Wednesday, March 17, 2021

शापित छाया...

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रतापसिंह नावाचा एक महापराक्रमी राजा होता. प्रतापसिंह जितके पराक्रमी आणि धैर्यवान होते, तितकेच दानशूर आणि नम्रही होते. आपल्या चांगल्या कृत्यांनी त्यांनी व महाराणी निर्मलादेवी यांनी प्रजेला आपलंसं केलं होतं. प्रजाही महाराज प्रतापसिंह आणि महाराणी निर्मलादेवी यांवर मनापासून प्रेम करायची. सर्वांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही, जेव्हा राजकुमार विक्रमसिंह यांची राज्याचा युवराज म्हणून घोषणा झाली. युवराज विक्रमसिंह हे त्यांचे पिता महाराज प्रतापसिंह यांच्याप्रमाणे शूर आणि पराक्रमी तर होतेच, पण त्यांच्या आई महाराणी निर्मलादेवींसारखे देखणे व सुंदरही होते. स्वत:च्या पदाचा, धनाचा गर्व नसलेले आणि मनमिळाऊ स्वभाव असलेले युवराज विक्रमसिंह सर्वांना हवेहवेसे वाटायचे. एकच कमतरता होती युवराज विक्रमसिंहांमध्ये आणि ती म्हणजे त्यांचा क्रोध. विक्रमसिंहांना क्रोध अनावर झाला, की त्यांच्या हातून कोणतीही अघटित, विध्वंसक गोष्ट घडायची. राग शांत झाल्यावर मात्र घडल्या प्रकाराबद्दल त्यांना पश्चात्ताप व्हायचा...

असेच एक दिवस युवराज विक्रमसिंह आपल्या दोन रक्षकांसह शिकारीला गेले होते. भर दुपारी दमून-भागून ते एका झाडाखाली येऊन बसले. त्यांचे रक्षक, भोजनाची सोय करण्यासाठी जंगलात निघून गेले. झाडाखाली बसलेल्या विक्रमसिंहांना थकव्यामुळे डुलकी लागली. तेवढ्यात झाडाची एक डहाळी तुटून विक्रमसिंहांच्या डोक्यात पडली. विक्रमसिंहांना जाग आली आणि डहाळी हातात पकडून त्यांनी झाडाकडे पाहिलं. एकही पान किंवा फळ-फूल नसलेल्या त्या झाडाच्या फांद्यातून एकेक डहाळी तुटून खाली पडत होती. हे पाहून विक्रमसिंहांना क्रोध अनावर झाला. त्या वृक्षाला लाथ मारत ते म्हणाले, "वृद्ध वृक्षा, मला सावली देणं तर दूरच राहिलं, पण विश्रांतीसाठी इथे बसलो असता, डहाळी पाडून तू मला जागं केलंस... ही घे त्याची शिक्षा..." असं म्हणत विक्रमसिंहांनी पुन्हा एकदा त्या झाडाला लाथ मारली. त्याबरोब्बर, "आह...!!!" असा आवाज आला. विक्रमसिंहांनी चमकून सगळीकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तेवढ्यात ते झाड हलू लागलं आणि पाहता पाहता ते गायब होऊन तिथे एक ऋषी दिसू लागले. आपला हात छातीवर ठेऊन ते विव्हळत होते. त्यांच्या छातीवर एका पावलाचा ठसा उमटला होता...

त्यांना पाहून विक्रमसिंह त्यांच्या जवळ जात म्हणाले, "क्षमा असावी मुनीवर. आम्हास ठाऊक नव्हते या वृद्ध झाडात तुम्ही आहात. क्षमा असावी..." थोडं सरळ होत त्या ऋषींनी विक्रमसिंहांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग खचून भरलेला दिसत होता. तसेच उभे राहत ते म्हणाले, "युवराज विक्रमसिंह, मी येथे आहे हे तुला ठाऊक नव्हते ते ठिक आहे, पण एका वृद्ध वृक्षाला लाथ मारणे योग्य नव्हते. या वृक्षाचा अपमान केल्याबद्दल आणि माझी तपश्चर्या भंग केल्याबद्दल मी तुला शाप देतो... तू ही असाच वृद्ध व कृष होशील आणि काही काळातच प्राणास मुकशील..." इतकं बोलून ऋषींनी त्यांच्या कमंडलूमधलं पाणी विक्रमसिंहांवर शिंपडलं. त्याचबरोबर विक्रमसिंहांची त्वचा काळवंडू लागली. सुरकुत्यांचं जाळं त्यांच्या अंगभर पसरलं. त्यांचे डोळे खोल गेले. डोक्यावरचे केस पांढरे झाले. चेहेऱ्यावर पांढरीशुभ्र दाढी दिसू लागली. त्यांचे हात-पाय कापू लागले आणि विक्रमसिंह जमिनीवर कोसळले. त्याचवेळी वनात गेलेले सैनिक परतले. युवराज तिथे नाहीत आणि जमिनीवर पडलेला एक वृद्ध माणूस व एक ऋषी समोर आहेत हे पाहिल्यावर त्या रक्षकांनी ऋषींना नमस्कार केला व युवराजांची विचारपूस केली. ऋषींनी सर्व सांगितल्यावर ते दोघं युवराजांच्या जवळ येऊन बसले...


थरथरत्या हातांनी ऋषींचे पाय धरत विक्रमसिंह म्हणाले
, "क्षमा मुनीवर क्षमा... यापुढे मी क्रोध कमी करेन. पण आपल्या शापातून माझी मुक्तता करा..." युवराजांना पाहून त्यांचे रक्षकही हात जोडून याचना करू लागले. ऋषी वरमले. युवराज विक्रमसिंहांच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले, "युवराज, माझा शाप मी परत घेणार नाही, पण एक उ:शाप मात्र देतो... जेव्हा तुमचा विवाह एका सुंदर, तरूण मुलीशी होईल, तेव्हा तिचे आयुष्य आणि रूप तुम्हाला लाभेल आणि तुम्ही पूर्ववत व्हाल... कल्याण हो..." इतकं बोलून ते ऋषी लुप्त झाले. रक्षकांनी युवराजांना रथात बसवून सुखरूप राजवाड्यात परत नेलं. नगरातून जाणाऱ्या रथाला पाहून सर्वांना अचंभा वाटत होता. "हा तर राजमुद्रा कोरलेला युवराज विक्रमसिंहांचा रथ...", "उगवतीला युवराज याच रथात बसून शिकारीला गेले होते...", "आता हा रथ परत आलाय तर आत बसलेले ते युवराज वाटत नाहीत...", "कोणीतरी वृद्ध दिसतोय आत...", "युवराज कुठे गेले..." याच चर्चा सर्वत्र होत होत्या. रथ थेट महालासमोर उभा राहिला. रक्षकांनी युवराजांना सांभाळून त्यांच्या दालनात नेलं. युवराज गायब आहेत आणि एक नवखा पाहुणा त्यांच्याच रथातून येऊन त्यांच्याच दालनात पोहोचला आहे हे समजताच महाराज आणि महाराणी युवराजांच्या दालनात पोहोचले...

