Saturday, March 22, 2025

मृत्यूचा चित्रकार (दुसरा भाग)...


पू
र्वार्ध...

कथेच्या सुरुवातीला भावनाला दाराबाहेर आलेल्या आवाजाने जंग येते. ती दार उघडते आणि किंकाळी फोडते. काही तासांपूर्वी रतन, मंजू, भावना आणि गौरव, रतनच्या फार्म हाऊसवर येतात. तिथे दयाळ काका त्यांचं स्वागत करतात. आत जाताना गौरवला जंगलात एक इमारत दिसते. गौरव त्या इमारतीबद्दल विचारतो तेव्हा तो एक झपाटलेला बंगला आहे असं दयाळ काका सांगतात. रात्री सगळे झोपल्यावर गौरव आणि रतन त्या बांगल्याकडे निघतात. तेव्हा मंजू आणि भावनाही त्यांना येऊन मिळतात. सगळे बंगल्याच्या गेटमधून आत जातात. भावनाला एक लॉकेट सापडतं. सर्व त्या लॉकेटबद्दल बोलतच असतात, की बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडतो...

सर्वजण आत जाताच दार बंद होतं. तिथे काही फोटो फ्रेम्स टांगलेल्या असतात. त्या फ्रेम्स आणि त्यातले फोटो यांच्यात काळाची तफावत सर्वांना जाणवते. इतक्यात घड्याळाचे चार टोले पडतात. बारा वाजले असताना चार टोले कसे असा सर्वांना प्रश्न पडतो. घडयाळ शोधण्यासाठी गौरव आणि मंजू वर जातात तर रतन आणि भावना खाली शोधू लागतात. अचानक गौरव मरण पावतो आणि घड्याळाचे तीन टोले पडतात. एका मागून एक रतन आणि मंजूही मारतात आणि भावना एकटीच उरते. टी कशी-बशी निसटून फार्म हाऊस गाठते आणि बेशुद्ध पडते. आत्ताच्या घडीला पोलिस तपास करत असताना भावनाला कोणीतरी गळा आवळून मारल्याचं समजतं. तेव्हा दयाळ काका सांगतात की रतन आणि बाकी तिघंसुद्धा गायब आहेत...
इन्स्पेक्टर जगताप भावनाची बॉडी पी.एम. साठी पाठवतात. काही हवालदारांना जंगलात शोध घायायला पाठवतात. जंगलात बॉडीज सापडतात. सर्वांच्या अहवालात सर्वांचा मृत्यू हृदय बंद पडल्याने झाला असं समजतं. शिवाय भावनाचा मृत्यू गळा दाबून झाला असंही समजतं. असं का ते जाणून घ्यायला शेखर तिथे थांबतो. चौकीवर आलेला एक म्हातारा तिथल्या परिसराबद्दल एक कथा सांगतो. कथेप्रमाणे, इथे एक गांव होतं आणि गावाच्या मधोमध होता सावकाराचा वाडा. सवकाराच्या मुलाला, सोहनला एक आजार होता आणि त्याला चित्रकलेचा नाद होता. तो माणसं पकडून आणायचा. चित्र काढायचा मग त्या व्यक्तीला मारून टाकायचा. एकदा एका मुलीला आणलं गेलं. सोहनने तिच्यावर... तिला मारून पुरात असताना गावकरी तिथे आले आणि सोहनला तळघरात लपावं लागलं...

दुसरा भाग...

गावकरी तळघराचं दार वाजवत होते पण सोहन काही बाहेर आला नाही. शेवटी गावकऱ्यांनी वाडा पेटवला. अगीच्या ज्वाळा वाड्याला गिळंकृत करत असताना अचानक तळघरातून घड्याळातच्या ठोक्याचा आवाज आला. त्या जळत्या वाड्यातून येणारा हा आवाज जणू सांगत होता, "मी इथेच आहे आणि इथेच राहणार..." ठोक्याच्या त्या आवाजाने गावकरी घाबरले. त्यांनी ताबडतोब वाडा तोडून टाकला. त्या नोकर शंभूचं काय झालं, हे आजपर्यंत समजलं नाही. सोहन तर मेला, पण लोकांचं गायब होणं सुरूच राहिलं. वस्ती कमी होत गेली आणि झाडीसह जंगल वाढू लागलं. आजही आजू-बाजूने ये-जा करणारे लोक त्या वाड्याला पाहिल्याचंही सांगतात आणि मृत्यूची हाक देणाऱ्या त्या ठोक्यांचा आवाज ऐकल्याचंही सांगतात... "

ते वृद्ध बोलायचे थांबले. जगताप, शेखर आणि हवालदार एकमेकांकडे पाहत होते. शांतता भंग करत जगताप म्हणाले, "या सगळ्या भाकडकथा आहेत. असल्या दंतकथांवर माझा विश्वास नाही. कायदा पुरावे मागतो. सध्यातरी, मि. शेखर, तुम्ही भावनाचं हे सामान..." जगताप बोलतच होते, की शेखरची नजर भावनाच्या सामानात असलेल्या लॉकेटवर गेली. जगतापांना मध्येच तोडत शेखर म्हणाला, "सर, हे लॉकेट भावनाचं नाही. ती कधी लॉकेट घालत नव्हती..." यावर हवालदार म्हणाला, "सर, त्या कॉटेजच्या चौकीदाराने सांगितलं, की भावना जेव्हा अपरात्री वाड्यात परतली, तेव्हा तिच्या हातात हे लॉकेट होतं. ती काहीतरी सांगणार होती पण बेशुद्ध पडली. तिच्या मृत्यूनंतर तपासादरम्यान आम्हाला हेच लॉकेट तिच्या बॉडीजवळ सापडलं. शेखर पुढे म्हणाला, "सर, भावना कॉटेजमध्ये परतली ती त्या वड्यातून निसटून. कदाचित हे लॉकेट त्या वड्यामधलंच असावं..."

जगतापांना शेखरचं म्हणणं पटलं. ते म्हणाले, "भावनाचा मृत्यू, इथे झालेल्या इतर मृत्युंपेक्षा वेगळा आहे. हे लॉकेट जर त्या चारही मुलांपैकी कुणाचंच नाही तर ते नक्कीच त्या वाड्यातून आलं असावं. भावना एकटीच आहे जी त्या जंगलातून जिवंत परतली. कदाचित तिला एखादी वाट सापडली असेल. जंगलाचा तो परिसर आणि तो वाडा आपल्याला नीट तपासायला हवा. पण मि. शेखर, मी तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत. तुम्ही तुमच्या घरी जा. आम्ही सगळे त्या जंगलात..." जगतापांना मध्येच तोडत शेखर म्हणाला, "भावनाचा खूनी तिथे असताना मी घरात दुबकून बसू. नाही इन्स्पेक्टर साहेब. मी सुद्धा तुमच्या सोबत येणार..." शेखरचं हे निर्धारपूर्ण बोलणं जगताप टाळू शकले नाहीत. सर्व तयारीनिशी इन्स्पेक्टर जगताप, शेखर आणि काही हवालदार निघाले. जाताना ते लॉकेट घ्यायला जगताप विसरले नाहीत. जीप जंगलाकडे निघाली. दुपार टळून वेळ संध्याकाळकडे सरकत होती...

जीप जंगलाजवळ पोहोचली. खाली उतरताच जगताप म्हणाले, "मोहिते, त्या तीन मुलांच्या बॉडीज जिथे सापडल्या, तिथे आम्हाला घेऊन चला..." मोहिते पुढे चालू लागले आणि सर्वजण त्यांच्या मागे गेले. एका ठिकाणी येऊन सर्वजण थांबले. एका ठिकाणी तीन खड्डे खणलेले होते. त्यांकडे बोट दाखवत मोहिते म्हणाले, "सर, याच ठिकाणी आम्हाला त्या तीन मुलांच्या बॉडीज सापडल्या..." मोहितेंची पाठ थोपटत जगताप म्हणाले, "वेल डन मोहिते... सर्वजण लक्षात घ्या... चौकीवर तो म्हातारा म्हणत होता, शंभू मेलेल्या व्यक्तींना वाड्याच्या मागे झाडीत पुरत असे. जर ते खरं मानलं, तर या वेळी आपण वाड्याच्या मागच्या बाजूला उभे आहोत. तो वाडा तर दिसत नाहीये. पण इथून वाड्याच्या आत किंवा तळघरात जायला नक्कीच एखादी वाट असणार. शोधा. पण सावध रहा..."

बॅटरीच्या अंधूक प्रकाशात सर्वजण शोध घेऊन लागले. शेखर जगतापांसोबतच होता. अचानक जगतापांना ठेच लागली आणि ते खाली पडले. त्यांच्या हातातलं लॉकेट थोड्या दूर जाऊन पडलं. हवालदार जगतापांना उभं राहण्यास मदत करतच होते, की शेखरची नजर लॉकेटवर गेली. लॉकेट चमकत होतं. "इन्स्पेक्टर जगताप हे पहा काय... " असं म्हणत शेखरने लॉकेट उचललं आणि जगतापांना दाखवायला घेऊन आला. जोवर शेखर जगतापांपर्यंत पोहोचला तोवर लॉकेटची चमक नाहीशी होऊन ते पुन्हा काळं पडलं होतं. लॉकेटकडून सर्वांकडे पाहत शेखर म्हणाला, "अरे... आत्ता तर हे लॉकेट चमकत होतं. आणि आत्ता काळं पडलं..." बोलता बोलता शेखरने लॉकेट पुन्हा त्याच जागी नेलं जिथून उचललं होतं. लॉकेट पुन्हा चमकू लागलं. शेखरने सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाला, "इथे येताच हे लॉकेट चमकतंय. म्हणजे वाड्यात किंवा तळघरात जायचा रस्ता इथेच असणार..." शेखर लगबगीने तिथली माती हटवू लागला. जगताप आणि बाकी हवालदारसुद्धा शेखरच्या मदतीला आले. बघता बघता तिथे एक मोठा खड्डा तयार झाला. जगतापांनी टॉर्च मारला, तर खाली जाणारी शिडी त्यांना दिसली. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. आधी जगताप, मागून शेखर आणि हवालदार त्या शिडीचा वापर करत खाली उतरले. ती एक छोटीशी खोली होती. भिंतींवर कोळीष्टकं होती, जमिनीवर किडे फिरत होते. खोलीच्या कोपऱ्यात वळवीने पोखरलेलं एक लाकडाचं टोलेजंग घड्याळ होतं. जगताप म्हणाले, "बराच मोठा काळ ही खोली जमिनीखाली गढलेली वाटते. इथे काय मिळेल आपल्याला... चला परत जाऊ..." जगतापांना थांबवत शेखर म्हणाला, "थांबा साहेब. इथे नक्कीच काहीतरी असणार. त्याशिवाय हे लॉकेट आपल्याला इथे का आणेल..." शेखर बोलतच होता, की लॉकेट पुन्हा चमकू लागलं. यावेळी ते जास्त तीव्रतेने चमकत होतं. लॉकेटमधून एक विशालकाय किरण निघाला आणि सर्वांना स्पर्श करत शिडीच्या उलट्या दिशेला जात गायब झाला. त्या प्रकाशाने सर्वांचे डोळे दिपले. सर्वांनी डोळे घट्ट बंद केले. काही क्षणात सर्वांनी डोळे उघडले तर ते सर्व एका खोलीत होते. ते घड्याळ पूर्ण सूस्थितीत होतं पण बंद होतं. ती खोली अशी वाटत होती, जणू नुकतीच वापरली गेली असावी. समोरच एका खुर्चीत बसलेला एक लहान मुलगा रडत होता आणि एक माणूस त्याच्या समोर उभा राहून कॅनव्हासवर त्याचं चित्र काढत होता. शेखर आणि इतर सर्व प्रकाशाच्या पांढऱ्या वलयात उभे पारदर्शक दिसत होते. शेखरने चित्र काढणाऱ्या माणसाच्या गळ्याकडे बोट दाखवलं... त्याच्या गळ्यात तेच लॉकेट होतं, जे भावनाच्या सामानात सापडलं होतं, आणि जे आत्ता जगतापांच्या हातात होतं. त्या रडणाऱ्या मुलाला दरडावत तो माणूस म्हणाला, "ए कार्ट्या... उगाच रडू नकोस आणि स्थिर बस जरा. नाहीतर माझं चित्र बिघडेल..." इतकं बोलून तो माणूस पुन्हा चित्र बनवू लागला. इतक्यात, "शंभू... अरे शंभू... माझी औषधं..." या आवाजने शंभू त्रस्त झाला. कपाळावर आठ्या आणत तो म्हणाला, "हा सोहन पण ना... थोडा वेळ तग धरू शकत नाही... सडत चालेल्या या सोहनच्या संगतीत मी आजारी पडलो नाही म्हणजे मिळवलं..." स्वतःशीच बोलत शंभू उठला आणि, "ए पोरा... लगेच येतो मी परत. हलायचं नाही इथून. समजलं का..." असं त्या मुलाला दरडावत, "आलो छोटे सरकार..." अशी सोहनच्या हाकेला ओ देत शंभू खोलीबाहेर गेला. शंभू तिथे नाही याची खात्री करून तो मुलगा लगेच खुर्चीतून खाली उतरला आणि बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागला. तेवढ्यात शंभू तिथे परतला... त्या मुलाला खुर्चीपासून लांब उभं पाहून शंभूच्या रागाचा पारा चढला. "कार्ट्या... माझं ऐकत नाहीस... हे घे..." इतकं बोलत शंभूने त्या मुलाला एक चपराक हाणली. तो मुलगा बाजूलाच असलेल्या टेबलाला धडकला आणि खाली पडला. खाली पडताच तो गतप्राण झाला. तो मुलगा मेला हे पाहून शंभू थोडा घाबरला. पण आपल्याला कोणीच पाहिलं नाही हे लक्षात येताच त्याने मुलाच्या प्रेताला पुन्हा खुर्चीत बसवलं. चित्र पूर्ण झाल्यावर शंभूने त्या मुलाच्या प्रेताला उचललं आणि खोलीच्या मागच्या दाराने शिडी चढून वाड्याच्या मागच्या बाजूला आला. सगळीकडे नजर फिरवून मग त्याने मुलाला खाली ठेवलं. बाजूची माती उकरून शंभूने एक खड्डा तयार केला. मुलाच्या प्रेताला खड्ड्यात ढकलून वरून माती टाकून खड्डा बुजवला. मग त्याने एक छोटं रोप त्या जागी लावलं, जेणेकरून इथे काय असेल याचा कोणाला पत्ताही लागणार नाही. शंभू मागे वळला तेवढ्यात, "जय अल्लख निरंजन..." या आवाजने शंभू चपापला. त्याच्या मागे एक साधू उभा होता. शंभूकडून आकशाकडे पाहत तो साधू म्हणाला, फक्त एक नाही बेटा... एक सहस्त्र आणि एक इतके बळी तुला द्यायचे आहेत वेताळाला. ही तर सुरुवात आहे तुझी. अजून ९९९ बळी जर तू दिलेस, तर वेताळ तुझ्यावर प्रसन्न होईल. तुला परकाया प्रवेशाची विद्या अवगत होईल. आणि १००१ बळी पूर्ण होताच तुला मृत्यूचं भय राहणार नाही. तू अमर होशील... जय अल्लख निरंजन..." इतकं बोलून तो साधू थरथर कापू लागला. मग त्याने एकदा आकाशकडे पाहिलं आणि, "जय अल्लख निरंजन..."चा घोषा लावत जंगलात पळून गेला... तो बैरागी गेला त्या दिशेला पाहत शंभू काही काळ तिथेच उभा राहिला. अजून हजार बळी दिल्यावर मी अमर होईन... वाह... पण सध्या मला या हत्येपासून वाचायचं आहे... " हाच विचार करत शंभू वाड्यात परतला... हे सगळं पाहत जगताप, शेखर आणि इतर जण तसेच उभे होते. घड्याळाचे काटे जोरजोरात फिरू लागले. जगतापांनी शेखरचं लक्ष घड्याळाकडे वेधलं. शेखर म्हणाला, "बहुतेक त्या मुलाच्या हत्येला काही दिवस उलटून गेलेत असं सुचवायचं असेल घड्याळाला..." शेखर बोलतच होता, की त्यांच्या समोरून एकेक दृश्य जलदगतीने सरकू लागलं. प्रत्येक दृश्यात शंभू कोणाचा तरी खून करतोय. मग प्रेताला खुर्चीत बसवून चित्र काढतोय. चित्र पूर्ण होताच प्रेताला वाड्याबाहेर घेऊन जातोय, असंच दिसत होतं... अचानक घड्याळाच्या काटयांचा वेग मंदावला. समोरची दृश्य पुन्हा स्पष्ट दिसू लागली. "सोड मला दुष्टा... जाऊ दे मला..." या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधलं. समोरून शंभू एका मुलीला ओढत खोलीत आणत होता. इथे शंभूने त्या मुलीला दोन-तीन चपराकी हाणल्या. खाली पडून ती मुलगी बेशुद्ध झाली. जमिनीवर पडलेल्या त्या मुलीला पाहून शंभूच्या आतला पशू जागा झाला. त्याने त्या मुलीवर झडप घातली आणि त्याच वेळी, "शंभू... हे काय करतोस..." या आवाजाने शंभू जागीच स्तब्ध झाला. त्याने वळून पाहिलं, तर सोहन उभा होता. सोहनला पाहून शंभू थोडा घाबरला. पण स्वतःला सांभाळत तो म्हणाला, "छोटे सरकार... तुम्ही इथे... आज औषधं नाही घेतली वाटतं तुम्ही. म्हणून अजून शुद्धीत आहात... कधी ना कधी तुम्हाला कळणारच होतं सगळं. चला. आजचाच तो दिवस म्हणायचा... पण मी कुठे काय करतोय... तुम्हीच करताय सगळं. आणि आज नाही... खूप आधीपासून... माझ्या गरिबीवर उपकार म्हणून तुझ्या बापाने मला इथे आणलं. चित्र काढण्याचा माझा छंद त्याच्या लक्षात आला आणि इथे या तळघरात मला जागा करून दिली. माझ्या कामावर खुश होऊन त्याने मला त्याची ही खड्याची अंगठीसुद्धा भेट दिली. इतपत तर सगळं छानच केलं त्याने. पण यासोबतच तुझ्यासारख्या आजारी माणसाची जबाबदारी पण मलाच दिली. दिवसातला अर्धा वेळ तर तुला औषधं देण्यातच जायचा माझा. राहिलेल्या वेळात मी ज्या कोणाला चित्र काढण्यासाठी विचारत असे, ती व्यक्ती मला झिडकारायची. तेव्हा मी युक्ती केली. सावकाराच्या मुलाला चित्र काढण्याचा नाद आहे ही गोष्ट सर्वत्र पसरवली. तो म्हातारा त्याच्या कामात गढलेला असायचा. तुझ्यामुळे मला त्रास होऊ नये म्हणून तुझ्या औषधात झोपेचं औषध मिसळून मी तुला देऊ लागलो. एक दिवस, मी तुझ्या औषधात गडबड करत आहे ही गोष्ट त्या म्हताऱ्याला समजली. त्याने जाब विचारला. मी त्याच क्षणी गळा दाबून त्या म्हाताऱ्याला मारलं... तुला सांभाळणं आता कठीण नव्हतं. मी गुंगीचं औषध देत राहिलो आणि तू झोपत राहिलास. आणि तुझ्या नावामुळे माझा छंदही सुरू राहिला. एक दिवस चित्र काढण्याच्या वेळी माझ्या हातून एक पोरगा मारला गेला. त्याच्या प्रेताला मी वाड्याच्या मागे गाडून टाकलं आणि त्यावर एक रोप लावलं. त्या मुलाचा मृत्यू लपला आणि माझ्या चित्रकलेच्या छंदासोबत मला एका वेडाने पछाडलं. आता चित्रासाठी पकडून आणलेल्या व्यक्तीचा खून करून प्रेताला खुर्चीत बसवू लागलो. चित्र काढून झाल्यावर मी प्रेताला वाड्याच्या मागे पुरून त्यावर रोप लावू लागलो आणि पूर्ण झालेल्या चित्राला वाड्याच्या भिंतींवर टांगू लागलो. आजही तेच करणार होतो. पण या मुलीला पाहून माझी काम भावना जागृत झाली. तुला द्यायची गुंगीची मात्रा कमी पडली बहुतेक. म्हणून तू इथे आलास आणि सगळं पाहिलंस. चल ठीक आहे. तू ही वाहत्या पाण्यात हात धुऊन घे. नाहीतरी तुझ्यासारख्या आजारी माणसाजवळ कोण मुलगी येईल म्हणा..." सोहन स्तब्ध होऊन हे सगळं ऐकत होता. असं काही त्याला ऐकायला आणि पाहायला मिळेल हे त्याच्या गावीही नव्हतं. त्याला हे सहन होत नव्हतं. सोहनने रागाच्या भरात शंभूचा गळा पकडला. पण औषधं आणि आजारपण यांमुळे अशक्त असलेल्या सोहनला दूर करणं शंभूसाठी कठीण नव्हतं. पाल झटकावी तसं शंभूने सोहनला झटकलं. सोहन त्याच्या मागे असलेल्या काचेच्या कपाटावर आदळला. शंभूने तुटलेल्या काचांमधून एक धारदार तुकडा उचलला आणि सोहनवर सपासप वार केले. सोहन विव्हळत राहिला, ओरडत राहिला पण शंभू थांबला नाही. त्याच वेळी ती मुलगीही शुद्धीवर आली. रक्तबंबाळ सोहनची अवस्था पाहून ती किंचाळली आणि वड्याबाहेर पळाली... मुलीला बाहेर पळताना पाहून शंभूने काचेचा तुकडा बाजूला फेकला. मग सोहनकडे पाहत, "तुला नंतर बघतो..." असं म्हणत शंभू त्या मुलीच्या मागे गेला. तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोहनने कसं-बसं स्वतःचं जखमी अंगं फरफटत घड्याळापर्यंत नेलं. पण वेदनेमुळे आणि अशक्तपणामुळे तो जास्त पुढे जाऊ शकला नाही. अगणित जखमांच्या वेदना सहन न होऊन सोहनने शेवटचा श्वास सोडला. शेखर आणि इतर सर्वजण श्वास रोखून हे सगळं पाहत होते. तेवढ्यात सोहनचा देह प्रकाशमान झाला. पांढऱ्या किरणाची एक लकेर सोहनच्या उघड्या डोळ्यातून बाहेर येत घड्याळात सामावली आणि घड्याळाचा एक टोला पडला. त्याच वेळी धाप लागलेला शंभू तिथे आला. आत येताच त्याने दार लाऊन घेतलं. बाहेरून बरेच आवाज येत होते, "सोहन, दार उघड... आज तुझी खैर नाही..." हे ऐकून शंभू घाबरला... त्याने समोर पाहिलं तर घड्याळाखाली सोहन निपचित पडला होता. सोहन मेला हे पाहून शंभू अधिकच घाबरला कारण आता तो पूर्ण अडकला होता. तो काही विचार करेल त्या आधीच सगळीकडे धूर पसरला. गावाकऱ्यांनी वाडा पेटवून दिला होता. आगीच्या ज्वाळा वाढत गेल्या. त्या आगीत होरपळून शंभू तळघरातच मरण पावला. शंभूच्या शरीरातून काळ्या धुराचा एक मोठा ढग बाहेर आला आणि पाहता पाहता त्या ढगाने शंभूचं रूप घेतलं. त्याचे डोळे जळत्या निखऱ्यासारखे लालबुंद होते. शंभूने पंजा उघडला आणि जमिनीवर पडलेला काचेचा तुकडा उठून त्याच्या हातात विसवला. कर्कश हसत शंभू म्हणाला, "हा... हा... हा... मी आता अमर आहे. शक्तिमान आहे. मला आता कोणीही थांबवू शकणार नाही... हा... हा... हा..." इतकं बोलून हातातल्या काचेच्या तुकड्याने शंभू कॅनव्हासवर रेघोट्या मारू लागला. समोर असलेल्या घड्याळाच्या काचेत भेदारलेला सोहन दिसू लागला. काचेवर हात आपटत तो म्हणाला, "या कॅनव्हासला नष्ट करा. नाहीतर हा हैवान कोणालाही सोडणार नाही... ऐका माझं..." अचानक सोहनचा आवाज बंद झाला आणि घड्याळाचा टोला पडला, "टण..." हळू हळू तळघरातलं वातावरण बदलू लागलं. भिंतींवर काळे डाग वाढू लागले. प्रकाशाची एक मोठी भिंत सर्वांना पार करत निघून गेली आणि स्मशान शांततेसह सर्वत्र अंधार पसरला. आता काळ्या पडलेल्या भिंती आणि कोळीष्टकं पुन्हा दिसू लागली. खोलीच्या मधोमध एक जुना, अर्धवट तुटलेला लाकडाचा कॅनव्हास होता आणि त्याच्या समोर टोलेजंग घड्याळ होतं. जगतापांकडे पाहत शेखर म्हणाला, "हे सगळं सोहन करत होता, हेच सर्वांपर्यंत पोहोचलं होतं. सोहनच्या आजारपणाचा फायदा घेऊन त्याच्या नावाचा वापर करून, शंभूच हे सर्व करत होता. सोहन तर बिचारा घड्याळातून सर्वांना सावध करू पाहत होता पण त्याची ती हाक कोणालाच समजली नाही. उलट घड्याळाच्या टोल्यांना सगळे घाबरू लागले..." जगताप म्हणाले, "खरं आहे तुमचं, मि. शेखर... खरा गुन्हेगार शंभू होता. सोहन पूर्ण निर्दोष होता..." शेखर आणि जगताप बोलतच होते, की घड्याळ प्रकाशमय झालं. पांढऱ्या धुराचा एक ढग घड्याळातून बाहेर पडला आणि त्याने सोहनचं रूप घेतलं. सोहनने हात जोडून सर्वांचे आभार मानले. मग लुप्त होणाऱ्या धुरासोबत सोहन पंचतत्वात विरून गेला... हे सगळं पाहत शेखर म्हणाला, "सोहनचा आत्मा पवित्र होता. त्यावर गुन्हेगार असल्याचा ठपका होता आणि म्हणून तो तडफडत होता. त्याची तळमळ घड्याळाच्या टोल्यांमधून बाहेर पडत होती. आज ते ओझं दूर झालं आणि सोहनला मुक्तीचा मार्ग सापडला. शेखर बोलत होता, की एक हवालदार म्हणाला, "सर, पण तो शंभू अजूनही आहे..." तेवढ्यात दुसरा हवालदार म्हणाला, "सर, एक गोष्ट लक्षात आली माझ्या... त्या सर्व घटना सुरू असताना, शंभू जेव्हा त्या मुली मागे गेला, तेव्हा त्याच्या गळ्यात ते लॉकेट होतं. पण जेव्हा तो परत आला, तेव्हा ते लॉकेट शंभूच्या गळ्यात नव्हतं. बाहेर जाताना किंवा परत येताना शंभूच्या गळ्यातून ते लॉकेट निघालं असावं..." हे ऐकताच जगताप म्हणाले, "येस... व्हेरी राईट... शंभू तो एकटाच माणूस होता जो जिवंतपणे वाड्याच्या आत-बाहेर करायचा. आणि हे लॉकेटही शंभूचं आहे. भावना वाड्याबाहेर आली तेव्हा तिच्या हातातही हेच लॉकेट होतं. भावनाच्या आधी एकही व्यक्ती त्या वाड्याच्या बाहेर जिवंत आली नव्हती. त्या लॉकेटमुळे भावना त्या वाड्यातून वाचली. तेव्हा शंभूचा राग अनावर झाला आणि त्याने भावनाला..." हे ऐकून शेखर अजून रागावला आणि कॅनव्हासकडे पाहत तो म्हणाला, "या शंभूला मी नाही सोडणार... त्याचा विनाश करेन मी..." "विनाश... माझा विनाश..." शेखर बोलत असताना मध्येच आलेल्या या भसाड्या आवाजाने सर्वजण दचकले. सर्वांनी पाहिलं, तर काळ्या धुराचं एक वावटळ कॅनव्हासभोवती फिरत होतं. त्या वावटळात विजा चमकू लागल्या आणि कॅनव्हास हवेत तरंगत जागेवरच गोल फिरू लागला. पुन्हा विजा चमकल्या आणि तो भसाडा आवाज पुन्हा आला, "मूर्ख मानवांनो, सोहन कमकुवत होता. तुम्हाला काय वाटतं, मी सुद्धा तसाच आहे... मी सोहन नाही. शंभू आहे शंभू... मी आजही शक्तिमान आहे आणि त्यावेळीही तितकाच शक्तिमान होतो. चित्र काढण्याआधी मी त्या मुलीलाही मारलं असतं. पण तिला पाहून माझी शारीरिक भूक चाळवली... मी त्या मुलीवर झडप घातली आणि ती ओरडू लागली. आवाजाने तो मूर्ख सोहन तिथे आला आणि त्याला सगळं समजलं. मारावं लागलं सोहनला. ती मुलगी जंगलाच्या दिशेने पळाली. मी तिला गाठलं आणि तिथेच झाडीत तिच्यावर...... मग गळा आवळून तिला मारलं. कोणीतरी पळत असल्याचा आवाज आला मला. तिला पुरतच होतो, की गावकरी तिथे पोहोचले. मी निसटलो आणि इथे तळघरात येऊन लपलो. गावाकऱ्यांनी वाडाच पेटवला. त्या आगीत माझं शरीर तर नष्ट झालं. पण मी वाचलो. धन्य तो साधू ज्याने मला अमरत्वाचा मार्ग दाखवला. १००१ बळी देण्याची माझी इच्छा अपूर्ण राहिली. म्हणून मी असा अर्धवट अवस्थेत इथे अडकून पडलोय. आत्तापर्यंत ९९७ बळी दिलेत मी. आता तुम्हा चौघांचे बळी देऊन मी अमर होणार... हा... हा... हा..." पुन्हा विजा चमकू लागल्या. ते काळं वावटळ वाढत गेलं. शेखर, जगताप आणि दोन्ही हवालदारांना आपल्या कवेत घेत ते वावटळ तळघरातून बाहेर गेलं. मागे तळघरात हवेतल्या हवेत गोल फिरणारा तो कॅनव्हास स्थिर होऊन जमिनीवर आला. तिथे वावटळात अडकलेल्या सर्वांना काहीच थांग लागत नव्हता. अचानक वावटळातून एकेक करत सर्व खाली पडले. वावटळ चौघांभोवती वेगाने फिरलं आणि गायब झालं. चौघंही जागेवर उभे राहिले. त्यांनी आजू-बाजूला पाहिलं. आता ते तळघरात नव्हते, तर वाड्याच्या मुख्य दिवाणखान्यात होते. एक हवालदार म्हणाला, "काय होतं ते. कुठे आहोत आपण... हे तर तळघर नाही वाटत..." सर्वत्र पाहत दुसरा हवालदार म्हणाला, "आपण कदाचित वाड्याच्या मुख्य भागात आहोत. आणि इथून बाहेर पडण्याचा मार्गही दिसत नाही कुठे..." दोन्ही हवालदारांना पाहत जगताप म्हणाले, "धीर धरा... इथून बाहेर पडण्याआधी शंभूचा दुष्ट मनसूबा हाणून कसा पाडायचा आणि शंभूला कसं संपवायचं, याचा विचारही करायला हवा आपल्याला..." जगतापांचं म्हणणं पुढे नेत शेखर म्हणाला, "शंभू कोणी जिवंत व्यक्ती नाही. एक आत्मा आहे तो. एक चेतना आहे. आणि चेतना नष्ट नाही होऊ शकत. पण मुक्त नक्कीच होऊ शकते. शंभू वापरत असलेल्या दोन गोष्टी आत्ता वाड्यात आहेत. एक आहे तो कॅनव्हास आणि दुसरं आहे ते लॉकेट. या दोन्ही गोष्टींचा वापर करून..." शेखर बोलतच होता, की, "आऽऽऽऽऽऽऽऽ..." बघता बघता काळ्या वावटळाने एका हवालदाराला पुन्हा गिळंकृत केलं आणि त्याला वरच्या मजल्याकडे घेऊन गेलं. हवालदार किंचाळत होता. त्याला सोडवण्यासाठी बाकी तिघं वावटळामागे वर येऊन पोहोचले. हवालदारचं ओरडणं एकदम थांबलं आणि पुन्हा अंधार पसरला. जगतापांच्या इशाऱ्याने दुसऱ्या हवालदाराने टॉर्च काढला. त्या अंधूक प्रकाशात व्हरांड्याच्या शेवटी कोणीतरी जमिनीवर पडलेलं सर्वांना जाणावलं. सर्वजण तिथे पोहोचले तर हा तोच हवालदार होता ज्याला ते वावटळ इथे घेऊन आलं होतं. त्याच्या मानेवर राक्षसी लाल निशाण होते. जणू पूर्ण ताकदीनिशी कोणीतरी त्याचा गळा आवळला होता. काही क्षण गेले आणि शेखरला एकदम काहीतरी आठवलं. तो लगेच खाली धावला. शेखरला पाहून जगताप आणि हवालदारही त्याच्या मागे गेले. शेखरने सगळीकडे नजर फिरवली आणि एका भिंतीकडे बोट दाखवलं... त्या भिंतीवर लावलेल्या एका फ्रेममध्ये आता त्या मेलेल्या हवालदाराचा चेहेरा दिसत होता. शेखर म्हणाला, "जगताप साहेब, शंभूने या हवालदाराला किती सहज मारलं. आपल्याला ते लॉकेट आणि तो कॅनव्हास लवकरात लवकर शोधून दोन्ही गोष्टी नष्ट करायला हव्यात. नाहीतर आपण पुन्हा संकटात सापडू..." "आपण... हा... हा... हा... आपण नाही. तू सापडला आहेस संकटात..." या भसाड्या आवाजाने शेखर दचकला. त्याने वळून पाहिलं, तर क्षणापूर्वी त्याच्या मागेच असलेले जगताप आणि हवालदार दोघेही गायब होते. "जगताप साहेब, कुठे आहात तुम्ही दोघं..." असं ओरडत सगळीकडे पाहत असतानाच कोणीतरी वरून खाली पडलं. शेखरने जवळ जाऊन पाहिलं तर ते इन्स्पेक्टर जगताप होते. त्यांची मान पूर्ण मुरगळलेली होती. शेखरने हळू हळू त्याची नजर फ्रेम असलेल्या भिंतीकडे वळवली तर एका फ्रेममध्ये जगतापांचा चेहेरा दिसू लागला... शेखर फ्रेमकडे पाहतच होता, की बाजूच्याच फ्रेममध्ये राहिलेल्या हवालदाराचा चेहेरा दिसू लागला. हे पाहून शेखर चरकला. तेवढ्यात त्याला मागून गुरगुरण्याचा आवाज आला. शेखरने मागे पाहिलं. एक वीज चमकली आणि त्या प्रकाशात शेखरला तो हवालदार उभा दिसला. त्या हवालदाराची ऊंची त्याच्या मूळ ऊंचीपेक्षा जास्त झाली होती. त्याचा चेहेरा पूर्ण पांढरा पडला होता. त्याचे डोळे लाल बुंद झाले होते. त्याचं शरीर उलट्या बाजूला होतं तर चेहेरा शेखरच्या दिशेने होता. शेखरच्या काळजात धस्स झालं. "ह...वाल... दा.. र..." असं थरथरत्या स्वर शेखर म्हणतच होता, की त्या आकृतीचं शरीर वळलं. त्याचे हातही पांढरे पडले होते आणि नखं एखाद्या जनावराच्या पंजाप्रमाणे दिसत होती... ती आकृती अधिकच भसाड्या आवाजात म्हणाली, "कोण हवालदार... मी तो हवालदार नाही. ते दोघं त्याच क्षणी मेले जेव्हा तुम्ही तिघं वर आलात. मी शंभू आहे... तो हवालदार माझा हजारावा बळी होता. आता मला परकाया प्रवेशाची विद्या अवगत झाली आहे. तू माझा शेवटचा बळी आहेस. तुला मारल्यावर माझी अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन मी अमर होईन... पण या सगळ्यांसारखा सहज मृत्यू मी तुला देणार नाही. तुला तडफडताना पाहून मला जास्त आनंद मिळेल. हा... हा... हा..." बोलता बोलता त्या आकृतीने शेखरला गळ्यानिशी उचललं आणि हवेत उडवलं. हवेतच मागे जात शेखर एका भिंतीवर आदळला आणि खाली पडला. जोरदार झटक्याने शेखरच्या पाठीत दुखू लागलं. तो कसा-बसा उभा राहत होता, की ती आकृती पुन्हा शेखरजवळ आली... पुन्हा शेखरचा गळा पकडत ती आकृती भसाड्या म्हणाली, "त्या योग्याने खरंच सांगितलं. माझ्या हजाराव्या बळीनंतर मला परकाया प्रवेश करता येईल... मी जितक्या लोकांना मारलं, त्या सर्वांच्या शरीरात प्रवेश करण्याचा मी प्रयत्न केला पण करू शकलो नाही. आज इतक्या काळानंतर या हवालदाराला मारताच याच्या शरीरात मी सहज प्रवेश करू शकलो. आता तुला मारताच मी अमर होणार... हा... हा... हा..." शेखरचा गळा सोडून दोन्ही पसरवत ती आकृती विकृत हसत वाडाभर धाऊ लागली. शेखरने हीच संधी साधली आणि इन्स्पेक्टर जगतापांच्या प्रेताजवळ जाऊन त्यांचं शरीर ढुंढाळू लागला. त्याचवेळी ती आकृती शेखरजवळ आली आणि हातातलं लॉकेट त्याच्या समोर धरत म्हणाली, "हेच शोधतो आहेस ना... आता याचा तुला काहीही उपयोग नाही. हे आता माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. हा... हा... हा..." शेखर लगेच लॉकेट घ्यायला पुढे सरसवला. पण त्या आकृतीने पुन्हा शेखरचा गळा धरून त्याला हवेत उडवलं. या वेळी हवेत गटांगळ्या खाऊन शेखर खाली पडला तेव्हा त्याच्या तोंडातून रक्ताची चिळकांडी निघाली. त्या आकृतीने लॉकेट दूर फेकलं आणि पुन्हा शेखरकडे जाऊ लागली. कसातरी शेखर शिडीजवळ पोहोचला आणि वर चढू लागला. हे पाहून ती आकृती बिभत्स हसत म्हणाली, "हा... हा... हा... मृत्यूपासून लांब पाळतोस..." शेखर वर पोहोचलाच होता, की त्या आकृतीने एक ऊंचं झेप घेतली आणि शेखर समोर येऊन उभी राहिली. आकृतीने पुन्हा शेखरचा गळा धरून त्याला हवेत उभं केलं आणि तसंच वरच्या दिशेने फेकलं. शेखर छताला आदळला. त्या धक्क्याने काही कौलंही निखळली. शेखर थेट खाली येऊन जमिनीवर पडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेखरने वर पाहिलं, तर वरच्या व्हरांड्यात ती आकृती जोरजोरात हसत होती. शेखरला आता उभं राहणं ही अशक्य होत होतं. तो स्वतःच्या जखमी शरीराला हाताच्या सहाय्याने ओढू लागला... एका बाजूला शेखरला खाली जाणारा एक जिना दिसला. हा जिना त्याच तळघरात जात होता जिथून शेखर, जगताप आणि त्या दोन हवालदारांना काही क्षणापूर्वी वावटळाने वर नेलं होतं. शेखर जिन्याकडे पाहतच होता, की त्याच्या हाताला काहीतरी लागलं. शेखरने डोळे किलकिले करून पाहिलं, तर ते शंभूचं लॉकेट होतं. शेखरने विचार केला, "लॉकेट आपल्या हातात आहे. तळघर समोर आहे. आता थांबून नाही चालणार. हीच संधी आहे..." शेखरने मान वळवून वर पाहिलं, तर ती आकृती बिभत्स हसत सर्वत्र संचार करत होती. जणू विजयोत्सव साजरा करत होती. शेखरने स्वतःला जिन्यावर झोकून दिलं. जिन्यावरून घरंगळत शेखर तळघरात पोहोचला. खोलीच्या मधोमध तो तुटलेला कॅनव्हास होता. भिंतीच्या आधारे शेखर उभा राहिला. त्याचे हात थरथरत होते. पाय लटपटत होते. पण त्याच्या चेहेऱ्यावर निग्रह होता. शेखरने खिशातून लायटर काढला. एका हातात लॉकेट आणि दुसऱ्या हातात लायटर घेऊन शेखर शंभूची वाट पाहू लागला... तिथे वर, शेखरला जिन्यावरून खाली पडताना पाहून, छतावर उलटी लटकलेली ती आकृती क्षणार्धात खाली आली. एका उडीतच आकृतीने जिना पार केला आणि तळघराच्या दारात येऊन पोहोचली. आकृतीने पाहिलं, की शेखर कॅनव्हासच्या शेजारी उभा होता आणि त्याच्या हातात लॉकेट होतं. हे पाहून आकृतीचे डोळे मोठे झाले. कर्कश आवाजात आकृती म्हणाली, "नाही वेताळा... इतक्या जवळ येऊन असं होऊ देऊ नकोस वेताळा..." शंभूला पाहून शेखर म्हणाला, "शंभू, आजवर खूप जणांना मारलंस तू. खूप निरपराध लोक तुझ्या हाती मरण पावले. आता बस. या पुढे तुझं हे दुष्कृत्य मी वाढू देणार नाही..." शेखरने लायटर पेटवला. लॉकेटच्या दोराला आग लावली आणि लॉकेट कॅनव्हासकडे फेकलं... "नाऽऽऽऽऽऽऽऽही... नाहीऽऽऽऽऽऽऽऽ... वेताळा..." असं कर्कश ओरडत आकृतीने कॅनव्हासकडे झेप घेतली. कॅनव्हासने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा भडकल्या. त्यामध्ये शंभूसुद्धा गुरफटला गेला. त्याच्या आर्त आणि बिभत्स किंकाळ्या सगळीकडे घुमू लागल्या. मोठा स्फोट झाला. झटक्यानिशी शेखर मागे फेकला जाऊन भिंतीवर आदळला आणि खाली पडून बेशुद्ध झाला. थोड्या वेळात त्याला शुद्ध आली. त्याने स्वतःला चाचपडलं. शरीरावरचं रक्त सुकून गेलं होतं पण वेदना अजूनही होत्या. त्याने समोर पाहिलं, तर राखेचा एक ढीग पडला होता. सगळीकडून हलका हलका प्रकाश येत होता. दगड-धोंड्यातून चालत शेखर कसा-बसा बाहेर आला आणि पुढे चालू लागला... शेखरने एकदा मागे वळून पाहिलं. वाड्याचे भग्नावशेष पाहून तो काही क्षण स्थिरवला. मग पुन्हा चालत जंगलात गेला. थोड्याच वेळात शेखर मुख्य रस्त्यावर पोहोचला. तिथे पोलीस जीप उभी होती. शेखर जीपजवळ पोहोचला आणि आतून पाण्याची बाटली काढून पिऊ लागला. तेवढ्यात दयाळ काका तिथे पोहोचले. शेखरला पाहून ते म्हणाले, "अरे साहेब तुम्ही इथे... आणि ते इन्स्पेक्टर साहेब कुठे आहेत... मला तिथे कॉटेजमध्ये काळजी वाटत होती. म्हणून मी इथवर आलो..." शेखरने स्मित केलं. दयाळ काकांच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, "जगताप आता खूप लांब गेलेत. पण जाता-जाता या परिसराला त्या वाड्यापासून आणि त्यात असलेल्या दुष्ट शक्तीपासून मुक्त करून गेले..." हे ऐकून दयाळ काकांनी आकाशाकडे पाहून हात जोडले. मग दयाळ काका आणि शेखर कॉटेजच्या दिशेने चालू लागले. शेखरने दयाळ काकांना विचारलं, "मला तुमचं चित्र काढायचं आहे..." बोलता बोलता शेखरने मागे पाहिलं. त्याच वेळी त्याच्या डोळ्यांचा रंग बदलला होता आणि शंभूचा अस्पष्ट चेहेरा त्याच्या चेहेऱ्यात दिसू लागला. शांत पण क्रूर हसत शेखरचं शरीर धारण केलेला शंभू म्हणाला, "वेताळा..." समाप्त.
@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, March 19, 2025

मृत्यूचा चित्रकार... (पहिला भाग)


नमस्कार. काहीवर्षांपूर्वी
, मी "मृत्यूची हाक..." या नावाने एक भयकथा लिहिली होती. कथा थोडक्यात अशी होती...

तीन मुलं आणि दोन मुली पिकनिकसाठी जात असताना रस्ता चुकतात. वाटेत त्यांना जंगल लागतं आणि जंगलात दडलेला एक वाडाही दिसतो. पाचही जण त्या वाड्यात जातात. लगेचंच त्यांना घड्याळाचे पाच टोले ऐकू येतात आणि त्यांच्यातल्या एकाचा मृत्यू होतो. टोले कमी होत जातात आणि एकामागून एक सगळे मृत्यूमुखी पडतात. सकाळी पोलीस तपासात एका ठिकाणी पाच प्रेतं सापडतात. सर्वाच्या मृत्युंचं कारण एकच असतं. Cardiac arrest. म्हणजे अचानक हृदय बंद पडल्याने झालेला मृत्यू...

याच "मृत्यूची हाक..." कथेचा sequel म्हणजे पुढचा भाग सादर करत आहे...

मृत्यूचा चित्रकार...

रात्र आपल्या गतीने चालली होती. सारं जग गाढ झोपेत मग्न होतं. भावना बेडवर पडली होती. तिची शुद्ध हरपली होती. अनेक वेगवेगळ्या विचारांनी तिच्या मनाची पकड घेतली होती. दयाळ काकांचे शब्द, आपल्या मित्रांची अवस्था, या सर्वांच्या विचारातच भावना शुद्धीवर आली. तिने डोळे उघडले आणि ती बेडवरच उठून बसली. सर्वत्र अंधार होता. तिने एकदा स्वतःला चाचपडलं, आणि आपण ठीक आहोत हे लक्षात येताच, तिला हायसं वाटलं. कूस बदलून भावना पुन्हा झोपणारच होती, की दारावर "ठक ठक..."चा आवाज आला...

त्या शांततेत तो आवाज अधिकच मोठा वाटत होता. भावनाने दाराकडे पाहिलं. खालच्या फटीत तिला सरकणारा प्रकाश आणि एक सावली दिसली. भीतीने तिच्या काळजात धस्स झालं. बेडवरून खाली उतरत भावना हळू हळू दाराकडे जाऊ लागली. तिने दाराला कान लावला. पण कुठलाच आवाज आला नाही. "बहुतेक मला भास झाला..." असा विचार करत भावना परत फिरली. तेवढ्यात पुन्हा दारावर थाप पडली. या वेळचा आवाज, मागच्या आवाजापेक्षा मोठा होता. जणू कोणी रागाच्या भरात दार ठोठावत होतं. भावना लगेच वळली आणि तिने खालच्या फटीकडे पाहिलं. आता तिथे तो प्रकाशही नव्हता आणि ती सावलीही नव्हती. आता मात्र भावना जास्तच घाबरली. ए. सी. सुरू होता तरीही ती घामाने थपथपली होती. थरथरत्या हाताने तिने हॅन्डल पकडलं आणि ते वळवून झटक्यात दार उघडलं. "आऽऽऽऽऽऽऽऽ..." भावनाची आर्त किंकाळी शांततेचा भंग करत होती...

काही तासांपूर्वी...

"एक दो तीन... चार पाँच छह सात आँठ नौ... दस ग्यारह... र आला भावनार..." ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला गौरव गाणं गुणगुणत म्हणाला. थोडा विचार करून भावना गाऊ लागली, "राजा की आयेगी बारात... रंगीली होगी रात..." "कोण आहे गं तो handsome, ज्याच्या विचाराने हे गाणं सुचलं..." भावनाला मध्येच तोडत मंजू म्हणाली. त्यावर बाकी सर्व हसू लागले. सर्वांकडे पाहत भावना म्हणाली, "मला चिडवलंत तर निघून जाईन हां मी..." काय गं भावना, मस्करी पण नाही समजत तुला... " ड्राइव्हर सीटवर बसलेला रतन म्हणाला. मग समोर पाहत पुन्हा म्हणाला, "आलं की माझं फार्म हाऊस..."

सर्वांनी समोर पाहिलं, तर एक बंगला होता. गाडी गेटमधून आत शिरली. पायऱ्यांवर एक म्हातारा बसला होता. गाडी आत आलेली पाहून तो उठला आणि पुढे आला. "कसे आहात दयाळ काका..." गाडीतून उतरत रतन म्हणाला. स्मित करत दयाळ काका म्हणाले, "देवाच्या कृपेने सर्व ठीक आहे रतन बाबा. साहेबांचा फोन आला होता. तू तुझ्या मित्र-मैत्रिणींसोबत येत आहेस हे कळवलं होतं त्यांनी. सगळी व्यवस्था केली आहे मी. जरा लाईट गेलेत. तुम्ही सगळे इथे व्हरांड्यात थोडा वेळ बसा, लाईट आले की पानं वाढतो..." सर्वजण उतरतच होते, की गौरवला बंगल्याच्या उजवीकडे असलेल्या जंगलात काहीतरी दिसलं. "गाईज, ते बघा तिथे काय आहे..."

गौरवने दाखवलेल्या दिशेला सर्वजण पाहू लागले. काळ्या रंगाची एक इमारत तिथे होती. "वाह... जंगलाच्या आत काय आहे ते..." बाकी तिघांच्या मुखातून एकाच वेळी हे शब्द बाहेर पडले. दयाळ काकांनी तिथे पाहिलं, आणि त्यांचे डोळे विस्फारले. "रतन बाबा, तुम्ही सगळे लगेच आत चला. इथे थांबणं धोक्याचं आहे..." हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती. त्यावेळी कोणी काहीच बोललं नाही. दयाळ काकांसोबत सर्वजण आत गेले. गौरवने एकवार त्या इमारतीकडे पाहिलं आणि दार लावून घेतलं. दिवाणखान्याच्या कोपऱ्यात असलेल्या एका खोलीत गौरव आणि रतन होते तर बाजूच्याच खोलीत मंजू आणि भावना होत्या. काही क्षणातच लाईट आले. गौरव म्हणाला, "रतन, काय असेल रे ते... ती बिल्डिंग..." रतनने खांदे उडवले. तेवढ्यात दिवाणखान्यातून, "जेवण तयार आहे..." अशी दयाळ काकांची हाक आली...

जेवण सुरू असताना गौरवने पुन्हा विषय काढला, "काका, जंगलात ते काय होतं... ते पाहून तुम्ही इतके घाबरलात का..." "हो ना... एक बिल्डिंग तर आहे... इतकं काय घाबरायचं..." रतनने ही गौरवची री ओढली. डबा टेबलवर ठेवत दयाळ काका म्हणाले, "ती फक्त एक इमारत नाही मुलांनो... दुष्ट शक्तींनी भारलेला बंगला आहे..." दयाळ काकांचं बोलणं ऐकताच मंजू आणि भावना घाबरल्या. दयाळ काका पुढे म्हणाले, "हो. भूत बंगला आहे तो. बऱ्याच काळापूर्वी तिथे एक चित्रकार राहत होता. एकदा चित्र काढत असताना त्याचा मृत्यू झाला. बस. तेव्हापासून त्या बंगल्यात जाणारी व्यक्ती परत येत नाही. म्हणून सांगतोय मुलांनो, त्या इमारतीचा विचारही मनात आणू नका..."

दयाळ काकांचं बोलणं ऐकून मंजू आणि भावना एकमेकींकडे पाहू लागल्या. रतन म्हणाला, "काका, उगाच काहीतरी बोलू नका. असं कुठे असतं का..." रतनचं बोलणं पुढे नेत गौरव म्हणाला, "नाहीतर काय... या घाबरट मुलींचे चेहेरे बघा कसे झालेत..." गौरव आणि रतनने हसत हसत एकमेकांना टाळी दिली. दोघांची नेत्रपल्लवी झाली. जेवणं संपली. सगळे झोपायला गेले. थोड्या वेळात गौरवने रतनला उठवलं. रतन तयारच होता. दोघं गपचूप बाहेर पडले. ते गेटजवळ पोहोचलेच होते, की त्यांच्या खांद्यावर हात पडले...

दोघांनी मागे पाहिलं, तर भावना आणि मंजू तिथे होत्या. भावना म्हणाली, "आम्हाला घाबरट म्हणताना मजा घेत होता ना तुम्ही दोघं... आता आम्ही तुम्हाला दाखवणार, की आम्ही घाबरट नाही..." भावनाचं बोलणं पुढे नेत मंजू म्हणाली, "आम्हाला माहीत होतं, तुम्ही दोघं असंच काहीतरी कराल. आम्हीही तुमच्या बरोबर येणार..." रतन आणि गौरवने एकमेकांकडे पाहिलं. हळू आवाजात टाळ्या वाजवत दोघांनी त्या दोघींचं स्वागत केलं. गेटची कडी काढून चौघं बाहेर पडली आणि जंगलाच्या दिशेने चालू लागली. थोड्याच वेळात जंगलात लपलेल्या त्या बंगल्याच्या गेटजवळ चौघं पोहोचली...

गेटवर कुलूप होतं. पण कडी तुटलेली होती. चौघांनी एकमेकांकडे पाहिलं. रतन आणि गौरवने गेट ढकललं. काही आवाज न करता गेट सताड उघडलं. हे पाहून मंजू आणि भावनाने एकमेकींचा हात पकडला. गौरव म्हणाला, "घाबरलात वाटतं तुम्ही. आत्ताही परत जा. घाबरट असणं काही चुकीचं नाही..." गौरवला टाळी देत रतन म्हणाला, "हो ना. अगदी खरं आहे...” भीतीला बाजूला सारत मंजू आणि भावना एकदम म्हणाल्या, “नाही. आम्ही येणार...” गेटमधून सर्वजण आत आले. समोर काळी पडलेली दोन माजली इमारत होती. समोरच्या बाजूने असलेल्या दोन खिडक्या आणि दरवाजा यांमुळे एखादी कवटी समोर ठेवल्याचा भास होत होता...

वातावरणात एक वेगळाच गारवा जाणवत होता. सर्वजण हळू हळू पुढे जाऊ लागले. भावना सर्वात मागे होती. तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली. तिच्या हातून टॉर्च सुटून बाजूला पडला. त्या प्रकाशात भावनाला काहीतरी दिसलं. तिने ती वस्तू उचलली, तर ते एक लॉकेट होतं. भावनाने ते लॉकेट उचललंच होतं, की बाकी तिघं तिच्या जवळ आली. गौरव आणि रतनने तिला उभं रहायला मदत केली. भावना आणि मंजूने भावनाचे कपडे झटकले. गौरवने विचारलं, "यू ओके ना..." भावनाने मान हलवून उत्तर दिलं. रतनला भावनाच्या हातात काहीतरी दिसलं. तो काही बोलणार इतक्यात बंगल्याचा दरवाजा उघडला...

दाराकडे पाहून सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं. कोणीही काहीही बोलत नव्हतं. काहीतरी आपल्याला आत यायला खुणावत आहे असं सर्वांना वाटलं. चौघंही आत पोहोचली. तिथे प्रकाशाचा मागमूस नव्हता. सर्वांनी चारही दिशा पाहिल्या. तीन-चार बंद दारं आणि खिडक्या होत्या. आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना दिसत होता. टॉर्च हातात पकडून सर्व जरा पुढे गेले. एका भिंतीवर लावलेल्या काही फोटो फ्रेम्सकडे सर्वांचं लक्ष गेलं. सर्वांनी त्यांवर टॉर्च मारल्या. फ्रेम्स आणि आतले फोटो यात काळाची तफावत सर्वांना जाणवली. सर्वांना आश्चर्य वाटलं. सर्व अचंभित होऊन फोटो पाहतच होती, की बंगल्याचा दरवाजा अचानक बंद झाला आणि, "टण... टण... टण... टण..."

शांतता भंग करणारा तो आवाज, घड्याळाच्या टोल्यांचा होता. रतनने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला, "आत्ता तर बारा वाजलेत... आणि चारच टोले ऐकू आले..." त्यावर मंजू म्हणाली, "आवाजावरून तर जुनाट घड्याळ आहे असं वाटतंय. बहुतेक खराब झालं असावं..." "पण हा टोल्यांचा आवाज आला कुठून... घड्याळ तर कुठे दिसत नाही..." मंजूला मध्येच तोडत भावना म्हणाली. सर्वजण विचारात पडले. गौरव म्हणाला, "आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊ. कदाचित घड्याळासोबत माणूस किंवा बाई सापडेल... तुम्ही दोघं या खालच्या खोल्यांमध्ये बघा, मी आणि मंजू वर शोध घेतो..." सर्वांना गौरवचं म्हणणं पटलं. दोन-दोनच्या जोड्या करून चौघं घड्याळाचा शोध घेऊ लागली...

भावना आणि गौरव जिन्याने वर पोहोचले. टॉर्च पेटवून दोघं पाहतच होती, की मंजू अडखळून खाली पडली. तिच्या हातून टॉर्च निसटला. घरंगळत जाणाऱ्या टॉर्चला पकडून तिने वर पाहिलं, तर गौरव तिथे नव्हता. मंजू उठली आणि गौरवला शोधू लागली. एका खोलीच्या बंद दाराच्या फटीतून तिला उजेड दिसला. मंजूने दार ढकललं. खोलीच्या डावीकडून उजेड येत होता. तिने तिथे पाहिलं, तर जमिनीवर गौरवच्या हातातला टॉर्च पडला होता. मंजू टॉर्चजवळ गेली आणि टॉर्च उचलताना टॉर्चचा प्रकाश समोर पडला, आणि "आऽऽऽऽऽऽ..." मंजूची किंकाळी ऐकून रतन आणि भावना धावतच वर पोहोचले. दोघांना तिथे पाहून कापऱ्या हाताने मंजूने एकीकडे बोट दाखवलं. तिथे गौरव निपचित पडला होता. तिघं गौरवजवळ गेले. त्याचे दोन्ही डोळे इतके मोठे झाले होते, जणू त्याने काहीतरी भयानक पाहिलं. गौरवची अवस्था पाहून भावनाही किंचाळली आणि तिने हातांनी डोळे बंद केले. इतक्यात, "टण... टण... टण..." पुन्हा आलेल्या टोल्यांचा आवाज ऐकून तिघं दचकली. चारही दिशांना पाहत मंजू म्हणाली, "त... तीन टोले... आ... पण इथे आलो त... तेव्हा चार टोले पडले... गौरव इथे पडला आहे. आ...णि... आता तीन टोले... 

"मंजू, तुम्ही दोघं वर आलात, तेव्हा इथे अजून कोणी होतं..." मंजूकडे पाहत रतनने विचारलं. नकारात्मक मान हलवत मंजू म्हणाली, "नाही रे. इथे कोणीही नव्हतं. पडलेला टॉर्च उचलायला मी वाकले तोवर गौरव गायब झाला होता..." सगळीकडे पाहत भावना म्हणाली, "इथे काहीतरी गडबड आहे. आपल्याला इथून ताबडतोब निघायला हवं..." तिघं जिन्यापर्यंत पोहोचलेच होते, की रतनला काहीतरी आठवलं. "अरे, आपल्या गाडीची चावी गौरवकडे होती. तुम्ही दोघी खाली जा, मी चावी घेऊन येतो..." इतकं बोलून रतन मागे फिरला. भावना आणि मंजू जिना उतरू लागल्या तेव्हा त्यांची नजर फोटो फ्रेम्सकडे गेली. तिथे गौरवचं चित्र पाहून दोघी घाबरल्या. दोघी फ्रेम्सच्या खाली उभ्या होत्या आणि, "आऽऽऽऽऽ..."

रतनचा आवाज ऐकून दोघींनी वर पाहिलं. कोणीतरी धक्का दिल्यागत रतन खाली पडत होता. रतन वेगाने खाली आला आणि तिथे ठेवलेल्या काचेच्या टेबलावर आदळला. काचांचा चक्काचूर झाला. मंजू आणि भावना लगेच रतनजवळ गेल्या. गौरवप्रमाणेच बाहेर आलेले रतनचे डोळे पाहून दोघीही किंचाळल्या. हळू हळू वळत त्यांनी फोटो फ्रेम्सकडे पाहिलं, तर आता तिथे रतनचंही चित्र होतं. "म... मंजू... रतनपण गेला गं. आ... पण दोघीच उरलो..." रतनकडे पाहत भावना म्हणाली. भावनाला मध्येच तोडत मंजू म्हणाली, "इथे नक्कीच असं काहीतरी आहे जे आपल्याला जिवंत पाहू शकत नाही. चल लवकर. आधी इथून बाहेर पडू आपण..." इतकं बोलेपर्यंत, "टण... टण..."

टोल्यांचा आवाज ऐकून दोघी घाबरल्या. भावनाच्या हातून लॉकेट सुटून खाली पडलं. लॉकेट उचलून ती उभी राहिली, तर बाजूला मंजू नव्हती. "मंजू... मंजू... अगं कुठे आहेस तू..." असं ओरडत भावना मंजूला शोधू लागली. तिला जिन्यावर मंजू पडलेली दिसली. भावना जवळ गेली आणि मंजूचे विस्फारलेले डोळे पाहून भावनाचा थरकाप उडाला. तिने हळू हळू आपली नजर फोटो फ्रेम असलेल्या भिंतीकडे वळवली. आता तिथे मंजूचंही चित्र होतं. भावना मागे सरकतच होती, की, "टण..." आवाज ऐकून भावना स्तब्ध झाली. "आता फक्त तूच राहिली आहेस भावना. तुझंही चित्र तयार होईल..."

शांततेला छेद देणाऱ्या या कर्कश आवाजने ती गारठली. तिने वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. आता मात्र भावनाचा धीर सुटला. तिथे असलेल्या दारं-खिडक्यांवर हात मारत, "वाचवा... मला वाचवा..." असा आकांत करत भावना पळू लागली. तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली. तेव्हाच तिची नजर तिच्या हातात असलेल्या लॉकेटकडे गेली. लॉकेट चमकत होतं. भावना लॉकेटकडे पाहतच होती, की तिच्या डाव्या हाताला असलेल्या खिडकीचं तावदान उघडलं. एक क्षणही न दवडता भावना उठली आणि तिने खोडकीतून बाहेर उडी घेतली. मागे वळूनही न पाहता भावना पळत राहिली. त्या बंगल्याचं गेट पार करून ती जंगलात पोहोचली. बंगल्याच्या गेटसमोरील दोन्ही खिडक्या आणि दारातून लाल प्रकाश येत होता. असं वाटत होतं, भावना जिवंत बंगल्याबाहेर पडलेल्याचा बंगल्यातल्या शक्तीला राग आला होता...

भावना मात्र दगडांवर, निसरड्या मातीवर अडखळत, ठेचकाळत पळत राहिली. तिच्या पायांना होणाऱ्या जखमांचं, ओरखड्यांचं तिला काहीच भान नव्हतं. ती फक्त पळत होती. थोड्याच वेळात भावना कॉटेजजवळ पोहोचली. जंगलातून बाहेर पडल्याने तिला जरा हायसं वाटत होतं. पण अजून तिची भीती गेली नव्हती. "काका... दार उघडा... लवकर उघडा... काका..." असं ओरडत भावना जोरजोरात दार वाजवू लागली. दयाळ काकांनी दार उघडताच भावना तडक आत गेली आणि दारं-खिडक्या लावू लागली. "अगं मुली काय झालं... सांगशील तरी... बाकीचे कुठे आहेत... आणि रतनबाबा..." दयाळ काकांच्या या प्रश्नांची भावनाला उत्तरं द्यायची होती. पण तिचा आवाजच फुटत नव्हता. तिने हातातलं लॉकेट दयाळ काकांना दाखवलं. पण ते काळं पडलं होतं. लॉकेटकडे पाहून भावना अजूनच घाबरली आणि तिची शुद्ध हरपली...

आत्ताची वेळ...

कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकत होते. दयाळ काका एका कोपऱ्यात मान खाली घालून उभे होते. पोलीस तपास करत होते. इन्स्पेक्टरने दयाळ काकांना जवळ बोलवून विचारलं, "तुम्हीच फोन केलात ना... इथे काय घडलं सांगू शकाल...??" दयाळ काकांनी एकवार दाराकडे पाहिलं. मग इन्स्पेक्टरकडे पाहत ते बोलू लागले, "साहेब, ही भावना. आमच्या रतन बाबाची, म्हणजे आमच्या मोठ्या साहेबांच्या मुलाची ही मैत्रीण. हिच्यासह रतनबाबा आणि अजून दोन जण आज संध्याकाळी इथे आले. जेवणं झाल्यावर सुमारे दहा वाजता सगळे आपापल्या खोलीत गेले. मी पण कामं संपवून झोपायला गेलो. आत्ता थोड्या वेळापूर्वी दारावर झालेल्या ठकठकीने मला जाग आली. मी दार उघडलं, तर ही बिचारी लागेचंच आत आली आणि तशीच बेशुद्ध पडली. हिला पलंगावर ठेऊन मी रतन बाबाला बोलवायला गेलोच होतो, की हिच्या किंकाळीने माघारी फिरलो आणि पाहतो तर..."

दयाळ काका, तो इन्स्पेक्टर आणि बाकी हवालदारांनी दाराकडे पाहिलं. उंबऱ्यात भावना निपचित पडली होती. तिचे डोळे बाहेर आले होते आणि तिची मान पूर्ण मुरगळून मागे वळली होती. प्रेत पाहून एक हवालदार म्हणाला, "सर, ज्या पद्धतीने या मुलीला मारलं आहे, हे कोण्या व्यक्तीचं काम नाही..." इन्स्पेक्टरच्या चेहेऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून दुसरा हवालदार म्हणाला, "सर, या परिसरातून रात्रीच्या वेळी अनेक जण गायब झालेत. आणि सकाळी त्यांच्या डेड बॉडीज जंगलात सापडल्यात. दोन वर्षांपूर्वी त्या पाच मुलांचं काय झालं, लक्षात आहे ना सर... सर्वांची प्रेतं बंगल्याच्या मागे..." 'बंगला' हा शब्द ऐकताच त्या हवालदाराला मध्येच तोडत दयाळ काका म्हणाले, "हवालदार साहेब, तुम्ही बंगला म्हणालात... त्या बंगल्याबद्दल मी या चौघांजवळ बोललो होतो. अरे देवा... ही मुलं त्या झपाटलेल्या बंगल्यात तर नाही गेली ना... तरीच रतन बाबा आणि बाकी दोघं दिसत नाहीत इथे...

दयाळ काकांच्या खांद्यावर हात ठेवत इन्स्पेक्टर म्हणाला, "भुतं, पिशाच्च, यांवर माझा विश्वास नाही. काही असो, सध्या या भावनाची बॉडी पी.एम.साठी पाठवा आणि हिच्या घरी कळवा..." मग खिशातून फोन काढत, नंबर लावत इन्स्पेक्टर म्हणाले, "हॅलो, मी इन्स्पेक्टर जगताप बोलतोय. ऍडिशनल फोर्स पाठवा. जंगलात शोध घ्यायचा आहे..." सर्वांच्या सामानाचा तपास केला गेला. भावना मृत असल्याची आणि बाकी तिघं गायब असल्याची खबर त्यांच्या नातेवाईकांना दिली गेली. तिथे असलेल्या हवालदारांना, रतन, मंजू आणि गौरवचा शोध घ्यायला सांगून इन्स्पेक्टर चौकीवर परतले. तिथे भावनाचा पोस्ट मॉरटम रिपोर्ट वाट पाहत होता. मृत्यूचं कारण होतं, मान मोडल्याने श्वास नलिका बंद झाल्याने मृत्यू...

हवालदाराला इशारा करत इन्स्पेक्टर जगताप म्हणाले, "जंगलातल्या परिसरात आत्तापर्यंत जितके मृत्यू झालेत, त्यांची फाईल आणा..." जगताप बराच वेळ फाईल वाचत होते. तेवढ्यात फोन आला, "इन्स्पेक्टर जगताप बोलतोय... काय... ठीक आहे... सर्व बॉडीज पी.एम.साठी पाठवा. आजू-बाजूचा परिसर सील करा आणि तुम्ही सगळे चौकीवर परत या. फोन ठेऊन आपल्या साथीदारांशी बोलत जगताप म्हणाले, "जंगलात झालेल्या मृत्युंची फाईल पाहत होतो. सर्वांमागे एकच कारण आहे. Cardiac arrest. हृदयाचे ठोके अचानक बंद झाल्याने मृत्यू..." जगताप बोलतच होते, की बाहेरून आवाज ऐकू येऊ लागले...

जगताप बाहेर आले तर तिथे त्या चारही मुलांचे कुटुंबीय आले होते. त्यांच्याकडे पाहत ते म्हणाले, "शांत व्हा. काल एकाच मुलीचा, भावनाचा मृत्यू झाला होता आणि बाकी तिघं गायब होते. पण आज त्या तिघांच्या बॉडीजसुद्धा सापडल्या आहेत. भावना कॉटेजमध्ये मृतावस्थेत सापडली तर बाकी तिघं जंगलात सापडलेत. भावनाचा खून झाला हे तर स्पष्टच आहे. पण बाकी तिघांच्या मृत्यूचं कारण रिपोर्ट आल्यावरच समजेल. मला माहीत आहे तुमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण बॉडीज तुम्हाला रिपोर्ट आल्यानंतरच मिळू शकतील..." हे ऐकून तिथे जमलेल्या सर्वांनी पाणावलेल्या डोळ्यांनी चौकी सोडली. तेव्हाच बाकी तीन मुलांचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट घेऊन हवालदार आला. रिपोर्ट जगतापांच्या हातात देत हवालदार म्हणाला, "सर, त्या तीन मुलांचा शोध घ्यायला आम्ही जंगलात गेलो, तेव्हा बरंच आत आम्हाला तीन रोपटी दिसली. ती नुकतीच लावल्यासारखी वाटत होती...

त्या रोपांचं तिथे असणं आम्हाला खटकलं. रोपं काढून तिथली जमीन आम्ही खोदली, तर तिथे तीन प्रेतं होती. सर, जंगल परिसरात या चौघांसह अनेक मृत्यू झालेत. अजूनही वेळ आहे सर. संपूर्ण जंगल आपण सील केलं तर... " जगतापांना हवालदाराचं म्हणणं पटलं. ते म्हणाले, "बरोबर आहे तुमचं. अजून मृत्यू व्हायला नको तिथे. संपूर्ण परिसर सील करा. पण मला एक गोष्ट समजली नाही, आत्तापर्यंत जंगल परिसरात जितके मृत्यू झालेत, ते सगळे हृदयाचे ठोके बंद पडल्याने झालेत. सर्वांच्या बॉडीज आधी गायब होत्या. नंतर त्या सर्व बॉडीज जंगलात मिळाल्या. या भावनाचा मृत्यू मात्र जंगलापासून दूर झाला. निर्घृण हत्या झाली तिची... असं कसं..." “हेच मलाही जाणून घ्यायचं आहे... " जगताप बोलतच होते, की या आवाजाने सर्वांचं लक्ष वेधलं...

सर्वांनी आवाजाकडे पाहिलं, तर दारात एक माणूस उभा होता. सर्व आपल्याकडेच पाहत आहेत हे लक्षात आल्यावर तो माणूस म्हणाला, "मी भावनाचा मोठा भाऊ शेखर. भावनाचा मृत्यू तिच्या तीनही मित्रांपेक्षा वेगळा का आहे, हाच विचार मला भेडसावतो आहे..." जगतापांनी शेखरला आत बोलावलं. आत येत शेखर म्हणाला, "सर, आमचे आई-वडील आमच्या लहानपणीच गेले. तेव्हापासून मी आणि भावना, आम्ही दोघंच एकमेकांसाठी होतो. आता तर भावनाही नाही राहिली. मी एकटा पडलो. हे कृत्य ज्या कोणी केलं आहे, त्या व्यक्तीला शिक्षा व्हायलाच हवी सर..." शेखरला शांत करत जगताप म्हणाले, "शांत व्हा मि. शेखर. खुन्याला आम्ही लवकरात लवकर पकडू..." "खूनी मानवी असेल तर पकडाल ना..." या आवाजाने सर्व चपापले. खुर्चीत एक वृद्ध बसला होता. सर्वांकडे पाहून आपला चस्मा सावरत तो वृद्ध म्हणाला, "क्षमा करा, मी मध्येच बोललो. माझी सायकल हरवल्याची तक्रार करायला आलो होतो. जंगलात घडलेल्या घटनांबद्दल ऐकून राहवलं नाही म्हणून बोलतोय...

या जागी मी लहानाचा मोठा झालो आहे. इथे घडलेल्या घटनांशी मी बऱ्यापैकी परिचित आहे. या परिसराबद्दल खूप जुनी कहाणी माझ्या आईने सांगितली होती. अनेक वर्षांपूर्वी इथे जंगल नव्हतं. तर एक गाव होतं. गावाच्या मध्यभागी गावच्या सावकाराचा वाडा होता. सावकारचा मुलगा सोहन, एका आजाराने ग्रस्त होता. सूर्याच्या प्रकाशात त्याला त्रास व्हायचा. त्याच्या शरीरावर फोड यायचे. म्हणून सोहन कधी वाड्याबाहेर पडायचा नाही. तो एक उत्तम चित्रकार होता. लोकांची चित्र काढून वाड्यातल्या भिंतींवर तो लावायचा. हाच त्याचा विरंगुळा होता. सोहनच्या या विरंगुळ्यासाठी सावकाराचे नोकर, कुठून कुठून माणसं, बायका यांना पकडून पकडून आणायचे. एक दिवस दीर्घ आजाराने ग्रासलेल्या सावकाराने देह ठेवला. सोहन नवा सावकार झाला. पण त्याची चित्रकलेची आवड तो जोपासत राहिला. वाड्याच्या तळघरात चित्र काढण्यात सोहन तासंतास घालवायचा. चित्र पूर्ण झाल्यावर, तिथे असलेल्या घड्याळाचा ठोका वाजवून सोहन नोकरांना चित्र पूर्ण झाल्याचं कळवायचा. जितकी माणसं तितके ठोके सोहन वाजवायचा. ठोके ऐकल्यावर नोकर मंडळी त्या पकडून आणलेल्या व्यक्तीला बाहेर सोडून यायचे. असं बराच काळ चाललं. पण एक दिवस घडू नये तेच घडलं...

एक दिवस चित्र बनवण्यासाठी एका लहान मुलाला नोकरांनी पकडून आणलं. तो बिचारा पोरगा भीतीपोटी रडत होता. त्याला गप्प करण्यासाठी सोहनने त्याच्या कानाखाली मारली. सोहनसाठी ती एक चपराक होती. पण त्या चिमुरड्यासाठी मात्र तो एक तडखा ठरला. बिचारं ते मूल खाली पडताच मरण पावलं. सोहनला हे लक्षातच नाही आलं. त्याने त्या पोराला तसंच खुर्चीवर बसवलं. चित्र पूर्ण झाल्यावर त्याने घड्याळाचा ठोका दिला. सोहन त्या मुलाजवळ गेला तेव्हा तो मुलगा मेला असल्याचं त्याला कळलं. सोहन थोडा चरकला. त्याने लगेच त्या पोराच्या प्रेताला वाड्याच्या मागे असलेल्या झाडीत गाडलं आणि त्यावर एक रोप लावलं. ठोक्याचा आवाज ऐकून तिथे आलेल्या नोकर शंभूने हे सगळं पाहिलं. तेव्हा सोहनने पैशाचं आमिष दाखवून शंभूचं तोंड बंद केलं. काही दिवस गेले. त्या पोराच्या मृत्यूचा काही गवगवा नाही झाला हे पाहून सोहनच्या लक्षात आलं, की त्याचा अपराध लपला गेला आहे...

त्या दिवसापासून सोहनच्या डोक्यात एक विचित्र आणि अघोरी तिडीक गेली. शंभू नोकर ज्या कोणाला चित्र काढण्यासाठी पकडून आणायचा, सोहन आधी त्या व्यक्तीचा खून करायचा. मग त्या व्यक्तीला खुर्चीत बसवून त्याचं चित्र काढायचा. चित्र पूर्ण झाल्यावर सोहन घड्याळाचा ठोका वाजवायचा. मग शंभू त्या मेलेल्या व्यक्तीच्या प्रेताला वाड्याच्या मागच्या झाडीत गाडून त्यावर रोप लावायचा. सोहनच्या या विकृतीमुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत ही गोष्ट शंभूला खटकत होती. पण पैशांच्या लालसेपोटी तो गप्प होता. एका संध्याकाळी चित्रकलेसाठी पकडून आणलेली एक मुलगी, चित्र पूर्ण होण्याआधीच वाड्यातून निसटली. झाडीतून गावाच्या विरुद्ध दिशेला पाळणाऱ्या त्या मुलीला सोहनने वाटेतच अडवलं आणि त्याच झाडीत त्या नीच सोहनने तिच्यावर........

मग गळा दाबून तिला मारून टाकलं. जवळच खेळणाऱ्या एका मुलाने मुलीचा गळा दाबला जातोय हे पाहिलं. अंधूक प्रकाशात त्याने मुलीला ओळखलं पण त्याला मारेकऱ्याचा चेहेरा दिसला नाही. सोहनच्या हातात चमकणारी हिऱ्याची अंगठी त्याने पाहिली. ते सगळं कृत्य पाहून तो घाबरला आणि गावाकडे पळाला. गावात जाऊन त्याने सर्वांना घडलेली घटना सांगितली. मुलीची हत्या झाली हे ऐकून गावकरी भडकले. दुसरा-तिसरा कोणी नसून हा सावकारचा पोरगा सोहनच आहे याची त्यांना खात्री पटली. मशाली, लाठ्या, दगड घेऊन गावकरी वाड्यावर पोहोचले. त्यांनी वाड्याला घेराव घातला. वाड्याच्या मागच्या झाडीत खोदकाम सुरू होतं आणि जवळच त्या मुलीचं प्रेत पडलं होतं. तिथे असलेल्या लोकांनी बाकी गावाकऱ्यांना बोलावलं. जमावाला येताना पाहून सोहन घाबरला आणि तळघरात जाऊन लपला...


पुढचा भाग काही दिवसात...

Friday, March 7, 2025

क्रिकेट रागिणी...

भारतीय क्रिकेट इतिहासाबद्दल, प्रामुख्याने फलंदाज आणि गोलंदाज या जोडीबद्दल जेव्हा बोललं जातं, तेव्हा सुनील गवसकर-मदन लाल, सचिन तेंडुलकर-अनिल कुंभळे, विराट कोहली-जासप्रीत बुमराह, ही नावं ओघाने येतात. हे सगळे, पुरुष संघातले सदस्य झाले. पण भारतीय महिलांची कामगिरीही यांच्या तोडीस तोड दिसते. अशाच काही कामगिऱ्यांबद्दल...

कसोटी...

अंजुम चोपडा-झूलन गोस्वामी...

भारत आणि इंग्लंड मध्ये रंगलेल्या २००६च्या मालिकेतला हा दुसरा कसोटी सामना होता. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी केली. ठराविक काळात समोर विकेट पडत होत्या पण अंजुम चोपडाने एक बाजू धातून ठेवली होती. तिने केलेल्या ९८ धावांच्या जोरावर भारताने पहिला डावात ३०७ धावांपर्यंत मजल मारली. प्रतिउत्तरादाखल फलंदाजी करायला आलेल्या इंग्लिश संघाला मानही वर काढू न देता झूलन गोस्वामीने पाच फलंदाज माघारी पाठवले आणि इंग्लंडला शंभरीसुद्धा गाठता आली नाही. फॉलो ऑन मिळवून पुन्हा खेणाऱ्या इंग्लिश संघाने दुसऱ्या डावात बरा खेळ केला पण तिथेही झूलनच्या भेदक माऱ्याने इंग्लिश धावसंख्येला लगाम घातला. सामन्यात दहा बळी घेत झूलनने सामन्यात सिंहाचा वाटा उचलला. शंभरच्या आतलं सोपं आव्हान भारतीय संघाने पार करून सामना जिंकला...

शेफाली वर्मा-स्नेह राणा...

२०२४ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या एकमेव कसोटी सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाटा खेळपट्टीवर शेफाली वर्माने दिमाखदार द्विशतक झळकवत २०५ धावा केल्या आणि भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ६०७ धावांचा डोंगर रचला. याच पाटा खेळपट्टीवर स्नेह राणाने घेतलेल्या ८ विकेटमुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावात गडगडला. फॉलो ऑननंतर दक्षिण आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली पण भारताला जास्त मोठं लक्ष देता आलं नाही. स्नेहने सामन्यात घेतलेल्या १० बळींमुळे दुसऱ्या दावत मिळालेलं ३७ धावांचं माफक लक्ष भारताने एकही विकेट न गमावता पार केलं...

एकदिवसीय...

स्मृती मंधाना-पूनम यादव...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८ साली झालेल्या एकदिवसीय मालिकेतला हा दूसरा सामना होता. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. स्मृती मनधानाच्या जबरदस्त १३५ धावांच्या पाठबळावर भारताने ३०३ धावा फालकावर लावल्या. नंतर पूनम यादवच्या अचूक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिका ढेपळली. पूनमने चार दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना तिच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि भारताला १७८ धावांनी मोठा विजय मिळाला...

हरमनप्रीत कौर-दीप्ती शर्मा...

विश्वचषक २०१७चा हा साखळी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी निवडली. एका बाजूला फलंदाज बाद होत असताना हरमनप्रीत कौरने एक बाजू धरून ठेवली. जास्तीतजास्त स्ट्राईक स्वतःकडे घेत हरमनप्रीतने धडाकेबाज शतक पूर्ण केलं. तिच्या नाबाद १७१ धावांमुळे भारताला २८१ पर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीसुद्धा थोडी अडखळली. ऍलेक्स ब्लॅकवेल कणखरपणे उभी होती. तीच सामना घेऊन जाईल असं वाटत असताना मोक्याच्या क्षणी दीप्ती शर्माने ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवला. दीप्तीने सामन्यात सर्वाधिक तीन बळी मिळवत भारताला ३६ धावांनी विजय मिळवून दिला...

टी २०...

रिचा घोष-राधा यादव...

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातल्या २०२४च्या टी २० मालिकेतला हा तिसरा सामना. दोन्ही देशांकडे एकेक विजय असल्याने हा सामना निर्णायक ठरणार होता. नाणेफेक जिंकून विंडीजने भारताला फलंदाजी दिली. रिचा घोषच्या जबरदस्त आन जलद गतीने केलेल्या ५४ धावांमुळे भारताने २१४ धावांचा डोंगर उभारला. प्रतिउत्तरादाखल विंडीज फलंदाजही बऱ्यापैकी फलंदाजी करत होते. पण राधा यादवने गोलंदाजी करत चार बळी मिळवले आणि विंडीज धावसंख्येला लगाम घातला. राधाच्या तिखट माऱ्यासमोर विंडीज संघ फक्त १५९ धावाच जमवू शकला आणि सामन्यासह भारताने मालिकाही जिंकली...

प्रियांका रॉय-अंजुम चोपडा...

पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातला विश्वचषक २००९ मधला हा साखळी सामना होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. प्रियांका रॉयने भेदक मारा करत टी २० मधले तिचे पहिले पाच बळी मिळवले आणि पाकिस्तानी डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. भारताला जिंकण्यासाठी ७५ धावाच हव्या होत्या. पण खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय कठीण होती. फलंदाजांना तग धरून उभं राहणं कठीण होत होतं. अशा वेळी अंजुम चोपडाने एका बाजूने किल्ला लढवला. अंजुमच्या धिरोदात्त नाबाद ३७च्या जोरावर भारताने तो सामना पाच गडी राखून जिंकला...

अजूनही काही सामने असे असतील ज्यात भारतीय महिला फलंदाज आणि गोलंदाज जोड्या चमकल्या असतील. पण वर दिलेले सामने मला जास्त रंगातदार वाटले. आज ८ मार्च. अंतरराष्ट्रीय महिला दिन. भारतीय क्रिकेटला वेगळ्या स्तरावर घेऊन जाणाऱ्या या रणरागिणींना माझा मानाचा मुजरा...

@ अनिकेत परशुराम आपटे.