रात्रीचे १० वाजून गेले होते. क्लबमध्ये अजून जोशपूर्ण
वातावरण होतं. डिस्को सुरू होता,
ड्रिंक्स दिले जात होते. दिवे
लखलखत होते. काही माणसं टेबलवर बसून खाण्याचा, पिण्याचा
आणि संगीताचा आस्वाद घेत होती. काही माणसं ठेक्यावर ताल धरून नाचत होती. एका
टेबलवर विक्रम त्या वातावरणाचा आनंद घेत होता. त्याच्या टेबलवर एक अर्धवट भरलेला
ग्लास होता आणि हातात जळकी सिग्रेट होती. सिग्रेटचे झुरके आणि ग्लासमधले घोट घेत
विक्रम सर्वत्र नजर फिरवत होता. बारकडे पाहताच एका ठिकाणी त्याची नजर स्थिरावली.
तिथे एक मुलगी हातात ग्लास घेऊन बसली होती. विक्रम हसला. सिग्रेटचा एक झुरका घेऊन
त्याने समोरचा ग्लास संपवला आणि टेबल सोडून बारच्या दिशेने जाऊ लागला...

मुलीच्या शेजारच्या स्टुलावर बसून आधी त्याने बियरची
ऑर्डर दिली मग मुलीकडे पाहत म्हणाला,
"हाय. मी विक्रम. सगळे मला विकी
म्हणतात..." त्या मुलीने विक्रमकडे पाहत स्मित केलं आणि ग्लासमधला एक घोट
घेतला. ती काहीच बोलत नाही म्हटल्यावर विक्रम पुन्हा बोलता झाला, "तुमचा चेहेरा खूप फोटोजेनिक आहे.
तुमची फिगरही छान आहे. बाय द वे,
तुम्ही..." ती मुलगी हसली
आणि म्हणाली,
"मी अक्षरा..."
"अक्षरा... तुमच्याप्रमाणे तुमचं नावही छान आहे. नाईस टू मीट यू..."
इतकं बोलून विक्रमने हात पुढे केला. अक्षराने पुन्हा स्मित केलं आणि विक्रमशी हस्तांदोलन
केलं. विक्रम पुढे म्हणाला,
"मी एक सिने-जर्नालिस्ट आहे.
अप-कमिंग मॉडेल्सवर मी एक आर्टिकल लिहितो आहे. तुमचे काही फोटो काढू शकतो का...
कदाचित माझ्या आर्टिकलमध्ये तुमचे फोटो झळकले तर तुम्हालाही प्रसिद्धी
मिळेल..." अक्षराने जरा विचार केला आणि होकार दिला. दोघंही दाराच्या दिशेने
निघालेच होते की मोठा आवाज झाला...
अचानक आलेल्या आवाजाने सर्व दचकले. आवाज क्लबच्या मुख्य
दाराच्या दिशेने आला होता. सर्वांनी त्या दिशेला पाहिलं, तर काळी पँट आणि बिन-बाह्यांचं काळं जॅकेट परिधान केलेला, चेहेऱ्यावर मास्क असलेला एक इसम हातात एक पम्प शॉर्ट गन
घेऊन दारात उभा होता. बोलणं आणि नाच बंद झाले होते. पण संगीत अजून सुरू होतं. तो
माणून एक पाऊल पुढे आला. त्याने सगळीकडे नजर फिरवली. कोपऱ्यात एक मोठा स्पीकर
होता. त्या माणसाने शॉर्ट गन स्पीकरकडे वळवली. मग लिव्हर खेचून ट्रिगर दाबला.
क्षणार्धात स्पीकर फुटला आणि आवाज बंद झाला. मग पुन्हा तो माणूस सर्वत्र नजर फिरवू
लागला. अक्षरा आणि विक्रमवर येऊन त्याची नजर स्थिरावली. हळू हळू चालत तो माणूस
त्या दोघांच्या दिशेने जाऊ लागला. जाताना त्याने परत लिव्हर खेचलं विक्रमजवळ येत
त्याने चाप ओढला. गोळी विक्रमच्या छातीत घुसली. गोळीच्या धक्क्याने विक्रम मागे
फेकला जाऊन भिंतीवर आदळला आणि जमिनीवर कोसळला...
कसातरी सरकत सरकत तो अक्षराच्या दिशेने जाऊ लागला.
अक्षराजवळ पोहोचून अचके देत विक्रमने प्राण सोडले. अक्षरा जागीच गोठली होती.
विक्रमकडे पाहत ती थरथर कापत होती. तो माणूस विक्रमजवळ आला. त्याने एकदा अक्षराकडे
पाहिलं, मग पायाने विक्रमच्या शरीराला
उताणं केलं. डोळे उघडेच ठेऊन विक्रम गतप्राण झाला होता. तो माणूस परत फिरला आणि
दाराच्या दिशेने जाऊ लागला. त्याने एक पाऊल पुढे टाकलं पण लगेच थांबून तो पुन्हा
विक्रमकडे वळला. लिव्हर खेचून त्याने विक्रमच्या डोक्यात गोळी झाडली. रक्ताची
चिळकांडी उडाली आणि काही थेंब अक्षराच्या चेहेऱ्यावर पडले. अक्षरा जिवाच्या
आकांताने किंचाळून जमिनीवर कोसळली...
तपास सुरू झाला. आनंद बॉडी तपासत होता. सचिन आणि उमा
त्या परिसरातून महत्वाच्या गोष्टी गोळा करत होते. आणि प्रधान तिथे असलेल्या
घोळक्याशी संवाद साधू लागले,
"तुम्ही सगळे इथेच होता जेव्हा हे
सगळं घडलं. कोणी सांगेल मला नेमकं काय झालं इथे..." एक वेटर पुढे येत म्हणाला, "सर, अर्ध्या-पाऊण
तासापूर्वी सगळं व्यवस्थित होतं. डिस्कोची गाणी वाजत होती, लोक खात-पित होते,
गप्पा मारत होते. विक्रमसाहेबही
त्यांची ड्रिंक घेऊन बसले होते. थोड्या वेळाने ते उठले आणि बारकडे गेले. तिथे ती
मुलगी होती. दोघं एकमेकांशी काहीतरी बोलली. मग एकत्र दाराकडे निघाली. तेवढ्यात एक
मोठा आवाज झाला गोळीबाराचा. आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक ऊचपुरा धिप्पाड
माणूस दारात उभा होता. काळे बूट,
काळी पँट, काळं लेदरचं जाकिट,
चेहेऱ्यावर मास्क आणि हातात एक गन
घेऊन तो माणूस सगळीकडे पाहत होता...
गाणी बंद करण्यासाठी त्याने अजून एक गोळी चालवून स्पीकर
फोडला. मग तो माणूस विक्रमसाहेबांच्या दिशेने गेला. त्याने विक्रमसाहेबांवर गोळी
चालवली. साहेब मागे सरकत खांबावर आदळले आणि काचांच्या तुकड्यांसह खाली पडले.
कसंतरी घसपटत ते त्या मुलीजवळ पोहोचले आणि शांत झाले. तो माणूस विक्रमसाहेबांजवळ
गेला. त्याने पायानेच बॉडी हलवली. मग पुन्हा विक्रमसाहेबांच्या डोक्यात एक गोळी
मारली. ती मुलगी बिचारी किंचाळली आणि बेशुद्ध पडली..." बाकी लोकांकडे पाहत
प्रधानांनी विचारलं,
"हे असंच झालं होतं..."
सर्वानी मानेनेच होकार दिला. प्रधानांनी त्या वेटरला विचारलं, "याचं नाव विक्रम आहे हे तुला कसं
माहित..." तेव्हा तो वेटर म्हणाला,
"सर हे आमचे रेग्यूलर कस्टमर आहेत.
शिवाय हे मॅगझीन्समध्येही लिहितात..." तो वेटर बोलत असताना उमा हातात बुलेट
शेल्स घेऊन आले. उमा म्हणाली,
"सर चार शेल्स मिळाले आहेत. दोन
दाराजवळ आणि दोन या विक्रमच्या बॉडीजवळ..."
प्रधान बुलेट शेल्सकडे पाहत असताना सचिन तीन गोळ्या घेऊन
आला बंदुकीच्या. प्रधानांना दाखवत तो म्हणाला, "सर,
या तीन बुलेट्स मिळाल्या. एक
स्पीकरच्या मागच्या भिंतीमध्ये,
एक त्या टेबलजवळ, तर एक या एक काचेच्या खांबात रुतली होती..."
बुलेट्सकडे पाहत प्रधान म्हणाले,
"चौथी बुलेट या विक्रमच्या शरीरात
असेल. त्या माणसाने हवेत फायर केलं तेव्हा वरच्या झुंबराला लागून बुलेट खाली आली
आणि टेबलजवळ येऊन थांबली. स्पीकर फोडणारी बुलेट भिंतीत अडकली. पण तिसरी बुलेट या
विक्रमचं शरीर भेदून आरपार जाऊन त्या खांबात अडकली असणार..." प्रधान बोलत
असताना आनंद म्हणाला,
"विक्रमच्या छातीत लागलेली गोळी
अजून शरीरातच आहे. पाठीवर कुठलाही एग्झिट वूंड नाही. त्याच्या कपाळावर लागलेली
गोळी मात्र डोक्याच्या मागून बाहेर पडली. विक्रमच्या डोक्याच्या बरोबर खाली एक
छोटा खड्डा आहे. विक्रमच्या डोक्यात शिरलेली गोळी जमीनीवर आदळून रिबाऊंड होऊन त्या
खांबात घुसली..."
