Wednesday, July 11, 2018

एक कप चहा...



रात्रीचा सुमार होता. पाऊस वातावरणाला झोडपून काढत होता. निर्मनुष्य रस्त्यावरून आर्यन झपाझप पावलं टाकत होता. अधून-मधून तो मागे वळून पाहत होता. मागे कोणीच नव्हतं पण आपला कोणीतरी पाठलाग करत आहे असा भास आर्यनला होत होता. कसाबसा तो स्टेशनवर पोहोचला. आर्यनने घड्याळात पाहिलं. पावसामुळे साडेनऊलाच त्याचं घड्याळ बंद पडलं होतं. त्याने स्टेशनवर सगळीकडे पाहिलं कुठेही घड्याळ दिसत नव्हतं. आडगावातलं स्टेशन ते, क्वचित एखादी ट्रेन तिथे थांबते. तिथे घड्याळ कुठलं असायला. किती वाजलेत हे कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. जिन्यालगतच्या एका बाकड्यावर आर्यन बसला. त्याचं सामान त्याने बाजूलाच ठेवलं आणि एकदा सभोवार नजर फिरवली. पाऊस, अंधार आणि एकलकोंडं स्टेशन याखेरीज त्याच्या नजरेस काहीच पडत नव्हतं. काही अंतरावर दिव्याखाली बाकावर कोणीतरी घोंघडी पांघरून बसलेलं आर्यनला दिसलं. “ओ दादा... ओय... ओ भाऊसाहेब...” असं बसल्या जागेवरून आर्यन ओरडला. घोंघडी फक्त सारखी झालेली आर्यनला दिसली...

आर्यन उठला आणि त्या घोंघडी पांघरलेल्या व्यक्तीकडे जाऊ लागला. त्याच्याकडे येणारा वारा जणू त्याला सांगत होता, “थांब... जाऊ नकोस तिथे... धोका आहे...” पण ती बाकावरील व्यक्ती एखाद्या चुंबकासारखी आर्यनला आपल्याकडे खेचत होती. बाकाजवळ पोहोचताच पुढे वाकून आर्यन म्हणाला, “माफ करा दादा... गाडी येऊन गेली का... का, येणार आहे अजून...” आवाज ऐकून बाकावर बसलेल्या माणसाने घोंघडी सारखी केली आणि अंगाची मुटकुळी करून घेतली. ती व्यक्ती काहीच उत्तर देत नाही पाहिल्यावर आर्यन आपल्या सामानाकडे वळणार इतक्यात वाऱ्यासरशी घोंघडी बाजूला झाली. आर्यनने पाहिलं तर ती एक मुलगी होती. साधारण वीस-पंचवीस वयातली ती मुलगी असावी. दिव्याच्या अंधुक प्रकाशातही तिचं सौंदर्य खुलत होतं. आर्यनला मोहित करत होतं. जरा वेळ तसाच त्या मुलीकडे पाहत आर्यन भानावर आला. म्हणाला “माफ करा. मी चुकून तुम्हाला दादा, भाऊसाहेब म्हणालो. मला माहित नव्हतं तुम्ही आहात. मी काही करू शकतो का तुमच्यासाठी...” त्या मुलीने पुन्हा घोंघडी सारखी केली आणि अवघडल्यासारखी दिसली. आर्यन जाण्यासाठी वळला तेव्हा त्याला आवाज ऐकू आला, “एक कप चहा...”

आर्यन पुन्हा मागे वळला. त्याने त्या मुलीच्या जवळ जात तिला विचारलं, “क...काय म्हणालात... पुन्हा सांगा...” ती मुलगी घोंघडी बाजूला करत म्हणाली, “एक कप चहा हवा आहे... थंडी वाजते आहे...” आर्यनने आजू-बाजूला पाहिलं आणि आपलं सामान ती मुलगी बसली होती त्या बाकाजवळ आणत म्हणाला, “ठीक आहे. मी करतो काहीतरी. पण माझं हे सामान जरा बघा हा...” आर्यनने सगळं स्टेशन पालथं घातलं पण तिथे चिटपाखरूही नव्हतं. शोधत शोधत तो बाहेर आला. रस्त्याच्या कडेला एक चहाची टपरी होती. एक कळकट माणूस त्यात पेंगत बसला होता. आर्यन टपरीजवळ गेला. त्या माणसाला उठवत चहा बनवायला सांगितलं. आधी त्या माणसाने थोडे आढेवेढे घेतले पण आर्यनने जास्त पैसे कबूल केल्यावर तो तयार झाला. चहा घेऊन आर्यन पुन्हा स्टेशनात परतला. त्या मुलीजवळ जात आर्यनने चहाचा ग्लास तिच्यासमोर धरला. तिने स्मित केलं आणि चहाचा ग्लास घेतला. “मी इथे बसलो तर चालेल का...” आर्यनने माफक सूर काढला. त्या मुलीने पुन्हा सिमत केलं आणि सावरून बसली. दोघंही चहाचे घोट घेऊ लागले. काही क्षण शांततेत गेल्यावर आर्यन बोलता झाला...