युवराजांनी महाराज व महाराणींना पाहून उठण्याचा प्रयत्न केला, पण अतीव थकव्यामुळे त्यांना ते जमत नव्हते. तेव्हा त्या रक्षकांनी जंगलात घडलेला प्रकार महाराज व महाराणींना सांगितला. महाराणी तर हमसून हमसून रडू लागल्या. महाराजांनाही युवराजांची दशा बघवेना. त्यांनी ताबडतोब फर्मान सोडलं, "राज्यातील सर्व वैद्य व हकीमांना पाचारण करा. इतर राज्यातही शोधा. युवराज बरे व्हायला हवेत..." युवराज विक्रमसिंहांना मिळालेल्या शापाबद्दल आणि त्यांच्या वाढलेल्या वयाबद्दलची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. अनेक वैद्य झाले, हकीम आले, पण कोणीही काहीही करू शकलं नाही. अखेर शेवटाचा उपाय म्हणून महाराजांनी दवंडी पिटवली. "ऐका हो ऐका... महाराजांचा खास सांगावा... युवराज विक्रमसिंहांचा विवाह करण्याचे योजिले आहे. तर विवाह इच्छूक मुली व त्यांच्या परिवाराने त्वरित महाराजांची भेट घ्यावी... विवाह पार पडल्यावर मुलीच्या माहेरच्यांना महाराजांकडून अमर्याद धन भेट म्हणून दिलं जाईल हो... ऐका हो ऐका..." अमर्याद धनाच्या लालसेने अनेक परिवार पुढे आले, पण युवराजांना मिळालेल्या शापामुळे झालेली त्यांची दशा पाहत मुली माघार घेत होत्या. दिवसेंदिवस युवराजांचं वय वाढत चाललं होतं आणि त्यांची तब्येत खालावर जात होती. चिंताग्रस्त महाराज व महाराणींना कोणताही मार्ग दिसत नव्हता...


राज्याच्या वेशीजवळ शांती आणि हरी नावंचं एक जोडपं राहत होतं. त्यांना रूपा नावाची मुलगी होती. रूपाची मोठी बहिण छाया
, हिचे आई-वडिल छायाच्या लहानपणीच वारले होते. त्यानंतर हरी आणि शांतीच छायाचा सांभाळ करत होते. छाया दिसायला अतिशय सुंदर होती पण रूपामात्र रंगाने सावळी होती. या कारणामुळे रूपा, शांती आणि हरी, छायाचा नेहमी रागराग करायचे, तिला मारहाण करायचे, कधीकधी तिला उपाशीही ठेवायचे. युवराजांना मिळालेल्या शापाबद्दल आणि महाराजांच्या दवंडीबद्दल शांती आणि हरीनेही ऐकलं होतं. हरी म्हणाला, "शांते, छायाचा लग्न जर युवराजांशी केलं तर, तिची कटकट कायमची मिटेल आणि आपण राजाच्याच तोडीचे श्रीमंत होऊ..." शांतीलाही ते पटलं. तिच्या मनात श्रीमंत होण्याची लालसा तर होतीच पण त्याचसोबत एक दुष्ट विचारही आला तिच्या मनी. हरीला आपल्या मनातले विचार सांगत शांती म्हणाली, "बरोबर आहे. लग्न झाल्यावर छायाचं सौंदर्य युवराजांना मिळेल. मग आपण आपल्या रूपाच्या आणि युवराजांच्या लग्नाबद्दल राजाशी बोलू. आपण केलेल्या उपकारापुढे नमून राजा तयार होईल आणि आपली रूपा राणी होईल..." हरी आणि शांती दोघांनाही एकमेकांचे विचार पटले. हरी लगेचंच राजाची भेट घ्यायला गेला आणि शांती व रूपा, छायाशी अत्यंत प्रेमाने वागू लागल्या...

हा बदल कशामुळे झाला हे छायाला उमगतच नव्हतं. पण राजाशी बोलणी करून आल्यावर जेव्हा हरीने तिला युवराज व तिच्या लग्नाबद्दल सांगितलं त्यावेळी तिच्या डोक्यात प्रकाश पडला. राजाच्या दवंडीबद्दल आणि युवराजांना मिळालेल्या शापाबद्दल तिनेही ऐकलं होतं. पण छाया काही बोलली नाही. तिने विचार केला, "माझ्या लग्नाने जर काका-काकू व रूपा सुखी होणार असतील आणि माझे हे रूप मिळून युवराज बरे होणार असतील तर माझं जीवन सार्थकी लागलं असंच समजेन मी..." हे विचार मनात आले आणि तिनेही काहीही न बोलता होकार दिला. लग्नाची तिथी ठरली. यथावकाश थाटामाटत विवाह संपन्न झाला. सप्तपदीच्या वेळी वृद्ध युवराजांना चालताही येत नव्हतं. छायाने त्यांना आधार देत सप्तपदी पूर्ण केली. सातवा व शेवटचा फेरा संपन्न झाला आणि आकाशातून विजेची एक भलीमोठी लकेर खाली आली आणि युवराज व छायाभोवती फिरू लागली. लकेरीचा वेग वाढत गेला आणि त्या प्रकाशाने सर्वांचे डोळे दिपले. विजेच्या वर्तुळात हळू हळू विक्रमसिंहांचे रूप व वय परत येऊ लागले आणि छायाचे वय वाढत जाऊन ती वृद्ध दिसू लागली. बराच वेळ चकरा मारून झाल्यावर विजेची ती लकेर पुन्हा आकाशात निघून गेली...


