Monday, December 24, 2018

हिऱ्याची करामत...



फार वर्षांपूर्वी एका गावात गोपाळ नावाचा एक माणूस आपल्या आईसोबत रहायचा. गावाच्या मधोमध एक छानसा बंगला. सावकारीचा जोमात चाललेला व्यवसाय. असा त्याचा थाट. गावकऱ्यांकडून वस्तू, घर, जमीन गहाण ठेऊन त्यावर भरघोस व्याज आकारून गावकऱ्यांना लुबाडत गोपाळ गब्बर झाला होता. "इतकं व्याज घेऊन गावकऱ्यांना त्रास देऊ नकोस. देवाचा कोप होईल..." अशा त्याच्या आईच्या विनवण्यांना गोपाळने कधीही दाद दिली नाही. सर्वकाही छान चालू असताना एक दिवस देवाचा कोप झालाच. गोपाळच्या घरात एक समारंभ असताना एक ठिणगी पडली आणि कोळशाच्या पोत्यांनी व तेलाच्या डब्यांनी पेट घेतला. क्षणार्धात बंगला जळून बेचिराख झाला. त्यात गोपाळच्या हिशोबवह्या, गहाणखतं, पैसा, धान्य, संपत्ती, सर्वांची राख झाली. हे पाहून गावकरी सुखावले पण गोपाळमात्र अजून दु:खात बुडाला. त्यात गावात आलेल्या तापाच्या साथीने गोपाळच्या आईला ग्रासलं. तिच्या औषधोपचारात राहता बंगलाही विकावा लागला. त्याच आजारपणात गोपाळची आई गेली आणि गोपाळ पुरता कफल्लक झाला...

गोपाळला गावात आश्रय मिळेना तेव्हा त्याने गाव सोडलं आणि गावाबाहेर असलेल्या जंगलाच्या तोंडावर एक झोपडी बांधून तो राहू लागला. एकेकाळी पंगतीने जेवणावळी उठवणाऱ्या गोपाळला आता एकावेळच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. जंगलातली कंदमुळं, फळं खात तो दिवस घालवू लागला. "असं किती दिवस कुढत जगायचं. लांब कुठेतरी जाऊन काही काम मिळतंय का पाहू..." असा विचार करत होतं-नव्हतं ते सामान बोचक्यात बांधून गोपाळ निघाला. तो बराच वेळ चालत होता. भुकेने आणि थकव्याने त्याला आता चालवेना. तेव्हा तो एका झाडाखाली बसला. जरा डोकं टेकतो तोच गोपाळला पाण्याची खळखळ एकू आली. "अन्न नाही तर नाही, निदान पाणी तरी मिळालं..." या विचाराने गोपाळ आवाजाच्या दिशेने गेला. त्याला एक छोटा ओढा दिसला. थंडगार पाणी पिऊन थोडं पाणी त्याने तोडांवर मारून घेतलं. गोपाळ तिथून उठणार इतक्यात पाण्यात काहीतरी चमकताना त्याला दिसलं. त्याने पाण्यात हात घालून ती चकाकणारी वस्तू बाहेर काढली. तो एक सुंदर हिरा होता. हिरा पाहून गोपाळचे डोळे दिपले. पुढच्या गावी हा हिरा विकावा असा विचार करून गोपाळने हिरा कमरेला खोचून ठेवला...

गोपाळ पुन्हा झाडाखाली येऊन बसला. डोकं बुंध्याला टेकून डोळे मिटून विचार करू लागला, "काय ही माझी अवस्था... एकेकाळी दिवसातून तीन-तीन वेळा जेवणारा मी आज पानं, काटक्या खाऊन, पाणी पिऊन दिवस काढतो आहे. अर्धपोटी असा किती काळ मी तग धरू शकणार... काहीतरी छान पोटभर खायला मिळावं असं वाटतंय..." गोपाळ अशा विचारात मग्न असतानाच खमंग अशा वासाने त्याची विचारमालिका भंग झाली. गोपाळने डोळे उघडले, तर जिलेबी, गुलाबजाम, पुऱ्या, भाजी, भात, वरण, अशा पदार्थांनी भरलेली ताटं त्याच्या पुढ्यात होती. ते पदार्थ पाहून गोपाळचे डोळे विसफारले. त्याने आजू-बाजूला पाहिलं. जवळ कोणीच नव्हतं. त्याने जिलेबीला हात लावला. ती खरी आहे हे समजताच वर पाहून त्याने हात जोडले आणि एकेक पदार्थाचा आस्वाद घेऊ लागला. आज बऱ्याच दिवसांनी गोपाळ पोटभर जेवला होता. पुन्हा देवाचे आभार मानून बोचक्याची उशी करून गोपाळ झोपी गेला. रात्र जशी वाढू लागली तसा थंडीमुळे गोपाळ कुडकुडू लागला. काही केल्या त्याला झोप येईना. गोपाळ पुन्हा विचारात बुडाला, "माझीच कुकर्म अशी मला छळत आहेत... कुठे माझा तो आलिशान बंगला आणि कुठे ही मळकट पथराळ जमीन...

मी गरीबांना लुबाडून श्रीमंती मिळवली आणि त्यांच्याच तळतळाटांनी आज माझी ही अवस्था झाली. माझा बंगला, नोकर-चाकर, धन-संपत्ती मला परत मिळावी... तसं झालंच तर यावेळी मी त्याचा नक्कीच सदुपयोग करेन..." विचारात मग्न असलेल्या गोपाळला अखेर झोप लागली. सूर्यप्रकाश डोळ्यांवर पडताच गोपाळची झोप चाळवली. त्याने डोळे किलकिले करून पाहिलं तर दोन जणं साफ-सफाई करत होते, एकजण पाण्याचा पेला घेऊन उभा होता आणि दोघं गोपाळच्या डोक्याजवळ उभे होते. गोपाळने आजू-बाजूला हात लावला तर मऊशार गादीचा स्पर्श त्याला जाणवला. गोपाळ ताडकन उठून बसला. त्याने पाहिलं तर तो त्याच्याच बंगल्यात होता. त्याच्याच बिछान्यावर. गोपाळशेट उठले म्हणून सर्व नोकरांची लगबग चालू होती. या सगळ्याने गोपाळमात्र पार गोंधळून गेला होता. तो विचार करू लागला, “रात्री तर मी फाटक्या कपड्यात आणि उठलो तर ही ऊंची वस्त्र, हा बंगला... चमत्कारच की...” इतक्यात एक नोकर जवळ येत म्हणाला, “शेट, आपल्याला भेटायला काही गावकरी खाली आलेत...”

गोपाळ आवरा-आवर करून खाली दिवाणखान्यात आला. तिथे काही माणसं बसली होती. गोपाळला पाहताच सर्व हात जोडून उभे राहिले. कोणी जमीन गहाण ठेवायला आलं होतं तर कोणी आपलं सामान विकायला आलं होतं. गोपाळला आपण पूर्वी कसे वागत होतो याची आठवण झाली. तो सर्व माणसांना सामोरा जात म्हणाला, “मंडळी, यापूर्वी मी तुम्हा गावकऱ्यांशी खूप वाईट वागलो. पण आता तसं होणार नाही. माझ्याकडे पुष्कळ धन आहे. तुमची ही मिळकत मला नको. तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे घेऊन जा. जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा परत द्या. मला व्याजही नको...” गोपाळचे हे शब्द ऐकून गावकऱ्यांनी एकाच जल्लोष केला. एक गावकरी पुढे होत म्हणाला, “शेट, आम्मासनी वाटलं व्हतं तुम्मी परतला म्हंजी आता पुन्यांदा आम्मासनी तरास द्येनार पर तुम्मी हे बोललात आम्मासनी लई बरं वाटलं बगा...” गोपाळचे आभार मानून सर्व निघून गेले. थोड्या वेळात अंघोळ करून, न्याहारी उरकून गोपाळ गावात फेरफटका मारायला गेला. जंगलात मिळालेला हिरा जवळ ठेवायला तो विसरला नाही...

एका झाडाखाली एक माणूस डोक्याला हात लावून बसला होता. गोपाळने त्याच्या जवळ जात असं बसण्याचं कारण विचारलं, तर तो म्हणाला, “आता काय सांगू तुम्मासनी शेट... म्या श्येताकडं ग्येलतो आन मागनं चोरट्यांनी घर फोडलं की माजं. पोरीच्या लग्नासाठी म्हनून दागिने पुरून ठेवले होते त्ये समदे न्येले की... आता काय करू म्या...” गोपाळने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, “काका, रडणं बंद करा बघू आधी... हे बघा, तुमचे दागिने तुम्हाला नक्की परत मिळतील. ते चोरच ते परत आणतील बघा. आणि तुमच्या मुलीसाठी चांगलं स्थळसुद्धा तुमच्या दाराशीच चालत येईल...” गोपाळ हे बोलून पुढे निघालाच होता की मागून आवाज आला. गोपाळने वळून पाहिलं, तर दोन माणसं त्या झाडाखाली बसलेल्या माणसाचे पाय धरत होती. त्यातला एक म्हणाला, “आम्हाला माफी करा. तुम्मी हितं दागिने पुरलेत ह्ये आम्मी पायलं आन त्ये चोरले. आम्मी म्होट्टी चूक क्येली. दागिन्यांचा ह्यो डबा परत घ्या आन आम्माला माफी करा. पुन्यांदा आम्मी आसं न्हाय करनार...”

बाजूलाच एक फेटा घातलेला माणूस, एक नववारी साडी नेसलेली बाई आणि एक देखणा तरुण उभे होते. तो फेटेधारी त्या माणसाला म्हणाला, “आम्ही पल्याड गावचे सरपंच बरं का... आन ह्ये आमचं कुटुंब. तुमची मुलगी लग्नाची हाय ह्ये समजलं म्हनून मुलासनी घेऊनच आलो बगा. जर मुलगी पसंत पडली तर बोलनी करूनच परत जाऊ. आनी, आम्मासनी फकस्त सून हवी. बाकी काय बी नको...” त्या माणसाचे डोळे पाणावले. त्याने जाऊन गोपाळच्या पायावर लोटांगण घातलं. म्हणाला, “गोपाळशेट, तुम्मी आलात आन माजे हरिवलेले दागिने माला मिळाले, माज्या पोरीचं लगीन ठरलं. तुम्मी द्येव हायसा गोपाळशेट द्येव हायसा...” त्या माणसाला गोपाळने उठवलं. पाठीवर थाप मारत म्हणाला, “आता कसलीही काळजी करू नका. तुमची मुलगी म्हणजे माझी बहीणच आहे की. लग्न ठरलं तर सगळा खर्च मी करेन. नमस्कार...” हे म्हणून गोपाळ पुढे चालू लागला. त्याच्या चेहऱ्यावरमात्र मोठ्ठ प्रश्नचिन्ह दिसत होतं...

गोपाळ पुढे गेला. एका झोपडीबाहेर एक म्हातारी रडत बसली होती. गोपाळने तिला रडण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली, “शेट, माज्या नातवाला साप डसला हो. आपल्या गावामंदी वैदू बी न्हाय. माजा मुलगा शेजारच्या गावाकडं ग्येला हाय वैदू आनाया. पर त्यो बी आजून आला न्हाय. माला तर लई कालजी लागी हाय बगा...” म्हातारीला धीर देत गोपाळ म्हणाला, “मावशी, काही काळजी करू नका. तुमचा नातू नक्की बरा होईल. मी तर म्हणतो तो आत्ता आजी आजी करत बाहेर येईल...” गोपाळनं हे म्हणण्याचा अवकाश, की, “आजी आजी...” अशा हाका ऐकू आल्या आणि पाठोपाठ एक मुलगा धावत येऊन त्या म्हातारीला बिलगला. आपले डोळे पुसत गोपाळकडे पाहत म्हातारी म्हणाली, “हे तुम्मी क्येलं शेट... माला वाटलं तुम्मी आम्माला काय बी बोलाल, पर... तुमचे लई उपकार जाले बगा...”

गोपाळ जे बोलतो ते सगळं खरं होतं ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. शिवाय गोपाळ आता पूर्वीसारखा राहिला नाही, तो पुरता बदललाय हेही सर्वांना समजलं. आता गोपाळला चांगल्या अर्थाने गावात मान मिळू लागला. लोक त्याला घरी बोलवू लागले. गोपाळलाही आपण चांगलं काम करतोय, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतोय हे पाहून समाधान वाटत होतं. पण त्याला सारखा एक प्रश्न भेडसावत होता, “या आधी तर असं कधीच झालं नाही. त्या जंगलातून परतल्यापासून हे सगळं सुरू झालं. असं काय घडलं असेल त्या जंगलात की मला ही शक्ती मिळाली... मी जी इच्छा व्यक्त करतो ती खरी होते याचं गुपीत मला समजावं...” “गोपाळ, तुला कुठलीही शक्ती मिळालेली नाही. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो आहे...” गोपाळ विचारच करत होता, की त्याला हा आवाज आला. त्याने पाहिलं तर त्याच्या खिशातून प्रकाश येत होता. गोपाळने खिशात हात घातला त्याच्या हाताला तो हिरा लागला. गोपाळने हिरा बाहेर काढला आणि तो हवेत तरंगू लागला. गोपाळ म्हणाला, “तू जादूचा हिरा आहेस का... हे सगळं तूच केलं आहेस का...” आणि तो हिरा बोलू लागला...

“हो गोपाळ. हे सगळं मीच केलं. माझी जादू मला धारण करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेवर चालते. तू मला धारण केलंस. तुझ्या इच्छा बोलत गेलास आणि मी त्या पूर्ण करत गेलो...” हे ऐकून गोपाळला आनंद झाला. तो म्हणाला, “हो ना... मग माझ्या आईलाही परत आणून दे ना...” तसा तो हिरा म्हणाला, “गोपाळ, अरे तुझं गेलेलं वैभव, तुझा मान-सन्मान मी तुला परत मिळवून दिला खरा, पण विधीलिखित कधीच बदलता येत नाही. ज्या व्यक्तीचं आयुष्य जितकं लिहिलं असतं, त्याला ते तितकंच मिळतं. विधात्यापुढे जादूही काहीच करू शकत नाही. हिऱ्याचं म्हणणं ऐकून गोपाळ थोडा खजील झाला खरा, पण निसर्गनियमापुढे आपण काहीच करू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्याने तो विषय बदलत विचारलं, “पण मग तू त्या ओढ्यात कसा काय पडलास... कुठून आलास तू...”

हिरा म्हणाला, “मी नीलमपरीच्या जादुई छडीवर विराजमान होतो. एकदा एका उद्यानात फिरत असताना मायासूर नावाच्या राक्षसाने तिला पाहिलं आणि आपल्या काळ्या शक्तीच्या जोरावर तिला एका पक्षाचं रूप देऊन एका सोन्याच्या पिंजऱ्यात कैद केलं. नीलमपरी पक्षाच्या रूपात परिवर्तीत होताच तिच्या हातून तिची छडी खाली पडली आणि जमिनीवर आदळल्याने मी छडीपासून वेगळा होऊन त्या ओढ्यात पडलो. त्यावेळी सगळं इतकं वेगाने घडलं की नीलमपरी काहीच करू शकली नाही. माझ्या समोर तो पिंजरा गायब झाला आणि नुसतं पाहण्याखेरीज मलाही काहीच करता आलं नाही. मला नीलमपरीला वाचवण्याची खूप इच्छा आहे. पण शेवटी मी एक दगड आहे. मला ना हात, ना पाय. आणि त्या मायासुराची काळी शक्तीही माझ्याहून प्रबळ आहे...”

तो हिरा गप्प झाला आणि गोपाळच्या हातात विसावला. गोपाळ म्हणाला, “आजपासून तू नुसता दगड नाहीस, तर माझा मित्र आहेस... तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास. आता तुझी ही इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य समजतो मी. त्या मायासुराच्या तावडीतून नीलमपरीला सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मला त्या मायासुराच्या राज्यात घेऊन चल...” हिरा पुन्हा तेजवान होऊन तरंगू लागला. तो म्हणाला, “गोपाळ, तू खूप चांगला माणूस आहेस. पण तो मायासूर, एक महाशक्तीशाली आणि कपटी राक्षस आहे. त्याच्याशी लढायला मी तुला काही आयुधं देतो. हिऱ्यामधून एक प्रकाश किरण बाहेर पडली आणि समोर एक तलवार प्रकट झाली. हिरा म्हणाला, “ही तलवार जोवर तुझ्या हातात राहील तोवर तुला कोणीही हरवू शकणार नाही...” पुन्हा हिऱ्यातून एक प्रकाश किरण बाहेर पडली आणि गोपाळच्या अंगावर चिलखत आणि हातात एक दोरखंड आला. हिरा म्हणाला, “हे चिलखत जोवर तुझ्या शरीरावर असेल तोवर तुला कोणतीच जखम नाही होणार आणि हा दोरखंड भिरकावल्यावर टोकाचा स्पर्श होताच एक घट्ट गाठ आपोआप बांधली जाईल. तू दोरखंड सोडताच गाठ आपोआप सुटून दोरखंड तुझ्या हातात येईल. आता मी तुला मायानगरात घेऊन चालतो. तिथे पोहोचल्यावर माझं तेज लुप्त होईल...”

गोपाळ अचानक गायब झाला आणि एका मोठ्या पर्वताजवळ पोहोचला. त्याच्यासमोर हवेत तरंगत असलेल्या हिऱ्याचं तेज गायब झालं आणि तो खाली पडू लागला. गोपाळने त्याला झेललं. त्याने पाहिलं तर एक काळा दगड त्याच्या हातात होता. गोपाळ स्वत:शीच म्हणाला, “म्हणजे मी मायानागरात पोहोचलो तर... आता त्या मायासुराचा समाचार घेतो...” गोपाळ हे बोलतच होता की पर्वताला मोठी फट पडली. आतून एक लांबसडक सरकता दगडी रस्ता बाहेर आला आणि लांबवर जाऊन थांबला. काही क्षण गेले असतील. एक अस्वल गोपाळच्या वासावर तिथे येऊन पोहोचलं. तो लाल डोळ्यांचा, सात-आठ फूट ऊंच हिंस्त्र प्राणी गोपाळने पाहिला आणि त्याने तलवार बाहेर काढली. ते अस्वल गोपाळवर धाऊन आलं. त्या सरकत्या रस्त्यावर अस्वलाचा पाय पडताच तो रस्ता हलला आणि स्वत:ची गुंडाळी करत क्षणार्धात अस्वलासकट पुन्हा पर्वतात गेला. ती फट बंद झाली आणि सगळं शांत झालं...

हे सगळं पाहून गोपाळला अचंभा वाटला. “काय असेल त्या पर्वताच्या फटीत, इतकं मोठं ते अस्वल आणि असं अचानक गायब झालं... कुठे जातो तो सरकता दगडी रस्ता... त्या मायासुरापर्यंत तर जात नसेल...” हा विचार करत गोपाळ तिथेच उभा होता, की पुन्हा पर्वतात फट दिसू लागली आणि तोच सरकत दगडी रस्ता बाहेर येऊन लांबवर गेला. गोपाळ विचार करू लागला, “जर मी या रस्त्यावर उभा राहिलो तर कदाचित आत जाता येईल मला...” गोपाळने मनाशी पक्क केलं आणि त्या रस्त्यावर तो पाय ठेवणार इतक्यात रस्ता हलला. गोपाळने मागे पाहिलं तर तो रस्ता स्वत:ला गुंडाळत होता. त्याच्या मार्गात एक हत्ती आला होता. आता मात्र गोपाळला घाई करण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. त्या दगडी रस्त्याच्या विळख्यात जर गोपाळ अडकला असता तर त्याच्या हाडांचा चेंदा-मेंदा झाला असता. गोपाळ त्या सरकत्या रस्त्यावरून पर्वतातल्या फटीकडे धावत सुटला. फटीजवळ पोहोचताच त्याला एक गुहा दिसली. गोपाळ तसाच धावत राहिला...

गुहेतच एक खोल दरी होती. तो सरकता रस्ता हत्तीला घेऊन मागून येतच होता. गोपाळला अचानक वरच्या बाजूला एक दगड दिसला. गोपाळने लगेच उडी घेतली आणि त्या दगडाला जाऊन लटकला. तो सरकता रस्ता फटीतून आत आला. फट बंद झाली. अचानक पाण्याचं कारंजं यावं तसं चहू बाजूंनी पाण्याच्या लाटा आल्या  आणि तो हत्ती त्या दरीत फेकला गेला. गुहेच्या वरच्या बाजूला दगडाला लटकलेला गोपाळ हे सर्व पाहत होता. गुहेतून त्या हत्तीचे चित्कार येणं बंद झालं. सगळीकडे भयाण शांतता पसरली. गोपाळने खाली उडी मारली. त्याने सर्वत्र नजर फिरवली. प्रचंड मोठ्या त्या गुहेच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला ठराविक अंतरावर गोपाळला सुळके दिसले. गोपाळ विचारात पडला, “इतक्या जोरात येणारं ते पाणी, ही खोल दरी, हे सुळके... काय प्रकार असावा हा... आणि आता आपण कुठे जायचं...” विचार करता करता गोपाळच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला...

"तो सरकता रस्ता, ते पांढरे दगड, ही दरी... म्हणजे... मी या राक्षसाच्या तोंडात आहे तर..." हा विचार गोपाळच्या मनात आला आणि भितीने त्याचा थरकाप उडाला. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. इतक्यात, "मला कोणीतरी वाचवा हो..." असा आवाज गोपाळला ऐकू आली. गोपाळने कान देऊन ऐकलं तर गुहेच्या वरच्या बाजूने ती हाक ऐकू आली होती. गोपाळचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं, "आवाज तर गुहेच्या वरच्या बाजूने येत आहे. पण मी तर या राक्षसाच्या तोंडात आहे... मग वर कसा जाणार..." गोपाळला एक युक्ती सुचली. गोपाळने पुन्हा उडी मारून तो दरीच्या वर असलेला दगड गाठला. त्याने दोरखंडाला वरच्या बाजूला भिरकावलं. दोरखंड एका ठिकाणी जाऊन अडकला...

गोपाळ त्याच्या सहाय्याने वर जाऊ लागला. मायासुराला आपण इथे आहोत हे कळलं तर नसेल ना, याचा तो अधून-मधून कानोसा घेत होता. पण मायासुराच्या बलाढ्य शरीरापुढे गोपाळ म्हणजे अगदीच मुंगी होता. त्यामुळे त्याला हायसं वाटत होतं. गोपाळ वर पोहोचला. तिथे त्याला दोन मोठाल्या गुहा दिसल्या. त्यातून वारा सारखा आत-बाहेर करत होता. त्या मायासुराच्या नाकपुड्या होत्या हे समजायला गोपाळला वेळ लागला नाही. यातून बाहेर जाण्याचा मार्ग नक्कीच असेल, हा विचार करत गोपाळ पुढे गेला. येत्या-जात्या वाऱ्याचा जोर इतका होता की गोपाळ सारखा मागे फेकला जात होता. तो जरा वेळ थांबला. येणाऱ्या व जाणाऱ्या वाऱ्यामध्ये काही क्षणांचा अवधी होता. गोपाळच्या हे लक्षात येताच त्याने त्या क्षणांची वाट पाहिली आणि संधी साधून तो पर्वताच्या बाहेरपर्यंत पोहोचला. गोपाळ बाहेर जाणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं, “अरेच्चा... जर आपण बाहेर पडलो तर कदाचित वर असलेल्या मायासुराच्या डोळ्यांनी मला पाहिलं तर...”

हा विचार मनात आला आणि गोपाळ थांबला. तो पुन्हा मागे फिरला आणि हवेच्या झोतापासून स्वत:ला वाचवत पुन्हा दरीपर्यंत पोहोचला. गोपाळने पुन्हा दोर वरच्या बाजूला भिरकावला. वर वर जात दोर एका ठिकाणी अडकला. दोराच्या सहाय्याने गोपाळ अजून वर गेला. सर्वत्र अंधारच अंधार होता. त्याला एका बाजूने वारा आल्यासारखं जाणवलं. गोपाळ वाऱ्याच्या दिशेने जात राहिला आणि काही क्षणातच तो गुहेच्या बाहेर पडला. त्याने खाली डोकावून पाहिलं तर जमीन खूपच खाली दिसत होती. गोपाळ विचार करू लागला, “खाली मी ज्या गुहेतून बाहेर पडलो ते जर मायासुराचं नाक होतं, तर हा कदाचित त्याचा कान असावा. म्हणजे आता मायासूर आपल्याला पाहू शकणार नाही...” गोपाळला जरा हायसं वाटलं आणि आता पुढे काय याचा विचार तो करत असतानाच, “वाचवा... मला वाचवा...” अशी हाक त्याला ऐकू आली...

गोपाळने कानोसा घेतला. आवाज वरच्या बाजूने येत होता. गोपाळ पुन्हा विचारात पडला, "हा जर मायासुराचा कान आहे, तर कानाच्या वर केस आणि मस्तक असतं. आणि येणारा आवाजही तिथूनच येत आहे. म्हणजे, आता मला या राक्षसाच्या डोक्यावर जावं लागणार तर... हाकेला ओ द्यावी का... पण नको. मायासुराला ऐकू गेलं तर..." गोपाळने पुन्हा एकदा प्रयत्नपूर्वक ती हाक ऐकली. विचार पक्का करत त्याने दोर वर भिरकावला. दोर वर जाऊन एका झाडाला अडकला. गोपाळ दोराच्या सहाय्याने वर जाऊ लागला. त्याच्या लक्षात आलं, की तो एका जंगलातून वर चालला आहे. हे जंगल म्हणजे कानापासून सुरू झालेले मायासुराचे केस होते हे समजायला गोपाळला वेळ लागला नाही. हळू हळू जंगल अजून दाट होत गेलं. गोपाळ दोराच्या टोकापर्यंत पोहोचला. झाडाला धरत तो खाली उतरला. काही वेळातच, "वाचवा... मला वाचवा..." ही हाक पुन्हा त्याच्या कानी पडली. हाकेचा कानोसा घेत दबक्या पावलांनी गोपाळ पुढे जात राहिला. वाटेत येणाऱ्या साप आणि विंचवांना चंद्राच्या मंद प्रकाशातही तो शिताफीने चुकवत पुढे जात राहिला...

बरंच अंतर पार केल्यावर अखेर गोपाळ जंगलाच्या मधोमध पोहोचला. तिथे एका पिंजऱ्यात एक पक्षी बसला होता. गोपाळ पिंजऱ्याच्या जवळ जात कुजबुजला, "तूच, हाक दिलीस का..." त्या पक्षाने गोपाळला पाहिलं आणि जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला, "हो. मीच हाक मारत होते. मी नीलमपरी. हा मायासूर त्याच्या प्रबळ विद्येच्या जोरावर मला इथे घेऊन आला. मला खात्री होती, की कधी ना कधी कोणीतरी मला वाचवायला येईल. म्हणून मी हाक देत राहिले. आणि आज तू आलास..." गोपाळ पुन्हा कुजबुजत म्हणाला, "परीताई, मी गोपाळ. तुझ्या छडीत असलेल्या हिऱ्याने मला सगळं सांगितलं आहे. मला सांग बरं, मी तुला यातून कसा सोडवू..."

नीलमपरी बोलू लागली, "गोपाळ, हा मायासूर खूप शक्तिवान आहे. त्याची विद्या माझ्याहूनही प्रबळ आहे. मायेच्या बळावर तू त्याला नाही हरवू शकणार, पण त्याची माया नष्ट होताच एका सामान्य राक्षसात त्याचं रूपांतर होईल. मगच त्याच्याशी लढून तुला विजय मिळवता येईल. या मायासुराच्या माथ्यावर एक काचेचा मणी आहे. त्यातूनच चंद्र व सूर्याच्या सहाय्याने या मायासुराला शक्ती मिळते. तो मणी तुटताच मायासुराची जादू संपेल आणि त्याचा वध केल्यावर मलाही या पिंजऱ्यातून मुक्ती मिळून माझं रूप मला परत मिळेल. पण गोपाळ, एकाच वारात तो मणी तुटायला हवा. नाहीतर जागच्या जागी तुझी राख होईल. आणि हो, मणी तुटताच तू खाली जा. या चिलखतामुळे तुला इजा होणार नाही. जा गोपाळ, माझे आशीर्वाद आहेत तुझ्या सोबत..."

पक्षी गप्प झाला. गोपाळने पिंजऱ्याला हात लावला व म्हणाला, "काळजी करू नकोस परीताई. मी सोडवेन तुला यातून. मला फक्त त्याच्या माथ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखव..." पक्षाने दाखवलेल्या मार्गावरून जात गोपाळ जंगलाच्या बाहेर पडला. त्याने खाली पाहिलं तर खोल दरी त्याला दिसली आणि तो उभा होता त्या जागेपासून खाली काही अंतरावर काहीतरी चमकत असल्याचं त्याला जाणवलं. गोपाळची विचार मालिका पुन्हा सुरू झाली, "मी जंगलाच्या बाहेर पडलोय म्हणजे आत्ता मी या मायासुराच्या माथ्यावर आहे तर... आणि ती चमकदार वस्तू म्हणजे तो मणी असावा. मला एकाच घावात तो मणी फोडायला हवा. कदाचित मायासूर दुसरा वार करण्याची संधीच देणार नाही..."

गोपाळने मनाशी काही ठरवलं आणि जंगलाच्या तोंडावर असलेल्या एका झाडावर दोर भिरकावला. दोराने झाडाच्या फांदीला घट्ट गाठ मारली. आता गोपाळ सज्ज झाला होता. त्याच्याकडे असलेल्या रुमालाचे त्याने दोन भाग करून दोन्ही हातांना गुंडाळले. दोराला पकडून घसरतच तो खाली येऊ लागला. मण्याजवळ पोहोचताच गोपाळने जोरदार लाथ मारली. लाथ बरोब्बर मण्यावर बसली. काचेला तडा गेला आणि क्षणार्धात काच फुटली. खाली येत गोपाळने दोर सोडून दिला आणि जमिनीवर कोलांटी उडी मारत उभा राहिला. काही क्षणातच तो महाकाय पर्वत हलू लागला. मोठ्या स्फोटानिशी पर्वताच्या ठिकऱ्या उडाल्या. धुळीच्या वाळवंटात गोपाळला, "हा...हा...हा..." असा जोर जोरात हसण्याचा आवाज आला...