“काय वातावरण आहे ना... हा पाऊस तर थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि अशावेळी असा गरमागरम चहा मिळाला तर किती छान वाटतं. बाय द वे, मी आर्यन. आणि तुम्ही...” चहाचा एक घोट घेत ती मुलगी म्हणाली, “मी दिशा. या स्टेशनवर न जाणो किती काळापासून एक कप चहाची वाट पाहत होते... आज योग आला...” आर्यनला दिशाच्या म्हणण्याचा अर्थ नाही समजला. बुचकळ्यात पडल्यासारखा तो चहाचा घोट घेऊ लागला. दिशाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, “तुम्हाला समजलं नाही वाटतं माझं म्हणणं. समजेल समजेल. ट्रेन तर येऊ देत...” पाऊस वाढत होता आणि दोघांच्याही कपातला चहा संपत आला. आर्यन प्रश्न विचारत होता आणि दिशा तेवढ्याच तेवढं उत्तर देत होती. आर्यनला दिशाचं ते बोलणं, तिचं तिथे असणं जरा खटकत होतं. इतक्यात कडाक्याची वीज चमकली. आवाजासरशी दिशाने आर्यनला मिठी मारली. त्याचवेळी एक ट्रेन वेगाने स्टेशनवरून गेली. दिशा आणि आर्यन दोघांनीही डोळे गच्च बंद करून घेतले. ट्रेन निघून गेली तसं आर्यनने डोळे उघडले. त्याने पाहिलं तर दिशा तिथे नव्हती. त्याने आजू-बाजूला पाहिलं पण कोणीच नव्हतं. आर्यन जागेवरून उठला आणि स्टेशनभर दिशाला शोधू लागला...

त्याला दूरवर दोन माणसं बोलताना दिसली. आर्यन त्यांच्या जवळ गेला तर एक टी.सी. होता तर दुसऱ्याच्या हातात हिरवा बावटा होता. आर्यन म्हणाला, “अहो, तुम्ही इथे एका मुलीला पाहिलंत का... घाऱ्या डोळ्यांची अशी पंचविशीतली ती मुलगी मागे बाकावर बसली होती. पाहिलंत का तिला...” तो टी.सी. बाकाच्या दिशेने पाहत म्हणाला, “काय... बाकावर... आज पुन्हा... अरे देवा... हे दुसऱ्यांदा झालं आहे. चल रे लवकर चल... दाखव मला...” तो टी.सी. आणि तो बावटाधारी दोघंही बाकाकडे धावले. मागोमाग आर्यनही निघाला. धावता धावता, “कुठे चाललास आर्यन... अरे मी इथे आहे...” हा आवाज आर्यनला ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिलं तर दिशा उभी होती. तिचे विस्कटलेले केस, पूर्ण पांढरे कपडे, मोठमोठे डोळे पाहून आर्यन क्षणभर घाबरला. लगेच सावरत म्हणाला, “दिशा, अगं कुठे गायब झालीस क्षणात...  मी तुला शोधायला गेलो तेव्हा तो टी.सी. दिसला. मी त्याला...” दिशाने आर्यनच्या तोंडावर हात ठेवला. म्हणाली, “मी इथेच आहे आणि इथेच राहणार... आणि आर्यन, तूही आता माझ्यासोबतच राहशील... कायमचा... नाही समजलं...” दिशाने तिचा हात आर्यनकडे नेला. वरून पडणारं पावसाचं पाणी तिच्या हाताच्या आर-पार जात होतं. नुसतं हाताच्याच नाही तर तिचं पूर्ण शरीराच पारदर्शक दिसत होतं...

