सकाळची वेळ होती. पाऊस चांगलाच कोसळत होता. अंधारं वातावरण झालं होतं. सकाळचे सात वाजले होते तरी संध्याकाळ झाल्यासारखं वाटत होतं. तयारी करून रेनकोट चढवत रवी हॉलमध्ये आला. समोर ठेवलेला डबा बॅगेत भरत, "आई, निघतो गं..." असं म्हणून दाराकडे वळला. रवीची आई किचनमधून बाहेर येत म्हणाली, "सांभाळून रे बाबा. पाऊस लागला आहे चांगला..." तिला हात करून रवी निघाला. एरवी अर्ध्या तासात ऑफिस गाठणाऱ्या रवीला आज पावसामुळे पाऊण तास लागला...
हळूहळू रवीचा स्टाफ ऑफिसात येऊ लागला. एक-दोघांनी पावसामुळे वाहन न मिळाल्याने रजा घेतल्याचंही कळवलं. कामकाज सुरू असताना कानावर पावसाच्या बातम्या येऊ लागल्या. रवीने बातम्या आणि येणाऱ्या मेसेजेसचा आढावा घेतला आणि ताबडतोब त्या दिवसाचं काम स्थगित केलं. सगळा स्टाफ गेल्यावर ऑफिस बंद करून रवीही निघाला. तो दाराबाहेर आला तेव्हा पावसाने रूद्रावतार धारण केला होता. पाण्याच्या आवाजाखेरीज दुसरं काहीच दिसत नव्हतं. गेटच्या बाहेर जणू पाण्याची छोटी नदीच दिसत होती...
या पाण्यात बेसमेंटमधून बाईक बाहेर आणण्याचं धैर्य रवीला होईना. रेनकोट चढवून पाणी कापत तो चालू लागला. गुडघाभर पाण्यातून कसातरी वाट काढत रवी पुढे जात होता. थोड्याच वेळात रवीला जाणवलं, की पाण्याची पातळी त्याच्या मांडीपर्यंत आली आहे. वरून कोसळणारा पाऊस, आणि खाली वाढतं पाणी, यातून पुढे जाणं अशक्य होतं. दुकानं बंद होती, रस्त्यावरचे लाईटही नव्हते. काय करावं या विचारात असतानाच, एका बिल्डिंगच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून एक हात रवीला दिसला...
रंग उडालेल्या, पोपडे पडत असलेल्या त्या दोन मजली इमारतीसह त्या परिसरातले सगळे लाईट्स गेलेले होते. मिणमिणत्या मेणबत्त्यांचा प्रकाश सर्वत्र दिसत होता. त्याच प्रकाशात रवीला तो हात दिसला. सरकत सरकत रवी बिल्डिंगजवळ गेला तर एक गृहस्थ त्याला दिसले. ते रवीला वर बोलवत होते. इथे पाण्यात राहण्यापेक्षा यांच्या घरात थोडावेळ थांबावं या विचाराने रवी जिना चढला. दार उघडं होतं आणि ते गृहस्थ मेणबत्ती हातात घेऊन दारातच उभे होते...
रवीला पाहत ते म्हणाले, "या आत या. पावसाचं कुठे बाहेर राहताय. पाऊस कमी झाला की जा..." रवी आत आला आणि त्या गृहस्थांनी रवीला डोकं पुसायला टॉव्हेल दिला. रवी डोकं पुसू लागला तसे ते गृहस्थ मेणबत्ती टेबलवर ठेऊन आत गेले. डोकं पुसत पुसतच रवीने सभोवार नजर फिरवली. हॉल तसा लहानखोरच होता. एक दिवाण, कपाट, स्प्रिंगचा जुनाट सोफा आणि एक टेबल असं सगळं असल्याने खोली अजूनच लहान वाटत होती. रवी सगळीकडे नजर फिरवत होता तेव्हा ते गृहस्थ एक ट्रे घेऊन आले...
"बसा की तुम्ही. आणि ही गरमागरम कॉफी घ्या. बरं वाटेल तुम्हाला..." कॉफीचा ट्रे टेबलवर ठेवत ते गृहस्थ म्हणाले. एक कप त्या गृहस्थांना देत रवी म्हणाला, "तुम्ही मला आहो-जाहो नका हो करू. मी मुलासारखा आहे तुम्हाला. बाय द वे, मी रवी. चार्टर्ड अकाऊंटंट आहे. इथून जवळच माझी फर्म आहे. आणि तुम्ही..." रवीला उत्तर देताना ते गृहस्थ म्हणाले, "मी विनायक. सगळे मला भाऊकाका म्हणतात. तूही तेच म्हण, आवडेल मला..." या घरात या माणसाखेरीज दुसरं कोणीच नाही हे एव्हाना रवीला समजलं होतं. त्याने आत वाकून पाहत विचारलं, "भाऊकाका, तुमच्या घरात... म्हणजे इथे अजून कोणी..."
भाऊकाका हसले. ट्रेमध्ये कप ठेवत म्हणाले, "मी एकटाच असतो इथे. सोळा वर्ष झाली, मी इथे एकटाच राहतोय. सोळा वर्षांपूर्वी अशाच आलेल्या पावसाने माझं सर्वस्व हिरावून घेतलं. माझी पत्नी मला दुरावली. मी तिला वाचवूही शकलो नाही. तेव्हाच ठरवलं. पावसात अडकलेल्यांची मदत करायची..." भाऊकाका बोलायचे थांबले. आपल्या थरथरत्या हातांनी त्यांनी डोळे पुसले. त्यांना दिलासा देत रवी म्हणाला, "काका, शांत व्हा. तुम्ही किती मोलाचं काम करताय. काकूंना नक्कीच समाधान वाटत असेल..." भाऊकाकांना रवीचं म्हणणं पटलं आणि ते हसले...
बराच वेळ दोघं गप्पा मारत राहिले. पाऊस आता थांबला होता. रवीने खिडकीतून पाहिलं तर पाणीही हळूहळू ओसरायला लागलं होतं आणि कुठे कुठे रस्ता दिसू लागला होता. रवी म्हणाला, "भाऊकाका, पाऊस थांबला आहे. पाणीही कमी होतंय. मोक्याच्या क्षणी तुम्ही मदत केलीत हो मला. आता निघतो मी. पुन्हा भेटूच आपण..." भाऊकाकांनी त्यांचे दोन्हीही हात आकाशाकडे नेले आणि म्हणाले, "बघू. पण तू नीट जा बरं का..." रवीला भाऊकाकांच्या त्या हातवाऱ्यांचा अर्थ नाही समजला, पण त्यावेळी त्याला फक्त घरच दिसत होतं. रवी रस्त्यावर आला. त्याने इमारतीकडे पाहिलं तर भाऊकाका खिडकीतून त्याला हात करत होते. त्यांना हात करून रवी त्याच्या वाटेने निघून गेला...
एक-दोन दिवस निघून गेले. जनजीवन पूर्वपदावर आलं होतं. रवीने भाऊकाकांना भेटायचं ठरवलं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो पुन्हा तिथे गेला. बिल्डिंगच्या बाहेर फुटपाथवर उभा राहत त्याने इमारतीकडे पाहिलं. त्या बिल्डिंगची स्थिती बऱ्यापैकी वाईट होती. गेटला कुलूप घातलेलं होतं. रवी विचार करू लागला, "गेटला कुलूप..?? भाऊकाका कुठे गेले असतील..?? आणि दोन दिवसात बिल्डिंगची इतकी वाईट अवस्था होऊ शकते..."
रस्त्याच्या पलिकडे बिल्डिंगच्या समोर रवीला एक चहाची टपरी दिसली. रवी तिथे गेला व चहावाल्याला भाऊकाकांबद्दल विचारू लागला. चहावाला गोंधळला. रवीकडे पाहत म्हणाला, "दादा या बिल्डिंगीत कोनीच नाय ऱ्हात. मी धा वर्स इतेच हाय. मी नाय पायलं कोनाला..." या उत्तराने रवी विचारात पडला. बाजूलाच एक गृहस्थ चहा पीत होते. ते म्हणाले, "साहेब, या चहावाल्याला काहीच माहित नाही. तुम्ही भाऊकाकांबद्दल विचारत आहात ना...
मी सांगतो. भाऊकाका म्हणजे राजा माणूस. एकदम दिलदार. सर्वांशी मिळून-मिसळून रहायचे. त्यांना मूलबाळ नव्हतं. ते आणि त्यांची पत्नी दोघेच रहायचे इथे. मी आणि माझ्यासारखे इतर स्थानिक रहिवासी त्यांच्याकडे येत-जात असायचो. ती पहिल्या मजल्यावरची खिडकी आहे ना, तो त्यांचा टेहळणीचा बुरूज असायचा. तिथून ते वाटसरूंशी गप्पा मारायचे, कधीकधी त्यांना चहासाठी वर बोलवायचे. काकूही मनापासून करायच्या. पण सोळा वर्षांपूर्वी सगळंच संपलं. २६ जुलै २००५ आठवतोय...
सगळीकडे हाहाकार माजला होता. काकू त्या दिवशी माझ्याकडेच आल्या होत्या. माझ्या पत्नीला कळा सुरू झाल्या होत्या. हॉस्पिटलसाठी निघेपर्यंत तिला धीर देण्यासाठी काकू इथे आल्या. एँब्यूलंस आली तशी मी व माझी पत्नी निघालो आणि काकू त्यांच्या घरी गेल्या. २८ तारखेला जेव्हा मी भाऊकाकांना आनंदाची बातमी द्यायला गेलो तेव्हा समजलं, दोघंही हे जग सोडून गेले. इतर स्थानिकांनी सांगितलं, की काकू बहुदा उघड्या मॅनहोलमध्ये पडून बुडाल्या. पाणी साचल्याने काकूंना ते मॅनहोल दिसलं नसावं...
पाण्याचा वेग इतका होता की कोणी काहीच करू शकलं नाही. ही बातमी द्यायला काहीजण वर आले तेव्हा भाऊकाका निपचीत पडले होते. त्यांचा हात याच खिडकीबाहेर होता आणि डोळे उघडे होते. आमचा अंदाज आहे, की कदाचित काकांनी काकूंना मॅनहोलमध्ये पडताना पाहिलं आणि त्या धक्क्याने... त्या दिवसापासून हे घर रिकामंच आहे. दरवर्षी पावसामध्ये या पहिल्या मजल्यावर प्रकाश दिसतो. अनेकांनी भाऊकाकांना पाहिल्याचंही सांगितलं आहे. शेवटी आम्ही स्थानिकांनी या घराला आणि गेटला कुलूप घातलं..."
हे सगळं ऐकून रवी पुरता गोंधळला होता. तो तसाच गेटजवळ गेला. त्याने पहिल्या मजल्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. संकटकाळी देवदुतासारखा मदतीचा हात देणाऱ्या भाऊकाकांना स्मरून रवीने बिल्डिंगला नमस्कार केला...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment