Saturday, August 28, 2021

भाऊकाका...

 

सकाळची वेळ होती. पाऊस चांगलाच कोसळत होता. अंधारं वातावरण झालं होतं. सकाळचे सात वाजले होते तरी संध्याकाळ झाल्यासारखं वाटत होतं. तयारी करून रेनकोट चढवत रवी हॉलमध्ये आला. समोर ठेवलेला डबा बॅगेत भरत, "आई, निघतो गं..." असं म्हणून दाराकडे वळला. रवीची आई किचनमधून बाहेर येत म्हणाली, "सांभाळून रे बाबा. पाऊस लागला आहे चांगला..." तिला हात करून रवी निघाला. एरवी अर्ध्या तासात ऑफिस गाठणाऱ्या रवीला आज पावसामुळे पाऊण तास लागला...

हळूहळू रवीचा स्टाफ ऑफिसात येऊ लागला. एक-दोघांनी पावसामुळे वाहन न मिळाल्याने रजा घेतल्याचंही कळवलं. कामकाज सुरू असताना कानावर पावसाच्या बातम्या येऊ लागल्या. रवीने बातम्या आणि येणाऱ्या मेसेजेसचा आढावा घेतला आणि ताबडतोब त्या दिवसाचं काम स्थगित केलं. सगळा स्टाफ गेल्यावर ऑफिस बंद करून रवीही निघाला. तो दाराबाहेर आला तेव्हा पावसाने रूद्रावतार धारण केला होता. पाण्याच्या आवाजाखेरीज दुसरं काहीच दिसत नव्हतं. गेटच्या बाहेर जणू पाण्याची छोटी नदीच दिसत होती...

या पाण्यात बेसमेंटमधून बाईक बाहेर आणण्याचं धैर्य रवीला होईना. रेनकोट चढवून पाणी कापत तो चालू लागला. गुडघाभर पाण्यातून कसातरी वाट काढत रवी पुढे जात होता. थोड्याच वेळात रवीला जाणवलं, की पाण्याची पातळी त्याच्या मांडीपर्यंत आली आहे. वरून कोसळणारा पाऊस, आणि खाली वाढतं पाणी, यातून पुढे जाणं अशक्य होतं. दुकानं बंद होती, रस्त्यावरचे लाईटही नव्हते. काय करावं या विचारात असतानाच, एका बिल्डिंगच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून एक हात रवीला दिसला...

रंग उडालेल्या, पोपडे पडत असलेल्या त्या दोन मजली इमारतीसह त्या परिसरातले सगळे लाईट्स गेलेले होते. मिणमिणत्या मेणबत्त्यांचा प्रकाश सर्वत्र दिसत होता. त्याच प्रकाशात रवीला तो हात दिसला. सरकत सरकत रवी बिल्डिंगजवळ गेला तर एक गृहस्थ त्याला दिसले. ते रवीला वर बोलवत होते. इथे पाण्यात राहण्यापेक्षा यांच्या घरात थोडावेळ थांबावं या विचाराने रवी जिना चढला. दार उघडं होतं आणि  ते गृहस्थ मेणबत्ती हातात घेऊन दारातच उभे होते...

रवीला पाहत ते म्हणाले, "या आत या. पावसाचं कुठे बाहेर राहताय. पाऊस कमी झाला की जा..." रवी आत आला आणि त्या गृहस्थांनी रवीला डोकं पुसायला टॉव्हेल दिला. रवी डोकं पुसू लागला तसे ते गृहस्थ मेणबत्ती टेबलवर ठेऊन आत गेले. डोकं पुसत पुसतच रवीने सभोवार नजर फिरवली. हॉल तसा लहानखोरच होता. एक दिवाण, कपाट, स्प्रिंगचा जुनाट सोफा आणि एक टेबल असं सगळं असल्याने खोली अजूनच लहान वाटत होती. रवी सगळीकडे नजर फिरवत होता तेव्हा ते गृहस्थ एक ट्रे घेऊन आले...

