Sunday, March 29, 2026

तिसरा डोळा (दुसरा आणि शेवटचा भाग)...

पहिल्या भागात...

पाच जणं भिवपुरीला ट्रीपसाठी जातात. तिथे धबधब्याजवळ त्यांना एक व्हिडियो कॅमेरा सापडतो. त्यात एक व्हिडियो असतो ज्यात एका मुलाचा खून होतानाचा एक व्हिडियो असतो आणि तारीख तीन महिन्यापूर्वीची असते. पोलिसांना बोलावलं जातं. प्रधान, आनंद, उमा आणि सचिन तो व्हिडियो बघतात. खून झाला ती जागा पाहण्यासाठी प्रधान, आनंद, सचिन, आणि दोघंजण धबधब्याकडे जातात. उमा खाली राहून मुलींची काळजी घेते...

सर्वांना धबधब्याजवळ ती व्हिडियोमधली जागा सापडते. मग त्या जागेचा अजून शोध घेत त्यांना एका गुहेत एक सांगाडा सापडतो. व्हिडियोतल्या मुलाचं नाव अंबर आहे आणि त्यात उल्लेख झालेल्या प्राजू या नावाशी तीन मुली जुळत आहेत या गोष्टी सचिन शोधून काढतो. कवटीवर प्रेशर पॉईंट्सनुसार स्कीन लावत डॉ. गोखले अंबरचाच चेहेरा बनवतात. प्रधान आणि उमा अंबरच्या घरच्यांना अंबर गेल्याची बातमी देत असताना स्वत: अंबर दारात उभा ठाकतो...

अंबरची माफी मागून प्रधान आणि उमा बाहेर पडतात. अचानक रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकवर त्यांची जीप आदळणार असते पंण ते दोघं वाचतात. दुसरीकडे आनंद सायनला तर सचिन माहीमला चौकशीसाठी गेलेले असतात. परत येताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली जाण्यापासून आनंद बचावतो. प्रधान, उमा आणि आनंद बोलत असताना त्यांना समजतं, डॉ. गोखलेंच्या लॅबमधून प्रधान आणि आनंदला कॉल आलेला असतो. डॉ. गोखलेंवरही हल्ला झालेला असतो. सगळे लॅबमध्ये बोलत असताना सचिन तिथे एका माणसाला पकडून येतो. तोसुद्धा फोन आल्याचं सांगतो...

आता पुढे...

प्रधान सगळं ऐकत होते. ते म्हणाले, "डॉकच्या लॅबमधून मला कॉल येतो. मी आणि उमा लॅबकडे यायला निघतो. रस्त्यावर उभ्या ट्रकला आमची जीप धडकणार अशी व्यवस्था केली जाते. पण आम्ही त्यातून थोडक्यात बचावतो..." त्यावर सचिन म्हणाला, "माझ्या बाईकला डॉज करणारी ती जीप मुद्दाम त्याच ठिकाणी आडवी आली जेणेकरून तिथे भांडण आणि मग हाणामारी होईल ज्यात कदाचित मला..." सचिनचं बोलणं पूर्ण होतं नं होतं तोच आनंद म्हणाला, "माझ्या बाईकलाही मागून त्याच वेळी टक्कर मारली गेली जेव्हा बाजूने येणाऱ्या ट्रकच्या टप्प्यात मी आलो... बाईकचा चेंदामेंदा झाला पण मी वाचलो..." यावर डॉक्टर गोखले म्हणाले, "आणि इथे लॅबमध्ये तो कुरियरवाला... लॅबमध्ये शॉर्ट सर्किट घडवून आग लावण्याचा त्याचा प्लॅन होता..." प्रधानांकडे पाहत उमा म्हणाली, "अशा विचित्र घटना आपल्या सगळ्यांसोबत घडल्या... काय अर्थ असावा या सगळ्याचा..."

"I think there is a pattern... या सगळ्या घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा हेतू एकच होता. आपल्याला जिवे मारायचं, किंवा हॉस्पिटलाईझ करायचं..." "कोण करत असेल हे..." उमाने शंका विचारली. आनंद म्हणाला, "सर सध्या आपल्याकडे तीन केसेस आहेत. एक त्या आमदाराविरुद्धची केस, एक अंबर मर्डर केस आणि एक बँक दरोड्याची केस... यापैकी कोणी..." आनंदचं म्हणणं पुढे नेत सचिन म्हणाला, "आपल्याला या केसेसमधून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे का... तसं असेल तर या मागे तो आमदारच असावा असं वाटतं मला..." डॉ. गोखले खुर्चीतून उठले आणि म्हणाले, "नाही सचिन... तो आमदार आणि ते दरोडा घालणारे यात नसावेत. नाहीतर लॅबवर का हल्ला झाला... मला वाटतं अंबर मर्डर केसचे गुन्हेगार हे सगळं करवत आहेत..." डॉ. गोखलेंकडे पाहत प्रधान म्हणाले, "Doc. is right... अंबरच्या केसशी संबंधित असलेलं कोणीतरी हे करत असणार... त्यांचा एक डाव फसला आहे. आता मला नाही वाटत ते इतक्या झटकन पुन्हा डोकं वर काढतील... Now we should get them..."

"सर पण आता पुढे कसं आणि कुठून जायचं... आपल्याला आधी वाटलं होतं मेलेली व्यक्ती अंबर आहे. पण अंबर तर प्रत्यक्षात समोरच आला आपल्या..." उमाने विचारलेल्या या प्रश्नावर सचिन म्हणाला, "हो ना... त्यामुळे आपण जिथून सुरुवात केली, तिथेच येऊन पोहोचलो... No further clue..." सचिनच्या खांद्यावर हात ठेवत आनंद म्हणाला, "सचिन, do not say it again... गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचे सगळे रस्ते बंद झाले, असं कधीच होत नाही. एक मार्ग बंद झाला की दुसरा मार्ग उघडतो. फक्त आपल्याला तो शोधावा लागतो..." आनंदकडे बोट दाखवत प्रधान म्हणाले, "Bang on आनंद... एकदम बरोबर आहे तुझं. आत्तापर्यंतच्या तपासात खुल्या झालेल्या तीन नव्या मार्गांकडे लक्षच गेलं नाही आपलं..." सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांकडे पाहत प्रधान पुन्हा म्हणाले, "हो... तीन नावे मार्ग... एक आहे ती डेड बॉडी. दुसरा आहे तो माणूस ज्याला सचिनने पकडलं आणि तिसरा म्हणजे हा नवा अंबर..."

हे ऐकून सर्वांच्या चेहेऱ्यांवर आनंदाची लकेर उमटली. डॉ. गोखले म्हणाले, "जर ती बॉडी खऱ्या अंबरची असेल, तर हा जो घरी होता, तो तोतया असणार..." उमा म्हणाली, "आणि जर तो खरा अंबर असेल, तर मेलेली व्यक्ती दुसरीच कोणीतरी आहे..." यावर सचिन म्हणाला, "आपल्या सर्वांवर झालेल्या हाल्ल्यामध्ये तो एकमेव माणूस माझ्या हाती लागला. त्याला बोलतं करू आपण..." यावर डॉ. गोखले म्हणाले, "लॅबमधला सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बंद होण्याआधी तो जो कोणी इथे आला होता, तो कॅमेऱ्यात आलाच असणार..." हे सर्व ऐकून जरा विचार करत प्रधान म्हणाले, "डॉक, मिळालेल्या सांगाड्यामध्ये अजून काही मिळतंय का बघा... सचिन, आनंद, तुम्ही त्या पकडलेल्या माणसाला बोलतं करा आणि इथल्या सी.सी.टी.व्ही.चं फुटेज मिळवा. मी आणि उमा, या अंबरबद्दल चौकशी करतो. त्याच्या ऑफिस आणि घराच्या आजू-बाजूच्या परिसरात त्या जिवंत अंबरच्या नकळत चौकशी करायला हवी... लेट्स मूव्ह..."

चौकीतल्या एका खोलीत सचिनने पकडलेल्या माणसाला एका खुर्चीवर बसवलं होतं. त्याचे दोन्ही हात खुर्चीला बांधलेले होते. खोलीत दोन कॉन्स्टेबल, आनंद आणि सचिन होते. आनंदने सचिनकडे पाहिलं. सचिन त्या माणसाकडे पाहत म्हणाला, "नाव काय तुझं..." सचिनकडे रागीट नजरेने पाहत तो माणूस गप्पच होता. त्या माणसाकडे पाहत आनंद खेकसला, "काय रे... कठीण आहे का नाव... जीभ जड होते का नाव सांगताना..." त्या माणसाने आनंदकडे पाहिलं आणि म्हणाला, "रमण नाव आहे माझं... साहेब, या तुमच्या ऑफिसरने कारण नसताना मला पकडलं. रस्त्यावर झालेलं भांडण होतं ते. भांडण करणारे तर पळाले. मी फक्त भांडण बघत होतो तेव्हा यांनी धरलं मला. साहेब, सबळ पुराव्याशिवाय तुम्ही मला असं अडकवू शकत नाही. मला कोणत्या गुन्ह्यासाठी इथे आणलं ते सांगा नाही तर कायदा मलाही कळतो..."

आनंद आणि सचिनने एकमेकांकडे पाहिलं. सचिन म्हणाला, "या रमणला चौकशीसाठी आपण इथे आणलं आणि हा आपल्यालाच कायद्याचा बडगा दाखवतो आहे... वाह..." रमणच्या समोरच्या खुर्चीत बसत आनंद म्हणाला, "तर तुला कायदा समजतो... चल, आता तुझ्याशी कायद्याच्या भाषेतच बोलतो आम्ही... तुकाराम, माझ्या केबिनमध्ये जा. तिथे ड्रॉव्हरमध्ये एक पॅकेट ठेवलं आहे. ते घेऊन या..." थोड्याच वेळात हवालदार तुकाराम एक पाकीट घेऊन आले आणि आनंदच्या हातात दिलं. तोवर सचिनने रमणचे हात सोडले. पाकीट टेबलवर ठेवत आनंदने हॅन्ड ग्लोव्ज घातले आणि पाकीट उघडून त्यातली वस्तू काढून रमणसमोर धरली. रमणकडे पाहत आनंद म्हणाला, "हे जर्मन मेड पिस्तूल आहे. बिना नंबर... घे..." असं म्हणत आनंदने ते पिस्तूल रमणकडे भिरकावलं. रमणने ते पकडलं. आनंद पुढे म्हणाला, "हे पिस्तूल एका डेड बॉडीजवळ सापडलं. पिस्तुलावर ठसे नाहीत की नंबर नाही. त्यामुळे आम्ही खुन्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. ती केस बंद झाली. पण आता वाटतंय ती केस पुन्हा ओपन करावी. कारण खूनी सापडला..."

पिस्तुलाकडून सचिन आणि आनंदकडे पाहत रमण म्हणाला, "खूनी सापडला म्हणजे..." रमणच्या खांद्यावर थाप मारत सचिन म्हणाला, "अरे, या पिस्तुलावर आधी ठसे नव्हते. आता तुझ्या बोटांचे ठसे आलेत त्यावर. त्या मेलेल्या माणसाचा आणि तुझा संबंध आणि वैर आहे या दोन्ही गोष्टी सिद्ध करू आम्ही. पण आनंद सर, याला आपण कोर्टात हजर करूया प्लिज, एन्काऊंटर नका करू याचा..." हे ऐकून रमण घाबरला. पिस्तूल त्याच्या हातून गळून पडलं. आनंदने पिस्तूल उचलताच हात जोडत रमण म्हणाला, "साहेब, मी खूनी नाही हो... मी आणि माझे मित्र गर्दीत मिसळून धक्का-बुक्की करतो, तमाशे उठवतो आणि त्याचा फायदा घेऊन चोऱ्या करतो फक्त. या खुनाशी माझा काहीही संबंध नाही हो..." आनंद ताडकन उठला आणि रमणच्या कपाळाला पिस्तूल लावत म्हणाला, "मग सचिनवर हल्ला का केलात तुम्ही... सचिन तर एकटाच होता ना... आणि तिथे गर्दी पण नव्हती... बोल पटपट. नाहीतर तुला फासावर लटकवायला मला एक सेकंदसुद्धा लागणार नाही..."

रमण अजूनच घाबरला. काही क्षण गेले आणि तो म्हणाला, "साहेब, या तुमच्या ऑफिसरवर हल्ला करायला मला पैसे दिले गेले होते. मला एक फोन आला. त्या माणसाने मला पार्कमध्ये बोलावलं. तिथे एका बेंचखाली हे पाकीट होतं. मी ते उचललं. त्यात पैसे आणि या ऑफिसरचा फोटो होता. वेळ आणि जागाही एका कागदावर लिहिली होती. मी ते पाहत होतो तेव्हा पुन्हा फोन आला. त्या माणसाने सांगितलं, "काम झाल्यावर बाकी पैसे इथेच मिळतील..." आणि फोन बंद झाला. साहेब, मी फक्त तेवढंच केलं जेवढं लिहिलं होतं. ते पाकीट माझ्या या पॅन्टच्या खिशात आहे..." सचिनने रमणच्या खिशातून पाकीट बाहेर काढलं. त्यात एक कागद आणि सचिनचा फोटो होता. कागदावर लिहिलं होतं, "सकाळी, तीन हात नाका..." आनंदने ते पाकीट आणि तो कागद पाहिला. दोन्ही पाहताना त्याच्या डोळ्यात चमक होती. आनंद काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला...

पालिकडे प्रधान बोलत होते. आनंद म्हणाला, "येस सर, ओके. This is a coincidence sir. आम्हालाही तीच लीड मिळाली आहे. आम्ही तिथेच यायला निघालो आहोत..." फोन बंद करत सचिनकडे पाहत आनंद म्हणाला, "सरांचा कॉल होता. सरांनी आणि उमाने त्या दुसऱ्या अंबरच्या नकळत त्याची माहिती जमवण्याचा प्रयत्न केला. त्यांना एक लीड मिळाली आहे. आणि सचिन, योगायोग म्हणजे तीच लीड आपल्यालाही मिळाली आहे. हा कागद बघ..." सचिनने कागद नीट पाहिला मग आनंदकडे पाहत तो म्हणाला, "सर यावर तर..." आनंदने मान हलवली आणि दोघंही चौकीतून बाहेर पडले...

थोड्याच वेळात एका बाजूने आनंद व सचिन आणि दुसऱ्या बाजूने प्रधान व उमा एका गेटजवळ पोहोचले. प्रधान आणि उमाला पाहताच आनंद आणि सचिन त्यांच्या मागे जीपमध्ये जाऊन बसले. सचिनने बोलायला सुरुवात केली, "सर, मी पकडून आणलेल्या त्या हल्लेखोराला, रमणला आम्ही बोलतं केलं. माझ्यावर तसा हल्ला करून त्यात मला मारायचा प्लॅन होता. या कामासाठी त्याला पैसे दिले गेले होते..." सचिनचं बोलणं पुढे नेत आनंद म्हणाला, "सर, या रमणला काय करायचं आहे ते एका कागदावर लिहिलं होतं. हा तोच कागद आहे..." आनंदच्या हातून कागद घेऊन प्रधान वाचू लागले. तेव्हा उमा म्हणाली, "त्या दुसऱ्या अंबरच्या नकळत आम्ही त्याची चौकशी केली. त्याच्या ऑफिसमधून समजलं, की त्याच वागणं चांगलंच बदललं होतं. काहींची तर नावंही तो विसरला होता. आणि हे सगळं तीन महिन्यांपूर्वीच सुरू झालं..." कागद वाचल्यावर तो घडी करून खिशात ठेवत प्रधान म्हणाले, "सळ्यांनी भरलेला तो ट्रक, ज्याने आमची वाट अडवली, तोही तपासला गेला. बाकी ट्रकमध्ये काही सापडलं नाही. पण ब्रेकजवळ हा कागद पडला होता. यात पण वेळ आणि सूचना लिहिली आहे..."

सचिनने तो कागद उलट सुलट करून पाहिला आणि म्हणाला, "सर हा कागद तर आम्हाला सापडलेल्या कागदासारखाच आहे..." आनंद म्हणाला, "हे कागद एकाच रायटिंग पॅडचे आहेत..." यावर उमा म्हणाली, "म्हणजे या रायटिंग पॅडचा मालक या कटाचा सूत्रधार आहे तर..." तिघांकडे पाहत प्रधान म्हणाले, "तुम्ही तिघं बरोबर आहात. या रायटिंग पॅडच्या मालकाला पकडण्यासाठीच आपण इथे आलो आहोत. डेड बॉडीचा आणि सी. सी. टीव्हीचा माग डॉक काढत आहेतच. पण तूर्तास हा माणूस महत्वाचा..." सचिन म्हणाला, "सर, तो अजूनही असेल इथे..." सचिनच्या खांद्यावर हात ठेवत प्रधान म्हणाले, "सचिन, बऱ्याच अंशी अशी माणसं फार over confident असतात. बघू, आपलं नशीब जोरावर आहे का... नाहीतर त्याला काढू की हुडकून... सचिन-आनंद, फॉर्म्यूला ३६. लेट्स गो..." सर्वजण गाडीतून उतरून गेटजवळ आले. गेटवर आणि बिल्डिंगवर बोर्ड होता, "गुड हेल्थ हॉस्पिटल..."

उमा एकटीच आत गेली आणि रिसेप्शनमध्ये असलेल्या एका सोफ्यावर बसली. पाठोपाठ प्रधानांनी आत प्रवेश केला. रिसेप्शनवर एक महिला बसली होती. प्रधान काऊंटरजवळ गेले. त्या महिलेच्या गणवेशावर 'मोना' या नावाचा बिल्ला होता. प्रधान म्हणाले, "मला Cosmetic surgeryबद्दल बोलायचं आहे. कोणाकडे जायचं सांगू शकाल का..." मोनाने एकवार प्रधानांकडे पाहिलं. मग म्हणाली, "या हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टर्स आहेत. पण ते सुद्धा अपॉइंटमेंटशिवाय भेटत नाहीत. आणि हो, तुमच्या local physicianकडून तशी चिठ्ठी आणि रिपोर्ट लागतील..." हे ऐकून प्रधान थोडे थबकले. पुन्हा मोनाच्या जरा जवळ सरकत म्हणाले, "चिठ्ठी आणि रिपोर्टशिवाय नाही का होणार काही... फार अर्जंट केस आहे..." मोना थोडी चिडली आणि चढ्या आवाजात म्हणाली, "हे बघा, हे असले प्रकार इथे चालत नाहीत. तुमच्या डॉक्टरची चिठ्ठी असेल तर बोला नाहीतर, ए बबन, यांना जरा बाहेरचा रस्ता दाखव रे..." बाजूलाच एक कर्मचारी सफाई करत होता. हातातलं फडकं खाली टाकत तो रिसेप्शनकडे वळला...

"काय झालं म्याडम..." बबनच्या या प्रश्नावर मोना म्हणाली, "अरे हे बघ काय बोलत आहेत... जरा समजाव त्यांना. बाहेर घेऊन जा त्यांना. दुसऱ्या पेशन्ट्सवर परिणाम होईल उगाच..." प्रधानांकडे वळत बबन म्हणाला, "चला साहेब, तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतो..." बबन आणि प्रधान बाहेर जात थोड्या आडोशाला गेले. बबन कुजबुजत म्हणाला, "अहो साहेब, इथे असं चालत नाही. म्हणजे असं समोर समोर तुम्ही त्या म्याडमला विचारलं ना... बरं आता सांगा काय झालं..." काही क्षण थांबत प्रधानांनी गाडीकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, "त्या गाडीत माझा भाऊ बसला आहे. त्याचा चेहेरा बदलायचा आहे. पण कोणाला कळू नं देता..." इथे तिथे पाहत बबन म्हणाला, "चेहेरा बदलायचा आहे... पण असं केलं काय त्यानं..." यावर थोडं भडकून प्रधान म्हणाले, "हे बघ, या नसत्या चौकाशा करायची काही गरज नाही तुला..." हात झिडकारत बबन म्हणाला, "राहिलं... चायला तुम्हाला मदत करायला म्हणून आलो तर तुम्ही माझ्यावरच खेकसताय... तुमचं तुम्ही बघून घ्या..." बबन जायला वळताच प्रधानांनी त्याला अडवलं आणि म्हणाले, "अरे बाबा असं नको करुस... माझा भाऊ मोठ्या संकटात सापडला आहे. तुला सगळं सांगतो. पण इथे नको..." बबन त्यांना हॉस्पिटलच्या मागे असलेल्या स्टोर रूममध्ये घेऊन गेला. दोघं आत जाताच दार लावलं गेलं. प्रधानांनी पाहिलं तर रिसेप्शनवरची ती महिला, मोना दारासमोर उभी होती...

तिच्याकडे आश्चर्याने पाहत प्रधान म्हणाले, "तुम्ही..." मोना हसली आणि म्हणाली, "काय झालं आहे ते सांगा लवकर. डॉक्टरांना भेटायचं आहे ना..." प्रधानांनी एकवार दोघांकडे पाहिलं आणि म्हणाले, "आत्ताच माझ्या भावाने एकाला गाडीने उडवलं. तो मेलेला माणूस पोलीस ऑफिसर होता. त्यांच्याच बिरादारीच्या माणसाला मारलं म्हटल्यावर पूर्ण फोर्स आता माझ्या भावाच्या मागे लागली आहे. मी या हॉस्पिटलबद्दल ऐकून आहे. म्हणून माझ्या भावाला इथे आणलं..." मोनाने आणि बबनने एकमेकांकडे पाहिलं. बबन म्हणाला, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचं काम झालंच म्हणून समजा. पण दोन खोके लागतील. म्हणजे दोन करोड कॅश... त्यातले पन्नास लाख आम्हाला द्यायचे, पन्नास डॉक्टरांना कामाच्या आधी आणि काम झाल्यावर डॉक्टरांना बाकीचे पैसे द्यायचे. मंजूर असेल तर पैशाची व्यवस्था करा. मग आमचे पैसे पार्किंगमध्ये पाच नंबर जागेत ठेवा आणि रिसेप्शनला परत या. आम्हाला पैसे मिळाले की तुम्हाला डॉक्टर भेटतील..." इतकं बोलून मोना आणि बबन दोघं बाहेर निघून गेले. ते गेल्याची खात्री करून प्रधानांनी कानाला हात लावला आणि म्हणाले, "Uma, into our jeep right now..."

चौघंही गाडीत बसले होते. प्रधान म्हणाले, "तुम्ही सगळ्यांनी ऐकलंत ना... Means we are on a right track... आता पुढे काय करायचं... तुम्हा तिघांचं काय म्हणणं आहे..." आनंद म्हणाला, "सर, आपल्याकडे माहिती आहे. पण पुरावे नाहीत..." आनंदच्या बोलण्याला पुढे नेत उमा म्हणाली, "आणि सर, ती रिसेप्शनिस्ट आणि तो बबन मामुली प्यादे आहेत. या सगळ्यामागे कोणीतरी डॉक्टर आहे हे नक्की..." उमाची री ओढत सचिन म्हणाला, "आणि एखाद्या डॉक्टरवर हात टाकणं म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे..." प्रधानांनी सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाले, "You all are very right... We need to get the proofs first..." प्रधान बोलतच होते की त्यांचा फोन वाजला, "हां डॉक, बोला... ओके..." फोन ठेवत प्रधान म्हणाले, "डॉकने सी. सी. टीव्ही फुटेज मधून एक माहिती शोधली आहे. त्या कुरियरवाल्याचा चेहेरा झाकलेला होता. पण डॉकने त्याचे बूट ओळखले. भिवपुरीला सापडलेल्या कॅमेऱ्यात जे बूट आपल्याला दिसले होते, हे बूट तसेच आहेत. हा बघा डॉकने बुटांचा फोटो पाठवला आहे. हे बूट मी अजून कुठेतरी पाहिले होते... येस... तो दुसरा अंबर जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या पायात हेच बूट होते. ओह नो... माझ्या त्याचवेळी लक्षात यायला हवं होतं. पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपण उद्याच या प्रकरणाचा सोक्ष-मोक्ष लावू..."

हॉस्पिटलचं पार्किंग मुख्य इमारतीच्या खाली होतं. त्यामुळे आधी मुख्य इमारतीत जावंच लागणार होतं. सर्वजण जीपमध्ये बसले होते. ती पोलीस जीप नसल्याने कोणाला संशय येणार नव्हता. उमा म्हणाली, "सर, काल जेव्हा आपण इथे होतो तेव्हा मला एक गोष्ट आढळली. हॉस्पिटलचे सफाई कर्मचारी, दर तीन तासांनी पार्किंग एरियामध्ये जाऊन तिथली सफाई करतात. काल साडे अकरा वाजता ते लोक तिथे गेले होते..." उमाच्या बोलण्यावर प्रधान म्हणाले, "अच्छा, म्हणून त्या बबनने आणि त्या रिसेप्शनिस्ट मोनाने वर वेळ घालवला. जेणेकरून सफाई झाल्यावर त्यांना मला तिथे नेता येईल. कारण एकदा सफाई झाली की पुढचे तीन तास तिथे कोणीच फिरकणार नव्हतं..." "मग आता प्लॅन काय सर..." सचिनच्या या बोलण्यावर प्रधानांनी एकवार सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाले, "उमा तुला ती मोना ओळखू शकते. तेव्हा तू आणि सचिन, सफाई कर्मचाऱ्यांचा वेश करून पार्किंगमध्ये लपून बसा. पाच नंबर पार्किंगजवळ मी बॅग ठेवेन तेव्हा कदाचित माझ्यावर कोणीतरी पाळत ठेऊन असू शकेल. मी तिथून गेल्यावर तुम्ही दोघं त्या बॅगवर नजर ठेवा. काही हालचाल जाणवली तर लगेच मला कळवा. आनंद, चल, तुझ्या चेहेऱ्यावर थोड्या पट्ट्या बांधू..."

सकाळचे अकरा वाजले होते. हॉस्पिटलच्या आवारात तुरळक गजबज होती. जीपने आत प्रवेश केला. मुख्य इमारतीच्या जवळ येताच जीपचा वेग मंदावला. त्यासर्शी वेशांतर केलेले उमा आणि सचिन जीपमधून उतरले आणि जीपपासून लांब गेले. जीप दारात आली. मोना आणि बबन तिथेच होते. त्यांनी जीप पाहिली आणि एकमेकांना इशारा केला. प्रधान जीपमधून आधी उतरले. बाजूला बसलेल्या आनंदला त्यांनी हळुवार उतरवलं. आनंदचा चेहेरा पट्ट्या लावून झाकला गेला होता. रिसेप्शन परिसरात काही पेशंट्स होते. प्रधानांनी आनंदला एका खुर्चीत बसवलं आणि मोनाकडे वळत म्हणाले, "हा माझा भाऊ आहे. जरा अर्जंट केस आहे..." मोनाने होकार दिला आणि बबन समोर आला. जीपकडे पाहत बबनने पार्किंगकडे बोट दाखवलं आणि तो त्याच्या कामाला लागला...

आनंदकडे वळत प्रधान म्हणाले, "मी गाडी पार्क करून येतो हं. लगेच येतो. धीर धर हं..." प्रधान लगेच जीपकडे गेले. जीप पुढे जाऊन डावीकडे वळली आणि पार्किंगमध्ये शिरली. पाच नंबर पार्किंगमध्ये एक गाडी उभी होती. प्रधानांनी त्यांची जीप त्या गाडीच्या बाजूला लावली. खाली उतरून त्यांनी सगळीकडे नजर फिरवली. त्यावेळी त्यांच्या कानात सचिनचा आवाज आला, "सर, you are right... एक माणूस तुमच्या पाळतीवर आहे..." दुसरा आवाज उमाचा होता, "सर हा बबन आहे..." प्रधान म्हणाले, "काहीही करू नका. फक्त नजर ठेवा and keep me posted..." प्रधानांनी घड्याळ पाहिलं. सवा-अकरा होत आले होते. त्यांनी जीपमधून एक बॅग काढली आणि बाजूला भिंतीवर पाच हा अंक लिहिला होता, तिथे जमिनीवर ठेऊन दिली. मग पार्किंगच्या बाहेर येत मुख्य इमारतीकडे वळले...

प्रधान रिसेप्शनकडे गेले. त्यांनी मान हलवून इशारा केला. मोनाने कोणालातरी फोन लावला, "हां, अरे सामान आहे ना व्यवस्थित... चेक कर... ओके. मी पाहते..." इकडे प्रधानांच्या कानात सचिनचा आवाज आला, "सर, तुम्ही बाहेर पडलात आणि तो बबन बॅगेजवळ आला. त्याने बॅग उघडून चेक केली आणि कोणाचातरी फोन आला त्याला..." उमा पुढे म्हणाली, "सर, आम्ही याचा माग घेतो. त्या मोनाला इतक्यात आपल्याला हात लावता येणार नाही. कारण तो डॉक्टर अजून समोर यायचा आहे..." तिथे फोन ठेवत मोना प्रधानांकडे वळत म्हणाली, "तुम्हाला तुमच्या भावासाठी डॉक्टरांना भेटायचं होतं ना... चला मी दाखवते. मोना पुढे आणि आनंदला धरून प्रधान मागे चालू लागले...

तिकडे बबनने बॅग घेतली आणि बाजूच्या गाडीत शिरला. त्याने बॅग सीटखाली सरकवली. मग बाहेर येत गाडीचं दार बंद करत तो पुन्हा मुख्य इमारतीकडे वळला. स्टोर रूममध्ये जाऊन तो थांबला. सचिन आणि उमा त्याच्या मागावर होतेच. तिकडे प्रधान आणि मोना चालत असताना प्रधान म्हणाले, "बाई, सगळं केलं आहे व्यवस्थित, तर आता कुठे घेऊन जात आहात आम्हाला..." मोना फक्त हसली. एका केबिनबाहेर बोर्ड होता, "डॉ. पलाश सेन, सर्जन..." मोनाने दार वाजवलं आणि उघडलं. आत एक माणूस बसला होता. टेबलवर पाटी होती डॉ. पलाश सेन. प्रधान आणि आनंदला समोर बसवत मोना म्हणाली, "डॉ. ही स्पेशल केस आहे. केसचे अर्धे पेपर्स मी पाहिलेत. बाकी तुम्ही बघाल का..." डॉ. सेनने होकारार्थी मान हलवली तशी मोना हसली आणि केबिनबाहेर निघून गेली. दार लावायला डॉक्टर उठलेच होते तेव्हा कानाला हात लावत हळू आवाजात प्रधान म्हणाले, "Now..."

प्रधानांचा मेसेज मिळताच सचिन लपलेलेल्या जागेवरून बाहेर आला. तोवर बबन गाडीतून उतरून इमारतीकडे चालू लागला होता. त्याने सचिनला येताना पाहिलं आणि काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच बबन पळू लागला. बबन पळाला हे लक्षात येताच सचिनही त्याच्या मागून पळू लागला. उमाने हे पाहिलं आणि ती मागे वळून इमारतीच्या मुख्य दाराकडे वळली जेणेककरून बबनला दुसऱ्या बाजूने गाठता येईल. रिसेप्शनवर थोडी गजबज होती. त्यामुळे उमाने तिचा वेग मंदावला. पण रिसेप्शनवर आलेल्या मोनाच्या नजरेतून हे सुटलं नाही. तिने विचार केला, "अरे, ही बाई तर कालसुद्धा आली होती आणि काही वेळाने गायब झाली. आणि आज परत आली. कोण असावी ही बाई... मला डॉक्टर सेनना आणि बबनला सावध करायला हवं. पण केबिनमध्ये तर पार्टी बसली आहे... आधी बबनलाच सांगते हिच्याबद्दल..."

मोनाने एकवार उमाकडे पाहिलं आणि तिच्या सीटवर नं येताच मागच्या दारातून बाहेर निघून गेली. उमाने मोनाला जाताना पाहिलं आणि लगेच तिचा पाठलाग करू लागली. तिथे बबन धावत स्टोररूमपर्यंत पोहोचला आणि आत जाऊन त्याने दार लाऊन घेतलं. सचिन त्याच्या मागावर होताच. स्टोररूमच्या दाराला जरा धक्का देताच ते उघडलं. आत जात सचिनने बबनवर गन रोखली. तेवढ्यात मोना तिथे आली आणि तिने बबन पाठोपाठ सचिनला स्टोररूमच्या आत जाताना पाहिलं. मोनाने सगळीकडे पाहिलं आणि कपड्यात लपवलेलं पिस्तूल काढून ती आत शिरली. बबन हात वर करून, दाराकडे तोंड करून उभा होता तर सचिनची पाठ दाराकडे होती. सचिनच्या डोक्याला पिस्तूल लावत मोना म्हणाली, "इन्स्पेक्टर, तुझी गन खाली टाक. नाहीतर चाप ओढला जाईल आणि तू..."

मोना पुढे काही बोलणार इतक्यात उमा पुढे सरसावली. तिने मोनाच्या हातावर फटका मारला. मोनाच्या हातातलं पिस्तूल खाली पडलं. उमाने लगेच तिला ढकललं आणि स्वतःची गन रोखत सचिनच्या बाजूला येऊन उभी राहिली. मोनाच्या हाताकडे पाहून सचिनने डोळे मोठे केले. मग दोघांवरची नजर नं हटवता सचिन उमाला म्हणाला, "उमा, हीच ती बाई जिने मला रस्त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. हिचा चेहेरा झाकला होता, पण हे हातातलं ब्रेसलेट मी हेरलं होतं..." हे ऐकून उमा पुढे आली आणि तिने खाडकन मोनाच्या थोबाडीत दिली. मोना थोडी गडबडली आणि मागे सरकली. पुन्हा उमा आणि सचिनने बबन आणि मोनावर गन रोखल्या. उमा म्हणाली, "आता ताबडतोब बोला नाहीतर..."

बबन आणि मोना घाबरले. एकमेकांकडे पाहू लागले. बबनने बोलायला सुरुवात केली, "मी आणि मोना नवरा-बायको आहोत. या हॉस्पिटलमध्ये मी आधीपासून कामाला आहे. शिफारस करून मी मोनाला इथे नोकरीला लावलं. या हॉस्पिटलमध्ये मेलेल्या लोकांची प्रेतं त्यांच्या नातेवाईकांना देताना आम्ही त्यांच्याकडून पैसे घ्यायचो. आमचं बरं चाललं होतं. पण एक दिवस डॉ. पलाश सेन यांना आमच्याबद्दल समजलं. ब्लॅकमेल करायच्या मान्सूब्याने त्यांनी आम्हाला बोलावलं. मोनाने तिच्या सौंदर्याची भूल डॉ. सेनना घातली आणि ते मॅटर मिटवलं. काही महिने असंच चालू राहिलं. डॉ. सेन कधीही आणि कुठेही मोनाला बोलवू लागले. एक दिवस आम्हाला डॉ. सेन यांच्या कामांची एक फाईल मिळाली. त्यात अनेक अशा लोकांचे चेहेरे त्यांनी बदलले होते, ज्यांना पोलीस शोधत होते. आम्ही लगेच डॉ. सेनना दोन अटी घातल्या. एक म्हणजे मोनाचा पिच्छा सोडण्याची आणि दुसरी होती त्यांच्या धंद्यात भागीदारी. डॉक्टरांनी दोन्ही अटी मान्य केल्या आणि तेव्हापासून आम्ही तिघं या प्रकारे पैसे कमावतो..."

सचिनने पुढे होऊन बबनच्या कानशिलात हाणली. मग स्वतःच्या कानाला हात लावत म्हणाला, "सर, आम्ही या बबनला आणि मोनाला ताब्यात घेतलं आहे... ओके सर..." उमाकडे वळत सचिन म्हणाला, "सरांनी आपल्याला वर बोलावलं आहे. या दोघांनाही घेऊन यायला सांगितलं आहे..." मोनाला धक्का देत उमा म्हणाली, "चला राणीसरकार... तुमच्या नवरदेवांसोबत वर चला... आणि हो, एक गोष्ट लक्षात असू द्या... काही वेडंवाकडं करू नका... आमच्या गन्समधून कधी गोळ्या सुटतील आणि तुमची डोस्की फुटतील हे कळणारसुद्धा नाही तुम्हाला..." मोना आणि बबनने होकारार्थी मान हलवली आणि स्टोररूम बाहेर पडले. सचिन आणि उमा त्यांच्या मागेच होते. बबन आणि मोनाला घेऊन सचिन आणि उमा, डॉ. सेनच्या केबिनच्या बाहेर येऊन पोहोचले. उमा कानाला हात लावत म्हणाली, "सर, आम्ही बाहेर आहोत..."

तिथे केबिनमध्ये, मोना बाहेर पडल्यावर डॉ. सेन म्हणाले, “तुमच्या केसबद्दल मोनाने मला सगळं सांगितलं आहे. तेव्हा माझ्यापासून काही लपवू नका. आधी तुमच्या भावाच्या चेहेऱ्यावरच्या पट्ट्या काढा...” प्रधानांनी आनंदला इशारा करताच आनंदने पट्ट्या काढल्या. आनंदला पाहताच डॉ. सेन घाबरले. हळू आवाजात ते म्हणाले, “म्हणजे तू मेला नाहीस तर. त्या गुंडांनी खोटी बातमी सांगून पैसे घेतले माझ्याकडून...” डॉ. सेन उठून दाराकडे पळणार इतक्यात आनंदने त्यांना धरून खुर्चीत बसवलं. त्यांच्यावर नजर रोखत आनंद म्हणाला, “म्हणजे माझ्यावर जो हल्ला झाला तो तुम्ही केलात तर... अजून काय काय केलं आहे तुम्ही... सांगा पटापट...” आनंदकडून प्रधानांकडे पाहत डॉ. सेन म्हणाले, “तुम्ही माझ्याशी अशा भाषेत नाही बोलू शकत. मी एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे. तुमच्या विरुद्ध केस करू शकतो मी...”

डॉ. सेन बोलत असतानाच सचिन आणि उमा केबिन बाहेर येऊन पोहोचले आहेत हे त्यांना समजलं. प्रधान हसले आणि म्हणाले, “प्रतिष्ठित डॉक्टर हां... डॉक्टर, तुमचा सगळा चिठ्ठा तुमच्या माणसांनी उघड केला आहे. सचिन, उमा, घेऊन या रे दोघांना...” काही क्षणातच सचिन आणि उमा, मोना आणि बबनला ढकलत आत आले. त्या दोघांना बेड्या घातलेल्या पाहून डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. मोना म्हणाली, “डॉक्टर, यांनी आमच्याकडून सगळं वदवून घेतलं. आणि रेकॉर्डसुद्धा केलं. तुमची ती फाईलसुद्धा त्यांना मिळाली आहे...” डॉ. सेनकडे पाहत प्रधान म्हणाले, “तेव्हा डॉ. सेन, आता निमूट सांगा सगळं...” डोक्यावरचा हात काढत, मोना आणि बबनकडे पाहत डॉ. सेन म्हणाले, “सांगतो, सगळं सांगतो...” 

मी एक कोसमॅटिक सर्जन आहे. लोकांचे चेहेरे बदलणं, चेहेऱ्यात बिघाड झाल्यास चेहेरा सुधारणं यात माझा हातखंडा आहे. ही विद्या सरळ मार्गाने मला तितकेसे पैसे मिळवून देऊ शकली नसती. म्हणून बबन आणि मोनाला हाताशी धरून, हॉस्पिटलमधल्या औषधांचा आणि इथे असलेल्या बेवारस मृतदेहांचा काळा बाजारसुद्धा करू लागलो. तुमच्या पोलिस रेकॉर्डसमध्ये असलेल्या कित्येक गुन्हेगारांचे चेहेरे बदलून मी त्यांना पोलिसांपासून लपवण्याचं काम केलं आहे. रॉकी आणि प्राजक्तासुद्धा तसेच...” बोलता बोलता डॉ. सेननी दोन फोटो टेबलवर ठेवले आणि पुढे म्हणाले, “आत्ताचे ते अंबर आणि तारा दुसरे तिसरे कोणी नसून रॉकी आणि प्राजक्ता आहेत. हे त्या दोघांचे मूळचे चेहेरे. खऱ्या अंबरला फसवून त्याचा पैसा लुबाडण्यासाठी हे सगळं त्यांनी रचलं आणि मी त्यांना मदत केली. सगळं बरं चाललं होतं, पण अचानक तुम्ही या केसचा पिच्छा पुरवू लागलात. आम्ही तिघं घाबरलो. मी तुम्हाला मारायला माणसं पाठवली तर रॉकी त्या डॉक्टरच्या मागे गेला...”

हे सगळं ऐकत असताना प्रधानांच्या डोळ्यातून आग बरसत होती. ते डॉक्टरचा गळा पकडायला सरसावलेच होते की त्यांनी स्वत:ला सावरलं. डॉ. सेन पुढे म्हणाले, “आमचं जे बोलणं झालं त्यात आम्ही असं ठरवलं, आता हे नाटक जास्त काळ चालू शकणार नाही. अंबरच्या आई-वडिलांना संपवून, मला माझा हिस्सा देऊन, रॉकी आणि प्राजक्ता आजच सटकणार आहेत. माझी गरज जेव्हा भासेल तेव्हा ते मला बोलवून घेतील...” प्रधान, उमा, सचिन आणि आनंदने एकमेकांकडे पाहिलं. फोन बाहेर काढून नंबर लावत प्रधान म्हणाले, “हॅलो, कोण घोरपडे का... मी सीनियर इंस्पेक्टर प्रधान बोलतोय. गुड हेल्थ हॉस्पिटलला ताबडतोब पोलिसांची कुमक पाठवा. गुन्हेगारांना ताब्यात घ्यायचं आहे... आणि हो, पोलिस सध्या वेशात असू देत. हे हॉस्पिटल आहे. इथल्या रुग्णांना आणि इतर चांगल्या कर्मचऱ्यांना याची झळ लागायला नको...”

थोड्याच वेळात संध्या वेशातले काही पोलिस खोलीत आले आणि प्रधानांना सल्युट करून उभे  राहिले. त्यांना उद्देशून प्रधान म्हणाले, “या दोघा नवरा-बायकोला घेऊन जा. कोठडीत पूजा घालू यांची आणि मेहूण म्हणून बसवू यांना... पार्किंगमध्ये पाच नंबर खांबाजवळ एक गाडी उभी असेल. तीसुद्धा ताब्यात घ्या...” बबन आणि मोनाला घेऊन पोलिस निघून गेल्यावर आनंद, उमा आणि सचिनकडे पाहत प्रधान म्हणाले, “या डॉक्टरला घेऊन चला अंबरकडे. खऱ्या अंबरला वाचवू शकलो नाही आपण. पण त्याच्या आई-वडिलांना या संकटातून बाहेर काढू... डॉ. सेनच्या या केबिनला सील करा... लेट्स गो...” सर्वजण तिथून निघाले ते थेट अंबरच्या घराबाहेर पोहोचले. आनंदने डॉ. सेनला धरून ठेवलं होतं. प्रधानांनी इशाऱ्यानेच त्याला तिथेच थांबायला सांगितलं आणि स्वत: प्रधान, उमा व सचिन दाराजवळ गेले. आतमध्ये हालचाल जाणवत होती. प्रधान बेल वाजवणार इतक्यात दाराची कडी काढल्याचा आवाज आला... 

दार उघडलं तेव्हा समोर प्राजक्ता उभी होती. तीसुद्धा या तिघांना पाहून चपापली. आत येत प्रधान म्हणाले, "काय तारा मॅडम, इतक्या घाई-घाईने कुठे निघालात..." तेवढ्यात, "झाली का तयारी... चल लवकर चल..." असं म्हणत रॉकी बाहेर आला. समोर सर्वांना पाहून तो थबकला. काही क्षण गेले आणि रॉकी म्हणाला, "अरे ऑफिसर्स, तुम्ही इथे... सॉरी आम्ही थोडे घाईत आहोत. पण तुम्ही बसा. आई-बाबांशी बोला. आम्ही येतोच थोड्या वेळात... आई... बाबा... हे पोलीस ऑफिसर्स आलेत. त्यांच्याकडे बघा ना जरा. आम्ही जाऊन येतो पटकन. चल तारा..." रॉकी जायला निघाला तर सचिनने त्याला अडवलं, "कुठे जाताय मि. अंबर... सॉरी. मि. रॉकी..." रॉकी हे नाव ऐकताच अंबर हबकला, "रॉकी... क...कोण रॉकी... म... मी अंबर आहे..." हे ऐकून सर्वजण हसू लागले, "ताराजवळ जात उमा म्हणाली, "आता तुम्ही पण म्हणाल, की तुमचं नाव तारा आहे. प्राजक्ता नाही..." प्राजक्ता काही बोलणार इतक्यात उमाने तिच्या थोबाडीत मारली. झटक्यानिशी प्राजक्ता मागे जात रॉकीवर आदळली. प्रधान म्हणाले, "तुम्हा दोघांचा खेळ संपलेला आहे. आनंद, घेऊन ये रे त्याला..."

काही क्षणातच डॉ. सेनची गचांडी धरून आनंद आत आला. डॉ. सेनला पाहून प्राजक्ता आणि रॉकी दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. दोघं एकमेकांकडे पाहू लागली. दोन फोटो टेबलवर टाकत प्रधान म्हणाले, "रॉकी आणि प्राजक्ता, हे तुमचे मूळचे चेहेरे... जे बदलून तुम्ही अंबर आणि तारा झालात... काय बरोबर ना..." प्रधान बोलत असताना उमाला काहीतरी जाणावलं. इकडे-तिकडे पाहत उमा म्हणाली, "सर, गॅसचा वास येतोय..." हे ऐकून चौघांनी सर्वत्र पाहिलं. सगळीकडे गॅस भरून राहिला होता. रॉकीने लगेच खिशातून लायटर काढला आणि हातात धरत म्हणाला, "हा... हा... हा... आम्हीच गॅस लीक केला आहे. किचनमध्ये सगळे बर्नर चालू केलेत मी. त्या जोडप्याला या आगीत जाळून मारायचं होतं आम्हाला. आता तुम्हीसुद्धा तसेच मराल... त्या थेरड्यांना वाचवायचं असेल तर जाऊ द्या आम्हा तिघांना... आनंदकडे पाहत रॉकी म्हणाला, "ए ऑफिसर, सोड डॉ. सेनला... नाहीतर..."

आनंदने जरा विचार केला आणि डॉ. सेनला रॉकीकडे ढकललं. डॉ. सेन रॉकीवर आदळले आणि रॉकीच्या हातून लायटर खाली पडला. क्षणाचाही विलंब नं करता आनंद, उमा आणि सचिनने आपापल्या पिस्तुली रॉकी, प्राजक्ता आणि डॉ. सेनवर रोखल्या. प्रधान लगेच किचनमध्ये गेले आणि त्यांनी सर्व बर्नर बंद केले. मग घराच्या सगळ्या दारं-खिडक्या उघडत ते बेडरूममध्ये पोहोचले. तिथे अंबरच्या आई-वडिलांना बांधून ठेवलं होतं. प्रधानांनी दोघांना सोडवलं आणि बाहेर घेऊन आले. रॉकी आणि प्राजक्ताला पाहून अंबरची आई पुढे सरसावली आणि तिने दोघांच्याही थोबाडीत मारली. मग मागे जाऊन अंबरच्या वडिलांजवळ उभी राहिली आणि म्हणाली, "नीच आहात तुम्ही दोघं. तुमच्या जाळ्यात अडकून आमचा बिचारा अंबर... तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही लक्षात ठेवा..." अंबरची आई रडू लागली. उमा त्यांना शांत करायला पुढे जाऊ लागली. सर्वांचं लक्ष दुसरीकडे आहे हे पाहून रॉकीने प्राजक्ताला इशारा केला...

प्राजक्ताने उमाला झटका दिला आणि तिचं खाली पडलेलं पिस्तूल उचलून उमाच्या डोक्याला लावलं. मग सर्वांकडे पाहत म्हणाली, "आम्ही नीच काय... आता बघा आम्ही काय करतो... ऑफिसर्स, आपापल्या पिस्तुली डॉ. सेन आणि रॉकीकडे द्या नाहीतर तुमची ही ऑफिसर ढगात गेली समजा..." सचिन आणि आनंद त्यांच्या पिस्तुली रॉकी आणि डॉ. सेनकडे सोपवणार इतक्यात वेगळ्याच दिशेला पाहत प्रधान ओरडले, "डोन्ट शूट..." अचानक झालेल्या ओरड्याने प्राजक्ता गडबडली. उमाने लगेच संधी साधली आणि प्राजक्ताच्या पिस्तूल धरलेल्या हाताला खाली खेचलं. दोघींमध्ये झटापट झाली आणि गोळी सुटली. गोळीने समोर उभ्या असलेल्या रॉकीच्या छातीचा वेध घेतला आणि त्या झटक्यानिशी रॉकी मागे ढकलला जाऊन टेबलाला आदळला. रॉकी जमिनीवर कोसळला आणि काही क्षणातच गतप्राण झाला...

रॉकी मेलेला पाहून प्राजक्ताला आणि डॉ. सेनला शॉक बसल्यासारखं झालं. उमाने लगेच पिस्तूल हिसकावून घेतलं आणि पुन्हा प्राजक्ताच्या कानाला लावलं. रॉकी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. प्रधान, उमा, सचिन आणि आनंदच्या गरड्यात प्राजक्ता आणि डॉ. सेन बसले होते. त्यांच्या समोरच डोळ्यात अश्रू घेऊन अंबरचे आई-वडील बसले होते. प्राजक्ता आणि अंबरच्या आई-वडिलांची नजरा-नजर झाली आणि प्राजक्ताने मान खाली केली. कणखर स्वरात प्रधान म्हणाले, "चला... आता पटापट बोलायला सुरू करा... नाहीतर..." प्रधानांचा आवाज ऐकून आणि डोळ्यातली जरब पाहून प्राजक्ता आणि डॉ. सेन दोघंही घाबरले. डोळे पुसत प्राजक्ताने बोलायला सुरुवात केली...

"सांगते. सगळं सांगते. मी प्राजक्ता. मी मूळची सोलापूरची. मी अनाथाश्रमात लहानाची मोठी झाले. त्या आश्रमातल्या लोकांचं म्हणणं होतं, मी तिथे राहून इतरांची सेवा करावी. पण मला ते करायचं नव्हतं. मला पैसा कमवायचा होता. श्रीमंत व्हायचं होतं. आश्रमातले पैसे चोरून मी तिथून पळ काढला. मोठ्या पार्ट्या गाठून त्यात आलेल्या श्रीमंत मुलांना नादाला लाऊन मी माझी ऐश-आरामाची हौस भागवू लागले. त्याच दरम्यान मला रॉकी भेटला. आम्ही दोघंही एकमेकांना आवडलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो. रॉकीसुद्धा माझ्याचसारखा श्रीमंत मुलींना नादाला लाऊन त्यांची संपत्ती लुबाडण्याचं काम करायचा. रॉकीने मला एक प्लॅन सांगितला. श्रीमंत आई-बापाच्या मुलांना फसवून त्यांच्याशी लग्न करून त्यांची संपत्ती लुबाडायची आणि त्यांना संपवायचं. आम्ही ऍक्सीडेन्टचा बहाणा करून दोन वर्षात दोन मुलांना असंच संपवलं. आणि अशातच आम्हाला अंबर भेटला. एकुलता एक मुलगा, मुंबईत मालकीचे असलेले दोन फ्लॅट्स, बक्कळ पैसा, हे सगळं पाहून आम्ही अंबरला आमची पुढची शिकार बनवायचं ठरवलं...

रॉकीने कैलास बनून अंबरशी ओळख करून मैत्री वाढवली. त्याची सगळी माहिती काढली. अंबरला आवडेल अशी दिसणारी आणि वागणारी तारा बनवून रॉकीने मला अंबरच्या आयुष्यात आणलं. काही दिवसांच्या प्रेमातच अंबरने मला लग्नाची मागणी घातली. तो मला त्याच्या आई-वडिलांकडेही घेऊन गेला. त्यांनी सुद्धा मला पसंती दर्शवली. आमचं रजिस्टर्ड लग्न झालं. आता पुढची पायरी होती, अंबरला संपवण्याची. आम्ही प्लॅन बनवला. अंबरसोबत मी हनिमूनला जायचं. अंबरच्या नकळत रॉकीने तिथे पोहोचायचं आणि तिथेच ऍक्सीडेन्ट घडवून आणायचा ज्यात अंबरला मारायचं. मग परत येऊन दु:खात असलेल्या या म्हातारा-म्हातारीसोबत काही दिवस घालवल्यावर संपत्ती हडप करायची आणि या दोघांनाही संपवायचं. केस बनली असती, मुलाच्या अकाली निधनाने या दोघांचा हाय खाऊन मृत्यू. पण हा अंबर अपेक्षेपेक्षा हुशार निघाला...

रॉकीचं खरं नाव कैलास नसून रॉकी आहे, आणि त्याच्या वाईट कामात हे डॉ. सेन त्याची मदत करतात, हे अंबरला समजलं. मला अंबरने हे सांगितलं आणि वर हे ही म्हणाला की त्याने कैलास हे नाव का धारण केलं ते अंबर शोधणार होता. अंबर जर रॉकीबद्दल अजून खोलात शिरला असता तर कदाचित तो माझ्यापर्यंत पोहोचला असता. मी रॉकीला कॉन्टॅक्ट करून नवीन प्लॅन बनवला. अंबरला गळ घालून भिवपुरीला ट्रेकला चलण्यासाठी भाग पाडलं. मी आणि रॉकी भिवपुरीला बऱ्याच वेळा गेलो होतो. अंबरशी लग्न झाल्यावरसुद्धा मी आणि रॉकी तिथे जात असू. त्यामुळे तिथल्या अनेक छुप्या जागा आम्हाला माहित होत्या. मी आणि अंबर धबधब्याशी पोहोचलो. मी रॉकीलाही तिथे बोलवून घेतलं होतं. रॉकी दिसताच मी तिथून दूर होत लपून बसले. रॉकीने अंबरला संपवलं आणि आम्ही त्याची बॉडी धबधब्याच्या मागच्या गुहेत गाडून टाकली. या वेळी अंबरचा अपघाती मृत्यू नव्हता, म्हणून रॉकीला अंबर बनवून आम्ही अंबरला काही काळ जिवंत ठेवलं. आमच्या प्रत्येक शिकारीच्या आधी आणि नंतर, आम्ही डॉ. सेन करवी माझा चेहेरा बदलून घेत असू. पण या वेळी फक्त रॉकीचा चेहेरा बदलून घेतला..."

प्राजक्ताचं बोलणं होतं तोच सर्वांनी डॉ. सेनकडे पाहिलं. तेव्हा डॉ. सेन बोलते झाले, "हो, एक दिवस ही प्राजक्ता मला भेटली. तिच्या कामात मी तिला साथ द्यावी यासाठी तिने मला तिच्या सौंदर्याची आणि शरीरसुखाची भूल घातली. मी त्याला बधत नाही म्हटल्यावर हा रॉकी माझ्याकडे आला. त्याने मला एक फाईल दिली. त्यात मी केलेल्या कामाचे पुरावे होते. मला त्यांना मदत करणं भाग पडलं. मी दोन वेळा प्राजक्ताचा चेहेरा बदलला. तीन महिन्यांपूर्वी रॉकी आणि प्राजक्ता माझ्याकडे अंबरचा फोटो घेऊन आले. तेव्हा मी पहिल्यांदा रॉकीचा चेहेरा बदलला. तुम्ही ही केस हातात घेतली आहे हे समजल्यावर मी माझ्या काही पेशंटन्स ना, ज्यांचे चेहेरे मी बदलले होते, त्यांना हाताशी धरून तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला. पण खात्री बाळगा ऑफिसर्स, अंबरच्या खुनात माझा काहीच हात नव्हता..."

डॉ. सेनने सर्वांकडे पाहिलं. प्रधानांच्या डोळ्यातली आग पाहून ते अजूनच घाबरले. डॉ. सेनच्या शर्टाची कॉलर पकडत प्रधान म्हणाले, "डॉ. सेन, देवानंतर मनुष्याचा जर कोणावर विश्वास असेल, तर तो डॉक्टर असतो. पण तुम्ही या उदात्त व्यवसायला काळिमा फासलात. आणि प्राजक्ता, ज्याने रॉकीसारख्या बनेल आणि पाताळयांत्री माणसाचं खरं रूप शोधून काढलं, त्या अंबरला तुमच्याबद्दल समजलं नसेल... अंबरच्या ऑफिसमध्ये आम्हाला एक कागद सापडला. त्यात त्याने तुम्हा तिघांबद्दल लिहिलं होतं. प्राजक्ता मॅडम, अंबरचं तुमच्यावर खरोखरचं प्रेम होतं. तुम्हाला सुधारण्याची संधी द्यावी या हेतूने अंबर प्रयत्न करणार होता. त्या व्हिडियोतसुद्धा त्याने तुम्हाला तारा नाही, तर प्राजू म्हणून हाक मारली होती. पण ती हाक ऐकायला तुम्ही तिथे होता कुठे... तुम्ही तर लपून बसलात आणि थंड डोळ्यांनी अंबरला मरताना पाहिलंत... प्राजक्ता मॅडम, सर्वात मोठं पाप तर तुम्हीच केलंत. प्रेमात विश्वासघात...

तुम्ही सर्वांनी प्लॅन करून अंबरला मारलंत. पण अंबरच्या कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्याने तुमचा घात केला. तुम्ही सगळे माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. लोभ आणि वासना यांमुळे तुमचं शरीरच नाही तर तुमचा आत्माही विटाळला आहे. या रॉकीला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळाली. आता मी प्रयत्न करेन की तुम्हा दोघांना कठोरातली कठोर शिक्षा मिळावी..."

समाप्त.

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment