Monday, June 28, 2021

माऊथ ऑर्गन...

रात्रीचे आठ वाजले होते. रेवा घरात एकटीच नवऱ्याची वाट पाहत बसली होती. तेवढ्यात लाईट गेले. नवऱ्याच्या ट्रांस्फरमुळे रेवा पहिल्यांदाच आपल्या शहरापासून इतक्या लांब आली होती. एकलकोंडं घर आणि त्यात लाईट गेलेले. ती घाबरली...

सगळ्या दारं-खिडक्या बंद करून रेवा गॅलरीत बसली. चंद्राचा मंद मंद प्रकाश पडत होता. ती शांतताही तिच्या अंगावर शहारा आणत होती. इतक्यात सुरेल आणि मंजूळ आवाज तिच्या कानी पडला. कोणीतरी माऊथ ऑर्गन वाजवत होतं. किशोर कुमारची अनेक गाणी एकामागून एक ऐकत रेवा मंत्रमुग्ध झाली...

थोड्याच वेळात बेल वाजली. माऊथ ऑर्गनच्या त्या सुरेल मैफलीत रेवा इतकी गुंग झाली होती, की लाईट कधी आले, बेल कधी वाजली हे तिला समजलंच नाही. सूर बंद झाले होते. रेवाने दार उघडलं तर समोर तिचा नवरा होता. दररोज रात्री हाच प्रकार घडू लागला. रात्री आठला लाईट जायचे. संध्याकाळची गॅलरीत एकटीच नवऱ्याची वाट पाहणारी रेवा, माऊथ ऑर्गनच्या सुरेल सोबतीत रंगून जायची आणि नवरा येताच माऊथ ऑर्गनचे सून बंद व्हायचे. रेवा रहायची तो भाग तसा कमी वस्तीचा असल्याने रेवाला थोडी भिती वाटायची, पण माऊथ ऑर्गनचे ते सूर तिची छान सोबत करायचे...

दीडेक वर्षाने रेवाच्या नवऱ्याची पुन्हा ट्रांस्फर झाली. आवरा-आवर करताना दोघांना कपाटामागे एक माऊथ ऑर्गन सापडला. त्याबद्दल त्यांनी घरमालकाला विचारलं तेव्हा त्यांचा डोळ्यात अश्रू आले. डोळे पुसत ते म्हणाले, "हा माऊथ ऑर्गन माझ्या मुलाचा आहे. तो याच घरात रहायचा. त्याला किशोर कुमारची गाणी खूप आवडायची. इथले दिवे बंद करून तासंतास त्याच्या ऑर्गनवर तो गाणी वाजवायचा...

दोन वर्षांपूर्वी तो गेला. तेव्हापासून हे घर आम्ही बंदच ठेवलं होतं. तो गेल्याच्या सहा महिन्यांनी हे घर पुन्हा उघडलं ते तुमच्यासाठी. माझा मुलगा गेला, पण त्याचा माऊथ ऑर्गन कधीच सापडला नाही. आज तुमच्यामुळे हा माऊथ ऑर्गन परत मिळाला. धन्यवाद..." इतकं बोलून माऊथ ऑर्गनला छातीशी कवटाळून घरमालक निघून गेला. रेवाचा नवराही त्याच्या कामाला लागला...

रेवा मात्र पाठमोऱ्या जाणाऱ्या घरमालकाकडे पाहत तशीच उभी होती. त्यांच्या हातातल्या माऊथ ऑर्गनवर प्रकाश पडून तो चमकला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी रेवाने दोनच शब्द उच्चारले, "थँक यू..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, June 26, 2021

माझा साहसानुभव...

थरारक बचाव...

मंडळी रेल्वेचं फाटक जर बंद असेल, तर ते ओलांडायचं नसतं हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. गाड्या जाण्याची ती वेळ असते. एकदा का गाड्या गेल्या, की फाटक उघडतं आणि आपण जातो आपल्या दिशेने. एक दिवस मी बंद फाटक ओलांडलं, आणि गाठीशी आला एक थरारक अनुभव...

प्रसंग आहे १९९३ सालचा. मी तेरा वर्षांचा होतो. त्यावेळी गोरेगाव (मुंबई) रेल्वे स्टेशनला लागूनच एक फाटक होतं. पिवळ्या-काळ्या रंगांचे आडवे टाकलेले बांबू म्हणजे फाटकाचे दरवाजे होते. वर्षभरापूर्वीच म्हणजे १९९२मध्ये ऑगस्ट क्रांती राजधानी ही गाडी सुरू झाली होती. मुंबई सेंट्रलवरून निघालेली ही गाडी भरधाव वेगाने गोरेगाव वेस्टच्या फाटकाच्या जवळच्या ट्रॅकवरून जायची...

एक दिवस मी आईसोबत गोरेगाव वेस्टला गेलो होतो. जाताना स्टेशनबाहेरच्या फ्लायओव्हर ब्रीजवरून गेलो आम्ही. पण येताना ठरवलं, फाटकाच्या दिशेने यायचं. काम झालं. फाटकाच्या जवळ असलेल्या अंबा माता मंदिरात जाऊन निघालो आम्ही घराकडे. फाटकाजवळ आलो तर ते बंद होतं. तिथला गार्ड सर्व पादचाऱ्यांना ओरडून सांगत होता, "कोई क्रॉस मत करना | राजधानी जाएगा अभी |"

ऑगस्ट क्रांती राजधानी येण्याची वेळ झाली होती. ट्रॅकवर मुंबईच्या फास्ट लोकल काय त्या दिसायच्या. लांब पल्ल्याच्या गाड्या पाहण्याचा योग आलाच नव्हता कधी. "पाहू तरी ही गाडी कशी दिसते..." असा विचार करत मी आडव्या बांबूजवळ येऊन उभा राहिलो. आई अर्थातच माझ्या शेजारीच उभी होती. सायरन ऐकू आला आणि ऑगस्ट क्रांती राजधानी लांबून येताना दिसली. मी तिथे पाहतच होतो इतक्यात एका मांजराच्या पिल्लाचा आवाज आला...

आता मांजर हा माझा अतीव प्रिय प्राणी. मी लगेच इथे-तिथे पाहत ते पिल्लू शोधू लागलो. दोन ट्रॅकपैकी एकावर एक छोटं पिल्लू, गोरेगाव स्टेशनच्या दिशेला पाहत बसलं होतं. हे तेच ट्रॅक होते ज्यांवरून ऑगस्ट क्रांती राजधानी येत होती. मी ते पिल्लू आईला दाखवलं. आई म्हणाली, "अरे ट्रेन जवळ आल्यावर जाईल ते उडी मारून..." आई हे म्हणाली खरं, पण ते पिल्लू गेलंच नाही तर... त्याला गाडीबद्दल कळलंच नाही तर... हे विचार मनात आले आणि काळजात धस्स झालं...

राजधानी एव्हाना बरीच पुढे आली होती. मागचा पुढचा कसलाही विचार न करता मी बंद फाटकातून आत गेलो. त्याच ट्रॅकच्या बाजूने राजधानीच्या दिशेने धावत जाऊन मी झटकन त्या पिल्लाला धरलं आणि बाजूला झालो. क्षणार्धात 'धाड धाड' करत ऑगस्ट क्रांती राजधानी त्याच ट्रॅकवरून निघून गेली. दोन-तीन सेकंदांचा फरक, नाही तर गाडी मलाच घेऊन गेली असती. ट्रॅकच्या शेजारीच मी स्तब्ध उभा होतो. एकीकडे माझी छाती धडधडत होती तर दुसरीकडे हातातलं ते पिल्लू सुटण्याचा प्रयत्न करत होतं...

मी भानावर आलो आणि हातातल्या पिल्लाला बाजूच्या झाडीत सोडून दिलं. गाडी पार झाल्याने फाटकही उघडलं होतं. आईसोबत तो गार्ड आणि इतर काही पादचारी माझ्याजवळ आले. आईसह तिथे जमलेले सगळे मला बोलत होते, ओरडत होते. पण मी मात्र फाटकाबाहेर पळत जाणाऱ्या त्या माऊच्या पिल्लाकडे पाहत होतो. मला त्याही वेळी मान्य होतं आणि आत्ताही मान्य आहे, की बंद फाटक ओलांडून मी फार मोठी चूक केली होती. राजधानीच्या वेगाने मृत्यू धावत माझ्याकडे येत होता. पण मला त्याचं भान नव्हतं. दिसत होतं, ते फक्त मांजराचं पिल्लू...

दिल में जज़्बा था बचाने का | और उस जज़्बेने दिमाग में बसे डरपर काबू कर लिया...

@ अनिकेत परशुराम आपटे.


जिवावरची उडी...

साहसदृष्य म्हटली, की आपल्याला आठवतात ते चित्रपट. अमक्या हिरोने काय साहसदृष्य दिलं... तमक्याने काय खतरनाक सीन दिला... असे उद्गार आपल्याला ऐकायला मिळतात. हे झालं चित्रपटांचं, पण खऱ्या आयुष्यात आपल्यालाही कधी कधी साहसांना सामोरं जावं लागतं. काही साहसं आपल्याकडून अनाहुतपणे घडतात तर काही आपण स्वत: घडवतो. असाच एक साहसानुभव माझाही आहे बरं का...

२००४चा एप्रिल महिना. हिमालयातल्या पिंढारी ग्लेसियरला एक टूअर जाणार होती. फक्त २०-२५ जणांचा समुह आणि हिमालय. मला मोह आवरला नाही आणि मीही माझं नाव दिलं. मुंबई ते दिल्ली व दिल्ली ते काठगोदाम हा संपूर्ण प्रवास ट्रेनने झाल्यावर, काठगोदाम ते लोहारखेत पायथा, हा प्रवास मात्र बसने केला. रस्त्यावरून लोहारखेतचा आमचा बेस कँप हा साधारण अर्ध्या तासाचा ट्रेक पार करून आम्ही लोहारखेत बेस कँपला पोहोचलो. दुसऱ्या दिवसापासून लोहारखेत बेस कँप ते फुर्किया या ६५ कि.मी. ट्रेकची सुरूवात झाली...

रोज साधारण २०-२२ कि.मी. ट्रेक करत वर चढायचं  आणि तिसऱ्या दिवशी फुर्कियाला पोहोचायचं असा आराखडा होता. लोहारखेत ते धाकुरी हा पहिला दिवस, मग धाकुरी ते खाती हा दुसरा दिवस आणि खाती ते फुर्किया हा तिसरा दिवस झाल्यावर चौथ्या दिवशी पहाटे पहाटे फुर्कियाहून निघून झीरो पॉईंट म्हणजेच पिंढारी ग्लेसियरला जायचं. त्याच दिवशी परतीचा प्रवास सुरू करत ती रात्र खातीला काढायची. पाचव्या दिवशी धाकुरी, सहाव्या दिवशी लोहारखेत असा आमच्या ट्रेकचा प्लॅन ठरला. पेपरावर हा प्लॅन छान वाटत असला तरी तो तितकासा सोपा नव्हता हे पहिल्याच दिवशी मला समजलं...