सर्वांनी डोळे उघडले तर युवराज विक्रमसिंह पहिल्यासारखेच तरूण आणि देखणे दिसत होते. त्याचवेळी बाजूलाच उभी असलेली छाया अशक्तपणाने जमिनीवर कोसळली. खोल गेलेल्या डोळ्यांनी तिने आपल्या काका-काकू व रूपाकडे पाहिलं तर ते तिघंही धुसर होत नाहीसे झाले. छायाला पडलेलं पाहून विक्रमसिंह तिला जवळ घेत ते म्हणाले, "छाया, हे काय झालं गं... अगं तू तर इतकी सुंदर होतीस... आणि आता..." आचके देत छाया म्हणाली, "स...स्वामी, बहुतेक माझं आयुष्य एवढंच होतं. प...ण तुम्ही बरे झालात यातच आनंद आहे मला. व...नात तुम्हाला पाहून मनोमन प्रेमात पडले मी तुमच्या. आज ते प्रेम फळाला आलं..." इतकं बोलून छायाने डोळे मिटले. छायाचा देह हातात घेत विक्रमसिंह तिला बोलवू लागले, "छाया... ऊठ छाया... असं सोडून जाऊ नकोस... छाया..." पण त्यांच्या आवाजाचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचवेळी विक्रमसिंहांना शाप देणारे ऋषी तिथे पोहोचले. विक्रमसिंहांसह सर्वांनीच त्यांना पाहिलं. छायाचा देह खाली ठेऊन ऋषींना प्रणाम करत विक्रमसिंह म्हणाले, "मुनीवर, आपण मला उ:षाप दिलात तेव्हा हे नाही सांगितलंत, की मला नवं आयुष्य देणाऱ्या मुलीला तिचा जीव गमवावा लागेल..." युवराजांकडे पाहत ऋषींनी स्मित केलं आणि म्हणाले, "युवराज, हा तर निसर्गनियम आहे...

एका बाजूला ढीग झाला म्हणजे दुसऱ्या बाजूला खड्डा हा होणारच... छायाचं रूप आणि आयुष्य जसं तुम्हाला प्राप्त झालं, तसंच तुमचं रूप आणि आयुष्य तिला मिळालं. पण छायाच्या मृत्यूसाठी तुम्हाला मिळालेला शापच कारणीभूत आहे असं नाही, तर हे एका काळ्या जादूचं फलित आहे..." सर्वजण ऐकत असताना ऋषी पुढे बोलू लागले, "फार वर्षांपूर्वीची घटना आहे. सोनम नावाची एक फार सुंदर परी होती. स्वर्गातील अप्सराही पाणी भरतील इतकं सौंदर्य होतं तिचं. एकदा ही सोनम परी पृथ्वीवर विहार करत असताना सांभ जादुगाराची नजर तिच्यावर पडली. श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीच्या विनाशाचं कारण असलेल्या श्रीकृष्णाच्याच मुलाचं, सांभचं नाव धारण केलेला हा सांभ जादुगार, सोनम परीवर मोहित झाला. त्याने सोनम परीची वाट अडवली आणि तिला तात्काळ लग्नाची मागणी घातली. आपली शक्ती आणि ऐश्वर्य पाहून सोनम नक्कीच होकर देईल असं सांभला वाटत होतं, पण तसं घडलं नाही. सोनम परीसुद्धा सांभची दुष्किर्ती ऐकून होती. तिने सांभला नकार दिला आणि आपल्या वाटेने निघून गेली. जादुगार सांभ, काळ्या जादूचा महारथी होता. अनेक वर्ष महादेवांची आराधना करून त्याने एक वरही मागून घेतला होता. त्या वरानुसार सांभने केलेली जादू कधीच उलटणार नव्हती की तिचा प्रभावही कमी पडणार नव्हता. त्याच्या शक्तीमुळे आणि त्याला मिळालेल्या वरदानामुळे सांभ उन्मत्त झाला होता. अशा या सांभला पहिल्यांदाच नकार मिळाला होता...

सांभ हा नकार पचवू शकला नाही. त्याचा अहंकार दुखावला गेला. क्रोधीत होऊन त्याने सोनम परीवर जादू केली आणि म्हणाला, "मूर्ख परे, तू मला नकार दिलास... ही आहे त्याची शिक्षा... तू मनुष्ययोनीत जन्म घेऊन पृथ्वीवर वास करशील. तिथे तुझे अनेक हाल होतील आणि ज्या दिवशी तुझा विवाह होईल, त्याच दिवशी तुझा मृत्यू होईल. मनुष्ययोनीतून जरी तुझी सुटका झाली, तरी तू पुन्हा परीराज्यात जाऊ शकणार नाहीस... हा...हा...हा..." महादेवांच्या वरदानामुळे सोनम परीही काही करू शकली नाही आणि तिथून लुप्त होत एका गरीब घरात जन्मली. तीच ही छाया. सोनम परीचं रूप तर तिला मिळालं, पण सांभच्या जादूमुळे तिचे अतोनात हाल झाले आणि आज तिचा मृत्यू झाला..."

ऋषी बोलायचे थांबले. युवराज विक्रमसिंह म्हणाले, "मुनीवर, सोनम परीवर केलेली जादू असो किंवा मला मिळालेला शाप असो, पण छायामात्र निष्कारण या सगळ्याला बळी पडली. माझ्यासाठी तिने स्वत:च्या जिवाचीही तमा नाही बळगली. यावर काहीतरी उपाय सांगा मुनीवर..." ऋषी हसले आणि म्हणाले, "युवराज, त्या दुष्ट जादुगार सांभचा अंतच यावरचा एकमेव उपाय आहे. मीसुद्धा त्याच संदर्भात इथे आलो आहे. ज्यावेळी तुमच्यामुळे माझी तपश्चर्या भंगली, त्यावेळी मी ब्रह्मदेवांची आराधना करीत होतो. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून सांभला संपवण्याचा उपाय जाणून घेण्याचा होरा होता माझा. सांभला कळू नये म्हणून त्या वृक्षाला माझं कवच बनवलं होतं मी...

कवच फुटलं आणि सांभला माझ्या अस्तित्वाचा व तपाचा पत्ता लागला. माझ्यासह सर्व ऋषींना संपवण्याचा जणू त्याने चंगच बांधला आहे. अनेक ऋषी सांभच्या रोषाला बळी पडले. जे वाचलेत, ते राजाश्रयाच्या हेतूने माझ्यासह इथवर आले आहेत. राजन, आपली कीर्ती व पराक्रम सर्वदूर आहे. आपण आम्हा सर्वांची सहाय्यता करावी ही विनंती आहे..." ऋषी बोलायचे थांबले. त्यांना वंदन करत महाराज प्रतापसिंह म्हणाले, "मुनीवर, आपण येथे आलात हे आमचे भाग्यच आहे. आपण सर्वांनी येथेच वास करावा. आम्ही प्राणपणाने आपले रक्षण करू..." हे बोलत असतानाच एक भालदार धावत येत म्हणाला, "महाराजांचा विजय असो... महाराज, उत्तरेकडून खूप मोठं वादळ आपल्या दिशेने येत असल्याचं समजलं आहे..."

भालदाराचे हे शब्द ऐकताच ऋषी म्हणाले, "राजन, ते वादळ नसून हिंस्र पशूंनी व भयानक राक्षसांनी भरलेलं सांभ जादुगाराचं सैन्य आहे. ते सैन्य इतकं अफाट आहे की ते एखाद्या वादळासारखंच दिसतं..." महाराजांनी त्वरित आदेश दिला, "प्रधानजी, आपलं सैन्य तयार करा. राज्याला वेढा घाला. तुलनेने आणि संख्येने आपण त्या राक्षसी सैन्यापेक्षा कमी असलो तरी आपण सर्वस्व पणाला लाऊन लढा देणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत त्या दानवांपैकी एकही मुनीवरांपर्यंत पोहोचता कामा नये..." विक्रमसिंहांकडे वळत ऋषी म्हणाले, "युवराज, सांभने आम्हाला संपवण्यासाठी राज्यावर आक्रमण केलं आहे. काळ्या पर्वतापार असणाऱ्या त्याच्या राज्यातून सांभ या युद्धावर लक्ष ठेवत असणार...

हीच येग्य वेळ आहे. अवकाश मार्गाने तुम्ही काळ्या पर्वताकडे जा आणि सांभचा वध करा. सांभच्या बोटात असलेल्या अंगठीतला हिरा तुटल्यावर त्याची जादू संपुष्टात येईल आणि तो एक सामान्य मानव होईल. त्यावेळी त्याचा वध करता येईल. माझ्या तपश्चर्येदर्म्यान मीसुद्धा अनेक सिद्धी मिळवल्या आहेत. त्यांच्याच सहाय्याने मी तुम्हाला हे देत आहे..." बोलता बोलता ऋषींनी हात वर केला आणि क्षणार्धात एक पांढरा शुभ्र घोडा समोर प्रकट झाला. घोड्याच्या खोगीराला एक धनुष्य, एक बाण आणि एक तलवार लावली होती. ऋषी पुढे म्हणाले, "युवराज, हे अश्व वाऱ्याच्या वेगाने तुम्हाला काळ्या पर्वताकडे घेऊन जाईल. तिथून पुढे मात्र तुम्हालाच जावं लागेल...

हा दिव्य धनुष्य, महापराक्रमी अर्जुनाच्या गांडीव धनुष्यापासून तयार झाला आहे आणि या बाणाची पात, सांभच्या बोटात असलेल्या हिऱ्याचाच एक भाग आहे. याच बाणाने तुम्हाला त्या हिऱ्याचा वेध घ्यायचा आहे. आणि या दिव्य तलवारीने तुम्हाला सांभचा शिरच्छेद करता येणार आहे. पण ध्यानात ठेवा युवराज, सांभचं शीर इतरत्र कुठे न पडता त्याच्याच देहावर पडलं तरच सांभचा समूळ नाश होईल. अन्यथा, जिथे सांभचं शीर स्पर्श करेल तिथून नवीन सांभ जन्मास येईल. जा युवराज, विजयी भव:.." धनुष्य-बाण आणि तलवार धारण करत युवराज विक्रमसिंहांनी महाराज व महाराणींचा आशीर्वाद घेतला, आणि ते घोड्यावर स्वार झाले. घोड्याने चौखूर उधळले आणि क्षणार्धात तो हवेत उडाला...

राज्यावर चाल करून येणारं वादळ आता काही कोसच लांब होतं. महाराज प्रतापसिंहांनी लगबगीने एक दालन स्वच्छ करून घेतलं. महाराणी निर्मलादेवींनी ते दालन फुलांनी आणि सुगंधी अत्तरांनी सजवलं. छायाचा देह त्या दालनात असलेल्या पलंगावर ठेवण्यात आला. ऋषींनी तिथेच बसून वेदपठण व मंत्रोच्चार सुरू केले. महाराणी निर्मलादेवी आणि इतर दास्याही त्या दालनात पोहोचल्या. महाराजांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि ते उत्तरेकडील द्वारावर गेले. एकटक त्या वादळाकडे पाहत आकाशाकडे पाहून हात जोडत ते म्हणाले, "देवा, युवराजांचं रक्षण कर. त्यांना विजयी कर आणि आम्हास या संकटाचा सामना करण्याची शक्ती दे..." हे बोलून म्यानातून तलवार बाहेर काढून महाराज प्रतापसिंह सर्वांना उद्देशून म्हणाले, "सैनिकहो, आपण शेवटच्या श्वासापर्यंत या वादळाचा सामना करायचा आहे आणि त्या आसुरांना आत प्रवेश मिळवू द्यायचा नाही..." सर्वांनी आपापली हत्यारं उंचावली आणि एकच जल्लोष केला. ते वादळ आता वेशीपासून काही अंतरावर येऊन ठेपलं होतं. धुरळा कमी होत गेला आणि हिंस्र पशू आणि अक्राळ-विक्राळ राक्षस समोर दिसू लागले. ते सैन्य पाहून सर्व सैनिक घाबरले खरे, पण महाराज प्रतापसिंहांचा पराक्रम आठवून पुन्हा युद्धाला सज्ज झाले...

दुसरीकडे हवेत उड्डाण केलेल्या पांढऱ्या घोड्यावर बसलेल्या युवराज विक्रमसिंहांनी जेव्हा चाल करून येत असलेलं अफाट सैन्य पाहिलं तेव्हा ते म्हणाले, "देवा, राज्याचं, मातोश्री आणि पिताश्रींचं रक्षण कर... चला अश्वराज, त्वरा करा आणि मला त्या काळ्या पर्वताच्या प्रदेशाकडे घेऊन चला..." घोड्याने मान हलवली आणि उडण्याचा वेग वाढवला. काही क्षणातच क्षितिजाजवळ काळ्या पर्वतरांगा दिसू लागल्या. घोडा हळू हळू खाली आला आणि एका पर्वताच्या पायथ्याशी येऊन उभा राहिला. घोडा थांबला तसे युवराज विक्रमसिंह खाली उतरले आणि घोड्याच्या मानेवर हात फिरवत तो प्रदेश न्याहाळू लागले...