वाळवंट नाहीसं झालं आणि गोपाळसमोर उभा होता जवळपास दोन पुरुष ऊंचीचा एक अजस्त्र राक्षस. लालभडक मोठाले डोळे, काळीकुट्ट केसाळ काया, सुळक्यांसारखे बाहेर आलेले मोठाले दात, अशा आविर्भावातला तो राक्षस मायासूरच होता. त्याच्या हातात तो पिंजरा होता आणि पिंजऱ्यात होती पक्षाच्या रूपातली नीलमपरी. मायासुराने पिंजरा खाली ठेवला. बाजूलाच पडलेला एक खडक उचलून त्याने गोपाळवर भिरकावला. तो प्रचंड दगड गोपाळवर आदळणार इतक्यात गोपाळ बाजूला झाला. दगड जमिनीवर आपटून त्याचा चक्काचूर झाला. मायासुराने पुन्हा बाजूला पडलेले दगड उचलले आणि गोपाळकडे भिरकावले. गोपाळने चपळाई करत दोन्ही दगडांपासून स्वत:चा बचाव केला. हे पाहून मायासूर चवताळला. त्याने हात समोर धरला आणि क्षणार्धात त्याच्या हातात भलीमोठी तलवार प्रकट झाली. “हा...हा...हा...” असं किळसवाणं हसत मायासूर गोपाळवर धाऊन आला...

तलवारींच्या पाती एकमेकींवर आदळल्या. घर्षणामुळे ठिणग्या निर्माण होऊ लागल्या. मायासूर जरी धिप्पाड असला तरी गोपाळ त्याला बरोब्बर पुरून उरत होता. लढता लढता गोपाळला एक खडक मायासुराच्या पायाशी दिसला. वाऱ्याच्या वेगासरशी गोपाळ धावला आणि खडकावर पाय देऊन त्याने हवेत उडी घेतली. तलवारीच्या एका वारानिशी त्याने मायासुराचं शीर धडावेगळं केलं. शीर जमिनीवर आपटताच प्रचंड स्फोट झाला पण मायासुराचं धड अजून तसंच उभं होतं आणि वार करत राहिलं. पिंजऱ्यात असलेल्या नीलमपरीने ओरडून सांगितलं, “गोपाळ, मायासुराच्या हृदयात अमृतकुंभ आहे. त्याचं हृदय नष्ट कर, तरच मायासुराचा अंत होईल. नाहीतर काही क्षणातच त्याला त्याचं शीर परत मिळेल...” गोपाळला समजलं. त्याने पाय अडकवून मायासुराच्या धडाला खाली पाडलं. त्याच्या छातीवर बसून तलवार त्याच्या हृदयात खुपसली आणि पूर्ण ताकदीनिशी बाहेर काढली. त्यासरशी मायासुराचं हृदय हवेत उडालं आणि जमिनीवर पडून स्फोट होऊन नष्ट झालं...

मायासुराचा अंत झाला होता. त्याचं शरीर हळू हळू वितळत जाऊन नाहीसं झालं. पिंजऱ्याचीही वाफ झाली आणि एक सुंदर परी त्या ठिकाणी दिसू लागली. गोपाळच्या अंगरख्यातला खिसाही चमकू लागला आणि तो हिरा तेजोमय होऊन बाहेर येऊन हवेत तरंगू लागला. नीलमपरीने हात पुढे केल्याबरोब्बर तो हिरा अलगद तिच्या हातात विसावला. हिरा आणि नीलमपरीचा एकमेकांशी स्पर्श होताच नीलमपरी भोवती एक सोन्याचं वलय तयार झालं. नीलमपरी म्हणाली, “गोपाळ, तू आधी कोण होतास, कसा वागलास आणि आत्ता कसा वागतो आहेस याची मला पूर्ण जाणीव आहे. तू केलेल्या साहसामुळे मी परत आले आणि तुझ्या गावातही तुझ्या चांगुलपणामुळे अनेकजण सुखी झाले. म्हणूनच मी हा हिरा तुला भेट देणार आहे. या हिऱ्याचा तू नक्की सदुपयोग करून अजून मोठा होशील...” हे बोलून नीलमपरीने हात मोकळा केला. हिरा पुन्हा हवेत तरंगत जाऊन गोपाळच्या हातात विसावला. नीलमपरी अंतर्धान पावली. हात जोडत गोपाळ म्हणाला, “परीताई, मी या माझ्या मित्राचा योग्य मान राखेन...”

समाप्त.

Saturday, December 22, 2018

ऑटोचाचा...



"साहब, कूली चाहिये... एक बस्ते का बीस रुपिया... ठेसन के बाहर तक छोड़ेगा साहब...", "उसका मत सुनो साहब, वह आपको बीचमें ही छोड़ देगा... आप समान मुझे दो... एक का पंधरह रुपिया..." निज़ामुद्दीन स्टेशनवर पाऊलही ठेवलं नव्हतं की कुलींच्या फौजेने ट्रेनच्या डब्ब्यातच मला घेराव घातला. बँकेत असल्याने बदलीवर मी इथे आलो होतो. स्वत:च्या घरापासून, माणसांपासून इतक्या लांब पहिल्यांदाच आल्याने आधीच थोडा सैरभैर झालो होतो, त्यात यांची भर. माझ्या दोन्ही बॅगा घट्ट धरत त्या कूलीसेनेला कापत मी स्टेशन बाहेर पडलो...

आता हुश्श् करणार इतक्यात अजून एक लढाई माझी वाट पाहत होती. एखादा नेता किंवा अभिनेता समोर येताच चाहते आणि पत्रकार त्याच्याभोवती जसा पिंगा घालतात तसाच माझ्या समोरचा रिक्षावाले, टॅक्सीवाले, गाईड यांचा जमाव पाहून मी थक्क झालो. "साहब किधर चलेंगे..."  "चलो साहब... देखो ए.सी. टॅक्सी है...", "होटल चलेंगे सर... ए वन इंतजाम करके दूँगा सर... फिक्स रेट..." अशा वाक्यांच्या हल्ल्याने बेजार होत असताना रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या रिक्षाकडे माझी नजर गेली. एक माणूस रिक्षाला टेकून पेपर वाचत होता...

मनात विचार पक्का केला आणि लगेच त्या रिक्षाकडे निघालो. जवळ पोहोचताच पेपरमधून डोकं वर काढत ते गृहस्थ हसत म्हणाले, "ऑटो चाहिये साहब..." त्यांचा आवाज आणि त्यांचं तिथे असणं मनाला भावून गेलं. मी होकार देताच त्यांनी माझ्या बॅगा आत ठेवल्या. मी आत बसताच त्यांना म्हणालो, "ब्लॉक २६, भोगल... यहाँ जाना है..." तशी ते गृहस्थ पटकन म्हणाले, "अरे... जयदीपजी की कोठी (दिल्लीमध्ये बंगल्यांना कोठी म्हणतात हे त्यावेळी मला समजलं...) पर जाओगे..." त्यांचं उत्तर ऐकून मी उडालोच...

"आप जानते हैं उन्हें..." या माझ्या वाक्यावर ते हसत म्हणाले, "अरे जयदीपजी तो हमारे भोगल की शान हैं. फौज में मेजर थे. अब रिटायर होकर आराम की ज़िंदगी बसर कर रहें हैं. मैं भी भोगल में ही रहता हूँ. तो आप हैं उनके नये किरायेदार..." त्या गृहस्थांच्या गप्पांच्या ओघात मला हवी असलेली जागा कधी आली तेच समजलं नाही. मी पैसे विचारले तर म्हणाले, "साहब, वैसे तो मीटर के हिसाब से पचास रुपए होते हैं पर मीटर खराब है तो जो मर्ज़ी हो दे दिजिए..." त्यांचं हे प्रामाणिक वक्तव्य आवडलं मला. मी हसत पन्नासची नोट त्यांच्या हातावर ठेवली. सलाम करून ते जाऊ लागले...

का कोणास ठाऊक, मला ओळख वाढवावीशी वाटली. मी माझं नाव सांगितलं. ते गृहस्थ म्हणाले, "मेरा नाम इक़्बाल है, पर यहाँ के बाशिंदे मुझे ऑटोचाचा कहते हैं साहब..." त्यांचं मला 'साहब' म्हणणं मला पटत नव्हतं. मी पटकन म्हणालो, "चाचा, साहब मत कहो मुझे. मैं हूँ तो आपसे छोटाही..." ऑटोचाचा हसले. "ठिक है बेटा. नहीं कहूँगा... अच्छा, अब चलता हूँ. ख़ुदाहाफ़ीस..." इतकं बोलून ते रिक्षा घेऊन निघून गेले. दिवस सरला. सकाळी नव्या ब्रांचमध्ये जायचं म्हणून जरा लवकरच निघालो. खाली येऊन पाहतो तर समोर ऑटोचाचा रिक्षा घेऊन उभे...

"अरे ऑटोचाचा, इतनी सुबह सुबह आप यहाँ..." हा प्रश्न मी विचारणार इतक्यात तेच म्हणाले, "आ गए बेटा... चलो, तुम्हें तुम्हारे दफ़्तर छोड़ देता हूँ... कहाँ जाना है..." माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ते बाहेर आले. माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "बेटा, कल स्टेशनपर समान के साथ तुम्हें अकेले देखा तभी समझ गया, की तुम यहाँ तबादला होकर आए हो. नया शहर, नये लोग, इसलिए सोचा कहीं पहलेही दिन दफ़्तर ढूँढ़ते तुम परेशान ना हो जाओ..." ऑटोचाचांचा हा आपलेपणा मला खूप आवडला. मी रिक्षात बसून त्यांना बँकेचा पत्ता सांगितला आणि आमचा प्रवास सुरू झाला...

त्यांच्या खमंग गप्पांमध्ये माझी ब्रांच कधी आली तेच समजलं नाही. दिवसभराचं काम उरकून पाचला मी बाहेर पडलो तर समोर ऑटोचाचा उभे. “अरे, ऑटोचाचा... आप यहाँ...” माझ्या या प्रश्नावर ते हसत म्हणाले, “बेटा, आज तुम्हारा पहला दिन था... अब इस वक्त कहाँ भीड में धक्के खाओगे... अब तो मीटर भी ठीक हो गया है... आज मै छोड़ देता हूँ कल से खुद चाले जाना...” मी रिक्षात बसत म्हणालो, “ऑटोचाचा, सुबह की बात और है, पर शाम को मेरा निकलने का टाईम फिक्स नहीं है... हाँँ, पर हर सुबह मैं आपका इंतजार करुँगा...” ऑटोचाचा फक्त हसले. दुसऱ्या दिवसापासून तर आमच्यात हा अलिखित ठरावच पास झाला. रोज सकाळी ऑटोचाचा मला ब्रांचपर्यंत सोडायचे आणि संध्याकाळी मी माझा माझा परत यायचो...

साधारण साडे-पाच फूट ऊंची, निम-गोरा वर्ण, काळ्या भिंगाच्या चष्म्याआड लपलेले पिंगट डोळे, आणि साठीकडे झुकलेल्या ऑटोचाचांचं वजन असेल साधारण साठ-सत्तर किलो. त्यांच्या वयामुळे, कामामुळे आणि कदाचित त्यांच्या आपलेपणाने बोलण्यामुळेही असेल कदाचित पण ऑटोचाचा हे नाव त्यांच्यावर जमून गेलं. त्यांच्याकडे पाहून कधी कधी वाटायचं त्यांच्या घरच्यांची माहिती करून घ्यावी पण ऑटोचाचांना आवडेल नाही आवडणार म्हणून कधी विचारलं नाही. अशातच आठवडा सरून गेला. येणारा रविवार इतरांसाठी कसाही का असेना पण माझ्यासाठी कंटाळवाणा होणार होता. दिवसभर काय करावं हा यक्षप्रश्न मनात घेऊन शनिवारी मी झोपी गेलो...

रविवारची सकाळ जरा निवांत होती. चहा-नाश्ता करता करता दहा वाजले. मी सहज बाल्कनीमध्ये आलो तर खाली ऑटोचाचा दिसले. मी खाली येत म्हणालो, “अरे, ऑटोचाचा आप... लेकीन आज तो छुट्टी है...” ऑटोचाचा लगेच म्हणाले, “मुझे पता है बेटा... मैंने सोचा आज मैं भी छुट्टी ले लूँ... चलो, आज तुम्हें दिल्ली की सैर करा दूँ...” मलाही कुठेतरी फिरायला जाण्याची इच्छा होतीच, पण एकट्याने कुठे जायचं शिवाय ऑटोचाचांना किती त्रास द्यायचा म्हणून मी गप्प होतो. ऑटोचाचांचे शब्द ऐकले आणि मला हुरूप आला. मी म्हणालो, “ठीक है ऑटोचाचा, चालते हैं... पर...” बहुतेक ऑटोचाचा समजले असावेत. म्हणाले, “अरे ठीक है बेटा, यह लो, मीटर शुरू कर दिया है. जो भी होगा वह दे देना, ठीक है...” मी हसलो आणि रिक्षात बसलो...

आधी हुमायूँचा मक़बरा मग लाल किल्ला पाहिला. तिथेच असलेल्या प्रसिद्ध पराठेवाली गलीमध्ये आम्ही दोघं जेवलो. निघता निघता चार वाजून गेले. आम्ही दोघांनी चहा घेतला. ऑटोचाचा म्हणाले, “बेटा, इस ट्राफिक में घर जाते जाते शाम हो जायेगी अगर और थोड़़ी देर रुक सको तो इंडिया गेट का चक्कर लगा लें...” नाहीतरी घरी जाऊन मी काय करणार होतो... मी होकार दिला आणि ऑटोचाचाने रिक्षा चालू केली. संध्याकाळच्या वेळी प्रकाशमान झालेलं इंडिया गेट आणि त्याच्या सभोवतालचा रस्ता, हे सगळं दृष्य अत्यंत मनोरम होतं. ऑटोचाचांनी एका जागी रिक्षा थांबवली. रस्त्यालगतच्या एका गाडीवर आम्ही शिकंजी प्यायलो. शिकंजी पिता-पिता आमच्या गप्पा सुरू झाल्या. एकेक वळणं घेत गप्पांची गाडी एकमेकांच्या कुटुंबावर आली. मी मुंबईत असलेली माझी आई आणि सहा महिन्यापूर्वीच लग्न करून आलेली बायको यांबद्दल सांगितलं. आईला दिल्लीची हवा मानवणार नव्हती म्हणून ती मुंबईतच राहणार होती आणि बायकोने तर राजीनामाच दिला होता पण तिला इथे यायला अजून महिनाभर होता हेही सांगून ऑटोचाचांना त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं. ऑटोचाचा बोलू लागले...

“मैं लाहोर का बाशिंदा हूँ. बँटवारे के वक्त मेरी अम्मी और अब्बा मुझे यहाँ ले आये. हम तीनों का पेट भरने के लिए यह ऑटो... आधी ज़िंदगी गुजर गयी तीन ज़िंदगियाँ सँवारने में. अम्मी और अब्बा गुज़र गये पर यह ऑटो हाथ से नहीं छूटा...” ऑटोचाचा गप्प झाले. मीही माझी शिकंजी संपवली. अशावेळी बोलून काही उपयोग नसतो हे माहित होतं मला. हा रविवार अविस्मरणीय असा गेला होता. आता तर मी रविवारची वाट पाहू लागलो जेव्हा ऑटोचाचा मला कुठे ना कुठेतरी फिरायला नेत असत. सोबत असायच्या असंख्य गप्पा आणि ऑटोचाचांचे खुसखुशीत किस्से. दिवस भराभर सरत गेले. तेजू आली आली माझा एकटेपणा जणू पळूनच गेला. ऑटोचाचाशी मी तिची ओळख करून दिली आणि आम्हा तिघांचं रविवार विशेष आयुष्य सुरू झालं. एखाद्या दिवशी ऑटोचाचा आम्हाला काही-बाही खायला आणत तर कधी तेजू त्यांच्यासाठी गोड-धोड करून पाठवत असे. ईदीच्या दिवशी ऑटोचाचाने त्यांची खास शेवयांची खीर आणली होती आमच्यासाठी. ऑटोचाचांच्या रूपाने आम्हा दोघांनाही घरापासून इतक्या लांब एक वडीलधारी हात मिळाला होता...

बघता बघता दीड वर्ष कसं निघून गेलं हे समजलंच नाही. अखेर तो दिवस उजाडला. माझी पुन्हा मुंबईला ट्रांस्फर झाल्याची ऑर्डर माझ्या हातात पडली. घरी परत जाण्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावरून काही हलत नव्हता. घरी येऊन तेजूला ही बातमी दिली. तीही भलतीच खुश झाली. ही बातमी आम्ही छान सेलिब्रेट केली. सकाळी ऑटोचाचा मला न्यायला आले आणि माझा हसरा आनंदी चेहरा पाहून म्हणाले, “आज बहुत खुश लाग राहे हो बेटा... क्या बात है...” मी त्यांना माझ्या ट्रांस्फरची बातमी सांगितली. “तो तुम वापस जाओगे...” हे शब्द उच्चारताना ऑटोचाचांच्या आवाजातील फरक मला प्रखर्षाने जाणवला. त्या दिवशी ऑटोचाचा फारसे काही बोलले नाहीत. असेच सहा दिवस निघून गेले. शनिवारी जेव्हा ऑटोचाचाने मला ब्रांचमध्ये सोडले तेव्हा मी त्यांना विचारलं, “ऑटोचाचा, कल हम वापस जा राहे हैं... हमें एयरपोर्ट छोड़ने आयेंगे ना...” ऑटोचाचा काही बोलले नाहीत, फक्त हसले...

आमचा जाण्याचा दिवस उजाडला. सर्व तयारी करून बाल्कनीमध्ये आलो तर खाली ऑटोचाचा उभे होते. आम्ही सामान घेऊन खाली आलो. रिक्षा सुरू झाली. पूर्ण प्रवासभर ऑटोचाचा गप्पच होते. एयरपोर्टला आम्ही उतरलो. ऑटोचाचांना नमस्कार करावा असं आम्हा दोघांनाही वाटलं. आम्ही तसं केलंही. ऑटोचाचा ओशाळले. आवंढा गिळत म्हणाले, “खुश रहो तुम दोनों... यह जोड़़ी हमेशा सलामत रहे...” मी मीटरचे पैसे काढले तर ऑटोचाचा म्हणाले, “नहीं बेटा, आज पैसे नहीं लूँगा. आज मेरी यह बेटी अपने ससुराल जा राही है, उसकी बिदाईही समझलो... कभी वापस आना तो इस ऑटोचाचा को ज़रूर याद करना... अच्छा ख़़ु़ु़ुदा ख़़ैर करे...” आम्ही आत गेलो. मागे वळून पाहिलं तर ऑटोचाचा रिक्षात बसून आपले डोळे पुसताना दिसले. आज सहा वर्ष झाली आम्हाला दिल्ली सोडून, पण आजही ऑटोचाचांच्या आठवणी तशाच आहेत. काही माणसं आयुष्यभर आपल्या सोबत असूनही आपल्या मनाचा कौल घेत नाहीत, पण ऑटोचाचांसारखी काहीच माणसं असतात, जी अल्पकाळातल्या सहवासातसुद्धा आपल्या मनात पक्कं स्थान मिळवतात. नाही का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, November 16, 2018

लढा...



सुजानगढ, भारताच्या मध्यावर वसलेलं एक सुंदर, आनंदी आणि प्रगतीशील राज्य. राज्याचे महाराज कुमारसिंह आणि महाराणी सुलेखादेवी खूप प्रेमळ आणि प्रजेला हवेहवेसे होते. राज्यात सर्वकाही छान होतं पण एकच सल होता. महाराज आणि महाराणीच्या विवाहाला दहा वर्षे सरून गेली तरी त्यांना मूल-बाळ नव्हते. राजपुरोहितांनी त्यांना त्यांच्या पारंपारिक मंदिरात जाऊन देवाला साकडं घालण्यास सांगितले. महाराज आणि महाराणी पूजा करून परतत असताना त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी पाहिलं तर देवळाच्या मागच्या बाजूला वाहत असलेल्या नदीच्या किनारी एका परडीत ते बाळ होतं. सुलेखादेवीने ते बाळ उचललं. महाराज म्हणाले, “उगवतीच्या वेळी सूर्यदेवाने दिलेला हा प्रसाद म्हणून आजपासून याचं नाव आदित्य...” महाराजांनी आदित्यच्या दोन्ही हातांवर असलेलं गोंदण पाहिलं. त्याच्या उजव्या हातावर एक पक्षी होता तर डाव्यावर एक ज्योत होती. आदित्य ज्या परडीत होता त्यात एक छोटा कागदही होता. त्यावर लिहिलं होतं, “जेव्हा हे हात एकत्र येतील तेव्हा आकाशाला सीमा नसेल आणि अग्नीचा पाऊस पडेल...” या ओळीचा अर्थ कोणालाच उलगडत नव्हता पण त्यावेळी महाराज आणि महाराणी यांनी त्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. महाराज आणि महाराणीने आदित्यला त्यांच्यासोबत नेलं. त्यांच्या छायेत आदित्य महालात राहू लागला. एक वर्ष सरून गेलं...

अखेर नवस फळाला आला आणि महाराणी सुलेखादेवीच्या पोटी एका नक्षत्रासारख्या सुंदर मुलीने जन्म घेतला. त्या मुलीचं नाव अवंतिका ठेवलं गेलं. आदित्य आणि अवंतिका एकत्र वाढू लागले. आदित्य शस्त्रास्त्र बनवण्यात तरबेज होता आणि अवंतिका तलवार चालवण्यात पारंगत होती. तलवार युद्ध दोघांच्याही आवडीचा खेळ होता. त्यांना जेव्हा संधी मिळे तेव्हा महालाच्या पटांगणात ते दोघं तलवार युद्धात रमून जात. राजकुमारी अवंतिका तलवार युद्धात कुशल होत आहे हे पाहून महाराज आणि महाराणी मनोमन सुखावत होते पण अवंतिका व आदित्यचे गुरू आणि सिंहासनाचे रक्षक भीमसिंह यांनामात्र आदित्य आणि अवंतिकाची ही जवळीक फारशी रुचत नव्हती. एकाएकी काळाने पावलं फिरवली आणि महाराज कुमारसिंह आजाराने ग्रस्त झाले. त्याच आजारात ते गेले आणि राजकुमारी अवंतिकासह सुजानगढची जबाबदारी महाराणी सुलेखादेवींवर आली. महाराणी सुलेखादेवीने आपल्या मुलासारखा राज्याचा सांभाळ केला पण वृद्धापकाळामुळे त्यांना अडचणी येऊ लागल्या. तेव्हा सुलेखादेवीने राजकुमारीचा स्वयंवर आयोजित केला जेणेकरून राजकुमारीच्या वराला राज्याभिषेक करवून राज्याचा कारभार त्याच्यावर सोपवला येईल...

स्वयंवराचा दिवस उजाडला. आज कोणीतरी राजकुमारीला पसंत करेल, तिला मागणी घालेल म्हणून महाराणी सुलेखादेवी बेहद खुश होत्या. अवंतिकाला सजवण्यासाठी दासींना दालनात पाठवण्यात आले पण अवंतिका कुठे होती तिथे. ती तर पटांगणात आदित्यसोबत तलवार युद्धाचा सराव करत होती. आदित्यचा एकेक वार ती चुकवत होती आणि संधी मिळेल तसा पलटवारही करत होती. तलवारी खणखणल्या आणि एका क्षणी आदित्यने अवंतिकाला डोळा मारला. अवंतिकाचं लक्ष विचलित झालं आणि आदित्यने संधी हेरून अवंतिकाच्या हातावर फटका मारला. त्यासरशी तलवार गळून पडली. आदित्य म्हणाला, “राजकुमारी अवंतिका... हरलीस बरं का तू... तलवार चालवताना लक्ष विचलित होऊन नाही चालत...” अवंतिका हसली आणि तिने हार स्वीकारत तलवार म्यान केली. म्हणाली, “आदित्य, आपण लहानपणापासून एकत्र खेळलो, शिकलो, मोठे झालो पण एक शंका तुला विचारायची राहूनच जाते बघ... हे तुझ्या हातांवरील गोंदण... काय अर्थ असावा यांचा...” आदित्यने एकवार गोंदणांकडे पाहिलं. म्हणाला “मलाही काहीच माहित नाही. महाराजांना मी जेव्हा सापडलो तेव्हा ही गोंदणं माझ्या हातांवर होती म्हणे आणि सोबत एक चिठ्ठी होती ज्यात लिहिलं होतं, “जेव्हा हे हात एकत्र येतील तेव्हा आकाशाला सीमा नसेल आणि अग्नीचा पाऊस पडेल...” मला तर काहीच कळत नाही याबद्दल पण एक गोष्ट नक्की, जेव्हाही अग्नी दिसे किंवा मी अग्नीच्या संपर्कात येत असे तेव्हा हातावरची ही ज्योत चमकत असे आणि अग्नी मला पिसासारखा भासे... याखेरीज या गोंदणांचा काय अर्थ तेच समजत नाही...” दोघं बोलत असताना एक भालदार तिथे येत म्हणाला, “महाराणींचा विजय असो...”

राजकुमारी, आपणाला राणीसरकारने दालनात पाचारण केले आहे. स्वयंवरानिमित्ते इतर राज्यांचे राजकुमार येण्याची वेळ झाली आहे...” भालदार निघून गेला. अवंतिकाला चिडवत आदित्य म्हणाला, “चला... आता राजकुमार येणार... आपल्याशी बोलायचं असेल तेव्हा आता स्वारींची अनुमती घ्यावी लागणार...” अवंतिकामात्र या स्वयंवरासाठी फारशी उत्सूक दिसत नव्हती. तिच्या मनात फक्त आदित्य होता पण गरीब व श्रीमंत या फरकामुळे ती कधी आदित्यला सांगू शकली नाही. सुलेखादेवींच्या आग्रहाखातर तयारी करून अवंतिका दरबारात आली. अनेक राज्यांच्या राजांनी व राजकुमारांनी दरबार भरला होता. हातात वरमाला घेऊन अवंतिका सर्वांवर एकेक कटाक्ष टाकत होती. तिने ठरवलं होतं, सर्वांकडे पहायचं पण पसंती न दर्शवताच माघारी जायचं. अवंतिका माघारी निघाली आणि इतक्यात सरबताचे पेले घेऊन चाललेला सेवक पाय अडखळून पडला आणि पेला एका राजकुमारावर उपडा झाला. तो राजकुमार क्रोधीत झाला आणि तलवार उपसून त्या सेवकावर धावून गेला. अवंतिकाने वरमाला झुगारून बाजूलाच उभ्या असलेल्या सैनिकाच्या म्यानातली तलवार उपसून त्या राजकुमाराचा वार थांबवला. तो सेवक चळचळा कापत होता. अवंतिका म्हणाली, “हात आवरा राजकुमार... एका छोट्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नाही असू शकत... आणि तुम्ही विसरताय राजकुमार, हा आमच्या मातोश्रींचा म्हणजे महाराणी सुलेखादेवींचा दरबार आहे...”

दुसऱ्या हाताने अवंतिकाला दूर ढकलत तो राजकुमार म्हणाला, “आम्ही थंबोरचे राजकुमार कालीसिंह आहोत. या तुच्छ सेवकाने आमचा अपमान केला आहे. याचा शिरच्छेद झालाच पाहिजे. नाहीतर...” कालीसिंह पुढे बोलणार इतक्यात अवंतिकाने त्याच्या मुस्कटात मारली. गाल चोळत कालीसिंह मागे झाला पण काळ्या पोशाखातला भरघोस दाढी-मिशा असलेला एक इसम उभा राहत म्हणाला, “महाराणी सुलेखादेवी... आम्ही थंबोरचे महाराज दुर्जनसिंह आहोत. आम्हास वाटले होते, स्वयंवरात अवंतिका कालीसिंहांचा स्वीकार करेल आणि हे राज्य आम्हास मिळेल. पण आता असं वाटतंय वेगळा मार्ग निवडायला हवा...” बोलत असताना दुर्जनसिंह टाळ्या वाजवल्या. काळे कपडे परिधान केलेल्या सैनिकांनी प्रचंड प्रमाणात दरबारात प्रवेश केला. येताना वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला तलवारीने ठार करत ते पुढे सरकले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सगळे सैरभैर झाले. अवंतिका कालीसिंहशी लढत होती तर सुलेखादेवींवर चाल करून आलेल्या दुर्जनसिंहला भीमसिंह थोपवत होता. आदित्य एकीकडे काळ्या सैन्याशी मुकाबला करत असताना संधी साधून दुर्जनसिंहाने सुलेखादेवींवर वार केला. वार वर्मी बसला. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवरून सरपटत जाणाऱ्या सुलेखादेवींवर कालीसिंहाने तलवार चालवली आणि त्यांचा अंत केला. आपल्या आईची दुर्दशा पाहून तिच्याकडे झेपावणाऱ्या अवंतिकाला भीमसिंह व आदित्य थोपवत मागे घेऊन गेले. दुर्जनसिंहचं सैन्य प्रचंड होतं आणि भीमसिंह व आदित्यकडे दुसरा पर्याय नव्हता. “मातोश्री, मी स्वस्थ बसणार नाही... दुर्जनसिंह मी परत येईन...” असं म्हणणाऱ्या अवंतिकाला दोघं चोर दाराकडे घेऊन गेले...

चोर दरवाजाजवळ पोहोचताच मागे जाण्यासाठी झगडणाऱ्या अवंतिकाला भीमसिंहकडे सोपवत आदित्य म्हणाला, “अवंतिकाच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे गुरूदेव. आपल्या मागे येणाऱ्या सैन्याला मी थोपवतो. ते अवंतिकापर्यंत पोहोचता कामा नयेत. अवंतिका, आपल्याला सुजानगढ परत मिळवायचा आहे पण आत्ता दुर्जनसिंहाचं सैन्य जास्त आहे. तेव्हा तूर्तास माघार घेणं आवश्यक आहे...” भीमसिंहांना आदित्यचं म्हणणं पटलं पण अवंतिका मानत नव्हती. आदित्यने तिला त्यांच्यातल्या मैत्रीची शपथ घातली तेव्हा अवंतिका जायला तयार झाली. बाहेर जात असताना अवंतिका म्हणाली, “आदित्य, मला तुझी साथ हवी आहे... मी परत येईन आदित्य...” अवंतिका आणि भीमसिंह चोरवाटेने बाहेर धावत होते आणि मागे खणखणणाऱ्या तलवारींचे आवाज हळू हळू कमी होत होते. महालाबाहेर मागच्या बाजूच्या जंगलात अवंतिका आणि भीमसिंह पोहचले. त्यांना काय करावं सुचत नव्हतं. काट्याकुट्यातून वाट काढत ते दोघं पुढे जात होते. तिकडे महालात समोर आलेल्या सैन्याशी आदित्य लढत होता. आदित्यवर अग्निबाण आणि भाल्यांचा वर्षाव होऊ लागला पण आगीचे चटके न लागता आदित्यला अधिक शक्तीचा भास होऊ लागला. त्याच वेळी त्याच्या डाव्या हातावरील ज्योत प्रकाशमान होताना त्याला दिसली. आदित्यचं लक्ष विचलित झालं आणि त्याच वेळी दुर्जनसिंहाच्या सैनिकांनी त्याला पकडून त्याच्या हातात बेड्या अडकवल्या. दुर्जनसिंह आणि कालीसिंह तिथे पोहोचले. कालीसिंहाने तलवार उपसून आदित्यवर वार केला पण दुर्जनसिंह तो थोपवत म्हणाले, “थांब काली... आत्ता नाही... आधी आपली शक्ती तर पाहू दे याला... याच शक्तीने मृत्यू देऊ याला. आदित्य, बहादूर आहेस ना मग बहादुरासारखाच मृत्यू देऊ तुला... प्रतीक्षा कर...”

आदित्यला कोठडीत बंद केलं गेलं. सर्वजण निघून गेल्यावर कोठडीच्या दुसऱ्या बाजूला वर असलेल्या झारोख्याखाली येत आदित्यने शिळ घातली. त्यासरशी एक गरुड त्या झारोख्यावर आला आणि आत येण्याचा प्रयत्न करू लागला. आदित्य म्हणाला, “राजा, उगा त्रास नको करूस. तुला या सळ्यांमधून आत येता येणार नाही. एक काम कर... अवंतिका सुखरूप आहे का ते पाहून ये. आणि हो, मला पकडल्याचं तिला सांगू नकोस. क्रोधाच्या भरात नको ते धाडस करायला सरसावेल ती. जा, लवकर जा मित्रा...” राजाने आकाशात झेप घेतलीच होती की पावलांचा आवाज आला. आदित्य लगेच पुढच्या बाजूला येऊन बसला. कालीसिंह आपल्या सैनिकांसह तिथे आला. आदित्यकडे पाहत म्हणाला, “चला राजे, आपल्या मृत्यूचं साधन कसं आहे ते पारखून घ्या... घेऊन या रे याला बाहेर...” कालीसिंह निघून गेल्यावर हुकुमानुसार सैनिकांनी आदित्यलाही अजून बेड्या घालून बाहेर आणलं. पटांगणात एक प्रचंड मोठी तोफ होती. तोफेला बत्तीची जागाच नव्हती पण माणसाची मूठ जाईल इतकीच जागा होती. साखळदंडाने एका मुलीला तोफेला बांधून ठेवलं होतं. त्या मुलीच्या जवळच एक बाई हातात लांबसडक चाबूक घेऊन उभी होती. दुर्जनसिंह आणि कालीसिंह तोफेच्या दोन्ही बाजूंना उभे होते. आदित्यला पाहताच दुर्जनसिंह म्हणाला, “ये आदित्य... बघ आमची क्षमता... तेजा, दाखव आम्हाला हे हत्यार...” तेजाने चाबूक उगारला आणि तोफेला बांधलेल्या मुलीवर चालवत म्हणाली, “तोफ चालव...” त्या मुलीला फटका बसला खरा पण चेहऱ्यावर वेदना नसून क्रोध होता. तिने हातांचे पंजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला फिरवत अग्नी निर्माण केला. तोफेला बत्ती मिळाली. क्षणार्धात लाल रंगाचा प्रचंड मोठा गोळा तोफेच्या मुखातून बाहेर पडला आणि समोरच्या भिंतीला खिंडार पडलं...

आश्चर्यचकित नजरेने तोफेकडे पाहणाऱ्या आदित्यकडे येत दुर्जनसिंह म्हणाला, “उद्या याच तोफेने तुला भस्मसात करू आम्ही. तोवर आराम कर कोठडीत. त्या मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच तिच्या हातातल्या साखळदंडातून आपोआप काटे निघाले आणि त्या मुलीच्या हातात रुतले. तेजा म्हणाली, “तू कितीही प्रतिकार केलास तरी तुझी सुटका नाही. महाराज, ही मुलगीच ही तोफ चालवेल तेव्हा हिलाही बंद करावे पण तिच्या हातांना स्पर्श करू नये...” दुर्जनसिंहाने टाळ्या वाजवल्या आणि सैनिक त्या मुलीला भाल्यांनी ढकलत कोठडीकडे घेऊन गेले. दुर्जनसिंह आणि तेजाही महालात निघून गेल्यावर आदित्यकडे पाहत कालीसिंह म्हणाला, “तुला आत्ताच मारलं असतं पण आमचे पिताश्री... जाऊ दे... आजची रात्र जगून घे... उद्यामात्र... हा...हा...हा...” कालीसिंह पाय आपटत महालात निघून गेला. सैनिकांनी आदित्यला पुन्हा कोठडीत फेकले. बाजूच्याच कोठडीत त्या मुलीला बंदिस्त केलं गेलं होतं. तिच्याकडे सरकत आदित्य म्हणाला, “मी पाहिलं, तुझ्या हातातून अग्नी निर्माण झाला आणि तोफ चालवली गेली. तू हे कसं केलंस...” त्या मुलीने आदित्यकडे पाहिलं. साखळदंडाच्या आड आदित्यच्या दोन्ही हातांवरची गोंदणं तिला दिसताच आदित्य जवळ येत ती म्हणाली, “जेव्हा हे हात एकत्र येतील तेव्हा आकाशाला सीमा नसेल आणि अग्नीचा पाऊस पडेल...” हे ऐकून आदित्यचे डोळे विस्फारले. आपल्या आयुष्यातलं हे इतकं महत्वाचं वाक्य जे आपल्याला, अवंतिकाला, महाराजांना आणि महाराणींनाच ठाऊक होतं ते या मुलीला कसं माहित याचा विचार करत आदित्य म्हणाला, “हे... हे वाक्य... तुला... कोण आहेस तू...” ती मुलगी अजून जवळ येत म्हणाली, “मी ज्वाला. तुझ्याप्रमाणे मीही अग्नीखग पंथात जन्मले. हे बघ...” आदित्यने पाहिलं तर त्याच्याच प्रमाणे ज्वालाच्या हातांवरही तशीच गोंदणं होती...

ज्वाला पुढे बोलती झाली, “अग्नीखग पंथावर सूर्यदेवाची कृपा आहे. शंभर वर्षांनी एक दिवस असा येतो जेव्हा सूर्यातून तेजस्वी किरण निघतात. त्या दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये ते किरण शिरताच त्या बाळांना सूर्याची दाहकता तर मिळतेच शिवाय अवकाशात भरारी मारण्याची शक्तीसुद्धा प्राप्त होते. माझे बाबा सांगायचे की मी आणि माझा भाऊ एकाच दिवशी एकाच वेळी जन्मलो. माझा भाऊ माझाहून काही क्षणांनीच मोठा होता. तो दिवस होता सूर्यदेवाच्या तेजस्वी किरणांचा दिवस. माझ्यावर आणि माझ्या भावावर त्या किरणांची कृपादृष्टी झाली खरी पण त्याच वेळी निसर्गाचा प्रकोप झाला. भूकंप आणि जलप्रलय एकाच वेळी आले आणि गाव वाहून गेलं. माझा भाऊ माझ्या आईजवळ होता. आई पाण्यात वाहून गेली आणि मी बाबांजवळ राहिले. आमचं गाव नष्ट झालं. बाबांनी मागे राहिलेल्या गावकऱ्यांना सोबत घेऊन गाव पुन्हा बसवलं. मी माझ्या भावाबद्दल बाबांना नेहमी विचारायचे आणि त्याचं एकच उत्तर असायचं, की माझ्या हातांवरची ही चिन्हच मला माझ्या भावापर्यंत पोहोचवतील...” ज्वाला बोलत असताना आदित्यच्या डोळ्यात पाणी तरारलं. तो म्हणाला, “म्हणजे आपण... तू माझी बहिण...” ज्वालाने मानेनेच होकार दिला. आदित्यला ज्वालाची गळाभेट घ्यायची होती पण कोठडीला आणि अंगभर असलेल्या सळ्यांमुळे ते शक्य होत नव्हतं. आदित्य म्हणाला, “पण ज्वाला... तू इथे कशी काय आलीस... आणि तीही अशी... बेड्यांमध्ये अडकलेली...”

ज्वालाने एकवार बेडयांकडे पाहिलं आणि बोलू लागली, “हे कृत्य त्या तेजाचं आहे. तेजा, आधुनिक आणि यंत्रवत हत्यार बनवण्यात तरबेज आहे. ती एकदा गावात आली होती. बाबांकडे व माझ्याकडे असलेली शक्ती तिने ओळखली आणि त्याचा वापर हत्यारांसाठी करावा म्हणून आमच्याकडे विचारणा केली. आम्ही दोघांनी ठाम नकार दिला तेव्हा तोच राग मनात ठेऊन तेजा निघून गेली. काही दिवसांनी अचानक गावावर हल्ला झाला. आधुनिक हत्यारबंध सैनिकांनी चारही बाजूंनी गावाला घेरलं. मी काही करण्याच्या आतच माझ्या हातात बेड्या अडकवल्या गेल्या. बाबांनी सामना केला खरा पण वयोमानामुळे त्यांना तितका प्रतिकार करणं जमलं नाही. गाव उध्वस्त झालं. तेजाच्या पहारेकऱ्यांनी गावाला वेढा घातला आणि सर्वजण तिथेच बंदिस्त झाले. मी काही करण्याचा प्रयत्न करताच या बेड्यांमधून निघालेले धारदार काटे मला टोचतात. आपलं गाव आणि बाबा तेजाच्या ताब्यात आहेत. त्यांच्यासाठी तेजा सांगेल तसं वागणं भाग आहे मला. मी तितकाच जोर लावू शकते जितका अग्नीचा लोळ तयार करण्यासाठी लागतो. जास्त जोर लावल्यास हे काटे... पण आदित्य, तुझ्या हातात तर साध्या सळ्या आहेत. तू लावू शकतोस की शक्ती... आपल्या दोघांमध्ये ही शक्ती आहे. या शक्तीचा स्रोत आहे क्रोध पण तोही योग्य मार्गासाठी...” ज्वाला गप्प झाली. तिकडे वनामध्ये अवंतिका आणि भीमसिंह पुढे जात असताना झाडं सळसळण्याचा आणि पावलांचा आवाज आला. अवंतिका आणि भीमसिंहने पाहिलं तर दुर्जनसिंहाने पाठवलेल्या सैनिकांनी दोघांनाही घेराव घातला होता...

भीमसिंह व अवंतिका दोघांनी तलवारी उपसल्या व त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या दुर्जनसिंहाच्या सैनिकांचा ते समाचार घेऊ लागले. दोघांच्या तुलनेत सैनिक जास्त होते. एक मारला गेला की त्याच्या जागी दोन येत होते. हार न पत्करता अवंतिका व भीमसिंह लढत होते. एकदा त्यांनी घेराव तोडला खरा पण पुन्हा ते घेरले गेले. या दोघांची मुंडकी दुर्जनसिंह महाराजांना दाखवल्यावर ते बक्षीस देतील हे माहित असल्याने सर्व सैनिकांनी तलवारी उंचावल्या. इतक्यात झाडीच्या आडून सपासप येणाऱ्या बाणांनी सर्व सैनिकांचा वेध घेतला. सारे निपचित पडलेले पाहून अवंतिका व भीमसिंह आश्चर्यचकित झाले. ते काही बोलणार इतक्यात झाडीतून काही आदिवासी त्यांच्याकडे येताना दिसले. या आदिवास्यांनी आपली मदत केली ही जाणीव अवंतिका व भीमसिंह दोघांनाही होती. तरी दोघांनी तलवारी सोडल्या नाहीत. ते आदिवासी पुढे आले आणि त्यांच्यातल्याच एकाने स्वत:च्या छातीला हात लावत कमरेत वाकून दोघांना नमस्कार करून बोलायला सुरुवात केली, "राजकुमारी अवंतिका, तुम्ही आम्हाला ओळखत नसाव्यात कारण आपली कधी भेटच नाही झाली. मी भैरव. यांचा सरदार. आम्ही आदिवासी याच जंगलात राहतो. आम्हाला आधाराची गरज असताना खुद्द महाराजांनी आमची वस्ती बसवली, महालातली धान्यांची कोठारे आमच्यासाठी खुली केली. महाराज गेल्यावर महाराणींनी जातीने आमच्या पोरी-बाळींची काळजी घेतली...

आम्हाला समजलं की दुर्जनसिंहाने महाराणींना मारलं आणि महालावर कबजा केला. तुम्ही भीमसिंहांसोबत तिथून निसटल्याचं समजलं म्हणून तुम्हाला शोधत आम्ही इथवर आलो. तुमच्या शाही पोषाखाकडे पाहून तुम्हीच आमच्या राजकुमारी आहात हे आम्ही ओळखलं..." भैरवच्या खांद्यावर हात ठेवत भीमसिंह म्हणाले, "धन्यवाद भैरव. तुम्ही सारे आमच्या मदतीला धावून आलात... राजकुमारी..." भीमसिंहांनी अवंतिकाकडे पाहिलं. अवंतिकाने स्मित केलं व भैरवला नमस्कार करत म्हणाली, "भैरव, तुमच्यासारखी माणसं आमच्यासोबत आहेत म्हणून आम्ही खंबीर आहोत अजून. आता वेळ न घालवता त्वरित महालावर हल्ला करू आणि..." "माफी असावी राजकुमारी..." अवंतिकाचे वाक्य तोडत भीमसिंह बोलते झाले, "क्रोधाच्या भरात कुठलाही निर्णय घेण्याची घाई करू नये. दुर्जनसिंहाने पाठवलेल्या मूठभर सैनिकांना आपण सहजतेने नमवू शकलो नाही. तिथे महालात त्याचं किती सैन्यबळ असेल, शस्त्रसाठा किती असेल या सगळ्याची आपल्याला काहीच कल्पना नाही. याक्षणी आपण तिथे पुन्हा गेलो तर कदाचित आयतेच दुर्जनसिंहाच्या तावडीत सापडू आणि आदित्यने जिवावर उदार होऊन जे केलं ते निष्फळ ठरेल..." भैरवने मान हलवत सहमती दर्शवली व म्हणाला, "राजकुमारी, भीमसिंह म्हणतात ते बरोबर आहे. आपण माझ्यासोबत आमच्या वस्तीवर चलावं आणि पुढील योजना आखावी..."

अवंतिकाला भीमसिंह व भैरवचं म्हणणं पटलं. सर्वजण भैरवच्या वस्तीकडे निघाले. इतक्यात आकाशातून चित्काराचा आवाज आला. सर्वांनी वर पाहिलं तर एक गरूड आकाशात घिरट्या घालत होता. अवंतिकाने त्याला ओळखलं. तो राजाच होता. शीळ घालून तिने त्याला जवळ बोलावलं. ओळखीची शीळ ऐकून राजा खाली आला आणि एका फांदीवर बसून चित्कारू लागला. चित्कार ऐकून अवंतिकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती म्हणाली, "गुरूदेव, आनंदाची बातमी... आदित्य वाचला व सुखरूप आहे. सध्या तो भूमिगत आहे आणि आपल्याच प्रतीक्षेत आहे. परमेश्वरा तुझीच कृपा... राजा, तू आमच्यासोबत चल. थोडा आराम कर, मग आदित्यला आम्ही सुखरूप असून लवकरच हल्ला करू ही खबर दे..." भैरवच्या वस्तीवर सर्व पोहोचले. भाले आणि धनुष्य-बाण हाती घेतलेले अनेक सैनिक अवंतिकाने पाहिले व स्मित केलं. भैरव म्हणाला, “महाराणी अवंतिका, हे सर्व सैनिक आपल्या बाजूने लढायला तयार आहेत. महाराणी अवंतिका हे शब्द ऐकून अवंतिकाला नवल वाटल्याचं पाहून भैरव म्हणाला, “महाराणी सुलेखादेवींनंतर आता आपणच राज्यकर्त्या आहात. आणि आपल्यात एका कुशल नेत्याचे सर्व गूण आहेत. आता तुम्हीच सुजानगढ व आमच्या महाराणी...” अवंतिकाने भीमसिंहकडे पाहिलं. त्यांनी मानेने होकार देताच अवंतिका म्हणाली, “तुमच्या या मान-सन्मानाबद्दल धन्यवाद. माझ्या बाजूने तुम्ही सगळे लढायला तयार आहात हे जाणून आता मलाही हुरूप आला आहे. परंतु भैरव, हे सैन्य दुर्जनसिंहाचा सामना करण्यासाठी कमी पडेल. शिवाय सैन्याची रसद आणि शास्त्रसाठा यासाठी लागणारं धनही सध्या आपल्याजवळ नाही...”

अवंतिकाला दुजोरा देत भीमसिंह म्हणाले, “अगदी खरं बोललात महाराणी अवंतिका. पण आपण आपल्या मित्रराष्ट्राला कनकपूरला कसे काय विसरलात... महाराज कनकसिंह आपल्या महाराजांचे जवळचे स्नेही होते व राजकुमारी सोना आपल्या बालपणापासूनच्या मैत्रीण आहेत. आपण त्यांना आवाहन केल्यास कनकपूर नक्कीच मदतीचा हात पुढे करेल...” अवंतिकाला भीमसिंहांचं म्हणणं पटलं. राजाला आदित्यकडे रवाना करून अवंतिका, भीमसिंह आणि भैरव कनकपूरकडे रवाना झाले. तिकडे राजाने आदित्यच्या कोठडीजवळ येत चित्कार केले. अवंतिका सुखरूप असल्याचं त्याला समजताच आदित्यला हायसं वाटलं. कोणी पहायच्या आत राजाला तिथून जायला सांगून आदित्य ज्वालाकडे वळत म्हणाला, “अवंतिका सुखरूप आहे तर. आता कनकपूरच्या मदतीने ती हल्ला चढवणार...” आदित्य बोलत असतानाच दोघांनाही आर्त चित्कार ऐकू आला. आदित्यने हा चित्कार राजाचाच आहे हे ओळखलं. लगोलग तो झरोख्याखाली आला. दूरवर त्याला राजा हवेत गटांगळ्या खाताना दिसला. आदित्यने झरोख्याकडे पाहत, “राजा...” अशी पुकार दिली पण त्याचा उपयोग झाला नाही आणि राजा, आदित्यच्या नजरेसमोर खाली पडत नाहीसा झाला. कोठडीच्या सळ्यांना गदागदा हलवत आदित्य ओरडत होता, “राजा... माझा सखा राजा... कोणी मारलं त्याला... राजा...” ज्वाला त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण आदित्य ऐकतच नव्हता. इतक्यात कोठडीजवळ पावलांसह हसण्याचे आवाज ऐकू आले...

“हा...हा...हा... तुझा सखा... तो पक्षी... त्याला आमच्या युवराज कालीसिंहांनी एका बाणानिशी मारलं. काय अचूक निशाणा साधला त्यांनी... त्या तुझ्या पळपुट्या अवंतिकाला संदेश पोहोचवत होतास काय... चला रे...” हे सर्व बोलत जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या सैनिकाकडे पाहत आदित्यला राग अनावर होऊ लागला. त्याच्या डोळ्यात आग दिसू लागली. ज्वाला आदित्यकडे येत म्हणाली, “आदित्य, हाच तो क्रोध ज्याची गरज आहे तुला. बघ तुझ्या हातांकडे...” आदित्यने पाहिलं तर त्याच्या हातावरील ज्योतीचं गोंदण चमकू लागलं होतं. त्याचे हात लालबुंद झाले होते व त्यातून धूर येत होता. त्याने धरलेल्या कोठडीच्या सळ्या वितळू लागल्या. आदित्यला अचंभा वाटला. ज्वाला म्हणाली, “आदित्य, तुझी शक्ती जागरूक होत आहे... तुझे दोन्ही हात एकमेकांच्या उलट्या बाजूला फिरव...” आदित्यने त्याचे दोन्ही हात एकमेकांच्या उलट्या बाजूला फिरवले तर हातांमध्ये एक आगीचा गोळा तयार झाला. त्या गोळ्याची दाहकता इतकी होती की त्याच्या हातातल्या बेड्या वितळून गळून पडल्या. वितळलेल्या सळ्यांमुळे निर्माण झालेल्या भागदाडातून आदित्य बाहेर आला आणि तो गोळा ज्वालाच्या कोठाडीवर भिरकावला. त्या आगीच्या गोळ्याने ज्वालाच्या हातांचा वेध घेत तिच्या हातातल्या बेड्यांची पार राखराख केली. ज्वालाही बाहेर येत म्हणाली, “चल आदित्य, आपल्याला त्वरित निघायला हवं. आपल्या माणसांना, आपल्या वडिलांना आपली गरज आहे...”

आदित्यने मानेनेच होकार दिला. दोघंही आपापल्या हाताने आगीचे गोळे बनवून समोर येणाऱ्या सैनिकांवर भिरकावत त्यांची राख करू लागले व पुढे जाऊ लागले. पटांगणात ठेवलेल्या तोफेपाशी दोघं पोहोचले. ज्वाला म्हणाली, “थांब आदित्य. या तोफेमुळे हे दुर्जनसिंह व कालीसिंह इतके माजलेत ना... या तोफेलाच नष्ट करू आपण. लाव शक्ती...” दोघांनीही आपापले हात एकमेकांच्या विरुद्ध फिरवत आगीचे गोळे निर्माण केले आणि ते तोफेवर भिरकावले. प्रचंड स्फोटासह तोफेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. आवाज ऐकून दुर्जनसिंह व कालीसिंह तेजासह पटांगणात आले. त्यांनी पाहिलं तर ज्वाला आणि आदित्य दोघंही त्यांच्या हातातून आग निर्माण करून सैनिकांना मारत आहेत. कालीसिंहाला पाहून आदित्य त्याच्याकडे झेपावणार इतक्यात ज्वाला म्हणाली, “नाही आदित्य. आत्ता याची वेळ नाही. आधी आपल्याला आपल्या वडिलांसह आपल्या गावाला मुक्त करायला हवं. शिवाय तुझ्या शक्तीची तुला पुरेपूर कल्पना नाही आली अजून. त्याचा वापर चुकीचा झाला तर आपलाच डाव आपल्यावर उलटेल. आदित्यला ज्वालाचं म्हणणं पटलं पण राहून राहून राजा त्याच्या समोर येत होता. आदित्यने आगीचा एक गोळा भिंतीकडे भिरकावला. काही क्षणातच समोरच्या भिंतीला मोठं खिंडार पडलं आणि ज्वाला व आदित्य त्यातून पसार झाले. कालीसिंह आपल्या सैन्याला फर्मान सोडणार इतक्यात दुर्जनसिंहाने त्याला थांबवलं. म्हणाला, “काली, जाऊ दे त्यांना. त्यांच्यावाचून आपलं काही अडत नाही. मला काळजी आहे ती त्यांनी नष्ट केलेल्या तोफेची...”

“काळजी नसावी महाराज...” तेजा पुढे होत म्हणाली, “एक हत्यार नष्ट झालं म्हणून त्रागा करू नये. हा तर एक छोटा नमूना होता. माझ्याकडे आपल्यासाठी अनेक हत्यारांचा साठा आहे. आपण माझ्यासोबत चलावं. अशा अनेक आधुनिक हत्यारांची ओळख मी तुम्हाला करून देईन ज्यांना चालवण्यासाठी कुठल्याही ज्वालाची गरज भासणार नाही...” तेजाच्या बोलण्याने दुर्जनसिंहाने स्मित केलं. कालीसिंहाकडे वळत म्हणाला, “आम्ही तेजासोबत नव्या हत्यारांसाठी जात आहोत. काली, आता इथली जबाबदारी तू सांभाळायची आहेस. क्रोधाच्या भरात आतातायी पाऊल उचलून त्या आदित्यच्या मागावर आपले सैनिक पाठवू नकोस. तो आपलं काहीएक वाकडं करू शकणार नाही. राहिला प्रश्न त्या अवंतिकाचा, तर तिची व्यवस्थाही आम्ही करून ठेवली आहे...” दुर्जनसिंह आणि तेजा नव्या हत्यारांसाठी निघून गेले. तिकडे, अवंतिका, भीमसिंह आणि भैरव यांनी कनकपूर गाठलं. महालात त्यांच्या येण्याची वर्दी देण्यात आली तशी राजकुमारी सोना त्यांच्या मंत्य्रांसोबत स्वागतासाठी आल्या. अवंतिका आणि सोनाची गळाभेट झाली आणि सर्व आत जाऊ लागले. भीमसिंहांनी सहज विचारले, “राजकुमारी, महाराज दिसत नाहीत ते...” या प्रश्नावर राजकुमारी सोना थोड्या बावचळल्यासारख्या झाल्या पण लगेच सावरत म्हणाल्या, “ते ना, ते आहेत की... नगराच्या कामकाजात व्यस्त आहेत. लवकरच भेट होईल...” हे बोलत असताना सोनाच्या चेहऱ्यावरील गोंधळ सर्वांना जाणवला...

अतिथीदालनात सर्वांना घेऊन आल्यावर राजकुमारी सोना म्हणाल्या, “अवंतिका, तू प्रवासाने थकली असशील. अंमळ आराम घ्यावा, सांजेच्या समयी भोजनाचे वेळी छान गप्पा करू आपण...” असं म्हणत कोणालाही काहीही बोलण्याचा अवसर न देता राजकुमारी सोना दालनाबाहेर निघून गेल्या. दालनात भीमसिंह, भैरव व अवंतिका चर्चा करत होते. भैरव म्हणाला, “राणी अवंतिका, माझ्या बोलण्याची माफी असावी पण तुमच्या व राजकुमारी सोनाच्या मैत्रीबद्दल आणि महाराज कुमारसिंह व महाराज कनकसिंह यांच्या मैत्रीबद्दल जे भीमसिंहांनी सांगितलं ते ऐकता इथलं वातावरण ठीक दिसत नाही. महाराज कनकसिंह कुठेही दिसत नाहीत...” भैरवला दुजोरा देत भीमसिंह म्हणाले, “हो राणी... महाराज स्वागताला नाही आले इथवर ठीक होतं पण अजूनही त्यांची भेट झाली नाही हे पटत नाही. शिवाय कनकपूरचे सैनिक सोन्याचे कवच घालत असत. आणि इथे काही सैनिकांचे कवच काळ्या रंगाचे दिसते. यात नक्कीच पाणी मुरतंय...” अवंतिकाने थोडा विचार केला व म्हणाली, “राजकुमारी सोना आणि महाराज कनकसिंह काही दगा करतील असं नाही वाटत आम्हाला. कदाचित नवीन सैनिकांचा भरणा केला असावा... तरीही सावध राहणं योग्य हेच खरं...” तिकडे या सगळ्यापासून लांब जंगलातून वाट काढत ज्वाला आणि आदित्य त्यांच्या गावाजवळ पोहोचले. तीन डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या त्या छोट्याशा गावात सगळीकडे सामसूम दिसत होतं. गावाला वेढा घातलेली काही यंत्रे दिसत होती. ती अजब यंत्रे पाहून आदित्यला अचंभा वाटला...

ज्वाला बोलती झाली, “याच यंत्रांनी अकस्मात आमच्यावर हल्ला केला. सर्वप्रथम मला व आपल्या बाबांना जेरबंद केलं आणि गावावर ताबा मिळवला. बाबांना साखळदंडात अडकवून तेजा मला तिच्यासोबत घेऊन गेली. तेव्हापासून तेजा सांगेल ते करणं मला भाग होतं. अन्यथा या यंत्रांमधून निघालेल्या आगीच्या गोळ्यांनी बाबा आणि आपलं गाव दोघांनाही संपवलं असतं. तेजाने बनवलेल्या नव्या यंत्रांना ऊर्जा देण्यासाठी तिने माझा वापर केला. यातून सुटका कशी करावी हाच एक विचार मनी असताना आदित्य, तू भेटलास मला...” आदित्यने ज्वालाच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाला, “काळजी करू नकोस ज्वाला. आपण दोघंही खंबीर आहोत. पण यावेळी त्वरित हालचाल करायला हवी. गावाला तीन बाजूंना डोंगराने वेढलं आहे. हा एकमेव मार्ग आहे गावात प्रवेश करण्याचा. इथे जी यंत्र दिसत आहेत तेवढीच असणार. डोंगरांमध्ये जरी यंत्र असली तरी त्यांना आपला वेध घेण्यासाठी खाली यावंच लागेल. तू डाव्या बाजूने प्रहार कर, मी उजवी बाजू सांभाळतो. पण हल्ला एकाच वेळी व्हायला हवा. मी तुला एक शीळ ऐकवतो जी मी माझ्या लाडक्या राजासाठी वापरात असे. तू आक्रमणाच्या जागी पोहोचलीस की शीळ घाल. मला समजेल. लगेचच आपण हल्ला सुरू करू...” आदित्यने ज्वालाला हलक्या आवाजात शीळ ऐकवली. ज्वाला झाडीतून डाव्या बाजूला जात नाहीशी झाली. काही क्षणातच आदित्यला शीळ ऐकू आली. त्याने स्मित केलं. डोळे बंद करून ध्यान केलं. डोळे उघडले तर ते लालबुंद दिसत होते. त्याच्या हातावरचं ज्योतीचं गोंदण चमकू लागलं...

आदित्यचे हात लाल दिसू लागले आणि त्यातून धूर येऊ लागला. त्याने आपले हात एकमेकांच्या विरुद्ध बाजूला फिरवले. आगीचा गोळा तयार झाला. गोळा बऱ्यापैकी मोठा होताच त्याने तो समोर दिसणाऱ्या यंत्रावर भिरकावला. गोळा यंत्रावर आदळताच प्रचंड स्फोट होऊन यंत्राच्या ठिकऱ्या समोर दिसू लागल्या. त्याप्रकारे डाव्या बाजूनेही स्फोटाचा आवाज आला. ज्वाला आणि आदित्य, आपल्या सामर्थ्याने एकेक यंत्राचा समाचार घेत पुढे जाऊ लागले. अचानक येणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने गावकरी काळजीत पडले. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर धुराचे मोठ मोठे ढग आकाशात दिसत होते आणि ती अजस्त्र यंत्र तुकडे होऊन जमीनदोस्त झाली होती. धूर हटला तशी ज्वाला त्यांना समोर दिसू लागली. ज्वालाला पाहताच गावकरी आनंदित झाले. ते पुढे येणार इतक्यात डोंगराळ भागात लापलेल्या तीन यंत्रांनी ज्वालाला घेरलं. ती यंत्र काही करणार इतक्यात त्यांच्यात स्फोट झाले आणि ती पार भुईसपाट झाली. आगीच्या ज्वाळा मंदावल्या आणि आदित्य समोर दिसू लागला. सर्व यंत्र नष्ट झाली होती. गाव मुक्त झालं होतं. गावकरी जल्लोष करत होते. त्यावेळी ज्वाला आदित्यला घेऊन गावच्या मंदिराच्या मागे असलेल्या दरीत उतरली. तिथे जमिनीत असलेल्या एका कोठडीत आदित्य व ज्वालाच्या वडिलांना बेड्या घालून कैद केलं होतं. बेड्या पाहताच आदित्यने आगीचा गोळा तयार करून त्या वितळवल्या. आदित्यच्या हातांवरील गोंदणं पाहून बाबांनी त्याला ओळखलं. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि धावत जाऊन त्यांनी आदित्यची गळाभेट घेतली...

बाप-लेकाची ही भेट पाहून ज्वालासह गावकरीही आनंदित झाले. ज्वालाच्या डोळ्यात तर पाणी तरारलं होतं. आदित्यने ज्वाला आणि त्याच्या वडिलांचे डोळे पुसले. तो म्हणाला, “बाबा, मला तर माहीतच नव्हतं मी कोण आहे. मला माझ्या जन्मदात्यांनी वाऱ्यावर सोडलं याच गैरसमजात मी तुम्हाला दोष देत राहिलो. पण ज्वालाची भेट झाली आणि सगळी हकीगत समजली. बाबा, आपली भेट झाली खरी पण मला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. तिथे अवंतिकाला माझी गरज आहे. मला तिथे जायला हवं...” महाराज कुमारसिंहांनी सांभाळ केल्यापासून दुर्जनसिंहाच्या हल्ल्यापर्यंतची सगळी हकीगत सांगून आदित्य जायला वळला त्याचवेळी ज्वाला त्याला अडवत म्हणाली, “थांब आदित्य. तुझ्यातल्या शक्तीचा पूर्ण वापर करायला तू अजून तयार नाहीस. आपल्या छोट्याशा गावावर हल्ला करायला त्या तेजाने इतके घातक हत्यार वापरले, तर अवंतिकासाठी अजून किती हत्यार असतील तिच्याजवळ. कदाचित त्यांसाठी तुझे हे आगीचे गोळे कमी पडतील...” दोघांचे बाबा ज्वालाच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाले, “खरं आहे आदित्य. तुझी शक्ती प्रखर असली तरी ती पूर्ण नाही. तुला याचा अभ्यास करायला हवा. चल माझ्यासोबत. ज्वाला, तू इथेच थांब. पुन्हा जर संकट आलं तर तुझी गरज भासेल गावाला...” आदित्यला घेऊन त्याचे बाबा गावच्या मागे असलेल्या एका डोंगराकडे गेले. डोंगर चढून वर गेल्यावर आदित्यने आत डोकावलं तर सोनेरी रसात बुडबुडे आलेले दिसत होते...

आदित्यने त्याच्या वडिलांकडे पाहिलं. ते म्हणाले, “आदित्य, हा धगधगता ज्वालामुखी तुझा शक्तीस्रोत आहे. याच ज्वालामुखीच्या तोंडावर बसून तुला अग्निदेवाची तपश्चर्या करायची आहे. काळजी करू नकोस, तुझ्या शक्तीची दाहकता या ज्वालामुखीपासून तुझं रक्षण करेल. जेव्हा तुझी शक्ती पूर्ण जागृत होईल तेव्हा आकाशाला सीमा नसेल आणि अग्नीचा पाऊस पडेल...” त्याच्या बाबांच्या या उद्गारांनी आदित्य चपापला. त्यांना नमस्कार करून ज्वालामुखीत उतरला. आसनमांडी घालून दोन्ही हात जोडून डोक्याच्या वर नेले आणि, “ओम अग्निदेवाय नम:” या मंत्राचा जप सुरू केला. तिथे कनकपुरात जेवणाच्या वेळीही महाराज कनकसिंह भेटीसाठी आले नाहीत म्हणून भैरव, भीमसिंह आणि अवंतिका तिघांनाही नवल वाटलं होतं. राजकुमारी सोनाची वागणूकही संशयास्पद वाटत होती. जेवणं झाली. भैरव व भीमसिंह आपापल्या कक्षात गेले. अवंतिका आणि सोना बराच वेळ गप्पा मारत होत्या पण सोनाचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी लागलं होतं. अवंतिकाच्या हे लक्षात आलं होतं पण तिने तसं दाखवलं नाही. काही वेळाने अवंतिका तिच्या दालनात निघून गेली. निजानीज झाली. दिवे मालवले गेले. सर्वत्र सामसूम झालं होतं. त्या शांत वातावरणात चार काळ्या सावल्या दिसू लागल्या. तलवारी घेतलेल्या त्या सावल्या हळू हळू पुढे सरकत होत्या. भीमसिंहांच्या कक्षाबाहेर एक, भैरवच्या कक्षाबाहेर एक आणि अवंतिकाच्या दालनाबाहेर दोन अशा त्या चार सावल्या उभ्या होत्या...

अवंतिकाच्या दालनाची दारं हळू हळू उघडली आणि काळ्या वेशातले दोन तलवारधारी सैनिक आत शिरले. अवंतिका डोक्यावरून चादर घेऊन झोपलेली त्यांना दिसली. दोन्ही सैनिकांनी एकमेकांकडे पाहिलं आणि तलवारीचा एकच वार केला. काहीच हालचाल झाली नाही तेव्हा दोघं जवळ गेले आणि त्यातल्या एकाने चादर हटवली. अवंतिकाच्या जागी उशा ठेवलेल्या पाहून दोघंही गोंधळले. इतक्यात पडद्यामागून अवंतिका बाहेर आली आणि काही कळायच्या आत तिने एकाएका वारानिशी दोन्ही सैनिकांचा खात्मा केला. तलवार सरसावून अवंतिका दालनाबाहेर आली. काळ्या सैनिकांची एक तुकडी तिच्या स्वागताला तयारच होती. एकेका सैनिकाचा समाचार घेत ती दिवाणखान्यात आली. तिथे भैरव आणि भीमसिंह काही सैनिकांच्या गराड्यात उभे होते. अवंतिकाने त्या सैनिकांच्यामध्ये उडी घेतली आणि तिघांनी मिळून सर्व सैनिकांना संपवलं. इतक्यात दारामागून राजकुमारी सोना बाहेर आली. अवंतिकाने तिला खेचून मध्ये आणलं आणि तिच्या मानेला तलवार लावत म्हणाली, “का केलंस सोना... का दगा केलास माझ्याशी... काय मिळालं तुला असं वागून...” राजकुमारी सोना हुंदके देऊन रडू लागली. अवंतिकाकडे पाहत ती म्हणाली, “अवंतिका, मी तुझ्या मैत्रीच्या लायक नाही गं... मैत्रीशी दगा केला मी. पण मी हतबल होते. दुर्जनसिंहाने माझ्या वडिलांना कैद केलं आहे आणि तेही याच महालाच्या तळघरात. या सर्व सैनिकांना माझ्यावर पाळत ठेवायला सांगितलं होतं त्या दुष्टाने. मी या काळ्या सैनिकांचं ऐकलं नसतं तर तिथे तळघरात माझे वडील...”

अवंतिकाने सोनाच्या खांद्यावर हात ठेवला. तिला धीर देत ती म्हणाली, “काळजी करू नकोस सोना. आपण सगळे मिळून सोडवू महाराजांना...” अवंतिकाने भैरव आणि भीमसिंहांकडे पाहिलं. त्यांनी मानेनेच होकार दिला. काळोखाचा फायदा घेत अवंतिका, भीमसिंह, भैरव आणि सोना तळघराशी पोहोचले. सोना तळघरात उतरत असताना अवंतिका, भैरव आणि भीमसिंह काळ्या सैनिकांशी लढत होते. अखेर महाराज कनकसिंह बाहेर आले. सर्वांना मनापासून धन्यवाद देत त्यांनी राजकुमारी सोनाला कडकडून मिठी मारली. डोळे पुसत महाराज म्हणाले, “महाराणी अवंतिका, आजपासून दुर्जनसिंहाविरुद्ध पुकारलेल्या या लढ्यात कनकपूर तुमची पुरेपूर मदत करेल. अवंतिकाने हात जोडून महाराजांना धन्यवाद दिले. रात्र संपली. सकाळ होताच कनकपुराच्या मोठ्या पटांगणात अवंतिका, भीमसिंह, राजकुमारी सोना, महाराज कनकसिंह आणि भैरव आले. समोर कनकपुराचं सैन्य आणि सोबत भैरवचे निष्ठावान सैनिक उभे होते. सर्वांना उद्देशून अवंतिका म्हणाली, “माझ्या मित्रांनो, आज ती वेळ आली आहे जेव्हा दुर्जनसिंह आणि कालीसिंहच्या जुलुमांचा अंत होईल. तुम्हा सर्वांच्या समक्ष आज मी हा लढा पुकारते आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात...” अवंतिकाचं हे म्हणण्याचा अवकाश की सर्व सैनिकांनी एकच गर्जना केली. अवंतिका गरजली, “दुर्जनसिंह, आपल्या मरणाला तयार हो...” तिथे कालीसिंहाच्या हेराने अवंतिका वाचल्याची आणि सुजानगढवर चाल करून येत असल्याची खबर देताच कालीसिंह कुत्सित हसत म्हणाला, “हा...हा...हा... येऊ देत तिला... यावेळी ती खात्रीने संपलीच...”

तिथे ज्वालामुखीच्या तोंडावर आदित्य तप करत होता. त्याला वाटत होतं तो अथांग अशा काळ्या आकाशात उभा आहे. त्याला समोर एक सफेद प्रकाशाचा रस्ता दिसला. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला ज्वाला आणि आदित्यचे वडील उभे होते. आदित्य त्या रस्त्यावर पाऊल ठेवणार इतक्यात त्याला चित्कार ऐकू आला. त्याने मागे पाहिलं तर घायाळ झालेला राजा गटांगळ्या खात खाली येताना त्याला दिसला. जमिनीवर रक्तबंबाळ झालेली अवंतिका निपचित पडलेली त्याला दिसली. आदित्यने राजाला झेललं आणि अवंतिकाकडे पोहोचला. शुद्ध हरपण्यापूर्वी, “आदित्य... आ...ला...स... तू...” इतकं म्हणून अवंतिकाने डोळे मिटले. वर आकाशात एका बाजूला दुर्जनसिंह आणि दुसऱ्या बाजूला कालीसिंह क्रूर हसत होते. आदित्यने, “अवंतिका...” असं ओरडत डोळे उघडले. आपली ध्यानमुद्रा सोडून आदित्य बाहेर आला. बाहेर ज्वाला आणि त्यांचे वडील उभे होते. आदित्यला मधूनच बाहेर पडलेला पाहून दोघंही चक्रावले. ते काही बोलणार इतक्यात आदित्य म्हणाला, “क्षमा करा बाबा. पण आत्ता या क्षणी अवंतिकाला माझी जास्त गरज आहे. मला सुजनगढला परत जायलाच हवं. दुर्जनसिंह आणि कालीसिंह कपटी आहेत, नीच आहेत. त्यांच्या विळख्यातून मी महाराणीला वाचवू शकलो नाही. पण अवंतिकाला मी नक्कीच वाचवणारच...” आपल्या वडिलांना नमस्कार करून ज्वालाच्या डोक्यावर हात ठेऊन आदित्य निघून गेला. ज्वालाने ज्वालामुखीत पाहिलं आणि ती अवाक झाली...

तिने लगेच बाबांना बोलावलं. त्यांनीही ज्वालामुखीत पाहिलं. लाव्हा पूर्ण शांत झाला होता. उकळणाऱ्या सोनेरी रसाची जागा काळ्या मातीने घेतली होती. ज्वाला काही बोलायच्या आत तिचे बाबा म्हणाले, “ज्वालामुखी शांत झाला... म्हणजे... आदित्य... त्याची शक्ती पूर्ण जागरूक झाली आहे... पण अजून त्याला याची कल्पना नाही. तो आता लढायला निघाला आहे... ज्वाला...” ज्वालाने तिच्या बाबांचा रोख ओळखला आणि होकारार्थी मान हलवली. तिथे सैन्यबळासह अवंतिकाने सुजानगढच्या किल्ल्यावर आक्रमण केलं. अवंतिकाचे शीलेदार कालीसिंहाच्या काळ्या सैन्यावर तुटून पडले. भीषण युद्धाला सुरुवात झाली. तलवारी खणखणल्या. बाणांचा वर्षाव होऊ लागला. किल्ल्याच्या एका बाजूला लावलेल्या तोफांमधून आगीच्या गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. अवंतिका, भैरव आणि भीमसिंह या तिघांनी मिळून एक योजना आखली आणि त्यानुसार भैरव आपल्या काही साथीदारांसह तट चढून वर गेला. तोफांना चालवणाऱ्या काळ्या सैनिकांचा सामना करत भैरवने तोफा तर निकामी केल्याच पण त्या बाजूला असलेला किल्ल्याचा दरवाजाही उघडला. हे पाहताच कालीसिंहाने भैरववर बाण चालवला पण आपल्या छातीचा कोट करून भीमसिंहांनी तो बाण अडवला. भैरवच्या हातात वीरमरण पत्करताना भीमसिंह म्हणाले, “रा...राणी अवंतिका... मी आप...ली सेवा क...रू शकलो नाही... क्षमा असावी...” सुजानगढच्या दाराकडे पाहून आपल्या थरथरत्या रक्ताळलेल्या हातांनी त्यांनी नमस्कार केला आणि प्राण सोडले. अवंतिका तिथे पोहोचली पण उशीर झाला होता. भीमसिंहांचीच तलवार हाती घेत अवंतिकाने गर्जना केली, “काली... मरणाला तयार हो...”

अवंतिका आणि भैरव सैनिकांसह पुढे सरकत गेले आणि काळे सैनिक हळू हळू मागे हटू लागले होते. मिनारावर उभा असलेला कालीसिंह हे सर्व पाहत होता. आता काही वेळातच अवंतिका आणि तिचं सैन्य कालीसिंहावर मात करत किल्ल्यावर विजय मिळवणार असं दिसत असतानाच आकाशातून आगीचे गोळे येऊन त्यांच्यावर आदळले. सैनिक होरपळून निघाले. सर्वांनी आकाशाकडे पाहिलं तर मोठमोठ्या जहाजांना हवेने भरलेले प्रचंड मोठे फुगे बांधलेले होते आणि ती जहाजं हवेत उडत होती. हे दृष्य पाहून अवाक झालेले सगळे आगीच्या गोळ्यांनी भानावर आले. अवंतिकाने बारीक नजर करून पाहिलं तर त्यातल्या एका जहाजावर दुर्जनसिंह होता तर दुसऱ्यावर एक बाई उभी होती. ती तेजा होती. आपल्या खास हत्यारांनी ती दुर्जनसिंहाची मदत करत होती. ती जहाजं आगीचे गोळे बरसू लागली आणि अवंतिकाचं सैन्य सैरावैरा पळू लागलं. तिकडे जंगल पार करून सुजानगढच्या दिशेने येणाऱ्या आदित्यला तलवारींचा खणखणाट ऐकू आला आणि तो अधिक वेगाने पळू लागला. आकाशातून येणाऱ्या जहाजांनी त्याचं लक्ष वेधलं. झुडूपाआड उभा राहून ती जहाजं काय करत आहेत हे पाहत असताना त्या जहाजांनी आगीचे गोळे सोडायला सुरुवात केल्याचं त्याला दिसलं. आदित्यने पुन्हा किल्ल्याच्या दिशेने जायला सुरुवात केली. जहाजावर दुर्जनसिंहाला पाहताच अवंतिकाला तिची आई आठवली आणि रागाच्या भरात ती मोकळ्यावर आली. मुख्य सावज टप्प्यात आलंय हे पाहताच दुर्जनसिंहाने एका जहाजाला अवंतिकावर हल्ला करण्यास सांगितलं. आदित्य जीवाच्या आकांताने धावत होता. त्याने पाहिलं तर एक जहाज बरोब्बर अवंतिकाच्या डोक्यावर होतं, “अवंतिका...” अशी त्याने हाक मारली...

आदित्यच्या लक्षात आलं की तो नुसता धावत नसून वर वर धावत जात आहे. त्याचे हात आगीने भडकू लागले. बघता बघता आदित्य जहाजांच्या समांतर पातळीवर आला आणि एकाएकी त्याचा सदरा फाडून दोन्ही बाजूंनी दोन पंख बाहेर पडले. त्याचा चेहरा आवळल्यासारखा झाला आणि बघता बघता आदित्य एका विशालकाय पक्षात परिवर्तीत झाला. त्याच्यासमोर तेच जहाज होतं जे अवंतिकावर निशाणा साधून होतं. ते जहाज आगीचा गोळा टाकणार इतक्यात आदित्यने तोंड उघडलं. त्याच्या तोंडातून आगीच्या ज्वाळा निघाल्या आणि ते जहाज भस्मसात झालं. सर्वजण हे दृष्य पाहून आश्चर्यचकित झाले. आदित्य एकेका जहाजाचा फडशा पाडत असताना काही जहाजांनी आदित्यला घेरलं आणि त्याच्यावर आगीच्या गोळ्यांचा मारा सुरू केला. इतक्यात एका जहाजाचा प्रचंड स्फोट झाला आणि मागून तसाच अजून एक पक्षी येताना दिसला. आदित्यने त्या पक्षाला ओळखलं होतं. ती ज्वाला होती. मग काय, वर आकाशात आदित्य आणि ज्वाला जहाजांना उध्वस्त करत होते तर खाली अवंतिका आणि भैरव बाकी सैन्यासह काळ्या सैनिकांवर तुटून पडत होते. ज्वालाने एका जहाजावर तेजाला पाहिलं आणि तिला क्रोध अनावर झाला. तिच्या तोंडून आगीची एक लकेर बाहेर पडली आणि थेट तेजाच्या जहाजावर आदळली. तेजाने लगेच बाहेर उडी घेतली. दुर्जनसिंहाने वेळेवर आपलं जहाज तिथे नेलं आणि तेजाला खाली पडण्यापासून वाचवलं. इतक्यात आदित्यने दुर्जनसिंहाच्या जहाजालाही खिंडार पाडलं. जहाज हवेत गटांगळ्या खात खाली येऊ लागलं...

जहाज जमिनीवर आदळणार इतक्यात तेजा आणि दुर्जनसिंहाने जहाजातून उद्या घेतल्या. दुर्जनसिंहाला समोर पाहून अवंतिकाला तिची आई आठवली. “दुर्जनसिंह, तुझा अंत जवळ आलाय...” असं म्हणत त्वेषाने अवंतिकाने तलवार चालवली. तिचा वार अडवत दुर्जनसिंह म्हणाला, “एवढीशी चिमुरडी तू... आणि माझा, दुर्जनसिंहचा सामना करणार... आपल्या आईला तर माझ्यापासून वाचवू शकली नाहीस... पळून गेलीस, आणि आता आलीस परत स्वत: मरायला... तुझं मुंडकंच छाटून टाकतो आता...” दोघंही तलवारीचे वार करत होते आणि एकमेकांचे वार चुकवत होते. तेजाला जमिनीवर उभं राहिलेलं पाहून ज्वाला खाली आली. जमिनीला स्पर्श होताच ज्वालाचे पंख अदृश्य झाले आणि ती पुन्हा मनुष्य रुपात परिवर्तीत झाली. ज्वालाला पाहून तेजा तलवार उपसून तिच्यावर धाऊन गेली. तिने जोरदार प्रहार केला. पण त्याच वेळी भैरवने दिलेल्या तलवारीनिशी ज्वालाने तेजाचा वार अडवला. आपल्या गावावर तेजाने आणलेली संकटं ज्वालाला आठवली आणि ती तेजावर सपासप वार करू लागली. आकाशातील सर्व जहाजांचा फडशा पाडून आदित्य काळ्या सैनिकांवर तुटून पडला. त्याच्या तोंडातून येणाऱ्या आगीच्या ज्वाळा क्षणार्धात त्या सैनिकांना बेचिराख करत होत्या. हे सुरू असतानाच आदित्यने पाहिलं तर मिनारावर कालीसिंह धनुष्यबाण घेऊन सज्ज झाला होता. बाणाचा रोख ज्वालाकडे होता. बाण सुटला आणि आदित्यने तिथे झेप घेतली. आपल्या अजस्त्र पंजात बाण पकडून तो मोडून टाकला. आदित्यची नजर कालीसिंहवर रोखली होती. तो मिनारावर कुत्सित हसत होता. आदित्य मिनाराच्या बाजूच्या तटावर उतरला आणि त्याचे पंख गायब होऊन तो पुन्हा मनुष्यरुपात दिसू लागला...

“कालीसिंह...” अशी गर्जना करत, बाजूलाच निपचित पडलेल्या सैनिकाची तलवार हाती घेऊन आदित्य कालीसिंहकडे धावला. कालीसिंहानेही त्याची तलवार बाहेर काढली आणि पातींचा खणखणाट झाला. आगीच्या ज्वाळांनी आणि अवंतिकाच्या सैनिकांमुळे घाबरलेले काळे सैनिक रणभूमी सोडून पळू लागले. भैरवने काही काळ त्यांचा पाठलाग केला खरा पण मूठभर राहिलेले ते सैनिक जंगलाच्या दिशेने गेले हे पाहून तो मागे फिरला. किल्ल्यात आता तीन वेगळ्या द्वंद्वांना सुरुवात झाली होती. मैदानात तेजा विरुद्ध ज्वाला, तटावर कालीसिंह विरुद्ध आदित्य आणि महालात दुर्जनसिंह विरुद्ध अवंतिका. तेजाने केलेला प्रत्येक वार चुकवत ज्वाला तिच्यावर वार करत राहिली आणि शेवटी तिची तलवार हातावेगळी करत ज्वालाने तेजाला निशस्त्र केलं. ज्वालाने तलवार उंचावली खरी पण ती तशीच जमिनीत खुपसत म्हणाली, “तुला संपवायची माझी खूप इच्छा आहे पण तुला गावकऱ्यांसमोर नेण्याचं वाचन दिलं आहे मी बाबांना. आता गावकरीच तुझा न्याय करतील...” तेजाला एक चपराक लगावून भैरवने दिलेल्या दोरखंडाच्या मदतीने ज्वालाने तेजाला जेरबंद केलं. वर मिनारावर कालीसिंह आणि आदित्य यांच्यात द्वंद्व पेटलं होतं. कधी कालीसिंह वरचढ होत होता तर कधी आदित्य. लढता लढता आदित्य ताटावरून तोल जाऊन खाली पडू लागला. त्याने तटाच्या दगडाचा आधार घेतला. त्याच्या हातून तलवार निखळून खाली पडली. कालीसिंहाने संधी साधत वार केले. काही वार आदित्यने चुकवले पण एक वार त्याच्या खांद्यावर बसला. आदित्यने पाहिलं तर कालीसिंह पुन्हा वार करण्यासाठी तलवार उगारत होता. आदित्यने वाऱ्याच्या वेगासरशी कालीसिंहचा पाय खेचला आणि हवेतच कोलांटी उडी मारून पुन्हा मिनारावर उभा राहिला...

पाय खेचल्याने तोल गेलेला कालीसिंह मिनारावरून खाली येऊ लागला. हे पाहून बाजूला पडलेली तलवार उचलून, “काली, वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या माझ्या मित्राला तू हवेत निर्घूणपणे मारलंस... तूही तसाच मर...” अशी गर्जना करत आदित्यने कालीसिंहाकडे झेप घेतली. हवेत गटांगळ्या खात असलेल्या कालीसिंहाने वरून येणाऱ्या आदित्यला पाहिलं आणि त्याचे डोळे विस्फारले. क्षणार्धात आदित्यची तलवार कालीसिंहाच्या छातीच्या आरपार गेली आणि त्याचक्षणी कालीसिंह खाली पडून तशाच फाटलेल्या डोळ्यांनिशी मेला. आदित्य खाली आला आणि कालीसिंहाची अवस्था पाहून, “राजा...” असं जोरात ओरडला. आदित्यचा आवाज ऐकून महालात अवंतिकाशी लढत असलेला दुर्जनसिंह बाहेर आला. कालीसिंह आणि तेजाची दुर्दशा पाहून तो चवताळला, “काली, माझा युवराज... आदित्य, तू त्याला संपवलंस... मी आता कोणालाच सोडणार नाही...” असं म्हणत तलवार उगारून दुर्जनसिंह आदित्यवर धाऊन गेला. त्याच्या आणि आदित्यमध्ये अवंतिका वाऱ्याच्या वेगाने उभी राहिली. “नाही दुर्जन... तू माझा अपराधी आहेस... माझ्या आईचा अपराधी आहेस... मीच तुला संपवणार आहे...” असं म्हणत असतानाच दुर्जनसिंहाच्या तलवारीचा वार अवंतिकाने तिच्या हातातल्या तलवारीने अडवला. दोघांच्याही तलवारी खणखणल्या. त्वेषाने दोघंही एकमेकांवर वार करू लागले. हळू हळू अवंतिकाला थकवा जाणवू लागला. याच संधीचा फायदा घेत दुर्जनसिंहाने तिच्या हातातली तलवार पाडली आणि वार केला. वार तिच्या खांद्यापासून खाली जात पोटापर्यंत गेला. जखमेने विव्हळत अवंतिका खाली कोसळली...

तिने वर पाहिलं तर दुर्जनसिंह पुन्हा वार करण्याच्या तयारीत होता. वेदना झुगारून अवंतिका उठली. दुर्जनसिंहाने वार केला. बाजूलाच पडलेल्या एका काळ्या सैनिकाच्या ढालीने तिने तो अडवला. दुर्जनसिंह वार करत राहिला आणि अवंतिका त्याचे वार अडवत राहिली, चुकवत राहिली. अवंतिकाचा थकवा अधिक वाढला. दुर्जनसिंहाने तिच्या हातातली ढालही पाडली आणि तिला एक जोराची लाथ मारली. लाथेच्या धक्क्याने अवंतिका एकदम मागे गेली आणि सैनिकांच्या शवांच्या ढिगावर जाऊन आदळली. वेदना आणि थकव्यामुळे अवंतिकाला उठताही येत नव्हतं. रक्ताने तिचं अंग ओलंचिंब झालं होतं. अवंतिका पडल्याचं पाहताच सर्वजण तिच्याकडे धावले. अवंतिकाने आपला रक्ताळलेला थरथरता हात वर नेत सर्वांना थांबायला सांगितलं. दुर्जनसिंह मोठमोठ्याने हसत म्हणाला, “हा...हा...हा... बस... झालं... इतकंच... मी तर ऐकलं होतं राजकुमारी अवंतिका खूप शूर लढवय्यी आहे... पण तूही तुझ्या आईसारखीच निघालीस... एकाच वारात तिचा खात्मा केला होता मी... आणि आता तुझाही तसाच अंत करणार... हा...हा...हा...” हे म्हणत असतानाच दुर्जनसिंहाने तलवार उगारली. अवंतिकाने डोळे मिटले. क्षणभरात महाराणी सुलेखादेवीचा चेहरा तिच्या समोर आला. अवंतिकाने जमिनीत हात खुपसला. तिच्या हाताला तलवारीची मूठ लागली. अवंतिकाने डोळे उघडले आणि, “दुर्जनसिंह...” अशी गर्जना करत तिच्यावर चाल करून येणाऱ्या दुर्जनसिंहावर एकच वार केला. त्याचक्षणी दुर्जनसिंहाचं शीर धडावेगळं झालं. त्याचं शरीर अवंतिकाच्या पायाशी पडलं. युद्ध संपलं होतं. अवंतिकाच्या विजयाचा जल्लोष होऊ लागला. दिवस मावळला. दुसऱ्या दिवशी अवंतिकाने दैदिप्यमान अशा सोहळ्यात महाराणी पदाची सूत्र हाती घेतली. त्या सिंहासनाधीश झाल्या. त्यांच्या मस्तकावर राजमुकूट स्वत: महाराज कनकसिंहांनी चढवला. महाराणी अवंतिकाने पहिला आदेश दिला, “दुर्जनसिंह आणि कालीसिंह यांनी दिलेले सर्व आदेश रद्द करण्यात यावेत आणि त्यांनी लादलेल्या सर्व करांमधून नागरिकांची मुक्तता व्हावी...” या पहिल्याच आदेशामुळे सर्वात आनंदाची लाट पसरली, “महाराणी अवंतिकाचा विजय असो...” या लालकारीने पूर्ण सुजानगढ निनादत होता. हात उंचावून महाराणी अवंतिकाने सर्वांना शांत केलं. त्या पुढे बोलू लागल्या, “या लढ्यात माझ्यासोबत अनेक वीर लढले. काहींना वीरमरण आले आणि काही जखमी झाले. त्या सर्वांच्या कुटुंबियांची जबाबदारी आता आम्ही आमच्या खांद्यावर घेत आहोत...” बोलता बोलता अवंतिकाचे डोळे पाणावले. डोळे पुसत त्या म्हणाल्या, “आमचे तीर्थस्वरूप, आमचे अंगरक्षक भीमसिंह, आज आमच्या सोबत नाहीत याची आम्हास खंत आहे...

आम्ही ज्वाला आणि तिच्या वडिलांना विनंती करतो की त्यांनी इथेच सुजानगढमध्येच रहावं. म्हणजे ज्वालाच्या रूपाने आम्हास राजकुमारी सोनाप्रमाणेच अजून एक हक्काची बहिण, मैत्रीण मिळेल आणि तिच्या वडिलांच्या रुपात मायेचं छत्र सदैव आमच्या सोबत असेल. त्यांच्या संपूर्ण गावाची निगा आजपासून सुजानगढ राखेल. भीमसिंहांच्या जाण्याने सैन्यात जी पोकळी निर्माण झाली आणि ती भैरवने भरून काढावी अशी आमची इच्छा आहे. भैरव आजपासून आमचा मुख्य सेनापती असेल...” हे बोलत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या आदित्यकडे अवंतिकाने पाहिलं. त्याच्या डोळ्यातलं कौतुक आणि मनातलं प्रेम दोन्हीही तिला समजलं होतं. आपलंही आदित्यवर प्रेम आहे याचीही तिला जाणीव होती. ती पुढे जाण्यास कचरत होती. आदित्य हसला आणि पुढे झाला. सर्वांसमक्ष अवंतिकासमोर गुडघ्यावर बसत तो म्हणाला, “महाराणी अवंतिका, आपण आज राणी झालात पण तरीही आपण माझ्यासाठी त्याच अवंतिका आहात. माझ्या लहानपणापासूनच्या माझ्या साथीदार. महाराणी अवंतिका, आपल्या जीवनाशी माझं जीवन जोडलं जावं ही एकच इच्छा आहे...” अवंतिकाने लाजून एकदा सर्वांकडे पाहिलं. सर्वांच्या नजरेत होकार होता. यथावकाश अवंतिका आणि आदित्यचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. जुलूमाच्या चिखलातून सुजानगढ कमळासारखा पुन्हा फुलला आणि सर्वत्र आनंदी आनंद पसरला...

समाप्त.