Sunday, March 29, 2026

तिसरा डोळा (दुसरा आणि शेवटचा भाग)...

पहिल्या भागात...

पाच जणं भिवपुरीला ट्रीपसाठी जातात. तिथे धबधब्याजवळ त्यांना एक व्हिडियो कॅमेरा सापडतो. त्यात एक व्हिडियो असतो ज्यात एका मुलाचा खून होतानाचा एक व्हिडियो असतो आणि तारीख तीन महिन्यापूर्वीची असते. पोलिसांना बोलावलं जातं. प्रधान, आनंद, उमा आणि सचिन तो व्हिडियो बघतात. खून झाला ती जागा पाहण्यासाठी प्रधान, आनंद, सचिन, आणि दोघंजण धबधब्याकडे जातात. उमा खाली राहून मुलींची काळजी घेते...

सर्वांना धबधब्याजवळ ती व्हिडियोमधली जागा सापडते. मग त्या जागेचा अजून शोध घेत त्यांना एका गुहेत एक सांगाडा सापडतो. व्हिडियोतल्या मुलाचं नाव अंबर आहे आणि त्यात उल्लेख झालेल्या प्राजू या नावाशी तीन मुली जुळत आहेत या गोष्टी सचिन शोधून काढतो. कवटीवर प्रेशर पॉईंट्सनुसार स्कीन लावत डॉ. गोखले अंबरचाच चेहेरा बनवतात. प्रधान आणि उमा अंबरच्या घरच्यांना अंबर गेल्याची बातमी देत असताना स्वत: अंबर दारात उभा ठाकतो...

अंबरची माफी मागून प्रधान आणि उमा बाहेर पडतात. अचानक रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांची जीप आदळणार असते पंण ते दोघं वाचतात. दुसरीकडे आनंद सायनला तर सचिन माहीमला चौकशीसाठी गेलेले असतात. परत येताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली जाण्यापासून आनंद बचावतो. प्रधान, उमा आणि आनंद बोलत असताना त्यांना समजतं, डॉ. गोखलेंच्या लॅबमधून प्रधान आणि आनंदला कॉल आलेला असतो. डॉ. गोखलेंवरही हल्ला झालेला असतो. सगळे लॅबमध्ये बोलत असताना सचिन तिथे एका माणसाला पकडून येतो. तोसुद्धा फोन आल्याचं सांगतो...

आता पुढे...

प्रधान सगळं ऐकत होते. ते म्हणाले, "डॉकच्या लॅबमधून मला कॉल येतो. मी आणि उमा लॅबकडे यायला निघतो. रस्त्यावर उभ्या ट्रकला आमची जीप धडकणार अशी व्यवस्था केली जाते. पण आम्ही त्यातून थोडक्यात बचावतो..." त्यावर सचिन म्हणाला, "माझ्या बाईकला डॉज करणारी ती जीप मुद्दाम त्याच ठिकाणी आडवी आली जेणेकरून तिथे भांडण आणि मग हाणामारी होईल ज्यात कदाचित मला..." सचिनचं बोलणं पूर्ण होतं नं होतं तोच आनंद म्हणाला, "माझ्या बाईकलाही मागून त्याच वेळी टक्कर मारली गेली जेव्हा बाजूने येणाऱ्या ट्रकच्या टप्प्यात मी आलो... बाईकचा चेंदामेंदा झाला पण मी वाचलो..." यावर डॉक्टर गोखले म्हणाले, "आणि इथे लॅबमध्ये तो कुरियरवाला... लॅबमध्ये शॉर्ट सर्किट घडवून आग लावण्याचा त्याचा प्लॅन होता..." प्रधानांकडे पाहत उमा म्हणाली, "अशा विचित्र घटना आपल्या सगळ्यांसोबत घडल्या... काय अर्थ असावा या सगळ्याचा..."

"I think there is a pattern... या सगळ्या घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा हेतू एकच होता. आपल्याला जिवे मारायचं, किंवा हॉस्पिटलाईझ करायचं..." "कोण करत असेल हे..." उमाने शंका विचारली. आनंद म्हणाला, "सर सध्या आपल्याकडे तीन केसेस आहेत. एक त्या आमदाराविरुद्धची केस, एक अंबर मर्डर केस आणि एक बँक दरोड्याची केस... यापैकी कोणी..." आनंदचं म्हणणं पुढे नेत सचिन म्हणाला, "आपल्याला या केसेसमधून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे का... तसं असेल तर या मागे तो आमदारच असावा असं वाटतं मला..." डॉ. गोखले खुर्चीतून उठले आणि म्हणाले, "नाही सचिन... तो आमदार आणि ते दरोडा घालणारे यात नसावेत. नाहीतर लॅबवर का हल्ला झाला... मला वाटतं अंबर मर्डर केसचे गुन्हेगार हे सगळं करवत आहेत..." डॉ. गोखलेंकडे पाहत प्रधान म्हणाले, "Doc. is right... अंबरच्या केसशी संबंधित असलेलं कोणीतरी हे करत असणार... त्यांचा एक डाव फसला आहे. आता मला नाही वाटत ते इतक्या झटकन पुन्हा डोकं वर काढतील... Now we should get them..."

"सर पण आता पुढे कसं आणि कुठून जायचं... आपल्याला आधी वाटलं होतं मेलेली व्यक्ती अंबर आहे. पण अंबर तर प्रत्यक्षात समोरच आला आपल्या..." उमाने विचारलेल्या या प्रश्नावर सचिन म्हणाला, "हो ना... त्यामुळे आपण जिथून सुरुवात केली, तिथेच येऊन पोहोचलो... No further clue..." सचिनच्या खांद्यावर हात ठेवत आनंद म्हणाला, "सचिन, do not say it again... गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचे सगळे रस्ते बंद झाले, असं कधीच होत नाही. एक मार्ग बंद झाला की दुसरा मार्ग उघडतो. फक्त आपल्याला तो शोधावा लागतो..." आनंदकडे बोट दाखवत प्रधान म्हणाले, "Bang on आनंद... एकदम बरोबर आहे तुझं. आत्तापर्यंतच्या तपासात खुल्या झालेल्या तीन नव्या मार्गांकडे लक्षच गेलं नाही आपलं..." सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांकडे पाहत प्रधान पुन्हा म्हणाले, "हो... तीन नावे मार्ग... एक आहे ती डेड बॉडी. दुसरा आहे तो माणूस ज्याला सचिनने पकडलं आणि तिसरा म्हणजे हा नवा अंबर..."

हे ऐकून सर्वांच्या चेहेऱ्यांवर आनंदाची लकेर उमटली. डॉ. गोखले म्हणाले, "जर ती बॉडी खऱ्या अंबरची असेल, तर हा जो घरी होता, तो तोतया असणार..." उमा म्हणाली, "आणि जर तो खरा अंबर असेल, तर मेलेली व्यक्ती दुसरीच कोणीतरी आहे..." यावर सचिन म्हणाला, "आपल्या सर्वांवर झालेल्या हाल्ल्यामध्ये तो एकमेव माणूस माझ्या हाती लागला. त्याला बोलतं करू आपण..." यावर डॉ. गोखले म्हणाले, "लॅबमधला सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बंद होण्याआधी तो जो कोणी इथे आला होता, तो कॅमेऱ्यात आलाच असणार..." हे सर्व ऐकून जरा विचार करत प्रधान म्हणाले, "डॉक, मिळालेल्या सांगाड्यामध्ये अजून काही मिळतंय का बघा... सचिन, आनंद, तुम्ही त्या पकडलेल्या माणसाला बोलतं करा आणि इथल्या सी.सी.टी.व्ही.चं फुटेज मिळवा. मी आणि उमा, या अंबरबद्दल चौकशी करतो. त्याच्या ऑफिस आणि घराच्या आजू-बाजूच्या परिसरात त्या जिवंत अंबरच्या नकळत चौकशी करायला हवी... लेट्स मूव्ह..."

चौकीतल्या एका खोलीत सचिनने पकडलेल्या माणसाला एका खुर्चीवर बसवलं होतं. त्याचे दोन्ही हात खुर्चीला बांधलेले होते. खोलीत दोन कॉन्स्टेबल, आनंद आणि सचिन होते. आनंदने सचिनकडे पाहिलं. सचिन त्या माणसाकडे पाहत म्हणाला, "नाव काय तुझं..." सचिनकडे रागीट नजरेने पाहत तो माणूस गप्पच होता. त्या माणसाकडे पाहत आनंद खेकसला, "काय रे... कठीण आहे का नाव... जीभ जड होते का नाव सांगताना..." त्या माणसाने आनंदकडे पाहिलं आणि म्हणाला, "रमण नाव आहे माझं... साहेब, या तुमच्या ऑफिसरने कारण नसताना मला पकडलं. रस्त्यावर झालेलं भांडण होतं ते. भांडण करणारे तर पळाले. मी फक्त भांडण बघत होतो तेव्हा यांनी धरलं मला. साहेब, सबळ पुराव्याशिवाय तुम्ही मला असं अडकवू शकत नाही. मला कोणत्या गुन्ह्यासाठी इथे आणलं ते सांगा नाही तर कायदा मलाही कळतो..."

आनंद आणि सचिनने एकमेकांकडे पाहिलं. सचिन म्हणाला, "या रमणला चौकशीसाठी आपण इथे आणलं आणि हा आपल्यालाच कायद्याचा बडगा दाखवतो आहे... वाह..." रमणच्या समोरच्या खुर्चीत बसत आनंद म्हणाला, "तर तुला कायदा समजतो... चल, आता तुझ्याशी कायद्याच्या भाषेतच बोलतो आम्ही... तुकाराम, माझ्या केबिनमध्ये जा. तिथे ड्रॉव्हरमध्ये एक पॅकेट ठेवलं आहे. ते घेऊन या..." थोड्याच वेळात हवालदार तुकाराम एक पाकीट घेऊन आले आणि आनंदच्या हातात दिलं. तोवर सचिनने रमणचे हात सोडले. पाकीट टेबलवर ठेवत आनंदने हॅन्ड ग्लोव्ज घातले आणि पाकीट उघडून त्यातली वस्तू काढून रमणसमोर धरली. रमणकडे पाहत आनंद म्हणाला, "हे जर्मन मेड पिस्तूल आहे. बिना नंबर... घे..." असं म्हणत आनंदने ते पिस्तूल रमणकडे भिरकावलं. रमणने ते पकडलं. आनंद पुढे म्हणाला, "हे पिस्तूल एका डेड बॉडीजवळ सापडलं. पिस्तुलावर ठसे नाहीत की नंबर नाही. त्यामुळे आम्ही खुन्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. ती केस बंद झाली. पण आता वाटतंय ती केस पुन्हा ओपन करावी. कारण खूनी सापडला..."

पिस्तुलाकडून सचिन आणि आनंदकडे पाहत रमण म्हणाला, "खूनी सापडला म्हणजे..." रमणच्या खांद्यावर थाप मारत सचिन म्हणाला, "अरे, या पिस्तुलावर आधी ठसे नव्हते. आता तुझ्या बोटांचे ठसे आलेत त्यावर. त्या मेलेल्या माणसाचा आणि तुझा संबंध आणि वैर आहे या दोन्ही गोष्टी सिद्ध करू आम्ही. पण आनंद सर, याला आपण कोर्टात हजर करूया प्लिज, एन्काऊंटर नका करू याचा..." हे ऐकून रमण घाबरला. पिस्तूल त्याच्या हातून गळून पडलं. आनंदने पिस्तूल उचलताच हात जोडत रमण म्हणाला, "साहेब, मी खूनी नाही हो... मी आणि माझे मित्र गर्दीत मिसळून धक्का-बुक्की करतो, तमाशे उठवतो आणि त्याचा फायदा घेऊन चोऱ्या करतो फक्त. या खुनाशी माझा काहीही संबंध नाही हो..." आनंद ताडकन उठला आणि रमणच्या कपाळाला पिस्तूल लावत म्हणाला, "मग सचिनवर हल्ला का केलात तुम्ही... सचिन तर एकटाच होता ना... आणि तिथे गर्दी पण नव्हती... बोल पटपट. नाहीतर तुला फासावर लटकवायला मला एक सेकंदसुद्धा लागणार नाही..."

रमण अजूनच घाबरला. काही क्षण गेले आणि तो म्हणाला, "साहेब, या तुमच्या ऑफिसरवर हल्ला करायला मला पैसे दिले गेले होते. मला एक फोन आला. त्या माणसाने मला पार्कमध्ये बोलावलं. तिथे एका बेंचखाली हे पाकीट होतं. मी ते उचललं. त्यात पैसे आणि या ऑफिसरचा फोटो होता. वेळ आणि जागाही एका कागदावर लिहिली होती. मी ते पाहत होतो तेव्हा पुन्हा फोन आला. त्या माणसाने सांगितलं, "काम झाल्यावर बाकी पैसे इथेच मिळतील..." आणि फोन बंद झाला. साहेब, मी फक्त तेवढंच केलं जेवढं लिहिलं होतं. ते पाकीट माझ्या या पॅन्टच्या खिशात आहे..." सचिनने रमणच्या खिशातून पाकीट बाहेर काढलं. त्यात एक कागद आणि सचिनचा फोटो होता. कागदावर लिहिलं होतं, "सकाळी, तीन हात नाका..." आनंदने ते पाकीट आणि तो कागद पाहिला. दोन्ही पाहताना त्याच्या डोळ्यात चमक होती. आनंद काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला...

पालिकडे प्रधान बोलत होते. आनंद म्हणाला, "येस सर, ओके. This is a coincidence sir. आम्हालाही तीच लीड मिळाली आहे. आम्ही तिथेच यायला निघालो आहोत..." फोन बंद करत सचिनकडे पाहत आनंद म्हणाला, "सरांचा कॉल होता. सरांनी आणि उमाने त्या दुसऱ्या अंबरच्या नकळत त्याची माहिती जमवण्याचा प्रयत्न केला. त्यांना एक लीड मिळाली आहे. आणि सचिन, योगायोग म्हणजे तीच लीड आपल्यालाही मिळाली आहे. हा कागद बघ..." सचिनने कागद नीट पाहिला मग आनंदकडे पाहत तो म्हणाला, "सर यावर तर..." आनंदने मान हलवली आणि दोघंही चौकीतून बाहेर पडले...

थोड्याच वेळात एका बाजूने आनंद व सचिन आणि दुसऱ्या बाजूने प्रधान व उमा एका गेटजवळ पोहोचले. प्रधान आणि उमाला पाहताच आनंद आणि सचिन त्यांच्या मागे जीपमध्ये जाऊन बसले. सचिनने बोलायला सुरुवात केली, "सर, मी पकडून आणलेल्या त्या हल्लेखोराला, रमणला आम्ही बोलतं केलं. माझ्यावर तसा हल्ला करून त्यात मला मारायचा प्लॅन होता. या कामासाठी त्याला पैसे दिले गेले होते..." सचिनचं बोलणं पुढे नेत आनंद म्हणाला, "सर, या रमणला काय करायचं आहे ते एका कागदावर लिहिलं होतं. हा तोच कागद आहे..." आनंदच्या हातून कागद घेऊन प्रधान वाचू लागले. तेव्हा उमा म्हणाली, "त्या दुसऱ्या अंबरच्या नकळत आम्ही त्याची चौकशी केली. त्याच्या ऑफिसमधून समजलं, की त्याच वागणं चांगलंच बदललं होतं. काहींची तर नावंही तो विसरला होता. आणि हे सगळं तीन महिन्यांपूर्वीच सुरू झालं..." कागद वाचल्यावर तो घडी करून खिशात ठेवत प्रधान म्हणाले, "सळ्यांनी भरलेला तो ट्रक, ज्याने आमची वाट अडवली, तोही तपासला गेला. बाकी ट्रकमध्ये काही सापडलं नाही. पण ब्रेकजवळ हा कागद पडला होता. यात पण वेळ आणि सूचना लिहिली आहे..."

सचिनने तो कागद उलट सुलट करून पाहिला आणि म्हणाला, "सर हा कागद तर आम्हाला सापडलेल्या कागदासारखाच आहे..." आनंद म्हणाला, "हे कागद एकाच रायटिंग पॅडचे आहेत..." यावर उमा म्हणाली, "म्हणजे या रायटिंग पॅडचा मालक या कटाचा सूत्रधार आहे तर..." तिघांकडे पाहत प्रधान म्हणाले, "तुम्ही तिघं बरोबर आहात. या रायटिंग पॅडच्या मालकाला पकडण्यासाठीच आपण इथे आलो आहोत. डेड बॉडीचा आणि सी. सी. टीव्हीचा माग डॉक काढत आहेतच. पण तूर्तास हा माणूस महत्वाचा..." सचिन म्हणाला, "सर, तो अजूनही असेल इथे..." सचिनच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "सचिन, बऱ्याच अंशी अशी माणसं फार over confident असतात. बघू, आपलं नशीब जोरावर आहे का... नाहीतर त्याला काढू की हुडकून... सचिन-आनंद, फॉर्म्यूला ३६. लेट्स गो..." सर्वजण गाडीतून उतरून गेटजवळ आले. गेटवर आणि बिल्डिंगवर बोर्ड होता, "गुड हेल्थ हॉस्पिटल..."

उमा एकटीच आत गेली आणि रिसेप्शनमध्ये असलेल्या एका सोफ्यावर बसली. पाठोपाठ प्रधानांनी आत प्रवेश केला. रिसेप्शनवर एक महिला बसली होती. प्रधान काऊंटरजवळ गेले. त्या महिलेच्या गणवेशावर 'मोना' या नावाचा बिल्ला होता. प्रधान म्हणाले, "मला Cosmetic surgeryबद्दल बोलायचं आहे. कोणाकडे जायचं सांगू शकाल का..." मोनाने एकवार प्रधानांकडे पाहिलं. मग म्हणाली, "या हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टर्स आहेत. पण ते सुद्धा अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाहीत. आणि हो, तुमच्या local physicianकडून तशी चिठ्ठी आणि रिपोर्ट लागतील..." हे ऐकून प्रधान थोडे थबकले. पुन्हा मोनाच्या जरा जवळ सरकत म्हणाले, "चिठ्ठी आणि रिपोर्टशिवाय नाही का होणार काही... फार अर्जंट केस आहे..." मोना थोडी चिडली आणि चढ्या आवाजात म्हणाली, "हे बघा, हे असले प्रकार इथे चालत नाहीत. तुमच्या डॉक्टरची चिठ्ठी असेल तर बोला नाहीतर, ए बबन, यांना जरा बाहेरचा रस्ता दाखव रे..." बाजूलाच एक कर्मचारी सफाई करत होता. हातातलं फडकं खाली टाकत तो रिसेप्शनकडे वळला...

"काय झालं म्याडम..." बबनच्या या प्रश्नावर मोना म्हणाली, "अरे हे बघ काय बोलत आहेत... जरा समजाव त्यांना. बाहेर घेऊन जा त्यांना. दुसऱ्या पेशन्ट्सवर परिणाम होईल उगाच..." प्रधानांकडे वळत बबन म्हणाला, "चला साहेब, तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतो..." बबन आणि प्रधान बाहेर जात थोड्या आडोशाला गेले. बबन कुजबुजत म्हणाला, "अहो साहेब, इथे असं चालत नाही. म्हणजे असं समोर समोर तुम्ही त्या म्याडमला विचारलं ना... बरं आता सांगा काय झालं..." काही क्षण थांबत प्रधानांनी गाडीकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, "त्या गाडीत माझा भाऊ बसला आहे. त्याचा चेहेरा बदलायचा आहे. पण कोणाला कळू नं देता..." इथे तिथे पाहत बबन म्हणाला, "चेहेरा बदलायचा आहे... पण असं केलं काय त्यानं..." यावर थोडं भडकून प्रधान म्हणाले, "हे बघ, या नसत्या चौकाशा करायची काही गरज नाही तुला..." हात झिडकारत बबन म्हणाला, "राहिलं... चायला तुम्हाला मदत करायला म्हणून आलो तर तुम्ही माझ्यावरच खेकसताय... तुमचं तुम्ही बघून घ्या..." बबन जायला वळताच प्रधानांनी त्याला अडवलं आणि म्हणाले, "अरे बाबा असं नको करुस... माझा भाऊ मोठ्या संकटात सापडला आहे. तुला सगळं सांगतो. पण इथे नको..." बबन त्यांना हॉस्पिटलच्या मागे असलेल्या स्टोर रूममध्ये घेऊन गेला. दोघं आत जाताच दार लावलं गेलं. प्रधानांनी पाहिलं तर रिसेप्शनवरची ती महिला, मोना दारासमोर उभी होती...

तिच्याकडे आश्चर्याने पाहत प्रधान म्हणाले, "तुम्ही..." मोना हसली आणि म्हणाली, "काय झालं आहे ते सांगा लवकर. डॉक्टरांना भेटायचं आहे ना..." प्रधानांनी एकवार दोघांकडे पाहिलं आणि म्हणाले, "आत्ताच माझ्या भावाने एकाला गाडीने उडवलं. तो मेलेला माणूस पोलीस ऑफिसर होता. त्यांच्याच बिरादारीच्या माणसाला मारलं म्हटल्यावर पूर्ण फोर्स आता माझ्या भावाच्या मागे लागली आहे. मी या हॉस्पिटलबद्दल ऐकून आहे. म्हणून माझ्या भावाला इथे आणलं..." मोनाने आणि बबनने एकमेकांकडे पाहिलं. बबन म्हणाला, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचं काम झालंच म्हणून समजा. पण दोन खोके लागतील. म्हणजे दोन करोड कॅश... त्यातले पन्नास लाख आम्हाला द्यायचे, पन्नास डॉक्टरांना कामाच्या आधी आणि काम झाल्यावर डॉक्टरांना बाकीचे पैसे द्यायचे. मंजूर असेल तर पैशाची व्यवस्था करा. मग आमचे पैसे पार्किंगमध्ये पाच नंबर जागेत ठेवा आणि रिसेप्शनला परत या. आम्हाला पैसे मिळाले की तुम्हाला डॉक्टर भेटतील..." इतकं बोलून मोना आणि बबन दोघं बाहेर निघून गेले. ते गेल्याची खात्री करून प्रधानांनी कानाला हात लावला आणि म्हणाले, "Uma, into our jeep right now..."

चौघंही गाडीत बसले होते. प्रधान म्हणाले, "तुम्ही सगळ्यांनी ऐकलंत ना... Means we are on a right track... आता पुढे काय करायचं... तुम्हा तिघांचं काय म्हणणं आहे..." आनंद म्हणाला, "सर, आपल्याकडे माहिती आहे. पण पुरावे नाहीत..." आनंदच्या बोलण्याला पुढे नेत उमा म्हणाली, "आणि सर, ती रिसेप्शनिस्ट आणि तो बबन मामुली प्यादे आहेत. या सगळ्यामागे कोणीतरी डॉक्टर आहे हे नक्की..." उमाची री ओढत सचिन म्हणाला, "आणि एखाद्या डॉक्टरवर हात टाकणं म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे..." प्रधानांनी सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाले, "You all are very right... We need to get the proofs first..." प्रधान बोलतच होते की त्यांचा फोन वाजला, "हां डॉक, बोला... ओके..." फोन ठेवत प्रधान म्हणाले, "डॉकने सी. सी. टीव्ही फुटेज मधून एक माहिती शोधली आहे. त्या कुरियरवाल्याचा चेहेरा झाकलेला होता. पण डॉकने त्याचे बूट ओळखले. भिवपुरीला सापडलेल्या कॅमेऱ्यात जे बूट आपल्याला दिसले होते, हे बूट तसेच आहेत. हा बघा डॉकने बुटांचा फोटो पाठवला आहे. हे बूट मी अजून कुठेतरी पाहिले होते... येस... तो दुसरा अंबर जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या पायात हेच बूट होते. ओह नो... माझ्या त्याचवेळी लक्षात यायला हवं होतं. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण उद्याच या प्रकरणाचा सोक्ष-मोक्ष लावू..."

हॉस्पिटलचं पार्किंग मुख्य इमारतीच्या खाली होतं. त्यामुळे आधी मुख्य इमारतीत जावंच लागणार होतं. सर्वजण जीपमध्ये बसले होते. ती पोलीस जीप नसल्याने कोणाला संशय येणार नव्हता. उमा म्हणाली, "सर, काल जेव्हा आपण इथे होतो तेव्हा मला एक गोष्ट आढळली. हॉस्पिटलचे सफाई कर्मचारी, दर तीन तासांनी पार्किंग एरियामध्ये जाऊन तिथली सफाई करतात. काल साडे अकरा वाजता ते लोक तिथे गेले होते..." उमाच्या बोलण्यावर प्रधान म्हणाले, "अच्छा, म्हणून त्या बबनने आणि त्या रिसेप्शनिस्ट मोनाने वर वेळ घालवला. जेणेकरून सफाई झाल्यावर त्यांना मला तिथे नेता येईल. कारण एकदा सफाई झाली की पुढचे तीन तास तिथे कोणीच फिरकणार नव्हतं..." "मग आता प्लॅन काय सर..." सचिनच्या या बोलण्यावर प्रधानांनी एकवार सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाले, "उमा तुला ती मोना ओळखू शकते. तेव्हा तू आणि सचिन, सफाई कर्मचाऱ्यांचा वेश करून पार्किंगमध्ये लपून बसा. पाच नंबर पार्किंगजवळ मी बॅग ठेवेन तेव्हा कदाचित माझ्यावर कोणीतरी पाळत ठेऊन असू शकेल. मी तिथून गेल्यावर तुम्ही दोघं त्या बॅगवर नजर ठेवा. काही हालचाल जाणवली तर लगेच मला कळवा. आनंद, चल, तुझ्या चेहेऱ्यावर थोड्या पट्ट्या बांधू..."

सकाळचे अकरा वाजले होते. हॉस्पिटलच्या आवारात तुरळक गजबज होती. जीपने आत प्रवेश केला. मुख्य इमारतीच्या जवळ येताच जीपचा वेग मंदावला. त्यासर्शी वेशांतर केलेले उमा आणि सचिन जीपमधून उतरले आणि जीपपासून लांब गेले. जीप दारात आली. मोना आणि बबन तिथेच होते. त्यांनी जीप पाहिली आणि एकमेकांना इशारा केला. प्रधान जीपमधून आधी उतरले. बाजूला बसलेल्या आनंदला त्यांनी हळुवार उतरवलं. आनंदचा चेहेरा पट्ट्या लावून झाकला गेला होता. रिसेप्शन परिसरात काही पेशंट्स होते. प्रधानांनी आनंदला एका खुर्चीत बसवलं आणि मोनाकडे वळत म्हणाले, "हा माझा भाऊ आहे. जरा अर्जंट केस आहे..." मोनाने होकार दिला आणि बबन समोर आला. जीपकडे पाहत बबनने पार्किंगकडे बोट दाखवलं आणि तो त्याच्या कामाला लागला...

आनंदकडे वळत प्रधान म्हणाले, "मी गाडी पार्क करून येतो हं. लगेच येतो. धीर धर हं..." प्रधान लगेच जीपकडे गेले. जीप पुढे जाऊन डावीकडे वळली आणि पार्किंगमध्ये शिरली. पाच नंबर पार्किंगमध्ये एक गाडी उभी होती. प्रधानांनी त्यांची जीप त्या गाडीच्या बाजूला लावली. खाली उतरून त्यांनी सगळीकडे नजर फिरवली. त्यावेळी त्यांच्या कानात सचिनचा आवाज आला, "सर, you are right... एक माणूस तुमच्या पाळतीवर आहे..." दुसरा आवाज उमाचा होता, "सर हा बबन आहे..." प्रधान म्हणाले, "काहीही करू नका. फक्त नजर ठेवा and keep me posted..." प्रधानांनी घड्याळ पाहिलं. सवा-अकरा होत आले होते. त्यांनी जीपमधून एक बॅग काढली आणि बाजूला भिंतीवर पाच हा अंक लिहिला होता, तिथे जमिनीवर ठेऊन दिली. मग पार्किंगच्या बाहेर येत मुख्य इमारतीकडे वळले...

प्रधान रिसेप्शनकडे गेले. त्यांनी मान हलवून इशारा केला. मोनाने कोणालातरी फोन लावला, "हां, अरे सामान आहे ना व्यवस्थित... चेक कर... ओके. मी पाहते..." इकडे प्रधानांच्या कानात सचिनचा आवाज आला, "सर, तुम्ही बाहेर पडलात आणि तो बबन बॅगेजवळ आला. त्याने बॅग उघडून चेक केली आणि कोणाचातरी फोन आला त्याला..." उमा पुढे म्हणाली, "सर, आम्ही याचा माग घेतो. त्या मोनाला इतक्यात आपल्याला हात लावता येणार नाही. कारण तो डॉक्टर अजून समोर यायचा आहे..." तिथे फोन ठेवत मोना प्रधानांकडे वळत म्हणाली, "तुम्हाला तुमच्या भावासाठी डॉक्टरांना भेटायचं होतं ना... चला मी दाखवते. मोना पुढे आणि आनंदला धरून प्रधान मागे चालू लागले...

तिकडे बबनने बॅग घेतली आणि बाजूच्या गाडीत शिरला. त्याने बॅग सीटखाली सरकवली. मग बाहेर येत गाडीचं दार बंद करत तो पुन्हा मुख्य इमारतीकडे वळला. स्टोर रूममध्ये जाऊन तो थांबला. सचिन आणि उमा त्याच्या मागावर होतेच. तिकडे प्रधान आणि मोना चालत असताना प्रधान म्हणाले, "बाई, सगळं केलं आहे व्यवस्थित, तर आता कुठे घेऊन जात आहात आम्हाला..." मोना फक्त हसली. एका केबिनबाहेर बोर्ड होता, "डॉ. पलाश सेन, सर्जन..." मोनाने दार वाजवलं आणि उघडलं. आत एक माणूस बसला होता. टेबलवर पाटी होती डॉ. पलाश सेन. प्रधान आणि आनंदला समोर बसवत मोना म्हणाली, "डॉ. ही स्पेशल केस आहे. केसचे अर्धे पेपर्स मी पाहिलेत. बाकी तुम्ही बघाल का..." डॉ. सेनने होकारार्थी मान हलवली तशी मोना हसली आणि केबिनबाहेर निघून गेली. दार लावायला डॉक्टर उठलेच होते तेव्हा कानाला हात लावत हळू आवाजात प्रधान म्हणाले, "Now..."

प्रधानांचा मेसेज मिळताच सचिन लपलेलेल्या जागेवरून बाहेर आला. तोवर बबन गाडीतून उतरून इमारतीकडे चालू लागला होता. त्याने सचिनला येताना पाहिलं आणि काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच बबन पळू लागला. बबन पळाला हे लक्षात येताच सचिनही त्याच्या मागून पळू लागला. उमाने हे पाहिलं आणि ती मागे वळून इमारतीच्या मुख्य दाराकडे वळली जेणेककरून बबनला दुसऱ्या बाजूने गाठता येईल. रिसेप्शनवर थोडी गजबज होती. त्यामुळे उमाने तिचा वेग मंदावला. पण रिसेप्शनवर आलेल्या मोनाच्या नजरेतून हे सुटलं नाही. तिने विचार केला, "अरे, ही बाई तर कालसुद्धा आली होती आणि काही वेळाने गायब झाली. आणि आज परत आली. कोण असावी ही बाई... मला डॉक्टर सेनना आणि बबनला सावध करायला हवं. पण केबिनमध्ये तर पार्टी बसली आहे... आधी बबनलाच सांगते हिच्याबद्दल..."

मोनाने एकवार उमाकडे पाहिलं आणि तिच्या सीटवर नं येताच मागच्या दारातून बाहेर निघून गेली. उमाने मोनाला जाताना पाहिलं आणि लगेच तिचा पाठलाग करू लागली. तिथे बबन धावत स्टोररूमपर्यंत पोहोचला आणि आत जाऊन त्याने दार लाऊन घेतलं. सचिन त्याच्या मागावर होताच. स्टोररूमच्या दाराला जरा धक्का देताच ते उघडलं. आत जात सचिनने बबनवर गन रोखली. तेवढ्यात मोना तिथे आली आणि तिने बबन पाठोपाठ सचिनला स्टोररूमच्या आत जाताना पाहिलं. मोनाने सगळीकडे पाहिलं आणि कपड्यात लपवलेलं पिस्तूल काढून ती आत शिरली. बबन हात वर करून, दाराकडे तोंड करून उभा होता तर सचिनची पाठ दाराकडे होती. सचिनच्या डोक्याला पिस्तूल लावत मोना म्हणाली, "इन्स्पेक्टर, तुझी गन खाली टाक. नाहीतर चाप ओढला जाईल आणि तू..."

मोना पुढे काही बोलणार इतक्यात उमा पुढे सरसावली. तिने मोनाच्या हातावर फटका मारला. मोनाच्या हातातलं पिस्तूल खाली पडलं. उमाने लगेच तिला ढकललं आणि स्वतःची गन रोखत सचिनच्या बाजूला येऊन उभी राहिली. मोनाच्या हाताकडे पाहून सचिनने डोळे मोठे केले. मग दोघांवरची नजर नं हटवता सचिन उमाला म्हणाला, "उमा, हीच ती बाई जिने मला रस्त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. हिचा चेहेरा झाकला होता, पण हे हातातलं ब्रेसलेट मी हेरलं होतं..." हे ऐकून उमा पुढे आली आणि तिने खाडकन मोनाच्या थोबाडीत दिली. मोना थोडी गडबडली आणि मागे सरकली. पुन्हा उमा आणि सचिनने बबन आणि मोनावर गन रोखल्या. उमा म्हणाली, "आता ताबडतोब बोला नाहीतर..."

बबन आणि मोना घाबरले. एकमेकांकडे पाहू लागले. बबनने बोलायला सुरुवात केली, "मी आणि मोना नवरा-बायको आहोत. या हॉस्पिटलमध्ये मी आधीपासून कामाला आहे. शिफारस करून मी मोनाला इथे नोकरीला लावलं. या हॉस्पिटलमध्ये मेलेल्या लोकांची प्रेतं त्यांच्या नातेवाईकांना देताना आम्ही त्यांच्याकडून पैसे घ्यायचो. आमचं बरं चाललं होतं. पण एक दिवस डॉ. पलाश सेन यांना आमच्याबद्दल समजलं. ब्लॅकमेल करायच्या मान्सूब्याने त्यांनी आम्हाला बोलावलं. मोनाने तिच्या सौंदर्याची भूल डॉ. सेनना घातली आणि ते मॅटर मिटवलं. काही महिने असंच चालू राहिलं. डॉ. सेन कधीही आणि कुठेही मोनाला बोलवू लागले. एक दिवस आम्हाला डॉ. सेन यांच्या कामांची एक फाईल मिळाली. त्यात अनेक अशा लोकांचे चेहेरे त्यांनी बदलले होते, ज्यांना पोलीस शोधत होते. आम्ही लगेच डॉ. सेनना दोन अटी घातल्या. एक म्हणजे मोनाचा पिच्छा सोडण्याची आणि दुसरी होती त्यांच्या धंद्यात भागीदारी. डॉक्टरांनी दोन्ही अटी मान्य केल्या आणि तेव्हापासून आम्ही तिघं या प्रकारे पैसे कमावतो..."

सचिनने पुढे होऊन बबनच्या कानशिलात हाणली. मग स्वतःच्या कानाला हात लावत म्हणाला, "सर, आम्ही या बबनला आणि मोनाला ताब्यात घेतलं आहे... ओके सर..." उमाकडे वळत सचिन म्हणाला, "सरांनी आपल्याला वर बोलावलं आहे. या दोघांनाही घेऊन यायला सांगितलं आहे..." मोनाला धक्का देत उमा म्हणाली, "चला राणीसरकार... तुमच्या नवरदेवांसोबत वर चला... आणि हो, एक गोष्ट लक्षात असू द्या... काही वेडंवाकडं करू नका... आमच्या गन्समधून कधी गोळ्या सुटतील आणि तुमची डोस्की फुटतील हे कळणारसुद्धा नाही तुम्हाला..." मोना आणि बबनने होकारार्थी मान हलवली आणि स्टोररूम बाहेर पडले. सचिन आणि उमा त्यांच्या मागेच होते. बबन आणि मोनाला घेऊन सचिन आणि उमा, डॉ. सेनच्या केबिनच्या बाहेर येऊन पोहोचले. उमा कानाला हात लावत म्हणाली, "सर, आम्ही बाहेर आहोत..."

तिथे केबिनमध्ये, मोना बाहेर पडल्यावर डॉ. सेन म्हणाले, “तुमच्या केसबद्दल मोनाने मला सगळं सांगितलं आहे. तेव्हा माझ्यापासून काही लपवू नका. आधी तुमच्या भावाच्या चेहेऱ्यावरच्या पट्ट्या काढा...” प्रधानांनी आनंदला इशारा करताच आनंदने पट्ट्या काढल्या. आनंदला पाहताच डॉ. सेन घाबरले. हळू आवाजात ते म्हणाले, “म्हणजे तू मेला नाहीस तर. त्या गुंडांनी खोटी बातमी सांगून पैसे घेतले माझ्याकडून...” डॉ. सेन उठून दाराकडे पळणार इतक्यात आनंदने त्यांना धरून खुर्चीत बसवलं. त्यांच्यावर नजर रोखत आनंद म्हणाला, “म्हणजे माझ्यावर जो हल्ला झाला तो तुम्ही केलात तर... अजून काय काय केलं आहे तुम्ही... सांगा पटापट...” आनंदकडून प्रधानांकडे पाहत डॉ. सेन म्हणाले, “तुम्ही माझ्याशी अशा भाषेत नाही बोलू शकत. मी एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे. तुमच्या विरुद्ध केस करू शकतो मी...”

डॉ. सेन बोलत असतानाच सचिन आणि उमा केबिन बाहेर येऊन पोहोचले आहेत हे त्यांना समजलं. प्रधान हसले आणि म्हणाले, “प्रतिष्ठित डॉक्टर हां... डॉक्टर, तुमचा सगळा चिठ्ठा तुमच्या माणसांनी उघड केला आहे. सचिन, उमा, घेऊन या रे दोघांना...” काही क्षणातच सचिन आणि उमा, मोना आणि बबनला ढकलत आत आले. त्या दोघांना बेड्या घातलेल्या पाहून डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. मोना म्हणाली, “डॉक्टर, यांनी आमच्याकडून सगळं वदवून घेतलं. आणि रेकॉर्डसुद्धा केलं. तुमची ती फाईलसुद्धा त्यांना मिळाली आहे...” डॉ. सेनकडे पाहत प्रधान म्हणाले, “तेव्हा डॉ. सेन, आता निमूट सांगा सगळं...” डोक्यावरचा हात काढत, मोना आणि बबनकडे पाहत डॉ. सेन म्हणाले, “सांगतो, सगळं सांगतो...” 

मी एक कोसमॅटिक सर्जन आहे. लोकांचे चेहेरे बदलणं, चेहेऱ्यात बिघाड झाल्यास चेहेरा सुधारणं यात माझा हातखंडा आहे. ही विद्या सरळ मार्गाने मला तितकेसे पैसे मिळवून देऊ शकली नसती. म्हणून बबन आणि मोनाला हाताशी धरून, हॉस्पिटलमधल्या औषधांचा आणि इथे असलेल्या बेवारस मृतदेहांचा काळा बाजारसुद्धा करू लागलो. तुमच्या पोलिस रेकॉर्डसमध्ये असलेल्या कित्येक गुन्हेगारांचे चेहेरे बदलून मी त्यांना पोलिसांपासून लपवण्याचं काम केलं आहे. रॉकी आणि प्राजक्तासुद्धा तसेच...” बोलता बोलता डॉ. सेननी दोन फोटो टेबलवर ठेवले आणि पुढे म्हणाले, “आत्ताचे ते अंबर आणि तारा दुसरे तिसरे कोणी नसून रॉकी आणि प्राजक्ता आहेत. हे त्या दोघांचे मूळचे चेहेरे. खऱ्या अंबरला फसवून त्याचा पैसा लुबाडण्यासाठी हे सगळं त्यांनी रचलं आणि मी त्यांना मदत केली. सगळं बरं चाललं होतं, पण अचानक तुम्ही या केसचा पिच्छा पुरवू लागलात. आम्ही तिघं घाबरलो. मी तुम्हाला मारायला माणसं पाठवली तर रॉकी त्या डॉक्टरच्या मागे गेला...”

हे सगळं ऐकत असताना प्रधानांच्या डोळ्यातून आग बरसत होती. ते डॉक्टरचा गळा पकडायला सरसावलेच होते की त्यांनी स्वत:ला सावरलं. डॉ. सेन पुढे म्हणाले, “आमचं जे बोलणं झालं त्यात आम्ही असं ठरवलं, आता हे नाटक जास्त काळ चालू शकणार नाही. अंबरच्या आई-वडिलांना संपवून, मला माझा हिस्सा देऊन, रॉकी आणि प्राजक्ता आजच सटकणार आहेत. माझी गरज जेव्हा भासेल तेव्हा ते मला बोलवून घेतील...” प्रधान, उमा, सचिन आणि आनंदने एकमेकांकडे पाहिलं. फोन बाहेर काढून नंबर लावत प्रधान म्हणाले, “हॅलो, कोण घोरपडे का... मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय. गुड हेल्थ हॉस्पिटलला ताबडतोब पोलिसांची कुमक पाठवा. गुन्हेगारांना ताब्यात घ्यायचं आहे... आणि हो, पोलिस सध्या वेशात असू देत. हे हॉस्पिटल आहे. इथल्या रुग्णांना आणि इतर चांगल्या कर्मचऱ्यांना याची झळ लागायला नको...”

थोड्याच वेळात संध्या वेशातले काही पोलिस खोलीत आले आणि प्रधानांना सल्युट करून उभे  राहिले. त्यांना उद्देशून प्रधान म्हणाले, “या दोघा नवरा-बायकोला घेऊन जा. कोठडीत पूजा घालू यांची आणि मेहूण म्हणून बसवू यांना... पार्किंगमध्ये पाच नंबर खांबाजवळ एक गाडी उभी असेल. तीसुद्धा ताब्यात घ्या...” बबन आणि मोनाला घेऊन पोलिस निघून गेल्यावर आनंद, उमा आणि सचिनकडे पाहत प्रधान म्हणाले, “या डॉक्टरला घेऊन चला अंबरकडे. खऱ्या अंबरला वाचवू शकलो नाही आपण. पण त्याच्या आई-वडिलांना या संकटातून बाहेर काढू... डॉ. सेनच्या या केबिनला सील करा... लेट्स गो...” सर्वजण तिथून निघाले ते थेट अंबरच्या घराबाहेर पोहोचले. आनंदने डॉ. सेनला धरून ठेवलं होतं. प्रधानांनी इशाऱ्यानेच त्याला तिथेच थांबायला सांगितलं आणि स्वत: प्रधान, उमा व सचिन दाराजवळ गेले. आतमध्ये हालचाल जाणवत होती. प्रधान बेल वाजवणार इतक्यात दाराची कडी काढल्याचा आवाज आला... 

दार उघडलं तेव्हा समोर प्राजक्ता उभी होती. तीसुद्धा या तिघांना पाहून चपापली. आत येत प्रधान म्हणाले, "काय तारा मॅडम, इतक्या घाई-घाईने कुठे निघालात..." तेवढ्यात, "झाली का तयारी... चल लवकर चल..." असं म्हणत रॉकी बाहेर आला. समोर सर्वांना पाहून तो थबकला. काही क्षण गेले आणि रॉकी म्हणाला, "अरे ऑफिसर्स, तुम्ही इथे... सॉरी आम्ही थोडे घाईत आहोत. पण तुम्ही बसा. आई-बाबांशी बोला. आम्ही येतोच थोड्या वेळात... आई... बाबा... हे पोलीस ऑफिसर्स आलेत. त्यांच्याकडे बघा ना जरा. आम्ही जाऊन येतो पटकन. चल तारा..." रॉकी जायला निघाला तर सचिनने त्याला अडवलं, "कुठे जाताय मि. अंबर... सॉरी. मि. रॉकी..." रॉकी हे नाव ऐकताच अंबर हबकला, "रॉकी... क...कोण रॉकी... म... मी अंबर आहे..." हे ऐकून सर्वजण हसू लागले, "ताराजवळ जात उमा म्हणाली, "आता तुम्ही पण म्हणाल, की तुमचं नाव तारा आहे. प्राजक्ता नाही..." प्राजक्ता काही बोलणार इतक्यात उमाने तिच्या थोबाडीत मारली. झटक्यानिशी प्राजक्ता मागे जात रॉकीवर आदळली. प्रधान म्हणाले, "तुम्हा दोघांचा खेळ संपलेला आहे. आनंद, घेऊन ये रे त्याला..."

काही क्षणातच डॉ. सेनची गचांडी धरून आनंद आत आला. डॉ. सेनला पाहून प्राजक्ता आणि रॉकी दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. दोघं एकमेकांकडे पाहू लागली. दोन फोटो टेबलवर टाकत प्रधान म्हणाले, "रॉकी आणि प्राजक्ता, हे तुमचे मूळचे चेहेरे... जे बदलून तुम्ही अंबर आणि तारा झालात... काय बरोबर ना..." प्रधान बोलत असताना उमाला काहीतरी जाणावलं. इकडे-तिकडे पाहत उमा म्हणाली, "सर, गॅसचा वास येतोय..." हे ऐकून चौघांनी सर्वत्र पाहिलं. सगळीकडे गॅस भरून राहिला होता. रॉकीने लगेच खिशातून लायटर काढला आणि हातात धरत म्हणाला, "हा... हा... हा... आम्हीच गॅस लीक केला आहे. किचनमध्ये सगळे बर्नर चालू केलेत मी. त्या जोडप्याला या आगीत जाळून मारायचं होतं आम्हाला. आता तुम्हीसुद्धा तसेच मराल... त्या थेरड्यांना वाचवायचं असेल तर जाऊ द्या आम्हा तिघांना... आनंदकडे पाहत रॉकी म्हणाला, "ए ऑफिसर, सोड डॉ. सेनला... नाहीतर..."

आनंदने जरा विचार केला आणि डॉ. सेनला रॉकीकडे ढकललं. डॉ. सेन रॉकीवर आदळले आणि रॉकीच्या हातून लायटर खाली पडला. क्षणाचाही विलंब नं करता आनंद, उमा आणि सचिनने आपापल्या पिस्तुली रॉकी, प्राजक्ता आणि डॉ. सेनवर रोखल्या. प्रधान लगेच किचनमध्ये गेले आणि त्यांनी सर्व बर्नर बंद केले. मग घराच्या सगळ्या दारं-खिडक्या उघडत ते बेडरूममध्ये पोहोचले. तिथे अंबरच्या आई-वडिलांना बांधून ठेवलं होतं. प्रधानांनी दोघांना सोडवलं आणि बाहेर घेऊन आले. रॉकी आणि प्राजक्ताला पाहून अंबरची आई पुढे सरसावली आणि तिने दोघांच्याही थोबाडीत मारली. मग मागे जाऊन अंबरच्या वडिलांजवळ उभी राहिली आणि म्हणाली, "नीच आहात तुम्ही दोघं. तुमच्या जाळ्यात अडकून आमचा बिचारा अंबर... तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही लक्षात ठेवा..." अंबरची आई रडू लागली. उमा त्यांना शांत करायला पुढे जाऊ लागली. सर्वांचं लक्ष दुसरीकडे आहे हे पाहून रॉकीने प्राजक्ताला इशारा केला...

प्राजक्ताने उमाला झटका दिला आणि तिचं खाली पडलेलं पिस्तूल उचलून उमाच्या डोक्याला लावलं. मग सर्वांकडे पाहत म्हणाली, "आम्ही नीच काय... आता बघा आम्ही काय करतो... ऑफिसर्स, आपापल्या पिस्तुली डॉ. सेन आणि रॉकीकडे द्या नाहीतर तुमची ही ऑफिसर ढगात गेली समजा..." सचिन आणि आनंद त्यांच्या पिस्तुली रॉकी आणि डॉ. सेनकडे सोपवणार इतक्यात वेगळ्याच दिशेला पाहत प्रधान ओरडले, "डोन्ट शूट..." अचानक झालेल्या ओरड्याने प्राजक्ता गडबडली. उमाने लगेच संधी साधली आणि प्राजक्ताच्या पिस्तूल धरलेल्या हाताला खाली खेचलं. दोघींमध्ये झटापट झाली आणि गोळी सुटली. गोळीने समोर उभ्या असलेल्या रॉकीच्या छातीचा वेध घेतला आणि त्या झटक्यानिशी रॉकी मागे ढकलला जाऊन टेबलाला आदळला. रॉकी जमिनीवर कोसळला आणि काही क्षणातच गतप्राण झाला...

रॉकी मेलेला पाहून प्राजक्ताला आणि डॉ. सेनला शॉक बसल्यासारखं झालं. उमाने लगेच पिस्तूल हिसकावून घेतलं आणि पुन्हा प्राजक्ताच्या कानाला लावलं. रॉकी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. प्रधान, उमा, सचिन आणि आनंदच्या गरड्यात प्राजक्ता आणि डॉ. सेन बसले होते. त्यांच्या समोरच डोळ्यात अश्रू घेऊन अंबरचे आई-वडील बसले होते. प्राजक्ता आणि अंबरच्या आई-वडिलांची नजरा-नजर झाली आणि प्राजक्ताने मान खाली केली. कणखर स्वरात प्रधान म्हणाले, "चला... आता पटापट बोलायला सुरू करा... नाहीतर..." प्रधानांचा आवाज ऐकून आणि डोळ्यातली जरब पाहून प्राजक्ता आणि डॉ. सेन दोघंही घाबरले. डोळे पुसत प्राजक्ताने बोलायला सुरुवात केली...

"सांगते. सगळं सांगते. मी प्राजक्ता. मी मूळची सोलापूरची. मी अनाथाश्रमात लहानाची मोठी झाले. त्या आश्रमातल्या लोकांचं म्हणणं होतं, मी तिथे राहून इतरांची सेवा करावी. पण मला ते करायचं नव्हतं. मला पैसा कमवायचा होता. श्रीमंत व्हायचं होतं. आश्रमातले पैसे चोरून मी तिथून पळ काढला. मोठ्या पार्ट्या गाठून त्यात आलेल्या श्रीमंत मुलांना नादाला लाऊन मी माझी ऐश-आरामाची हौस भागवू लागले. त्याच दरम्यान मला रॉकी भेटला. आम्ही दोघंही एकमेकांना आवडलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो. रॉकीसुद्धा माझ्याचसारखा श्रीमंत मुलींना नादाला लाऊन त्यांची संपत्ती लुबाडण्याचं काम करायचा. रॉकीने मला एक प्लॅन सांगितला. श्रीमंत आई-बापाच्या मुलांना फसवून त्यांच्याशी लग्न करून त्यांची संपत्ती लुबाडायची आणि त्यांना संपवायचं. आम्ही ऍक्सीडेन्टचा बहाणा करून दोन वर्षात दोन मुलांना असंच संपवलं. आणि अशातच आम्हाला अंबर भेटला. एकुलता एक मुलगा, मुंबईत मालकीचे असलेले दोन फ्लॅट्स, बक्कळ पैसा, हे सगळं पाहून आम्ही अंबरला आमची पुढची शिकार बनवायचं ठरवलं...

रॉकीने कैलास बनून अंबरशी ओळख करून मैत्री वाढवली. त्याची सगळी माहिती काढली. अंबरला आवडेल अशी दिसणारी आणि वागणारी तारा बनवून रॉकीने मला अंबरच्या आयुष्यात आणलं. काही दिवसांच्या प्रेमातच अंबरने मला लग्नाची मागणी घातली. तो मला त्याच्या आई-वडिलांकडेही घेऊन गेला. त्यांनी सुद्धा मला पसंती दर्शवली. आमचं रजिस्टर्ड लग्न झालं. आता पुढची पायरी होती, अंबरला संपवण्याची. आम्ही प्लॅन बनवला. अंबरसोबत मी हनिमूनला जायचं. अंबरच्या नकळत रॉकीने तिथे पोहोचायचं आणि तिथेच ऍक्सीडेन्ट घडवून आणायचा ज्यात अंबरला मारायचं. मग परत येऊन दु:खात असलेल्या या म्हातारा-म्हातारीसोबत काही दिवस घालवल्यावर संपत्ती हडप करायची आणि या दोघांनाही संपवायचं. केस बनली असती, मुलाच्या अकाली निधनाने या दोघांचा हाय खाऊन मृत्यू. पण हा अंबर अपेक्षेपेक्षा हुशार निघाला...

रॉकीचं खरं नाव कैलास नसून रॉकी आहे, आणि त्याच्या वाईट कामात हे डॉ. सेन त्याची मदत करतात, हे अंबरला समजलं. मला अंबरने हे सांगितलं आणि वर हे ही म्हणाला की त्याने कैलास हे नाव का धारण केलं ते अंबर शोधणार होता. अंबर जर रॉकीबद्दल अजून खोलात शिरला असता तर कदाचित तो माझ्यापर्यंत पोहोचला असता. मी रॉकीला कॉन्टॅक्ट करून नवीन प्लॅन बनवला. अंबरला गळ घालून भिवपुरीला ट्रेकला चलण्यासाठी भाग पाडलं. मी आणि रॉकी भिवपुरीला बऱ्याच वेळा गेलो होतो. अंबरशी लग्न झाल्यावरसुद्धा मी आणि रॉकी तिथे जात असू. त्यामुळे तिथल्या अनेक छुप्या जागा आम्हाला माहित होत्या. मी आणि अंबर धबधब्याशी पोहोचलो. मी रॉकीलाही तिथे बोलवून घेतलं होतं. रॉकी दिसताच मी तिथून दूर होत लपून बसले. रॉकीने अंबरला संपवलं आणि आम्ही त्याची बॉडी धबधब्याच्या मागच्या गुहेत गाडून टाकली. या वेळी अंबरचा अपघाती मृत्यू नव्हता, म्हणून रॉकीला अंबर बनवून आम्ही अंबरला काही काळ जिवंत ठेवलं. आमच्या प्रत्येक शिकारीच्या आधी आणि नंतर, आम्ही डॉ. सेन करवी माझा चेहेरा बदलून घेत असू. पण या वेळी फक्त रॉकीचा चेहेरा बदलून घेतला..."

प्राजक्ताचं बोलणं होतं तोच सर्वांनी डॉ. सेनकडे पाहिलं. तेव्हा डॉ. सेन बोलते झाले, "हो, एक दिवस ही प्राजक्ता मला भेटली. तिच्या कामात मी तिला साथ द्यावी यासाठी तिने मला तिच्या सौंदर्याची आणि शरीरसुखाची भूल घातली. मी त्याला बधत नाही म्हटल्यावर हा रॉकी माझ्याकडे आला. त्याने मला एक फाईल दिली. त्यात मी केलेल्या कामाचे पुरावे होते. मला त्यांना मदत करणं भाग पडलं. मी दोन वेळा प्राजक्ताचा चेहेरा बदलला. तीन महिन्यांपूर्वी रॉकी आणि प्राजक्ता माझ्याकडे अंबरचा फोटो घेऊन आले. तेव्हा मी पहिल्यांदा रॉकीचा चेहेरा बदलला. तुम्ही ही केस हातात घेतली आहे हे समजल्यावर मी माझ्या काही पेशंटन्स ना, ज्यांचे चेहेरे मी बदलले होते, त्यांना हाताशी धरून तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला. पण खात्री बाळगा ऑफिसर्स, अंबरच्या खुनात माझा काहीच हात नव्हता..."

डॉ. सेनने सर्वांकडे पाहिलं. प्रधानांच्या डोळ्यातली आग पाहून ते अजूनच घाबरले. डॉ. सेनच्या शर्टाची कॉलर पकडत प्रधान म्हणाले, "डॉ. सेन, देवानंतर मनुष्याचा जर कोणावर विश्वास असेल, तर तो डॉक्टर असतो. पण तुम्ही या उदात्त व्यवसायला काळिमा फासलात. आणि प्राजक्ता, ज्याने रॉकीसारख्या बनेल आणि पाताळयांत्री माणसाचं खरं रूप शोधून काढलं, त्या अंबरला तुमच्याबद्दल समजलं नसेल... अंबरच्या ऑफिसमध्ये आम्हाला एक कागद सापडला. त्यात त्याने तुम्हा तिघांबद्दल लिहिलं होतं. प्राजक्ता मॅडम, अंबरचं तुमच्यावर खरोखरचं प्रेम होतं. तुम्हाला सुधारण्याची संधी द्यावी या हेतूने अंबर प्रयत्न करणार होता. त्या व्हिडियोतसुद्धा त्याने तुम्हाला तारा नाही, तर प्राजू म्हणून हाक मारली होती. पण ती हाक ऐकायला तुम्ही तिथे होता कुठे... तुम्ही तर लपून बसलात आणि थंड डोळ्यांनी अंबरला मरताना पाहिलंत... प्राजक्ता मॅडम, सर्वात मोठं पाप तर तुम्हीच केलंत. प्रेमात विश्वासघात...

तुम्ही सर्वांनी प्लॅन करून अंबरला मारलंत. पण अंबरच्या कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्याने तुमचा घात केला. तुम्ही सगळे माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. लोभ आणि वासना यांमुळे तुमचं शरीरच नाही तर तुमचा आत्माही विटाळला आहे. या रॉकीला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळाली. आता मी प्रयत्न करेन की तुम्हा दोघांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी..."

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, March 24, 2026

तिसरा डोळा (पहिला भाग)...


संध्याकाळचे साडेपाच वाजत आले होते. एका बाजूने एक टोईंग व्हॅन लॅबच्या गेटजवळ पोहोचली तर दुसऱ्या बाजूने आनंद रिक्शातून उतरत होता. आनंदला रिक्शातून बाहेर येताना पाहून प्रधान म्हणाले, “हे काय... आनंद, तुझी बाईक कुठे आहे...” आनंद काही बोलणार तोच त्याने टोईंग व्हॅन पाहिली. मग प्रधानांकडे पाहत म्हणाला, “सर, ही टोईंग व्हॅन, तो ट्रक...” ते दोघं अजून काही बोलणार इतक्यात उमाचं लक्ष लॅबच्या बिल्डिंगकडे गेलं. ती म्हणाली, “सर, लॅबमध्ये अंधार दिसतोय... या वेळी लॅबमध्ये अंधार...” प्रधान, आनंद आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं आणि लॅबकडे वळले. लॅबच्या दाराचा सेन्सर निकामी झाला होता. त्यामुळे दार उघडत नव्हतं. प्रधानांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार उघडलं नाही. त्यांनी आनंदला इशारा केला. आनंद आणि प्रधानांनी लाथा हाणून दार उघडलं. आता अंधार होता. सगळी उपकरणं बंद होती. ए. सी. पण बंद होता. उमाने लाईट लावण्याचा प्रयत्न केला पण लाईट लागले नाहीत. प्रधानांनी आनंदला फ्यूज तपासायला पाठवलं आणि टॉर्च सुरू करून प्रधान व उमाने तिथली पाहणी केली. एका दाराजवळ डॉ. गोखले जमिनीवर पडले होते...

बारा तासांपूर्वी...
 
“आशू... अरे लवकर ये की खाली...” गाडीचा हॉर्न वाजवत यतीन ओरडत होता. गाडीत बसलेले रिया, सारिका आणि वरुण, सारखं घड्याळ बघत होते. चेहेऱ्यावर आठ्या आणत सारिका म्हणाली, “तरी मी कालच सांगत होते, ट्रेनने जाऊ. पण या यतीनला नवीन गाडीचा शो ऑफ करायचा होता ना...” सारिकाला दुजोरा देत वरुण म्हणाला, “आता या लेटलतीफ आशूमुळे उगाच उशीर होणार. ट्रॅफिक नाही लागला म्हणजे मिळवलं...” दोघांनाही थांबवत रिया म्हणाली, “उगाच काहीतरी बोलू नका. काही उशीर होत नाही. अरे आशूला आपण काल रात्री कळवलं. इतक्या उशीरा कळवून तो यायला तयार झाला तर त्याला वेळ द्या की...” रियापुढे हात जोडत सारिका आणि वरुण दोघं एका सुरात म्हणाले, “सॉरी मॅडम, तुमच्या आशूबद्दल आम्ही तक्रार केली...” हे ऐकून तिघांमध्ये हशा पिकला. इतक्यात समोरून आशू येताना दिसला. त्याला पाहून यतीन म्हणाला, “काय रे... लेट का आलास... अजून एक मिनीट, आणि आम्ही तुला सोडून निघून गेलो असतो...” यतीनला टाळी देत रियाकडे पाहत आशू म्हणाला, “असं कसं जाल... मेरी जान तो आपकी गाडी में है...” हे ऐकून रिया लाजली. आशू आणि यतीन गाडीत बसले. मुली म्हणाल्या, “इट्स पिकनिक टाईम...” मुलं म्हणाली, “चलो भिवपुरी...” आणि गाडी निघाली...
 
थोड्याच वेळात गाडी एका वाटेजवळ थांबली. गाडी बंद करत यतीन म्हणाला, "चला, इथून जरा वॉकी-टॉकी करत जाऊ..." त्यावर सारिका म्हणाली, "म्हणजे आता चालायचं... काय यार... यापेक्षा छानपैकी अलिबागला गेलो असतो आमच्या फार्महाऊसवर..." सारिकाला टपली मारत वरुण म्हणाला, "काय गं सारिका, आत्तापासूनच नाही म्हणतेस... अगं तिथे जाऊन बघ तर सही... सूपर्ब स्पॉट आहे..." सर्वांनी आपापल्या बॅगा घेतल्या आणि चालू लागले. आशू आणि रिया सर्वांच्या मागून हातात हात घालून एकमेकांकडे पाहत हळू हळू चालले होते. त्यांना पाहून वरुण म्हणाला, "ओय लव्ह बर्ड्स... चला की लवकर लवकर... तुमच्या स्पीडने आपली इथेच, "यह शाम मस्तानी...” होईल..." वरुणच्या बोलण्यावर सगळे हसू लागले आणि आशू व रिया हात सोडून त्यांच्यात सामील झाले...
 
थोड्या पायपिटीनंतर ते सर्व एका डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले. तिथे एक छोटं हॉटेल होतं. सर्वांना भुका लागल्या होत्याच. पोटभर नाश्ता करून सर्वजण तृप्त झाले. मालकाने विचारलं, "धबधब्याकडं निघाला काय... मग असं करा, या दोन खोल्या आहेत ना, तिथे कपडे बदलून घ्या. सामान ठेवा इथेच. या दोन्ही खोल्यांचे मला हजार रुपये द्या आणि जाऊन या निवांत. थोडी चढण आहे. पण तो धबधबा सर्वांचा क्षीण घालवेल बघा... दुपारी इथेच या जेवायला..." सर्वांना हॉटेलच्या मालकाचं म्हणणं पटलं. सर्वजण रूम्समध्ये शिरले. कपडे बदलून, कॅमेरा घेऊन, बाकी सामान नीट लाऊन सर्व बाहेर पडले. रूम्स लॉक करून चाव्या वरुण आणि यतीनने सांभाळल्या. थोडी चढण गेल्यावर समोरचं दृश्य पाहून सर्वजण आनंदित झाले. एका सुंदर धबधब्यासमोर सर्वजण उभे होते. एकमेकांचे हात हातात घेऊन, ते उंचावून सर्वजण एकत्र ओरडले आणि धबधब्याकडे धावत सुटले...
 
वरुणचं त्या धबधब्याखाली एखाद्या ऋषीसारखं बसणं, यतीनचं धबधब्यातून उडी मारून बाहेर येणं, रिया आणि सारिकाचं एकमेकींवर पाणी उडवणं, आशूचं वेगवेगळे फोटो घेणं, सर्व सुरळीत चालू होतं. थोड्या वेळात आशूने रियाला इशारा केला. सर्वांच्या नजरा चुकवत आशू आणि रिया धबधब्याच्या मागच्या बाजूला असलेल्या खडकावर पाण्यात पाय सोडून बसले. हातात हात घेऊन दोघं एकमेकांशी गप्पा मारत होते. तेवढ्यात रियाच्या पायाला काहीतरी लागलं. एखादा दगड असावा म्हणून तिने अंगठ्याने ती वस्तू ढकल्याचा प्रयत्न केला. पण ती वस्तू जागची हल्ली नाही. आशूलाही ती वस्तू दिसली. पाण्याखाली मातीत ती वस्तू रुतली होती. आशूने ती वस्तू बाहेर काढली. ती वस्तू पाहून आशू आणि रिया दोघांनाही आश्चर्य वाटलं. ती वस्तू म्हणजे एक डिजिटल कॅमेरा होता...
 
आशू आणि रिया लगेच तो कॅमेरा घेऊन सर्वांकडे आले. त्यांना पाहून वरुण म्हणाला, "काय प्यार के पंछी..." आम्हाला सोडून कुठे गेला होता... " वरुणच्या पाठीवर थाप मारत यतीन म्हणाला, "जाऊ दे रे... कॉलेज संपलं की लग्न होईल त्यांचं. मग ही मजा कशी काय अनुभवतील ते..." सारिकाला रियाच्या हातात काहीतरी दिसलं. तिच्या जवळ जात सारिका म्हणाली, "रिया, लगे हाथ शॉपिंग पण केलंस की काय... हा कॅमेरा कुठून आला तुझ्याकडे... काय रे आशू, माझ्या मैत्रिणीचे नुसते फोटोच काढत होतास ना... की..." सारिकाच्या बोलण्यावर सर्वजण हसू लागले. तेव्हा आशू म्हणाला, "अरे यार, हा कॅमेरा माझा नाही. इथे धबधब्याच्या मागे सापडला रियाला..." आशूची री ओढत रिया म्हणाली, "हो ना. आम्ही बसलो तिथे पाण्यात अडकून पडला होता हा कॅमेरा..."
 
सर्वजण आशू आणि रिया भोवती गोळा झाले. आशूने कॅमेरा चालू करण्यासाठी पॉव्हरचं बटण दाबलं. पण कॅमेरा चालू झाला नाही. सारिका म्हणाली, "अरे हा खराब झाला बहुतेक. पाण्यात होता ना..." त्यावर वरुण म्हणाला, "मला वाटतं याची बॅटरी गेली असणार. ए यतीन, असाच कॅमेरा तुझाही आहे ना... त्याचा चार्जर असेल ना तुझ्याकडे..." मानेनेच होकार देत यतीन म्हणाला, "हो खाली बॅगेत आहे. चला आपण तिथे जाऊ. नाहीतरी बराच वेळ झाला आहे आपण इथे आहोत..." सर्वजण वळले तशी रिया म्हणाली, "कॅमेरा चालू करून काय करणार आहोत आपण... जर तो बिघडलाच असेल तर आपली मेहनत फुकट जाईल..." रियाच्या खांद्यावर हात ठेवत आशू म्हणाला, "अगं राणी, जर कॅमेरा सुरू झाला, तर त्यातल्या फोटो आणि व्हिडियोवरून आपल्याला खरा मालक सापडू शकतो याचा..." आशूच्या गालाला हात लावत रिया म्हणाली, "किती हुशार आहेस रे तू... म्हणून तर मला आवडतोस तू..." कॅमेऱ्यानिशी सर्वजण हळू हळू उतरत हॉटेलपर्यंत पोहोचले...
 
खोलीत गेल्या बरोब्बर यतीनने कॅमेरा चार्जिंगला लावला. कॅमेऱ्यावर चार्जिंगचा लाल दिवा पेटलेला पाहून सर्वांना आनंद झाला. वरुण म्हणाला, "आता याला जरा चार्ज होऊ देत. आपण सगळे फ्रेश होऊ, जरा पोटोबा करू मग सुरू करू कॅमेरा..." सर्वांना वरुणचं म्हणणं पटलं. फ्रेश होऊन, कपडे बदलून सर्वजण बाहेर आले. टेबलवर जेवण तयारच होतं. झुणका-भाकर, ठेचा, भजी, ताक, मिसळ, सर्वांनी जेवणावर ताव मारला. तोवर बराच वेळ निघून गेला होता. सर्वजण पुन्हा खोलीत गेले. आता कॅमेऱ्यावर हिरवा दिवा दिसत होता. कॅमेरा पूर्ण चार्ज झाला होता. वरुणने बटण दाबलं तर कॅमेरा सुरू झाला. त्यात एक व्हिडियो होता. सर्वांनी तो व्हिडियो पाहिला. रिया आणि सारिकाने आपापल्या तोंडावर हात ठेवले. वातावरण थोडं गंभीर झालं. आशू म्हणाला, "आपल्याला पोलिसांना कळवायला हवं..."
 
व्हिडियो सुरू झाला... एक मुलगा कॅमेऱ्यासमोर होता. "काय व्हियू आहे यार. ए प्राजू आपण इथे परत यायचं हं... प्राजू... अगं बोलत का नाहीस..." तो मुलगा पुढे काही बोलणार इतक्यात एक झटका लागला आणि कॅमेरा पाण्यात पडला. रेकॉर्डिंग अजून सुरू होतं. वरच्या बाजूला कोणीतरी त्या मुलाला पकडल्याचं दिसत होतं पण आवाज नीट ऐकू येत नव्हता. त्या मुलाला ढकललं गेलं. तो मुलगा पाण्यात पडला. त्याचा हात लागल्यामुळे कॅमेऱ्याची पॉझिशन हल्ली. आता कॅमेऱ्यात पाण्याखालचं दृश्य दिसत होतं. दोन हात त्या मुलाच्या गळ्याभोवती आले. तो मुलगा धडपडू लागला. काही क्षणातच तो मुलगा उघड्या डोळ्यानिशी निश्चल झाला. काही क्षण गेल्यावर एक बूट पाण्यात आला. आणि दोन हात पुन्हा त्या मुलाच्या कॉलरकडे गेले. कॉलर धरून त्या मुलाला वर उचललं गेलं. त्या मुलाचा हात कॅमेऱ्याजवळ होता. पुन्हा हाताच्या धक्क्याने कॅमेरा मागे सरकला आणि एका फटीत जाऊन बसला. त्यानंतर कॅमेऱ्यात काळोख दिसत होता. आणि थोड्या वेळात शूट बंद झालं...
 
थोड्याच वेळात सगळे धबधब्याजवळ पोहोचले. तो परिसर पाहून सचिन भारावून जात म्हणाला, “काय जागा आहे ही. इथे मित्र-मंडळींसोबत मस्त वीकेंड घालवायचा, धमाल करायची...” सचिनच्या खांद्यावर हात ठेवत आनंद म्हणाला, “साहेब, आता हे सुंदर दृश्य एक probable crime spot झालं आहे, तेव्हा त्या नजरेनेसुद्धा बघा की...” आनंद आणि सचिनकडे पाहत प्रधान म्हणाले, “आनंद, अरे सरळ विचारसारणी असलेल्या व्यक्तीच्या मनात हा परिसर पाहून असेच विचार येतात. त्यात सचिनचं काही चुकलं नाही. But you are right. Now this is a crime scene. So lets get back to work. आशू, आम्हाला दाखव तुला तो कॅमेरा कुठे सापडला...” प्रधानांचं बोलणं ऐकून आशू धबधब्याच्या उजवीकडे वळला. प्रधान, आनंद, सचिन आणि हॉटेलचा मालक त्याच्या मागे होतेच. थोडी पावलं चालल्यावर आशू धबधब्याच्या थोड्या आड, मागच्या बाजूला पोहोचला. तिथे गुडघाभर पाणी साचलेलं एक डबकं होतं आणि शेजारीच एक मोठा सपाट खडक होता...
 
त्या खडकाजवळ जात आशू म्हणाला, “सर, मी आणि रिया या दगडावर बसलो होतो पाण्यात पाय सोडून. रियाच्या पायाला काहीतरी लागलं. तिने पायाच्या अंगठ्याने ती वस्तू ढकलण्याचा प्रयत्न केला. मग तिने पाण्यात हात घालून ती वस्तू बाहेर काढली तर हा कॅमेरा हातात आला...” प्रधान पुढे सरकले आणि त्याच ठिकाणी उभे राहिले जिथे रियाला तो कॅमेरा सापडला. मग त्यांनी आनंदकडे कॅमेरा मागितला. कॅमेरा सुरू करून त्यांनी तो व्हिडियो पुन्हा सुरू केला. संपूर्ण व्हिडियो पाहून झाल्यावर त्यांनी पुन्हा तोच व्हिडियो सुरू केला. काही सेकंद गेल्यावर प्रधानांनी व्हिडियो पॉज केला. आजू-बाजूला पाहत प्रधान म्हणाले, “या व्हिडियोमध्ये स्क्रीनच्या डाव्या हाताला धबधब्याचा काही भाग दिसतो आहे. मी आता जिथे उभा आहे तीच पोझिशन आहे. इथेच त्या मुलाला धक्का लागला. आणि कॅमेरा पाण्यात पडला...” कॅमेरा बंद करून प्रधानांनी आनंदच्या हातात दिला. सचिन म्हणाला, “तो मुलगा पाण्यात पडल्यावर त्याला मारण्यात आलं. सर, जर खून झाला आहे, तर बॉडीसुद्धा कुठेतरी असायला हवी...”
 
सचिनचं म्हणणं पुढे नेत आनंद म्हणाला, “पायथ्यापासून इथपर्यंत चढणं तर कठीण आहेच. पण उतरणं त्याहून कठीण आहे. एक बॉडी घेउन खाली जाणं वाटतं तितकं सोप्पं नाही. शिवाय खाली उतरताच यांचं हॉटेल लागतं...” आनंद आणि सचिनकडे पाहून अंगठा दाखवत प्रधान म्हणाले, “You both are absolutely right. जर खून झाला आहे, तर बॉडी नक्कीच असणार. आणि इथून बॉडी हलवणं तितकंसं सोप्पं नाही म्हणजे बॉडी याच परिसरात कुठेतरी असायला हवी...” तिघांचं बोलणं ऐकून हॉटेलचा मालक म्हणाला, “साहेब, या धबधब्याच्या डाव्या बाजूला मागे एक जागा आहे. छोटी गुहाच म्हणा ना... आम्ही सगळे त्या जागेला भुताची गुहा म्हणतो. तिथून म्हणे कसले कसले आवाज येत राहतात. कोणीही जात नाही तिथे...” हॉटेल मालकाचं बोलणं ऐकून प्रधानांनी सचिन आणि आनंदला इशारा केला. दोघं पुन्हा खाली गेले. काही वेळात दोघं कुदळ आणि फावडं घेउन वर आले. सर्वजण धबधब्याच्या डाव्या बाजूकडे वळले. थोडी सपाट जामीन तिथे दिसली आणि एक छोटा बोगदाही दिसला. सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आत प्रवेश केला...
 
जागा चांगलीच अंधारी होती. प्रधान, आशू आणि हॉटेलच्या मालकाने टॉर्च सुरू केले. प्रधान आनंद आणि सचिनने सर्वत्र नजर फिरवली. एका कोपऱ्यातली माती थोडी भुसभुशीत जाणवत होती. सचिन आणि आनंदने तिथे खणायला सुरुवात केलं. थोड्याच वेळात तिथे मातीच्या आवाजाव्यतिरिक्त एक वेगळा आवाज आला. तसं दोघांनी खणणं थांबवलं आणि हातांनी माती बाजूला करू लागले. काही क्षणातच तिथे एक निळ्या रंगाचं प्लास्टिक दिसू लागलं. आनंदने प्लास्टिक हटवलं आणि समोरचं दृश्य पाहून हॉटेल मालकाचे डोळे मोठे झाले तर आशू ओरडला, "ओह शिट..." त्या निळ्या प्लास्टिकमध्ये एक सांगाडा तिथे पुरून ठेवला होता...
 
सांगाड्याकडे पाहत आशू म्हणाला, "म्हणजे त्या मुलाला तिथे मारलं आणि बॉडी इथे पुरून ठेवली..." आशूकडे पाहत सचिन म्हणाला, "मि. आशू, जोवर पूर्ण खात्री पटत नाही, तोवर कुठल्याही निष्कर्षापर्यंत येणं बरोबर नाही..." सचिनच्या खांद्यावर हात ठेवत आनंद म्हणाला, "सचिन is right आशू. त्या व्हिडियोमध्ये दिसणारा मुलगा आणि हा सांगाडा, दोन्ही एकच आहेत हे सिद्ध व्हायचं आहे अजून..." तिघांचं बोलणं ऐकून सांगाडा बघताना हॉटेलचा मालक म्हणाला, "निसर्ग पण कसा अवलिया आहे... आपल्या पोटात काय काय रहस्य दडवून ठेवलीत देव जाणे..." हॉटेल मालकाकडे पाहत प्रधान म्हणाले, "दादा, निसर्ग जितका सुंदर असतो, कधी कधी तितकाच गूढही असतो. सचिन, आनंद, आपल्यासमोर दोन घटना आहेत. एक तो व्हिडियो ज्यात एका मुलाचा खून झाल्याचं दिसतंय. आणि दुसरा हा सांगाडा. आनंद, हा सांगाडा डॉककडे घेऊन जा. सचिन, व्हिडियोत दिसणाऱ्या त्या मुलाबद्दल आपल्याकडे काही रिपोर्ट आहे का ते तपास... मूव्ह..."
 
लॅबमध्ये डॉ. गोखले, प्रधान, उमा, आनंद आणि सचिन उभे होते. डॉ. गोखले म्हणाले, "प्रधानसाहेब, तुम्ही आणलेला सांगाडा पुरुषाचा आहे. टेस्टवरून समजतं की त्याचं वय साधारण २४-२५ असावं. कवटीच्या वर मागच्या बाजूला खोक पडल्याची खूण आहे. बहुतेक याचं डोकं कशावरतरी आदळलं असावं. या कवटीच्या आधारे मी एक चेहेरा बनवला आहे. हा मुलगा असा दिसत असावा..." डॉ. गोखलेंनी स्क्रीनवर दाखवलेला चेहेरा पाहून आनंद म्हणाला, "अरे, हा तर व्हिडियोमधला मुलगा, ज्याचा खून झाला..." डॉ. गोखलेंकडे पाहत सचिन म्हणाला, "डॉक्टर, याला नं बघता तुम्ही त्याचा चेहेरा कसा बनवलात..." डॉ. गोखले हसत म्हणाले, "जादू... हा... हा... हा... जोक्स अपार्ट. सचिन, प्रत्येक स्कलवर काही प्रेशर पॉईंट्स असतात. त्यानुसार तिथे कमी-जास्त स्किन असते. तशी-तशी स्किन त्या त्या पॉईंट्सवर लावली तर चेहेरा आपोआप तयार होत जातो. आधी क्लेचा वापर केला जायचा पण आता ग्राफिक्समुळे ते काम अजून सोप्पं झालं..."
 
मान हलवत प्रधानांनी सचिनला विचारलं, "सचिन, मी तुला या मुलाची माहिती काढायला सांगितलं होतं..." लॅपटॉप समोर धरत सचिन म्हणाला, "सर, या मुलाबद्दल कुठलीही मिसिंग कंप्लेंट नाही. पण याचा सोशल मीडिया अकाऊंट आहे. याचं नाव अंबर आहे. याच्या फ्रेंड लिस्टमध्ये प्राजू या  नावाशी जुळणाऱ्या तीन मुली आहेत. एक आहे प्राजक्ता निकम, दुसरी प्रज्वल शाह आणि तिसरी आहे प्राजक्ता सोनार..." हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "त्या व्हिडियोमध्ये उल्लेख झालेली प्राजू कदाचित या तिघींपैकीच असावी. सचिन, आनंद, तुम्ही दोघं या तीनही मुलींची चौकशी करा. उमा, आपण या अंबरच्या घराला भेट देऊ. इतका काळ त्या घरातून एक मुलगा नाहीसा झाला आहे आणि त्यांनी मिसिंग कम्प्लेंट का नाही दिली याचं कारण विचारू..."
 
थोड्या वेळात उमा आणि प्रधान एका घरासमोर उभे होते. बेल वाजवताच एका प्रौढ महिलेने दार उघडलं. तिला आय.डी. कार्ड दाखवत, नमस्कार करत उमा म्हणाली, "नमस्कार. मी सब-इन्स्पेक्टर उमा. आणि हे माझे वरिष्ठ, सीनियर इन्स्पेक्टर प्रधान..." दोघांना नमस्कार करताना त्या महिलेच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. पुढे होत प्रधान म्हणाले, "आम्हाला अंबरबद्दल थोडं बोलायचं आहे..." त्या महिलेने दोघांना आत बोलावलं. दोघं सोफ्यावर बसले आणि ती महिला आत गेली. काही क्षणात अजून एक वृद्ध माणूस त्या महिलेसोबत बाहेर आला. त्याच्या चेहेऱ्यावर त्रासिक भाव होते. उमा आणि प्रधानांकडे पाहत तो म्हणाला, "मी जनार्दन, आणि ही ललिता. अंबर आमचा मुलगा आहे..."
 
हे ऐकून उमा आणि प्रधान एकमेकांकडे पाहू लागले. दोघंही उठून उभे राहिले आणि त्या वृद्ध जोडप्याला खाली बसवत उमा म्हणाली, "तुम्ही दोघं जरा बसा. खरंतर आम्ही तुम्हाला एक बातमी द्यायला आलो आहोत. बातमी तशी वाईट आहे जनार्दन साहेब..." इतकं बोलून उमाने प्रधानांकडे पाहिलं. जनार्दनच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "मि. जनार्दन, तुमचा मुलगा अंबर आता या जगात नाही..." हे ऐकल्याबरोबर जनार्दन जागेवरच उठून उभे राहिले आणि धक्का बसलेल्या आवाजात म्हणाले, "काय... अहो काय बोलताय काय तुम्ही..." ललिता पुढे येत म्हणाल्या, "जीभ कशी झडली नाही तुमची असं अभद्र काहीतरी बोलताना..." प्रधान पुढे काही बोलणार इतक्यात आतून एका महिलेचा आवाज आला, "काय झालं बाबा... कोण आलं आहे..." बोलत बोलत एक मुलगी बाहेर आली. आणि प्रधान व आनंदला नमस्कार करून त्या वृद्ध जोडप्याजवळ उभी राहिली. प्रधानांनी नमस्कार करून तिची ओळख विचारली. ती मुलगी म्हणाली, "मी तारा. अंबरची बायको..."
 
हे ऐकताच प्रधान आणि उमाने एकमेकांकडे पाहिलं. मि. जनार्दन ताराला म्हणाले, "हे लोक पोलीस ऑफिसर्स आहेत. हे सांगत आहेत आपला अंबर या जगात नाही..." हे ऐकताच त्रासिक चेहेरा करून तारा म्हणाली, "Are you both out of your mind officers... तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का..." उमा पुढे होत म्हणाली, "मॅडम शांत व्हा. ऐकून घ्या माझं. आम्हाला हा व्हिडियो कॅमेरा सापडला आहे. हा अंबरचाच आहे ना..." व्हिडियो कॅमेरा पाहताच ताराने तो हातात घेतला आणि म्हणाली, "हा कॅमेरा... हा तर मी अंबरला गिफ्ट दिला होता... हा कुठे मिळाला तुम्हाला..." कॅमेरा पुन्हा हातात घेत प्रधान म्हणाले, "मॅडम, हा कॅमेरा जिथे मिळाला, तिथून जवळच आम्हाला एक सांगाडा सापडला आहे. आणि प्राथमिक तपासणीनंतर तो सांगाडा अंबरचा आहे असं समजलं आहे..." प्रधानांचं बोलणं पूर्ण होतं त्या आधीच ताराला भोवळ आली आणि ती जमिनीवर कोसळली...
 
अंबरला समोर पाहून उमा आणि प्रधान आश्चर्यचकित झाले. पुढे होत जनार्दन म्हणाले, "अरे अंबर... आलास तू... आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. हे पोलीस ऑफिसर्स तुझ्याबद्दल वाट्टेल ते सांगत आहेत बघ..." हे ऐकून अंबरने प्रधान व उमाकडे पाहिलं. उमा म्हणाली, "मि. अंबर, खरंतर आम्ही इथे तुम्ही गेल्याची बातमी द्यायला आलो होतो. पण तुम्हाला जिवंत पाहून आता आम्हीच चक्रवलो आहोत..." हे ऐकून अंबरच्या कपाळावर आठ्या आल्या. त्रासिक चेहेऱ्याने तो म्हणाला, "काय... मी मेलो... सकाळी सकाळी मला हेच ऐकायचं होतं... मी तुमच्यासमोर धडधाकट आहे... तरी तुम्हाला अजून शंका आहे का... माझे डॉक्युमेंट्स दाखवू का तुम्हाला..." हे ऐकून प्रधान पुढे झाले आणि म्हणाले, "शांत व्हा मि. अंबर. हे बघा आम्हाला एका ठिकाणी एक प्रेत मिळालं. त्यासोबत सापडलेल्या गोष्टींवरून ते प्रेत तुमचं असावं हा अंदाज केला आम्ही. पण आता तुम्हाला भेटून सगळा खुलासा झाला आहे. वी आर सॉरी. आम्ही निघतो. आणि हो, तुमच्या मृत्यूची बातमी ऐकून तुमच्या बायकोला, ताराला जरा धक्का बसला आहे. काळजी घ्या त्यांची..." इतकं बोलून प्रधान आणि उमा तिथून बाहेर पडले...
 
नवल वाटून उमा म्हणाली, "सर, हे काय गौडबंगाल आहे... आपण त्या अंबरला मृत समजत होतो. पण अंबर तर जिवंत आहे. मग ती मेलेली व्यक्ती कोण असावी..." हनवटी चोळत प्रधान म्हणाले, "कदाचित खूनी स्वतः... आपण व्हिडियोमध्ये पाहिलं, की कोणीतरी अंबरला पाण्यातून बाहेर काढलं. में बी बाहेर आल्यामुळे अंबरला शुद्ध आली असेल आणि त्याने प्रतिकार केला असेल..." प्रधानांचं म्हणणं पुढे नेत उमा म्हणाली, "आणि त्या प्रतिकारात तो खुनीच मारला गेला. मग घाबरून अंबरनेच त्याचं प्रेत तिथे गुहेत गाडलं..." उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, "Quite a possibility उमा. पण बॉडी मिळाली आहे म्हणजे खून नक्कीच झाला आहे. नक्की कोण विक्टिम आहे ते शोधायला हवं आपल्याला. या अंबरने सेल्फ-डिफेन्समध्ये खून केला असेल खरा. पण बॉडी लपवून आणि पळून जाऊन त्याने गुन्हा केला आहे. त्यासाठी शिक्षा होईल त्याला. आपल्याला पुरावे लागतील. सर्वात आधी आपण डॉककडे जाऊ. त्या सांगाड्याकडून डोकने अजून काही माहिती मिळवली आहे का ते समजेल. शिवाय नेमका अंबरचाच चेहेरा त्याने कसा बनवला तेही कळेल..."
 
हे सगळं होत असताना लॅबवर आनंद आणि सचिन बोलत होते. सचिन म्हणाला, "सर, या तीनही मुलींची नावं तर मिळाली. पण त्यांना शोधायचं कसं... पत्ता तर नाही इथे..." आनंद प्रोफाइलमधले फोटो पाहत होता. एका फोटोवर बोट ठेवत तो म्हणाला, "सचिन, हा फोटो प्रज्वल शाहच्या घराच्या गॅलरीतून काढलेला दिसतो. हा कठडा आहे गॅलरीचा. इथे मागे एका थेटरचा आणि बाजूला असलेल्या बँकेचा बोर्ड दिसतोय. सायन... सायन आहे हे..." आनंदला फोटो बघताना पाहून सचिननेही बाकी दोघींच्या प्रोफाइल्समध्ये डोकावलं. आनंदकडे पाहत सचिन म्हणाला, "सर, प्राजक्ता निकमच्या प्रोफाइलमध्ये न्यूझीलंडचा उल्लेख आहे. भारतातले कुठलेही फोटो दिसत नाहीत. पण या प्राजक्ता सोनारच्या काही फोटोमध्ये माहीमचा एरिया दिसत आहे. हे माहीम रेल्वे स्टेशन आणि हे माहीम चर्च..." आनंद आणि सचिनने एकमेकांकडे पाहिलं. दोघांनी माना हलवल्या आणि लॅबमधून बाहेर पडले. आनंद सायनच्या दिशेने गेला तर सचिनने माहीमची वाट धरली... 
 
लोकेशन शोधत आनंद प्रज्वल शाहच्या घराजवळ पोहोचला. दार उघडंच होतं आणि एक मुलगी फुलझाडांना पाणी घालत होती. आनंद तिच्याजवळ गेला. स्वत:चं आय.डी. कार्ड तिला दाखवत आनंदने स्वत:ची ओळख करून दिली आणि तिला विचारलं, “प्रज्वल शाह... ” तिने होकार देताच आनंदने अंबरचा फोटो बाहेर काढला आणि प्रज्वलला दाखवला. फोटोकडे पाहत प्रज्वल म्हणाली, “सर, हा मुलगा माझ्या प्रोफाईल लिस्टमध्ये आहे. पण फारशी ओळख नाही. लाईक आणि कॉमेंट्स, इतकीच मैत्री आहे आमची...” प्रज्वलला धन्यवाद देऊन आनंद तिथून बाहेर पडलाच होता, इतक्यात त्याचा फोन वाजला. पलिकडे डॉ. गोखले होते. फोन उचलत आनंद म्हणाला, "बोला डॉक्टर... आत्ता... ठिक आहे मी सरांना कळवतो. अच्छा तुम्ही कळवलं का त्यांना. ओके. डॉक्टर तुमच्या आवाजाला काय झालं... ओके ओके. मी येतो..." कॉल कट झाला. आनंदला शंका आली. तो म्हणाला, “काहीतरी गडबड आहे... डॉक्टर गोखले मला थेट कॉल करत नाहीत. आधी सरांना करतात...” बोलत बोलत आनंदने पुन्हा डॉ. गोखलेंना कॉल लावला पण कॉल लागला नाही. आनंदने लगेच प्रधानांना कॉल लावला...
 
“सर आनंद बोलतोय. आत्ता मला डॉ. गोखलेंचा फोन आला... हो, मलाही शंका आली. त्यांनी मला लॅबवर बोलावलं... माहीत नाही सर, कॉल कट झाला. मी त्यांना पुन्हा फोन लावला. पण त्यांनी उत्तर दिलं नाही. सर कुठेतरी पाणी मुरतंय. येस सर. मी लगेच पोहोचतो लॅबला...” आनंद डॉ. गोखलेंच्या लॅबकडे निघाला. सिग्नल येताच आनंदने बाईक स्लो करून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात मागून येणाऱ्या एका व्हॅनने आनंदच्या बाईकला धडक दिली. आनंदची बाईक सिग्नल क्रॉस करत पुढे गेली. तो मागे बघणार तेवढ्यात भरधाव वेगाने एक ट्रक आनंदकडेच येताना दिसला. आनंद लगेच बाईकपासून बाजूला झाला आणि ट्रक बाईकला उडवत पुढे निघून गेला. आनंदने ती व्हॅन पाहिली, तर तीसुद्धा यू टर्न मारून पसार झाली. आनंदने लगेच रिक्शा पकडली आणि डॉ. गोखलेच्या लॅबकडे रवाना झाला...
 
तिकडे अंबरच्या घरातून उमा आणि प्रधान बाहेर पडून मुख्य रस्त्याला लागले होते. तेवढ्यात प्रधानांचा फोन वाजला, “हां डॉक... हो आम्ही आता लॅबकडेच यायला निघालो आहोत. डॉक, तुमचा आवाज वेगळा वाटतोय... अच्छा ओके...” फोन ठेवत उमाकडे पाहत प्रधान म्हणाले, “उमा, काहीतरी गडबड आहे. डॉकचा आवाज नेहमीसारखा नव्हता. आपण लवकरात लवकर तिथे पोहोचू...” ते बोलतच होते, की त्यांचा फोन पुन्हा वाजला. या वेळी पलिकडे आनंद होता, "हां बोल आनंद... काय... तुलापण फोन केला... स्ट्रेंज... अरे मलाही कॉल आला त्यांचा. लॅबमध्ये बोलावलं आहे त्यांनी अर्जंट... में बी. आम्हीही पोहोचतो तिथे. तूही ये लवकर..." फोन ठेवत प्रधान म्हणाले, "आनंदला डॉकचा फोन आला. त्याने आनंदला लॅबला बोलावलं आहे. आनंद डॉककडे निघाला आहे. आपणही जाऊ तिथे. सचिनला कॉल करून डायरेक्ट डॉककडे यायला सांग... लेट्स गो..."
 
प्रधान आणि उमा जीपने लॅबकडे निघाले. उमा सचिनला फोन लावत होती. बेल वाजत होती पण सचिन फोन घेत नव्हता. प्रधानांकडे पाहत उमा म्हणाली, "सचिन कॉल रिसीव्ह करत नाहीये. पण सर, डॉ. गोखलेंनी आनंद सरांना डायरेक्ट कॉल लावला नव्हता कधी..." आपली नजर रस्त्याकडे ठेवत प्रधान म्हणाले, "तेच तर समजत नाही. एरवी मला आधी कॉल येतो आणि मी तुम्हा सर्वांना सांगतो. आज असं काय घडलं असावं..." प्रधानांच्या जीपसमोर एक ट्रक चालला होता. ट्रकने वेग वाढवला. प्रधानांनीसुद्धा जीपचा वेग थोडा वाढवला आणि साईड द्यायला ते हॉर्न वाजवू लागले. तो ट्रक डाव्या बाजूला वळला आणि प्रधानांनी उजव्या बाजूने जीप पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अचानक समोरच, भर रस्त्यात सळ्यांनी भरलेला एक ट्रक उभा दिसला. ट्रक असा वाटेतच उभा पाहून प्रधानांनी ब्रेक मारला. पण जीपचा वेग हवा तितका कमी झाला नाही. उमाकडे पाहत ते म्हणाले, "उमा, वी नीड टू जंप आऊट नाव... जंप..."
 
उमा आणि प्रधानांनी जीपच्या दोन्ही दारातून उड्या घेतल्या. जीप थेट त्या सळ्या भरलेल्या ट्रकमध्ये घुसली. जीपच्या समोरच्या काचा फोडून सळ्या पार जीपच्या मागून बाहेर आल्या. प्रधान आणि उमा तबडतोब उठले आणि मगाचच्या ट्रककडे पाहू लागले. तो ट्रक वेग वाढवून पुढे जात नाहीसा झाला. प्रधान म्हणाले, "त्या ट्रकने आपल्याला जाणून-बुजून साईड दिली म्हणजे आपण या उभ्या असलेल्या ट्रकवर आदळू. नाहीतर हा ट्रक असा भर रस्त्यात का उभा करेल कोणी... ट्रकच्या आजू-बाजूला दगड रचलेले दिसत नाहीत जेणेकरून ट्रक बंद पडला आहे, हे समजावं. म्हणजे हा ट्रक इथे मुद्दाम उभा केला गेला होता. आपल्या समोरून धावणारा तो ट्रकसुद्धा मुद्दामच आपल्या समोरून हटला. इट वॉज अ ट्रॅप..." उमा म्हणाली, "आपल्या जीपचा ऍक्सीडेन्ट घडवून आणला गेलाय सर..." दोघं बोलत असताना तिथे गर्दी जमा झाली. जवळच्या सिग्नलवरून एक ट्रॅफिक हवालदारसुद्धा तिथे आला आणि प्रधान व उमाला सेल्यूट करून उभा राहिला. प्रधानांनी हवालदाराला सांगून गर्दी पांगवली, ट्रॅफिकसुद्धा हटवला गेला. मग टोईंग व्हॅनची व्यवस्था करून जीप आणि तो ट्रक घेऊन प्रधान व उमा लॅबकडे निघाले...
 
आत्ताच्या घडीला...
 
प्रधान आणि उमा दोघं डॉ. गोखलेंजवळ गेले. उमाने पाणी आणलं आणि डॉ. गोखलेंच्या चेहेऱ्यावर थोडे हपके मारले. डॉ. गोखले शुद्धीवर येऊ लागले तसं उमा आणि प्रधान दोघांनी त्यांना उठायला मदत केली. डॉ. गोखलेंना खुर्चीत बसवण्यात आलं. त्यांच्या गालाला हात लावत, थोडं हलवत प्रधान म्हणाले, “डॉक शुद्धीवर या... डॉक...” तेवढ्यात आनंद सांगत आला, “बहुतेक शॉर्ट सर्किट झालं. फ्यूज बिघडला आहे. दाराला सेन्सर असल्याने ते उघडलं नाही. मी इलेक्टरीशियनला बोलावलं आहे... पण हे काय, डॉक्टर गोखलेंना काय झालं...” डॉ. गोखलेंनी डोळे किलकिले केले. समोर प्रधान, आनंद आणि उमा उभे होते. डॉक्टर खुर्चीत सावरून बसले आणि उमाने दिलेलं पाणी त्यांनी प्यायलं. थोडं स्थावर झाल्यावर ते बोलू लागले, “सगळं अचानक घडलं. मी अंबरची बॉडी तपासण्यात गुंतलो होतो. तेवढ्यात बाहेरून एक अनोळखी माणूस दाराकडे येताना दिसला. पेहेरावावरून तो कुरियरवाला दिसत होता. त्याने मला एक पाकीट दिलं आणि माझी सही मागितली. त्याच्या हातून पेन घेताच मला एक झटका लागला. मी मागे झालो आणि पेन माझ्या हातून निसटलं. दुसऱ्याच क्षणी त्या माणसाने माझ्या डोक्यात मारलं. मी खाली पडलो. शुद्ध जाण्याआधी तो माणूस सगळीकडे फिरून सगळं अस्ताव्यस्त करत होता हे अंधूकसं दिसलं. पुढे काही...”

डॉ. गोखले गप्प झाले. आनंद म्हणाला, “म्हणजे मला जो कॉल आला, तो तुम्ही केला नसून त्या कुरियरवाल्याने केला होता...” त्यावर उमा म्हणाली, “वायरिंगमध्ये बिघाड करून इथे आग लावण्याचा त्याचा मानसूबा असणार. सगळं काही उधळून डॉक्टरांना इथेच सोडून त्याने पळ काढला. याचा अर्थ तो डॉक्टरांना मारायला आला होता. पण इथल्या इलेक्ट्रिक सिस्टीममुळे तो बेत फसला. आनंद सर, तुम्हाला इथे का बोलावलं असावं त्याने...” आनंद म्हणाला, “त्याने मला इथे बोलावलं नाही, तर लॅबच्या रस्त्यावर यायला भाग पाडलं म्हणजे तो अपघात घडवून आणता येईल...” हे सगळं बोलणं सुरू असताना डॉ. गोखले म्हणाले, “आपण सगळे इथे आहोत. पण सचिन कुठे आहे...” डॉक्टरांच्या या शंकेवर सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. उमा म्हणाली, "सर, सचिन अजून कॉल उचलत नाही. मला तर काळजी वाटते आहे..." उमा अजून काही बोलणार तेवढ्यात, "मी इथे आहे सर..."

दारातून आलेल्या आवाजाकडे सर्वांनी पाहिलं. एका माणसाच्या कॉलरला धरून सचिन दारात उभा होता. सचिनचे कपडे मळलेले आणि ठिक-ठिकाणी फाटलेले होते. आनंदने त्याला विचारलं, "सचिन, ही काय अवस्था तुझी... आणि हा कोण..." सचिनने त्या माणसाच्या हातात बेड्या ठोकल्या आणि त्याला खुर्चीत बसवलं. तो गया-वया करत होता पण सचिनने ऐकलं नाही. बेड्यांचं दुसरं टोक त्याने खुर्चीला बांधलं आणि सर्वांपुढे येऊन उभा राहत बोलायला सुरुवात केली, "सर, त्या प्राजक्ता सोनारला भेटून मी चौकीकडे निघालो. मला डॉ. गोखलेंचा कॉल आला. त्यांचा आवाजही बादलेला वाटला. मी लगेच बाईक लॅबकडे वळवली. वाटेत एक जीप आणि तीन-चार बाईकर्स हुल्लडबाजी करत जात होते. जीप एकदम माझ्या बाईकजवळ आली. मी थोडा बाजूला झालो तर तिथून चालेल्या एका मुलीच्या स्कूटरला माझ्या बाईकचा थोडा धक्का लागला. तिचा तोल गेला पण तिने लगेच सावरलं. मी बाईक बाजूला लाऊन तिला मदत करायला गेलो तर ती माझ्यावर ओरडू लागली. हे पाहून ती जीप आणि त्या बाईक्स थांबल्या आणि सगळे आमच्या भोवती गोळा झाले...

प्रधानांच्या हातात असलेल्या या कॅमेऱ्यातलं हे दृश्य आनंद, उमा आणि सचिनने पाहिलं. समोर आशूसह बाकी चारही जण उभे होते. आशू म्हणाला, "पाहिलंत सर... म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला..." कॅमेरा आनंदकडे देत प्रधान म्हणाले, "या व्हिडियो फाईलची तारीख तीन महिन्यापूर्वीची आहे. म्हणजे तिथे वर जे काही घडलं, ते तीन महिन्यापूर्वी घडलं..." मग प्रधानांनी आशूकडे पाहिलं आणि म्हणाले, "हा कॅमेरा जिथे सापडला, ती जागा दाखवू शकतोस तू..." हॉटेलच्या मालकालाही प्रधानांनी वर येण्याची विनंती केली. मालकाने आणि आशूने होकार देताच उमाकडे वळत प्रधान म्हणाले, "मी, सचिन आणि आनंद, ती जागा पाहून येतो जिथे हा कॅमेरा सापडला. तोवर तू इथे चौकशी कर. आणि हो, या मुलींची काळजी घे. घाबरलेल्या दिसतात. लेट्स गो..."

उमा आणि प्रधानांनी ताराला तिच्या खोलीत नेलं. मागे जनार्दन आणि ललिता होतेच. ताराला बेडवर ठेऊन सर्वजण बाहेर आले. जनार्दनच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "आपलं माणूस गेल्याचं दुःख मी समजू शकतो मि. जनार्दन, पण मला एक समजलं नाही, तीन महिने तुमचा मुलगा गायब आहे आणि तुम्ही काहीच केलं नाहीत..." हे ऐकून जनार्दन चक्रावले. डोळ्यांवरचा चष्मा काढत ते म्हणाले, "तीन महिने... हे अशक्य आहे... अहो काल रात्रीच तर अंबर याच घरातून नाईट शिफ्टसाठी बाहेर पडला..." आता धक्का बसण्याची पाळी प्रधान व उमावर होती. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. उमा काही बोलणार इतक्यात दारातून आवाज आला, "हॅलो एव्हरीवन..." सर्वांनी दाराकडे पाहिलं तर समोर अंबर उभा होता...

हा पकडलेला माणूस जीप चालवत होता. त्याने त्या बाईला विचारलं तर ती म्हणाली मी तिची छेड काढतो आहे. हे ऐकून सर्वांनी माझ्यावर हल्ला चढवला. मला लाथा-बुक्क्यांनी मारू लागले. त्या गडबडीत ती बाई स्कूटर घेऊन निघून गेली. मी लगेच माझं सर्व्हिस रिवॉलव्हर काढून हवेत फायर केलं. त्यासरशी ती सगळी माणसं आपापल्या गाड्या तिथेच टाकून पळाली. हा माणूस माझ्या हाती लागला. मी त्याला धरलं. तिथे एक पोलीस जीप आली. त्यांनी मला ओळखलं आणि माझी इथे येण्याची व्यवस्था केली. या गडबडीत माझा फोन खराब होऊन बंद झाला. सर, त्या निघून गेलेल्या बाईचा चेहेरा झाकलेला होता. तिच्या स्कूटरचा नंबर मी पाहून ठेवला आहे. आणि सर मला मारहाण करणारी माणसं त्या बाईला सामील असणार. नाहीतर तिची स्कूटर ज्या ठिकाणी होती, तिथेच का ती जीप माझ्या बाईकजवळ आली..."

क्रमश:..