घोडा म्हणाला, "क्षमा करा युवराज. यापुढे मी आपली साथ नाही देऊ शकणार. या पर्वतापलिकडून त्या दुष्ट जादुगार सांभचा प्रदेश सुरू होतो. इथून पुढचा प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावा लागेल. वळणावर ती गुहा दिसते ना, ते आहे प्रवेशद्वार सांभच्या दुनियेत प्रवेश करण्याचं. तिथे एकही पहारेकरी नाही. आत प्रवेश करताच अनेक जादूमय संकटं तुमच्यासमोर असतील. जादूशी तुम्ही कदाचित नाही लढू शकणार, पण नीट विचार केलात तर बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडेल तुम्हाला. तुमच्या विजयावर आता सर्वांचे प्राण अवलंबून आहेत..." घोडा शांत झाला. विक्रमसिंहांनी पुन्हा घोड्याच्या मानेवर हलकेच थाप मारली आणि तलवार सरसावत ते गुहेकडे जाऊ लागले. गुहेच्या तोंडाजवळ पोहोचताच त्यांनी आत डोकावलं. तिथे प्रचंड शांतता होती. वाऱ्याच्या थंडगार झुळुकी वाहत होत्या. अंधार होता, पण समोरची काही पावलांपर्यंतची वाट दिसेल इतपत उजेड दिसत होता. विक्रमसिंह पुढे चालू लागले. जसे ते गुहेच्या आत गेले तसं गुहेचं द्वार बंद झालं, "हा...हा...हा..." हसण्याचा हा आवाज सर्वत्र घुमू लागला. विक्रमसिंहांनी चहू बाजूंनी नजर फिरवली पण कोणीच दिसत नव्हतं. तो आवाज पुन्हा बोलू लागला, "ये विक्रमसिंह ये... धाडसी आहेस... एकटाच आलास... आता आलाच आहेस तर माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, मीच तुला दाखवतो. बघ तुझ्या डावीकडे..."


विक्रमसिंहांनी डाव्या बाजूला पाहिलं तर एक बंद दरवाजा त्यांना दिसला. विक्रमसिंह त्या दाराकडे पाहतच होते की पुन्हा आवाज आला, "विक्रमसिंहा, हा दरवाजा मी माझ्या शक्तीने बंद केला आहे. बघू तुला उघडता येतो का... लवकरात लवकर उघड तो दरवाजा, अन्यथा तुझ्या स्वागतासाठी येणाऱ्यांकडून होशील तू वजा... हा...हा...हा..." आवाज बंद झाला. विक्रमसिंह एक टक त्या दाराकडे पाहत होता. भल्यामोठ्या त्या दाराला एक लोखंडी कुलूप होतं. पण किल्ली कुठे दिसत नव्हती. विक्रमसिंहांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि आजू-बाजूच्या भिंती फोडून पाच राक्षस बाहेर आले आणि विक्रमसिंहांच्या दिशेने येऊ लागले...

तिथे राज्याबाहेरच्या रणावर युद्धाचं रणशिंग वाजलं होतं. चाल करून येणाऱ्या शत्रूकडे पाहत महाराज प्रतापसिंहांनी पुन्हा घोषणा केली, "सैनिक हो, या सर्वांना इथेच थोपवायचं आहे. राज्याची वेस ओलांडू द्यायची नाही कोणालाही. आक्रमण..." महाराजांचा आदेश मिळताच सर्व सैनिकांनी दानवी सैन्याकडे धाव घेतली आणि भीषण युद्धाला प्रारंभ झाला. काही दानवांना सैनिक मारत होते तर कुठे जनावरांच्या हाती काही सैनिकांचा फडशा पडत होता. महाराज प्रतापसिंहही आपल्या सैन्यासोबत त्या दानवांशी दोन हात करत होते. महाराज प्रतापसिंहांचा इशारा मिळताच तोफांना बत्ती दिली गेली आणि एकाच वेळी अनेक तोफा आग ओकू लागल्या...

दुसरीकडे काळ्या पर्वतातल्या त्या गुहेत विक्रमसिंहांना घेरून ते पाच राक्षस उभे होते. सात-सात फुटी उंचीच्या त्या राक्षसांच्या दोन्ही हातात एकेक शस्त्र होतं. विक्रमसिंहांनी तलवार सरसावली आणि विचार करू लागले, "या दानवांशी लढताना जर मी इथेच अडकलो तर सांभपर्यंत नाही पोहोचू शकणार. हा दरवाजा उघडायला काहीतरी शक्कल लढवायला हवी. त्यांनी दाराकडे नीट पाहिलं. त्या दाराला अनेक छोटे छोटे भाले लावले होते. काही भाले वरच्या दिशेने रोखले होते तर काही खालच्या. पण पाच भाले समोरच्या दिशेने रोखलेले दिसत होते आणि त्या पाचही भाल्यांचे रंग वेगवेगळे होते. भाल्यांवरून राक्षसांकडे पाहता विक्रमसिंहांना जाणवलं, की त्या राक्षसांच्या त्वचेचे रंग आणि भाल्यांचे रंग सारखे आहेत. विक्रमसिंहांना मार्ग सापडला आणि ते हसले...

त्या पाचही राक्षसांनी विक्रमसिंहांना गराडा घातला होता. त्यांनी एकाचवेळी झडप घातली आणि विक्रमसिंहांनी त्याचवेळेस कोलांटी उडी मारत गराड्यातून स्वत:ची मुक्तता केली. ते दारापर्यंत पोहोचले. निळ्या रंगाचा भाला खेचून काढत त्यांनी निळ्या राक्षसाच्या दिशेने भिरकावला. भाला राक्षसाच्या आरपार गेला आणि पुन्हा त्याच्या जागी येऊन बसला. हे पाहून विक्रमसिंह विचार करू लागले, "आता काय करावं... या भाल्याचा त्या राक्षसावर काहीच परिणाम झाला नाही... यांच्यापासून कसं सोडवावं स्वत:ला..." विचार करत असतानाच त्यांनी पाहिलं, की पाचही राक्षस एका ओळीत असून जवळ येत आहेत. ते राक्षस होते त्याच रंगांच्या क्रमाने ते भालेही होते. विक्रमसिंहांना दुसरी युक्ती सुचली...

त्यांनी पाचही भाले खेचून काढले आणि आपल्या दिव्य धनुष्यावर त्यांना लावत एकाचवेळी पाचही राक्षसांवर भिरकावले. पाचही भाले एकाचवेळी पाचही राक्षसांच्या पोटात शिरले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. पाचही राक्षस गायब होऊन तिथे त्या त्या रंगांची चक्र दिसू लागली. सगळी चक्र एकत्र फिरता फिरता दरवाजाच्या फटीत शिरली. दाराला एक झटका बसला आणि मोठा आवाज करत तो दरवाजा उघडला. विक्रमसिंहांनी आत डोकावलं आणि पुन्हा आवाज आला, "हा...हा...हा... हुशार आहेस विक्रमसिंह. या दरवाजाला आजवर कोणीच पार करू शकलं नाही आणि तू तो उघडलास... ये आत ये. तुझ्या स्वागतासाठी आम्ही स्वत: आलो आहोत..." विक्रमसिंह दारात उभे राहिले. समोर एका अंतरावर सांभ जादुगार उभा होता. त्याच्यापासून दारापर्यंत एक सपाट जमीन पसरलेली होती. विक्रमसिंह विचार करू लागले, "नुसती सपाट जमीन... हे इतकं सोप्पं असेल...!!!"

तिथे रणांगणावर युद्ध आपल्या चरम सीमेवर पोहोचलं होतं. दानवांचं सैन्य कमकुवत पडत होतं. अखेर महाराज प्रतापसिंहांनी शेवटच्या दानवाचा शिरच्छेद केला आणि एकच जल्लोष झाला. "आपण हे युद्ध जिंकलो..."  "त्यांचा पराभव झाला...", अशा आरोळ्या सगळीकडे निनादत होत्या. इतक्यात घोड्यावर स्वार झालेला एक सैनिक प्रतापसिंहांजवळ पोहोचला. महाराजांना वंदन करून तो म्हणाला, "महाराजांचा विजय असो... महाराज, उत्तरेकडून अजून एक वादळ येताना दिसत आहे. हे वादळ आधीच्या वादळापेक्षा दसपटीने मोठं आहे आणि अधिक वेगाने आपल्याकडे सरकत आहे..." हे ऐकताच महाराज प्रतापसिंहांनी आपल्या सैन्यावर नजर फिरवली. काही सैनिकांना वीरमरण आलं होतं, बरेच सैनिक जखमी झाले होते. युद्ध खूप वेळ चालल्यामुळे सैनिक थकलेही होते...


महाराज प्रतापसिंह स्वत: जखमी झाले होते. त्यांनी विचार केला, "सैन्य थकलं आहे, पण थांबून चालणार नाही. इथे पूर्ण सेना आहे, पण तिथे युवराज एकटेच आहेत..." त्यांनी निर्धार केला आणि म्यान केलेली तलवार पुन्हा बाहेर काढत सर्वांना उद्देशून म्हणाले, "सैनिकहो, एक लढाई आपण जिंकली, पण अजून एक मोठं वादळ आपल्या दिशेने येत आहे. राज्यातल्या सर्वांच्या जिवाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. आता माघार नाही. आम्ही या वादळाचा सामना करणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत आहात...???" महाराजांना पाहून सर्व सैनिक पुन्हा उठून उभे राहिले. आपापली शस्त्र हवेत उंचावत सर्वांनी महाराजांना लढण्याची ग्वाही दिली. तिथे दालनात एकेक बातमी पोहोचत होती. महाराणी निर्मलादेवींनी आकाशाच्या दिशेने हात जोडले आणि म्हणाल्या, "देवा गजानना, सर्व सैन्याचे, महाराजांचे आणि युवराजांचे रक्षण कर..."

दुसरीकडे काळ्या पर्वताच्या गुहेत एक टप्पा पार करून विक्रमसिंह मैदानासमोर उभे होते. समोर हसत असलेल्या सांभ जादुगाराला पाहताक्षणीच विक्रमसिंहांनी त्याच्याकडे धाव घेतली. ते दोन-तीनच पावलं धावले असतील की जमीन हादरली. जमिनीचा एक मोठा चौकोनी भाग वर-खाली हालायला लागला. तंरगणाऱ्या एका मोठ्या खडकासमान दिसणाऱ्या त्या जागेवर विक्रमसिंहांनी स्वत:ला सावरलं. त्यांनी त्यांच्या तीनही बाजूंना पाहिलं. खोल अंधारी दरी आ वासून आपल्या भक्षाची वाट पाहत होती. विक्रमसिंहांच्या समोर हलत्या चौकोनाच्या पलिकडे जादुगार सांभ विचित्र हसत उभा होता. तो हसत-हसतच म्हणाला, "हा...हा...हा... काय विक्रमसिंह, इतकं सोप्पं वाटलं तुला माझ्यापर्यंत पोहोचणं... अरे ही तर सुरुवात आहे. आता बघ माझी शक्ती..."

बोलता बोलता सांभने त्याच्या बोटातल्या अंगठीचं चुंबन घेतलं आणि हात समोर धरला. अडखळत स्वत:ला सावरताना विक्रमसिंहांनी पाहिलं, तर अंगठीतला खडा चमकू लागला होता. विक्रमसिंहांनी विचार केला, "हाच तो अनमोल व जादुई हिरा ज्यात या सांभची शक्ती सामावली आहे. या हिऱ्याला नष्ट करायला हवं..." विक्रमसिंह या विचारात असतानाच खड्यातून निघालेली किरणं हलत्या जमीनीवर पडली आणि अचानक ताडाच्या ऊंचीचे साप तिथे प्रगट झाले. डंख मारण्याच्या तयारीत असलेल्या सापांपासून कसं वाचायचं याचा विचार करत असताना विक्रमसिंहांना तिथे पडलेली एक लोखंडी शिडी दिसली. विक्रमसिंहांनी ती शिडी उचलण्याचा प्रयत्न केला पण जणू काही ती जमिनीत घट्ट रुतून बसली होती. साप जवळ येताच विक्रसिंहांनी शिडी सोडून तलवार हाती घेतली आणि सापावर वार केला...

तलवार सापाच्या देहाच्या आर-पार गेली. विक्रमसिंहांचा वार फुका गेला आणि सापाने डंख मारण्यासाठी फणा खाली आणला. फण्याला चुकवण्यासाठी विक्रमसिंहांनी कोलांटी उडी मारली आणि त्या सापापासून दूर जात जमिनीवर स्थिरावला. सांभ म्हणाला, "विक्रमसिंह, हे माझ्या शक्तीने निर्माण झालेले सर्प आहेत. सामान्य शस्त्रांनी त्यांना काहीच होणार नाही, पण त्यांच्या विषारी डंखाने तू क्षणार्धात मरशील आणि तिथे तुझं राज्यही मी गिळंकृत करेन... हा...हा...हा..." एकीकडे सांभ बोलत होता तर समोर विक्रमसिंह सापांच्या डंखांपासून स्वत:चा बचाव करत होते. त्यांनी पुन्हा कोलांटी उडी मारली आणि उभे राहिले. एक साप त्यांच्या अगदी जवळ आला होता पण त्याने विक्रमसिंहांना डंख नाही मारला. सापाने खाली पाहिलं आणि जोरात फुंकारला. विक्रमसिंहांनी पाहिलं तर ते एका शिडीवर उभे होते...

विक्रमसिंहांनी सभोवार नजर फिरवली तर त्या मैदानात जागोजागी शिड्या होत्या आणि त्या मैदानापलिकडे जाऊन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचल्या होत्या. विक्रमसिंह विचार करू लागले, "या शिड्यांवर स्वार होऊन आम्ही सांभपर्यंत पोहोचू तर शकतो, पण तिथे पोहोचताच सांभ त्याच्या जादूने आम्हाला कैद करेल, कदाचित यमसदनीही पाठवेल. तिथे राज्याची भिस्तही आमच्यावर आहे. काहीही करून मैदान पार करण्यापूर्वी तो खडा नष्ट करायला हवा, पण सांभ अजूनही आपल्या बाणाच्या टप्प्याबाहेर आहे..." विचार करता करता विक्रमसिंहांना एक युक्ती सुचली. एका शिडीवरून दुसरीवर उड्या मारत आणि मध्ये येणाऱ्या सापांना चुकवत विक्रमसिंह पुढे जाऊ लागले. सांभच्या बरोब्बर समोर एक शिडी होती. विक्रमसिंह जिथे उभे होते तिथून त्यांनी ती शिडी व आजू-बाजूची जागा नीट न्याहाळली आणि लगेच त्या शिडीवर उडी मारली...


विक्रमसिंहांच्या अपेक्षेप्रमाणे ते सांभच्या समोर येताच सांभने त्यांच्यावर जादू करण्यासाठी जसा हात पुढे केला, तशी विक्रमसिंहांनी त्यांच्या उजव्या बाजूला उडी घेतली. तिथेच नेमका एक साप उभा होता. आपलं भक्ष हवेतून आपल्याकडेच येत आहे हे पाहून सापाने आपला अजस्त्र जबडा उघडला. विक्रमसिंहांनी त्वरेने धनुष्यावर बाण चढवला आणि हवेतच फिरून तो बाण सांभच्या दिशेने भिरकावला. बाणाने चोख काम करत खड्याच्या बरोब्बर मधोमध आघात केला. खड्याचे तुकडे होऊन अंगठी जमिनीवर पडली. त्याच क्षणी ते सर्व साप नाहीसे झाले आणि विक्रमसिंहांचे पाय जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच ती हलणारी जमीन शांत झाली. विक्रमसिंहांनी वळून पाहिलं तर अचंभित झालेला सांभ सगळीकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होता...

तिथे रणांगणावर येणाऱ्या वादळाचा सामना करण्यासाठी महाराज प्रतापसिंह आणि त्यांचं सैन्य सज्ज होतं. त्या वादळाने प्रचंड वेगाने सर्वांवर झडप घातली आणि त्याचक्षणी सर्व दानव व श्वापदांची माती झाली. रणांगणावर पसरलेली ती काळीठिक्कर माती पाहून महाराज प्रतापसिंहांनी घोषणा केली, "आपण हे युद्ध जिंगलो आहोत... दानवसेना पराभूत झाली आहे..." हे ऐकताच सर्वांनी जल्लोष केला. ही बातमी राजवाड्यात पोहोचली आणि आनंदछटा पसरली. छायाच्या मृतदेहाजवळ जप करणारे ते ऋषी म्हणाले, "देवा गजानना, तुझीच कृपा आहे रे... युवराज विक्रमसिंह, आता सांभचा वध करून ही काळी जादू कायमची संपुष्टात आणा..." ऋषींचं हे वाक्य ऐकून दालनात सर्वांनी श्री गणेशाचं स्मरण करत हात जोडले आणि उत्तरेकडे पाहत युवराज विक्रमसिंहांच्या नावाचा धावा केला...

तिथे गुहेमध्ये सांभने पुन्हा जादू करण्याचा प्रयत्न केला पण काहीच घडलं नाही. हे पाहून सांभ चवताळला. विक्रमसिंहांकडे रोखून पाहत तो म्हणाला, "विक्रमसिंह, माझी जादू संपवून तुला काय वाटलं, तू मलाही संपवलंस...  माझ्या काळ्या विद्येने मी मृत्यूला आधीच वश केलं आहे. आता तुला ठार मारून मी पुन्हा माझी शक्ती मिळवेन... हा...हा...हा..." बोलता बोलता सांभने त्याची तलवार काढली आणि विक्रमसिंहांवर धावून गेला. विक्रमसिंहसुद्धा या हल्ल्यासाठी तयारच होते. आपल्या तलवारीने त्यांनी सांभचा वार अडवला आणि एका लाथेसरशी सांभला दूर लोटलं. हवेत मागे मागे जात सांभ दूर गेला आणि जमिनीवर पडला. तो पुन्हा उभा राहिला आणि आता तो पलटवार करणार इतक्यात त्याचे पाय लटपटू लागले, हात कापू लागले. तलवार गळून पडली आणि त्याच्या अंगभर सुरकुत्या दिसू लागल्या...

आपला अंत जवळ आला आहे हे जाणवताच सांभने कमरेला खोचलेली आपली कट्यार बाहेर काढली आणि विक्रमसिंहांना म्हणाला, "सांभच्या या देहाचा अंत जरी झाला तरी सांभ अजून संपलेला नाही..." बोलता बोलताच त्या कट्यार स्वत:च्या मानेवरून फिरवली. रक्ताची चिळकांडी उडाली आणि सांभचं शीर खाली पडू लागलं. विक्रमसिंहांना त्याच क्षणी ऋषींचे शब्द आठवले, " सांभचं शीर इतरत्र कुठे न पडता त्याच्याच देहावर पडलं तरच सांभचा समूळ नाश होईल..." जराही वेळ न दवडता विक्रमसिंहांनी सांभच्या पायावर वार केला. सांभचे पाय तुटले आणि त्याचं शरीर एक झटका देत जमिनीवर पडलं. त्याच क्षणाला सांभचं शीरही त्याच्या शरीरावर पडलं. एक विस्फोट झाला. सांभचा देह जळू लागला आणि काही क्षणात एक काळा धूर हवेत विरून गेला. तो सगळा काळा प्रदेश हळू हळू प्रकाशमय होऊ लागला. काळे पर्वत नाहीसे होऊन सुंदर हिमशिखरे तिथे दिसू लागली. जमिनीवर नदी वाहू लागली आणि फुलांनाही बहर आला...

हे सर्व पाहून विक्रमसिंह अचंभित झाले. सांभ ज्या जागी पडला होता, आता त्या जागी एक प्रकाशज्योत दिसू लागली. विक्रमसिंह ती ज्योत पाहतच होते, की घोडा त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, "युवराज, ही ज्योत म्हणजेच सोनम परी आहे. त्वरा करा युवराज, ही ज्योत घेऊन आपल्याला छायाकडे जायला हवं..." विक्रमसिंहांनी ती ज्योत आपल्या हातात ठेवली आणि घोड्यावर स्वार झाले. घोडा हवेत झेपावला आणि काही क्षणातच राजवाड्यापर्यंत येऊन पोहोचला. विक्रमसिंहांना पाहून महाराज, महाराणी, सारं सैन्य, ऋषीगण आणि संपूर्ण प्रजाही आनंदली. दालनात पोहोचताच मंत्रोच्चारांच्या सानिध्यात विक्रमसिहांनी ती ज्योत पलंगावर ठेवलेल्या छायाच्या देहात अलगद प्रविष्ट केली...