आर्यन चरकला. मागे मागे जाऊ लागला. दिशाने त्याला थांबवलं आणि बाजूलाच असलेल्या काचेजवळ नेलं. काचेत आर्यनला त्याचं प्रतिबिंबच दिसत नव्हतं. त्याचे डोळे विस्फारले. इतक्यात तो टी.सी. आणि तो बावटाधारी त्याच्या बाजूने गेले. टी.सी. म्हणाला, “काय अभद्र स्टेशन आहे हे... दोन महिन्यांपूर्वी पंचविशीतली एक मुलगी त्या बाकावर मृतावस्थेत सापडली आणि आता हा मुलगा... काय घडतंय इथे काय माहित. पण जे काही आहे ते फार अघोरी आहे... भयानक आहे... अमानवी आहे...” आर्यन त्या दोघांच्या समोर उभा राहिला पण त्याचं अस्तित्व त्या दोघांना जाणवतच नव्हतं. आर्यनच्या शरीराच्या आर-पार जात ते दोघं स्टेशनबाहेर नाहीसे झाले. आर्यनने धावत बाकाजवळ जाऊन पाहिलं तर त्याचं सामान बाकाच्या बाजूला होतं. बाकावर आर्यनचं मृतशरीर होतं. त्याची मान पूर्ण मागे वळली होती व डोळे बाहेर आलेले दिसत होते आणि बाकाच्या बाजूला जमिनीवर होता एक कप चहा...

समाप्त.

Sunday, July 8, 2018

मस्करी...



दुपारचे चार वाजत आले होते. तेराव्या मजल्यावरच्या कँटीनमध्ये सिया, आकाश, विपूल आणि पूनम गप्पा मारत बसले होते. सिया म्हणाली, “यार किती बोरिंग झालं आहे सगळं... तेच तेच रूटीन आयुष्य...” सियाला दुजोरा देत आकाश म्हणाला, “हो ना... तेच दुपारी दोन ते रात्री दहाचं ऑफीस आणि मग घर... वेगळं काहीच घडत नाही. हा, शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे काय तो वेगळेपणा, पण बाकी...” ज्यूसचा घोट घेत पूनम म्हणाली, “मला काय वाटतं, काहीतरी थ्रिल, काहीतरी भन्नाट घडायला हवं... व्हॉट से...” विपूल बराच वेळ शांत बसला होता. काही विचार करून तो म्हणाला, “आयडिया... सर्वांना काहीतरी वेगळं हवं आहे ना... मग मस्करी...” कोणाला काहीच कळत नव्हतं. विपूलने मोबाईल काढला आणि काही बटणं दाबून, “डन...” असं म्हणत सर्वांकडे पाहू लागला...

सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा त्याला समजल्या. विपूल म्हणाला, “सांगतो सर्व सांगतो... ऐका... आपण मस्करी करायची लोकांची... आपलं सर्वांचं ऑफीस दहा ते साडेदहा या वेळेत संपतं. उद्या कोणीच घरी नका जाऊ. नाहीतरी परवा शनिवार आहे... त्यामुळे ऑफीसला येण्याचं टेंशन नाही... रात्री बाराला ग्राऊंड फ्लोअरला लिफ्टजवळ सर्वांनी जमा. मी आत्ताच एक मस्त वस्तू ऑनलाईन मागवली आहे. उद्या सकाळपर्यंत ती माझ्याकडे पोहोचेल. ती पोहोचली की मस्करी सुरू...” विपूल सांगत होता आणि सर्वांच्या मुद्रा बदलत होत्या. सर्वांना विपूलची आयडिया आवडली. आता सर्वांचं लक्ष उद्या रात्रीकडे लागलं होतं. दुसऱ्या दिवशी चौघंही आपापली कामं उत्सुकतेने करत होते. साडेदहा पर्यंत दुपारच्या शिफ्टचे सर्व बाहेर पडले. रात्रीची शिफ्ट सुरू व्हायला बराच वेळ होता. अखेर रात्रीचे बारा वाजले...

सर्वजण लिफ्टजवळ जमले. आकाश रिसेप्शनवर थांबला आणि सावज येण्याची वाट पाहू लागला. दारातून एक मुलगी येताना दिसली. आकाशचा इशारा मिळताच विपूल लिफ्टसमोर उभा राहिला आणि सिया व पूनम कॅमेरा सरसावून लपून बसल्या. ती मुलगी टप्प्यात आली आणि विपूलने बटण दाबलं. लिफ्टचं दार उघडलं आणि विपूल आत शिरला. लिफ्ट आल्याचा आवाज येताच ती मुलगी धावत पुढे येत, “सर, जरा थांबा... मलाही यायचं आहे...” असं ओरडू लागली. आत गेलेल्या विपूलने हात बाहेर काढला. दार बंद झालं आणि हात बाहेर राहिला व लिफ्टसोबत वर जाऊ लागला. वरच्या चौकटीवर पोहोचताच हात खाली पडला आणि त्यातून रक्त येऊ लागलं. तुटलेला हात पाहून ती मुलगी किंचाळली. तिला काय करावं समजत नव्हतं. ती सैरभैर झालेली पाहून आकाश, सिया आणि पूनम जोरात हसत बाहेर पडले...

“सॉरी सॉरी हां... आम्ही फक्त मस्करी करत होतो... तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी...” सिया त्या मुलीला दिलासा देत म्हणाली खरी पण तिचं हसणं काही थांबत नव्हतं. काही क्षणात विपूल खाली आला. तो म्हणाला, “सॉरी मिस... आम्ही मस्करी करत होतो... हा पडलेला हात खोटा आहे आणि ते रक्त नाही, रोज सिरप आहे...” हे सर्व पाहून ती मुलगी खूप चिडली. सर्वांना शिव्या देत लिफ्टजवळ पोहीचली पण लिफ्टने न जाता जिन्याने गेली. हे पाहून ते सर्व अजून जोरात हसू लागले. आलटून पालटून एकाने सावज हेरायचं, दुसऱ्याने हात लिफ्टमधून बाहेर टाकून सावजाला घाबरवायचं आणि बाकी दोघांनी हे सर्व शूट करायचं. हा त्यांचा खेळ बराच वेळ चालू होता. शेवटी सिया आणि पूनम म्हणाल्या, “ए आता बास रे... उशीर झाला आहे खूप...” पण आकाश आणि विपूलचा नूर काही वेगळाच होता. विपूल म्हणाला, “काय रे तुम्ही दोघी... आत्ता कुठे मजा यायला लागली होती आणि तुम्ही...” आकाश म्हणाला, “हो ना यार... अभी तो रात बाकी है... पण ठीक आहे. आता माझी पाळी आहे. एक लास्ट मस्करी...” सिया आणि पूनम म्हणाल्या, “बघ हा... फायनल ना...” आकाश आणि विपूलने माना डोलावल्या. सर्वजण आपापल्या जागेवर गेले व सावजाची वाट पाहू लागले...

एक माणूस दारातून येताना दिसला. सियाने खूण करताच विपूल व पूनम कॅमेरा घेऊन लपून बसले आणि आकाश लिफ्टजवळ आला. त्याने तशाच प्रकारे लिफ्ट वर जाताना नकली हात बाहेर टाकला. हात पाहून तो माणूस गांगरला. “सिक्यूरीटी... सिक्यूरीटी... हेल्प... हेल्प...” असं म्हणत तो पळू लागला. तेवढ्यात सिया, पूनम आणि विपूल जोरजोरात हसत बाहेर आले. पूनम म्हणाली “सॉरी सर... आम्ही जरा मस्करी करत होतो. लिफ्टमधून वर जाणारा व हा खोटा हात खाली टाकणारा तो आमचाच मित्र आहे... व्हेरी सॉरी सर...” तो माणूस अजूनही चरफडत होता. म्हणाला, “कसली अघोरी मस्करी ही... आणि खरंच असा हात तुटला असता म्हणजे...” पूनम हसत म्हणाली, “अहो काहीतरीच काय... असा हात तुटेल का कधी...” सिया पूनमला दुजोरा देत म्हणाली, “हो ना... उगाच आम्हाला घाबरवता कशाला सर...” सर्वांकडे एक नजर फिरवत त्या माणसाने, “पहायचं आहे तुम्हाला हात कसा निखळतो ते...” असं म्हणत स्वत:च्या हाताकडे पाहिलं...

त्याचा तो हात एका झटक्यात मुख्य शरीरापासून वेगळा झाला आणि तरंगायला लागला. तो तरंगता हात पाहून सर्वांचे श्वास अडकले. तो माणूस पुढे म्हणाला “हे तर काहीच नाही... अजून पहायचं आहे तुम्हाला...” हे म्हणत असतानाच डाव्या हाताने त्या माणसाने त्याचं डोकं धरलं आणि खाडकन धडावेगळं केलं. भिबत्स आणि किळसवाणं हसत तो माणूस सिया, पूनम आणि विपूलकडे पाहू लागला. काही क्षणात आकाश खाली आला. त्यानं पाहिलं तर सिया, पूनम आणि विपूल जमिनीवर पडले होते. त्यांची तोंडं उघडी होती आणि डोळ्यात भीती दिसत होती. आकाशने सर्वांच्या नाड्या चेक केल्या. डोळे मोठे करत आकाश म्हणाला, “ओह नो... दे ऑल आर डेड... पण... हे कसं... इथे कोण आलं... हे काय...” इतक्यात त्याच्या खांद्यावर एक हात पडला. आकाशने मागे पाहिलं तर तो मगाचचाच माणूस त्याच्या समोर उभा होता. तो म्हणाला, “लोकांची मस्करी करता करता त्याची कुस्करी होते ती अशी... आता पुन्हा तुम्ही कधीच कोणाची मस्करी करणार नाही... हा...हा...हा...” तो माणूस किळसवाणा हसत लिफ्टकडे वळला आणि बंद लिफ्टच्या आर-पार जात गायब झाला. फाटलेल्या डोळ्यांनी आ वासून आकाश त्या माणसाला पाहत राहिला...

सकाळचे सात वाजले होते. रिसेप्शनजवळ गर्दी जमा झाली होती. पोलीस तपास करत होते. इंस्पेक्टरने डॉक्टरला मृत्यूचं कारण विचारलं तर ते म्हणाले, “तूर्तास तरी हेच सांगता येईल, की हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे या चौघांच्याही प्राणावर बेतलं...” इंस्पेक्टर म्हणाले, “पण यांचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत आहेत... त्यांनी असं काहीतरी भयानक पाहिलं ज्यामुळे भितीने त्यांचं हृदय बंद पडलं. पण... असं काय पाहिलं त्यांनी... आणि हा खोटा हात काय करतो आहे या ठिकाणी... काय घडलं असावं इथे...”

समाप्त.

प्रवासी...


मध्यरात्र उलटून गेली होती. तुफान पाऊस पडत होता. वादळ-वारा तर, "बाहेर पडू नका... काहीतरी अघटित घडेल..." असं सांगू पाहत होता. अशा वातावरणात निर्जन रस्त्यावरच्या एका बस स्टॉपवर एक जोडपं बसलं होतं. ती म्हणाली, "संजय, अरे इतका वेळ आपण इथे आहोत. पाऊसही वाढत चालला आहे. गाडी येईल का रे अशा वेळी..." संजय सभोवार नजर फिरवत म्हणाला, "वाट पाहण्याखेरीज आपण अजून काय करू शकतो... गाडी आली तर ठीक. नाही, तर आपलं नशीब..." ती थोडी उदास झाली. इतक्यात काही अंतरावर असलेल्या वळणावर प्रकाश दिसला आणि मागोमाग गाडीचा हॉर्न ऐकू येऊ लागला...

संजयने तिला तिथेच स्टॉपवर बसायला सांगितलं आणि स्वत: रस्त्यावर आला. डोळे किलकिले करत संजयने पाहिलं तर एक मोठी जीपवजा गाडी येताना दिसली. गाडीचे वायपर हलत होते. फ्रंट लाईटच्या प्रकाशात ड्रायव्हरला कोणीतरी हातवारे करताना दिसलं. गाडीचा स्पीड मंदावला. काही क्षणात काळ्या रंगाची टाटा क्वॉलीस संजयजवळ येऊन थांबली. काच खाली होताच संजयने आत पाहिलं. ड्रायव्हर आणि त्याच्या साथिदारासह अजून दोघंजण मागे बसले होते. संजय सर्वांना म्हणाला, "माफ करा. आमची गाडी बंद पडली. मी आणि माझी पत्नी कसेबसे चालत या बसस्टॉपपर्यंत पोहोचलो. पण आता पुढे जाववत नाही. तुम्ही आम्हाला पुढच्या गावापर्यंत सोडाल का..."

ड्रायव्हरने सर्वांकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. संजयचा हात दिसताच ती धावत गाडीजवळ आली. त्या दोघांना मधल्या सीटवर बसवून बाकी दोघं सर्वात मागे जाऊन बसले. गाडी सुरू झाली आणि संजय बोलता झाला, "मी, संजय. ही माझी पत्नी वसुधा. आम्ही देवीला जात होतो तर गाडी बिघडली. बरं झालं तुम्ही भेटलात. नाहीतर या पावसात टिकाव धरणं मुश्कील झालं होतं..." मागे बसलेल्या दोघांपैकी एक म्हणाला, "तुम्ही बाहेर होता ते बरं होतं की इथे बसलात ते बरं झालं हे समजेलच आता..." त्याचं बोलणं संपतं न संपतं तोच त्याच्यासह बाकी तिघंही हसायला लागले. त्यांचं ते हसणं पाहून वसुधा घाबरली. गाडी रस्त्याच्या कडेला थांबली. वसुधा संजयचा हात पकडत म्हणाली, "स...संजय... आ...पण यांच्या स...सोबत नको जायला... चल उतरू..."

दोघं उतरणार इतक्यात ड्रायव्हरचा साथिदार वसुधाचा हात धरत म्हणाला, "चाललीस कुठे... या अशा वातावरणात तू इथे असताना आम्ही तुला कसे जाऊ देऊ... पळव रे गाडी आणि जाऊ दे सरळ जंगलात..." इशारा मिळताच ड्रायव्हरने अॅक्सलरेटर दाबला. गाडीने कर्कश आवाज करत वेग घेतला आणि बाजूलाच असलेल्या झाडीत शिरली. गाडी एका झाडाजवळ थांबली आणि पावसालाही भेदणारा आर्त किंकाळ्याचा आवाज व मागून येणाऱ्या भिबत्स हसण्याचा आवाज साऱ्या जंगलात घुमला. विजा चमकत होत्या आणि पाऊस गाडीवर तसाच कोसळत राहिला...

सकाळ झाली होती. गाडीच्या आस-पास वर्दळ दिसत होती. पोलीस तपास सुरू होता. "बोला, काय पाहिलंत तुम्ही..." इंस्पेक्टरने एकाला विचारलं. तो इसम म्हणाला, "काय सांगू सायेब... फाटं आम्मी कामावर जायाला निगालू आन वाटत ह्यो परकार दिसला बगा... त्यांची तसली हालत बगुनशान आम्माला तर काय बी बोलताच येईना..." इंस्पेक्टरने पुन्हा गाडीकडे पाहिलं. आत चार प्रेतं होती. त्या चौघांच्याही माना पूर्ण वळवलेल्या होत्या आणि डोळ्यांतून बुबूळं गायब होती. इंस्पेक्टर म्हणाला, "फार भयानक मरण आलं यांना... पण अशा प्रकारे यांचे खून झाले तरी कसे असतील..." बाजूलाच उभा असलेला हवालदार म्हणाला, "सर, या परिसरातली खुनाची ही दुसरी घटना...

तुमची नुकतीच बदली झाल्यामुळे तुम्हाला काही माहीत नाही याबद्दल. सहा महिन्यांपूर्वी याच भागात दोन मृतदेह सापडले होते. ते जोडपं होतं सर. तपासात समजलं, की मुलीवर...... मुलाला खूप मारहाण झाली होती. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा छिन्न-विछिन्न अवस्थेत मुलीचं प्रेत जमिनीवर होतं तर मुलाचं प्रेत झाडाला बांधलं होतं. दोघांचेही गळे कापले गेले होते. बाजूलाच टायर मार्क दिसत होते. त्या प्रकरणाचा अजून सुगावा लागला नाही आणि आता हे..." इंस्पेक्टर विचार करत म्हणाला, "या दोन्हीही घटना कदाचित एकमेकांशी जुळत असाव्यात... मागच्या घटनेची फाईल पहायला हवी..." गाडी आणि प्रेतं पुढील तपासासाठी पाठवले गेले आणि इंस्पेक्टर व हवालदार चौकीवर आले...

फाईल मिळवून इंस्पेक्टर ती चाळू लागला, "हम्म्म... मुलाचं नाव होतं संजय आणि मुलीचं वसुधा... बिचारे... फिरायला जात असतील आणि हाकनाक बळी पडले..." मध्यरात्रीचा सुमार. पाऊस तसाच मी म्हणत होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टॉपवर दोघं उभी होती. ती म्हणाली, "संजय, अरे इतका वेळ आपण इथे आहोत. पाऊसही वाढत चालला आहे. गाडी येईल का रे अशा वेळी..." संजय म्हणाला, "वाट पाहण्याखेरीज आपण अजून काय करू शकतो... गाडी आली तर ठीक..." इतक्यात काही अंतरावर असलेल्या वळणावर प्रकाश दिसला आणि मागोमाग गाडीचा हॉर्न ऐकू येऊ लागला...

समाप्त.