आनंदचं म्हणणं पुढे नेत उमा म्हणाली, "सर, ती
गोळी नुसती खांबात घुसली नाही. तर जाताना या मुलीच्या हाताला चाटून गेली. हिच्या
दंडावर जखम आहे. ही मुलगी थोडक्यात वाचली सर. पण आत्ता बेशुद्ध आहे. हिचं नाव
अक्षरा आहे. हिच्या पर्समध्ये हिचं आधार कार्ड आहे ज्यावर अमरावतीचा पत्ता आहे.
.." उमा बोलत असताना अक्षरा शुद्धीवर आली. सगळीकडे पाहत, "त...तो रा...क्षस...
ग...गोळी..." इतकं बोलून ती पुन्हा बेशुद्ध पडली. अक्षराकडे पाहत प्रधान
म्हणाले,
"हिला जबरदस्त शॉक बसलेला दिसतोय.
हिने त्या खुन्याला खूप जवळून पाहिलं आहे. ही आपली मदत करू शकेल. उमा, तू अक्षराला घेऊन हॉस्पिटलला जा. शुद्धीत आल्यावर ही
बोलण्याच्या मन:स्थितीत आली की मला कळव..." अक्षराला घेऊन उमा निघून गेल्यावर
प्रधान, सचिन आणि आनंद आपापसाद बोलू
लागले. सचिन म्हणाला,
"इतक्या सगळ्या लोकांमध्ये त्या
खुन्याने विक्रमलाच टार्गेट केलं. बाकी कोणालाही काहीही न करता तो निघून गेला.
एकतर या विक्रमला मारण्यासाठी त्याला पैसे मिळाले असतील किंवा त्याचं विक्रमशी वैर
असावं..."
यावर आनंद म्हणाला,
"सर हा विक्रम एक सिने जर्नालिस्ट
आहे. "Island
of Stars" या मॅगझीनमध्ये याचे आर्टिकल्स
येत राहतात. याचे तीन लेख सध्या खूप प्रसिद्ध आहेत. एक आहे ऍक्ट्रेस नताशाबद्दल
ज्यात तिचे काही अश्लील फोटो आहेत, दुसरा लेख आहे प्रोड्यूसर जयवंतबद्दल ज्यात
जयवंत B grade movies बनवतो. त्याच्या moviesमध्ये sex आणि violence जास्त असतो याबद्दल लिहिलं
आहे. आणि तिसरा लेख हिरो पवनच्या
अफेयर्सबद्दल आहे..." थोडा विचार करत प्रधान म्हणाले, "आनंद, सचिन,
बॉडीला डॉककडे पाठवायची व्यवस्था
करा. This
can be a high profile case. We need to handle it carefully..." डॉ. गोखले बॉडी तपासत होते.
प्रधानांकडे पाहत ते म्हणाले,
"प्रधानसाहेब, या विक्रमचा मृत्यू गोळी लागूनच झाला आहे. खूनी निष्णात
आहे. One
shot and game over. विक्रमच्या शरीरातून मिळालेली
गोळी, तुम्ही क्लबमधून आणलेल्या गोळ्या
आणि हे शेल्स एकाच मेकचे आहेत. 18mm
calibre. हे कोणत्याही पिस्तुल किंवा
रिवॉल्व्हरचं काम नाही. अजून एक गोष्ट प्रधानसाहेब, या
विक्रमचा मृत्यू छातीत लागलेल्या गोळीने झाला आहे. तरीही याच्या डोक्यात गोळी
मारली गेली. याचा अर्थ त्या खुन्याचा विक्रमवर प्रचंड राग होता..."
डॉ. गोखलेंचं म्हणणं ऐकून विचार करत असताना प्रधानांचा
फोन वाजला,
"येस उमा. गुड. मी येतोच
तिथे..." फोन बंद करत प्रधान म्हऩाले,
"अक्षरा शुद्धीवर आली आहे. आनंद, तू माझ्यासोबत हॉस्पिटलला चल. आणि सचिन, तू नताशा,
पवन आणि जयवंत कुठे आहेत ते बघ.
आपल्याला त्यांना भेटायला हवं..." आनंद आणि प्रधान हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा
अक्षरा बेडवर टेकून बसली होती आणि उमा तिला पाणी पाजत होती. बेडजवळ जात प्रधान
म्हणाले,
"अक्षरा, मी सीनियर इन्स्पेक्टर प्रधान आणि हे इन्स्पेक्टर आनंद.
तुम्ही त्या खुन्याला खूप जवळून पाहिलं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकता
का..." अक्षराने उमाकडे पाहिलं,
मग प्रधान व आनंदकडे पाहत बोलती
झाली,
"खूप क्रूर होता तो माणूस. त्याचे
हिरवेगार डोळे होते. अंगाने चांगलाच मजबूत होता तो. त्याच्या डाव्या दंडावर
जळणाऱ्या खोपडीचा एक टॅटू होता. काळे बूट,
लेदरचं स्लीव्हलेस जॅकेट, चेहेऱ्यावर मास्क होता त्याच्या आणि त्याच्या गळ्यात 'B' हे अक्षर असलेलं एक लॉकेट आणि चेन
होते. हातात एक मोठी गन घेऊन तो आत शिरला आणि माझ्यासमोरच त्याने
विक्रमला..."
अक्षरा बोलायची थांबली आणि रडायला लागली. उमाने तिला धीर
दिला आणि प्रधानांकडे वळली. अक्षराने केलेलं वर्णन ऐकून प्रधान आणि आनंदने
एकमेकांकडे पाहिलं. आनंदने लगेच मोबाईल काढला आणि चेक करू लागला. अक्षराजवळ जात
उमा म्हणाली,
"अक्षरा, तुला अजून काही आठवतं त्या खुन्याबद्दल... एखादी वेगळी
गोष्ट..." अक्षराने काही क्षण डोळे बंद केले. मग लगेच डोळे उघडत म्हणाली, "तो खुनी जेव्हा परत फिरला आणि
त्याने विक्रमच्या डोक्यात गोळी मारली,
त्याआधी तो काहीतरी बोलला... काय
बरं... हां... तो म्हणाला,
"बदनामी करतोस... हा घे तू
केलेल्या बदनामीचा मोबदला..." हे ऐकून प्रधान आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं.
तेवढ्यात पुढे येत आनंद म्हणाला,
"सर, आपला
संशय खरा ठरला. अक्षराने केलेल्या वर्णनाची व्यक्ती आपल्या रेकॉर्ड्समध्ये
आहे..." आनंदला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, "बाबू... राईट..." आनंदने मानेनेच होकार दिला.
तेवढ्यात प्रधानांना सचिनचा फोन आला. फोन ऐकून उमा आणि आनंदकडे पाहत प्रधान
म्हणाले,
"नताशा एका जाहिरातीचं शूटिंग करून
घरी परतली आहे. तो प्रोड्यूसर जयवंत सध्या लोणावळ्याला एका मूव्हीच्या सेटवर आहे
आणि तो पवन गोव्यात आहे. आनंद,
तू आणि उमा नताशाकडे जा सचिन आणि
मी त्या जयवंतला गाठतो..." पुन्हा फोनवर
नंबर लावत प्रधान म्हणाले, “हॅलो, गोवा पोलिस स्टेशन... मी मुंबईहून सीनियर
इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय. तो हीरो पवन तिथेच शूटिंग करतो आहे. त्याच्यावर नजर
ठेवा. And keep me posted…”
हे ऐकून अक्षरा घाबरली. उमाचा हात गच्च पकडत म्हणाली, "म्हणजे, तुम्ही मला इथे एकटं सोडून जाणार... आणि तो खूनी इथे आला
तर... नको नको. मला इथे एकटं सोडू नका प्लीज..." अक्षराचं बोलणं ऐकून उमा
म्हणाली,
"अक्षरा, अगं असं काय करतेस... इथे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत,
तुला काहीही होणार नाही. शिवाय
आम्ही तुझ्या घरी कळवलं आहे. तुझे आई-वडील निघालेत यायला. डोंट वरी..." उमाने
सांगूनही अक्षरा ऐकत नव्हती. तेव्हा प्रधान म्हणाले, "अक्षरा,
आम्हाला काळजी आहे तुझी. पण
विक्रमला मारणाऱ्या आणि तुला या अवस्थेत पोहोचवणाऱ्या त्या खुन्याला पकडायला हवं
ना. एक काम करू,
तुला आपण प्रोटेक्शन देऊ. मग तर
झालं..." हे ऐकून अक्षराला थोडं हायसं वाटलं. तिने उमाचा हात सोडला. प्रधान
पुन्हा म्हणाले,
"उमा, अक्षराच्या पोलीस प्रोटेक्शनची व्यवस्था कर. एक लेडी
ऑफिसर इथे आत आणि दोन ऑफिसर्स रूमच्या बाहेर. ओ.के. लेट्स गो..."
आनंद आणि उमा,
आनंदच्या बाईकने नताशाकडे निघाले
तर जीप घेऊन प्रधान लोणावळ्याला रवाना झाले. एका बंगल्याच्या गेटवर बाईक थांबली.
गेटवर दोन माणसं तैनात होती. आनंदने त्यांना आय.डी. कार्ड दाखवताच त्यांनी गेट
उघडलं. बाईक एका ठिकाणी पार्क करून आनंद आणि उमा दाराजवळ आली. उमाने बेल वाजवली.
एका माणसाने दार उघडलं. "काय आहे... हे पहा मॅडम आत्ताच शूटवरून आल्या आहेत.
त्या आता कोणालाही भेटणार नाहीत. तुम्ही उद्या सकाळी या. आता निघा..."
उद्धटपणे हे उद्गार काढत त्या माणसाने दार लावायला सुरुवात केली. आनंदने त्याच
क्षणी दार ढकललं आणि आत येत म्हणाला,
"हे पहा मिस्टर, आम्ही इथे शिळोप्याच्या गप्पा मारायला आलो नाही. मी
इन्स्पेक्टर आनंद आणि या सब-इन्स्पेक्टर उमा. एका खुनाच्या केस संबंधी नताशा
मॅडमशी बोलायचं आहे. तेव्हा आता लगेच त्यांना बोलवा..." आनंदचा चढा आवाज ऐकून
तो माणूस जरा वरमला. तिथेच असलेल्या इंटरकॉमने नंबर लावत तो म्हणाला, "मॅडम, खाली पोलिस आलेत. काही चौकशी करायचं म्हणत आहेत. ओ.के.
मॅडम..." मग फोन ठेवत तो म्हणाला,
"मॅडम पाच मिनिटात खाली येत आहेत.
बाय द वे, मी सतीश. मॅडमचा सेक्रेटरी. सॉरी
हं मी तसा बोललो..." सतीश बोलतच होता,
की वरून आवाज आला, "सतीश..."
सर्वांनी वर पाहिलं तर एक सुंदर मुलगी जिना उतरत होती.
जिना उतरून ती सोफ्यावर बसली. मग तिने सतीशला विचारलं, "सतीश, हेच का ते पोलिसवाले..." सतीशने होकार देताच आनंद
आणि उमाकडे पाहत ती म्हणाली,
"काय काम काढलं माझ्याकडे, माझा ऑटोग्राफ हवा आहे की फोटोग्राफ. असं करा तुम्ही
दोन्हीही घेऊन जा. सतीश,
यांना माझे साईन केलेले फोटोज दे.
नाव, विल यू प्लीज एक्सक्यूज
मी..." इतकं बोलून नताशा उठली. उमाला तिचं वागणं जरा खटकलंच होतं. ती लगेच
नताशाजवळ जात म्हणाली,
"नताशा मॅडम, आम्हाला ना तुमचा ऑटोग्राफ हवा आहे, ना फोटोग्राफ. सिने जर्नालिस्ट विक्रमला ओळखता
तुम्ही..." विक्रमचं नाव ऐकताच नताशा वळली आणि खाली मान घालून म्हणाली, "हो, न्यूजमध्ये
वाचलं मी सकाळी. चांगला रायटर आणि फोटोग्राफर होता. त्याच्या आर्ट्कल्समुळे
अनेकांना इंडसर्ट्रीत एंट्री मिळाली. मीसुद्धा त्याने माझ्यावर आर्टिकल लिहावं म्हणून
त्याच्याकडे गेले होते. पण विक्रमने माझ्या फोटोजना मॉर्फ करून चुकीच्या पद्धतीने
वापरले. मैत्रीच्या पाठीत खंजीर खुपसला त्याने..."
'मैत्री'
हा शब्द ऐकताच आनंद आणि उमा
चपापले. दोघांच्याही प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे पाहून नताशा म्हणाली, "हो. मी आणि विक्रम कॉलेजपासूनचे
मित्र आहोत. मी,
विक्रम आणि दिव्या एकाच वर्षी
पास-आऊट झालो. विक्रम त्याही वेळी छान लिहायचा, फोटो
काढायचा. त्याच्या या गुणांवर दिव्या इम्प्रेस झाली होती. ती विक्रमवर प्रेम करू
लागली होती. पण विक्रम माझ्याकडे आकर्षित होता. त्याने मला प्रपोजही केलं होतं. पण
मी नकार दिला. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी विक्रम मला म्हणाला होता, की या नकाराचा तो बदला घेईल. आणि आज हे आर्टिकल... मी
ऍक्ट्रेस व्हायला आले होते. पण विक्रमच्या आर्टिकलने बोल्ड गर्लचा शिक्का माथी
लागला माझ्या. मला क्लब डान्सर,
आयटम गर्ल असेच रोल मिळू लागले
आणि मी स्वीकारले. कारण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. हे सगळं वैभव आतून पोकळ
आहे. हा बंगलाही रेन्टवर आहे. ऍक्ट्रेस बनायला मी माझ्या लग्नमंडपातून पळून आले
होते. मला वाटलं विक्रम माझी मदत करेल. पण
त्याने..." इतकं बोलून नताशाने डोळ्यांच्या कडा पुसल्या. पुढे होत उमा
म्हणाली,
"म्हणून तुम्ही विक्रमला मारायला
माणूस पाठवलात..."
हे ऐकून डोळे पुसत नताशा म्हणाली, "म्हणजे, तुम्ही माझ्यावर संशय घेताय... ऑफिसर्स, विक्रम मेल्याचा आनंद आहे मला. पण मी त्याचा खून करवला
नाही. आणि तुम्ही फक्त मलाच का प्रश्न विचारताय... दिव्यालाही विचारा. कदाचित
तिनेच पाठवलं असेल कोणालातरी विक्रमला मारायला. विक्रमच्या मरण्याने तिलाच तर
सर्वात जास्त फायदा आहे... शिवाय तिचं रानही मोकळं झालं आहे..." नताशाचं
बोलणं ऐकून आनंद आणि उमाला प्रश्न पडला. आनंदने नताशाला प्रतिप्रश्न केला, "नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला
मॅडम..." आनंदकडे पाहत नताशा म्हणाली,
"हे तुम्ही दिव्यालाच विचारा. हा
आहे दिव्याचा पत्ता. मी याहून जास्त काहीच सांगणार नाही..." नताशाकडून बाहेर
पडल्यावर बाईकजवळ येताना आनंद आणि उमामध्ये बोलणं झालं. उमा म्हणाली, "चांगली ऍक्ट्रेस आहे. मध्येच
इमोशनल होते तर मध्येच आवाज वाढवते..." उमाला दुजोरा देत आनंद म्हणाला, "नताशा काहीतरी लपवते आहे
आपल्यापासून. सध्यातरी आपल्याला या दिव्याकडून काही माहिती मिळते का ते
पाहू..."
तिथे प्रधान आणि सचिन, प्रोड्यूसर
जयवंतला भेटायला एका शूटिंगच्या सेटवर पोहचले. माणसांची लगबग चालू होती. कॅमेरा
ऍडजस्ट केला जात होता. एका माणसाला अडवत सचिनने जयवंतबद्दल विचारलं, तर त्याने एका झाडाकडे बोट दाखवलं. हॅट, जॅकेट घातलेला एक माणूस झाडाखाली ठेवलेल्या खुर्चीत बसला
होता. प्रधान आणि सचिन तिथे गेले. त्या माणसासमोर उभं राहत सचिन म्हणाला, "मि. जयवंत. मी सब-इंस्पेक्टर सचिन
आणि हे सीनियर इंस्पेक्टर प्रधान. विक्रम मर्डर केसबद्दल तुम्ही ऐकलं असेलच...
त्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे..." उठून उभा राहत जयवंत म्हणाला, "हो. सकाळी न्यूजमध्ये पाहिलं मी.
बरं झालं मेला तो. आज तर पार्टी करेन मी. पण त्याची चौकशी करायला तुम्ही इथे का
आलात..." पुढे येत प्रधान म्हणाले,
"मि. जयवंत, तुमच्यात आणि विक्रममध्ये त्याने लिहिलेल्या एका
आर्टिकलवरून वाद होता ना... त्यासाठीच आलो आहोत आम्ही इथे..." जयवंतने टोपी
काढली. कपाळावरचा घाम रुमालाने टिपून घेतला आणि बोलायला सुरुवात केली...
"सर, मी
प्रोड्यूसर आहे आणि विक्रम फोटोग्राफर आणि जर्नालिस्ट. आम्हा दोघांनाही कधी कधी
एकमेकांची गरज भासते. एक दिवस विक्रम माझ्याकडे एक स्टोरी घेऊन आला. स्टोरी चांगली
होती पण माल-मसाला जास्त नव्हता. सर आजकाल पब्लिकला रियलिस्टिक स्टोरी तर लागतेच, पण मसालासुद्धा लागतो. मी विक्रमला स्टोरीमध्ये बदल
करायला सांगितलं पण विक्रमने नकार दिला. मी त्याला युनिटमधून काढून टाकलं आणि
दुसऱ्या रायटरची स्टोरी घेऊन मूव्ही बनवली. सर, मूव्ही
हिट झाली. रायटरला अवॉर्डपण मिळाला. याचा राग म्हणून विक्रमने, मी बी ग्रेड मूव्हीज बनवतो. सेक्स आणि वॉयलन्स शिवाय
माझ्या मूव्हीजमध्ये काहीच नसतं असा गवगवा केला. मी विक्रमला त्याच्या ऑफिसमध्ये
भेटायला गेलो तर तिथेही माझ्याबद्दल अजून लिहीन अशी धमकी दिली त्याने..."
जयवंतला तोडत सचिन म्हणाला,
"आणि म्हणून तुम्ही विक्रमचा काटा
काढलात. बरोबर ना..." प्रधानांकडे पाहत जयवंत म्हणाला, "सर आम्ही सगळे इंडस्ट्रीमधले
आहोत. आमच्याबद्दल चांगलं-वाईट नेहमीच लिहिलं जातं. म्हणून आम्ही लेखकाचा खून करत
बसत नाही. आणि तुम्ही फक्त मलाच का विचारता आहात... त्या हिरो पवनलाही विचारा
की... त्याच्या अफेयरबद्दलही विक्रमने लिहिलं होतं..." प्रधान काही बोलणार
इतक्यात त्यांना आनंदचा फोन आला...
तिथे आनंद आणि उमा,
दिव्याला भेटण्यासाठी नताशाने
दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. एका छोटेखानी बंगल्याच्या आवारात बाईक थांबली. आस-पास
कोणीच नव्हतं. दोघंही दाराजवळ आली. बराच वेळ बेल मारूनही कोणी दार उघडलं नाही. दार
ठोठावण्यासाठी आनंदने दारावर थाप मारली तर ते आत ढकललं गेलं. आनंद आणि उमाने
एकमेकांकडे पाहिलं. दारात बुटांचे काही ठसे होते. झटक्यात दोघांनी आपापल्या गन्स
काढल्या. आनंद पुढे झाला आणि त्याने दार पूर्ण उघडलं. आत कोणीच नव्हतं. कानोसा घेत
दोघांनी आत प्रवेश केला. दोघांची नेत्रपल्लवी झाली. उमा एका बाजूला वळली आणि आनंद
दुसऱ्या दिशेला गेला. किचनच्या बाजूला एक दार होतं. उमाने कडी काढून दार उघडलं. तो
मागचा दरवाजा होता. उमाने आनंदकडे पाहिलं. त्याने होकारार्थी मान हलवली. उमाने दार
बंद केलं आणि किचनचा तपास करून ती पुन्हा हॉलकडे वळली. दुसरीकडे आनंद तिथल्या
रूम्स शोधू लागला. एका रूममध्ये बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवर आनंदला दोन
फ्रेम्स सापडल्या...
एका फ्रेममध्ये विक्रमचा फोटो होता तर दुसऱ्या
फ्रेममध्ये दिव्याचा फोटो होता. आनंदने टेबलाखालचा ड्रॉव्हर उघडला. त्यात एक फाईल
होती. आनंदने ती फाईल बाहेर काढली. ते विक्रम आणि दिव्याच्या घटस्फोटाचे पेपर्स
होते. शिवाय त्यात दिव्या आणि पवनचे एकत्रित फोटोही होते. ते फोटो आणि फाईल
पाहताना आनंद विचार करू लागला,
"म्हणजे विक्रम आणि दिव्या नवरा
बायको होते तर... आणि या पवनसोबत दिव्याचं अफेयरपण चालू होतं..." आनंद विचारच
करत होता, की फटाक्यासारखा आवाज आला आणि
आनंदच्या कानाच्या बाजूने एक गोळी जाऊन मागच्या आरशाला लागली. काच निखळून खाली आली
आणि आनंदही उडी मारून बेडच्या आडोशाला गेला. त्याला हॉल दिसला आणि हातात गन घेऊन
सोफ्याच्या मागे बसलेली उमाही दिसली. समोरच्या खिडकीतून दोन मास्कधारी गुंड
आलटून-पालटून फायर करत होते. उमा ते फायर्स चुकवत स्वत: गोळ्या झाडत होती. इथे
आनंद ज्या बेडचा आडोसा घेऊन लपला होता त्या बेडच्या पलिकडे असलेल्या खिडकीतूनही
दोघंजण आलटून-पालटून फायर करत होते आणि आनंद त्यांना प्रतिउत्तर देत होता...
आनंद आणि उमाच्या गोळ्यांनी एकेक गुंड मरून पडला. आता
दोघांच्याही समोरच्या खिडकीत एकेक गुंड राहिला होता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.
आनंदने आधी एक बोट मग दुसरं बोट दाखवलं. मग दोन वेळा हात गोल फिरवला. उमाने
होकारार्थी मान हलवली. दोघंही खाली गेली. मॅगझीन्स बदलून गनचं लिव्हर खेचलं आणि
एकामागून एक हवेत फायर करू लागले. लागोपाठ फायर येऊ लागल्याने ते दोन गुंड भिंतीआड
लपले. हे पाहून आनंद आणि उमा तसेच फायर करत मागच्या दाराबाहेर पडले. दोन्ही
दिशांनी जात त्यांनी त्या दोन्ही गुंडांच्या डोक्याला आपापल्या गन्स लावल्या. आनंद
व उमा अचानक त्यांच्या मागे आल्याने दोन्हीही गुंडं बावरले आणि हात वर करून उभे
राहिले. आनंदने दरडावतच विचारलं,
"काय रे, आमच्यावर गोळ्या का झाडल्यात..." त्यातला एक वळू
लागला तशी उमा म्हणाली,
"जसे आहात तसेच रहा नाहीतर... आता
बोला लवकर..." त्यातला एक गुंड बोलता झाला, "आम्ही या घराच्या पाळतीवर होतो. या घरात येणाऱ्या
व्यक्तीचा काटा काढायची सुपारी मिळाली होती आम्हाला. म्हणून आम्ही..." आनंदने
दोघांची झडती घेतली. मरून पडलेल्या बाकी दोघांची झडती घ्यायला आनंद वळलाच होता, की एका गुंडाने उमाच्या हाताला हिसडा दिला...
उमाची गन खाली पडली. दोन्हीही गुंडं पळू लागले. उमाने गन
उचलून आणि आनंदने वळून एकाच वेळी फायर केलं. दोन्हीही गुंडं गोळ्या लागून खाली
कोसळले. आनंद पुन्हा त्या आधीच्या गुंडांकडे वळला. एकाच्या पँटच्या खिशात पैसे
गुंडाळलेला पेपर नॅपकिन होता. दोघांनी पाहिलं, तर
त्या नॅपकिनच्या एका कोपऱ्यावर लाल रंगात 'पी.सी.' ही अक्षरं होतं आणि बाजूलाच एका घराचं चित्र होतं. आनंद
आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. उमाने इंटरनेटवर ही अक्षरं सर्च केली आणि पटेल
कॉटेजचं नाव समोर आलं. आनंदने प्रधानांना फोन लावला, "सर,
मी आणि उमा नताशाकडून दिव्याच्या
घरी आलो होतो. इथे काही माणसं दबा धरून बसली होती. त्यांनी गोळ्या झाडल्या
आमच्यावर. हो सर आम्ही ठीक आहोत. सर,
विक्रम, दिव्या आणि पवनबद्दल काही महत्वाच्या गोष्टी हाती
लागल्या आहेत. शिवाय एक पेपर नॅपकिन मिळाला आहे. तो पटेल कॉटेजचा नॅपकिन आहे. आम्ही
दोघं तिथेच जातोय सर... ओ.के. सर..." फोन ठेवत आनंद म्हणाला, "सर आणि सचिन त्या प्रोड्यूसर
जयवंतला भेटले. त्यांनाही काही गोष्टी समजल्या आहेत. तो ऍक्टर पवन गोव्याला होता.
तो थोड्या वेळात मुंबईत दाखल होत आहे. सर त्याला एयरपोर्टवरून चौकीवर आणणार
आहेत..."
आनंद बोलत होता पण उमा टक लाऊन त्या पेपर नॅपकिनकडे पाहत
होती. उमाचं लक्ष नाही पाहून आनंदने तिला हटकलं, "उमा... कसला विचार करतेस..." तो नॅपकिन समोर धरत
उमा म्हणाली,
"हा लोगो मी नुकताच पाहिला आहे.
आठवत नाही कुठे पाहिला हा लोगो. पण इतक्यातच पाहिल्यासारखा वाटतोय..."
आनंदनेही तो नॅपकिन पुन्हा पाहिला. मग उमाकडे पाहत म्हणाला, "कदाचित या घरावर पाळत ठेवण्यासाठी
आणि घरात येणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी ज्या व्यक्तीने या गुंडांना पाठवलं, त्याचा या लोगोशी काहीतरी संबंध असावा... आणि आपण त्या
व्यक्तीला भेटलो असू म्हणून तुला हा लोगो ओळखीचा वाटत असेल... पण या सगळ्यावर इथे
चर्चा करण्यापेक्षा तुर्तास आपण चौकीवर जाऊ. कदाचित तिथे जाऊन काहीतरी
समजेल..." इतकं बोलून आनंद आणि उमा बाईकने निघाले...
तिथे एयरपोर्टवर प्रधान आणि सचिन, पवनच्या बाहेर येण्याची वाट पाहत होते. सचिन म्हणाला, "सर, हा
पवन मोठा माणूस आहे. आपण त्याला चौकीवर नेलं तर ठिक होईल का..." प्रधान
म्हणाले,
"मला माहित आहे त्याला असं
डायरेक्ट नेता येणार नाही. म्हणून मी तशी परमिशन घेऊनच आलो आहे. ते बोलतच होते की
प्रधानांचा फोन वाजला,
"हॅलो, सीनियर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय... येस डॉक्टर... ओ.के.
तिथे आमची माणसं आहेत ना,
त्यांना द्या जरा... हां, हे बघा तिला फक्त स्टेशनला नका सोडू. तिच्या ट्रेनमध्ये
सीटपर्यंत नीट सोडा..." फोन खिशात ठेवत सचिनकडे वळून प्रधान म्हणाले, "हॉस्पिटलमधून फोन होता. अक्षराचे
आई-वडील आलेत तिला न्यायला. मी आपल्या माणसांना अक्षराला स्टेशनवर सोडायला सांगितलं
आहे..." प्रधान बोलतच होते,
की समोरून पवन येत असल्याची खूण
सचिनने केली. सचिनला गाडी काढायला सांगून प्रधान पवनच्या दिशेने गेले...
पवनजवळ जात प्रधान म्हणाले, "मि. पवन. मी सीनियर इंस्पेक्टर
प्रधान. एका केस संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही प्लीज चौकीवर
येता..." पवनने प्रधानांकडे पाहिलं आणि म्हणाला, "विक्रम..." प्रधानांनी
होकारार्थी मान हलवली आणि पवन त्यांच्यासोबत चालू लागला. एयरपोर्टच्या बाहेर
पडताना प्रधानांनी सचिनला गाडी घेऊन यायला सांगितलं आणि पवनकडे वळले तोच गोळी
झाडण्याचा आवाज आला. पवन व प्रधान एकत्र खाली बसले. अजून एक गन शॉटचा आवाज आला आणि
पवनच्या बाजूलाच असलेला कचऱ्याचा लोखंडी डबा खाली पडला. पवनला कव्हर करत
प्रधानांनी समोर पाहिलं तर एका बाईकवर एक मास्क घातलेला माणूस हातात पम्प गन घेऊन
पवनवर गोळ्या झाडत होता. प्रधानांनी त्यांची गन काढली आणि लोड करून फायर केलं.
मास्कधारी सरकला पण प्रधानांनी झाडलेली गोळी त्याच्या हाताला लागली आणि त्याची गन
त्याच्या हातून लांब फेकली गेली. मास्कधाऱ्याने बाईक सुरू केली आणि भरधाव वेगाने
बाहेरच्या दिशेने निघाला...
पवनला सांभाळत प्रधानांनी रस्त्यावर पाहिलं तर सचिनही
गाडीसह तिथे पोहोचला होता. सचिनकडे पाहत प्रधान ओरडले, "सचिन दॅट इज द मॅन... पकड त्याला..."
सचिनने गाडीचा गेयर बदलला आणि मास्कधाऱ्याच्या मागे जाऊ लागला. तिथे एयरपोर्टवर
घडल्या प्रकारामुळे अनेक पोलिस जमा झाले होते. त्यातल्याच दोघांना प्रधानांनी गाडी
आणायला सांगितलं आणि पवनकडे वळत म्हणाले,
"आर यू ओ.के..." पवनने
होकारार्थी मान हलवली. तेवढ्यात हवालदार पोलिस जीप घेऊन आले. प्रधान आणि पवन
जीपमध्ये बसले आणि जीप चौकीकडे निघाली. तिथे सचिन त्या बाईकस्वार मास्कधाऱ्याचा
पाठलाग करत होता. बाहेर हात काढून सचिन त्या मास्कधाऱ्यावर गोळ्या झाडत होता. तो
मास्कधारी बाईक वेडी-वाकडी हलवत त्या गोळ्या चुकवत होता. रत्यावरून गल्लीमध्ये, गल्लीमधून पुन्हा रस्त्यावर असा भरधाव वेगाने तो
बाईकस्वार जात होता आणि सचिन त्याच्या मागावर होता...
सचिनने एक गोळी झाडली. मास्कधाऱ्याने बाईक वळवली. सचिनने
झाडलेली गोळी मास्कधाऱ्याच्या गळ्यात असलेल्या स्ट्रॅपवर बसली. स्ट्रॅप तुटला आणि
सोबत जोडलेली साईड-बॅग निखळून वेगळी होऊन बाजूला फेकली गेली. सचिनसोबत त्या
मास्कधाऱ्यानेही ती बॅग पडताना पाहिली होती. त्याने एकवार समोर पाहिलं. मग आपली
बाईक बॅलन्स केली. नंतर हँडलवरचे दोन्ही हात सोडून त्याने दोन गन्स बाहेर काढल्या
आणि चालत्या बाईकवरच पाठीवर आडवा झोपून एकाच वेळी दोन्ही गोळ्या सचिनच्या गाडीच्या
दिशेने झाडल्या. गोळ्यांनी सचिनच्या गाडीच्या पुढच्या चाकांचा बरोब्बर वेध घेतला.
चाकं फाटली आणि गाडी कंट्रोल बाहेर जाऊ लागली. क्षणाचाही उशीर न करता सचिनने
गाडीतून उडी घेतली. गाडी त्याच वेळी पुढच्या दोन चाकांवर उचलली जाऊन हवेत
गंटांगळ्या खात जमिनीवर आली. आदळताच गाडीचा स्फोट झाला आणि आगीच्या लोळासह
रस्त्यावर घासत गाडीने रस्त्यावरचं रेलिंग तोडलं आणि घळीत शिरली. मास्कधाऱ्याने
एकवार मागे पाहिलं आणि बाईकचा वेग वाढवत पुढे निघून गेला...
जीपमधून उडी घेऊन रस्त्याच्या कडेला पडलेला सचिन उठला
आणि रस्त्यावर आला. एव्हाना तिथे बघ्यांची गर्दी जमली होती. सचिनने बाईक गेली त्या
दिशेला नजर फिरवली पण तोवर बाईक निघून गेली होती. गर्दीतले काही जण, "तुम्ही ठिक आहात का...", "कोण होता तो बाईकवाला...", "रॅश ड्रायव्हिंग काय
करताय...",
"तुमच्याकडे बंदूक कशी..."
अशा प्रश्नांचा भडिमार करत होते. सर्वांना शांत करत सचिनने स्वत:चं आय.डी. कार्ड
दाखवून स्वत:ची ओळख पटवून दिली. गर्दी पांगू लागली तसा सचिनने मोबाईल काढून
प्रधानांना फोन लावला,
"हॅलो सर... सर तो बाईकवाला निसटला
सर. तो माझ्या आवाक्यात होता. पण त्याने टायरवर गोळी झाडली. टायर फाटलं आणि गाडी
आऊट ऑफ कंट्रोल झाली. हो सर मी ठिक आहे. सर मी पण त्याच्यावर गोळ्या झाडल्या
होत्या. त्यातली एक..." सचिन पुढे काही बोलणार इतक्यात त्याला आठवलं गोळी
बाईकरच्या गळ्यातल्या क्रॉस बॅगच्या पट्ट्याला लागली होती आणि पट्टा तुटून बॅग
बाजूला फेकली गेली होती. "सर,
मी थोड्या वेळात तुम्हाला परत कॉल
करतो..." असं म्हणून सचिनने फोन ठेवला आणि मागच्या दिशेने चालू लागला...
थोडं अंतर चालून गेल्यावर एका झाडाजवळ पडलेली एक वस्तू
सचिनला दिसली. तो जवळ गेला तर ती वस्तू म्हणजे तीच क्रॉस बॅग होती. त्यात थोडेफार
पैसे, सिगारेट लायटर आणि एक की-चेन
होती. त्या की-चेनवर "पी.सी. २२..." लिहिलं होतं. सचिनने थोडा विचार
केला आणि पुन्हा प्रधानांना फोन लाऊन त्या बॅगबद्दल आणि की-चेनबद्दल सांगितलं आणि
म्हणाला,
"सर, मी
या की-चेनवरच्या लोगोचा इंटरनेटवर शोध घेतला. सर हा पटेल कॉटेजेसचा लोगो आहे. २२
नंबर म्हणजे कदाचित रूम नंबर असावा. सर मी तिथेच निघालो आहे. तुम्हाला पत्ता
पाठवला आहे सर..." इतकं म्हणून सचिनने फोन ठेवला आणि पुन्हा रस्त्यावर येऊन
त्याने लिफ्टसाठी हात करायला सुरुवात केली. गाड्या थांबतच नव्हत्या. काही क्षणात
पोलिसांची मोबाईल व्हॅन त्याच रस्त्याने चालली होती. सचिनने हात दाखवताच ती जवळ
येऊन थांबली. आत बसलेल्या पोलिसांना सचिनने स्वत:ची ओळख करवून दिली आणि त्याच
गाडीत बसून सचिन पटेल कॉटेजकडे रवाना झाला...
काही वेळाने व्हॅनने मुख्य रस्ता सोडला आणि मातीच्या
रस्त्यावरून पुढे जाऊ लागली. झाडीतून डोकं वर काढलेला एक बोर्ड समोर होता. त्यावर लिहिलं होतं 'पटेल कॉटेजेस...'
सचिनने गाडी थांबवायला सांगितली.
व्हॅनमधले हवालदार सचिनसोबत येऊ पाहत होते. पण सचिन म्हणाला, "इथे थोडा धोका आहे. तुम्ही असेच
जवळच्या चौकीवर जा आणि अजून कुमक घेऊन या. तोवर मी..." सचिन पुढे बोलणार
इतक्यात त्याची नजर व्हॅनच्या मागच्या सीटकडे गेली. तिथे दोन माणसं झोपलेली होती.
त्यांची अवस्था पाहून सचिनला समजलं की ते दोघंही मेलेले आहेत. सचिनने त्या हवालदारांकडे
पाहिलं. दोघंही हसत होते. त्यातला एक म्हणाला, "धोका आम्हाला नाही. तुला आहे. बरेच पुढे आलात तुम्ही
लोक. पण आमचा बॉससुद्धा हुशार आहे. जागो जागी आमच्यासारखी माणसं पेरून ठेवली होती
त्यांनी. नताशाच्या घरातला तो सेक्रेटरी,
दिव्याच्या घरावर हल्ला करणारे
गुंड आणि आता आम्ही. आत्तापर्यंत ते बाकी पोलिसवाले तर मेले असतील. आता तुझी
पाळी..."
दुसऱ्या बाजूने आनंद आणि उमा गेटजवळ पोहोचले होते. पटेल
कॉटेज असा मोठा बोर्ड तिथे होता. समोर रिसेप्शनवर एक माणूस बसला होता. आनंद आणि
उमा काऊंटरवर गेले. आपले आय.डी. कार्ड दाखवून दोघांनी स्वत:ची ओळख पटवून दिली.
बाबूचा फोटो दाखवत आनंदने विचारलं,
"हा माणूस राहतोय का इथे..."
बाबूचा फोटो पाहून रिसेप्शनवरच्या माणसाने डोळे विस्फारले. तो म्हणाला, "हो सर. तीन दिवसांपूर्वी हा माणूस
इथे आला होता. कॉटेज नंबर २२ दिला आहे त्याला. पण हा आत्ता कॉटेजमध्ये नाही.
सकाळीच बाहेर गेला आहे. चावी मात्र दिली नाही..." तो बोलतच होता की प्रधानही
तिथे पोहोचले. उमाने प्रधानांना सर्व
माहिती दिल्यावर रिशेप्शनिस्टकडे पाहत प्रधान म्हणाले, "हे पहा, जो माणूस कॉटेज नंबर २२ मध्ये आहे तो एक अपराधी आहे.
आम्ही त्यालाच पकडायला आलो आहोत. तुम्ही सगळे इथून बाहेर जा. कदाचित तुम्हालाही
धोका होऊ शकतो... उमा, तू इथेच थांब. कॉटेजवर काही झालं तर आपल्याकडे बॅकप असायला
हवा. आनंद, लेट्स गो..."
उमाला रिसेप्शनवर सोडून प्रधान आणि आनंद कॉटेज नं २२कडे
वळले. मॅनेजरने कॉटेजचा रस्ता दाखवल्यावर प्रधानांनी त्यांना मागे राहण्याचा इशारा
केला. मॅनेजर आणि कॉटेजचा बाकी स्टाफ मागे गेले तशी प्रधान आणि आनंदने आपापल्या
गन्स काढून लोड केल्या. प्रधान डावीकडून गेले तर आनंदने उजवी बाजू धरली. २२
नंबरमध्ये जर कोणी असेल तर त्या व्यक्तीला दिसू नये अशा पद्धतीने भिंतींमागे लपत, झाडाच्या आड जात,
गाड्यांचा आडोसा घेत दोघं
कॉटेजच्या जवळ पोहोचली. कॉटेज नंबर २२ त्या आवारात एकदम शेवटी होतं. पलिकडच्या
बाजूला छोटी दरी होती आणि दरीच्या अंताला तलाव होता. प्रधान आणि आनंदची
नेत्रपल्लवी झाली आणि प्रधानांनी डाव्या हाताचं पहिलं बोट हवेत फिरवलं. आनंदला
समजलं आणि त्याने मानेनेच होकार दिला. दोघांनी बाहेरूनच कॉटेजची पडताळणी केली.
आजू-बाजूला कोणीही नाही याची खात्री करून दोघंही कॉटेजच्या मुख्य दाराशी आली...
तिथे रिसेप्शनवर उमा वाट पाहत असताना मॅनेजर तिथे आला.
मॅनेजरला पाहून उमाला प्रश्न पडला. उमाजवळ येत मॅनेजर म्हणाला, "दोन्ही ऑफिसर्स कॉटेजकडे गेलेत
आणि तुम्हालाही बोलावलं आहे..." उमा पुढे जाऊ लागली तसं मॅनेजरने तिच्या
डोक्याला पिस्तूल लावलं. उमाने हात वर केले तसा तो मॅनेजर म्हणाला, "कुठे निघालात मॅडम... तुमच्या
त्या दोन ऑफिसर्सकडे... ते आता वरच्या वाटेने जाणार आहेत. मानलं बॉस तुम्हाला.
इतक्या सफाईदारपणे तुम्ही सर्वांचा काटा काढला की बस. इथे आल्यावर आम्ही इथल्या
सगळ्या वेटर्सना आणि रिसेप्शनिस्टला कायमची रजा दिली आणि हे कॉटेज ताब्यात घेतलं.
तो तुमचा ऑफिसर आमच्या बॉसचा पाठलाग करत होता. बॉस तर निसटला पण या कॉटेजच्या
बाजूच्या जंगलात आमच्या साथिदारांनी तुमच्या माणसाचा गेम केला. आता तुम्हाला
तिघांनाही इथेच उडवणार आम्ही. आता मरणाला तयार हो..." बोलता बोलता मॅनेजरने
लिव्हर मागे-पुढे केलं...
प्रधानांनी
कानोसा घेतला. आतून कसलाही आवाज येत नव्हता. आनंद आणि प्रधानांनी एकमेकांकडे
पाहिलं आणि लाथा हाणून दार उघडलं. ती एक छोटीशी खोली होती. पलंग, कपाट, एक छोटा फ्रीज, एक टेबल
आणि खोलीच्या कोपऱ्यात असलेली एक वॉशरूम. आनंद आणि प्रधान पिस्तूलं सरसावत अंत
शिरले. आनंद वॉशरूमकडे गेला तर प्रधान कपाट चेक करू लागले. प्रधानांनी कपाट उघडलं.
आत काही पुरुषी कपडे होते तर काही कपडे बायकी पण होते. एका पॅकेटमध्ये बरीच मोठी
रक्कम होती आणि बाजूला काही पुडक्या होत्या. एक पुडी फाडून प्रधानांनी त्यातली
वस्तू चाखली. प्रधानांचे डोळे विस्फरले. त्या पुडक्यातली वस्तू ड्रग्स होते. दार
ढकलून आनंदने पिस्तूल समोर धरलं. पण वॉशरूममध्ये कोणीही नव्हतं. आनंद मागे वळला
तोवर कपाट चेक करून प्रधान टेबलजवळ पोहोचले. तिथे खाण्याच्या दिशेस पडलेल्या
होत्या, चहाचे कप होते आणि टेबलाच्या एका कोपऱ्यात एक फोटो
फ्रेम होती. प्रधानांनी फ्रेम उचलली त्यातले फोटो पाहून प्रधानांचे डोळे मोठे
झाले. तोवर आनंद प्रधानांजवळ येऊन पोहोचला होता. आनंदकडे पाहत प्रधान म्हणाले,
“आनंद, हे दोन्ही फोटो पाहिलेस...” फोटो पाहत
आनंद म्हणाला, “सर, हा फोटो तर...”
आनंदला मध्येच तोडत प्रधान म्हणाले, “तो लिफाफा कुछ और था,
और मजमून कुछ और है...”
दोघं
बोलतच होते, की प्रधानांचा फोन वाजला,
“हॅलो सीनियर इन्स्पेक्टर प्रधान बोलतोय..., व्हॉट...
कसा पळाला तो... शिट...” बोलणं ऐकून फोन आत ठेवत प्रधान म्हणाले, “पवन निसटला...” प्रधान पुढे बोलणार इतक्यात खिडकीच्या काचा अचानक फुटल्या.
बाहेरून काही बंदुकधाऱ्यांनी कॉटेजला तीन बाजूंनी घेरलं होतं आणि ते कॉटेजवर बेछूट
गोळीबार करू लागले. तिकडे
जंगलात दोन्ही गुंडांनी पिस्तुली काढल्या. एकाने सचिनची गन काढून घेतली तर
दुसऱ्याने त्याचा मोबाईल हिसकावला. सचिनला धरून दोघं झाडीत शिरली. दोन्ही हात
डोक्यामागे धरून सचिन पुढे चालला होता आणि हातात पिस्तुली सरसावून ते गुंडं मागून
येत होते. सचिन थोडा पुढे गेला आणि अचानक वाकला. आपले दोन्ही हात जमिनीला टेकवत
त्याने पायाने दोघांची पिस्तुलं उडवली. अचानक झालेल्या हल्ल्याने दोन्ही गुंडं
मागे सरकले. संधी साधून सचिनने आपल्या पायाने एका गुंडाच्या मानेवर वार केला. तो
गुंडं झाडावर आदळून तिथेच निपचित पडला. दुसऱ्या गुंडाने ठोसा मारायला हात फिरवला
तसा सचिन बाजूला झाला आणि लगेच त्या गुंडाची मानगूट पकडडून वळवली. त्या गुंडाची
मान मोडली आणि तोही गतप्राण झाला. सचिनने लगेच आपला मोबाईल आणि गन ताब्यात घेतले. मोबाईलकडे पाहत सचिन म्हणाला, “मोबाईल तर बंद पडला
आहे. आता सरांना कॉनटॅक्ट
कसा करू... त्या पटेल कॉटेजमधून संपर्क साधतो सरांशी...” इतकं बोलून त्याने मोबाईल
खिशात ठेवला आणि पटेल कॉटेजकडे मोर्चा वळवला...
गन शॉट्सचे आवाज रिसेप्शनपर्यंत येत होते. उमाच्या
डोक्यावर लावलेलं पिस्तूल स्थिर करत मॅनेजर गोळीबाराच्या दिशेला पाहू लागला.
मॅनेजरचं लक्ष नाही पाहून उमा झटक्यात आपले दोन्ही पाय जमिनीला समांतर करून खाली
बसली आणि तिने मॅनेजरच्या पोटात गुद्दा मारला. अकस्मात झालेल्या हल्ल्याने मॅनेजर
बावचळला. त्याच्या हातून त्याची गन निखळून पडली. उमाने लगेच आपले पाय दुमडले आणि
पोटात गुद्दा बसल्याने वाकलेल्या मॅनेजरच्या हनवटीवर लाथ मारली. उमा आणि तो मॅनेजर
दोघांनीही हवेत कोलांटी मारली. मॅनेजर छातीवर पडला तर उमा आपल्या पायांवर उभी
राहिली. उमाने हातकडी काढून त्या मॅनेजरचे हात त्याच्या पाठीला जखडले. त्याच्या
कोटाच्या आतल्या बाजूला असलेली स्वत:ची गन मिळवली आणि कॉटेज नं. २२कडे जाऊ
लागली...
इकडे गोळ्यांच्या वर्षावापासून वाचण्यासाठी प्रधान आणि
आनंदने जमिनीवर समांतर उडी मारली आणि बेडच्या आडोशाला गेले. दोघांनीही आपापल्या
गन्स काढल्या पण डोकं वर करून गोळ्या चालवणं त्यांना शक्य होत नव्हतं. कॉटेजवर
तीनही बाजूंनी बेछूट गोळीबार होत होता. काचा फुटत होत्या, तावदानं तुटत होती, भिंतींचे टवके उडत होते तरीही
गोळीबार थांबत नव्हता. इतक्यात कॉटेजच्या उजव्या बाजूने रिसेप्शनकडून उमा आली आणि
डाव्या बाजूने जंगलाकडून सचिन आला. दोघांनीही उजव्या आणि डाव्या बाजूच्या गुंडांवर
प्रतिहल्ला चढवला. हे पाहून गुंडांनी आपल्या गन्सच्या नळ्या सचिन व उमाकडे
वळवल्या. गोळीबार दोन बाजूंनी बंद झाला हे लक्षात येताच प्रधान आणि आनंदने आपापल्या
गन्स लोड केल्या आणि गोळ्या चालवतच बेडमागून वर येत समोरच्या खिडकीची एकेक बाजू
पकडली. कॉटेजला घेरून हल्ला करणारे ते गुंड स्वत:च या चौधांच्या घेरात अडकले आणि
मारले गेले. मरता मरता एका गुंडाने बॉम्बची पिन काढून बॉम्ब कॉटेजच्या दिशेने
भिरतावला. बॉम्ब आत आला आहे हे पाहताच प्रधान आणि आनंदने खिडकीतून उड्या टाकल्या.
स्फोट झाला आणि कॉटेजच्या ठिकऱ्या उडाल्या...
उमा आणि सचिन धावत तिथे पोहोचले. "तुम्ही ठिक आहात
ना..." दोघांनी विचारलेल्या या प्रश्नाला आनंद आणि प्रधानांनी मान हलवून
होकार दिला. प्रधानांकडे पाहत आनंद म्हणाला, "सर, आपण जिथे जातो तिथे आपल्या
स्वागतासाठी ही माणसं आधीच पोहोचलेली असतात. हा बाबू इतका पहोचलेला असेल असं वाटलं
नव्हतं. पण तो तर एकटाच ऑपरेट करायचा..." आनंदला मध्येच तोडत सचिन म्हणाला, "आनंद सर, मला तर वाटतं तो मारेकरी बाबू
नाही..." सर्वजण सचिनकडे पाहू लागले. सचिन पुढे म्हणाला, "सर, एयरपोर्टवरून मी त्या
बाईकवाल्याचा पाठलाग केला. सर ज्या प्रकारे त्याने बाईक चालू असताना माझ्यावर
गोळ्या चालवल्या, तेवढी
लवचिकता बाबूमध्ये असणं शक्य नाही सर..." सचिन बोलतच होता, की रिसेप्शनच्या दिशेने कोणीतरी
धावताना दिसलं. प्रधान लगेच म्हणाले, “कोणीतरी धावत जातंय. पकडा त्या
व्यक्तीला...” आनंद रिसेप्शनच्या दिशेने गेला आणि सचिन डाव्या बाजूने गेला.
दोघांनी लवकरच त्या व्यक्तीला घेरलं. दोघांनी त्या व्यक्तीला प्रधानांसामोर उभं
केलं. त्या व्यक्तीला पाहून प्रधान म्हणाले, “ओ... मला वाटलंच होतं. एखादातरी ओळखीचा चेहेरा पाहायला मिळाणारच
इथे...” प्रधान बोलतच होते, की
गतप्राण झालेल्या मारेकऱ्यांपैकी एकाचा फोन वाजला. आनंदने सर्वांकडे पाहिलं आणि
गुंडाच्या खिशातून फोन काढून ऑन केला...
आनंद काही बोलणार इतक्यात समोरून आवाज आला, "हॅलो, मी साहेब बोलतोय... काय झालं...
मेले का सगळे पांडू..." आनंदने थोडा विचार केला आणि म्हणाला, "हो सगळे मेले..." हे
ऐकल्यावर समोरून आवाज आला, "ठिक
आहे. तुम्ही सगळे गायब व्हा तिथून. इथलं काम झालं की तुमचे पैसे मिळतील
तुम्हाला..." फोन बंद झाला. आनंदने नंबर पाहिला आणि सर्वांना दाखवला. नंबर
पाहून सचिनने डायरी चेक केली आणि म्हणाला, "सर
हा नंबर तर..." सचिन पुढे बोलणार इतक्यात खिशातून एक फ्रेम काढत प्रधान
म्हणाले, "नंबर
तर पाहिलात तुम्ही. आता हा फोटो बघा. या कॉटेजमधून आम्हाला हा फोटो आणि या
ड्रग्सच्या पुडक्या मिळाल्या..." फोटो पाहून सचिन आणि उमाचे डोळे विस्फारले.
मान हलवत प्रधान म्हणाले, "तुमचा
सर्वांचाच तर्क बरोबर आहे. द गेम विल एंड नाव... लेट्स हंट नताशा..."
तिथे एका बंगल्यात बऱ्यापैकी अंधार होता. एका खोलीत
ठेवलेल्या दोन खुर्च्यांवर दोन व्यक्ती बसल्या होत्या. त्या दोन्हीही व्यक्ती
उठण्यासाठी धडपडत होत्या पण त्यांना हलता येत नव्हतं. अजून एक व्यक्ती धावत तिथे
आली आणि खुर्च्यांवर बसलेल्या व्यक्तींना सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात, "यांना सोडवायला आलास... पण ते
शक्य नाही... तुम्हाला निघता येणार नाही माझ्या कचाट्यातून..." या
आवाजापाठोपाठ बुटांचा आवाज खोलीत घुमू लागला. खुर्चीत बसलेल्या दोन्हीही
व्यक्तींनी बुटांचा आणि बोलण्याचा आवाज ऐकून हालचाल थांबवली. बुटांचा आवाज
त्यांच्या अगदी जवळ आला आणि खोलीतले लाईट लागले. खुर्चीत नताशासोबत दुसऱ्या एका
मुलीला बांधून ठेवलं होतं. ती दुसरी मुलगी दिव्या होती आणि बाजूला पवन उभा होता.
लाईट लागेपर्यंत पवनने दिव्या आणि नताशाच्या तोंडांवर बांधलेली फडकी सोडवली होती.
तिघांनीही समोर पाहिलं तर हातात पिस्तुल घेऊन एक माणूस समोर उभा होता. त्याच्या
मागे असलेल्या चार गुंडांनी धावत जाऊन पवनला धरलं...
पिस्तुलाची दिशा पवनकडे करत तो माणूस म्हणाला, "मि. पवन, पिक्चरमध्ये दाखवता तशी हीरोगिरी
इथे दाखवू नका. हे लुटूपुटूचे गुंडं नाहीत, माझी
माणसं आहेत. खरंतर तुमच्याशी माझं काहीच वैर नाही. त्या विक्रमसह मला या दोघींचाही
बदला घ्यायचा होता. तुमचे आणि दिव्याचे संबंध माझ्या पथ्थ्यावर पडले आणि मी तुमचा
ढालीसारखा वापर करायचं ठरवलं.
म्हणजे या प्रकरणात तुम्हाला गोवलं तर मी नामानिराळा राहून माझा धंदा सुरू ठेवायला
मोकळा..." तो माणूस बोलतंच होता की दिव्या बोलू लागली, "आम्ही काय वाकडं केलं तुझं. आम्ही
तर तुला ओळखतच नाही. मला इथे बांधून स्वत:च्या जॅकेटवर कॅमेरा लावून विक्रमचा खून
तू आम्हाला दाखवलास..." दिव्याचं बोलणं पुढे नेत नताशा म्हणाली, "पिस्तुलाचा धाक दाखवून माझ्याकडून
पोलिसांना खोटा पत्ता दिलास. आणि आता आम्हालाच मारायची भाषा करतोस... अरे काय वाईट
केलं आम्ही तुझं..."
दिव्या आणि नताशा रडत होत्या आणि हातात गन घेतलेला तो
माणूस हसत होता. हसता हसता तो म्हणाला, "हे
सगळं गरजेचं होतं. विक्रमच्या खुनात तुम्हाला अडकवून तुमचं आयुष्य बरबाद करायचं
होतं मला. विक्रमचा खून मोकळ्यावरच करायचा होता मला. पण त्याच्या खुनात अडकायचं
नव्हतं. पोलिसांना घुमवण्यासाठी मी हा प्लॅन बनवला. त्या खाकीवर्दीवाल्यांना
मारण्याचा मी हरेक प्रयत्न केला. पण ते वाचले आणि माझ्या अड्ड्यापर्यंत पोहोचले.
कर्माने मेले बिचारे. पण कायदा तर आहे ना अजून. कायद्यातून वाचण्यासाठी माझा हा
प्लॅन. त्या फोटोंमुळे विक्रमला मारण्याचं कारण नताशाकडे होतं. नताशाने तिच्या
प्रियकराकरवी विक्रमला मारलं. नंतर दिव्याने पवनकरवी नताशाला मारलं. मग समजलं की
पवनच नताशाचाही प्रियकर होता म्हणून दिव्या आणि पवनमध्ये वाद झाला आणि दोघांनी
एकमेकांचा जीव घेतला. बस. खेळ खल्लास. सो नो हार्ड फीलिंग्स. आणि तुम्ही दोघींनी
माझं काय वाईट केलं हे आता वर जाऊन विक्रमलाच विचारा..." हसत हसत त्या
माणसाने गनचा लिव्हर ओढला. तो फायर करणार इतक्यात त्याच्या हातावर एक गोळी येऊन
आदळली...
त्या माणसाच्या हातून त्याची गन सुटून दूर फेकली गेली.
प्रधानांसह उमा, सचिन
आणि आनंद आत आले. प्रधानांनी त्या माणसावर गन रोखली. सचिन आणि आनंदने बाकीच्या
गुंडांना गन पॉईंटवर हात वर करून गुडघ्यांवर बसायला लावलं. त्या माणसांकडे पाहत
प्रधान म्हणाले, "संजय, तुझा खेळ संपलेला आहे. संजयचा
प्रश्नार्थक चेहेरा पाहून प्रधान पुढे म्हणाले, "बातमी तर आली होती की आम्ही मेलो.
त्यामुळे आम्हाला पाहून आश्चर्य वाटलं असेल ना तुला... शिवाय आम्ही इथे कसे... आणि
तुझ नाव कसं माहित आम्हाला... हाही प्रश्न पडला असेल ना... तुझ्यापर्यंत आम्हाला
पोहोचवलं या व्यक्तीने... तुम्ही तिघंही बघा या व्यक्तीला... काही लक्षात
येतंय..." प्रधान दाराकडे बोट दाखवत होते. दारात एका व्यक्तीला उमाने गन
पॉईंटवर उभं केलं होतं. त्या व्यक्तीला आत आणून सर्वांसमोर उभी करत उमा त्या
खुर्च्यांकडे वळली ज्यांवर दिव्या आणि नताशाला बांधलं होतं...
त्या व्यक्तीकडे पाहून नताशा आणि दिव्याने एकमेकींकडे
पाहिलं आणि एका सुरात म्हणाल्या, "आरती..."
तोवर उमाने दिव्या आणि नताशाला सोडवलं होतं. एका गुंडाचा गळा धरत आनंद म्हणाला, "येस आरती. तुमच्या कॉलेजमधली
आरती. जी अक्षरा बनून विक्रमला भेटली. या सगळ्या कारस्थानात तिचाही सहभाग
आहे..." अनंदचं बोलणं पुढे नेत सचिन म्हणाला, "संजय, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता हे
या फोटोने सिद्ध झालं. शिवाय, या
फोटोत आरती आणि तुझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे. तो फोटोग्राफर ज्याची इमेज
तुमच्या मागे असलेल्या आरशात दिसते आहे..." तेव्हा उमा पुढे म्हणाली, "हा सतीशच आहे ना, जो याच घरात आम्हाला भेटला होता.
नताशाचा सेक्रेटरी म्हणून..." पुढे होत प्रधान म्हणाले, "सतीशला पाहिल्याबरोबर हा सगळा डाव
याच घरातून खेळला जात असणार याची खात्री पटली आम्हाला. सगळी माहिती मिळवली आहे
आम्ही. आरती, तू
आणि बाबूचं काय नातं आहे, हे
सुद्धा समजलं आम्हाला. तेव्हा आता गुन्हा कबूल कर तुझा..."
संजयची माणसं डोक्यामागे दोन्ही हात ठेऊन गुडघ्यांवर
बसली होती. त्यांच्या दोन्ही बाजूला आनंद आणि सचिन उभे होते. समोर एका खुर्चीत
संजय बसला होता. नताशा, दिव्या, पवन, उमा आणि प्रधान त्याला घेराव घालून
उभे होते. संजयने एकवार सर्वांकडे पाहिलं आणि बोलायला सुरूवात केली, "हो. मीच केलं हे सगळं. आरती माझी
धाकटी बहिण आहे. तुम्ही म्हणता तो कॉन्ट्रॅक्ट किलर बाबू आमचे वडिल. आमची आई
आमच्या लहानपणीच गेली. टॅक्सी चालवून बाबा आम्हा तिघांचं पोट भरायचे. एक दिवस एका
भाडेकरूसोबत झालेल्या वादादर्म्यान बाबांकडून तो भाडेकरू त्याच्याचकडच्या पम्प आप
शॉटगनने मारला गेला. सोबत असलेल्या दुसऱ्या भाडेकरूने बाबांना चिक्कार पैसे दिले
आणि खून पचवायला मदतही केली. एक खून आणि पैशांचा पाऊस. टॅक्सीसोबत बाबांनी सुपारी
किलिंगचा व्यवसाय सुरू केला. यातच आमचं ज्यूनियर कॉलेजपर्यंतचं शिक्षणही झालं. आणि
एक दिवस बाबा पकडले गेले...
साऱ्या जगाला कळलं आम्ही कॉन्ट्रॅक्ट किलर बाबूची मुलं
आहोत. आमचा काही दोष नसताना आम्हाला हिणवलं गेलं. आम्हाला दूर लोटलं गेलं. आम्ही
शहर सोडलं आणि अमरावतीला मामाकडे आलो. बहिणीची मुलं म्हणून त्याने आम्हाला रहायला
जागा दिली. पण बाकी सारं आमचं आम्हालाच पहायचं होतं. आमचं शिक्षण सुटलं. कष्ट करून
आम्ही गुजरण करू लागलो. त्याच दरम्यान मला ड्रग्जचं व्यसन लागलं. ड्रग्स
मिळवण्यासाठी मी ड्रग्स विकायला लागलो. एक पुडी विकली की चिक्कार पैसा... मी हा
धंदा समजून घेतला आणि एक दिवस माझ्या बॉसलाच डबल क्रॉस करून धंद्यावर कब्जा मिळवला.
पुन्हा पैशाचा पाऊस पडू लागला. मी माणसं कमावली. माझं साम्राज्य बनवलं. आरतीला
पुन्हा कॉलेजला पाठवलं. माझ्या वडिलांप्रमाणे माझ्या धंद्याचं सावट आरतीवर पडू नये
म्हणून तिच्यापासून लांब जायचं ठरवलं...
मुंबईत या धंद्याला चांगली कमाई होती पण जोखिमही होती.
मी मुंबई गाठली आणि पटेल कॉटेजला माझा मुख्य अड्डा बनवलं. लोकांसाठी राहण्याचं
असलेलं पटेल कॉटेज माझ्या ग्राहकांसाठी ड्रग्सच्या देवणा-घेवाणीचं मुख्य केंद्र
बनलं. आमचं चांगलं चाललं होतं. आरती कॉलेजमध्ये शिकत होती आणि चारही बाजूंनी पैसा
बरसत होता. धंदा वाढवावा म्हणून दोन वर्षांसाठी मी दुबईला गेलो. परत आलो आणि तडक
अमरावतीला गेलो. मला वाटलं आरतीला आनंद होईल. पण तिला पाहून मलाच धक्का बसला. आरती
हॉस्पिटलमध्ये होती. पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेली माझी आरती एकदम शांत आणि सुन्न
झाली होती. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मी आरतीला पटेल कॉटेजवर घेऊन आलो. इथेच
तिच्यावर उपचारही झाले. दोन वर्ष लागली आरतीला नॉर्मल व्हायला. परत आलेल्या आरतीने
एक दिवस आयलँड ऑफ स्टार्स हे मासिक पाहिलं आणि तिला फीट आली...
शुद्धीवर आल्यावर माझ्या कुशीत शिरून आरती मनमोकळेपणाने
रडली. मग दोन वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टी तिने मला सांगितल्या. अमरावतीला ज्या
कॉलेजमध्ये आरती शिकत होती, त्याच
कॉलेजमध्ये विक्रम, नताशा
आणि दिव्यासुद्धा शिकत होते. आरतीला दोन वर्ष सीनियर असलेल्या या तिघांना आमच्या
वडिलांबद्दल समजलं. विक्रमने सगळ्या कॉलेजमध्ये आरतीला बदनाम केलं. आमच्या
वडिलांचं नाव घेऊन घेऊन विक्रमने तिचं जगणं मुश्किल केलं. नताशा आणि दिव्या आरतीला
विक्रमसमोर आणायच्या आणि विक्रम तिला बदनाम करायचा. तिला त्रास द्यायचा. आरतीचं
मानसिक संतुलन ढळलं. तिचं करियर संपलं. आणि हे सगळं त्या विक्रम, दिव्या आणि नताशामुळे. माझ्या
बहिणीचं आयुष्य खराब झालं आणि हे तिघं ऐश-आरामात जगत होते. माझ्या तळपायाची आग
मस्तकात गेली. मी या तिघांची सर्व माहिती मिळवली. माझ्या वडिलांचं नाव वापरुन आरतीला
सर्वांसमोर त्रास देणारा विक्रम होता म्हणून माझ्या वडिलांचंच नाव वापरून मी
सर्वांसमोर विक्रमला संपवायचं ठरवलं...
तुम्हा सर्वांना माहित आहे की कॉन्ट्रॅक्ट किलर बाबू जेल
मधून पळाला. पण हे कोणालाच माहित नाही की त्यांनी आम्हाला पटेल कॉटेजला शोधून
काढलं. आरतीने जेव्हा तिची हकीगत सांगितली तेव्हा बाबाही तिथे होते. आरतीच्या
झालेल्या मानसिक छळांमुळे त्यांच्या मनावर आघात झाला आणि ते हार्ट अटॅकने गेले. या
तिघांमुळे माझे वडिलही गेले. आम्हाला या तिघांचा बदला घ्यायचा होता. आम्ही प्लॅन
बनवला. विक्रमला क्लबमध्ये मारलं. मग दिव्याला नताशाच्या घरी बोलवून दोघींना कैद
केलं. दिव्याकडून विक्रम आणि तिच्या घटस्फोटाचे पेपर्स आणि पवन व दिव्याचे फोटो
मिळवले. नताशाकरवी दिव्याच्या पत्त्याऐवजी तुम्हाला पवनच्या घरी पाठवलं. मग
पवनलाही गायब करून नताशाच्या घरी आणलं. सगळा संशय दिव्या आणि पवनवर आला. माझा
मार्ग मोकळाच झाला होता. पण तुम्ही कॉटेजवर पोहोचलात आणि इथेही..." संजय
बोलायचा थांबला. प्रधान पुढे होत म्हणाले, "संजय, तुझ्या कॉटेजच्या चावीमुळे, पेपर नॅपकिन्समुळे आणि या
फोटोमुळे आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचलो. आरतीवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष देऊन कोर्ट
कदाचित तिच्या सोबत नरमी बरतेल. पण तू अट्टल गुन्हेगार आहेस. ड्रग्सचा व्यवसाय
चालवतोस, पोलिसांवर
हल्ला करवलास, विक्रमला
मारलंस... या सर्व गुन्ह्यांसाठी तुला कठोरातली कठोर शिक्षा होईल..."
समाप्त.
@ अनिकेत परशुराम आपटे.