिसरातल्या आहेत सो..." आनंदची पाठ थोपटत प्रधान म्हणाले, "देयर यू आर आनंद... आता लॅबकडे घे. तिथे पोहोचल्यावर अजून काही गोष्टींचा खुलासा होईल..."

दुसरा व शेवटचा भाग: २८.०५.२०२१

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment