आपण अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पाहतो, त्यांना हजेरी लावतो. काही कार्यक्रम पटकन संपावेत असं वाटतं. पण काही कार्यक्रम इतके सुंदर असतात, की ते चालतच रहावेत असं वाटतं. असाच एक कार्यक्रम म्हणजे, 'पांडुरंगवाडी विकास मंडळ' आयोजित "पांडुरंगवाडी महोत्सव २०२३..."
दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रूवारी, या तीन दिवसात, गोरेगाव (पूर्व) येथे मसुराश्रमसमोर असलेल्या पांडुरंगवाडी मैदानात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. वाडीत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या सर्वांना यात सहभागी होतं येणार होतं. At the same place for the same people and by the same people, असा हा महोत्सव वाडीत पहिल्यांदाच होणार होता. वाडीतली उत्साही मंडळी महिन्याभरापासून या महोत्सवाच्या तयारीत जुंपली होती...
वाडीच्या आतले रस्ते, विविध रंगांनी, नक्षीकामांनी, चित्रकलेने सजवणं तर सुरू होतंच, शिवाय कार्यक्रमांचा सरावही जोरात सुरू होता. आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून वाडीतल्या मंडळींनी वाडी सजवण्याचं काम हाती घेतलं होतं. ही गोष्ट खूपच कौतुकास्पद होती. बिल्डिंगच्या गच्च्यांवर, कंपाऊंडमध्ये, रहिवाशांच्या घरात, कार्यक्रमाची सरावसत्र सुरू होती. मुख्य महोत्सव खूपच छान होणार यात वादच नव्हता. अशा प्रकारच्या सोहळ्यांना अजून एका गोष्टीची गरज असते. ती गोष्ट म्हणजे आर्थिक पाठबळ...
या महोत्सवासाठी वाडीतल्या सर्वांनी सढळ हातांनी मदत केली. वाडीत असलेली दुकानं, बँका, यांनीही आपापल्या परीने या महोत्सवाला आर्थिक मदत देऊ केली. एकीकडे पैसे जमत असताना हा सगळा लेखा-जोखा म्हणजेच accounts, सांभाळायचा कोणी... हा प्रश्न कधी उद्भवलाच नाही. वाडीतल्याच काही रहिवाशांनी या कामाचं सुरेख वाटप केलं होतं. काही जण खर्चाची बाजू सांभाळत होते तर काही जमा झालेल्या रकमेचा हिशोब पाहत होते. एकेक गोष्ट जागेवर पडत होती आणि बघता बघता महोत्सवाचा दिवस उगवला...
महोत्सवाचं स्वरूप छान होतं. पहिले दोन दिवस, म्हणजे दिनांक ३ आणि ४ हे सांस्कृतिक कार्यक्रमांना वाहिलेले होते. वक्तशीरपणा काय असतो, ते या महोत्सवात पहायला मिळालं. दिनांक ३ आणि ४ ला महोत्सव ४ ते ४:१५मध्ये सुरू व्हायचा होता. दोन्हीही दिवस ४:१५ आधी कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गायन, नर्तन, लघुनाटिका, फॅशन शो, मिमिक्री, असे विविध प्रकार होते. वयाच्या अटीचा प्रश्न नसलेल्या या सर्व कार्यक्रमात शिशू विहार ते जेष्ठ नागरिक असा सर्वांचा सहभाग होता...
महोत्सवाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी खाद्यजत्रा, म्हणजेच फूड फेस्टिव्हल ठेवलं गेलं होतं. खाण्यापिण्याचे विविध स्टॉल्स तर होतेच, पण इतर गृहोपयोगी वस्तूंचेसुद्धा स्टॉल होते. त्याच पांडुरंगवाडी मैदानात ही जत्रा आयोजित केली गेली होती. मैदानाचे दोन भाग केले गेले. पैकी आतल्या भागात घरात लागणाऱ्या वस्तूंचे स्टॉल होते, तर बाकी अर्ध्या भागात खाद्यजत्रा होती. वाडीतल्याच उत्साही मंडळींनी हे स्टॉल्स भरवले होते. वस्तूंचे, खाद्यपदार्थांचे दरही बऱ्यापैकी वाजवी होते. तिसऱ्या दिवशी गर्दी इतकी होती, की स्टॉल्स न दिसता फक्त माणसंच दिसत होती...
या महोत्सवाचं विशेष आकर्षण होतं, अभिनय क्षेत्रातील काही मान्यवरांनी कार्यक्रमांना लावलेली हजेरी आणि सहभागींना दिलेली दाद. शिवाय तीनही दिवस, प्रेक्षकांचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. काही काळ का होईना, पण आभासिक जगापासून दूर जात, माणसं जवळ आली. काही नव्याने तर काही जुन्या अशा अनेक ओळखी झाल्या. वाडीतल्या लोकांचा अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होता. असे अजूनही कार्यक्रम होवोत हीच इच्छा...
हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे...
असे सुंदर कार्यक्रम अधिकाधिक आयोजित होत राहणे...