"बसा की तुम्ही. आणि ही गरमागरम कॉफी घ्या. बरं वाटेल तुम्हाला..." कॉफीचा ट्रे टेबलवर ठेवत ते गृहस्थ म्हणाले. एक कप त्या गृहस्थांना देत रवी म्हणाला, "तुम्ही मला आहो-जाहो नका हो करू. मी मुलासारखा आहे तुम्हाला. बाय द वे, मी रवी. चार्टर्ड अकाऊंटंट आहे. इथून जवळच माझी फर्म आहे. आणि तुम्ही..." रवीला उत्तर देताना ते गृहस्थ म्हणाले, "मी विनायक. सगळे मला भाऊकाका म्हणतात. तूही तेच म्हण, आवडेल मला..." या घरात या माणसाखेरीज दुसरं कोणीच नाही हे एव्हाना रवीला समजलं होतं. त्याने आत वाकून पाहत विचारलं, "भाऊकाका, तुमच्या घरात... म्हणजे इथे अजून कोणी..."

भाऊकाका हसले. ट्रेमध्ये कप ठेवत म्हणाले, "मी एकटाच असतो इथे. सोळा वर्ष झाली, मी इथे एकटाच राहतोय. सोळा वर्षांपूर्वी अशाच आलेल्या पावसाने माझं सर्वस्व हिरावून घेतलं. माझी पत्नी मला दुरावली. मी तिला वाचवूही शकलो नाही. तेव्हाच ठरवलं. पावसात अडकलेल्यांची मदत करायची..." भाऊकाका बोलायचे थांबले. आपल्या थरथरत्या हातांनी त्यांनी डोळे पुसले. त्यांना दिलासा देत रवी म्हणाला, "काका, शांत व्हा. तुम्ही किती मोलाचं काम करताय. काकूंना नक्कीच समाधान वाटत असेल..." भाऊकाकांना रवीचं म्हणणं पटलं आणि ते हसले...

बराच वेळ दोघं गप्पा मारत राहिले. पाऊस आता थांबला होता. रवीने खिडकीतून पाहिलं तर पाणीही हळूहळू ओसरायला लागलं होतं आणि कुठे कुठे रस्ता दिसू लागला होता. रवी म्हणाला, "भाऊकाका, पाऊस थांबला आहे. पाणीही कमी होतंय. मोक्याच्या क्षणी तुम्ही मदत केलीत हो मला. आता निघतो मी. पुन्हा भेटूच आपण..." भाऊकाकांनी त्यांचे दोन्हीही हात आकाशाकडे नेले आणि म्हणाले, "बघू. पण तू नीट जा बरं का..." रवीला भाऊकाकांच्या त्या हातवाऱ्यांचा अर्थ नाही समजला, पण त्यावेळी त्याला फक्त घरच दिसत होतं. रवी रस्त्यावर आला. त्याने इमारतीकडे पाहिलं तर भाऊकाका खिडकीतून त्याला हात करत होते. त्यांना हात करून रवी त्याच्या वाटेने निघून गेला...

एक-दोन दिवस निघून गेले. जनजीवन पूर्वपदावर आलं होतं. रवीने भाऊकाकांना भेटायचं ठरवलं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो पुन्हा तिथे गेला. बिल्डिंगच्या बाहेर फुटपाथवर उभा राहत त्याने इमारतीकडे पाहिलं. त्या बिल्डिंगची स्थिती बऱ्यापैकी वाईट होती. गेटला कुलूप घातलेलं होतं. रवी विचार करू लागला, "गेटला कुलूप..?? भाऊकाका कुठे गेले असतील..?? आणि दोन दिवसात बिल्डिंगची इतकी वाईट अवस्था होऊ शकते..."

रस्त्याच्या पलिकडे बिल्डिंगच्या समोर रवीला एक चहाची टपरी दिसली. रवी तिथे गेला व चहावाल्याला भाऊकाकांबद्दल विचारू लागला. चहावाला गोंधळला. रवीकडे पाहत म्हणाला, "दादा या बिल्डिंगीत कोनीच नाय ऱ्हात. मी धा वर्स इतेच हाय. मी नाय पायलं कोनाला..." या उत्तराने रवी विचारात पडला. बाजूलाच एक गृहस्थ चहा पीत होते. ते म्हणाले, "साहेब, या चहावाल्याला काहीच माहित नाही. तुम्ही भाऊकाकांबद्दल विचारत आहात ना...

मी सांगतो. भाऊकाका म्हणजे राजा माणूस. एकदम दिलदार. सर्वांशी मिळून-मिसळून रहायचे. त्यांना मूलबाळ नव्हतं. ते आणि त्यांची पत्नी दोघेच रहायचे इथे. मी आणि माझ्यासारखे इतर स्थानिक रहिवासी त्यांच्याकडे येत-जात असायचो. ती पहिल्या मजल्यावरची खिडकी आहे ना, तो त्यांचा टेहळणीचा बुरूज असायचा. तिथून ते वाटसरूंशी गप्पा मारायचे, कधीकधी त्यांना चहासाठी वर बोलवायचे. काकूही मनापासून करायच्या. पण सोळा वर्षांपूर्वी सगळंच संपलं. २६ जुलै २००५ आठवतोय...

सगळीकडे हाहाकार माजला होता. काकू त्या दिवशी माझ्याकडेच आल्या होत्या. माझ्या पत्नीला कळा सुरू झाल्या होत्या. हॉस्पिटलसाठी निघेपर्यंत तिला धीर देण्यासाठी काकू इथे आल्या. एँब्यूलंस आली तशी मी व माझी पत्नी निघालो आणि काकू त्यांच्या घरी गेल्या. २८ तारखेला जेव्हा मी भाऊकाकांना आनंदाची बातमी द्यायला गेलो तेव्हा समजलं, दोघंही हे जग सोडून गेले. इतर स्थानिकांनी सांगितलं, की काकू बहुदा उघड्या मॅनहोलमध्ये पडून बुडाल्या. पाणी साचल्याने काकूंना ते मॅनहोल दिसलं नसावं...

पाण्याचा वेग इतका होता की कोणी काहीच करू शकलं नाही. ही बातमी द्यायला काहीजण वर आले तेव्हा भाऊकाका निपचीत पडले होते. त्यांचा हात याच खिडकीबाहेर होता आणि डोळे उघडे होते. आमचा अंदाज आहे, की कदाचित काकांनी काकूंना मॅनहोलमध्ये पडताना पाहिलं आणि त्या धक्क्याने... त्या दिवसापासून हे घर रिकामंच आहे. दरवर्षी पावसामध्ये या पहिल्या मजल्यावर प्रकाश दिसतो. अनेकांनी भाऊकाकांना पाहिल्याचंही सांगितलं आहे. शेवटी आम्ही स्थानिकांनी या घराला आणि गेटला कुलूप घातलं..."

हे सगळं ऐकून रवी पुरता गोंधळला होता. तो तसाच गेटजवळ गेला. त्याने पहिल्या मजल्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. संकटकाळी देवदुतासारखा मदतीचा हात देणाऱ्या भाऊकाकांना स्मरून रवीने बिल्डिंगला नमस्कार केला...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, August 2, 2021

विश्रांती...

 

संध्याकाळ सरून वेळ रात्रीकडे झुकत होती. दुतर्फा झाडी असलेल्या निर्मनुष्य रस्त्यावरून मोहन बाईकने जात होता. त्याच्या मनात निरनिराळे विचार येत होते, "कशाला चहासाठी थांबलो मी... तरी तिथले लोक सांगतच होते, की अंधार पडण्याआधी हे जंगल पार व्हायला हवं. पण मी... भजी खायची होती ना... आता घ्या... जंगल सुरूच झालं आणि अंधार होत चाललाय... हे जंगल किती लांब पसरलंय कोण जाणे. बाईकच्या लाईटमध्ये कसा काय हा रस्ता कापायचा... त्यापेक्षा रात्र काढण्याची काही व्यवस्था होते का ते पाहू..."

या विचारात असतानाच मोहनने बाईक थांबवली. गूगल मॅप पहावा म्हणून मोबाईल बाहेर काढला तर रेंज नव्हती आणि मोबाईलची बॅटरीही १०%वर आली होती. मोबाईल खिशात ठेऊन तो निघणार इतक्यात मिणमिणत्या दिव्यांनी त्याचं लक्ष वेधलं. त्याने बाईक थांबवली होती तिथेच उजवीकडे एक कच्चा रस्ता दिसत होता. रस्त्याच्या तोंडावर "विश्रांती" असा बोर्ड होता. "एखादं हॉटेल किंवा लॉज असावं... बघू तरी..." हा विचार करत मोहनने गाडी कच्चा रस्त्यावर घातली. काही अंतरावरच एक आडवी दोन मजली इमारत त्याला दिसली. गेट उघडंच होतं. मोहनने गाडी आत नेली आणि तिथे असणाऱ्या इतर गाड्यांसोबत पार्क केली. दारातून त्याने आत डोकावलं. रिसेप्शनवर कोणीच नव्हतं...

मोहनने पुढे होऊन टेबलवर ठेवलेली बेल वाजवली. एक माणूस बाहेर आला. त्याच्याकडे पाहत मोहनने स्मित केलं आणि म्हणाला, "एका रात्रीसाठी रूम हवी आहे..." तो माणूस म्हणाला, “मिळेल, आता इथे दोनच रूम्स शिल्लक आहेत...” मोहनकडून आयडी कार्ड घेऊन तो माणूस रजिस्टर भरू लागला आणि मोहन आजू-बाजूला पाहू लागला. काऊंटर पलिकडच्या माणसाच्या मागे एक पाटी लावली होती, "खिडकी उघडू नये..." ती पाटी वाचून मोहन जरा चक्रावला पण काहीही न बोलून सही करायला पेन हातात घेतलं. सही करून मोहन त्या माणसासोबत चालू लागला. चालता चालता मोहनने विचारलं, "तिथे रजिस्टरमध्ये बरीच नावं दिसत होती. पण इथे कोणीच दिसत नाही..."

तो माणूस काहीही न बोलता तसाच पुढे चालत राहिला. रूमपर्यंत आल्यावर लॉक उघडत तो माणूस म्हणाला, "सगळे इथेच आहेत. थोड्या वेळाने सर्वांची भेट होईल. ही तुमची रूम. मी पाणी आणतो..." चाव्या मोहनच्या हाती देऊन तो माणूस निघून गेला. दार बंद करून मोहन आत गेला. रूम तशी लहानखोरच होती. एक बेड, एक कपाट, दोन दिवे आणि एक पंखा इतकंच काय ते सामान. रूम पाहत असतानाच दाराजवळ, "खिडकी उघडू नये..." असं लिहिलेली पाटी वाचून मोहन गोंधळात पडला. इतक्यात मगाचचाच माणूस पाण्याचा जग आणि ग्लास घेऊन आला. त्याला पाहून मोहनने विचारलं, "ही पाटी इथे... हीच पाटी खाली पण लावलेली होती..."

त्या माणसाने स्मित केलं आणि म्हणाला, "ही पाटी इथल्या प्रत्येक रूममध्ये आणि प्रत्येक मजल्यावर आहे. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी जेवण आणतो..." तो माणूस निघून गेल्यावर मोहनने दार लावलं आणि पंख्याचं बटण दाबलं. पण पंखा सुरूच झाला नाही. मोहनने बरेचदा बटण चालू-बंद केलं, रेग्यूलेटर मागे-पुढे करून पाहिला, पंखाही हलवून पाहिला. पण तो काही सुरू झाला नाही. शेवटी मोहनने त्याचे प्रयत्न सोडले आणि अंघोळीला निघून गेला. थोड्याच वेळात मोहन बाहेर आला. मोबाईल चार्ज करायला ठेवला आणि टि.व्ही. लाऊन बसला. लाईट चालू आहेत, गीझर चालू आहे, टि.व्ही. चालू आहे मग पंखाच का बंद..." या विचारात असतानाच दारावर 'टक् टक्' झाली...

