भारतीय क्रिकेट इतिहासाबद्दल, प्रामुख्याने फलंदाज आणि गोलंदाज या जोडीबद्दल जेव्हा बोललं जातं, तेव्हा सुनील गवसकर-मदन लाल, सचिन तेंडुलकर-अनिल कुंभळे, विराट कोहली-जासप्रीत बुमराह, ही नावं ओघाने येतात. हे सगळे, पुरुष संघातले सदस्य झाले. पण भारतीय महिलांची कामगिरीही यांच्या तोडीस तोड दिसते. अशाच काही कामगिऱ्यांबद्दल...
कसोटी...
अंजुम चोपडा-झूलन गोस्वामी...
भारत आणि इंग्लंड मध्ये रंगलेल्या २००६च्या मालिकेतला हा दुसरा कसोटी सामना होता. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी केली. ठराविक काळात समोर विकेट पडत होत्या पण अंजुम चोपडाने एक बाजू धातून ठेवली होती. तिने केलेल्या ९८ धावांच्या जोरावर भारताने पहिला डावात ३०७ धावांपर्यंत मजल मारली. प्रतिउत्तरादाखल फलंदाजी करायला आलेल्या इंग्लिश संघाला मानही वर काढू न देता झूलन गोस्वामीने पाच फलंदाज माघारी पाठवले आणि इंग्लंडला शंभरीसुद्धा गाठता आली नाही. फॉलो ऑन मिळवून पुन्हा खेणाऱ्या इंग्लिश संघाने दुसऱ्या डावात बरा खेळ केला पण तिथेही झूलनच्या भेदक माऱ्याने इंग्लिश धावसंख्येला लगाम घातला. सामन्यात दहा बळी घेत झूलनने सामन्यात सिंहाचा वाटा उचलला. शंभरच्या आतलं सोपं आव्हान भारतीय संघाने पार करून सामना जिंकला...
शेफाली वर्मा-स्नेह राणा...
२०२४ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या एकमेव कसोटी सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाटा खेळपट्टीवर शेफाली वर्माने दिमाखदार द्विशतक झळकवत २०५ धावा केल्या आणि भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ६०७ धावांचा डोंगर रचला. याच पाटा खेळपट्टीवर स्नेह राणाने घेतलेल्या ८ विकेटमुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावात गडगडला. फॉलो ऑननंतर दक्षिण आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली पण भारताला जास्त मोठं लक्ष देता आलं नाही. स्नेहने सामन्यात घेतलेल्या १० बळींमुळे दुसऱ्या दावत मिळालेलं ३७ धावांचं माफक लक्ष भारताने एकही विकेट न गमावता पार केलं...
एकदिवसीय...
स्मृती मंधाना-पूनम यादव...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८ साली झालेल्या एकदिवसीय मालिकेतला हा दूसरा सामना होता. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. स्मृती मनधानाच्या जबरदस्त १३५ धावांच्या पाठबळावर भारताने ३०३ धावा फालकावर लावल्या. नंतर पूनम यादवच्या अचूक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिका ढेपळली. पूनमने चार दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना तिच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आणि भारताला १७८ धावांनी मोठा विजय मिळाला...
हरमनप्रीत कौर-दीप्ती शर्मा...
विश्वचषक २०१७चा हा साखळी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी निवडली. एका बाजूला फलंदाज बाद होत असताना हरमनप्रीत कौरने एक बाजू धरून ठेवली. जास्तीतजास्त स्ट्राईक स्वतःकडे घेत हरमनप्रीतने धडाकेबाज शतक पूर्ण केलं. तिच्या नाबाद १७१ धावांमुळे भारताला २८१ पर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीसुद्धा थोडी अडखळली. ऍलेक्स ब्लॅकवेल कणखरपणे उभी होती. तीच सामना घेऊन जाईल असं वाटत असताना मोक्याच्या क्षणी दीप्ती शर्माने ब्लॅकवेलचा त्रिफळा उडवला. दीप्तीने सामन्यात सर्वाधिक तीन बळी मिळवत भारताला ३६ धावांनी विजय मिळवून दिला...
टी २०...
रिचा घोष-राधा यादव...
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातल्या २०२४च्या टी २० मालिकेतला हा तिसरा सामना. दोन्ही देशांकडे एकेक विजय असल्याने हा सामना निर्णायक ठरणार होता. नाणेफेक जिंकून विंडीजने भारताला फलंदाजी दिली. रिचा घोषच्या जबरदस्त आन जलद गतीने केलेल्या ५४ धावांमुळे भारताने २१४ धावांचा डोंगर उभारला. प्रतिउत्तरादाखल विंडीज फलंदाजही बऱ्यापैकी फलंदाजी करत होते. पण राधा यादवने गोलंदाजी करत चार बळी मिळवले आणि विंडीज धावसंख्येला लगाम घातला. राधाच्या तिखट माऱ्यासमोर विंडीज संघ फक्त १५९ धावाच जमवू शकला आणि सामन्यासह भारताने मालिकाही जिंकली...
प्रियांका रॉय-अंजुम चोपडा...
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातला विश्वचषक २००९ मधला हा साखळी सामना होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. प्रियांका रॉयने भेदक मारा करत टी २० मधले तिचे पहिले पाच बळी मिळवले आणि पाकिस्तानी डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. भारताला जिंकण्यासाठी ७५ धावाच हव्या होत्या. पण खेळपट्टी फलंदाजीसाठी अतिशय कठीण होती. फलंदाजांना तग धरून उभं राहणं कठीण होत होतं. अशा वेळी अंजुम चोपडाने एका बाजूने किल्ला लढवला. अंजुमच्या धिरोदात्त नाबाद ३७च्या जोरावर भारताने तो सामना पाच गडी राखून जिंकला...
अजूनही काही सामने असे असतील ज्यात भारतीय महिला फलंदाज आणि गोलंदाज जोड्या चमकल्या असतील. पण वर दिलेले सामने मला जास्त रंगातदार वाटले. आज ८ मार्च. अंतरराष्ट्रीय महिला दिन. भारतीय क्रिकेटला वेगळ्या स्तरावर घेऊन जाणाऱ्या या रणरागिणींना माझा मानाचा मुजरा...
@ अनिकेत परशुराम आपटे.







No comments:
Post a Comment