पहिल्या दिवशी सातला ट्रेक सुरू झाला. तासाभरातच मला तर एकदमच गळल्यासारखं झालं. मी तिथेच बसून लोहारखेतला परतणार होतो पण आमच्या दोन टुअर गाईडपैकी एक सतीश चौधरी, यांनी माझी हिम्मत वाढवली. सगळ्यात शेवटी कसा-बसा पोहोचून मी पहिला दिवस पूर्ण केला. त्या दिवशीचा सर्वात चांगला ट्रेकर म्हणून माझ्याहून वयाने मोठ्या असलेल्या एकाचा जेव्हा सत्कार झाला, तेव्हा मला तर जाम ओशाळल्यासारखं झालं होतं. मी तेव्हाच ठरवलं, पुढचे सगळे दिवस आपणच हा पुरस्कार मिळवायचा. दुसऱ्या दिवशी तोच निर्धार करून मी, इतर काही ट्रेकर्ससोबत जरा लवकरच चालायला सुरूवात केली...

एव्हाना मला वातावरणाचा चांगला अभ्यास झाला होता. पायांनाही आता चालायची सवय झाली होती. शिवाय, काही ट्रेकर्ससोबत मैत्रीही झाली होती. आम्ही चार-पाच जणांनी ठरवलं, नेमून दिलेल्या पाऊलवाटेने जाण्यापेक्षा त्याच्याजवळचा खडकाळ डोंगराळ प्रदेश कापत गेलो तर वेळेच्या आधी पोहोचू. आम्ही ठरवलं आणि तसं केलंही. आत्तापर्यंत माझ्या चालण्याचा वेग वाढला होता. दुसरा दिवस संपला तेव्हा सर्वांच्या आधी मीच पोहोचलो होतो. बेस्ट ट्रेकरचा सन्मान मिळाला आणि मी जामच खुश झालो.  तिसरा दिवसही असाच गाजवायचा असं मी ठरवलं आणि सकाळी ट्रेकला सुरूवात केली...

माझ्या चालण्याचा वेग आता चांगलाच वाढला होता. चालताना सर्वात पुढे मीच होतो. आत्तापर्यंत आम्ही जो रस्ता धरला तो डोंगरांतल्या पाऊलवाटांचा होता आणि चालण्याचा डोंगरही एकच होता. पण फुर्कियाजवळ ४-५ तासांचा एक असा पॅच होता, जो दोन छोट्या टेकड्यांमधून होता. एक टेकडी चढून उतरली की जेवण, मग पुढची टेकडी चढली की दोन कि.मी.वर फुर्किया होतं. मी एक टेकडी उतरली. दोन तासांच्या ट्रेकनंतर, दोन टेकड्यांच्या मध्ये असलेल्या आमच्या लंच कँपला मी पोहोचलो. जेऊन, थोडी विश्रांती घेऊन, पुढचा दोन तासांचा ट्रेक चढून वर आलो. सहज उजवीकडे पाहिलं, तर जी टेकडी उतरून मी लंच कँपला पोहोचलो होतो, ती टेकडी समोर दिसत होती. दोन्ही टेकड्यांमधलं अंतर साधारणत: १०-११ फूट होतं. टेकड्यांच्या एका बाजूला पाऊलवाट आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि जंगल...

माझं विचारचक्र सुरू झालं, "या टेकड्यांमधलं अंतर तसं १०-१२ फूट दिसतंय... आणि ते पार करायला चार-साडे चार तास चालायचं... त्यापेक्षा डायरेक्ट गेलो तर... किती तरी वेळ वाचेल..." विचार करत करतच फुर्कियाला पोहोचलो. त्या संध्याकाळीही बेस्ट ट्रेकर म्हणून पुन्हा माझाच सत्कार झाला. संध्याकाळच्या कँप फायरच्या वेळी चौथ्या दिवसाचं नियेजन झालं. झीरो पॉईंटला किती बर्फ आहे, रस्ता कसा निसरडा असू शकतो, या सगळ्या चर्चांना ऊत आला होता. स्लाईड शोज दाखवले गेले, फोटोज दाखवले गेले. माझे कान हे सर्व ऐकत होते, पण डोळ्यांसमोर मात्र त्या दोन टेकड्यांमधलं १०-१२ फूट अंतरच दिसत होतं...

चौथा दिवस उजाडला. बर्फाळ प्रदेशात जायला आम्ही सर्व उत्सूक होतो. काही वेळातच झीरो पॉईंटला पोहोचलो. छान फोटो काढले, व्हिडियोज काढले. बर्फ फार नव्हता पण खेळण्याइतपत नक्कीच होता. थोड्या वेळाने परतीचा प्रवास सुरू झाला. सर्वात पुढे अर्थात मीच. थोड्या वेळातच त्या टेकडीच्या तोंडावर पोहोचलो. समोर पाहिलं तर १०-१२ फुटांवर ती दुसरी टेकडी दिसत होती. पुन्हा चढ-उतार करत चार तास घालवायचं माझ्या जिवावर आलं होतं. मी मागे पाहिलं. नजरेच्या टप्प्यात कोणीच नव्हतं. थोडं मागे चालत गेलो. देवाचं नाव घेतलं आणि धावायला सुरूवात केली. टेकडीच्या तोंडाजवळ पोहोचताच जान की बाजी लावत हवेत झेप घेतली...

उडी मारताना माझे डोळे गच्च बंद होते. समोरच्या टेकडीच्या टोकापासून एक-दोन इंच आत माझे पाय जमिनीला लागले. वेगामुळे एक-दोन पावलं पुढे जात मी स्थिरावलो. मागे पाहिलं आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. फक्त दहा सेकंदांच्या एका साहसामुळे मी जवळ जवळ चार तास वाचवले होते. त्याच आनंदात गाणी-बिणी गात, मजल-दरमजल करत मी खातीला पोहोचलो. तिथे आमच्या टूअर गाईडपैकी दुसरे, विहंग भोसले होतेच. मी इतक्या लवकर पोहोचल्याने त्यांना आश्चर्य वाटलं. ते मला काही विचारणार इतक्यात त्यांच्या सॅटलाईट फोनवर कॉल आला. डोंगराळ प्रदेश असल्याने तिथे संपर्काचं साधन म्हणजे आमच्या टुअर गाईड्सकडे असलेले सॅटलाईट फोन्स...

तर विहंगसरांना फोन आला. समोरून सतीशसर म्हणाले, "एक मुलगा, अनिकेत आपटे गायब आहे. लंच कँपला २२ जणंच पोहोचली आहेत..." हे ऐकताच विहंगसरांनी माझ्याकडे पाहिलं आणि फोनवर म्हणाले, "अनिकेत आपटे इथे पोहोचला आहे. डोंट वरी..." फोन बंद झाला. मी लंच कँप पार केला पण तिथे कोणाला दिसलो नाही, हे कसं काय... असं विहंगसरांनी विचारताच मला खरं सांगणं भाग होतं. साधारण दोनेक तासांनी सर्वजण खातीला पोहोचले. विहंग सरांनी सगळं सतीशसरांना सांगितलं. मला कँप फायरच्या जागी बोलावलं गेलं आणि मी दोन्ही गाईड्सकडून, न भूतो न भविष्यति असा पोटभर ओरडा खाल्ला. त्यानंतर लोहारखेतच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत माझ्यावर खडा पहारा ठेवण्यात आला...

आज तो प्रसंग आठवताना मनात विचार येतो, की मी जे केलं ते साहस होतं की आगाऊपणा... झेप घेण्याची वेळ आणि टेकड्यांमधलं अंतर, या दोघांची सांगड जर पर्फेक्ट बसली नसती तर... मी गेलो असतो ढगात. पण दरीतल्या त्या जंगलात कदाचित माझं प्रेतही मिळालं नसतं. पण जे झालं नाही त्याचा विचार कशाला करा... झालं हे, की जिवावरची ती उडी यशस्वी झाली आणि एक साहसानुभव माझ्या गाठीशी आला. इतिहासातली ती सावरकरांची उडी त्रिखंडात गाजली होती. तशी माझी ही जिवावरची उडी, त्रिखंडात नाही पण माझ्या स्मरणात नक्कीच राहील...

@ अनिकेत परशुराम आपटे.