मोहनने दार उघडलं तर हॉटेलचा तो माणूस जेवण घेऊन आला होता. तो आत आला तसं मोहनने त्याला विचारलं, "पंखा बंद आहे हो. जरा कोणालातरी पाठवता का..." टेबलवर ट्रे ठेवत त्या माणसाने थंड नजरेने एकदा मोहनकडे पाहिलं आणि पंख्याकडे नजर वळवली. पंख्यावर नजर स्थिरावत तो म्हणाला, "आता लावा पंखा..." मोहनने बटण दाबलं आणि पंखा सुरू झाला. फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत मोहन म्हणाला, "आश्चर्य आहे... आत्तापर्यंत हा पंखा बंद होता आणि आता..." बोलता बोलता मोहनने नजर फिरवली तर तो माणूस गायब झाला होता...

मोहनने दाराबाहेर पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. बाकी रूम्सची दारंही बंद होती. गोंधळलेला मोहन दार बंद करतच होता, की हॉटेलवाल्या माणसाने ते हाताने अडवलं आणि म्हणाला, "तुमचं जेवण झाल्यावर ट्रे दाराबाहेर ठेवा..." तो माणूस वळताच मोहन दार बंद करू लागला. पुन्हा मागे फिरत, थंड नजरेने मोहनकडे पाहत तो माणूस म्हणाला, "आणि... खिडकी उघडू नका..." मोहनने त्याच्या तोंडावर दार बंद केलं पण त्याच्या डोक्यात आणि मनात विचारांचं काहूर माजलं होतं. कसेबसे त्याने दोन घास पोटात ढकलले. टि.व्ही. पाहण्याची इच्छा नव्हती, मोबाईलही एव्हाना पूर्ण चार्ज झाला होता पण रेंज नव्हती. शेवटी सगळे दिवे बंद करून मोहन झोपी गेला...

बारा वाजून गेले होते. पंखा पुन्हा बंद झाला. गरमीने मोहनला जाग आली. त्याने दार उघडलं. बाहेर चिटपाखरूही नव्हतं. पॅसेजमधले दिवेही सारखे चालू-बंद होत होते. मोहन रिसेप्शनवर आला. तिथेही कोणीच नव्हतं. शेवटी तो पुन्हा रूममध्ये शिरला. "इतक्या गरमीत कसं काय झोपायचं... इथे तर ए.सी.पण नाही. रिसेप्शनवर पण कोणी नाही. असे कसे हे बेजबाबदार लोक..." बोलता बोलता मोहनची नजर खिडकीकडे गेली. "खिडकी उघडू नये असं लिहिलं आहे खरं, पण का लिहिलं असावं... खिडकी उघडली तर निदान हवा तरी खेळती राहील..." मोहनने दार उघडून पुन्हा बाहेर डोकावलं. कोणीही नाही याची खात्री करून दार बंद करत तो खिडकीजवळ आला...

खिडकीला लाकडाची दोन दारं होती. दारांना एकही कडी नव्हती. फक्त एका दाराला एक हँडल होतं. आधी मोहनने एका हाताने प्रयत्न केला पण खिडकी उघडली नाही. मग त्याने दोन्ही हातांनी हँडल पकडलं आणि जोर लाऊन दारं उघडली. खिडकी जशी उघडली गेली तशी वाऱ्याची एक झुळूक मोहनला स्पर्श करत आत शिरली. मोहनने खिडकीबाहेर डोकावलं आणि तो अवाक झाला. बाहेर जमीन किंवा आकाश, उजेड किंवा अंधार असं काहीच नव्हतं. होतं ते निळ्या-पांढऱ्या प्रकाशाचं एक मोठं वलय. त्यात विजा चमकत होत्या पण त्या कुठल्याही ढगातून न येता त्याच वलयात निर्माण होत होत्या. मोहन खिडकीबाहेर पाहतच होता की, "तुला सांगितलं होतं ना, खिडकी उघडू नकोस म्हणून... तरीही तू खिडकी उघडलीस..." या आवाजाने तो दचकला...

मोहनने हळूहळू मागे पाहिलं आणि त्याचा थरकाप उडाला. अनेक पुरूष, बायका व मुलांनी त्या खोलीत गर्दी केली होती. आपली थंड नजर रोखून सर्वजण मोहनकडे पाहत होते. रिसेप्शनवरचा माणूस सर्वांच्या पुढे उभा होता. मोहनच्या अंगावर शहारे आले. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. मोहन तसाच खिडकीखाली बसला. सर्वजण हळूहळू मोहनच्या जवळ येऊ लागले. तो माणूस म्हणाला, "या हॉटेलमधल्या इतर रहिवाशांना भेटायचं होतं ना तुला... हे बघ. हे आहेत ते सगळे... भेट त्यांना कायमचा... हा...हा...हा..." तो माणूस आणि इतर सगळे बिभत्स हसू लागले आणि सर्वांनी मोहनला घेराव घातला. एक आर्त किंकाळी सर्वत्र घुमली आणि खिडकी आपोआप बंद झाली... 

काही वेळाने मोहनला जाग आली. तो खिडकीखालीच बसला होता. स्वत:ला चाचपडत मोहन उभा राहिला. त्याने समोर पाहिलं तर रिसेप्शनवरचा तो माणूस त्याला दिसला. त्याच्याकडे जात मोहन म्हणाला, "बरं झालं तुम्ही आलात. काय विचित्र प्रकार घडला आत्ता... मला असं वाटलं जणू ते सगळं प्रत्यक्षात माझ्यासोबत घडतंय..." थंड नजरेने पाहत एकीकडे बोट दाखवत त्या माणसाने मोहनला आरशाकडे पाहण्याचा इशारा केला. मोहनने आरशात पाहिलं आणि त्याला धक्का बसला. मोहनला स्वत:चं प्रतिबिंबच दिसत नव्हतं. तो माणूस मोहनच्या बाजूला येऊन उभा राहिला. मोहनला अजून धक्का बसला जेव्हा त्या माणसाचंही प्रतिबिंब आरशात दिसलं नाही...

त्या माणसाने खिडकीकडे बोट दाखवलं. मोहनने तिथे पाहिलं तर त्याला त्याचंच शरीर खिडकीखाली निपचीत पडलेलं दिसलं. मोहनच्या खांद्यावर हात ठेवत तो माणूस म्हणाला, "तुझ्या जन्मापासून आत्तापर्यंत मेहनत करून तुझं शरीर खूप थकलंय. आता त्याला विश्रांतीची गरज आहे..." बोलत असतानाच त्याने हात वर केला. त्याचवेळी मोहनचं शरीर हवेत तरंगू लागलं. खिडकी उघडली गेली आणि मोहनचं शरीर बाहेरच्या वलयात नाहीसं झालं. तो माणूस म्हणाला, "आता तू याच खोलीत राहशील... कायमचा..." असं म्हणत तो माणूस मोहनला घेऊन गेला...

संध्याकाळची वेळ होती. निर्मनुष्य रस्त्यावरून विकास गाडीने चालला होता. अचानक गाडी बंद पडली. बाहेर येत विकासने सगळीकडे पाहिलं. बाजूलाच एक कच्चा रस्ता होता. कडेला लावलेल्या एका बोर्डवर लिहिलं होतं, "विश्रांती..." कच्च्या रस्त्यावरून जात विकास काही वेळातच हॉटेलला येऊन पोहोचला. त्याने रिसेप्शनच्या टेबलवरची बेल वाजवली. मोहन समोर आला. विकासने विचारलं, "एका रात्रीसाठी रूम मिळेल का..." थंड नजरेने विकासकडे पाहत मोहन म्हणाला, "मिळेल. आता इथे एकच रूम शिल्लक आहे..." 

समाप्त.


@ अनिकेत परशुराम आपटे.