छायाच्या निपचित पडलेल्या देहाला ज्योतीचा स्पर्श होताच एक विजेची लकेर तिच्या शरीरातून बाहेर आली आणि सभोवताली फिरू लागली. ती लकेर अधिकच मोठी आणि वेगवान होत गेली. त्या फिरणाऱ्या विजेरीवर छायाचा देह हवेत तरंगू लागला. देहाच्या सर्व बाजूंनी प्रकाशकिरणं बाहेर पडू लागली. त्याच प्रकाशात छायाचा देह लुप्त झाला. तिथे असलेला प्रकाश इतका वाढला ती सर्वांचे डोळे दिपले. हळू हळू प्रकाश कमी होत गेला आणि एक तेजस्वी दिव्य रूप आकार घेऊ लागलं. सर्वांनी हळू हळू डोळे उघडले. समोर सुवर्ण पोषाख परिधान केलेली, सुवर्ण पंख असलेली एक हसतमुख परी उभी होती. सर्वांनी परीचं अभिवादन केलं. सोनम परी म्हणाली, "महाराज प्रतापसिंह आणि युवराज विक्रमसिंह, तुमच्या असामान्य साहसामुळे आज मला माझं दिव्यरूप पुन्हा प्राप्त झालं. तुमचे मनापासून धन्यवाद..."

सर्वजण त्या दृश्याने मोहित झाले होते, पण युवराज विक्रमसिंह मात्र कासाविस दिसत होते. निर्मलादेवींना विक्रमसिंहांची भावना समजली. त्यांच्या जवळ येत निर्मलादेवींनी विचारलं, "काय झालं युवराज, तुम्ही अस्वस्थ का आहात...?? छायाची आठवण आली का...??" युवराजांनी मानेनेच होकार दिला. ऋषी पुढे होत म्हणाले, "युवराज, छाया एक निमित्त होतं ही संपूर्ण घटना तडीस नेण्याचं. तिचं कार्य पूर्ण झालं आणि ती मुक्त झाली..." युवराज विक्रमसिंह काही बोलणार इतक्यात सोनम परी बोलू लागली, "मुनीवर, मी एक परी आहे. मला जसं अमरत्व प्राप्त आहे तसं चिरतारुण्यही प्राप्त आहे. पण छाया, तिने तर सदैव दु:खच भोगलं आहे. आता कुठे तिचे सुखाचे दिवस आले होते आणि माझ्यामुळे तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं. मला छायाचं आयुष्य परत देण्याची इच्छा आहे..."

सर्वजण सोनम परीकडे पाहत होते. छायाच्या मनातलं विक्रमसिंहांबद्दलचं प्रेम सोनम परीच्या डोळ्यांत दाटलं होतं. तिच्यासमोर हात जोडून ऋषी काही बोलणार इतक्यात, "ते कदापि शक्य नाही..." या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधलं. आवाजाच्या दिशेने सर्वांनी पाहिलं तर हवेत प्रकाशाचे मोठे ढग दिसत होते. ते ढग लुप्त होऊन एक देवदूत आणि काही इतर पऱ्या तिथे प्रकटल्या. सोनम परीने, "पिताश्री..." अशी हाक मारत त्या देवदुताला अलिंगन दिलं. त्याचसोबत तिथे जमलेल्या इतर पऱ्यांचीही गळाभेट घेतली. तो देवदूत म्हणाला, "पुत्री, छायाला तिचं आयुष्य परत देणं शक्य नाही. तिला जीवन द्यायचं झालं तर तुझं अस्तित्व संपवायला हवं... यासाठी तू तयार होशील का...!!" हे शब्द ऐकताच सोनम परीने काही क्षण विचार केला आणि पुन्हा एकदा युवराज विक्रमसिंहांकडे पाहिलं. मग देवदुताकडे वळून ती म्हणाली, "पिताश्री, मी तयार आहे. छायाच्या मनातलं प्रेम मी पूर्णत्वाला नेईन..."

"धन्य आहेस तू सोनम परी आणि धन्य ती प्रेमाची उत्कट भावना. आमचे आशीर्वाद आहेत... तू छायाच्या रूपाने सुखाचा संसार करशील. छायाचं जीवित कार्य पूर्ण झाल्यावर तो देह जेव्हा पंचतत्वात विलीन होईल तेव्हा सूक्ष्म रूपाने तू परी राज्यात परत जाशील जिथे तुला तुझं हे दिव्य रूप प्राप्त होईल..." ऋषींनी दिलेल्या या आशीर्वादाला स्वीकारत सोनम परी देवदुताकडे वळत म्हणाली, "पिताश्री, मी तयार आहे..." पाणावलेल्या डोळ्यांनी देवदुताने व इतर पऱ्यांनी सोनम परीला पुन्हा अलिंगन दिलं. देवदूत म्हणाला, "पुत्री, मनुष्यरूपात तुला तुझं हे दिव्य रूप आणि विद्या यांचा विसर पडेल. पण तू परी राज्यात परतलीस की हे सर्व तुला पुन: प्राप्त होईल..." बोलता बोलता त्यांनी त्याच्या हातातली जादूची छडी सोनम परीवर फिरवली. पुन्हा एक विजेची लकेर सोनम परी भोवती फिरू लागली. प्रकाश वाढत गेला. सोनम परी प्रकाशात लुप्त झाली आणि पलंगावर अलगदपणे छायाचं शरीर विसावलं...

छायाने डोळे उघडले. सर्वांकडे पाहताना तिला विक्रमसिंह दिसले. "स्वामी..." अशी साद घालून तिने आपला हात विक्रमसिंहांकडे नेला. विक्रमसिंहांनीसुद्धा छायाचा हात आपल्या हाती घेतला. ते दृश्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. देवदूत व पऱ्यांना सर्वांनी नमस्कार करताच ते सर्व लुप्त झाले. विक्रमसिंह आणि छायाने ऋषींना वाकून नमस्कार केला आणि ऋषींनी प्रसन्न मुद्रेने, "कल्याण हो..." असा आशीर्वाद दिला. पुढे विक्रमसिंह व छायाने सुखाचा व प्रेमाचा संसार तर केलाच, पण महाराज प्रतापसिंह व महाराणी निर्मलादेवी निवर्तल्यानंतर नव्या महाराज विक्रमसिंह आणि महाराणी छायादेवीने प्रजेची मनापासून काळजीही घेतली...



समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment